Powered by Blogger.

Saturday, 17 February 2018

ऍन ते परवाना

स्वाती हुद्दार

सामान्य जनता सत्तापिपासुंचे अनन्वित अत्याचार नाईलजास्तव मुग गिळून सहन करीत राहिली. त्यात सर्वाधिक भरडली गेली स्त्री. कुठल्याही देशात, कुठल्याही समाजात. तिला आवाजच नसला तरी मन मात्र असतं आणि ते आतल्याआत आक्रंदत असतं. कधीतरी ते कोणाच्याही नकळत व्यक्‍त होण्याची बंडखोरी करीतच असतं. अशीच व्यक्‍त झाली नाझींच्या अत्याचाराला घाबरून अज्ञातवासात गेलेली फ्रन्क कुटुंबातली ऍन. तिच्या डायरीच्या माध्यमातून. साल होते 1942. आणि अशीच व्यक्‍त झाली परवाना डेबोरा एलीसच्या शब्दांमधून. साल होते 2000. ऍन होती अवघी 13 वर्षांची आणि परवाना तर केवळ 11 वर्षांची. 1942 ते 2000 यामध्ये आणि आगेमागेही. अगणित असंख्य कहाण्या आहेत. अशाच किंवा यापेक्षाही भयंकर. व्यक्‍त झालेल्या आणि अव्यक्‍तही.


पाषाणयुगापासून ते विज्ञानयुगापर्यंतचा मानवाचा प्रवास. अचंबित, स्तंभित करणारा. कधीतरी गुहांमध्ये वास्तव्य करणारा मानव आता संगमरवरी घरांमध्ये राहतो. भुकेपोटी श्‍वापदांची शिकार करून कच्चे मांस भक्षण करणारा मानव आता स्वादिष्ट, रुचकर पदार्थ सेवन करतो आणि खाणाखुणांनी मुक संवाद साधणारा मानव आता साहित्य प्रसवतो. तत्वज्ञानावर चर्चा करतो. सभा-संमेलने गाजवतो. हे सगळे बदल घडून यायला युगे लोटावी लागली. हा मानवाचा माणुसपणाकडे होणारा प्रवास होता, असे मात्र म्हणता येणार नाही. कारण या प्रवासात मानव युद्ध विसरला नाही. त्याने हिंस्त्रपणाचा त्याग केला नाही. तो शिकार विसरला नाही. फरक इतकाच. आधीची शिकार, आधीची लढाई त्याच्या पोटाच्या भुकेसाठी होती आणि आताची लढाई महत्त्वाकांक्षेच्या भुकेसाठी आहे. स्वार्थासाठी आहे, साम्राज्य विस्तारासाठी आहे. जातीसाठी आहे. धर्मासाठी आहे.
मुठभर साम्राज्यवाद्यांसाठी, धर्मांधांसाठी भरडली गेली मात्र सामान्य निरपराध जनता. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होणारी टोळीयुद्ध असोत. मुघल काळातील भारताला छिन्नविछिन्न करणाऱ्या शाहांच्या लढाया असोत, पहिले महायुद्ध असो, वंशभेदापोटी झालेला अनन्वित छळ असो की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी हिटलरने केलेला ज्युंचा छळ असो. भारत-पाक फाळणी दरम्यान वाहिलेले रक्‍ताचे पाट असोत, आयाबहिणींच्या अब्रुची वेशीवर टांगलेली लक्‍तरे असोत, अलिकडे मध्य पूर्व आशीयात तालिबान, इसिसच्या माथेफिरुंनी केलेली छळवणुक असो, म्यानमारमध्ये लष्करी सत्तेने केलेले सामान्यांचे दमन असो की आजघडीला सुरू असलेला रोहिंग्याचा प्रश्‍न असो, की उत्तर कोरीयाच्या माथेफिरु किम जॉंगच्या अण्वस्त्रांच्या भयावह चाचण्या आणि त्या दडपणाखाली जगत असलेला जनसमुदाय असो ( ही यादी बरीच लांबवता येईल) सत्ताधाऱ्यांनी माणुसकी नेहमीच पायदळी तुडवली आहे.
स्वत:चा आवाजच नसलेली सामान्य जनता सत्तापिपासुंचे अनन्वित अत्याचार नाईलजास्तव मुग गिळून सहन करीत राहिली. त्यात सर्वाधिक भरडली गेली स्त्री. कुठल्याही देशात, कुठल्याही समाजात. तिला आवाजच नसला तरी मन मात्र असतं आणि ते आतल्याआत आक्रंदत असतं. कधीतरी ते कोणाच्याही नकळत व्यक्‍त होण्याची बंडखोरी करीतच असतं. अशीच व्यक्‍त झाली नाझींच्या अत्याचाराला घाबरून अज्ञातवासात गेलेली फ्रन्क कुटुंबातली ऍन. तिच्या डायरीच्या माध्यमातून. साल होते 1942. आणि अशीच व्यक्‍त झाली परवाना. डेबोरा एलीसच्या शब्दांमधून. साल होते 2000. ऍन होती अवघी 13 वर्षांची आणि परवाना तर केवळ 11 वर्षांची. 1942 ते 2000 यामध्ये आणि आगेमागेही. अगणित असंख्य कहाण्या आहेत. अशाच किंवा यापेक्षाही भयंकर. व्यक्‍त झालेल्या आणि अव्यक्‍तही.
इसवीसन 1942. दुसऱ्या महायुद्धाचा ऐन भराचा काळ. आताचे नेदरलॅंड आणि तेव्हाचे हॉलंडही नाझींच्या अनन्वित छळाला बळी पडले होते. राजधानी ऍमस्टरडॅमपर्यंत छळाचा वणवा पसरला होता. फ्रॅंक या चौकोनी सुखवस्तु कुटुंबालाही अज्ञातवासात जाणे भाग पडले. फ्रॅंक कुटुंबातील लहान मुलगी ऍन हिने वाढदिवसाला भेट मिळालेल्या डायरीत रोजनिशी लिहिणे सुरू केले. 14 जुन 1942 रोजी ऍनने लिहिणे सुरू केलेल्या डायरीत शेवटची नोंद 1 ऑगस्ट 1944 या दिवशीची आहे. त्यानंतर अज्ञातवासातले फ्रॅंक कुटुंब पकडले गेले. ऍन आणि तिची मोठी बहीण मार्गारेट यांना बर्जेर बेल्सन इथल्या छळ छावणीत ठेवण्यात आले. तिथेच या दोघी बहिणींचा मार्च 1945 मध्ये दुर्दैवी मृत्यु झाला. ऍनला छळछावणीत काय सोसावे लागले हे कळायला मार्ग नाही कारण तिथे ती रोजनिही लिहू शकली नाही. मात्र त्या छळाची कल्पना करता येते. कारण छळछावणीत अवघ्या 7 महिन्यातच ऍनचा मृत्यू झाला.
अज्ञातवासातल्या दिवसांचे अत्यंत जिवंत वर्णन ऍनने रोजनिशीत केले आहे. आपण कधीही पकडले जाऊ ही कायमची दहशत. सतत सुरू असलेला बॉम्बचा वर्षाव. त्याची सुचना देणारा भयावह सायरन. शाळा बंद, मित्रमैत्रिणी नाहीत. ठरावीक साचेबद्ध जीवन आणि उपलब्ध असलेले जेवण. एकच समाधान. सगळे कुटुंब एकत्र असण्याचे आणि अजून तरी जिवंत असण्याचे. थोडक्‍यात मृत्युच्या छायेतले 2 वर्षाचे बंदिस्त जगणे. मुळातच परिपक्‍व असलेली ऍन या दोन वर्षात अधिकच परिपक्‍व होत गेली. मानवी भावभावनांकडे, स्वत:च्या गुणदोषांकडे त्रयस्थपणे पाहण्याची कला तिला वयाच्या तेराव्या वर्षीच प्राप्त झाली. रोजनिशी लेखन हा तिचा विरंगुळा होता. एखाद्या जिवाभावाच्या सखीशी संवाद साधावा, अशा पद्धतीने ऍन या रोजनिशीत व्यक्‍त होत गेली. दोस्त देशांच्या फौजा पोहोचल्या आहेत आणि लवकरच आपली इथून सुटका होणार आहे, अशी आशा करीत असतानाच एक दिवस ही सगळी मंडळी पकडली गेली आणि महायुद्ध संपले तेव्हा केवळ ऍनचे वडील जिवंत उरले. त्यांनी पुढे ऍनची डायरी प्रकाशित केली. ज्यू म्हणून जन्माला येणे हा एकमेव गुन्हा केलेल्या अगणित ज्यूंच्या हालअपेष्टांची मूक कहाणी ऍनची ही डायरी सांगते.
इसवीसन 1992. सोव्हिएत रशीयाचे अफगाणिस्तानातले अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर उदय झाला तालिबानी राजवटीचा. शरयतीच्या नावाखाली तालिबानींनी अफगाणी जनतेचे जगणे नकोसे केले. कधीतरी सुजलाम सुफलाम असलेला अफगाणिस्तान आता उरला एक उद्धवस्त खंडहर. मोठमोठी विद्यापीठ, सुंदर इमारती यांच्या जागी दिसायला लागले केवळ मातीचे ढिगारे. केव्हाही होणारे बॉम्बवर्षाव. तालिबानींची दंडुकेशाही, प्रेतांचा खच. त्यावर ताव मारणारे भटके कुत्रे आणि गिधाडे. याच पार्श्‍वभुमीवर परवानाची कहाणी उलगडत जाते. परवानाच्या कुटुंबात ते चौघे बहीणभाऊ आणि तिचे अब्बु अम्मी. एक सुशिक्षित कुटुंब. मात्र या सगळ्या पडझडीत कुटुंब बेघर झाले. परवानाच्या अब्बुंचा एक पायही बॉम्बस्फोटात निकामी झाला आणि सुशिक्षित अब्बुंवर बाजारात बसून लोकांची पत्रे वाचून आणि लिहून दाखवून घरात चूल पेटवण्याची वेळ आली. एक पाय नसलेल्या अब्बुंचा आधार बनली परवाना. एके दिवशी दुर्दैवाने आणखी दशावतार दाखविले आणि अब्बुंना तालिबानी पकडून घेऊन गेले. घरात चुल पेटण्याचा प्रश्‍न उभा राहिला आणि परवानाला कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी तिचे सुंदर केस कापून मुलगा बनविण्यात आले. मुलाचे रुप धारण केलेल्या परवानाच्या शरीरात मात्र सृजनाची ओढ असलेले मुलीचेच हळवे, सुकोमल मन जिवंत राहिले. सगळ्यांचे पोट भरण्याच्या कर्तव्यात तिने कसूर केली नाही. त्यासाठी अगदी हाडांची तस्करीही केली. दोन पैशासाठी हाडांची तस्करी करणाऱ्या परवानाने काळ्या खिडकीतल्या कधीही न पाहिलेल्या मैत्रिणीसाठी अफगाणिस्तानातल्या उजाड भुमीवर एक इवलेसे रोप रुजवले. परवानाचे पुढे काय झाले माहिती नाही. मात्र तिने रुजविलेले ते रोपटे बॉम्ब वर्षावाने वैराण झालेल्या भुमीत रुजले. पाकिस्तानातील अफगाण निर्वासितांच्या छावणीत द ब्रेड विनरच्या लेखिका डेबोरा एलिस यांना अशा अनेक कहाण्या दिसल्या. अनेक परवानाही सापडल्या. प्रत्येकीची कथा वेगळी असेलही. कथेचा शेवट मात्र सारखाच दुर्दैवी.
स्त्रीच्या लेखी युग बदलले असेल. मात्र दुर्दैवाचे दशावतार प्रत्येक युगात सारखेच. कधी ती अग्नीपरीक्षा देणारी सीता असते, कधी भरसभेत विटंबना होणारी द्रौपदी असते, कधी ऍन असते तर कधी परवाना असते. युद्ध पुरुषांचे असते. पराजित मात्र स्त्री होते.



Wednesday, 14 February 2018

आता तो येत नाही

स्वाती हुद्दार

संध्याकाळची वेळ. सेलफोनची रिंग वाजली. तिचा अंदाज खरा होता. फोन त्याचाच होता. तिनं फोन घेतला.
"मी ऑफीसच्या खाली उभा आहे. ये खाली. चहा घेऊया.'
"नको, मी मीटिंगमध्ये आहे.'
"काही हरकत नाही. उद्या येतो.'
तिनं नाखुशीनंच हो म्हटलं आणि आता उद्या न भेटण्याचं काय कारण सांगायचं, याचा मनोमन विचार करू लागली.
हा संवाद नेहमीचाच. तिचं भेट टाळणं आणि त्याचं न कंटाळता पुन्हा पुन्हा भेटायला येणं.
अलीकडे तिला कुणाशीच बोलणं नको वाटायचं. कुणात मिसळणं तिनं सोडूनच दिलं होतं. किती दिवसांत काही नवं लिहायला तिनं पेनही हातात घेतला नव्हता. तिनं स्वत:भोवती एक कोश निर्माण केला होता. बाकी जगाला तिच्या या अवस्थेशी काही देणंघेणं नव्हतं. तिच्या आजूबाजूच्या जगाचं रहाटगाडगं व्यवस्थित सुरू होतं. त्यानं मात्र तिला यातून बाहेर काढण्याचं मनोमन ठरवलं होतं. तिला रोज फोन करणं, जमेल तेव्हा भेटायला जाणं, त्यानं सुरूच ठेवल होतं. तिची न भेटण्याची कित्येक खोटी कारणं पचवूनही तो येतच राहिला. सतत. अविरत.
कधी सुरू झाली ही जगावेगळी विलक्षण मैत्री?
नेमकं आठवत नाही; पण तिनं सहज कागदावर खरडलेली दोन-चार अक्षरं त्यानं वाचली आणि तो फिदा झाला. तो स्वत: प्रथितयश साहित्यिक होता. त्याच्या शब्दांमागे प्रचंड साधना होती. आयुष्याच्या भट्टीत तावूनसुलाखून निघालेल्या शब्दांचं संचित त्याच्या साहित्यात जागोजागी विखुरलं होतं. जागतिक साहित्याचा त्याचा अभ्यास त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असे. ती मात्र स्वान्त सुखाय काहीतरी खरडायची आणि मनात आलं तर ते कागद चुरगळून फेकूनही द्यायची. असंच काही त्यानं वाचलं आणि तिला लिहितं करण्याचं त्यानं ठरवलं. हळूहळू त्यांच्या साहित्यिक चर्चा रंगू लागल्या. वाचन, लेखन, चर्चा आणि चहा. चहा, हो त्याला लेमन टी आवडायचा. दिवसेंदिवस त्यांची गप्पाष्टक रंगायची. साहित्यिक गप्पांबरोबर ती दोघं त्यांची सुखदु:खही वाटून घेऊ लागली. घट्ट विणींचं अतूट नातं त्यांच्यात निर्माण झालं. एक निनावी नातं. निरपेक्ष नातं. राग-लोभ, अपेक्षांच्या पलीकडचं. एक अक्षर नातं.
दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे गेली. दोघांच्याही जीवनात अनेक चढउतार आले. दोघेही एकमेकांबरोबर उभे होते.
मात्र तिच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली न कळे. तिच्या संसारात संकटांची मालिकाच उभी राहिली आणि मुळातच संवेदनशील असलेली ती कोलमडली. संकटांशी लढता लढता विझत गेली. रोजचं रहाटगाडगं सुरूच होतं, कर्तव्य म्हणून ती सगळं पार पाडत होती. ती मात्र त्यात कुठेच नव्हती.
मैत्र जुळले तेव्हापासून तिच्या प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी तो हुकमाचा एक्‍का म्हणून कायम उभा होता. ती मात्र थकली होती. तिला कोणाचीच सहानुभूती नको होती. तिला कुणाशीच बोलावसं वाटेना. अगदी त्याच्याशीसुद्धा. त्याला हे कळत होतं. तिचं त्यालाही टाळणं त्याला उमजत होतं. तरीही त्यानं त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. तिला यातून बाहेर काढायचंच, असा त्यानं मनोमन निश्‍चय केला आणि तो येत राहिला...
...आणि एक दिवस अचानक त्याचं येणं बंद झालं. आठवडा, पंधरा दिवस...जवळपास महिना. तो आलाच नाही. त्याचा फोनही नाही. त्याचं येणं नको आणि त्याला भेटणंही नको, असं वाटत असतानाही ती त्याची वाट बघत होती. शेवटी न राहवून तिनं फोन केला. फोनवर एक अपरिचित आवाज. तिनं त्याची चौकशी केली. त्या अपरिचित आवाजानं तो आजारी असल्याचं सांगितलं.
तिला स्वत:चाच राग आला, लाजही वाटली. तो बरा झाला की आता त्याला दुखवायचं नाही. पुन्हा आधीसारख्या खूप गप्पा मारायच्या. खूप वाचायचं, लिहायचं आणि त्याच्याबरोबर टपरीवर जाऊन लेमन टी ही घ्यायचा. तिनं मनाशी पक्‍क ठरवलं. ती एक दिवसाआड फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागली. प्रत्येकवेळी कुणीतरी तिसरीच व्यक्‍ती फोनवर... आणि तब्येतीविषयी काहीतरी गंभीर.
...आणि एक दिवस तो गेल्याची बातमी.
ती मुकी. संवेदनाहीन.
अजूनही रोज सूर्य पश्‍चिमेला कलतो. संध्याकाळ झाडांवर उतरते. मात्र तो येत नाही. त्याचा फोनही येत नाही.


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह