घर दोघांचेअत्याधुनिक बांधणीचे प्रशस्त घर. घरासभोवती मोकळी जागा. घरात भरून राहिलेला नवीन बांधकामाचा थंडावा. नुकत्याच केलेल्या रंगरंगोटीचा कोंदून राहिलेला सुगंध. वास्तुपुजा असल्याने घरावर केलेली रोषणाई. प्रवेशद्वारावर बांधलेले केळीचे खांब. दारासमोर रेखलेली सुंदर रांगोळी. सगळे काही आखीव रेखीव. दारातच त्याने जंगी स्वागत केले. नव्या घराचा, वास्तुपुजनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. हस्तांदोलन केल्यावर त्याने घर दाखवायला सुरुवात केली. ही ड्रॉईंगरुम. तो म्हणाला. उंची सोफासेट, खिडक्यांवर सोडलेले सुरेख रंगसंगती साधणारे पडदे, कोपऱ्यातील महागडी फुलदाणी, टीव्ही, म्युझिक सिस्टम, प्रकाश परावर्तित करणारे झुंबर आणि समाजातले त्याचे स्थान दर्शविणारे मोठ्या मंडळींबरोबरचे निवडक फोटो, त्याला मिळालेल्या पुरस्कारांनी भरलेली शोकेस आणि छोटासा बारही. सगळीकडे त्याच्या अस्तित्वाच्या खुणा ठासून भरलेल्या. बारकडे अंगुली निर्देश करून तो म्हणाला, दिवसभर घरासाठी राबल्यानंतर श्रमपरिहार हवाच ना! त्यानंतर त्याचे गडगडाट करणारे सातमजली हास्य. तेवढ्यात ती झळकली. कोणाशी तरी बोलत होती.घर बघणाऱ्या आमची मिरवणुक त्याच्यासकट स्टडी रुमकडे. उच्च अभिरुचीची दाद देणारी प्रत्येक गोष्ट. छोटासा राऊंड टेबल, त्याच्यासमोर आरामदायी खुर्ची, वाचताना सुलभ होईल अशी प्रकाशयोजना. त्याच्या आवडीच्या पुस्तकांनी भरलेली कपाटे. कपाट उघडून दाखवत अनेक पुस्तकांविषयी तो भरभरून बोलला. ही सगळी पुस्तके मी विशेष आवडीने जमवली आहेत. माझा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे, वगैरे वगैरे. कोपऱ्यात जुना ग्रामोफोन आणि एक सीडी प्लेयरही. बाजुला छोट्या कपाटात त्याच्या आवडत्या गाण्यांच्या सीडीज आणि एलपीजही. गझल मला खूप आवडतात. वाचताना सोबतीला जगजित लागतोच. काय दर्द आहे हो त्याच्या आवाजात. तो म्हणाला. याची बायको फार सुंदर गाते, असे ऐकल्याचे काहीतरी पुसटसे आठवले, एवढेच. आणि हो, स्टडी रुममधल्या आरामदायी खुर्चीच्या बाजूला छोटासा स्टुल आणि त्यावर एक ऍश ट्रे आणि बाजुला खुण घालून ठेवलेले कमला दासचे माय स्टोरी. माझी नजर त्यावर रोखलेली पाहून तो म्हणाला, हे माझे विशेष आवडीचे पुस्तक बरं का? काय संघर्ष आहे हो बाईचा. आजुबाजुला शोधक नजर फिरवली. त्याची बायको कुठेच नव्हती. आम्ही सगळे कीचनमध्ये. हे कीचन. त्याने मोघम सांगितले. देवघर, इतर खोल्या असे करीत करीत आमची मिरवणुक वरच्या मजल्यावरच्या बेडरुममध्ये. अद्ययावत सुखसोयींनी नटलेली बेडरुम, आरामदायी बेड, सुरेख रंगसंगतीने नटलेल्या भिंती, त्याच्याशी मेळ खाणारे झिरमिरीत पडदे, भिंतीवर एक अबोल ऍब्स्ट्रॅक्ट पेंटींग. ते कोणत्या प्रदर्शनातून किती कष्टाने आणि किती प्रयासाने खास बेडरुममध्ये लावण्यासाठी भरपूर किंमत देऊन त्याने खरेदी केले, याचे रसभरीत वर्णन त्याने ऐकवले. त्याच्या बायकोने जे जे स्कुल ऑफ आर्टसमधून पदवी घेतल्याचे आणि लग्नाआधी तिच्या चित्रांचे प्रदर्शन लागल्याचे कधीतरी ऐकले होते. इतकेच. बेडरुमला बाहेर प्रशस्त बाल्कनी. नारळाच्या झावळ्यांआडून आकाशातील चंद्रबिंब सहज दृष्टीपथात यावे अशा पद्धतीने केलेली झुलत्या पाळण्याची रचना, लाजवाबच. तो म्हणाला, मी रोज रात्री या पाळण्यावर बसून रात्रीच्या नीरव शांततेचा आनंद घ्यायला मला खूप आवडते. साग्रसंगीत आणि मनसोक्त घर बघून झाल्यावर आमची यात्रा बुफेकडे. तिथेही हा उत्साहाने ओसंडलेला. म्हणाला, सगळा मेनु माझ्या विशेष आवडीचा. खूप विचारपूर्वक ठरवला आहे. कॅटररला सांगितले, नो कॉम्प्रमाईज. आज माझे मोठमोठे क्लायंट्स येणार आहेत ना, शिवाय राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रातील मोठ्या असामींनाही मी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मेनु आणि टेस्ट मी सांगेन, तशीच असली पाहिजे. हळुच विचारले, एवढा सुंदर बंगला बांधलात, बराच खर्च... बॅंक बॅलन्स की...! छे छे, अहो बायको सरकारी नोकरीत आहे ना, तिने कर्ज काढले. पगारातून परस्पर पैसे कापले जातात. चिंता नाही. अहो घर दोघांचे आहे ना! त्याचे निरागस उत्तर! गेल्या दोन तासात त्याने तिचा केलेला हा एकमेव उल्लेख. हो! घर तिचेही होतेच न! घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या कागदपत्रांवर तिचेच नाव आहे. घर तिचेही असल्याची एकमेव खूण. त्याने विचारपूर्वक ठरवलेल्या मेनुचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. घराच्या प्रवेशदारावर मोठ्या ग्रेनाईटवर सोनेरी अक्षरांत त्याचे नाव कोरले होते. आणि झुलत्या झावळ्यांआडचा आकाशातला चंद्र उदास हसत होता. | |||
Monday, 11 December 2017
Subscribe to:
Posts (Atom)