बाळू
आज अचानक बाळू आठवला. खूप वर्षांआधी मी शाळेत शिकत असताना माझ्या माहेरच्या घरी बाळू यायचा. कधीही अवचित. वळिवातल्या पावसासारखा. कधीकधी आठवड्यातून दोनदा. तर कधी दोन-तीन महिन्यांनी एकदा. बाळू आला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याच्याभोवती गोळा व्हायचे. बाळूची वेळ बहुदा दुपारची. मायमाऊल्यांची धावपळ आटोपलेली असायची. घरची पुरुषमंडळी नोकरीधंद्याला गेलेली असायची. मोठी मुलं शाळा-कॉलेजला गेलेली असायची. मायमाऊल्या जरा निवांत झालेल्या असायच्या. बारकी पोर उगाचच इकडेतिकडे मिरवित असायची आणि अशावेळी बाळूची हाळी यायची. काय काकू काय करून राहिल्या. बाप्पा अजून झालचं नाही का जेवणखाणं. बाळूचा खणखणीत आवाज चाळीतल्या सगळ्या घरात पोहोचायचा आणि सगळ्या बायाबापड्या हातातली काम दूर सारून बाळूभोवती जमा व्हायच्या. कित्ती दिवसांनी आला रे बाळू, कुठं दडून बसला व्हता इतके दिवस? अशा चौकशा सुरू व्हायच्या. बाळूही प्रत्येकच बाईच्या प्रश्नाला समर्पक उत्तर द्यायचा. एव्हाना बाळूभोवती पोराटोरांचा गलका सुरू झालेला असायचा. नुकतच बोलायला लालेल्या कार्ट्यापासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत सर्वेजण बाळूला अरे बाळूच म्हणायचे. कुणीही त्याच्या नावापुढे कधी काका, मामा, दादा जोडले नाही. आणि बाळूलाही कधी त्यात वावगे वाटले नाही. पाहता पाहता सगळी चाळ बाळूभोवती गोळा व्हायची. बाळूचा वेषही कायम एकच. कधीतरी पांढरा असावा,असा ढगळ, विटलेला पायजामा. त्यावर दोन तीन ठिकाणी फाटलेला शर्ट, खांद्यावर मळका पंचा. डोक्यावरचे केस कायम भादरलेले. मध्यभागी एक काळीपांढऱ्या केसांची शेंडी. दाढीचे खुंट वाढलेले. पायात कधी तुटकी चप्पल, तर कधी ती पण नाही. आवाज मात्र कायम खणखणीत, उत्साही. सगळ्या आयाबाया जमल्या, इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या की कुणीतरी काकू बाळूला गाणं म्हणायचा आग्रह करायची, आणि जणू त्याचीच वाट पाहात असलेला बाळू तारस्वरात आपलं गायन सुरू करायचा. चाळीतल्या एखाद्या घरात सबकुछ बाळू असलेला विविध मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मध्ये बाळू आणि त्याच्या भवताल चाळीतल्या सगळ्या आयाबाया आणि पोरंसोरं. एव्हाना बाळूचा खांद्यावरचा पंचा कमरेला बांधला जायचा. आणि खड्या आवाजात बाळू गाऊ लागायचा. डॉक्टर होणा...र. लहान मुलांना इंजेक्शन मी कधी न दे...णार. इथून सुरू झालेला बाळूच्या गाण्याचा प्रवास अनेक मराठी कविता पार करीत करीत भातुकलीच्या खेळामधली, वगैरे गाण्यांपर्यंत येऊन पोहोचायचा. सोबतीला उड्या मारीत केलेला नाच. त्यानंतर मुद्दाम फर्माईश केलेली एक दोन गाणी आणि नंतर बाळूचे खड्या आवाजातील उखाणे. महादेवच्या पिंडीवर उदबत्तीचा वास, रावांना देते मी जिलबीचा घास. अशा उखाण्यांची अहमहमिका लागायची. गाणे आणि उखाण्यांची मेजवानी संपली की, कोणीतरी मावशी, काकु बाळूला म्हणायच्या, दळण आणून देतोस का बाळू? बाळू लगेच तयार व्हायचा. मग डोक्यावर काकुंचा, हातात मावशींचा डबा घेऊन बाळूचे ध्यान चक्कीवर जायचे. चक्कीवरून आल्यावर कोणीतरी विहीरीचे पाणी काढून मागायचे. कोणीतरी आंगण झाडून मागायचे, अशी प्रत्येक घरची कामाची जंत्री संपली की सगळ्या घरातून बाळूसाठी जेवण यायचे, काकू म्हणायच्या बाळू ही लोणचाची डबी घेऊन जा, नवीन घातले आहे. मावशी म्हणायच्या, बाळू फणसाची भाजी खाऊन बघ. कोणी भात वरण, कोणी काही गोडधोड बाळूसाठी आणून द्यायचे. बाळू यथेच्छ जेवायचा. वरून एखाद्या घरातून आलेला फक्कड चहा बशीत ओतून मन लाऊन प्यायचा. जेवणाची, चहाची मन भरून स्तुती करायचा. तेवढ्यात एखाद्या म्हाताऱ्या आजी कपड्यांचे बोचके घेऊन यायच्या. बाळू हे आमच्या मन्याचे शर्ट आहेत, चांगलेच आहेत हो, तुला होतील आणि या धडक्या चादरी आहेत, मुद्दाम तुझ्यासाठी काढून ठेवल्या होत्या, घेऊन जा, असे म्हणत प्रेमाने ते बोचकं बाळूच्या स्वाधीन केलं जायचं. येतो वं काकू, असा मोठ्ठ्याने निरोप घेऊन बाळू उड्या मारत निघुन जायचा.
बाळू आमच्या चाळीव्यतिरिक्त कधी एखाद्या खानावळीत पाणी भरताना दिसायचा, कधी धान्याच्या दुकानात पोते उचलताना दिसायचा. तेव्हाही त्याचा उत्साह तेवढाच असायचा. बाळूला कधी चिंता करताना, विचार करताना, निराश झालेलं कुणी पाहिलंच नाही. असा सर्वत्र संचार असलेला बाळू कधीतरी अचानक यायचा बंद झाला. सुरुवातीला वर्ष दोन वर्ष त्याची सगळ्यांना आठवण यायची. हळुहळु जीवनाच्या रामरगाड्यात बाळू विस्मरणात गेला. तो कुठून आला, कोणाचा कोण होता, कुठे राहायचा, हे कुणालाच कधी कळलं नाही. तसंचं तो अचानक कुठे गेला, त्याचं काय झालं, हे देखील कुणाला कळलं नाही. पुढे चाळीतल्या सगळ्यांचीच पांगापांग झाली. मुली लग्न होऊन सासरी गेल्या, मुलं नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडले, कुणी ब्लॉकमध्ये राहायला गेले, मात्र आमच्या मुलांना बडबडगीत शिकवताना हटकून आजही बाळू आठवतो, आणि नकळत डोळ्याच्या पापण्या ओलावतात. दोन घास अन्नासाठी आणि कुणाच्या तरी उतरलेल्या कपड्यांसाठी बाळू राबत राहिला, दोन घटका मनोरंजन करत राहिला. वस्तीनही बाळूला आपलं मानलं. आपल्या घासातला घास त्याच्यासाठी काढून ठेवला. सणासुदीला गोडाधोडात बाळूचा वाटा पक्का असायचा. वस्तीतल्या प्रत्येक घरात स्वयंपाकघरापर्यंत वावर असलेला बाळू कोणालाच परका वाटला नाही. आजच्या काळात असा बाळू एखाद्या वस्तीत सापडणं कठीणच आहे. कारण बाळूसारख्यांना सामावून घेणारी समाजव्यवस्थाच आता उसवली आहे.
स्वाती हुद्दार
6 एप्रिल 2016