Powered by Blogger.

Saturday, 24 October 2015

ललित

नवरात्रातली प्रसन्न पहाट. गार वाऱ्याची सुखावणारी झुळूक. पावसाळा आणि हिवाळ्याचा हा संधीकाळ. समेवर आलेला प्राजक्‍ताचा दरवळ आणि रागदारी सुरू करण्याच्या तयारीत असलेली गर्भरेशमी शेवंती. घरादाराला आलेलं लखलखत्या पावित्र्याचं उधाण. हळदी कुंकवाच्या ठसठशीत बोटांनी सजलेली सुवासिनींची कपाळ आणि बांगड्यांच्या किणकिणीची अलवार लगबग. सजवलेल्या मखरात कोवळ्या हिरव्या लुसलुशीत कोंबांमध्ये विसावलेली जगन्माता आदिशक्‍ती. नवरात्र म्हणजे सृजनाचा उत्सव. माती आणि स्त्री दोघींच्याही पुजनाचा सोहळा. काळ्या मातीतून उगवणारे हिरवे कोंभ रसरशीत जीवनाचं प्रतीक. नवरात्राचा घट म्हणजे जीवनाचं आणि जन्माबरोबरच जन्मलेल्या मृत्युचही प्रतीक. उदाधुपाच्या पवित्र सुवासानं कोंदलेला गाभारा. टाळ्यांचा गजर आणि लयबद्ध सुरात चाललेली अंबेची आर्त आळवणी.
क्‍लेशापासून सोडवी, दु:खापासून सोडवी
तोडी भवपाशा
भवपाश, मोह, सुखदु:ख आणि त्याही पलिकडे जन्ममरणाचे बंध तोडण्याचं मागणं एकीकडे जगदंबेला मागत असताना खरंचं या मोहपाशाचे बंध सैल झाले असतात का, बाबा रोज भवानीअष्टक म्हणायचे.
न तातो न माता न बंधुर्न न भ्राता
न पुत्रो न पुत्री
न भ्रुत्यो न भर्ता
न जायां न विद्या न वृर्त्ती ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि
सगळं इथेच सोडून आदिशक्‍तीच्या तेजात विलीन होण्याची पूर्णावस्था. तेव्हा कळत नव्हता त्यातला मतितार्थ. आता कळतो, पण अजूनही वळत नाही
बंध सोडवत तर नाहीतच, सैलावतही नाहीत. हे आभासच खरे भासायला लागतात. हे घर, हा संसार, ही माणसं, ही नाती, हे मान हे अपमान, हे सुख हे दु:ख. जगण्याच्या या आवर्तात अडकलेल माझे मी पण. नाकारते आहे मातीतूनच अंकुरलेल्या जीवाचा पुन्हा मातीतच विलीन होण्याचा प्रवास. जडत्वाचा चैतन्याकडे प्रवास. उत्पत्ती स्थिती लय. एक पूर्ण वर्तूळ.
आज अष्टमी. फुंकलेल्या घागरीतून उमटणारा अनाहत नाद. अहं ब्रह्मास्मी. हे सत्य अधोरेखीत करत पोचतो आत आत अंतर्आत्म्यापर्यंत आणि गळून पडते शारीर जाणिव. अशारिरी आत्म्यापर्यंत पोहोचतो आदिशक्‍तीच्या तेजोवलयातील तेजपुंज कण आणि उरल्या सुरल्या नेणीवाही गळून पडतात. उरतो फक्‍त दीपवून टाकणारा तेजस्वी प्रकाश, सर्वस्व व्यापून उरणारा. तिच्याही ठायी आणि माझ्याही ठायी.
कित्येक जन्म सरले, युगानुयुग सुरू आहे आदिशक्‍तीच्या गाभाऱ्यात उदाधुपाच्या साथीनं तीच आर्त आळवणी. मी त्या अनंत युगांची साक्षीदार, कधी मी शास्त्रार्थ सांगणारी गार्गी, कधी मैत्रेयी, कधी कृष्णभक्‍तीत लीन झालेली राधा, कधी मीरा, कधी चांगदेवाला तत्वज्ञान सांगणारी मुक्‍ता, कधी पांडुरंगाशी भांडणारी जना, कधी चोख्याची सोयरा, कधी तुक्‍याची जिजा. मी युगंधरा. मी विदेही. आरतीच्या तबक्रातल्या ज्योतीभोवती एक प्रकाशवलय. त्या तेजस्वी प्रकाशानं ठाव घेतला संपूर्ण गाभाऱ्याचा मी, माझे मीपण त्यात विरघळून गेले. उरला केवळ तेज:पूंज कण. हळुहळु तोही आदिशक्‍तीच्या हृदयज्योतीत विलीन झाला आणि उजळून गेला अवघा गाभारा, एका अलौकिक प्रकाशानं.
स्वाती हुद्दार

Saturday, 13 June 2015

शोध निरंतर

कित्येक युगांपासून मी घेतेय शोध माझ्यातल्याच मी चा
माझ्यातल्या चैतन्या ! वेद पुराणांमधून शोधलं तुला
पृथ्वीच्या अग्रावर स्वार होऊन घातल्या
कित्येक प्रदक्षिणा तेजोनिधी भोवती
प्रकाश वर्षांवर स्वार होऊन घातली संपूर्ण सूर्यमाला पालथी
ब्रह्मांडाच्या पोकळीत घेतली किती आवर्तने
सप्तसागराच्या खोल तळात घेतला शोध
धुंडाळली आकाशाचे उदर फाडून उंचचउंच गेलेली हिमशिखरे
घेतला कानोसा खळाळणाऱ्या पाण्याचा, सळसळणाऱ्या रानाचा
मंदीरातल्या घंटेचा, मशिदीतल्या अजानचा
उत्पत्ती, स्थिती, लयानंतर
राख राख झालेल्या कणांमध्येही घेतला धांडोळा
त्याच राखेतून पुन्हा उभारी घेतलेल्या
कोवळ्या लुसलुशीत कोंबातही शोधलं तुला
माझ्यासह सगळं ब्रह्मांड व्यापून उरलेल्या चैतन्या
तुझ्याच शोधात राजवैभव त्यागून
बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ झालेल्या
सिद्धार्थाला तू गवसलास आणि तो बुद्ध झाला
तेव्हापासून मीही घेतेय तिथेच युगांपासून तुझा शोध
निरंतर...

स्वाती हुद्दार
13 जून 2015

Tuesday, 2 June 2015

तुझी साक्ष


असंख्य सूर्यमाला, असंख्य ग्रह तारे
आणि हे सगळे कवेत घेणारी अतिप्रचंड पोकळी
या सगळ्या पसाऱ्यातील एका सूर्यमालेतल्या
पृथ्वीवरच्या एका देशातल्या
एका छोट्याशा गावात राहणारा
एक छोटासा जीव.
विश्‍वाच्या या अफाट पसाऱ्यातला
केवळ एक ठिपका
जेव्हा तुझ्या अस्तित्वालाच आव्हान देतो,
तुझे असणे नाकारतो,
तेव्हा हे जग्गनियंत्या
तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी
हलकीशी स्मित रेषा पाहून चकाकते वीज आकाशात
आणि सगळं विश्‍व व्यापून दशांगुळे उरलेला तू
हळूच तुझे कृपाळू बाहू पसरवून
त्याला कवेत घेतो
त्याचं बुद्धिकौशल्य, त्याचं वक्‍तृत्व,
त्याचा तुझ्या नसण्यावरचा विश्‍वास
ठामपणे मांडण्यासाठी त्याला शब्दांचं बळ पुरवतो
कारण तो आहे तुझाच अंश
एक दिवस तुझ्यातच सामावणारा
पण तोपर्यंत तुझ्या नसण्याचे संदर्भ तो देत राहणार
तुझ्याच साक्षीनं

स्वाती हुद्दार
2 जून 2015

Sunday, 31 May 2015

माझ्या कविता


तोही हरवला

अशी सारखी सारखी कुठे हरवतेस
त्यानं विचारलं
नितळ आकाशातील चांदण्यांचे ठिपके करून
रांगोळी रेखण्यात मग्न असलेल्या
तिच्यापर्यंत त्याचा प्रश्‍न पोहोचलाच नाही
चांदण्यांची उठाठेव करणाऱ्या तिच्या
भावविभोर स्वप्नाळू डोळ्यात पाहताना
त्यालाही त्याच्या प्रश्‍नाची निरर्थकता उमगली
आणि दुधेरी चांदण प्रकाशात एक आकाशातला
आणि दुसरा भुईवरचा चंद्र न्याहाळण्यात
मग तोही हरवला

****************************************

शिशिर

अस्वस्थ पानगळ
सुकलेले बुंधे
गोठलेला शिशिर
उजाड घरटे

उदास सांज
बोचरा वारा
सुरांवर झुलणारा
जीवघेणा मारवा

सावळे आभाळ
सावळी भुई
जीवनावर रुसलेली
निष्पर्ण राई

व्याकुळ डोळे
कोंदलेलं अंबर
परतीच्या वाटेवर
भुकेला हंबर

दूरदेशी घरधनी
थरथरली वात
आसवांचा महापूर
पापण्यांच्या आत
****************************************

शब्दांना जागच येत नाही आताशा
जागवण्याचा खूप अट्टाहास केला
तरी कूस बदलून ते परत स्वप्नात दंग होतात
माझ्या मनात मात्र भावनांचा कल्लोळ
शब्दांशिवाय मी अस्वस्थ...


****************************************

दु:स्वप्नाची एक भयाण रात्र
सर्वस्व व्यापून दशांगूळे उरलेली
युगाच्या सीमेवर उभी ती, अस्वस्थ
तांबड फुटण्याची वाट पाहात...


****************************************

Wednesday, 27 May 2015

पाऊसगाणं

पाऊसगाणं


सृष्टीला सृजनाचे वेध लागले की शब्दांनाही पालवी फु टु लागते. मोगऱ्याच्या सुगंधाच्या साक्षीनं अंगभर दुलईची उब लपेटुन पहाटे निरभ्र आकाशातील चांदण्या मोजण्याचा ऋतू आता सरला आहे. आता सामोरं जायचं आहे, टपोऱ्या थेंबांतून निथळणाऱ्या जीवनाला. अवघी सृष्टी डोळ्यात प्राण आणून त्याच्या वाटुलीकडे डोळे लावुन बसली आहे.

आज परत आभाळ गर्द निळं झालं आहे. गोकुळातल्या सावळ्या कृष्णासारखं. वेळुबनातून सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचे सूरही उमटताहेत त्याच्या आगमनाची वार्ता घेऊन. दूरस्थ माळावर ध्यानस्थ योग्यासारख्या उभ्या असलेल्या त्या शतायुषी वडानं अंगभर धुळीचं उटणं माखलं आहे आणि सुस्नात होण्यासाठी प्रतीक्षा करतो आहे ेपर्जन्यधारांची. उष्म्यानं आळसावलेल्या वडावरच्या पाखरांनीही मंजुळ चिवचिवाट करीत त्याच्या येण्याचे संकेत दिले आहेत. चाऱ्यासाठी दिवसभर कुरणात हुंदडलेल्या गायीवासरांनीही वडाच्या पारंब्यांखाली आसरा शोधला आहे. नुकतंच चालायला लागलेलं गायीचं गोजीरवाणं वासरू आपल्या काळ्याभोरं नजरेनं सृष्टी बदलाचा तो सोहळा डोळ्यात साठवतं आहे. गायीनं त्या पिलाला मायेनं आपल्या मानेखाली घेतलं आणि त्याचं मस्तक हुंगत त्याला आश्‍वस्त केलं. आभाळ अधिकच गहिरं झालं आहे. सगळा आसमंत काळवंडुन आला आहे आणि अचानक वीज लकाकली. क्षणभर सगळं लख्ख झालं. त्या प्रकाशात सगळ्या आकृत्या स्पष्ट झाल्या आणि क्षणात पुन्हा सगळं सावळ्या वर्णात अस्पष्ट, धुसर झालं. आयुष्याचही तर असचं असतं. एखाद्या घटनेची, प्रसंगाची संगती लागता लागताच अचानक काही दुवे निखळतात आणि ते प्रसंग कायमचे धुक्‍यात विरतात. मनाच्या अंतरंगात कायमचे गुडुप होतात. मन कितीही डहुळंल तरीही पृष्ठभागावर उमटतात केवळ तरंग.

पावसाच्या आगमनाची पूर्वतयारी झाली आणि पाहता पाहता टपोरे थेंब तृषार्त धरणीवर टपटपु लागले. मृण्मय गंधानं तन मन मोहरुन आलं. भेगाळलेल्या भुमीतून कोंडलेला असह्य उष्मा बाहेर पडु लागला. हळुहळु सगळं श्रांत क्‍लांत होत चाललं आहे. थेंबांचं नर्तन आता ऐन रंगात आलं आहे. थेंबांनी धारानृत्य आरंभलं आहे. पावसानं आता एक लय धरली आहे. वडाखालचं ते गोजीरवाणं वासरू थरथरत्या अंगानं गायीला अधिकच बिलगलं आहे. वडावरची किलबिलही शांत झाली आहे. वडाची हिरवीकंच पालवी कोसळत्या जलधारात मध्येच चमकते आहे.

पावसासह सावळ्या कृष्णाची आठवण हटकुन येतेच आणि कृष्णामागोमाग राधेची सयही येते. राधा म्हणजे कासळत्या धारेचचं रुप. आकाशातून वसुंधरेवर कोसळणाऱ्या नितळ पारदर्शी धारेसारखीच राधाही शुद्ध, सात्विक, पवित्र. राधेचा आणि धारेचा गुणधर्म सारखाच, समर्पणाचा. दोघींनाही परिणामांची पर्वा न करता उत्कटतेनं झोकुन देणं एवढंच माहिती.

राधा म्हणजे खरंतरं कृष्णावर निस्सीम प्रेम करणारं, अवघ्या गोकुळानं वेडं ठरवलेलं एक काल्पनिक पात्र. मात्र युगानुयुगे राधाच ठरली आहे उत्कट आणि निस्सीम प्रेमाचा मानदंड.

पाऊस कोसळायला लागला की गोकुळातील राधाकृष्णाच्या रासलीलेचे सूर कानात घुमु लागतात.पाऊस कृष्ण भासू लागतो. वसुंधरारुपी राधेवर ओसंडून प्रेम करणारा. एक आभासदृष्य. राधा सुद्धा तर आहे केवळ एक आभास. कृष्णाचं एक हळवं अपुरं स्वप्न. गोकुळात माघारी राहिलेलं.

पाऊस कोसळू लागला की तो हातांवर वेचायचा. त्याचा थंड स्पर्श अनुभवायचा, त्याच्या कधी सरळ तर कधी तिरप्या असलेल्या रेशमी रेषा वाचायच्या. तो हृदयात साठवायचा. स्मरणकुपीत जपून ठेवायचा. मग हळुहळु उलगडत जायचा. एकेका रुपेरी धारेत गवसतात कितीतरी संदर्भ. आताशा पाऊस अनुभवता येतो त्यात न भिजताही. अगदी अलिप्तपणे. आणि तोच अनुभव अधिक समृद्ध आणि गहिरा वाटतो. न भिजताही अंतर्बाह्य चिंब करणारा. पावसाचा तो ओलावा झिरपतो आंत आंत हृदयात अलगद मोरपिसासारखा. पाऊस धारांच्या उभ्या आडव्या उनाड रेषांनी आता गंभीर लय धरली आहे. वयात आलेल्या मुलीनं उपजत शहाणपणानं सरळं चालावं तसा पाऊसही एका रेषेत कोसळतो आहे. त्याच्या रेषा वाचताना कधीतरी पाऊस पाण्यात सोडलेली हेलकावत पुढे पुढे जाणारी कागदी नावं दिसते. अचानक गाठलेल्या पावसानं चिंब भिजवलेली दप्तरातली कोरी करकरीत पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करताना डोळ्यातून उतरलेला पाऊस दिसतो. पावसाच्या तांडवानं ओल्या झालेल्या सरपणावर सांजेची भाकर शिजवताना खोलीभर दाटलेला धूर आणि फुंकणीनं त्या सरपणाचे आर्जव करणारी माय गवसते. नाचऱ्या थेंबांनी अंगणभर घातलेली रांगोळी बघत नाचणारी परकरी पोर सापडते तर कधी दूरदेशी गेलेल्या सजणाची सय येऊन व्याकुळलेली नववधु दिसते. पावसाच्या माऱ्यानं अस्ताव्यस्त झालेल्या झोपडीत तान्ह्याला कुशीत घेऊन थरथरणारी मायही आठवते. अशावेळी हा पाऊस, तो वाचताना पाऊसमय झालेली ही सगळी दृश्‍य आणि मी हे द्वैत उरतच नाही मुळी. मग एका संपृक्‍त क्षणी माझ्यातलं मी पण विरघळत जातं आणि मी होते एक कोसळती पाऊस धारा? की कृष्णवेडी राधा?

Tuesday, 26 May 2015

प्राजक्‍त


आजही रोजच्या सारखाच अंगणभर प्राजक्‍ताचा सडा पडला होता. केशरी देठाची दळदार पांढरीशुभ्र नाजुक फुल पहाटेच्या अंधुक प्रकाशात चमकत होती. आतापर्यंत आकाशभर पसरलेलं पिठुर चांदणं जणू या फुलांच्या रुपानं आता धरेवर सांडलं होतं. प्राजक्‍ताचा तो स्वर्गीय सुगंध तनामनात भरून घेताना मन मोरपिसासारखं हलकं झालं होतं. प्राजक्‍त युगानुयुग उभा आहे, कृष्ण-रुक्‍मिणीच्या प्रेमाची आणि सत्यभामेच्या लाडिक रुसव्याची साक्ष देत. मध्यरात्री जेव्हा ही केशरी देठाची पांढरी दळदार फुलं उमलतात, तेव्हा त्याचा गंध अवघ्या वातावरणाचा ठाव घेतो. याच गंधाला भूलून कृष्णानं रुक्‍मिणीसाठी हे स्वर्गीय फु ल आणलं असेल आणि त्या गंधाच्या साक्षीनं प्राजक्‍ताच्या नाजुक फांद्यांना झोके बांधून त्यावर झुलत कृष्णानं रुक्‍मिणीला आपले पाव्यातून उमटलेले श्‍वास ऐकवले असतील. त्या स्वरांच्या ओढीनं द्वारकेतलं गोधन कृष्ण रुक्‍मिणीभोवती गोळा झालं असेल. ती मध्यरात्र, आकाशातलं टिपूर चांदणं, फांद्याफांद्यांवर उमललेले प्राजक्‍ताचे सुगंधी गुच्छ, सभोवतीची मुकी जनावरं पाहून त्या क्षणी कृष्णाला गोकुळ आठवलं असेल का? गोकुळातले आता खूप मागे राहिलेले सवंगडी, कृष्णावर जीव ओवाळून टाकणारी यशोदा आणि नंदबाबा,तिथला यमुनेचा निळाशार डोह, कृष्णावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या गोपी आणि यमुनेच्या नितळ पाण्यासारखीच अंतर्बाह्य शुद्ध असलेली ती वेडी राधा, द्वारकाधीश झाल्यानंतरही कृष्णाच्या मनाचा एक कोपरा राधेच्या निरपेक्ष, निर्व्याज प्रेमासाठी आसुसलेलाच राहिला असेल. राधाकृष्णाचं प्रेमही या प्राजक्‍तासारखंच तर होतं शुद्ध, सात्विक, सुगंधी आणि अल्पायुषीही. गोकुळात असताना कृष्णाला प्राजक्‍त मिळाला असता तर त्यावर केवळ आणि केवळ राधेचाच हक्‍क असता. आता मात्र गोकुळ, राधा, राधेच्या तरल आठवणी, सगळंचं या सूवर्णाच्या द्वारकेत हरवलं आहे. खूप खूप मागे राहिलं आहे. कृष्णानचं उभारली आहे ही वैभवसंपन्न द्वारका. त्याला द्वारका उभारता आली, मात्र निर्व्याज, निष्कपट प्रेम करणाऱ्या माणसांचं गोकुळ नाही पुन्हा निर्माण करता आलं. नवा राजपाट, नवी राजकीय समीकरणं, नियती बदलून टाकणारे सोंगट्यांचे दान, नियतीनंच कृष्णाशी सांधलेलं दुर्भागी कुंतीचं नातं, पर्यायानं त्याच्या वाट्याला आलेला त्याचा सखा पार्थ, ज्यांच्या परस्परांवरच्या विश्‍वासाला कुठल्याही नात्याच्या कोंदणात कधी बांधताचं आलं नाही, अशी कृष्णाची सखी कृष्णप्रिया याज्ञसेनी, या सगळ्यांच्या नियतीच्या सोंगट्या कृष्णाला आपल्या हाती धराव्या लागल्या, कदाचित कर्तव्य म्हणून कदाचित नाईलाज म्हणून. मात्र या सगळ्या व्यवहारात राधा खूप मागे राहिली, दूर गोकुळात. कृष्ण गोकुळातून गेल्यानंतर राधा रोज सांजेला यमुनेवर यायची. सांजावणाऱ्या आकाशात आपल्या सावळ्याचा चेहरा शोधायची. उगवणाऱ्या चंद्राजवळ कृष्णासाठी निरोप धाडायची. यमुनेच्या खळाळणाऱ्या लाटांमध्ये कृष्णाच्या बासरीचे सूर शोधायची. घरी परतणाऱ्या कपिलेला जोजवायची. कृष्णाच्या आठवणीनं राधेच्या काळ्याभोर डोळ्यातून उष्ण जल पाझरायचं, ते यमुनेच्या पाण्यात विरघळायचं. कधीतरी या सगळ्या राजपाटातून निवांत क्षणाच्या शोधात प्राजक्‍ताजवळ आलेला कृष्ण प्राजक्‍ताच्या कृश बुंध्याला टेकून राधेचे निर्व्याज प्रेम स्मरत बासरीचे सूर छेडायचा. कृष्णाचे ते सूर प्राजक्‍ताचा गंध लपेटून वाऱ्यावर झुलत गोकुळात पोहोचायचे. राधेच्या काळीजकळांवर हळुवार फुंकर घालायचे.

प्राजक्‍तही मोहरून यायचा, त्या बेधुंद स्वरांनी. कृष्णस्पर्शानं पावन झालेला प्राजक्‍ताचा तो हडकुळा बुंधा आणि उंचचउंच गेलेल्या रखरखीत पानांच्या फांद्या धन्यधन्य व्हायच्या. बासरीचे सूर छेडण्यात समाधी लागलेल्या कृष्णाची आरक्‍त पावलं प्राजक्‍ताखालच्या ओलसर मातीत रुतायची. कृष्णाच्या पावलांचा आरक्‍त रंग त्या मातीत रुजायचा आणि मुळातच केशरी असलेली प्राजक्‍ताची देठं अधिकच केशरी व्हायची. कृष्णाच्या हृदयातून झरलेला राधेच्या आठवणीचा गंध प्राजक्‍ताच्या गाभ्यात रुजला आहे आणि म्हणूनच युगानुयुग हा प्राजक्‍त राधाकृष्णाच्या प्रेमाचा गंध जपत फुलतो आहे.

आज हा बहरलेला प्राजक्‍त पाहाताना पुन्हा तुझी अनिवार आठवण येते आहे. तू मात्र नाहीसच, नेहमी नसतोस तसाच. तनान आणि मनानही. तुला लागलं आहे जग बदलण्याचं वेड. परवा त्या गच्च भरलेल्या सभागृहात डोळ्यात जग बदलण्याची स्वप्न दाटलेला तू व्यासपीठावर भाषण देत होतास. एका कोपऱ्यात मीही, तुझे ते विराट रुप डोळ्यात साठवत. तुझा तो आवेश, ते जगावेगळं स्वप्न. यावरच तर जीव ओवाळून टाकला होता मी कधीतरी. मात्र ते स्वप्न आपण दोघांनी मिळून पाहिलं होतं. ते पूर्ण करताना आपल्यात न सांधता येणारं अंतर पडत जाईल, असं वाटंलच नव्हत कधीही. तुझं भाषण संपलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. तू मंचावरून खाली उतरलास. झपझप पावल टाकीत दूर जायला लागलास. तुझ्या भोवती तुझ्या कार्यकर्त्यांचं कडं होतं. बावरलेली मी, तुझ्या एका कटाक्षासाठी आसुसलेली मी. हाक मारण्यासाठी आ वासला, पण शब्दच फुटेना. तू गर्दीत हरवलास. नेहमी हरवतोस तसाच. निराश झालेली मी घरी परतले, रिक्‍त मनानं. अंगणात तू आणि मी एकत्र लावलेला प्राजक्‍त बहरला होता आपल्या स्वर्गीय सुगंधासह. हा प्राजक्‍त पहिल्यांदा फुलला तेव्हा श्रावणाच्या रिमझिमणाऱ्या पावसानं सुस्नात झालेल्या फुलांची ओलेती ओंजळ तू माझ्या ओंजळीत रिती केली होतीस आणि म्हणालास, या फुलांसारखाच आपल्या प्रेमाचाही सुगंध कायम दरवळत राहायला हवा. मी मान लववली.

आज मात्र मी, माझं प्रेम, आपलं घरकुल, अंगणातला तो प्राजक्‍त, त्याचा दरवळ या सगळ्याचेच बंध तुला बांधून ठेवण्यास असमर्थ आहेत, हे मला पुरतं कळलं आहे. तुझ्या जग जिंकायला निघालेल्या तुझ्या भ्रमंतीत कधीतरी रिमझिम श्रावण बरसत असताना फुललेला प्राजक्‍त पाहून तुला माझी सय आलीच, तरी माझ्या काळजीनं व्याकुळ होऊ नकोस, कारण मी एकटी नाही, तू आणि मी एकत्र लावलेला प्राजक्‍त माझ्या सोबतीला आहे.

गोकुळात कृष्णाची वाट पाहात थांबलेल्या राधेसारखीच मीही तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसले आहे. तोपर्यंत कृश बुंध्याचा,उंचचउंच गेलेल्या फांद्यांचा, पानोपानी फुललेला दरवळणारा प्राजक्‍त असाच बहरत राहिल.

स्वाती हुद्दार

परतीचा पाऊस


परवा अचानक पाऊस आला. घरातील कुणी जुनं जाणतं माणूस म्हणालं, अरे हा परतीचा पाऊस आहे. निरोप घ्यायला आलेला. निरोप... या शब्दानं त्या नेहमीच्या आल्हाददायक पावसाचे सगळे संदर्भच बदलले. सांजवेळी आलेल्या त्या पावसानं आधीचं सांजावलेलं ते निळसावळ आभाळ अधिकच गडद झालं. प्रकृतीचे रंग अंतरंगातही उतरतात काय? न कळे. पण मनातले रंगही धुसर झाले. हळवे झाले. निरोप असतोच हळवा करणारा. या निरोपाच्या पावसानं माझ्याही मनातल्या काही संदर्भांची गाठोडी उकलली गेली.
काय हरवले सांग शोधिसी, त्या यमुनेच्या जळी... अशी काहीशी अवस्था झाली. काहीतरी गवसत नाही, सारखी शोधाशोध चालली आहे. आतल्याआत. एक अस्वस्थ हुरहुर... पण नेमकं काय हरवलय तेच कळत नाही आणि शोधायचं तरी कुठं? तर यमुनेच्या डोहासारख्या अथांग मनात! बुद्धीला खूप ताण दिला. त्या विवेकनिष्ठ बुद्धीचं आणि हळव्या मनाचं तर कायम भांडण. ती बुद्धी कसला थांग लागू द्यायला तयार नाही. एखादी वास्तव्याची जागा सोडून जाताना सगळं घर रिकामं केल्यावर त्या ठिकाणी एक अस्वस्थ रिकामपणं जसं भरून राहतं ना, तशीच काहीशी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली. पुन्हा मनातल्या सगळ्या आठवणी एकेक करून उसवून पाहिल्या. शोधाशोध केली. पुन्हा जशाच्या तशा रचून ठेवल्या. पण तरी ते हरवलेलं काही गवसलं नाही. त्या उसवलेल्या आठवणीही किती सुंदर होत्या. एरवी त्यापाशी मन नक्‍कीच घोटाळलं असतं. पण आज काहीच कसं भावत नाही? कुठेच थांबावसं वाटतं नाही. मन सारखं त्या हरवलेल्या आठवणीकडेच धाव घेत आहे. जे हरवलं आहे, त्याचं रुपडं तरी स्मरतयं का? तेही नाही. नाव, पत्ता, रंगरुप काहीच स्मरत नसलेल्या त्या आठवणी शोधायच्या कशा? शोधून शोधून खूप थकवा आला आहे. श्‍वास भरून आल्यासारखा वाटतो आहे. शेवटी बाहेर अवेळी कोसळणाऱ्या त्या उभ्या आडव्या रेघात काही गवसते का म्हणून शोधत बसले. तर तिथेही सगळा काळोखच. फक्‍त त्या तिरप्या तिरप्या कोसळणाऱ्या रेघांचा एक ठरावीक नाद. बाकी सगळं शांत. मनात मात्र कमालीचं अशांत. उलघाल, शोधाशोध, उचलठेव... सारचं कसं संदर्भहीन. संदर्भ हवाच कशाला? सगळंच तर संदर्भाशिवाय सुरू आहे. जन्माला कुठला संदर्भ असतो? आणि मृत्यूला तरी लागतो का संदर्भ? जन्ममृत्युच्या मधल्या जगण्याला तरी कुठे आहे संदर्भ? जन्माला आलो म्हणून आणि मृत्यू येत नाही म्हणून जगत राहायचं आणि जगतो आहोत म्हणून संदर्भ शोधायचे. आपल्या धडपडीला पूरक असे संदर्भ कुरवाळत, गोंजारत राहायचे. जगायचं म्हणून पोट भरायचं, पोट भरण्यासाठी कमवायचं... कमवायचं म्हटलं की स्पर्धा आलीच, स्पर्धेतून चढाओढ, स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड, सोबतच्यांशी शर्यत, स्पर्धेत टिकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद.. त्यातून येणारे असह्य ताण आणि मग त्या ताणांतून मुक्‍त होण्यासाठी सुखाच्या क्षणांचा शोध! एक न संपणारी अन थकवणारी शोधयात्रा असते आयुष्य म्हणजे. विचारांचा नुसता पसारा झाला आहे. आवरता आवरला जात नाही. लहानपण छान होतं. भातुकलीच्या खेळातली इवली इवली खेळणी मांडायची... लूटूपुटूचा संसार थाटायचा. मन भरलं की आवरून ठेवायचा. अडचणी नाहीत की गुंतागुंत नाही. आताचा हा आठवणींचा पसारा मात्र नावरे आवरिता झाला आहे. पसाराच भरलाय पण रिता रिता पसारा! भातुकली आठवली आणि माझ्या लहानपणची ती इंदुराहून आणलेली लालचुटूक लाखेची खेळभांडीही आठवली. एकदा खेळता खेळता त्यातलं एक खेळणं तुटलं. मी रडून रडून गोंधळ घातला. ते तुटलेलं खेळणं जोडत किती तरी वेळ अंगणातल्या चाफ्याखाली हिरमुसुन बसले होते मी. तेव्हा कुठं कळत होतं की, तुटलेलं परत सांधता येत नाही. तेव्हा कळत नव्हतं हे खरच, पण आता तरी कळतयं का? आता कळतयं खरं, पण वळत नाहीच. पुन्हा पुन्हा तुटलेलं जोडण्याचा प्रयत्न करतं मन. कधी वस्तू, कधी नाती, कधी मैत्री... पण हाती येतं अपयश आणि जगण्याच्या पसाऱ्यानं दिलेलं रितेपण. प्रचंड थकवा आलाय, काळाच्या ओघात ते माहेरचं चाफ्याचं झाडही हरवलं आहे. एरवी त्याच्याजवळ व्यक्‍त होता यायचं. माहेरचं अंगण आता प्रशस्त झालं आहे. दगडी फरशांचं... पण मला ते रुक्ष आणि उदास वाटतं आता तिथं चाफा नाही. चाफ्यावरच्या पाखरांची किलबिल नाही. सगळी पाखरं उडून गेली... त्यांनी आपापली घरटी बांधलीत... त्यांनाही त्या चाफ्याची आठवण छळत असेल का? माझ्याचसारखी! चाफा मात्र अव्यक्‍त, अबोल... पूर्वीसरखाच. अरे तो चाफा गेला कुठं? तो तर पूर्वीसारखाचं फुललाय माझ्या मनात. चला मनातला पसारा आवरताना माझा हरवलेला चाफा तर गवसला. सध्या जे शोधतेय, तेही असचं गवसेल... कधीतरी. कारण ही शोधयात्रा तर सुरूच राहणार आहे... कायम...अंतापर्यंत. तोवर पसारा मांडायचा... तो आवरायचा...मग पुन्हा मांडायचा...नि पुन्हा!!!
स्वाती विवेक हुद्दार
3 वर्षांपूर्वी दै. लोकशाही वार्ताच्या उंबरठा पुरवणीत प्रकाशित

aani tohi haravala

अशी सारखी सारखी कुठे हरवतेस
त्यानं विचारलं
नितळ आकाशातील चांदण्यांचे ठिपके करून
रांगोळी रेखण्यात मग्न असलेल्या
तिच्यापर्यंत त्याचा प्रश्‍न पोहोचलाच नाही
चांदण्यांची उठाठेव करणाऱ्या तिच्या
भावविभोर स्वप्नाळू डोळ्यात पाहताना
त्यालाही त्याच्या प्रश्‍नाची निरर्थकता उमगली
आणि दुधेरी चांदण प्रकाशात एक आकाशातला
आणि दुसरा भुईवरचा चंद्र न्याहाळण्यात
मग तोही हरवला

शिशिर


अस्वस्थ पानगळ
सुकलेले बुंधे
गोठलेला शिशिर
उजाड घरटे


उदास सांज
बोचरा वारा
सुरांवर झुलणारा
जीवघेणा मारवा

सावळे आभाळ
सावळी भुई
 जीवनावर रुसलेली
निष्पर्ण राई

व्याकुळ डोळे
कोंदलेलं अंबर
परतीच्या वाटेवर
भुकेला हंबर

दूरदेशी घरधनी
थरथरली वात
आसवांचा महापूर
पापण्यांच्या आत

स्वाती हुद्दार
22.1.14

shabd

शब्दांना जागच येत नाही आताशा
जागवण्याचा खूप अट्टाहास केला
तरी कूस बदलून ते परत स्वप्नात दंग होतात
माझ्या मनात मात्र भावनांचा कल्लोळ
शब्दांशिवाय मी अस्वस्थ...
स्वाती हुद्दार

swapn

दु:स्वप्नाची एक भयाण रात्र
सर्वस्व व्यापून दशांगूळे उरलेली
युगाच्या सीमेवर उभी ती, अस्वस्थ
तांबड फुटण्याची वाट पाहात...
स्वाती हुद्दार

aai

आई...
13 ऑक्‍टोबर 2014 रोजी आजपासून बरोब्बर 17 दिवसांपूर्वी आई गेली. वयाच्या केवळ 65 व्या वर्षी. गेल्या 17 दिवसांपासून आईशिवाय जगण्याची सवय करते आहे. आज आईचा तारखेने वाढदिवस आहे. तसा तिचा जन्म लक्ष्मीपुजनाचा. सहज लक्षात राहणारा. घरात दिवाळी निमित्त गोडधोड व्हायचेच. त्यामुळे आम्ही तिचा वाढदिवस कधी वेगळ्याने साजरा केल्याचे आठवत नाही. अलिकडे मात्र आईच्या नाती तिला त्यांनी स्वत: तयार केलेले शुभेच्छापत्र देऊ लागल्या. तिचे सामान आवरताना तिने जपून ठेवलेल्या या शुभेच्छापत्रांच्या भेटी सापडल्या. नातींनी तिला दिलेली ही भेटच तिच्यासाठी सगळ्यात अमूल्य असावी.
गेल्या दीड वर्षांपासून ती अंथरुणाला खिळली होती. मृत्युशी झुंजत होती. दिवसेंदिवस विकल होत चालली होती, मनाने आणि शरीरानेही. शेवटचा महिनाभर तर ती स्वत:सकट सगळ्यांनाच विसरली होती. अघटिताची चाहुल आम्हालाही लागली होती. शेवटी मृत्यु जिंकला आणि माझ्या आईला माझ्यापासून दूर घेऊन गेला, कायमचा. अनघा विजय कोठे या कष्टमय जीवनाचा यातनामय अंत झाला.
या दीड वर्षात मीच तिची आई झाले होते. ती खायला तयार नसली तर जुन्या जुन्या गोष्टी सांगून तिला भरावायचं, कधी रागवून कधी समजाऊन औषध घ्यायला लावायची. बाबांच्या आठवणी सांगून तिच्या चेहऱ्यावर पसरलेली प्रसन्नता न्याहाळायची, असं बरच काही मी, वैदेही-गार्गी आणि विवेकनं (माझ्या नवऱ्यानं) केलं.
आई आयुष्यभर कष्टच करीत राहिली. घरात कायम पै पाहुणा असायचा. बाबांच्या थोड्या पगारात तिने काटकसरीने सगळ्यांचे हसतमुखाने केले. सगळ्यांच्याच अडचणीत धावत गेली. शेकडो माणसे जोडली. संवेदनशील पण काहीशा एककल्ली स्वभावाच्या माझ्या बाबांना तिने जपले. त्यांचे संघकार्य, त्यांचा मित्रपरीवार सगळ्याचा अभिमान बाळगला आणि हे सगळे स्वत:ची नोकरी सांभाळून. 12 वर्षांपूर्वी बाबा गेल्यावर मात्र ती खचली. मनानं एकाकी होत गेली. सगळ्यात राहून अलिप्त राहिली. माझी नोकरी, मुली लहान, म्हणून माझ्या मुलींसाठी ती माझ्याकडे राहायला आली. तिच्याचमुळे मी निश्‍चिंतपणे नोकरी करू शकले.
लहानपणापासूनचे तिच्या सहवासातले कितीतरी क्षण भोवती पिंगा घालताहेत. माझ्या आजरपणात तिने जागविलेल्या रात्री, माझ्या छोट्या छोट्या आनंदासाठी तिने केलेली धडपड. वेळप्रसंगी तिचे कठोर होणे. बाबांच्या शिस्तीमुळे कोमेजलेल्या माझ्यासाठी तिचे हळवे होणे. माझ्या लग्नाच्या वेळची आई, वैदेहीच्या जन्माच्या वेळची आई, माझ्या छोट्या अपघाताच्या वेळी उन्मळून गेलेली आई. आईची किती रुपं आणि आता अंथरुणाला खिळलेली आई. केवळ अस्थिपंजर देह. संवेददनाविहीन. जाणिव हरवलेला, नेणीवांच्या पलिकडला. तृप्त, शांत...आता तर आई त्यातूनही मुक्‍त झाली आहे. बाबांच्या सावलीत गेली आहे. मला पोरकं करून.
आई ! बुचाचं झाड फुलांनी बहरलं आहे. लहानपणी त्या फुलांची वेणी करून द्यायचीस न मला. तुझी लाडकी काटेकोरांटीही खूप फुलली आहे. रातराणीच्या सुगंधानं घर कोंदून गेलंय. तो कोपऱ्यावरचा भाजीवाला तुझी आठवण काढतो आहे. तुझ्या हातच्या गोग्रासाची वाट पाहात ती काळी गाय दारात थांबली आहे. आई कुठे आहेस गं तू. तुझी आठवण येतेय आई.
आई गेलीच नाहीय कुठे... बुचीच्या फुलातून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते आहे. रातराणीच्या सुगंधातून आनंद वाटते आहे. माझी आई आहे, माझ्याजवळच आहे.

abola

अबोला
काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्‍तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्‍तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.
लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्‍वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्‍कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्‍न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्‍तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्‍तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्‍यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्‍ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्‍यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते.
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.
जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्‍ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्‍तीला निश्‍चित सांगावे.
आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.
अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्‌सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्‍तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्‍तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे.
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्‍ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?
अशा अबोला धरलेल्या पण हवाश्‍या वाटणाऱ्या व्यक्‍तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.
स्वाती

surel bandish

सुरेल बंदीश
आज भर दुपारी आभाळ भरून आलं आणि पाऊस आडवा-उभा कोसळला. आंब्याच्या झरलेल्या मोहोरानं अंगण पिवळंजर्द झालं. आताशा पावसाला आवतण लागतच नाही. तो कधीही येतो, आगंतुकासारखा आणि धुऊन जातो वातावरणावर, मनावर साचलेली कळकट-मळकट मरगळ. मग पावसानं धुऊन लख्ख केलेल्या मनाच्या आरशात आपणच बघावं दर दिवशी-दर क्षणी जुन्या नात्यांची, संबंधांची, मान अपमानाची, बोचऱ्या दु:खाची कात टाकून नवं झालेलं आपलं प्रतिबिंब.
पावसाबरोबर दु:ख झरलं ना की आपलेच आपण भासतो नवे कोरे करकरीत, नुकतेच मातीच्या कुशीतून बाहेर आलेल्या हिरव्याकंच लुसलुशीत कोंबासारखे. आपणच आपलं हे ताजतवानं रुप पाहून गुणगुणावी छानशी लकेर. भरून घ्यावा पावसानं न्हाऊन ओल्या झालेल्या मातीचा सुगंध उरभर. मोजून घ्यावी अवखळ पावसामुळे भेदरलेले पंख सावरत तारेवर बसलेल्या पोपटांची रांग आणि टिपून घ्यावा अनिमिष नेत्रांनी पर्णहिन बुंध्याच्या निमुळत्या फांदीवरून ओघळणारा अलवार पाऊस थेंब.
...आणि सुरू करावा आयुष्याच्या बंदीशीचा अंतरा. लागू दे ना एखादा विवादी स्वर. त्यामुळं जीवनाची बंदीश अधिकच सुरेल होईल.
स्वाती हुद्दार
20 फेब्रुवारी 2015

nach g ghuma

माझ्या एका प्रिय मैत्रीणीनं सकाळच्या चारचौघी पानावर 2011 मध्ये प्रकाशित झालेलं आणि माझ्या स्मरणातुनही उतरलेलं माझं एक टिपण मला सरप्राईज म्हणून पाठवलं. अचानक पणे मिळालेली ही भेट खूप आनंद देऊन गेली. अशी अनमोल भेट क्‍वचितच कुणाला मिळत असेल.
या टिपणाला घटनेचे संदर्भ असले तरी ती परिस्थिती मात्र आजही बदललेली नाही.
नाच ग घुमा........
आज पुन्हा एक हार, प्रस्थापितांनी लादलेली...ती पुन्हा हतबल, असहाय एकटी.
अन्नपाण्याविना तडफ्नार्या रुश्मिताला क्रूर समाजान वाळीत टाकलं ....तिची अवहेलना, दुःख पाहून मृत्यू गहिवरला आणि त्याने तिला कवेत घेतलं
आठ दिवसांची उपाशी, जीवघेणी तगमग अखेर शांत झाली...कोण जिंकलं ? दूर लोटणारा समाज ...कि जवळ घेणारा मृत्यू?
गणेशपुरच्या पारधी बेड्यावर रुश्मिता आणि अमृत कुमारच प्रेम बहरलं....रुश्मितला लग्नाविना दिवस गेले.....बेड्यावर हाहाकार माजला.. जात पंचायत भरली, सगळ्या पुरुषांनी अमृत कुमारला निर्दोष ठरवत रुश्मिताला वाळीत टाकलं .....गुन्हा असेल तर तो दोघांचाही सारखाच पण समाजाने शिक्षा मात्र रुश्मितालाच दिली .......
घरानं,समाजानं नाकारलेली असहाय रुश्मिता उन,वारा, पावसात अन्न पाण्या वाचून तडफडली....सोबतीला होता पोटातला सहा महिन्याचा गर्भ....अखेर मृत्यूने सुटका केली ........
आता होतील निदर्शनं , सवाल-जवाब, निषेध सभा, कोर्ट कचेरया, न्यायनिवाडा, घोषणा, नारेबाजी.....आणि मग पुन्हा एक भयाण शांतता.....दीर्घ उसासे...रुश्मिताचे अस्फुट हुंदके, पोटातल्या बाळाचे भुकेले हुंकार.... या बधीर समाजापर्यंत मात्र ते कधीही पोहोचणार नाही......
कालांतराने पुन्हा एक रुश्मिता ...कधी हुंड्याची बळी, कधी वासनांची तर कधी.....या निर्दयी समाजाची.....! जग पोहोचतय अंतराळात, इथे मात्र ठराविक परीघ....अन्यायाचा, अत्याचाराचा....त्या परिघात फिरत राहणं हेच प्राक्तन......
नाच ग घुमा........
Swati Huddar
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह