Powered by Blogger.

Friday, 21 October 2016

न्यूशाच्या कॅमेऱ्यातून दिसणारा मध्यपूर्व आशिया

शंभर शब्दांची बातमी कदाचित जे बोलू शकणार नाही, ते एक छायाचित्र बोलू शकते, हे साऱ्या जगाने नुकतेच अनुभवले. ते आयलान कुर्दीच्या निमित्ताने. निष्पाप आयलानच्या समुद्राकाठी पहुडलेल्या निष्प्राण कलेवराने मध्य आशियातील शरणार्थींसाठी युरोपचे दरवाजे उघडले गेले. घटना निःसंदेह दु:खद असली तरी छायाचित्रणाचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे.
कॅमेऱ्याच्या एका क्‍लिकला कल्पकतेची जोड देऊन जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी अनेक छायाचित्रे छायाचित्रकारांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. जगाचा इतिहास, भूगोल बदलवणारी अनेक युद्धे झालीत, होत आहेत आणि त्याचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या अनेक लढवय्या छायाचित्रकारांनी त्या त्या वेळी आपली भूमिका योग्यप्रकारे निभावली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात छायाचित्र कलेने महत्त्वाची भूमिका बजावली आणि नृशंस हत्या आणि मानवतेला लाजवणाऱ्या छळ मालिकांचे वास्तववादी चित्रण जगासमोर आणले. छायाचित्र पत्रकारितेला त्यावेळी अनन्य महत्त्व प्राप्त झाले. महायुद्धाची दाहकता दर्शवणाऱ्या छायाचित्रांचे मॅगझिनही त्यावेळी प्रसिद्ध होत असे. हीच परंपरा पुढे चालवत जगभरातल्या छायाचित्रकारांची मुकी चित्रे खूप काही बोलत राहिली.
महिला छायाचित्र पत्रकारही यामध्ये मागे नाहीत. जेसिस टॅरबोक्‍स ही अमेरिकन मुलगी पहिली छायाचित्र पत्रकार मानली जाते. जागतिक महायुद्धाचे छायाचित्रण करणाऱ्या हॅरिएट ऍडम्सच्या छायाचित्रांचा समावेश नॅशनल जिऑग्राफिकमध्ये करण्यात आला होता. छायाचित्र पत्रकारितेचा पूर्वसुरींचा हाच वारसा पुढे नेणाऱ्या न्यूशा तवाकोलिन या शूर इराणी छायाचित्र पत्रकार महिलेला नुकतेच प्रिन्स कॉल्स पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. इसिसच्या नृशंस कारवायांनी धगधगत असलेल्या मध्यपूर्व आशियात न्यूशा जिवावर उदार होऊन छायाचित्र पत्रकारिता करते आहे.
न्यूशाचा जन्म 1981 मधला. तोही इराणमधील तेहरानचा. इराणमध्ये त्यावेळी स्थित्यंतराचा काळ होता. रझा पेहलवीची सत्ता जाऊन खोमेनी इराणचा शहा बनला होता. इराणी महिलांवर डोंगराएवढे निर्बंध लादले गेले होते. 1980 मध्ये इराण-इराक युद्ध सुरू झाले आणि इराण युद्ध ज्वालांनी वेढला गेला. 1981 मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये जन्मलेली न्यूशा युद्धग्रस्त वातावरणातच मोठी झाली. तेव्हापासून इराण आणि मध्यपूर्व आशिया राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर आहे.
सीरिया, इराक आणि एकूणच मध्य आशिया अलीकडे इसिसच्या कारवायांनी पोखरला गेला आहे. हजारो लोक स्थलांतर करीत आहेत. शेकडो गावे उजाड होत आहेत. केवळ धर्मवेडापायी उमलती तरुण पिढी आपले आयुष्य दावणीला लावत आहे. मानवतेला लाजवणारी नृशंस हत्याकांड घडत आहेत.
या घटनांचे राजकीय आणि सामाजिक परिणाम तर आहेतच. सोबतच मानसिक परिणामही आहेत. घर आणि शहरांसोबतच मनेही कोलमडत आहेत. न्यूशाने हे सगळे आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. प्रत्यक्ष घटनांपेक्षाही न्यूशाच्या छायाचित्रांनी घटनांचे पडसाद आणि त्याचे मानसिक कंगोरे अधिक टिपलेले आढळतात. छायाचित्र पत्रकारिता आणि कला यांचा सुरेख संगम न्यूशाच्या छायाचित्रांमध्ये दिसतो. निर्बंधाचा व्यक्‍तिगत परिणाम, कुर्दीश महिलांचा संघर्ष, मध्यमवर्गीयांवर झालेले दूरगामी परिणाम, हजारो स्थानिकांचे स्थलांतरण, त्यांचे निर्वासित होणे, त्यांच्यातील सगळे व्यापून उरलेली असुरक्षिततेची भावना, जिहादी महिलेची उत्तर इराकमध्ये इसिसशी झुंज अशा अनेक घटनांवर न्यूशाची छायाचित्रे बोलतात, शब्दांशिवाय.
न्यूशा कलावंत आहे आणि स्त्री आहे, म्हणून तिला ही स्पंदने अधिक हळुवारपणे टिपता येत असावीत का? तिने
छायाचित्र पत्रकारितेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्‍नांनाही वाचा फोडली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू झालेला न्यूशाचा हा प्रवास सुरू आहे अथक, अव्याहत. एका इराणी वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या न्यूशाने नऊ सुधारणावादी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. टाइम, नॅशनल जिओग्राफिक व मॅग्नम फोटोज, द न्यूयॉर्क टाइम्स, ल फिंगारो, ल मॉंद यांनीही न्यूशाच्या छायाचित्रांना प्रसिद्धी दिली आहे. पुढे 2001 दरम्यान तिने न्यूयॉर्कच्या पॉलॅरिस इमेजेससाठी इराणमध्ये छायाचित्रण केले. तिच्या छायाचित्रांचा समावेश फ्रान्समधील पेरपिग्नन महोत्सवातही झाला. न्यूशाचे मदर ऑफ मॅटर्स, विमेन इन ऍक्‍सिस ऑफ एव्हिल, द डे आय बिकेम वुमन व लूक हे छायाचित्र संग्रहही खूप गाजले. न्यूशाने महिलांसाठी एक वृत्तपत्रही सुरू केले होते.
छायाचित्र पत्रकारिता हा न्यूशाचा केवळ व्यवसाय नाही, तर तो तिचा ध्यास आहे. न्यूशा ही एक संवेदनशील कलावंत आहे, म्हणूनच धगधगत्या युद्धजन्य प्रदेशातही तिच्यातील संवेदनशीलता जागृत आहे, नव्हे या युद्धज्वाळांमध्ये ती दिवसेंदिवस तावून सुलाखून अधिक झळाळते आहे.
प्रिन्स कॉल्स पुरस्कार स्वीकारताना न्यूशाने केलेले भाष्य प्रत्येक संवेदनशील व्यक्‍तीला अंतर्मुख करणारे आहे. न्यूशा म्हणते, ""इराक, सीरियातील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. तिथे ज्वालांना जवळ करीत मी छायाचित्र पत्रकारिता केली. त्या परिस्थितीत अनेकजण होरपळत असताना मला हा पुरस्कार स्वीकारताना संकोचल्यासारखे होते आहे.'' न्यूशाचे हे उद्गार तिच्यातील संवेदनशील कलाकाराची ओळख पटवून देण्यास पुरेसे आहेत.
न्यूशाने पुरस्कारापोटी मिळालेली 1 लाख युरोची रक्‍कम विविध संघटनांना वाटून दिली आहे. याआधीही 2014 मध्ये न्यूशाला कार्मिगनॅक गॅशन छायाचित्र पुरस्कार प्राप्त झाला आहे.
न्यूशासारखे अनेक ध्येयवेडे जिवावर उदार होऊन मध्यपूर्वेतील भयाण वास्तव आपापल्या परीने जगासमोर आणत आहेत. पुरस्कार मिळविणे, हे त्यांचे उद्दिष्ट नक्‍कीच नाही. तर ही परिस्थिती बदलणे, हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या प्रयत्नांना कधीतरी यश येईल आणि धर्माच्या नावावर उच्छाद मांडणाऱ्या माथेफिरूंच्या हातात एकवटलेले निष्पापांचे जिणे सुकर होईल, या आशेसह न्यूशाच्या साहसी कलेला सलाम!
-स्वाती हुद्दार
publish in sakal
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह