Powered by Blogger.

Friday, 31 March 2023

अखंडीत सेवा घडो रामचंद्राची

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे माझ्या बाबांचे (श्री. विजय हरीभाऊ कोठे) सद्गुरू.
बाबांनी आयुष्यभर चांगुलपणाचीच आराधना केली. श्रीराम त्यांच्या आचरणात होते आणि रामनाम त्यांच्या मुखात होते. मेधाविनी मंडळाने रामनवरात्रात राम ध्यावा, राम गावा ही मालिका चालवली. त्यानिमित्ताने ही रामनाम नौका, या माझ्या आवडत्या पदावर काही वेडेवाकुडे लिहण्याचा प्रयत्न केला. ही रामसेवा माझ्या बाबांच्या चरणी समर्पित करते.
स्वाती


ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||
मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |
ते दुःख शांतवाया | मांत्रिक रामराया ||
सुटले अफाट वारे | मनतारू त्यात बिथरे |
त्या वादळातुनी या नेईल रामराया ||
भ्रम भोवऱ्यात अडली | नौका परी न बुडली |
धरुनी सुकाणू हाती | बसलेत रामराया ||
आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |
तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया ||
हा देह नाशिवंत | जाण्यास ना समर्थ |
तारी तारी रामराया | दीनदास लागे पाया |


निष्पर्ण चाफा पानोपानी बहरू लागला, आंब्याच्या झाडावर कैऱ्या लगडून आल्या, मोगऱ्याच्या सुगंधानं अंगण कोंदू लागलं, कडूलिंबाचा कडवट वास वातावरणात दाटू लागला की चैत्राची चाहूल लागते. आणि या सगळ्या जाणिवांना लगडून येतं गुढीपाडव्यापासून सुरू होणारं रामाचं नवरात्र.
माझ्या लहानपणी रामाच्या नवरात्रात आमच्या वेटाळातल्या माता-भगिनी एकत्र येऊन कोणा एकीच्या घरी सामुहिकपणे रामायण वाचायच्या. घरातली आवरासावर झाली की दुपारी रामायण सुरू व्हायचं.आईबरोबर मीही तिथे जात असे.रामायणाचं वाचनं झालं की त्या साऱ्या मिळून ही रामनाम नौका,भव सागरी तराया हे पद म्हणायच्या.
त्या महिलांमध्ये काही साठी पार केलेल्या होत्या. काही मध्यमवयीन होत्या. काही तरुणी होत्या. त्या सगळ्या सामुहिक स्वरात जेव्हा हे पद गायच्या, तेव्हा दुपार टळत असायची. चैत्रातला उष्मा जाणवत असायचा. रामाच्या फोटोला घातलेला मोगऱ्याचा हार मलूल झालेला असायचा.समोर नंदादीप तेवत असायचा. उदबत्तीच्या सुगंधानं अधिकच भावपूर्ण झालेल्या वातावरणात त्या साऱ्याजणींचा भावविभोर सूर मिसळायचा. या पदाचा भावार्थ कळण्याचं ते वय नव्हतं, मात्र तरीही ते पद, त्याची चाल, त्याची लय मला खूप आवडायची आणि तेव्हापासून श्रीराम माझं आराध्य दैवत झालं. या पदानंतर निराजनं उजळली जायची आणि राम श्रीराम जयराम जयजयराम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ही आरती सुरू व्हायची. त्या साऱ्या जणींचे ते भक्तिरसात न्हाऊन निघालेले थरथरते स्वर, टाळ्यांच्या आवाजात मिसळलेला त्यांच्या काकणांचा नाद, त्यांची रामशरणता म्हणजे रामभक्तिचा परमोच्च बिंदू. त्यानंतर सुरू होणारी धूप-दीप झाला आता कर्पूर आरती, छत्र सिंहासनी बसले जानकीपती, ही कापुरारती म्हणजे या साऱ्या दैनिक उपासनेचा कळसाध्याय. हे सारं माझ्या मनपटलावर कायमचं कोरलं गेलं आहे.

परमेश्वर भक्तीचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकजण त्याला मानवेल त्या पद्धतीनं परमेश्वराची उपासना करीत असतो. त्यापैकी योगमार्ग, कर्ममार्ग सामान्यांसाठी कठीण आहे. मात्र ज्ञानेश्वरादी संतांनी सांगितलेला भक्तीमार्ग हा परमेश्वर उपासनेचा सोपा मार्ग आहे. परमेश्वर उपासनेचा त्याहीपेक्षा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामाचं महात्म्य अनेक साधुसंतांनी सांगितलं आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी तर नामस्मरण सुद्धा अत्यंत सोपं करून सांगितलं आहे.
नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसी सांगावे
हाचि सुबोध गुरूंचा, नामापरते न सत्य जाणावे

 
हाच भाव ही रामनाम नौका या पदामध्ये आहे.
रामनामाचा महिमा तर अगाध आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य या रामनामात आहे. दगडांना तरंगायला लावून समुद्रावर सेतू निर्माण करण्याची ताकद रामनामात आहे.
बुधकौशिक मुनींनीही रामरक्षेत
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने
असं रामनामाचं महत्त्व सांगितलं आहे.

श्रीराम हे तर भारतीयांचं राष्ट्रदैवत आहे. म्हणूनच आसेतूहिमाचल रामकथा गायली जाते. श्रीराम भारतीयांच्या ह्रदयात आहेत. इथे दोन माणसं एकमेकांना भेटली की राम-राम म्हणतात. माणूस अंतीम प्रवासाला निघाला की रामनामाचा गजर केला जातो. इतकं रामनाम आमच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात रुजलं आहे.
ही राम नाम नौका या पदातही रामनामाचा महिमा वर्णन केला आहे. माणसाचं मन म्हणजे साऱ्या विकारांचं आगर. विकारांवर विजय मिळवणं सामान्य भक्तांना अशक्य आहे.  मद, मोह, लोभ हे सारे विकार माणसाच्या ठायी आहेतच. परमेश्वरासमोर त्याची कबुली देण्यात काहीही गैर नाही. श्रीराम हे तर त्यांच्या भक्तांसाठी मांत्रिक आहेत आणि रामनाम हे त्या विकारांवरील औषध आहे. या साऱ्या विकारांचं विष उतरविण्याची ताकद रामनामात आहे. कारण श्रीराम हे साऱ्या विकारांपासून दूर आहेत. अयोध्येचा युवराज्याभिषेक होण्याच्या दिवशी वल्कलं परिधान करून १४ वर्ष वनात जावं लागलं, तरीही ते विचलित झाले नाहीत. सोन्याच्या लंकेवर विजय मिळवूनही जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणत ती लंका बिभीषणाला देऊन टाकणाऱ्या श्रीरामांनी मोह-लोभावर विजय मिळवला होता. अशा श्रीरामांचं नाम हे या विकारांवरचं रामबाण औषध आहे.
राम के गुण गुणचिरंतन
राम गुण सुमिरन रतन धन
मनुजता को कर विभूषित
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये

श्रीराम म्हणजे गुणांचा समुच्चय. आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, बंधु, भ्राता, एवढंचं नव्हे तर आदर्श शत्रुही. एकवचनी, एक पत्नी, एक बाणी असलेले, चिरंतन गुणांचा पुतळा असलेले श्रीरामच आमचे नावाडी आहेत आणि त्यांच्या सुमिरनाचं, नामस्मरणाचं रत्न आम्हा भक्तांच्या हाती लागलं आहे.
माणसाच्या आयुष्यात अनेक वादळं येतात. सांसारिक अडचणी येतात. त्या अडचणींना सामोरे जाताना मन विचलित होतं. परमेश्वराचा विसर पडतो, अशावेळी श्रीरामांनी सतत सोबत करावी. त्या चरणयुगलांचा विसर कधीही पडू नये आणि त्या अडचणीरुपी वादळातून श्रीराम कृपेनं बाहेर येता यावं, असं मागणं इथे मागितलं आहे.
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
अनुदिन अनुतापे तापलो रामराया
परम दीनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे, नावरे आवरिता
माणसाचं मन वाऱ्यापेक्षाही वेगानं धावतं. त्याला आवर घालणं कठीण आहे, मात्र सारी सूत्र श्रीरामांच्या हाती सोपवली, तर ते नक्कीच आम्हाला या प्रवाहातून पार नेतील, आवश्यकता आहे, स्वतःला पूर्णपणे त्यांच्यावर सोपवून देण्याची.आमच्या जीवननौकेचं सुकाणू प्रत्यक्ष श्रीरामांनी हाती धरलं आहे. त्यामुळे भ्रमाचे कितीही भोवरे जीवनात आले तरीही ही जीवन नौका बुडण्याची भीती नाही. असा विश्वास या पदात व्यक्त केला आहे आणि तो सार्थ आहे.

तुलसी रामायणात अत्यंत सुंदर प्रसंग आहे. श्रीराम वनात जायला निघाले, तेव्हा त्यांना गंगापार करायची होती. अर्थातच एक नावाडी त्याची नौका घेऊन हजर झाला. तो श्रीरामांचा भक्त होता. नौकेतून गंगापार करवणं हा त्याचा व्यवसाय होता.नावाड्यानी प्रभुंना गंगापार नेलं. वनवासी श्रीरामांजवळ नावाड्याला द्यायला काही नव्हतं. त्यांनी जानकीकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली अंगठी नावाड्याला देऊ केली. ती घ्यायला नकार देताना नावाड्यानं दिलेलं उत्तर गोस्वामीजींनी अत्यंत भावपूर्ण शब्दात वर्णिलं आहे.
नाई से न नाई लेत, धोबी से न धोबी लेत,
देकर मजूरिया जाति को न बिगाडिये,
प्रभ आये मोरे घाट तो पार मैंने उतार दीने,
जब आऊंगा मैं तोरे घाट तो पार मोहे उतारिये

 
अगदी हाच भाव या पदातही व्यक्त झाला आहे.

आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |
तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया

 
हे जग नश्वर आहे, आम्ही सारेच मर्त्य आहोत, हे सत्य सांगतानाच हा जीवनप्रवास संपवून पैलतीराचा मार्ग दाखविण्यास श्रीराम समर्थ आहेत.  हा नाशवंत देह भवपार जाण्यास असमर्थ आहे. त्यामुळे श्रीरामांनी हा देह तारावा आणि हा भवसागर पार व्हावा, हेच मागणं शेवटी मागितलं आहे.
श्रीरामांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी अनन्यशरणता पाहिजे. ती असली आणि मुखात रामनाम असलं तर जीवनाचं सोनं होतं आणि जन्म कृतार्थ होतो.
धर्माच्याकरिता आम्हास जगती, रामाने धाडियले
ऐसे जाणूनी रामभक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले
आता धर्मसख्या तुझ्या पुढतीया, नम्रत्वतेने असे
इच्छा हो जसी मानसी करितसे, हा देह तुझा असे

 जय जय रघुवीर समर्थ
(c) स्वाती हुद्दार

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह