Powered by Blogger.

Tuesday, 28 May 2024

जिण्याचा आषाढ मेघ व्हावा

स्वाती हुद्दार 

 
 आशा निर्माण करणारा आणि ओढ लावणारा तो आषाढ. कृषक, कलावंत, धार्मिक साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. ज्येष्ठाच्या मध्यावर अवचित येणारा पाऊस आषाढात स्थिरावत जातो. पारावर पावसाविषयीच्याच गप्पा रंगतात. काळी भुई बीज पोटात रुजवून घ्यायला सज्ज असते. हरिनामाचा गजर करीत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या दिंड्यांतील पावलांना लय गवसली असते. टाळ-चिपळ्यांच्या तालावर अभंग रंगला असतो. फेर धरले जातात. फुगड्या खेळल्या जातात. वारीतल्या भगव्या पताका काळ्या ढगांनी व्यापलेल्या आकाशात लहरत असतात. डोईवरची कृष्ण तुळस, गळ्यातली तुळशी माळ आणि कपाळावरचा अबीर सावळ्या विठ्ठलाला कडकडून भेटायला आतूर झालेले असतात.
गवय्याने छेडलेले मल्हारचे सूर पाऊसधारांना आवाहन करीत असतात.
अशा पार्श्वभूमीवर आभाळातून अमृतधारा बरसतात आणि सारी सृष्टी चैतन्याने न्हाऊन निघते. धुळीचे भस्म लावून ध्यानस्थ बसलेल्या वेशीवरच्या वडाच्या पानापानांतून पाऊस थेंब अलवार ओघळतात. वडावरची घरटी चिवचिवतात. अलगद अंगावर उडालेल्या पाऊस तुषारामुळे वडाच्या आश्रयाला आलेल्या गायीचे अंग थरथरते. वडाखााली वाटसरूही निथळत उभे राहतात.
असा हा आषाढ. महिन्यांच्या क्रमातला चवथा. एका हातात पांडुरंग भक्ती आणि दुसऱ्या हातात गुरूभक्ती घेऊन येणारा. महाकवी कालिदासाला मेघदुताची रचना करायला लावणारा.
म्हणूनच कलावैदर्भीचा आषाढ अंक आषाढ विशेष म्हणून सादर करीत आहोत.

आदिमानवाची आर्टगॅलरी
स्वाती हुद्दार
अन्न, पाणी आणि हवा या मुलभूत गरजांइतकीच मानवाची आणखी एक निकड आहे आणि ती म्हणजे कला. अन्न, पाणी, हवा या शारीरिक गरजा आहेत, तर कला ही मानसिक गरज आहे. आणि ही कलाच माणसाला पशुंपेक्षा वेगळे ठरवते. कशासाठी-पोटासाठी या ऱ्हिदमवर चाललेली सारी वणवण, धावपळ करून थकलेल्या मनाला ही कलाच कुशीत घेऊन जोजवते आणि माणूस पुन्हा एकदा सिद्ध होतो, पोटासाठी धावायला.
संगीत, नृत्य, चित्र अशी कोणतीही कला त्या-त्या व्यक्तीच्या आवडीनुसार त्याला आनंद देते.
कलेशी असलेले हे मानवाचे नाते अलिकडचे नाही, तर अगदी पूर्वापार आहे, आदिमानव काळापासूनचे. त्याच्या खुणा आज आधुनिक काळातही सापडतात. दिवसभर शिकारीमागे धावून शिणलेला आदिमानव मध्यभागी अग्नी प्रज्ज्वलित करून त्याभोवती एकमेकांच्या हातातहात गुंफून फेर धरत असे. ते विरंगुळ्याचे क्षण त्याला आनंद आणि उभारी देत असत, उद्याच्या जगण्यासाठी. हा इतिहास बराच अलिकडचा. मात्र जवळपास १२००० ते २०,००० हजार वर्षांआधीही मानव कलासक्त होता. या खुणा सापडतात, त्याच्या चित्रांच्या माध्यमातून.
१२ ते २० हजार वर्षांपूर्वी पाषाण युगातील आदिमानव कदाचित नृत्य-संगीत या कलाविधांची आराधना करीत असेल, मात्र त्याच्या खूणा आज उपलब्ध नाहीत, पण आदिमानवाच्या कलावंत बोटांतून उतरलेला रंगरेषांचा खजिना मात्र साऱ्या विश्वातील अनेक गुहांमध्ये उपलब्ध आहे. मानव समूहाने राहू लागला तेव्हापासून त्याने आपलं जगणं, संस्कृती यांचं प्रतिबिंब पर्वतामधील गुहांमध्ये चित्रं काढून मागे ठेवलं. या पाऊलखुणाच इतिहास संशोधनात मार्गदर्शक ठरतात. फ्रान्स, स्पेनमधल्या लास्को, अल्टामिरा, आफ्रिकेतील कालाहारी डेझर्ट आणि भारतातील भिमबेटका आदी ठिकाणच्या चित्रगुहांनी अश्मयुगीन मानवाच्या इतिहासाचे दालन उघडलं आहे.
आजवरच्या संशोधनातून उपलब्ध माहितीनुसार जगातील सगळ्यात जुनी गुहा चित्र स्पेनमधील कॅस्टिलो गुहांमध्ये आहेत. याठिकाणी हातांच्या छाप्यातून आणि बोटांच्या ठश्यांमधून साकारलेली चित्र आहेत.
भारतातही हा चित्रमय वारसा सापडला, १९५७ साली. अगदी योगायोगाने. संशोधक वृत्ती रोमारोमात भिनलेले  पुरातत्त्वशास्त्रज्ञ डाॅ. हरिभाऊ वाकणकर एकदा रेल्वेने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला.

त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला.
या भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे. येथील वेगवेगळ्या चित्रांचा काळजीपूर्वक अभ्यास श्री यशोधर मठपाल यांनी केला आहे. त्यांनी या चित्रांतील प्राण्यांच्या ऐंशी जातीओळखल्या आहेत. यांमध्ये अस्वल, लांडगा,तरस , गेंडा, हत्ती, रानडुक्कर, रानटी बैल, हरीण, काळवीट, ससा. माकडे मुंगीखाऊ (anteater),  उंदीर, मासे, कासवे, मोर, उडणारे पण काही तपशील नसलेले पक्षी या वन्यपशूंचा व कुत्रा या पाळीव पशूचा समावेश आहे. हरणे व काळवीट हे सर्वात जास्त संख्येने चित्र केलेले आहेत. माणसांच्या शिकारी टोळ्या दाखवलेल्या आहेत. यातील एक टोळी गेंड्यापासून दूर पळत आहे. इतर टोळ्या हरिण इत्यादी पशूंची शिकार करत आहेत. शिकारीसाठी भाले व धनुष्यबाण ही आयुधे वापरात आहेत. मासे व कासवे जाळ्यात पकडली आहेत तर उंदरांना त्यांच्या बिळातून हुसकून बाहेर काढून पकडले आहे. तसेच एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. यात घोडयावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत असे दिसते. बरोबर वाद्ये वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंड घेऊन चालणारा एक माणूस आहे. तसेच एका गुहेत एक पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा असे देखणे चित्र दिसते.
भीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ या पुरातत्त्ववेत्त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्‍यांच्या नावाची संशोधन संस्था उभारली आहे. तसेच यावर पुढे सखोल संशोधन करणारे यशोधर मठपाल यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अगदी अलिकडे सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यप्रदेशातील तापीच्या खो-यात हिमालयापेक्षाही जुन्या असलेल्या सातपुडा पर्वतराजीत हजारो वर्षांपूर्वीच्या चित्रगुहांचा शोध  लागला आहे. हजारो वर्षांपूर्वीची वन्यप्राण्यांची चित्रं त्या गुहेतील एका प्रचंड शिळेवर आहेत.  यात  वाघ, हत्ती, जिराफ, गेंडा, रानगवे, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वल, वानर, रानकुत्रे, गिधाड, इ. चित्रे लाल-गेरव्या रंगात  रंगवली आहेत. एवढेच नव्हे तर एका ठिकाणी झाडावरील फांदीला झोके घेणा-या एका आदिमानवाचे चित्रही  काढले आहे. त्याचे पाय मात्र वानराच्या पंज्यासारखे आहेत. कळपाने राहाणा-या वन्यप्राण्यात एके ठिकाणी रानकुत्र्यांचा कळप चित्रित केला आहे. जवळपास ७०-८० फूट रुंदीच्या आणि ४० फूट उंचीच्या या धनुष्यबाणासारख्या अर्धगोलाकार शिळेवरील चित्र   तळापासून चार फूट उंचीवरून डावीकडून उजवीकडे शेवटपर्यंत विशिष्ट अंतरावर काढली आहेत. . सातपुडा पर्वताच्या अतिउच्च परिसरात  अशा पाच गुहा सापडल्या आहेत. प्रत्येक गुहेतील चित्र आणि त्याची मांडणी जवळपास सारखीच होती. गुहेतील चित्रात चित्रित केलेल्या सर्व वन्यप्राण्यांचे डोके उजव्या बाजूने असल्याने ती उजवीकडून डावीकडे  काढली असावी.  चित्रगृहांमध्ये सर्व चित्रे वन्यप्राण्यांची असून केवळ गिधाड या एकमेव पक्ष्यास तेथे स्थान देण्यात आले आहे. . रंगज्ञानातही त्यावेळचा मानव अत्यंत हुषार होता. कारण एकाच रंगात सांबर आणि चितळ काढण्याची कला वाखाणण्याजोगीच आहे.मध्यप्रदेशाच्या तापी खो-यातील सातपुडा पर्वतात असलेली १५ हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगातील (upper peleolithic period) ही चित्रगुहा (cave painting)  पुसट झाली असली तरी ती आजही ओळखू येण्याइतपत चांगली आहे.
अश्मयुगीन आदिमानवाच्या कलाकुसरीचा ही काही उदाहरणे. जसा-जसा काळ पुढे सरकेल, तसे-तसे संशोधनही होत राहिल आणि काळाच्या कुशीत दडलेल्या अशा अधिकाधिक कलाकृती समोर येत राहतील, त्याचे विविध आयाम उलगडत राहतील.
काळाच्या ओघात उन-वारा-पावसाचा मारा सोसून या चित्रातील काही रंग धुसर झाले आहेत. काही चित्रही पुसट झाली आहेत, मात्र मानवी इतिहासाच्या अभ्यासावर या चित्रांनी उमटवलेली नाममुद्रा मात्र अक्षर आहे.
पुरातत्ववेत्त्यांच्या मते ही चित्र केवळ कला म्हणून चितारली गेलेली नाहीत, तर तो समुह शिक्षणाचा एक भाग होता. समुहाने राहणारा आदिमानव आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या पशु-पक्षांची ओळख आपल्या टोळीतील इतर सदस्यांना व्हावी, म्हणून आपल्या आवासात ही चित्र रेखाटत असावा.
असेही असले तरी त्याचे कलामूल्य अजिबात कमी होत नाही. उलट आदिमानवाची ही चित्रमय लिपी आणि समुह शिक्षणाची त्याची ही तऱ्हा अधिकच भावते.
१२ ते २० हजार वर्षांचा कालावधी उलटूनही कालप्रवाहातील सारे घाव सोसूनही गहिरे राहिलेले या चित्रांचे रंग, ते रंग तयार करण्याची त्याची हातोटी हे केवळ अप्रूप.
रंगरेषांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची मानवाची आदिम ओढ आजही आपल्यात जिवंत आहे. शब्दांचा, भाषेचा जन्मही न झालेल्या काळात चित्रलिपीतून व्यक्त होणाऱ्या आपल्या पुर्वजांचा वारसा मानव आज हजारो भाषांच्या जन्मानंतरही जोपासतो आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने समृद्ध झालेले आपण गॅझेट्सवर व्यक्त होताना भाषेपेक्षा चिन्ह वापरतो. निरनिराळ्या स्माईली वापरून आपल्या भावना सांगणे आपल्याला अधिक जवळचे, आपलेसे वाटते. याचे मूळ आदिमानवाशी असलेल्या ऋणानुबंधात दडलेले असावे का?
इथे आपण एक वर्तुळ पूर्ण केले आहे. चित्रलिपीपासून चित्रलिपीपर्यंतच्या प्रवासाचे.
आदिमानवाच्या या गुहाचित्रांचा प्रवास पुढे अधिकाधिक विस्तारत जाईल. आणि आजही अस्पष्ट असलेले आपले आदिम जग आपल्या पुढे उलगडत जाईल. तोपर्यंत उपलब्ध असलेल्या या गुहाचित्रांच्या खजिन्याचा आनंद घेऊया.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह