बहिणाबाईंच्या कवितालेक सरस्वतीचीघरोटंदेवा घरोटं, घरोटं तुझ्या मनातील गोटसर्व्या दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट अरे जोडता तोडल त्याला नातं म्हनू नही ज्याच्यातून पीठ येतं, त्याले जातं म्हनू नही जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर तसं दुधावानी पीठ पडलं रे भुईवर दाने दळता दळता जशी घामानं मी भिजे तुझी घरोटा तशी पाऊ झिजे झिजे अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी तस तसं माझ गानं पोटातून येतं ओठी बहिणाबाईंच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांचं अधिष्ठान त्या कवितेला लाभलं आहे. त्यांचं जगणं सहजसोपं नव्हतं. परिस्थितीचे चटके खाऊन अनुभवाच्या भट्टीत तावून सुलाखून बहिणाबाईंची कविता समृद्ध झाली आहे. बहिणाबाई म्हणतात, कुटुंब सुखसमाधानानं जगायचं असेल तर कुणाला तरी जात्यात भरडल्या जावंच आगतं. म्हणजे कुणाच्यातरी प्राक्तनात भरडणं निश्चित आहे. लौकिकार्थानं माणूस एकटा असतो, परंतु तुमच्या ताटातल्या प्रत्येक घासामागे किती जणांचे कष्ट असतात, ते परमेश्वरच जाणे. जीवन जगताना अनेक मंडळी आपल्या आजुबाजुला वावरत असतात. प्रत्येकाशीच आपले सुर जुळतील, असं नाही. काही वेळा नात्यात मतभेद निर्माण झाले तर ते नातं संपून जातं. बहिणाबाई म्हणतात जे तुटतं त्याला नातं कसं म्हणायचं? इथे बहिणाबाईंची शब्दचमत्कृती बघा, त्या म्हणतात, ज्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणू नये. जे येतं त्याला आपण जातं म्हणतो, या दुनीयेची ही उलटी रित आहे. म्हणतात ना दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. जसजशी जात्याची पाऊ फिरते, तसतसे दुधासारखे पांढरेशुभ्र पीठ भुईवर पडते. घरच्या अत्यंत गरिबीमुळे अश्वत्थाम्याची आई त्याला दूध म्हणून पांढऱ्या शुभ्र पीठात पाणी कालवून देत असे. दुधावानी पीठ ही संकल्पना मांडताना बहिणाबाईंना अश्वत्थामा आठवला असेल का? रहाटगाडगं चालण्याकरिता कुणाला तरी घाम गाळावाच लागतो. कुणाला तरी झिजावच लागतं. पांढरशुभ्र पीठ दळताना जसजशी जात्याची पाऊ झिजते तशीच बहिणाबाईही घामानं भिजते आहे. जात्यावर पीठ दळणं हे इथे कर्मयोग आणि तपश्चर्या या अर्थानं येतं. कर्मयोगाची महती सांगायला कृष्णाला भगवद्गीता लिहावी लागली आणि टिळकांना गीतारहस्य .बहिणाबाईचं जीवन ही एक तपश्चर्या आहे. तपश्चर्येनं समृद्ध झालेल्या बहिणाबाईच्या शब्दांना प्रतिभा स्वत: अमृताचं सिंचन करते. आणि त्यातून एक रसरशीत तत्वज्ञान आपल्यासारख्या रसिकांसमोर उभ ठाकतं. शब्दांना हे सामर्थ्य प्राप्त करण्याकरिता जीवनाच्या शाळेतील बाराखडीच गिरवावी लागते. स्वाती हुद्दार | |||