सरती दिवाळीस्वाती हुद्दारदिवाळी म्हणजे काय उत्सव आणि उत्साहाची रेलचेल. माणसांचे संमेलन, मनोमीलन, आठवणींना उजाळा, नातेसंबंधांची उजळणी. काही हव्याशा नात्यांचा ओलावा आणि दुखावलेल्या नातेबंधांना मलमपट्टी आणि कधीतरी नकोशा पण जपाव्या लागणारी नात्यांची ओढगस्तीही.दिवाळी सरली आणि निवांतपण घरादारावर विसावले. गेले पाच दिवस घरदार, अंगण, भांडीकुंडी आणि माणसांमागेही कमालीची लगबग होती. साऱ्या विश्वावर चैतन्याच्या खाणाखुणा होत्या. अंगणं रांगोळ्यांनी सजली होती. घराघरांत फराळाचे तिखट-गोड सुगंध कोंदले होते. गप्पाष्टक रंगत होती. हास्याच्या लकेरी घुमत होत्या. पणत्या लुकलुकत होत्या. आकाशदिवे दिमाखाने मिरवत होते. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. आता मात्र सरत्या दीपोत्सवाच्या खाणाखुणांचे रंग घरादारावर पसरू लागले आहेत. परवा घरच्या लेकीबाळींनी कौशल्याने रेखलेली सुंदर रांगोळी जराशी पुसटली आहे. दारावर लावलेल्या झेंडूच्या केशरी माळाही कोमेजल्या आहेत. हिरवेगार आंब्याचे मंगलदायी तोरणही सुकले आहे. फराळाचे जिन्नस ठेवलेल्या पदार्थांनी तळ गाठला आहे. उरलेल्या रांगोळ्यांच्या डब्यांनी कपाटात आपली जागा पटकावली आहे. देवघरासमोरचे औक्षवणाचे तबक कालच्या ओवाळणीच्या सुखद आठवणीत रमले आहे. काही आकाशदिवे आणि दीपमाळा अजूनही तेवताहेत. पाच दिवस घर प्रकाशमान करणाऱ्या पणत्या आता कोनाड्यात जाऊन बसल्या आहेत. काल मिळालेल्या ओवाळणीच्या साडीने कपाटातल्या साड्यांच्या ढिगावर शीग ठेवली आहे. घरदार दिवाळीचे सुख अंगाखांद्यावर मिरवते आहे. दिवाळी म्हणजे काय उत्सव आणि उत्साहाची रेलचेल. माणसांचे संमेलन, मनोमीलन, आठवणींना उजाळा, नातेसंबंधांची उजळणी. काही हव्याशा नात्यांचा ओलावा, आणि दुखावलेल्या नातेबंधांना मलमपट्टी आणि कधीतरी नकोशा पण जपाव्या लागणारी नात्यांची ओढगस्तीही. दिवाळी झाली की रिकामपण भरून राहते मनामनात. श्रावणापासूनची सणउत्सवांची धावपळ समेवर आलेली असते. सणउत्सवाच्या संकल्पना कदाचित बदलल्या असतीलही; मात्र माणसाला सणांचे अप्रूप आजही आहेच. पूर्वी चुलीच्या जाळाशी बसणाऱ्या बायका आज रेडीमेड फराळाने ताट सजवून दिवाळी पहाटला जात असतील. एकमेकांना सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देत असतील. व्हर्च्युअल भाऊबीज साजरी करीत असतीलही. पण दिवाळीनिमित्त येणारी माहेरची सय तीच असते. डोळे आजही माहेरच्या वाटेकडे लागतात आणि बीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळताना अलगद डोळ्यांच्या कडाही पाणावतात. दिवाळी संपली आणि आज अंगण पणत्यांनी झगमगले नाही. दीपमाळा लखलखल्या नाहीत. कालपर्यंत पाहुण्यांनी गजबजलेली बैठकीची खोली आज हिरमुसली आहे. अंगणातल्या भिंतीलगतच्या कोपऱ्यात चुकून राहून गेलेली पणती जळलेल्या वातीशी सुखदु:खाच्या गुजगोष्टी करते आहे आणि अंगणाबाहेरच्या कचऱ्याच्या ढिगामध्ये तो चौकापलीकडच्या वस्तीत राहणारा काटकुळा मुलगा एखादा जिवंत फटाका शोधतो आहे. कारण त्याच्या वस्तीत अजून दिवाळी पोहोचलेलीच नाही. | |||
Tuesday, 24 October 2017
Monday, 9 October 2017
मी मुलगी आहे म्हणून...स्वाती हुद्दार11 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला जागतिक मुलगी दिवस. संयुक्त राष्ट्रसंघाला का गरज भासली मुलगी दिवस साजरा करण्याची? कारण जगभरातील मुलींचे प्रश्न एकसारखेच आहेत. लैंगिक असमानतेचे चटके जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुलीला सहन करावे लागत आहेत. मुलगी असण्याच्या समस्यांचा सामना करण्याचे गांभीर्य संयुक्त राष्ट्रसंघातही नोंदले गेले आणि 2012 पासून 11 ऑक्टोबर हा जागतिक मुलगी दिन म्हणून साजरा होतो आहे.परवा एका प्रदर्शनात लागलेल्या छायाचित्राने लक्ष वेधून घेतले. एक पाच वर्षाची छोटीशी मुलगी डोक्यावर पाण्याचा हंडा, पोटाचा नगारा, केसांच्या जटा, हातापायाच्या काड्या, पोटातील भूक डोळ्यात उतरली होती. आणि प्रश्नही होता, मी मुलगी आहे म्हणून ? ते छायाचित्र खूप बोलके होते. 2017 सालीही मुलींची अवस्था समाजात काय आहे, हे त्या छायाचित्राने सांगितले. मुलींची ही अवस्था केवळ आपल्या आजुबाजुला आहे किंवा केवळ आपल्या देशात आहे, असे नाही. बालिकांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या नाहीत, असा एकही दिवस जात नसेल. थोड्याफार फरकाने जगभर मुली अशाच समस्यांशी आजही लढताहेत. आजही जगभरातल्या 62 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. 5 ते 14 वयादरम्यानच्या मुलींना घरकामासाठी राबवून घेतले जाते आहे. चार पैकी एका मुलीचा आजही 18 वर्षापेक्षा कमी वयात विवाह होतो आहे. जगभरातल्या अनेक बालिकांना लैंगिक छळ सोसावा लागतो आणि लाजिरवाणी गोष्ट ही की गुन्हेगार मोकाट सुटतात. बालविवाह, लैंगिक शोषण, कायदेशीर हक्क, आरोग्याचे प्रश्न आणि शैक्षणिक मागासलेपण या मुलींविषयीच्या जागतिक समस्या. या समस्या जागतिक व्यासपीठासमोर याव्यात आणि त्यांच्या निवारणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न व्हावेत, या जाणिवेतून जागतिक मुलगी दिवसाची सुरुवात झाली. कॅनडाच्या तत्कालिन महिला व बाल कल्याण मंत्री रोना ऍम्ब्रोस यांनी सर्वप्रथम 19 डिसेंबर 2011 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 55 व्या अधिवेशनात ही संकल्पना मांडली आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंम्बीलीने त्यासाठी मतदान करीत ती संकल्पना उचलून धरली. जागतिक मुलगी दिनाच्या माध्यमातून मुलींच्या कल्याणाच्या दृष्टीने भरीव कार्य करण्यासाठी जागतिक स्तरावरील एक अशासकीय संस्था स्थापन करण्यात आली. मी मुलगी आहे या कॅम्पेनच्या माध्यमातून जगभरातल्या विशेषत: मागास आणि विकसनशील देशातील मुलींच्या पालनपोषणाचे प्रश्न ऐरणीवर आलेत आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येऊ लागले. मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी विविध देशात अनेक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. नाटक, खेळ, सेमिनार अशा उपक्रमांमधून बालिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. 2016 मध्ये लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला महोत्सवात 250 शाळकरी मुलींनी सल्लागाराची भूमिका पार पाडली. अमेरिकेचे तत्कालिन राश्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2016 साली लैंगिक असमानता झुगारून देण्याचे आव्हान केले. Dayof the girl या हॅशटॅगच्या माध्यमातून याविषयीचे उपक्रम आणि बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आणि त्याद्वारे जनजागृती करण्यात येऊ लागली. जगाची अर्धी लोकसंख्या असलेल्या बालिकांचे मागासलेपण, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांचे शैक्षणिक मागासलेपण हे जागतिक विकासाच्या आड येते आहे. हे गरीबीचे आणि मागासलेपणाचेही प्रमुख कारण आहे. जागतिक विकासात महिलांचा सहभाग आणि लैंगिक समानता हिंसेच्या घटना आणि गुन्हेगारी कमी करण्यास नक्कीच सहाय्यभुत ठरतील, या निर्णयावर संयुक्त राष्ट्रसंघ आले आहे. 21 व्या शतकात तरी बालिकांना त्यांचे मानवी हक्क मिळावेत, त्यांचे अनारोग्य दूर व्हावे, निर्णयप्रक्रीयेत त्यांचा सहभाग असावा, यादृष्टीने जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने दरवर्षी एक थिम राबवली जाते, आतापर्यंत बालविवाह बंदी, बालिका शिक्षणपद्धती सुधारणा, किशोरवयीन मुलींचा उत्कर्ष आणि हिंसेचे चक्र संपविणे, किशोरवयीन बालिकांची शक्ती : व्हिजन 2020 आणि गर्ल प्रोग्रेस :गोल प्रोग्रेस अशा विविध थिम राबविण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे हे विविध उपक्रम हा बालिकांच्या सर्वांगिण विकासाचा केवळ एक भाग आहेत. बालिकांच्या समस्या या हिमनगासारख्या आहेत. जगासमोर आले आहे ते केवळ त्याचे एक टोक. जगभर चालणारे हे सगळे प्रयोग ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. खरोखर बालिकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळायचे असतील, तर लैंगिक असमानतेच्या मनोवृत्तीवरच प्रहार केला पाहिजे. मनामनांमध्ये ठासून भरलेली महिलां आणि बालिकांविषयीची दुय्यम भावना ज्या दिवशी गळून पडेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता समाजात रुजेल. तो दिवस लवकरच येईल, या आशेसह. | |||
Subscribe to:
Posts (Atom)