कशासाठी? पोटासाठी
स्वाती हुद्दार
स्थित्यंतर हा सृष्टीचा नियम आहे. अगदी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून अगणित
बदल सृष्टीनं अनुभवले. असंख्य सूर्यमालांचा जन्म, अस्त, अनेक भूकंप,
ज्वालामुखी, समुद्र, पर्वतांची निर्मिती, लय, विशालकाय जीवांची
उत्पत्ती-स्थिती-लय आणि असंच बरंच काही. मानवाची उत्पत्ती ही विश्वाच्या
उलाढालीतली एक छोटीशी घटना. विश्वाच्या या पसाऱ्यात सगळ्या सजीवांच्या जागी
समान असलेली एक जाणीव म्हणजे भूक. कदाचित सगळ्यात आदिम जाणीव. नुकत्याच
जन्मलेल्या जीवापासून मृत्युपंथाला लागलेल्या प्रत्येक जीवापर्यंत. तेवढीच
प्रखर आणि सत्य. किंबहुना तेच एकमेव सत्य. जगण्यासाठी खाणे आणि खाण्यासाठी
जगणे. एवढीच भावना. पोट भरण्याची कला सजीवांना जन्मतःच अवगत होती. भूक
लागली की भक्ष्य शोधायचे, शिकार करायची आणि पोट भरेपर्यंत यथेच्छ खायचे.
एकाचे जगणे दुसऱ्यावर अवलंबून. जीवो जीवस्य जीवनम्. जीवनाची साखळी. हिच
होती जगण्याची तऱ्हा. हाच होता कायदा. खरे तर आदिमानवाने हेच जगणे
स्वीकारले होते. मात्र निसर्गानं इतर सजीवांपेक्षा मानवाला एक गोष्ट अधिक
दिली होती आणि ती म्हणजे बुद्धी. पोट भरल्यावर मानवाला हळुहळु या बुद्धीचा
वापर सुचू लागला. त्या बुद्धीच्या जोरावर मानव उत्क्रांत होऊ लागला.
बुद्धीबरोबरच मानवाला मनही होते आणि त्या मनात अनेक भावभावनाही होत्या.
प्रेम होते, राग होता, वात्सल्य होते, स्पर्धाही होती. बुद्धीच्या आणि
मनाच्या जोरावर मानवाने सगळ्या विश्वावर साम्राज्य प्रस्थापित केले. तरीही
पोटाची भूक त्याला सुटली नाही. बुद्धीच्या जोरावर त्याला पोटाच्याच नव्हे
कुठल्याच भुकेवर विजय मिळवता आला नाही. उलट त्या भुका अधिकाधिक तीव्र होत
गेल्या. कधी ती भूक स्वतःला सिद्ध करण्याची, कधी काही नवे मिळवण्याची, कधी
कोणावर तरी कुरघोडी करण्याची. कधी श्रीमंत होण्याची. कधी सत्तेची. मानवाची
ही भुक न अंत आहे. एक भुक संपली की दुसरी तिची जागा घेते. आणि त्या मागे
माणूस धावत राहतो धाप लागेपर्यंत. फिरत राहतो त्या आशा-अपेक्षांच्या
आऱ्यावर अखंड, अव्याहत.
आदिम काळात भूक लागली की शिकार करायची आणि पोट भरायचे, एवढेच माणसाला
ठाऊक होते, पण जसजसा माणूस सुशिक्षित होत गेला, सुसंस्कृत होत गेला, तशी
त्याची पोट भरण्याची संकल्पना बदलली. भुकेसाठी अग्नी, शेती ते पुढे वस्तु
विनिमय आणि त्याहीपुढे पैसा. पैशासाठी नोकरी-व्यवसाय, त्यासाठी शिक्षण असे
हे कोष्टक वाढतच गेले, त्यातून जन्माला आली एक वेगळीच भूक. स्पर्धेची. आणि
त्या भूकेआड येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला सारण्यासाठी मानव साम-दाम-दंड-भेद
अशा कुठल्याही मार्गाचा अवलंब करू लागला. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी
करण्याचा प्रयत्न. चढाओढ, हेवेदेवे आणि बरेच काही. या स्पर्धेसाठी तो आपले
सगळे काही पणाला लावायला तयार असतो. त्यासाठी माणसाला हा सगळा मनस्ताप
मान्य असतो.
खरेतर विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात एका टिंबाएवढ्या माणसाचे
अस्तित्व ते काय आणि किती? पण माणूस निघालाय अहंकाराच्या रथावर स्वार होऊन
त्याच्या निर्मात्या सृष्टीलाच आव्हान द्यायला. या लढाईत जिंकणार कोण?
पोटाच्या भुकेपासून स्पर्धेच्या भुकेपर्यंत झालेला हा प्रवास मानवाची
प्रगती आहे की अधोगती. याचा शेवट काय? या प्रश्नांची जंत्री न संपणारी.
कदाचित मानवाची ही न संपणारी हाव पुन्हा त्याला मुळापर्यंत पोहोचवेल, उरेल
केवळ एकच जाणीव पोटातल्या भुकेची आणि पूर्ण होईल एक वर्तुळ भुकेपासून
भुकेपर्यंत. अजून काही हजारो-लाखो वर्षांनंतर. तोपर्यंत सनातन प्रश्न.
जगण्यासाठी खायचे की खाण्यासाठी जगायचे? खाण्यासाठी कमवायचे, कमवण्यासाठी
झगडायचे, धपापत धावायचे, माणसांच्या गर्दीत, माणसांच्या पुढे, पळा..पळा..
पुढे कोण पळे तो..सकाळपासून रात्रीपर्यंत. पुन्हा.. पुन्हा. दिवस, महिने,
वर्ष! जन्मापासून मरेपर्यंत. बस.. इतकंच!
Friday, 19 February 2021
Subscribe to:
Posts (Atom)