Powered by Blogger.

Friday, 21 October 2016

वैदेही
ताईराणी...
खूप खूप आशीर्वाद बेटा
येत्या 8 मे ला तू 21 वर्षांची होते आहेस. एक सुजाण, समंजस आणि खूप शहाणी मुलगी. आतापर्यंतचे तुझे वाढदिवस साजरे करताना न जाणवलेली एक अनामिक हुरहुर यावेळी जाणवते आहे. एकीकडे तुला सर्वच दृष्टीनं मोठं झालेलं पाहून उर अभिमानाने भरून येतो आहे, दुसरीकडे मात्र काहीतरी हातातून निसटून जात असल्याची अस्वस्थ जाणीव. खरंतर तू जशी मोठी होत गेली, तसं आपलं नातं अधिक बहरत गेलं. आधी केवळ आई-मुलीचं असलेलं आपलं नातं नंतर मैत्रिणींचंही झालं. माझ्या जीवनातली बहिणीची रिकामी जागाही तू सहज घेतली आणि आजी गेल्यानंतरच्या एका भावूक क्षणी तर तुच माझी आई झालीस. मात्र या सगळ्यात तुझं बालपण दूर दूर गेलं. ही हुरहुर कदाचित त्याची आहे. तुझं लहानपण घट्ट पकडून ठेवावसं वाटतं आहे. तू टाकलेलं पहिलं पाऊल, तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलीस, तो क्षण. तुझ्या कुरळ्या जावळाचा सुगंध, तुझे मनगट्या घातलेले गोरेगोबरे हात आणि वाळे घातलेली गुलाबी पावलं. जीवाला लगडलेल्या या आठवणींची यादी खूप मोठ्ठी होईल. त्या सगळ्या सुखावणाऱ्या आठवणी मी तुझ्या आंगड्या टोपड्यांमध्ये गुंडाळून मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. तुला मोठं होताना पाहणं हा देखील सुखाचा सोहळा आहे.
हे तुझ्या आयुष्यातलं संक्रमणाचं वर्ष. आता उबदार घरट्यातून विस्तीर्ण मोकळ्या अवकाशात उड्डाण घेणं अपरिहार्य आहे. त्यासाठी पंखांमध्ये पुरेसं बळ तू गोळा केलं आहेस. मात्र यावेळी मला आठवते, ती श्रावण बाळाची गोष्ट ऐकताना स्फुंदणारी तू. काबुलीवाला पाहताना हमसाहमशी रडणारी हळवी वैदेही. मात्र बेटा जगात वावरताना हळवेपण आणि कणखरपणा यातील अदृष्य सीमारेषा जपावी लागते. आपला हळवेपणा आपला दुबळेपणा ठरू नये. अनेक निर्णय मनानं नव्हे डोक्‍यानं घ्यावे लागतात. संवेदना आणि कर्तव्य यांची सरमिसळ करून चालत नाही. हे मनावर कायम कोरून घे. एकदा सुरक्षित चार भिंतींच्या बाहेर पडलीस की, सगळ्या प्रवृत्तीची माणसं भेटतील. तेव्हा नीरक्षीर विवेक आकळलाच पाहिजे. आयुष्यात धनाची जोड नाही मिळाली तरी चालेल, पण माणसांच वैभव असलंच पाहिजे. त्यासाठी दोन्ही आबांचा आदर्श ठेव. सोशिकपणासाठी अनघाआजीचा आदर्श असू दे आणि कुठल्याही परिस्थितीला हिंमतीनं सामोरं जाण्यासाठी लताआजीचा आदर्श असू दे.
आता तुझे निर्णय तुलाच घ्यायचे आहेत, कधीतरी ते चुकतीलही. मात्र कोणत्याही परिस्थितीत तू एकटी नाहीस. मी आणि बाबा सदैव तुझ्या पाठीशी आहोत, याची जाणिव असू दे.
मल्लिकार्जून मन्सूर यांनी गायलेली सुंदर बंदीश आहे, जेव्हा समुद्राला ओहोटी लागते, तेव्हा चंद्र हतबल असतो आणि जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं, तेव्हा समुद्रही हतबल असतो, मात्र या दोन्ही स्थिती कायम नसतात. समुद्राला पुन्हा भरती येते आणि चंद्राचं ग्रहणही सरतं. आयुष्याचही असचं आहे. सुख आणि दु:ख कधीच कायम नसते. मात्र दोन्ही परिस्थितीत आपला संयम ढळू द्यायचा नसतो.
प्रामाणिकपणानं आणि मेहनतीनं यशोशिखर गाठ, आकाशाला गवसणी घाल. पण पाय जमिनीवरच असू देत. कितीही वादळ आलीत तरी मूळं जमिनीत घट्ट रुजलेली असली ना की झाड उन्मळत नाही. आयुष्यात यश, ऐश्‍वर्य मिळवताना माणूस म्हणूनही मोठ्ठी मोठ्ठी होत राहा, बाबांसारखी.
तुझ्या नावामागे असलेल्या बाबांच्या नावाला आणि पूर्वजांच्या आडनावाला अभिमानं वाटेल, असचं नेहमी वाग. आणि गार्गीवर खूप खूप माया कर बेटा. मला आईपण दिल्याच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. मी तुमच्यासाठीच आहे बेटा. फक्‍त तुमच्याचसाठी.

तुझीच आई
swati
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह