Powered by Blogger.

Monday, 25 June 2018

रंग ऋतुंचे

स्वाती हुद्दार

ऋतूंनाही रंग असतात. पिवळा हिरवा वसंत सरला की आग ओकणारा केशरी-लाल ग्रीष्म अवतरतो, आपल्या तप्त स्वभाव धर्मासह. ग्रीष्मातले उष्ण वारेही केशरी रंगात न्हालेले असतात. ग्रीष्मातला दिवस जसजसा वर चढत जातो तसतशी त्यावर लाली चढत जाते. दूरवर आकाशाकडे नजर लाऊन डोळे मिटले तरी डोळ्यासमोर लाल वर्तुळं नाचत राहतात. ग्रीष्मात फुलणारा पळसही केशरीच. पानोपानी बहरणारा गुलमोहोरही लाल-केशरीच. मावळतीला डोंगराआड जाणारे लालबुंद सूर्यबिंब आकाशात लाल-केशरी छटांचे फटकारे मारत जाते, एखाद्या कसबी चित्रकारासारखे. ग्रीष्माच्या उन्हानं उघडे-बोडके झालेले डोंगरमाथे ते लालेलाल आकाश आपल्याभोवती लपेटून घेतात आणि तो लाल रंग पसरत जातो उघड्या माळरानावर, डोंगरदऱ्यांवर, नदी-तलावावर, क्षितिजापर्यंत अथांग पसरलेल्या समुद्रावर. जणूकाही सूर्यानं आकाशात लालकेशरी फटकारे मारून आपला कुंचला या पाण्यात बुडवला असावा. हा लाल रंग साचून राहतो मग पानाफुलांवर, घरादारावर आणि मनांवरही. तडा गेलेली जमीन आणि उंच गेलेली वाळक्‍या पानांची झाडं अनाथ एकाकी वाटू लागतात. वेध लागतात पाऊसधारांचे. तो येणार म्हणून वाऱ्याचे सांगावे येऊ लागतात. ढग दवंडी पिटतात आणि ग्रीष्माच्या लाहीलाहीनंतर ज्येष्ठाचा हात धरून गर्जत बरसत येणारा वर्षा ऋतू ओंजळीतून निळं चैतन्य घेऊन येतो. निळ्या रेशमी पाऊसधारा बरसतात आणि सगळी सृष्टी निळ्या रंगात रंगून जाते. आभाळं निळंसावळं होतं. आभाळातून बरसणाऱ्या निळ्या जलधारा निळ्या जलाशयात एकरुप होतात. निळ्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि अवघ्या विश्‍वाला हे निळेपण व्यापून उरतं. सृष्टीलाही वेध लागतात पंढरीच्या निळ्याच्या भेटीचे. निळ्या आभाळाच्या विशाल मांडवाखालून कड्याकपारीतला निळा पाऊस झेलत गळ्यात तुळशीची सावळी माळ घातलेली आणि डोक्‍यावर सावळी तुळस धरलेली पाऊले पंढरीची वाट चालू लागतात. ओढ असते त्या निळया समचरणांच्या दर्शनाची. सह्याद्रीच्या घाटदार वळणांवर घुमत राहतो निळ्या विठुच्या नामाचा गजर. रंगतो ज्ञानोबांचा हरीपाठ, रंगतात तुक्‍याचे अभंग इंद्रायणीच्या निळ्या पाण्यानं तारलेले. धुळवड रंगते अबीराची. हिरव्या पाऊलवाटांवरही चढतो रंग निळ्याच्या भक्‍तीचा. वारकऱ्यांच्या त्या मेळ्यात कोणी असतो नाम्या, कोणी गोरा, कोणी चोखा, कोणी जनाई, कोणी मुक्‍ताई, सोयराबाई. अवघी संतसज्जनांची मांदियाळी. चंद्रभागेच्या वाळवंटात वाहत्या निळ्या पाण्याच्या साक्षीनं रंगतं रिंगण, घातल्या जातात फुगड्या. हा भक्‍तीसोहळा बघायला निळे ढग आभाळात गर्दी करतात. टाळ चिपळ्यांच्या ध्वनीला आसमंतातली सौदामिनी साथ देते. एकतारी झंकारते आणि अवघे पंढरपुर भक्‍तीरंगात न्हाऊन निघते. चंद्रभागेच्या वाळवंटात देहभान विसरून विठ्ठलनामात मी-तू पण सरलेल्या, एकमेकांच्या पायावर डोई ठेवणाऱ्या वारकऱ्यांवर आभाळीच्या निळ्या जलधारा अभिषेक करू लागतात. ज्या पांडुरंगासाठी हा अवघा रंगसोहळा रंगतो आहे, तो पांडुरंगही रुक्‍मिणीसह या रंगात रंगून जातो. भक्‍त आणि भगवंत हे द्वैत सरते आणि पांडुरंगाच्या निळ्या प्रभेत अवघे पंढरपूर न्हाऊन निघते.


वडाचा पार


युगानुयुगं उभा आहे तो
गावाच्या वेशीवर
पाराचा परीघ सांभाळत
दरसाल न चुकता येणाऱ्या
लेकीसुनांना सौभाग्याचा वायदा देत
सात फेरे, सात वेढे
कच्च्या सुतात बांधलेले
सात जन्माचे पक्‍के वादे
दह्यादुधाचा अभिषेक
आंबा आणि नाणी
सोबत गव्हाची रास
त्याबदल्यात त्याच्या पारंब्यांनी
उधळलेले अखंड सौभाग्याचे दान
सौभाग्य???
कपाळी कुंकवाचा मळवट
गळ्याभोवती रुतलेली काळी सर
हातभर हिरवा चुडा
बोटं सोलवटून काढणारी घट्ट जोडवी
सवाष्ण असल्याच्या खुणा अंगाखांद्यावर
त्याखाली लपला जातो
परवाच हातावर उमटलेला
तापल्या सळीचा चुरचुरीत चटका
आणि चुरगळलेलं मनही
कारण ती सवाष्ण आहे
...आणि तिच्या येण्यानं
वर्षभर एकाकी असलेला
त्याचा पारही सवाष्ण झाला आहे

स्वाती हुद्दार

Saturday, 16 June 2018

मल्हार

स्वाती हुद्दार

आज तो पुन्हा कोसळतोय धुवाधार. उर फुटून दु:ख झरावं तसा. तिच्या विशाल उबदार कुशीत ती सामावून घेते आहे त्याच्यासह त्याचं कोसळणं. तिचं मूक सांत्वन आणि त्याचा आवेगी आकांत.
अशा भरून आलेल्या रित्या संध्याकाळी मग एकटेपण अधिकच प्रकर्षानं जाणवू लागतं. हा झरणारा पाऊस कोणाशी तरी शेअर करावासा वाटू लागतो. आजूबाजूला खूप गर्दी आहे चेहऱ्यांची; पण हा कोसळणारा पाऊस मनात रुजावा, असं मृदू मन असलेला एकही चेहरा तिथे नाही. सगळेच चेहरे कोरे. हात सेलफोनकडे वळले. बोटं सवयीनं कॉन्टॅक्‍ट लिस्ट सर्च करू लागली. मात्र मन एकाही नावाशी थांबलं नाही. कुणाशीच हा पाऊस वाटावासा वाटला नाही. आताशा असं का होतं? हे एकटेपण सगळं विश्‍व व्यापून पुन्हा दशांगुळे उरतंच.
पावसाचा दु:खाचा आवेग आता जरा ओसरला आहे. पाऊसधारांपलीकडच्या अस्पष्ट टेकड्या नजरेच्या टप्प्यात येत आहेत. या टेकड्यांपलीकडे असेल का कुणीतरी पाऊस समजून घेणारा. कदाचित ते गावच असेल पाऊसवेड्या ओलेत्या मनांचं. पाऊसवेड्या मनाची माणसं असली की जमिनीतून तरारून येणाऱ्या हिरव्या अंकुरांसह त्या मनांनाही फुटतात आशाआकांक्षांचे धुमारे. ती वेडी माणसं गाऊ लागतात सृजनाचं गाणं, सुरांच्या हिंदोळ्यावर झोके घेत. ती सुरावट खूप ओळखीची वाटते. अगदी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी. मन आणि कान तृप्त करणारी. जीवनाशी नातं सांगणारी. आभाळातून कोसळणारा पाऊस मग डोळ्यातून झरू लागतो. झरणाऱ्या डोळ्यांमुळे सगळंच अस्पष्ट भासू लागतं. मनात मात्र मल्हारचे सूर घुमू लागतात.
सखी सावन आये
कंत नैय्या मोरा मन अकुलाए
रिमझिम बादर बरसन लागी
मोरा मनवा तरसावे

युगामागून युगं उलटली. तानसेनचा मल्हार तेव्हापासून श्रांत क्‍लांत करतोय युगंधरेला. मल्हारच्या सुरावटीत भिजलेला पाऊस कधी झरतो शांत धीरगंभीर स्वरातून, कधी झंकारतो सतारीच्या तारांतून, तर कधी वेड लावतो वेळूच्या बासरीतून. माणसांच्या गर्दीतही एकट्या पडलेल्या या जिवाला हे सूर मग अलगद मिठीत घेतात. हलकेच जोजवतात. सुरांच्या साथीनं पाऊस आत आत झिरपत जातो. अंतर्बाह्य चिंब करतो. बाहेर धारांचा पाऊस आणि आत सुरांचा. ढगांनी झाकोळलेलं आभाळ अलगद मोकळं व्हायला लागलयं. पाऊसधारांनी चिंब झालेली संध्याकाळ सूरमयी झाली आहे. मल्हाराच्या सुरांमध्ये न्हाऊन चिंब झालेल्या सुरावटीत एकटेपणाची भावना विरघळून गेली. लख्ख वीज चकाकली. आपलीच आपल्याला ओळख पटली. युगानुयुगं मीच तर व्यक्‍त होतेय, कधी धीरगंभीर स्वरातून, कधी सतारीच्या झंकारातून, कधी बासरीच्या सुरावटीतून. आभाळातून वसुंधरेवर अलगद उतरणारी पाऊसधार म्हणाली सो$$$हम. युगानुयुगं छेडलेली मल्हारची सुरावट मीच. जिच्यासाठी कृष्णानं बासरीत श्‍वास फुंकला ती राधाही मीच. गोकुळही मीच आणि मल्हारच्या हाकेला ओ देत धरेवर कोसळणारा पाऊसही मीच. सोऽऽऽहम.


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह