श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे
स्वाती हुद्दार
गंधभारित उत्फुल्ल सकाळ. आज शक्तिस्वरुपिणी जगन्मातेच्या नवरात्राचा
प्रारंभ. हळदी-कुंकवाच्या शुभ पावलांनी तिचं आगमन. चुन्यानं सारवलेल्या आणि
गेरुनं वेलबुट्टी रेखलेल्या स्वच्छ देवघरात नवधान्य रुजवलेल्या काळ्याशार
मातीवर मृण्मयी घटाची स्थापना. देवीतत्वाची स्थापना. त्यावर सोडलेली
पुष्पमाला. सगळं भक्तीमय.
दरवर्षी आम्ही हा नवरात्रोत्सव साजरा करतो. नवरात्रोत्सव म्हणजे
सुष्टांच्या दुष्टांवर विजयाचं प्रतीक. दुष्टांच्या निर्दालनासाठी
देवांच्या तेजातून जिची निर्मिती झाली ती आदिमाया. शुंभ, निशुंभ, रक्तबीज,
आदी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेनं चंडीचा अवतार घेतला आणि नऊ दिवस या
राक्षसांबरोबर युद्ध करून दशमीला तिनं अंतिम विजय संपादन केला. त्या
दुष्टांच्या निर्दालनाचं प्रतीक म्हणजे हा नवरात्रोत्सव. देवाधिदेवांनाही
ज्या दुष्टांचं निर्दालन करणं अशक्य झालं, ते कार्य चंडीनं केलं. त्यानंतर
जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं, दुर्जन शक्तीचं प्राबल्य वाढलं, तेव्हा
तेव्हा समाज त्या आदिशक्तीलाच शरण गेला.
सन १५०० चा काळ. यवनी राजवटीच्या जुलमानं सारी प्रजा त्रासली होती.
सज्जनांचा कोणीही वाली उरला नव्हता, तेव्हा संत एकनाथ महाराज त्या
जगत्जननीलाच शरण गेले.
हे माते, तुझ्या कृपेचं दार बंद झाल्यामुळे समाजजीवन विकारग्रस्त झालं
आहे. रामराज्य लयाला जाऊन राक्षसांचं राज्य उदयाला येत आहे. या विकारग्रस्त
समाजावर दुबळा शत्रूसुद्धा खूप वर्षे राज्य करीत आहे. तेव्हा तुझ्या
कृपेचं दार आता उघडलंच पाहिजे. म्हणून नाथ पुनःपुन्हा म्हणतात,
‘‘दार उघड बया आता दार उघड
अलक्ष पूर भवानी दार उघड
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड
तेलंग लक्ष्मी दार उघड
तुळजापूर भवानी दार उघड’’
आणि खरचं नाथांची आर्जवी विनवणी त्या जगत्जननीनं ऐकली आणि शिवबाच्या
रुपानं सज्जनांच्या रक्षणकर्त्यानं जन्म घेतला. आणि पुन्हा एकदा
सज्जनशक्तीचा विजय झाला.
या अनादी निर्गुण जगदंबेचा महिमा वेद-उपनिषदांनीही गायला.
पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व॥
असं तिचं वर्णन श्रीसूक्तात केलं आहे.
देवराज इंद्रानही महालक्ष्मीचा महिमा गाताना
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते
असं वर्णन केलं आहे.
तर आद्य शंकराचार्य
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि
हे माते आई, वडिल, बंधु, पुत्र-पुत्री हे कोणीही माझे नाहीत. मी केवळ तुला शरण आलो आहे. या अनन्य भावानं जगन्मातेला शरण गेले आहेत.
वेद-उपनिषदातील वर्णनानंतरही दशांगुळे उरलेल्या आदिमायेचं वर्णन मराठी
संतकवींनी त्यांच्या कवनांमधून करण्याचा प्रयत्न केला. नाथांचे नातू पंतकवी
मुक्तेश्वरांनी रचलेल्या आरतीतून
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
महालक्ष्मीचं असं वर्णन केलं आहे.
नरहरीने रचलेल्या देवीच्या आरतीत ते लिहितात, हे माते तुझे गुण गाताना
चारही वेद श्रमतात. इतकी तुझी लिली अगाध आहे. शेवटी भावव्याकुळ झालेले
नरहरी म्हणतात,
क्लेशापासून सोडी, दुःखापासूनी सोडवी
तोडी भवपाशा
हे अंबे तुझ्यावाचुन हा भवसागर पार करण्याची माझी इच्छा कोण पुरी करणार?
वेद-उपनिषदांमधुन आणि संत काव्यातून आलेल्या वर्णनाइतकंच
लोकवाड्.मयातून आलेलं देवीचं वर्णनही तितकच लोभस आणि भावपूर्ण आहे. जोगवा,
गोंधळ, डहाका ही खास महाराष्ट्रातली भक्ती प्रथा. देवीचे भुत्ये आणि गोंधळी
ही भक्तीरसप्रधान लोकगीतं गातात. यातील तत्वज्ञान वेदांताइतकच सखोल असतं.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥
आता साजणी साजणी झाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला मी संग ।
काम क्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग । सत्चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥
तुझ्या कृपेने आता कामक्रोधादी विकार सांडून मी सत् चित आनंदाचा अनुभव घेतो आहे. असं सांगणारा हा जोगवा वेद-उपनिषदांपेक्षा कमी नाही.
ही अनादी निर्गुण जगन्माता तिच्या भक्तांसाठी मात्र सगुण रुप धारण करते.
कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी |
नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी |
समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी |
शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी |
भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे
तिचं काव्यातुन येणारं अनुपम रुप भक्तांच्या ह्रदयात विराजमान आहे.
परमेश्वरीच्या परमतत्वाला सगुण साकार रुप देण्याची ताकद फक्त भक्ताच्या
भक्तीत आहे. शिवाची शक्ती असलेल्या आदीमायेचं वर्णन शिवाच्या आधी येतं.
दिव्यांबरायचं दिगंबराय म्हणताना आपण शिवाच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो.
घागर घुमु दे घुमु दे म्हणताना जन्म मरणाचे फेरे चुकविण्याचं मागणं आपण ज्या जगन्मातेकडे मागतो, ती सृजनाची शक्ती आहे.
नवरात्रीचा हा सोहळा नऊ रात्रींचा. पेरणी नऊ धान्याची. जलकुंभ मातीचा.
ही तर सृजनाची पुजा. स्त्रीत्वाची पुजा. या नवरात्रीनिमित्त प्रत्येक
स्त्रीच्या ठायी असलेल्या दैवी अंशाला, सृजनशक्तीला नमन करुया.
आणि त्या निरांजनी नारायणी परब्रह्म स्वरुपिणीला जगावरचं संकट दूर सारण्याचं साकड घालूया.
Thursday, 7 October 2021
Monday, 4 October 2021
उजाडल्यावरी सख्या निघुन जा घराकडे
swati huddar
मराठीत गझल हा काव्यप्रकार रुजवणाऱ्या कवीवर्य सुरेश भटांची भावगीतेही
अप्रतीम आहेत. त्यांचं अत्यंत भावपूर्ण असं गीत म्हणजे उजाडल्यावरी सख्या
निघुन जा घराकडे.
भटांच्या या कवितेत नायिका नायकाला आर्जव करते आहे,
उजाडल्यावरी सख्या निघुन जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपुर चांदणे पडे
खूप दिवसांनंतर लाभलेल्या त्याच्या सहवासाची तिला असोशी आहे. त्यानं
तिच्याजवळ थांबावं, नुसतच थांबू नये, तर त्यांनी एकमेकांच्या सहवासात
देहभान विसरावं, असं तिला वाटतं. शरीराच्या मीलनातून अलगद तिला त्याच्या
मनात उतरायचं आहे. तो मात्र केवळ देहानं तिथं आहे. त्याचं मन तिथे रमत
नाहीये. त्याला अंधार सरण्याच्या आत परतण्याची घाई आहे, ती म्हणतेय, निघुन
जा घराकडे, याचा अर्थ हे त्याचं घर नाही. म्हणजे त्यांचं हे प्रेम चोरटं
आहे. त्यामुळे रात्रीचा अंधार हाच त्यांच्या भेटीचा आधार आहे. त्याला
त्याचं घर आहे, हे तिला माहिती आहे आणि याची तिला जाणिवही आहे. ते तिनं
मान्यही केलं आहे. तो दिवसाच्या उजेडात तिला कितीही वाटलं तरी तिच्याजवळं
थांबु शकत नाही, हे सत्यही तिनं स्विकारलं आहे. त्यांचं प्रेम रात्रीच्या
अंधारातच फूलू शकतं. गंधाळलेल्या रातराणीसारखं, हे ती पुरतं जाणून आहे. ती
त्याला सांगतेय, दिवस उजाडल्यावर तू परतणार आहेसच. पण अजून उजाडायला बराच
अवकाश आहे. अजून उत्तर रात्रच सरलेली नाही. आकाशातला प्रकाशोत्सव आत्ता
कुठे रंगात आला आहे. त्याचं प्रतिबिंब तुझ्या-माझ्या मनात उतरलय. ती त्याला
उशीवर पडलेलं टिपुर चांदणं दाखवते आहे. हे चांदणं तिच्या त्याच्यावरच्या
प्रेमाचं प्रतीक आहे. या चांदण्याच्या स्निग्ध प्रकाशात एकमेकांना
अंतर्बाह्य जाणून घेऊया. असं ती त्याला सुचवते आहे. तो मात्र मिटलेलाच आहे.
तिची हाक त्याच्या कानापर्यंत पोहोचतेय, मात्र मनात उतरत नाहीये. ती
त्याला म्हणते,
उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ?
पुन्हापुन्हा मिठीतही शहरतोस काय तू ?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे ?
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
किती सायासानंतर तुझी माझी भेट झालीय, पुन्हा अशी निवांत भेट कधी होईल,
किंबहुना होईल की नाही, हे सांगणही कठीण आहे. आजची ही रात्र आपली आहे. हे
ती त्याला सांगते आहे. अवघं आयुष्य आजच्या एका रात्रीत तिला जगून घ्यायचं
आहे. त्याच्या सहवासाचं सुख तिला आकंठ पिऊन घ्यायचं आहे. तिला तृप्त
व्हायचं आहे. तो मात्र अजूनही काठावर आहे. कोरडा आहे. त्याला तिच्या
काठोकाठ भरलेल्या प्रेमाच्या सागरात उतरताच येत नाहीये. हे तिला कळतयं.
त्याच्यावर प्रेम सरींचा वर्षाव करूनही त्याला धड भिजताही येत नाहीये.
काही घटिकांनंतर उगवणाऱ्या दिवसापाशी त्याचं मन आत्ताच पोहोचलंय. त्यामुळे
आत्ताचा तिच्या सहवासातला मखमली क्षण त्याच्या हातातून निसटतो आहे. त्याचं
तिच्याजवळं असूनही तिच्याजवळं नसणं, तिला आकळतयं. ती त्याच्या मिठीत
सर्वस्व विसरते. तो मात्र ती जवळ असताना साध वेळेचं भानही विसरू शकत नाही.
यानं ती दुखावली आहे. त्याला ती तिच्यासाठी अत्यंत दुखऱ्या असलेल्या या
सत्याची जाणिव करून देते आहे. मात्र ही तिची तक्रार नाही. केवळ हे तिचं
आर्जव आहे. की ती जवळ असताना तरी त्यानं मनानं तिच्या निकट असावं, मात्र
हे त्याला अशक्य आहे.
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यातला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे ?
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
त्याच्या अस्वस्थतेमुळे त्यांचा प्रणय फुलतच नाहीये. ती त्याला
नानाप्रकारे त्याच्या नेहमीच्या खुणांपाशी नेण्याचा प्रयत्न करते आहे.
भुलवण्याचा प्रयत्न करते आहे. तो मात्र कशालाही दाद देण्याच्या मनस्थितीत
नाही. तिला मनोमीलनाची आस असताना तो मात्र तिच्याशी एकरुप होऊ शकत नाही. तो
अलिप्त आहे. केळीच्या पानावरच्या वळीवाच्या थेंबासारखा.
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुलामला विचारुनी फुटेल आज तांबडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
ती त्याला सांगतेय ज्या जगाच्या भीतीपोटी तू तुझ्या-माझ्या मीलनाचा हा
लाखमोलाचा क्षण नाकारतो आहेत, ते जग मात्र रात्रीच्या कुशीत गाढ झोपी गेलं
आहे. रात्रही काळा अंधार लपेटून निवांत झाली आहे. हा काळा अंधारच आपल्या
मीलनासाठी वरदान आहे. अंधाराचा रंग काळा असतानाच आपण एकरुप होऊया. कारण
हळूहळू ही काळी रात्र कृष्णासारखी सावळी व्हायला लागेल. या नायिकेलाही
कृष्ण रंगात रंगलेल्या राधेसारखीच सावळ्या रंगाची भूल आहे. तिला वेध लागले
आहेत, त्याच्या रंगात रंगून जाण्याचे. हळूहळू हा काळा अंधार सावळा होऊ
लागेल, एकमेकांचा सहवास कितीही हवाहवासा वाटला तरी तुला परतावे लागेल,
त्यामुळे आत्ताचे हे मीलनाचे क्षण वाया दवडू नकोस. असं ती त्याला सुचवते
आहे.
भटांची ही नायिका प्रचंड आशावादी आहे. तिच्या प्रेमाच्या ताकदीवर तिचा
पूर्ण विश्वास आहे. ती म्हणते, रात्र पहाटेकडे झुकू लागली, तरी तू काळजी
करू नकोस, तुझ्या-माझ्या परवानगीशिवाय आज दिवसाचे दूत आकाशात अवतरणार
नाहीत. तांबडं फुटल्यावर मात्र मला कितीही वाटलं तरी मी तुला थांबवणार
नाही, तू खुशाल घराकडे निघुन जा.
आपलं तन-मन सर्वस्व अर्पण केलेला तो आपला नाही. तो त्याच्या सोयीनं
येणार आणि त्याला हवं तेव्हा निघुन जाणार. हे जाणून सुद्धा ती त्याच्यात
गुंतली आहे मनानं. तो मात्र अलिप्त आहे. तिच्या मानसिक गुंतवणुकीशी,
त्याच्या सहवासासाठी आसुसलेल्या तिच्या भावनांशी त्याला देणंघेणं नाही.
तिच्यापेक्षा त्याला त्याची सामाजिक प्रतिष्ठा, त्याचं घर अधिक महत्त्वाचं
वाटतं. आणि हे ती पुरेपुर जाणून आहे. आणि हे तिनं विनातक्रार स्विकारलंही
आहे.
ही कविता वाचताना भटांची न पाहिलेली नायिका, तिचं आर्जव डोळ्यापुढे उभं
राहतं. कशी असेल ती? कदाचित हा वाट चुकुन आलेला चुकार वाटसरू कधीही आपला
होऊ शकणार नाही, हे सत्य माहिती असतानाही त्याच्यावर निरपेक्ष मुग्ध प्रेम
करणाऱ्या देवदासमधल्या चंद्रमुखीसारखी असेल ती. प्रगल्भ. अंतर्मुख.
त्याच्या हिताची त्याच्याही पेक्षा अधिक काळजी करणारी.
भटांची ही कविता ऐकली की फैय्याज हाशमी यांची आज जाने कि जिद ना करो गझल आठवते.
सुरेश भटांचा उर्दू साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या मालवून
टाक दीप या कवितेतील दूर दूर तारकात हे कडवं त्यांना मेहंदी हसन यांच्या
एका गझलेवरून सुचलं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. कदाचित सुरेश
भटांना त्यांची ही कविता फैय्याज हाशमींच्या त्या गझलेवरून स्फुरली
असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्थात फैय्याज हाशमींच्या गझलेतली नायिका नायकाने जाऊ नये, म्हणून लडिवाळ का असेना पण
हाय मर जाएंगे
हम तो लुट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो
आज जाने की ज़िद ना करो
असे मरणं. लुटलं जाणं, असे लौकिक पातळीवरचे हट्ट धरते.
मात्र भटांची नायिका करते, ते केवळ आर्जव. तेही अत्यंत तरल, अलौकिक पातळीवरचं.
फैय्याज हाशमींच्या नायिकेला त्या जोडीदाराची साथ शारीर पातळीवर हवी
आहे, असं वाटतं, तर भटांच्या नायिकेला मात्र मनोमीलनाची आस अधिक आहे, हे
जाणवत राहतं. अर्थात
दोन्हीही रचना तेवढ्याच अप्रतीम आहेत, एवढे निश्चित.