वाचनाची मेजवानी देणारे दिवाळी अंक
स्वाती हुद्दार
दिवाळी अंक ही खास महाराष्ट्राची परंपरा. दिवाळीतल्या फराळाइतकेच
दिवाळी अंकाचेही मराठी माणसाला महत्त्व आहे. नव्हे दिवाळी अंकाशिवाय मराठी
माणसाची दिवाळी अपूर्ण आहे. दिवाळी अंक म्हणजे दर्जेदार साहित्याची
मेजवानी. दिवसेंदिवस दिवाळी अंकाची ही परंपरा विस्तारते आहे आणि अधिक
समृद्ध होते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दर्जेदार दिवाळी अंक
वाचकांच्या सेवेत हजर आहेत. त्यांचाच हा लेखाजोखा.
मीडिया वॉच दिवाळी अंक
मीडिया वॉच हा दिवाळी अंक माणसांच्या कथा सांगणारा आहे. रवीश कुमार,
प्रशांत किशोर, मोईना मोईत्रा, जयंत पाटील यांच्या सोबतच अमिताभ, तब्बु,
कपिल शर्मा, जी. ए. कुलकर्णी अशा विविध क्षेत्रातील मातब्बरांच्या
आयुष्याच्या कहाण्या सांगण्यासोबतच त्यांच्या जीवनातील अंधाऱ्या
कोपऱ्यांवरही या लेखांमधुन प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय आदिवासींची
संस्कृती-परंपरा आणि जगणे बायांचे या विभागातील लेख अत्यंत वायनीय आहेत.
तसेच सुलक्षणा वऱ्हाडकर यांच्या मैत्रिणींच्या भन्नाट कथा आणि समीर
गायकवाडांचा रेड लाईट डायरी वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात.
आकांक्षाचा दिवाळी अंक
सत्ता, स्त्री आणि सौंदर्य या विषयाला वाहिलेला आकांक्षा प्रकाशनाचा
दिवाळी अंक अंतर्मुख करणारा आहे. स्त्री सौंदर्याच्या पूर्वापार संकल्पना,
त्यामागचे पुरुषी वर्चस्व, स्त्री सौंदर्याचे आजचे परिमाण, स्री
सौंदर्याच्या व्याख्येकडे पाहण्याचा आधुनिक स्त्रीचा दृष्टिकोन अशा विविध
विषयांना स्पर्श करणारे गणेश कनाटे, सुरेश द्वादशीवार, अरुणा सबाने, सानिया
भालेराव आदी नामवंतांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत. याशिवाय संजय आवटे,
नीलम गोऱ्हे, प्रतीक्षा लोणकर, गीताली आदींच्या मुलाखती, काही कथा आणि
कविता असा भरगच्च मजकुर या अंकात आहे.
मराठामार्गचा बळीराजा
दिवाळी अंकाच्या नेहमीच्या परंपरेला फाटा देत शेतकऱ्यांना वाहिलेला
बळीराजा विशेषांक काढून मराठामार्गने एक नवीन मुहुर्तमेढ रोवली आहे. आरक्षण
आणि शेतकरी आंदोलन अशा दोन विषयात हा अंक विभागला आहे. या अंकात
आरक्षणातील बनवाबनवी हा मराठामार्गचे संस्थापक संपादक ॲड. पुरुषोत्तम
खेडेकर यांचा लेख विचार करायला भाग पाडणारा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची
भूमिका आणि लढा हा डॉ. बबनराव तायवाडे यांचा लेख, याशिवाय डॉ. प्रदीप
आगलावे, प्रा. जावेद पाशा कुरैशी, डॉ. एम. ए. रशीद, जयश्री पाटील रणदिवे
अशा अनेक मान्यवरांचे आरक्षणासंबंधी ऊहापोह करणारे लेख, शेतकऱ्यांच्या
चिरंतन प्रश्नावरचे फिरदोस मिर्झा, अनिल घनवट, डॉ. अजित नवले, ॲड. वामनराव
चटप, अमिताभ पावडे आदी अभ्यासकांचे लेख आणि आधुनिक मराठी रंगभूमीचे
शिल्पकार हा डॉ. सतीश पावडे यांचा लेख अशा अभ्यासपुर्ण लेखांचा समावेश या
अंकात आहे.
इंक ॲण्ड पेनचा अनलॉक
देशभरातील विविध समुह हा अनलॉक दिवाळी अंकाचा विषय आहे. देशातील अनेक
समुहांचे जगणे चाकोरी बाहेरचे आहे. काहींचे कर्तृत्व अत्यंत मोठे आहे. काही समुह
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही समस्या आणि प्रश्नांच्या
चक्रव्युहात अडकले आहे. काही समुहांनी देशाला दिशा दिली तर काहींची आजही
उपेक्षाच होते आहे. अनेक समुहांविषयी जगाला माहितीच नाही. अशा अनेक
समुहांवर या दिवाळी अंकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय अनेक
मान्यवरांच्या कथा, कविता या अंकात आहेत.
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक
महाराष्ट्र टाईम्सच्या विदर्भ आवृत्तीला यंदा ९ वर्षे पूर्ण झाली.
यानिमित्त यंदाच्या दिवाळी अंकात प्राचीन वैदर्भीय शहरांमध्ये दडलेल्या
ऐतिहासिक दाखल्यांचा ऊहापोह या अंकात करण्यात आला आहे. विदर्भातील आदिवासी
संस्कृती, त्यांच्या प्रथा-परंपरा, पूर्व विदर्भातील दुर्मीळ वनौषधी याचा
मागोवाही अंकात घेण्यात आला आहे. यासोबतच विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा शोध
घेणारा लेख, महाकवी दंडीचा आठव, गावांमध्ये अजूनही न पोचलेला विकास,
जगविख्यात कोलंबियन-स्पॅनिश लेखकाच्या लिव्हिंग टु टेल द् टेल या
आत्मकथेतील माणूसतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्नही या अंकात करण्यात आली आहे.
याशिवाय धर्मांतरण प्रक्रियेचा प्रवास सांगणारा लेख, संगीत वेड्यांसाठी
बंदिशीवरचा अभ्यासपूर्ण लेख, काही व्यक्तिवेध घेणारे लेख, काही यशोकथा अशा
अनेकविध विषयांचा अंतर्भाव या अंकात आहे.
लोकशाहीवार्ताचा लोकदीप
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नितीन गडकरी, देवेंद्र
फडणवीस, दिनकर रायकर, यमाजी मालकर, श्रीनिवास खांदेवाले, कर्नल अभय
पटवर्धन, आदींच्या परिसंवादासह, कथा, ललित, कविता असा साहित्यिक नजराणाही
या अंकात पुरेपुर आहे. याशिवाय व्यंगचित्र, रेखाचित्र, अंकज्योतिष्य आणि
राशीभविष्य अशा नेहमीच्या सदरांनीही हा अंक परिपूर्ण आहे.
पुण्यनगरी दिवाळी अंक
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ही संकल्पना घेऊन पुण्यनगरीचा दिवाळी अंक
वाचकांच्या भेटीला आला आहे. ७५ वर्षातील जमा-पुंजी, डावे-उजवे, कर्तव्य-
जबाबदाऱ्या या सगळ्यांचा अत्यंत संतुलित लेखाजोखा विविध क्षेत्रातील
विचारवंतांनी मांडला आहे. हा दिवाळी अंक चार भागात प्रकाशित झाला असून
चारही भाग वाचनीय आहेत. याशिवाय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेशा कथा,
कविता, ललित, राशीभविष्य असा नियमित भरमसाठ मजकुर यामध्ये आहेच. एकूणच अंक
वाचनीय झाला आहे.
एकूणच अनेक दर्जेदार दिवाळी अंकांनी यंदाची दिवाळी तेजोमय करण्यात हातभार लावला.
दिवाळी संपल्यानंतरही विचारांचे प्रकाशपुंज मनामनात तेवत ठेवणारे दिवाळी अंक म्हणजे मराठी माणसासाठी मर्मबंधातली ठेव आहेत.