| बाईची गं माझी जात स्वाती हुद्दार विनयभंग, अत्याचाराच्या घटना सततच्याच. अशा घटनांनंतर समाजात उठणारे पडसादही नेहमीचेच. काहींचे हेलावणे, सल्ले देणेही कायमचेच. मात्र, आता स्त्रीनेच याविरुद्ध ठामपणाने उभे राहिले पाहिजे, काहीतरी ठोस केलेच पाहिजे, या निष्कर्षापर्यंत या अलीकडच्या घटनांनी आणून पोहोचवले आहे. | डिसेंबर-जानेवारीच्या समेवरची गोठवणारी थंडी. 2016 मधून सारे जग 2017
मध्ये संक्रमित होत होते. सगळीकडे नववर्षाचा जल्लोष सुरू होता. मात्र, बदलत्या
वर्षाच्या साक्षीने बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात बदलत्या पिढीचे प्रतिनिधित्व
करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग होत होता. नसते उठले आवाज, नसत्या झडल्या अर्थहीन आणि
परिणामहीन चर्चा याही घटनेविषयी, तर ही घटनादेखील काळाच्या कुठल्याशा कोपऱ्यात
वळचणीला दडपली गेली असती इतर एक, दोन, तीन, अनेक, अनंत, रोजच घडणाऱ्या घटनांसारखी.
मात्र, सीसीटीव्हीच्या डोळ्यांनी ही घटना टिपली आणि मग सुरू झाले चर्वितचर्वण न
संपणारे. आम्ही तर रोजच अनुभवतोय असे प्रसंग. कधी गर्दीचा फायदा घेऊन होणारे नकोसे
स्पर्श, नकोसे इशारे, नकोशा नजरा... करतोच आहोत की सामना या सगळ्यांचा
वर्षानुवर्षे, युगानुयुगे... अगदी रामायणकाळापासून. रामासारखा योद्धा पती असलेल्या
सीतेलाही सहन करावा लागला रावणाचा हिडीस स्पर्श, स्वीकारावी लागली त्याची कैद आणि
प्रियतम पतीने स्वीकारावे म्हणून द्यावी लागली आपल्याच पवित्रतेची अग्निपरीक्षा.
अहल्येलाही मिळाली होती शिक्षा मनविहीन, भावनाविहीन दगड बनण्याची... न केलेल्या
चुकीसाठी. आणि बघावी लागली होती वाट राम नावाच्या पुरुषाचीच उद्धारासाठी.
महाभारतातली द्रौपदीही नव्हती अपवाद या अवमानाला. पाच योद्धे पती समोर असताना
दु:शासनाने केली फरपट भरसभेत, दुर्योधनाने दाखवली उघडी मांडी आणि कर्णानेही केली
निर्भर्त्सना. आजही आम्ही होतोच आहोत अवमानित. घरी, दारी, बंगल्यात आणि झोपडीतही.
काळ बदलतोय की सोकावतोय आमच्यासाठी न कळे! जिजाऊ, सावित्रींनी प्रशस्त केलेल्या मार्गावर पावले टाकत आम्हीही कर्त्या झालो आहोत. मोठ्या पदव्यांचे आणि पदांचेही रेशमी वस्त्र परिधान करून जगभर मिरवतो आहोत. पण, पुरुषी अहंकाराने लादलेले अवमानाचे लक्तर काही पाठ सोडत नाही. उलट, अवमानाच्या या कुरूप खुणा दिवसेंदिवस अधिकच बटबटीत होत जाताहेत, अस्वस्थ करताहेत समाजमन. "तितलियों के पखों पर रख दिये गये पत्थर, रेशमी लिबाजों को चिरते है कुछ खंजर' हीच तर स्थिती आहे ना! मग कुणी म्हणते, कायदे कठोर करा. कुणी म्हणते, कठोरातली कठोर शिक्षा करा. कुणी म्हणते, कपडे बदला. कुणी म्हणते, सातच्या आत घरात व्हा. कुणी म्हणते, कराटे शिका. कुणी म्हणते, मोबाईल ऍप डाउनलोड करा. कुणी म्हणते, जोरात ओरडा. कुणी म्हणते, तीच जबाबदार, तिचे कपडे जबाबदार, तिचे दिसणे जबाबदार... कधीतरी कुणी म्हणेल तिचे असणेच जबाबदार... त्याची वृत्ती जबाबदार, असे कुणी का म्हणत नाही? त्याची दृष्टी वाईट, असे कुणी का म्हणत नाही? त्याने बदलावे, असे म्हणण्याची हिंमत कुणी का करीत नाही? पुन्हा हव्या आहेत सावित्रीबाई, आमच्या मनगटात ताकद भरण्यासाठी. आमच्या मनात स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. अवमानाविरुद्ध ठाम उभे राहण्यासाठी. त्याला त्याच्या चुकीचा जाब विचारण्यासाठी. हवी आहे पुन्हा एक जिजाऊ परस्त्रीविषयी आदर बाळगण्याचे बाळकडू पाजणारी. आणि हो, हवा आहे एक शिवबाही आयाबहिणींच्या अब्रूसाठी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडणारा, शत्रूच्या सुनेचाही साडीचोळी देऊन गौरव करणारा, तिच्यातही आपली आई पाहणारा. प्रत्येकच ऋतुचक्रात शिशिर येतोच, पानगळ होतेच. मात्र, हा शिशिर वसंताच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येतो. वठलेल्या झाडांना आशेची लुसलुशीत पालवी येते. पण, मैत्रिणींनो, आमच्या जीवनातला शिशिर सरता सरत नाहीए. वठलेल्या बुध्यांना प्रतीक्षा आहे नवसंजीवनी देणाऱ्या वसंताची. तो वसंत फुलविणे तुमच्या-माझ्याच हातात आहे. गरज आहे प्रत्येक स्त्रीने जिजाऊ बनण्याची, आपल्या मुलाच्या मनात महिलांविषयी आदरभाव निर्माण करण्याची. एवढे जरी आपण केले, तरी नक्कीच अशा नकोशा घटनांची संख्या कमी होईल. आपण जागरूक झालो तर सरकारने शाळा-महाविद्यालयातून लैंगिक शिक्षण दिले किंवा न दिले तरी फरक पडणार नाही. थोडासा संकोच बाजूला ठेवून आपल्या घरातल्या मुलामुलींना वास्तवाची जाणीव करून द्या. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचे वेगळेपण सांगा. मात्र, स्त्रीलाही मन असते, हे सांगायला विसरू नका. अर्धे प्रश्न तिथेच संपतील आणि हळूहळू का होईना, वसंताचे आगमन होईलच. पुरे झाली असोशी संसाराची, समाजाची. आता घ्यायलाच हवा शोध माझ्यातल्याच "मी'चा. तन्वीर गाझी म्हणतो त्याप्रमाणे- तु खुद कि खोज में निकल तु किस लिये उदास है तु चल तेरे वजुद कि समय को भी तलाश है | ||||||
Tuesday, 17 January 2017
Subscribe to:
Posts (Atom)