Powered by Blogger.

Monday, 29 June 2020

डॉ. मंदा आमटे कसे व्यतीत करतात निवांत क्षण 

Swati Huddar

हेमलकसा जि. गडचिरोली : आजपासून 47 वर्षांपूर्वी या मातीत पाऊल ठेवले आणि इथली सुखदु:खे, चालीरिती, भाषा, राहणीमान आणि जीवनसरणी हळूहळू आत्मसात झाली. इथले आदिवासीच सोयरे झाले. वेगळे आयुष्य उरलेच नाही. आदिवासींच्या समस्या, त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पाहता पाहता प्रकाशबरोबर मीही त्यांच्या उत्थानाचा ध्यास घेतला. त्यांच्या समस्या सोडविणे हाच छंद बनला आणि त्यांचे कुटुंब हेच आमचेही कुटुंब बनले. शहरी जीवन आता परके वाटते. असे मत डॉ. प्रकाश आमटेंच्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी असलेल्या डॉ. मंदा आमटे यांनी व्यक्‍त केले.
23 डिसेंबर 1973 रोजी भामरागडमध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना झाली आणि तेव्हापासून तेच मंदा आणि प्रकाश आमटेंचे कायमचे घर झाले. जगातील सुधारणांचा वाराही न लागलेल्या इथल्या आदिवासींसाठी आरोग्यसेवा, त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शाळा आणि एवढेच नव्हे तर अनाथ प्राण्यांसाठी प्राणी संग्रहालयही आमटे दाम्पत्याने सुरू केले. त्यांचे हे सगळे अद्भुत कार्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मात्र ही मंडळी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याविषयी कधीच बोलत नाहीत. हा धागा पकडून मंदाताईंना बोलते केले.
मंदाताई म्हणाल्या, मागे जाताना मला दिगंतचा जन्म आठवतो. बाळंतपणासाठी मी नागपुरला आले होते. मी बाळंत झाले, मुलगा झाला ही बातमी प्रकाशपर्यंत महिन्याभरानंतर पोहोचली. कारण हेमलकसाचा पावसाळ्यात जगाशी संबंध तुटलेलाच असतो. त्यामुळे त्यांना दिगंतच्या जन्माची तार मिळाली नाही. शेवटी एक माणूस पाठवून त्यांना ही बातमी कळवावी लागली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आमच्या नातवाच्या जन्माची बातमी गोव्याहून आमच्यापर्यंत 15 मिनिटात पोहोचली आणि अनिकेतच्या मुलाचा तर जन्मल्याबरोबर व्हिडिओच पाहायला मिळाला. तंत्रज्ञानामुळे हे सगळे शक्‍य झाले आहे. तेव्हाचा काळ वेगळा होता, तरीही आम्ही खूप आनंदात होतो.
तेव्हा इथे वर्तमानपत्रही येत नसत. बाकी काही करमणुकीच्या साधनांचा तर प्रश्‍नच नव्हता. जगाशी संबंध जोडणारी एकच गोष्ट इथे होती आणि ती म्हणजे ट्रान्झिस्टर. त्यावेळीही इथे बीबीसी स्पष्ट ऐकायला यायचे आणि जगाच्या बित्तंबातम्या त्या माध्यमातून कळायच्या. मला गाणी ऐकायला आवडतात. एरवी याच ट्रान्झिस्टरवर मी जुनी हिंदी गाणी, मराठी भावगीते ऐकायचे.
हा सगळा कामाचा व्याप वाढण्याआधी मी चित्र काढायचे. तो माझा आवडता छंद होता. नंतर मात्र वेळ मिळेनासा झाला आणि चित्र काढणे बंद झाले. मात्र भामरागडचा निसर्ग चित्रासारखाच सुंदर आहे. त्याच्या सान्निध्यात दुसऱ्या करमणुकीची आवश्‍यकताच नाही. लोकहिताच्या कार्यात सर्वार्थाने गुंतलेल्या मंदाताईंनी भामरागडचे शब्दचित्रच डोळ्यापुढे उभे केले.
लोकबिरादरीतील दिवाळी कशी असते, असे विचारले असता मंदाताई म्हणाल्या, इथे केवळ आमटे परीवार एवढेच आमचे कुटुंब नाही. इथे आदिवासींसाठी कार्य करणारे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचा परीवार असे आमचे संयुक्‍त कुटुंब आहे. रोजचा स्वयंपाकही इथे सगळ्यांचा एकत्र होतो. त्या स्वयंपाकघराला इथे रसोडा म्हणतात. आम्ही 100-150 लोक रोज एकत्र जेवतो आणि दिवाळीही तशीच एकत्र साजरी करतो. दिवाळीचे पाचही दिवस दररोज एकेक फराळाचा पदार्थ करून सगळे मिळून त्याचा आस्वाद घेतो. छोटीशी पुजाही एकत्रितपणेच करतो. एवढेच रोजच्या पेक्षा काहीतरी निराळे. मात्र खूप आनंद देणारे.
आता आमची मुले मोठी झाली. त्यांनी बराचसा कामाचा भार उचलला आहे. दोन्ही सुनाही याच कार्यात झोकून देऊन काम करताहेत. कामाचा पसाराही खूप वाढला असला तरी जबाबदारी वाटली गेली आहे. त्यामुळे नातवंडांबरोबर खेळायला थोडा वेळ मिळतो. आणि ते क्षण खूप सुखाचे असतात. सकाळी नातवंडे प्रकाश बरोबर प्राण्यांशी खेळतात. त्यांची देखभाल करतात. दुपारी मग आमचा पत्त्यांचा डाव रंगतो. कधी बुद्धिबळ, कधी कॅरम अशी उन्हाळ्यातली दुपार असते. बाहेर उन्हाच्या प्रचंड झळा आणि घरात मात्र नातवंडांच्या सहवासाचा सुखद गारवा.
सिनेमा-नाटक पाहण्याविषयी मंदाताईंना छेडले असता त्या म्हणाल्या एकदा नागपुरला आलो असताना मुलांनी हट्ट धरला म्हणून लगान सिनेमा पाहिला होता. त्यानंतर प्रकाशच्या जीवनावर आलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमाचा प्रिमीयर शो पाहिला. इथे टॉकीज वगैरे नसल्यामुळे सिनेमे पाहणे होत नाही. पुण्याला जाणे झाले तर नाटक मात्र पाहतो. सामाजिक विषयावरची नाटके आम्हाला आवडतात.
निवांत क्षण कसे असतात, असे विचारल्यावर मंदाताई म्हणाल्या आम्ही सगळे सायकली चालवत नदी किनारी जातो. नदीत पोहतो. कधी की नदी पार करून छत्तीसगडच्या सीमेवरील बस्तरलाही जातो. आणि आमचे सगळ्यांचेच आवडते काम म्हणजे नदी किनाऱ्यावर चूल पेटवून आम्ही भजे बनवून खातो. हा आमच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो.
मंदाताई आणि त्यांच्या कुटुंबाच्या या जगावेगळ्या आनंद सोहळ्यात कधीतरी आपणही सहभागी व्हावे, असे वाटते.

दंतेश्‍वरी, मोगऱ्याचा हार आणि फक्‍त माझी असलेली ती पंधरा मिनटे 

Swati Huddar

आपल्यासाठी आदर्श असलेल्या सुप्रसिद्ध व्यक्‍तींच्या कौटुंबिक आयुष्याविषयी सगळ्यांना नेहमीच उत्सुकता असते. कसे असतात केवळ त्यांचेच असलेले निवांत क्षण? प्रसिद्धी आणि पैशाची खात्री देणारी रुजलेली वाट सोडून समाजसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. राणी बंग यांनी डॉ. अभय बंग यांना साथ देत नवी मळवाट रुजवली. तरीही त्यांचे असे खास क्षण असतातच, जाणून घेऊया त्या क्षणांविषयी राणीताईंकडूनच अँखियोंके झरोखोंसे या सदरातून
वैष्णवजन तो तेणे कहिये
पीड पराई जाणे रे
पुस्तकातला गांधी विचार आचारात उतरवून पराई पीड जाणणारे आणि जगत्कल्याणाचा ध्यास घेतलेले वैष्णवजन म्हणजे बंग दाम्पत्य. गडचिरोली जिल्ह्यातील शोधग्राम इथल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या आणि दीनांवर घन होऊन बरसण्याचेच व्रत घेतलेल्या डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या सेवाकार्याची पताका जगभर फडकते आहे. शिस्त, सातत्य, निष्ठा त्यांच्या कार्याच्या मुळाशी आहे. त्यामुळेच आज सर्चच्या माध्यमातून बंग दाम्पत्याने उभारलेले कार्य मैलाचा दगड ठरले आहे.
लोककार्यात सतत व्यस्त असलेल्या या मंडळींचे कौटुंबिक आयुष्य कसे आहे? याविषयी डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला असता त्या भरभरून बोलल्या.
आम्ही सगळे जगण्यावर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे सर्चचे काम करतानाच जीवनातल्या इतर अनेक गोष्टींचा आनंद आम्ही मनापासून घेत असतो. रोजचा दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी आम्ही जेवताना शक्‍यतोवर एकत्र असतो. सकाळचे जेवण जर एकत्रित घेता आले नाही तरी रात्री मात्र आम्ही एकत्रच जेवतो. त्यावेळी दिवसभरातील कामे, महत्त्वाच्या चर्चा, कधी नुसत्याच गप्पा, कधी हास्यविनोद असे सगळे विषय असतात. छान गप्पा करीत आम्ही जेवतो. त्यावेळी इतर व्यवधाने नसतात.
स्वयंपाक करणे माझा छंद
दोन्ही वेळचा स्वयंपाक आणि सकाळचा नाश्‍ता मी स्वत: करते. मला निरनिराळे पदार्थ करायला आवडतात. विविध प्रकारची लोणची करायलाही आवडतात. त्यातून खूप आनंद मिळतो.
वाचन आणि चर्चा
आमच्याकडे सगळे जण खूप वाचन करतात. अभय उपनिषद, विनोबांचे साहित्य वाचतो. त्यावर आम्ही चर्चा करतो. आपापली मते मांडतो. साहित्य, संगीत, विज्ञान, चालू घडामोडी आणि बरेच काही आमच्या बोलण्याचे विषय असतात. कधी गंभीर, राजकीय चर्चाही रंगतात. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही आम्ही आपापली मते हिरिरीने मांडतो. अलिकडे समाजमाध्यमांवर येणारे विनोदही आम्ही एकमेकांना सांगतो. तेव्हा मुले म्हणतात, आवो अम्मा चुगली करे, त्या खरोखर कोणाच्या चुगल्या नसतात. तो हास्य-विनोदाचा वेळ असतो.
मॅच बघायला आवडते
फुटबॉलची मॅच आम्ही सगळेजण मिळून टीव्ही वर पाहतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच आणि वर्ल्ड कप क्रिकेट मॅच तर आम्ही अजिबात चुकवत नाही. त्याचा भरभरून आनंद घेतो.
पत्त्यांचा डाव
दोन्ही मुले आता इथे आहेत. आधी ते शिकण्यासाठी बाहेर असताना सुटीमध्ये घरी यायचे, तेव्हा आमचा पत्त्यांचा डाव रंगायचा. पत्ते खेळणे आम्हाला सगळ्यांनाच आवडते. अजूनही वेळ मिळेल, तेव्हा आम्ही पत्ते खेळतो.
स्वरांच्या सावलीत
आनंद आणि अमृत दोघेही छान गातात. सिंथेसायझर वाजवतात. हार्मोनियम वाजवतात. मग एखादी रात्र संगीत रजनी होऊन येते आणि आम्ही सगळे स्वरांच्या सान्निध्यात भिजून चिंब होतो.
जंगलात फेरफटका
अभयला आणि मला जंगलात फिरणे आवडते. रोज सकाळच्या शांतवेळी आम्ही जंगलात फिरायला जातो. त्या निशब्द वातावरणात निरनिराळ्या पक्षांचे आवाज कानी पडतात. ते आवाज शांतपणे अनुभवणे, हा खूप आनंददायी अनुभव आहे. रात्री उशीराही आम्ही जंगलात फेरफटका मारायला जातो. कधी तलावावर जातो. एका जागी गाडी उभी करून आकाशभर पसरलेले चांदणे निरखत राहतो.
सिनेमेही बघायला आवडतात
कधी टीव्ही एखादा छान सिनेमा लागला असेल तर आम्ही तो नक्‍की बघतो. शिवाय काही चांगले सिनेमे मुद्दाम वेळ काढून लॅपटॉपवरही बघतो. त्यावर चर्चाही करतो.
ओन्ली फॉर मी
शोधग्राममध्ये मुद्दाम खूप मोगऱ्याची रोपटी लावली आहेत. उन्हाळ्यात भरभरून हा मोगरा फुलतो आणि सारा परसर सुगंधाने न्हाऊन निघतो. शोधग्रामच्या प्रवेशद्वारातच दंतेश्‍वरी या आदिवासींच्या देवीचे देऊळ आहे. त्या देवीला मोगऱ्याचा हार करणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असतो. अभय ध्यान करतो, मी ध्यान वगैरे करत नाही, मात्र देवीसाठी मोगऱ्याचा हार करण्याची ती 10-15 मिनट हे फक्‍त माझी आणि माझीच असतात. त्याशिवाय या मोगऱ्याचे मी रोज 10-12 गजरे करते आणि आमच्या शोधग्राममधील सगळ्या बायका-मुलींना देते. मोगऱ्याच्या गजऱ्याच्या निमित्ताने हे सुगंध वाटणे आहे आणि ते खूप सुंदर आहे.
शोधग्राममध्येच आम्ही चांगल्या जातीच्या कापसाची काही झाडे लावली आहेत. त्याला कापसाची बोंड आली आणि ती फुटली की मी स्वत:ला त्यातला कापूस वेचते, तो एकत्र गोळा करून त्याच्या सुंदर मऊ उशा तयार करते आणि त्या आमच्या मित्रांना, परिचितांना भेट म्हणून देते. स्वत: तयार केलेली वस्तू कोणाला तरी देणे, यातला आनंद सांगण्यासारखा नसून केवळ अनुभवण्यासारखाच असतो. शिवाय आमच्या घराच्या आजुबाजुला काही देवकापसाची रोपेही लावली आहेत. त्या कापसाच्या फुलवाती करून त्याही मी आमच्या मित्रमंडळींना देत असते. घरी देवासमोरही मी स्वत: तयार केलेल्या वातीच लावते.
दगड आणि भरतकाम
मला विविध आकाराचे, रंगाचे दगड जमविण्याचा छंद आहे. अशा रंगाढंगांच्या दगडांचा खजिनाच माझ्याजवळ आहे. याशिवाय भरतकाम करायला मला खूप आवडते. अभयच्या, मुलांच्या हातरुमालांवर, उशीच्या अभ्रयांवर मी स्वत: भरतकाम करते. हे सगळे क्षण खूप सुंदर असतात.
सगळे सण उत्साहात
आमची दोन कुटुंब आहेत. एक मी, अभय, मुलं आणि सुना असे आणि दुसरे शोधग्राममधले सगळे आणि आम्ही असे. शोधग्राममध्ये होळी-रंगपंचमी सारखे सण आम्ही एकत्र साजरे करतो. घरीही आम्ही गणपती बसवतो. माझी परमेश्‍वरावर श्रद्धा आहे. मी सगळे सण श्रद्धेने करते आणि अभय आणि मुलं त्यात उत्सव म्हणून सामिल होतात. या सणांच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आपल्या आजुबाजुला भरून राहते आणि काम करताना त्याची उर्जा कामी येते.
हे सगळे करायला आम्हाला आवडते कारण जीवन रुक्ष नसून जीवन खूप सुंदर आहे, यावर माझा विश्‍वास आहे.
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
सर्चच्या माध्यमातून समाजसेवेचा यज्ञ अखंड प्रज्वलित ठेवणाऱ्या बंग दाम्पत्याला जीवन खरोखर कळले आहे.


दहीवाली ते फुड डिलिव्हरी बॉय

स्वाती हुद्दार

माझ्या लहानपणी आमच्याकडे एक म्हातारी बाई दही विकायला यायची. हिंदी बोलणारी. फाटकातूनच ती आईला हाक द्यायची, बिटीया, दही चाहिये क्‍या? आई बाहेर येईपर्यंत ती फाटक ओलांडून दारापर्यंत आलेली असायची. आई पुढे होऊन तिच्या डोक्‍यावरची जड दह्याची हंडी उतरवायला तिला मदत करायची. हंडीखालची ओशट झालेली चुंबळ एका हाताने जमिनीवर ठेऊन ती अंगणात विसावायची आणि मापभर दही आईच्या भांड्यात ओतायची, वरून भरपूर शिगही द्यायची. उलट्या पदराची साडी नेसणारी ती दहीवाली गवळण होती. दहीदूध विकण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. तिच्या पायात मोठ्या आणि जाड चांदीच्या तोरड्या होत्या. कपाळावर मोठ्ठे गोल कुंकू ती लावायची. भांगातही कुंकू भरलेले असायचे उन्हातान्हातून हिंडताना आलेल्या घामाने त्या कुंकवाचे ओघळ तिच्या गालावरून ओघळत असायचे. तिच्याशी आमचा महिन्याचा हिशेब होता. दही दिल्यावर ती कमरेला खोचलेल्या चंचीतून रंगीत मेणकांडी काढायची आणि आम्हाला अगम्य असलेल्या चिन्हांमध्ये आईने खरेदी केलेल्या दह्याचा हिशेब ती आमच्याच घराच्या भिंतीवर मांडून ठेवायची. महिन्याच्या शेवटी आई तिला त्याप्रमाणे पैसे चुकते करायची. दही देऊन हिशेब मांडून झाल्यावर ती परत अंगणात बसकण घालायची. आईही ओट्यावर विसावायची आणि थोडावेळ दोघींच्या सुखदु:खाच्या गप्पा चालायच्या. तिची मुलंबाळं, तिचा संसार एवढेच नव्हे तर तिच्या घरच्या गाईगुरांविषयी आईला माहिती होती आणि आमचे नातेवाईक, आमच्या घरच्या अनेक गोष्टी तिलाही ठाऊक होत्या. नवे घातलेले लोणचे, केलेले पापड, एखादी नव्हाळीची भाजी असे काहीबाही आई तिला हमखास घरी न्यायला द्यायची आणि तिच्याकडची गाय व्याली की हमखास खरवस आमच्या घरी यायचा. ज्या दिवशी तिने लोणी काढले असेल, त्या दिवशी ती आमच्यासाठी ताकाची बरणी न विसरता आणायची. तिचे आमचे नाते विक्रेती आणि ग्राहक या पलिकडचे झाले होते.
थोड्याफार फरकाने असेच नाते भाजीवाली, दूधवाला, कपड्यांवर भांडी विकायला येणारी बाई अशा अनेकांशी त्या काळातल्या प्रत्येकाचेच होते, नव्हे तो त्यावेळच्या समाजव्यवस्थेचा भागच होता. हळुहळु मात्र अशा दही विकणाऱ्या, दुध द्यायला येणारा ही माणसे दिसेनाशी होऊ लागली. ती जिव्हाळ्याची नातीही संपुष्टात आली आणि आपल्याही नकळत आपल्याला त्यांचा विसरही पडू लागला. आजच्या पिढीला तर ऍल्यूमिनियमच्या गोल हंडीत दही विकायला येणारी दहीवाली अपवादानेच माहिती असेल.
हे केवळ दारावर येणाऱ्या विक्रेत्यांपुरतेच मर्यादीत नाही तर सर्वच पारंपरिक व्यवसायांबाबतीत झाले. गावांमध्ये पिढ्‌यानुपिढ्या चाललेले लोहाराचे भाते कधी स्तब्ध झाले आणि त्यांची जागा शहरातील मोठमोठ्या उद्योगांनी कधी घेतली, हे देखील जगण्याच्या धबडग्यात आपल्या लक्षात आले नाही. विणकर उद्योग, सुतार काम असे अनेक उद्योग बंद पडत गेले आणि गावे ओस पडत गेली. त्याऐवजी धनाढ्यांनी शहरात सुरू केलेल्या मोठमोठ्या उद्योगांकडे गावातला तरुण वळू लागला. अर्थात मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांच्या मदतीने तयार झालेल्या वस्तूंचा दर्जा घरगुती उद्योगात तयार झालेल्या वस्तुंपेक्षा नक्‍कीच चांगला होता. त्यामुळे हे पारंपरिक गृहोद्योग कालौघात संपुष्टात आल्याचे सोयरसुतक समाजाला उरले नाही. या सगळ्या घरगुती उद्योगांची जागा मोठमोठ्या कंपन्यांनी घेतली आणि ते सगळे आपल्या अंगवळणी पडले. हा केवळ सामाजिक बदल नव्हता तर हा अर्थकारणातला मोठा आणि महत्त्वाचा टप्पा होता.
पुढचा टप्पा होता जागतिकीकरणाचा, औद्यागिकरणाचा. स्वातंत्र्य मिळून एक पिढीचा कालावधी लोटला होता. देश सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात होता. आदर्शवादी पिढीची जागा वास्तववादी पिढीने घेतली होती. हरीतक्रांती, धवलक्रांती होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला होता. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच स्तरावर स्थैर्य येत होते. नवी पिढी नव्या पद्धतीने विचार करायला लागली होती. पैशाचे महत्त्व वाढत होते. पाश्‍चिमात्य विचारसरणीचा, जीवनपद्धतीचा पगडा इथल्या तरुण मनावर होता. महिलाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागल्या आणि दोन कमावत्या व्यक्‍तींच्या कुटुंबात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. महिन्याअखेरीपर्यंत जेमतेम पैशात चालणाऱ्या घराला आता थोडीशी वस्तुंची, कपड्यांची, एखाद्या सिनेमाची, एखादवेळच्या हॉटेलिंगची चैन परवडू लागली.
गेल्या दहावर्षात तर जीवनाची परिमाणेच बदलली. जागतिकीकरणाचे हे बदल थेट स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचले. अगदी दह्यादुधाच्या उद्योगांमध्येही मोठ्या कंपन्या उतरल्या. डोक्‍यावर हंडी घेऊन गल्लोगल्ली दही विकणाऱ्या दहीवालीची जागा डेलीनिड्‌सच्या दुकानात ठेवलेल्या पॅकड्‌ दह्याने घेतली. या व्यवसायाने अनेकांना रोजगार पुरवला. गावागावातून दूध गोळा करायचे ते दूध संकलन केंद्रावर पोहोचवायचे. तिथुन प्रोसेसिंग करणाऱ्या कारखान्यात पोहोचवायचे. या सगळ्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या निमित्ताने अनेकांसाठी रोजगाराची दारे खुली झाली. उत्कृष्ट दही तयार करणारे कारागिर, त्यासाठी लागणारी यंत्रे, ती यंत्रे तयार करणारी माणसे, दही तयार झाल्यानंतर त्याचे उत्कृष्ट पॅकेजिंग, त्यासाठी लागणाऱ्या चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्याचे पॅकींग, त्या तयार पिशव्या दुकानांमध्ये पोहोचविणारे मनुष्यबळ, अशी ही यादी आणखी विस्तारता येईल. सांगायचा उद्देश हा की केवळ दही या वस्तूभोवती खूप मोठे अर्थकारण या नव्या काळात गुंफले गेले. असेच अनेक उद्योगांबाबतीत म्हणता येईल. महिला कमावत्या झाल्यामुळे घरी तयार होणाऱ्या अनेक वस्तू विकत घेण्याकडे कल वाढला आणि घरात तयार वस्तू येऊ लागल्या. थोड्याफार फरकाने दह्यासारखीच इंडस्ट्री प्रत्येक वस्तुची तयार झाली.
हळुहळु जागतिकीकरणाचा पगडा वाढतच गेला. आयटी कंपन्यांची संख्या वाढत गेली. अनेक तरुण-तरुणी या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी घरापासून दूर राहू लागली. आणि कामाचे स्वरुपही बदलले. तरुण-तरुणींचे कामाचे तासही वाढले. परिणामी बाहेर खाणे ही चंगळ न राहता गरज झाली आणि एका नव्या इंडस्ट्रीचा जन्म झाला आणि ती आहे फुड इंडस्ट्री. त्यावर उपाय म्हणून घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईपासून ते पोळीभाजी केंद्रापर्यंत अनेक पर्याय आपण स्वीकारले. त्यातूनही अनेकांना रोजगार मिळू लागला. काही महिला बचत गटांनीही पोळीभाजी केंद्र सुरू करून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवला. मात्र काहींनी त्यापुढे जाऊन तुमच्या घरापर्यंत किंवा तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला हवे ते पदार्थ पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि एका नव्याच व्यवसायाचा जन्म झाला, तो म्हणजे फुड डिलिव्हरी इंडस्ट्री. भारता पुरता विचार केला तर मुंबईतील डबावाला सर्व्हिस ही या इंडस्ट्रीतली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी इंडस्ट्री आहे. मुंबईतील ही डबावाला सर्व्हिस बंद झाली तर चाकरमान्यांचे काय हाल होतील, हे सांगणे न लगे.
आपल्याला या फुड डिलिव्हरीचा परीचय अलिकडच्या दशकात विशेषत्वाने झाला. जेव्हा डॉमिनोजसारख्या कंपन्या ऑर्डरप्रमाणे पिझ्झा आणि इतर पदार्थ घरी पाठवू लागल्या. आता जगभर विस्तारलेल्या या व्यवसायाची सुरुवात मात्र 1768 साली कोरिआमध्ये झाली आहे. त्यावेळी Naengmyeon या कोरिअन नुडल डिशची ऑर्डरनुसार होम डिलिव्हरी केली जात असे. त्यावेळी याचे स्वरुप अत्यंत मर्यादित होते. आता मात्र या व्यवसायाने सगळे जग व्यापले आहे. सर्वात लोकप्रिय आणि उपयुक्‍त अशी ही इंडस्ट्री आहे. आणि अजूनही पिझ्झा डिलिव्हरी हिच सर्वात मोठी मिल डिलिव्हरी इंडस्ट्री आहे.
या क्षेत्रातील पायोनियर म्हणावी अशी कंपनी म्हणजे फुड पांडा. 2012 मध्ये या कंपनीने लुकास नागल आणि रिको वायडर या दोघांनी दक्षिण-पूर्व आशियामध्ये या व्यवसायाची सुरुवात केली.सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स अशा देशांमध्ये या कंपनीने सेवा सुरू केली आणि हळुहळु संपूर्ण जगात त्यांचा व्यवसाय विस्तारला. भारतातही 2017 पासून त्यांची सर्व्हिस सुरू झाली.
भारतात स्विगी, उबर इट्‌स, झोमॅटो अशा अनेक कंपनीज फुड सर्व्हिस पुरवितात.
काळ बदलतो आहे. जीवनपद्धती बदलते आहे. त्याप्रमाणे माणसांच्या गरजाही बदलत आहेत. त्यानुसार व्यवस्थाही बदलते आहे. त्या व्यवस्थांनुसार व्यवसायांचे स्वरुपही बदलत असते. आणि जगाचे अर्थकारण त्यावर अवलंबून असते. दारोदारी फिरून दही विकण्याचा व्यवसाय करणारी दिवसाला त्यावेळी 5-10 रुपये रोजी कमवित होती. आजच्या काळात दारोदारी दही विकणारीची जागा दारावर ऑर्डरप्रमाणे सुंदर पॅकिंगमध्ये फुड घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने घेतली आहे. त्याचा पगार आजही काही हजारांच्याच घरात असेल, मात्र हा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर मात्र नक्‍कीच अब्जोंमध्ये आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण कुठे आहोत, आपण दही घेऊन येणाऱ्या दहीवालीपासून ते फुड घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयपर्यंत झालेल्या आर्थिक, सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार आहोत.
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह