Powered by Blogger.

Saturday, 18 August 2018

श्रावणोत्सव

स्वाती विवेक हुद्दार

श्रावणातली उनकोवळी ओलसर दुपार. न्हालेले काळेभोर लांबसडक ओले केस पाठीवर मिरवत पायातल्या तोरड्यांच्या मंजुळ नादात तिचं सतत आतबाहेर मिरवणं. तिच्या उत्सुक डोळ्यातून झरत होता हसरा श्रावण. रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधानं घर कोंदून गेलं होतं. बांबुच्या परडीवर पानाफुलांची गौर रेखण्यात आईआजी रंगून गेल्या होत्या. पांढरा तगर, लालचूटूक जास्वंद, गुलाबी कण्हेर, जांभळा, लाल, केशरी, पांढरा तेरडा, सुगंधी नाजुक जाई-जुई-सायली आणि चमेली, सोनेरी सोनचाफा आणि नाजुक केशरी देठाचा स्वर्गीय प्राजक्‍त. रंग-गंधाचा उत्सव. निसर्गाची मनसोक्‍त उधळण. ते सगळे रंग-गंध, आई-आजीच्या कलासक्‍त हातातून परडीवर उतरले आणि भराडी गौरीतून साकारला उत्सवी श्रावण. भराडी गौर. श्रावणातला एक निसर्गोत्सव.

आषाढातला पावसाचा आवेग ओसरल्यानंतर लयबद्ध विलंबित बंदीशीसारख्या पावसाच्या रेशमी श्रावण सरी झरू लागतात. रंगात आलेल्या मैफीलीसारखी झाडेवेलीही पानोपानी बहरून येतात. रंगसंगतीचं अचुक ज्ञान असलेल्या कसबी चित्रकारासारखा निसर्ग उधळतो रंगीबेरंगी फुलांची रास. आणि सुरू होतं निसर्गपुजेचं पर्व. श्रावणातल्या पंचमीला नागपुजन. दर मंगळवारी नवथर नववधुंनी केलेली मंगळागौरीची आराधना. अगस्तींनी प्राशन केलेल्या सागराची आराधना करणारी नारळी पौर्णिमा. गोकुळाष्टमी, पोळ्याला होणारे वृषभ पुजन. कृषकसंस्कृतीच्या आणि निसर्गपुजेच्या खुणा श्रावणभर विखुरलेल्या.
दर सोमवाराची शिवआराधना हा तर श्रावणाचा प्राण. देवघरातल्या पिंडीवर वाहिलेली शिवामुठ आणि हिरवीकंच बेलाची रास. मंदीरातल्या अंधाऱ्या दगडी गाभाऱ्यातल्या शिवपिंडीवर अभिषेकाची धार आणि बाहेर पावसाची श्रावणधार. नंदादीपातल्या स्निग्ध ज्योतीचा उष्ण सुगंध. शिवपिंडीवरील फुलांच्या शेजेचा मिश्रित सुगंध आणि चिदानंद रुपम शिवोहम शिवोहमचा धीरगंभीर नाद.
श्रावण सोमवारची उपासाची दुपारी चार वाजताची पंगत म्हणजे आनंदपर्वणी. श्रावण घेवड्याची भाजी. पांढऱ्याशुभ्र वाफेभरल्या भाताच्या मुदीवर पिवळेधम्म वरण आणि त्यावर तुपाची धार. कढी आणि घराघरातून दरवळणारा मऊसुत गरम पोळ्यांचा सुगंध. जोडीला कधी केळाचं शिकरण तर कधी करवंदाचा गुळांबा. दर सोमवारी अशी चविष्ट मेजवानी. श्रावणाशी हे संदर्भ कायमचे जुळलेले.
चरैवेती चरैवेती म्हणत सतत पुढे पुढे सरकणाऱ्या काळाच्या ओघात काही संदर्भ गळतात काही नव्याने जोडले जातात. असाच मनाच्या एका कोपऱ्यात दडलेला भराडी गौरीचा संदर्भ. भराडी गौर हा निसर्गपुजेचाच एक प्रकार. श्रावणात उमलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांनी परडीवर ही गौर साकारतात. स्त्रीच्या सौंदर्यासक्‍त कलागुणांचा आविष्कार घडवणारा हा सण. पूर्वी संयुक्‍त कुटुंब पद्धती होती. घरात आजी, काकु, आत्या, बहिणी, वहिनी अशा खूप स्त्रिया असायच्या. वेटाळातले संबंधही कुटुंबासारखेच असायचे. त्यामुळे प्रत्येक सणाला उत्सवी स्वरुप यायचं. मोठ्ठी बसकी घरं, घराभोवती खूप फुलझाडं. श्रावणात ती सगळी झाडं बहरायची. निसर्गातल्या प्राणी-पक्षी अशा सगळ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करणारी आपली संस्कृती. चित्तवृत्ती प्रफुल्लीत करणाऱ्या या फुलांनाही देवीस्वरुप मानून त्यांची पुजा बांधणारी भराडी गौर. श्रावणात वेटाळातल्या सगळ्या बायका मिळून भराडी गौर साजरी करायच्या. झाडांवरची सगळी रंगीत-गंधीत फुल एकत्रित करून परडीवर शुभचिन्ह रेखली जायची. कधी स्वस्तीक, कधी ओम, कधी गौरी-गणपती, असं बरच काही. त्या परडीवर साकारलेल्या शुभ चिन्हांना देवीस्वरुप कल्पून पुजा बांधली जायची. हळदीकुंकु, नैवेद्य प्रसाद असे सगळे सोपस्कार व्हायचे. मंगळागौरीसारखे खेळ, गाणी या गौरी समोर सादर केली जायची. स्त्रीचं सृजन, नवनिर्मितीची ओढ, या गौरीच्या माध्यमातून व्यक्‍त व्हायची आणि साकारायची एक उत्तम कलाकृती. निसर्गाच्या वैभवातून साधलेली निसर्गपुजा. तुझे तुलाच अर्पण ही नम्र भावना.
या एका भराडी गौरीच्या माध्यमातून किती गोष्टी साध्य व्हायच्या. निसर्गाशी तादात्म्य, कृतज्ञता. सृष्टीतील रस, रंग, गंधाशी परीचय, निसर्गाशी अनोखं नातं, सामाजिक एकोपा, करमणुक आणि बरंच काही.
अलिकडे मात्र असे सगळे सण, उत्सव नामशेष होत चालले आहेत. आमची बदलती जीवनशैली, धावपळीचं आयुष्य, जगण्याची बदलती परिमाणं, सणउत्सवांचे बदलते स्वरुप अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. ती अपरिहार्यही आहेत. मात्र त्यामुळे कदाचित आम्ही निसर्गापासून दूर चाललो आहोत. या सगळ्या सणांच्या माध्यमातून निसर्गाशी होणारी आमची ओळख पुसली जाते आहे. पूर्वी निसर्गवाचनाचे वेगळे धडे गिरवायची गरज नव्हती. ऋतूंनुसार सहज उमलणाऱ्या झाडे, वेली फुलांचे रंग-गंध आमच्या संवेदनांमध्ये पक्‍के रुजले होते. अलिकडे मात्र निसर्गाशी आमची फारकत होत चालली आहे. बाल्कनीत आणि कीचन गार्डनमध्ये वस्तीला असलेला निसर्गच आम्हाला ज्ञात आहे. दर श्रावण सोमवारी पुड्यांमधून विकायला येणाऱ्या बेलाशीच आमची ओळख आहे. श्रावणात सहज उगवणाऱ्या वनस्पती, त्यांचे औषधी उपयोग, त्यांचे उग्र पण हवेहवेसे गंध या सगळ्याशी आम्ही अपरिचित आहोत. निसर्गाची मुक्‍त उधळण, डांबरी रस्त्यांमध्ये आणि फरशीच्या अंगणामध्ये लुप्त होत चालली आहे.
अर्थात संक्रमण हा निसर्गाचा नियम आहे. तरीही ते स्मरणातले रस, रंग, गंध श्रावणाच्या अशा वळणावर खूप खूप मागे नेतात आणि परडीवर सजलेल्या भराडी गौरीच्या आठवणी हळवं करतात इतकंच.


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह