Powered by Blogger.

Monday, 22 April 2019

गौराईचं माहेरपण

स्वाती हुद्दार

माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्‍त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्‍काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही.

त्यादिवशी अंगणाची शोभा काही औरच होती. जुईच्या मांडवाखाली भुश्‍याचा डोंगर केला होता. त्या डोंगरावर झाडाच्या फांद्या खोचल्या होत्या. अंगणातल्याच गवताने तो डोंगर हिरवागार शाकारला होता. खेळण्यातले छोटेछोटे हत्ती घोडे, चिमण्या पक्षी त्यावर मांडले होते. डोंगराच्या एका बाजुला वाळुचे कडे करून तलाव केला होता. तलावाच्या काठावर सुंदर सुंदर पक्षी विहरत होते. तलावाच्या मध्यभागी पांढऱ्याशुभ्र कांद्याचे कोरीव कमळ ठेवले होते. एका बाजुला भातुकलीतला लुटुुपुटुचा संसार मांडला होता आणि डोंगराच्या पायथ्याशी छोट्याशा शिसवी पाळण्यात गौराईची स्थापना केली होती. मोगऱ्याच्या गजऱ्यांनी गौराईचा पाळणा शाकारला होता. तिच्यासमोर चिवडा, लाडु, करंजा असे जिन्नस मांडले होते. खरबुज कलिंगडाचे कोरीव काप ठेवले होते. खिरापत, कैरीची डाळ आणि कैरीच्या केशर विलायची घातलेल्या पन्ह्याचा प्रसाद होता. वातावरणात अत्तर गुलाबजलाचा सुगंध भरून राहिला होता. आई-आजी नाकात नथ घालून केसांवर मोगऱ्याचे गजरे माळून विशेषच सजल्या होत्या. सडा रांगोळी घातलेल्या अंगणात सतरंजा अंथरल्या होत्या. उतरत्या सांजेला त्या दिवशी आमच्या अंगणात आयाबायांचा जमावडा जमला होता. हास्यकल्लोळात अवघं घर बुडून गेलं होतं. होतं काय असं विशेष त्या दिवशी. आजी म्हणाली अग चैत्रगौर माहेरपणाला आली आहे आपल्याकडे. माझ्या आठवणीतली ती पहिली चैत्रगौर. त्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की माझं मन आपसुकच त्या माहेरवाशीण गौरीची वाट पाहू लागायचे. तेव्हा त्यातला माहेर हा शब्द काही खूप महत्त्वाचा वाटला नव्हता. मात्र शिसवी पाळण्यात विराजमान झालेल्या त्या गौरीच्या येण्यानं खाण्यापिण्याची चंगळ असते. खणाचं परकरपोलकं घालून मिरवायला मिळतं. खूप मैत्रीणी, काकवा मावश्‍या घरी येतात. एवढंच कळत होतं. या चैत्रगौरीच्या आगमनाची तयारी घरी आठवडाभर आधीपासून चालायची. वय वाढलं तसं आई-आजीबरोबर सजावटीत माझाही सहभाग राहू लागला आणि मन अधिकच उत्कंठेनं चैत्रातल्या गौरीची वाट पाहू लागलं.
गौरीनं माहेरपणाला येण्याचे किती प्रसंग येतात असे वर्षातून. एकदा ती भाद्रपदात तीन दिवसांसाठी येते. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नुसतीच धावपळ करत उभ्या उभ्या आलेल्या कर्तव्यदक्ष सासुरवाशीणीसारखी. तेव्हाचा थाटही अगदी बघण्यासारखा. सोळा भाज्या, सोळा चटण्या, गोडधोड, पुरणपोळी आणि बरच काही. चैत्रातला मुक्‍काम मात्र चांगला महिनाभराचा. सासरच्या जबाबदाऱ्या निस्तरून निवांतपणानं माहेरच्या अंगणात विसावायला आल्यासारखी. झोपाळ्यावर झुलणारी गौरी. मोगऱ्याच्या माळा माळलेली गौरी. माहेरचा पाहुणचार घेणारी गौरी. अगदी तुमच्या माझ्यासारखी माहेरवाशीण वाटते. आपलं देवपणही काही काळाकरता विसरून गेल्यासारखी भासते. माहेर असतच असं. देवपणही विसरायला लावणारं. या गौरीची पाठवणी अत्यंत भावुक करणारी. तिच्या कोडकौतुकात मुक्‍कामाचे दिवस कसे सरतात, कळतच नाही. पाठवणी करताना तिला दहीभात आणि मुरड पोळीची शिदोरी दिली जाते. आणि पुन्हा ये ग अशीच मुक्‍कामी असं सांगत पुनरागमनायच म्हणत तिला निरोप दिला जातो, तो क्षण खरच हळवं करतो.
पूर्वी सासरी खूप कष्ट असायचे. छळही व्हायचा. खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. लग्नही अगदी कमी वयात व्हायची, त्यामुळे माहेरची ओढ असायचीच. माहेरची मायेची माणसं, दोन घास उन उन अन्न, जीवाला थोडा आराम या सगळ्यासाठी माहेर हवं असायचं. माहेरचं महत्त्व सुखदु:खसमेकृत्वा असणाऱ्या संतांनाही मान्य आहे. तुकारामांच्या अभंगात याचे दाखले येतात. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली किंवा कन्या सासुरासी जाये या अभंगांमधून तुकारामांनी सासुरवाशीण लेकीच्या माहेरच्या ओढीचा दाखला दिला आहे. माहेराचं महत्त्व संतांनाही जाणवावं असं आहे. लोकगीतांनी, जात्यावरच्या ओव्यांनी स्त्रीच्या मनातलं माहेर जपलं आहे. भोंडल्याच्या गाण्यात सासर माहेरच्या वैद्याची केलेली तुलना, सासरच्या नातेवाईकांना दिलेली दुषणं बरीच बोलकी आहेत. एकनाथांच्या भारुडातही नणंदेचं कार्ट किरकिर करत, खरुज होऊ दे त्याला म्हणणाऱ्या सासुरवाशीण स्त्रीच्या भावना व्यक्‍त होतात.
काळ बदलला आहे. छळ करणार सासर आता नाही. विभक्‍त कुटुंब पद्धतीत अनेक ठिकाणी राजाराणीचाच संसार असतो. सासरची माणसंही पूर्वीसारखी खाष्ट नाहीत. स्त्रियाही आता शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आहेत. माहेरी जाण्यासाठी, सासुबाई मला मुळ आलं आता तरी धाडा ना, अशी सासुबाईंची परवानगी घेण्याची गरजही नाही. तरीही माहेरची ओढ कायम आहे. सासरच्या वाटे कुचुकुचु काटे आता उरले नसले तरी माहेरच्या वाटेवर अजूनही हळदकुंकु दाटलेलं असतचं. माझ्या अंगणात पिंगा घालणाऱ्या वाऱ्यानं माहेरी सुवासाची बरसात करावी, असं आजच्या सुशिक्षित स्त्रीलाही वाटतचं.
माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्‍त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्‍काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही. अनेक कारणांनी माहेराला पारख्या झालेल्या स्त्रियांसाठी अलिकडे अनेक संस्था एक दिवस माहेरचा अशा उपक्रमांचं आयोजन करतात. त्या दिवशी सगळ्या सख्यांची माहेरी ठेवावी, तशी बडदास्त ठेवली जाते. त्यांना साडीचोळीचा अहेर केला जातो. असं औटघटकेचं लटकं माहेर या माहेरासाठी आसुसलेल्या सख्यांच्या मनावर हळुवार फुंकर घालत.माहेर मायेच्या माणसांमुळे तर असतंच पण काळाच्या ओघात दृष्ट लागल्यासारखी ती मायेची माणसं गेली तरी माहेरच्या घराच्या विटांच्या भिंती, माहेरचं अंगण, माहेरचं गाव मायेची पखरण करीतच असतात.
सासरी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना स्त्रीच्या मनातली माहेरची ओढ कधीच कमी होत नाही, तरीही ती सासरी कां नांदते, याचं हळवं उत्तर सरस्वतीची लेक बहिणाबाई चौधरींच्या कवितेत दिसतं, त्या म्हणतात, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते! पुढे बहिणाबाई सांगतात,
देव कुठे देव कुठे भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला असं देवपण सामावलेलं माहेर स्वर्गापेक्षाही अधिक सुखदायी असतं.
देवालाही दुर्लभ असलेलं माहेरचं प्रेम आणि पंचपक्‍वानांपेक्षाही चविष्ट असलेला माहेरचा दहीभात सगळ्यांना उदंड लाभो आणि चैत्रातल्या गौरीसारखंच माहेरपणाचं सौख्य सगळ्या सख्यांच्या वाट्याला येवो, बस इतकंच, एवढंच.

Monday, 8 April 2019

कालजयी कुमारगंधर्व

रियाज 

swati huddar

इंदुर उज्जैन रस्त्यावर वसलेलं टुमदार देवास. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आणि म्हणूनच देवाचं वास्तव्य असलेलं देवास. नर्मदेच्या सुजलाम प्रवाहानं माळव्यातल्या भुमीच्या या तुकड्याला सुफलाम केलं. देवासच्या भुमीला संगीताची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध संगीतकार बंदे अली, शेवटचे मोठे बीनकार बाबूखॉं , संगीत सम्राट खॉंसाहेब रजब अली खॉं, पुढे कुमार गंधर्व. आणि असे कितीतरी संगीतज्ज्ञ या भुमीनं दिले.
चामुंडा टेकडीकडे जाणाऱ्या उतारावरचं एक सुरेल घर भानुकुल. नित्य संगीत आराधनेत रमलेलं. ऋतूचक्राची जाणीव करून देणारी घराभोवतीची वृक्षराजीही स्वरांच्या घोसांनी लगडलेली. त्या वृक्षांवरच्या पक्ष्यांचा चिवचिवाटही एखाद्या बंदीशीसारखा. भानुकुलमधल्या बंगईच्या पितळी कड्यांची किणकिणही सुरेलच. एखादी रागिणी छेडल्यासारखी. कारण साक्षात सात स्वरांचं वास्तव्य या घरात होतं.
30 जानेवारी 1948 एका गंधर्वाची पावलं देवासच्या भुमीला लागली आणि ही भुमी अधिकच संगीतमय झाली.
8 एप्रिल 1924 रोजी बेळगाव इथं जन्मलेला शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली हा यक्ष संगीत साधनेसाठी मुंबईला येतो काय आणि पुढे प्रकृतीच्या कारणानं माळव्याच्या भुमीत रुजतो काय. सारंच अचंबित, अनाकलनीय. या गंधर्वाची पाच वर्षांची मुक साधनाही देवासच्या भुमीनं अनुभवली. इथल्या पोषक, स्वास्थ्यवर्धक वातावरणानं या गंधर्वाला जपलं आणि चमत्कार झाला. नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं ते स्वरपुंज वातावरणात घुमू लागले आणि त्यांनी अवघं संगीत अवकाश आपल्या कवेत घेतलं.
अवघ्या नऊ वर्षांच्या शिवपुत्राचं गाणं ऐकून बेळगावच्या स्वामीजींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले अरे हा तर साक्षात कुमार गंधर्व. हे बिरुद कुमारांबरोबर कायम राहिलं. कुमार गंधर्व या व्यक्‍तिचं शारीरिक वय वाढत गेलं. त्याच्या स्वरांचं, गाण्याचं वय मात्र त्याच्या नावाप्रमाणं कायम कुमारच राहिल. चिरतरुण राहिल. ते स्वर नित्यनुतन संगीत प्रसवत राहिले.
साल 1935. अलाहाबादच्या संगीत परिषदेत हे स्वर गुंजले आणि उस्ताद फैयाज खान, कुंदनलाल सहगल सारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी अवाक केलं. त्यावेळी त्या स्वरांचं वय होतं अवघं नऊ वर्षांचं. त्यानंतर कोलकत्त्याला संपन्न झालेली गांधर्व महाविद्यालय मंडळाची परिषद. पंडीत विनायकराव पटवर्धन, पंडीत नारायणराव व्यास, पंडीत शंकरराव व्यास, प्रो. बी. आर देवधरांसारख्या संगीतज्ज्ञांची उपस्थिती. 10 वर्षांच्या त्या गंधर्वानं पिया बिना नाही आवत चैन ही झिंझोटीतली ठुमरी छेडली आणि सगळी सभा देहभान विसरली. एका रात्रीत वयाच्या केवळ दहाव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव राष्ट्रीय गायक म्हणून नावारुपाला आलं. 1936 मध्ये कुमारजी मुंबईत देवधरांच्या स्कूल ऑफ इंडियन म्युजिक मध्ये दाखल झाले आणि या हिऱ्याला पैलू पडायला लागले. या स्वरांनी भारतवर्षाला वेड लावलं.
साल 1947. या स्वरांना ग्रहणानं ग्रासलं. निदान झालं राजयक्षमा. कोरड्या हवेसाठी निवड झाली देवासची. चार-पाच वर्षांचा अज्ञातवास. स्वर मुक झाले. आत मात्र संगीत सुरुच होतं. अधिकाधिक बहरत होतं. माळव्याचं लोकसंगीत , कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास, निर्गुणी भजन, अहिमोहिनी, मालवती, मघवा, लगनगंधार, सहेली, तोडी, संजारी, मधसुरजा, निंदियारी, भवमतभैरव अशा नवनवीन रागरागिणी, अनेक नव्या बंदिशी, असं अगणित अनंत मनात उमलत होतं, आकारत होतं.
अखेर 1952 साली या स्वरांचं ग्रहण सुटलं. आणि एक नवनवोन्मेषी तप:पुत अनुपम, स्वर्गीय स्वर दशदिशांना व्यापून राहिला.
एक क्रांतीकारी स्वर. एक अपारंपरिक संगीत विचार. स्वतंत्र शैलीचा गायक. संगीत घराण्यांची परंपरा झुगारून देणारा संगीतोपासक. शास्त्रीय संगीताला परंपरेच्या जोखडातून मुक्‍त करून रसिकाभिमुख बनवणारा सरस्वतीचा सच्चा उपासक. चिंतनशील स्वतंत्र प्रतिभेचा गायक. असं बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे कुमार गंधर्व.
कुमारजींनी चिंतनातून स्वत:ची गायकी जन्माला घातली.
या अवलियावर स्वर प्रसन्न झाले. सगळे स्वर याच्या गळ्यात येऊन बसले आणि लहान मुलांना अंगाखांद्यावर खेळवावं तसा हा या सुरांशी खेळू लागला. शास्त्रीय संगीताचा उगम लोकसंगीतात आहे, असा विश्‍वास असलेल्या कुमार गंधर्वांनी मालवा की लोकधुने हा कार्यक्रम केला. आणि माळव्यातलं लोकसंगीत अक्षर झालं.
कुमारजींनी तंत्रात अडकलेली गायिकी खुली केली. त्यात गोडवा निर्माण केला. रागांमध्ये विविध प्रयोग केले. एकाहून एक सुंदर बंदिशींची रचना केली. अनुपरागविलास हा कुमारजींच्या स्वरचित बंदिशी आणि राग यांच्या स्वरांकनाचा ग्रंथ आहे.
सारंग या रागात बांधलेली ही बंदिश
रुखवातले आया, आया तले आया
बेठा बटमारा तपन करी दूर
अरी ओ बाजी आओ
पियास बुझाले तोरा
व्यातलं लोकजीवन या बंदिशीतून व्यक्‍त होतं.
कबीरांवर कुमारांचं विशेष प्रेम
सुनता है गुरू ज्ञानी हे कुमारांनी गावं. आणि ऐकणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागावी.
तानपुरे जुळवावेत आणि तासनतास त्या नादब्रह्माच्या आराधनेत तल्लीन व्हावं, ते कुमारांनीच.
प्रिय पत्नी भानुताईंचं निधन झाल्यावर स्मशान घाटावरचं आंब्याचं बहरलेलं झाड पाहून भानुंच्या आठवणीनं व्याकुळ होऊन त्यांच्या चितेच्या साक्षीनं फेर आई मौरा अम्बुवापे ही बंदीश रचावी तिही कुमारांनीच.
भानुकुलसमोरच्या माताजी का रास्तावरून देवीला बळी द्यायला निघालेल्या बकऱ्याच्या केविलवाण्या स्वरातून मधसुरजा राग सुचावा, तोही कुमारांनाच. बचा ले मोरी मां, घरमे ललुवा अकेलो है बिन मोहे ही आर्त बंदीश लिहावी तिही कुमारांनीच.
संगीताबरोबरच कुमारांना साहित्याचीही उत्तम जाण होती. म्हणूनच कुमारांना तुकाराम पेलता आला. तुलसीदास गाता आला. भा. रा तांबेंच्या भावगीतांवर तांबे गीत रजनी सादर करता आली.
भारत सरकारच्या निमंत्रणावरून कुमारजींनी गांधी मल्हार या रागाची निर्मिती केली.
बेळगावच्या कुमारांना कर्नाटकी संगीतापेक्षा हिंदुस्तानी संगीत जवळच वाटलं. रागदारी संगीतातील या गंधर्वाला संतकाव्य, भावकाव्य, लोकसंगीत ठुमरी टप्पा असं काही सुद्धा वर्ज्य नव्हतं. कुमारांनी मला उमजलेले बालगंधर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाट्यगीतही पेश केली.
संगीतातील घराण्यांचा अट्टाहास कुमारांनी मोडीत काढला. स्वत:च्या ग्वाल्हेर घराण्याचा अभिमान बाळगत असतानाच इतर संगीत घराण्यातील बलस्थानंही त्यांनी आत्मसात केली.
कुमारांनी त्यांच्या प्रत्येक गुरूची विशेषता स्वत:च्या गाण्यात आणली अंजनाबई मालपेकरांकडून पूर्णतेची दृष्टी घेतली. प्रखर सूर घेतला. वाझिद हुसेनकडून बंदिशीची समज आणि ज्ञान घेतलं. राजाभैय्या पुंछवालेकडून अस्सल गाणं घेतलं. पं. ओंकारनाथ ठाकुर, जगन्नाथबुवा, गोविंदराव टेंबे, सिंदे खॉं, रामकृष्णबुवा वझे आणि देवधर या प्रत्येकाची खासियत कुमारांच्या गळ्यात उतरली आणि त्यांचं गाण परिपूर्ण झालं.
अवघं 68 वर्षांचं आयुष्य. एका आयुष्यात कुमारांनी दहा आयुष्यांएवढी संगीताची सेवा केली. कुमारांच्या जीवनाचा रग रग संगीत, कण कण संगीत होता. संगीत हा त्यांचा ध्यास होता आणि श्‍वासही होता, कुमारजींना सम दिसायची. त्यांना स्वर दिसायचे. एखाद्याला परमेश्‍वर दिसावा तसा. मधसुरजा रागाची निर्मिती करणारे कुमार गंधर्व स्वत:च माध्यन्हिचा सूर्य होते. प्रखर आणि तेजस्वी. कुमारजी म्हणजे सळसळत चैतन्य. कुमारजी म्हणजे पौर्णिमेचं चांदणं. कुमारजी म्हणजे स्वरांचा गंगौघ.
कुमारजींसाठी वसंत बापटांनी लिहिलेलं काव्य सादर करते.
एका कुमाराची कहाणी
सकाळच्या उन्हासरिसे एकदा याने काय केले
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले
टिंबाटिंबामधे जसे चिंब आपले भरून ठेवले
वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले
तेवढ्यामध्ये कोणी तरी कौतुकाची टाळी दिली...
तशी हा सावध झाला,
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला
सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक तप करते
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते
तसा तोही इनामदार उग्र एकाग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला...
तशी हा जो तडक उठला,
ृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला.
खजुरीच्या बनामधे संध्याकाळची सावली झाला
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला
म्हणे कोणी तरी याच्यासाठी हाय म्हटले...
तशी याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला
कोणी म्हणतात निगुर्णाच्या डोहाचाही तळ पाहिला...
एवढ्यामध्ये काय घडले,
मंदिरात सनातन डमरू झडले.
कण्यामधल्या मण्यांमधून मल्हाराची नागीण उठली
चंद्राच्या तव्यामध्ये ॐकाराची लाट फुटली
तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली...
आता तसा कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठे
म्हणे माझा सप्तवर्ण श्‍यामकर्ण घोडा कुठे!

Tuesday, 2 April 2019

वुमन ऑफ बीट

जॅनिस जॉप्लिन

गार्गी विवेक हुद्दार

अनुवाद - वैदेही विवेक हुद्दार

मेझो सुप्रानो ही जॅनिसच्या आवाजाची ओळख, नव्हे तिची मक्‍तेदारीच. जॅनिस गायला लागली की क्षणार्धात तिच्या जादुई आवाजाने लाखोंना भुरळ पडायची. महिला रॉकस्टार हा शब्दच जॅनिससाठी निर्माण झाला.
जॉपलिनचें सगळेच वेगळे, तिचे कपडे, तिची बीडेड ज्वेलरी, तिचे पिसे जडवलेले ड्रेस, ती स्वत: आणि हो तिचे गाणे आणि आवाज. सगळेच विलक्षण.
या सगळ्यामागे जॉपलिनचा रियाझ होता, तिची संगीत साधना होती. सगळ्या पट्ट्यांमध्ये लिलया फिरणारा तिचा आवाज ऐकणाऱ्यावर जादु करायचा. ती सुरांशी खेळायची.
तिला लेडी एल्विस प्रेसली म्हटले जायचे. अर्थात दोघांची तुलना करणे किंवा जॉपलीनला अशी उपाधी देणे हा कुठेतरी तिच्यावर अन्याय आहे. कारण तिची स्वत:ची ओळख आहे. एल्विस प्रेसली आणि जॅनिस जॉपलिन दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ होते. त्यांच्यातील साम्य म्हणजे दोघांनीही रॉक एन रोल या गायन प्रकाराला ग्लॅमर मिळवून दिले. दोघांमध्येही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद होती. अचाट आणि वैविध्यपूर्ण गायनशैलीने दोघांनीही संगीत इतिहासात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. दोघांचेही नाव पाश्‍चात्य संगीत इतिहासात अजरामर झाले.
1960 च्या उत्तरार्धात अफाट लोकप्रियता मिळवून चाहत्यांना वेड लावणारी जॅनिस मॉन्टरी पॉप फेस्टिव्हलमध्ये बिग ब्रदर्स या बॅन्डमधली मुख्य गायिका म्हणून पहिल्यांदा गायली आणि नवीन तारका म्हणून प्रकाशात आली. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या तिच्या दोन्ही अल्बमनी समीक्षकांची भरपूर वाहवा मिळवली. मात्र तिच्या कलागुणांना पुरेसा वाव मिळत नसल्याचे पाहून जॅनिसने इथून पुढे स्वत:चा बॅंड तयार करण्याचे आणि स्वतंत्र कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यातून जन्माला आला कॉस्मिक ब्लुज बॅंड. मात्र पुढे या बॅंडमध्ये काही आंतरिक मतभेद निर्माण झाले. म्हणून जॉपलिनने काही तज्ज्ञ मंडळींना घेऊन full filt boogie band सुरू केला. तिचे नवीन सहकारी अत्यंत कुशल आणि मेहनती होते. परीणामी जॉपलिनला नवे व्यासपीठ प्राप्त झाले, नवे अवकाश मिळाले. तिची गाणी चाहत्यांनी तर डोक्‍यावर घेतलीच आणि समीक्षकांकडूनही नावाजली गेली. जॅनिस कलावंत म्हणून अधिकाधिक समृद्ध होत गेली. जॅनिस तिच्या कलेविषयी, कामाविषयी अत्यंत निष्ठावान होती. तिचे सहकारी सांगतात, जॅनिस नेहमीच सर्वात आधी स्टुडिओत यायची आणि सर्वात शेवटी जायची.
जॅनिसच्या बिग ब्रोज या पहिल्यावहिल्या अल्बममधील कमी लोकप्रियता लाभलेली पण अविस्मरणीय अशी काही गाणी म्हणजे डाऊन ऑन मी, द टेस्ट टाईम. नंतर तिचा चिप थ्रिल नावाचा दुसरा अल्बम आला. तो प्रचंड प्रकाशझोतात आला, त्याला खूप लोकप्रियता लाभली. या अल्बमने billiboard 200 अल्बम चार्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले. त्यातील halled way for iconic heat, piece of my heart, summer time ही काही महत्त्वाची गाणी. तिचा तिसरा अल्बम kozic blues ने billiboard hot hundred मध्ये 41 वे स्थान प्राप्त केले. पण चिप थ्रिल ची उंची kozic blues गाठू शकला नाही. मात्र बाकीच्या अल्बमपेक्षा या अल्बमच्या आवाज आणि रेकॉर्डिंगची गुणवत्ता उत्कृष्ट मानली गेली.
28 जुन ते 4 जुलै 1970 या कालावधीत जॅनिस आणि तिच्या full filt boogie बॅंडने all star festival express train tour ध्ये सहभाग घेतला. ही ट्रेन कॅनडामधून प्रवास करायची आणि सर्व प्रवासी कलावंत ठिकठिकाणी थांबून कार्यक्रम करायचे. हा जॉपलिनच्या संगीत कारकीर्दीतला सर्वोच्च काळ होता.
दरम्यान तिच्या वैयक्‍तिक आयुष्यात याच काळात तुफान आले होते. तिचे खाजगी आणि सार्वजनिक संबंध, तिचे हेरॉइनचे व्यसन अशा बऱ्याच वादग्रस्त गोष्टी त्या काळात घडल्या. मात्र ते सगळं वादळ तिने आपल्या कलेत, गायनात ओतले. ती झोकून देऊन व्यक्‍त झाली आणि तिने स्वत:लाच नव्हे तर संगीत क्षेत्रालाही गौरवान्वित केले.
जॅनिसने तिच्या pearl या पुढच्या अल्बमचे रेकॉर्डिंग सुरू केले. या अल्बममध्ये जॅनिसने स्वत: लिहिलेल्या मर्सिडिझ बेन्झ या गाण्याचा समावेश होता. हा अल्बम खरोखरच pearl म्हणजे पाश्‍चात्य संगीतातील मोती ठरला. यामध्ये जॅनिसने क्रिस क्रिस्टोफरचे me and bobby megee हे गाणे स्वत:च्या अंदाजात गाऊन या मोत्याला सूवर्णाचे कोंदण चढवले. pearl अल्बम प्रकाशित झाला आणि म्युझीक इंडस्ट्री अवाक झाली. चाहत्यांनी, समीक्षकांनी यातील गाणी अक्षरश: डोक्‍यावर घेतली. आर्थिकदृष्टयाही या अल्बमने अफाट यश मिळविले. जॅनिसला या अल्बमने यशोशिखरावर नेऊन ठेवले. 2008 साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार HUNDRED GRETEST SINGERS OF ALL TIME या यादीमध्ये जॅनिसचे नाव 28 व्या क्रमांकावर झळकले. एवढेच नव्हे तर ROCK N ROLL HALL OF FAME 1995 मध्ये जॅनिसच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी महिला कलाकरांमध्येही जॅनिसचा समावेश आहे. तिच्या अल्बमने 15 दशलक्ष प्रती विकल्या जाण्याचा विक्रम केला. या यशाचा आनंद घेणे मात्र जॅनिसच्या नशिबात नव्हते.
जॅनिस अगदी लहान असताना तिला झोपेत चालण्याची सवय होती. अशी चालत असताना तिला कुठे चाललीस, असे कुणी विचारले तर तिचे उत्तर असायचे, घरी! समाजाची बंधने झुगारणारी जॅनिस प्रत्यक्ष आयुष्यातही स्वत:चा एकटेपणा सोबत घेऊन खूप भटकली. लहान असतानासारखीच कदाचित घराच्या शोधात. तिचा तो एकटेपणा, तिचे औदासिन्य तिच्या कलेतून जाणवत राहिले. सगळ्या पट्ट्यांमधून लिलया फिरणाऱ्या तिच्या जादुई स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली.
पण नियतीपुढे कुणाचे चालणार? वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जॅनिस जॉपलिन नावाची ही स्वर्गीय सुरांची मलिका ड्रग ओव्हर डोजमुळे हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली. अगदी लहान वयात तिने या जगाचा निरोप घेतला आणि कदाचित पाश्‍चात्य संगीत क्षेत्रात घडू शकले असते, असे अनेक विक्रम अपूर्णच राहिले. अनेक आख्यायिका अर्धवटच राहिल्या.
जॅनिसची भटकंती मात्र थांबली. मिळाले बहुदा तिला तिचे खरे घर. स्थिरावले तिचे सूर आणि ती!

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अक्षर साहित्याचा जरासा अंश

आठव गदिमांचा

स्वाती हुद्दार

यंदाचं वर्ष अनेक सांस्कृतिक साहित्यिक घडामोडींचं वर्ष आहे. महाराष्ट्राचं भुषण असलेल्या पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग दि. माडगुळकर या त्रयींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहेच, त्याचप्रमाणं ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अमृता प्रीतम यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या सगळ्या साहित्यिकांनी, कलाकारांनी रसिकांना भरभरून दिलं. साहित्यिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न केलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या ऋणातून थोडंतरी उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्यापरीनं करीत आहे.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्‍तिमत्व असलेल्या भाईंवर सिनेमा आलाय. बाबुजींचे सुपुत्र श्रीधर फडके त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम करीत आहेत. अमृता प्रीतम आणि गदिमांवरही विविध कार्यक्रम सादर होत आहेत.
यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भाच्या मातीत यवतमाळला संपन्न झालं. डॉ. अरुणा ढेरेंसारख्या तरल संवेदनशील साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. एक विलक्षण आणि सुंदर योगायोग बघा. 1973 साली ग. दि. माडगुळकरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं होतं आणि ते साहित्य संमेलनही यवतमाळ इथंच झालं होतं. आणि यंदा अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षातही यवतमाळलाच साहित्य संमेलन पार पडलं.
यंदा महाराष्ट्र इथल्या मातीत जन्मलेल्या तीन प्रतिभासंपन्न आणि लाडक्‍या कलाकारांची जन्मशताब्दी साजरी करतोय. गदिमांच्या साहित्यावर यानिमित्ताने चर्चा, कार्यक्रम निश्‍चितच होतील. होत आहेत.
माझ्यासारख्या साहित्याच्या विद्यार्थिनीनं गदिमांवर बोलण्याचं धाडस करावं, म्हणजे काजव्यानं सूर्याची पुजा बांधण्यासारखं आहे. गदिमांच्याच शब्दात सांगायचं तर ही ज्योतीने तेजाची आरती आहे. तरी आपणा सारख्या सुविदय, सुजाण श्रोत्यांच्या समोर माझ्या अल्पमतीप्रमाणें मला आकळलेले गदिमा मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आजच्या विवेचनाचा विषय अलक्षित कवी गदिमा असला तरी यानिमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचाच धावता आढावा सुरुवातीला घेऊया.
कथा, कादंबरी, आत्मचरीत्र, पटकथा, संवाद, चित्रपटगीत, लावणी, बालगीत, प्रेमकाव्य, भावकाव्य, भक्‍तीकाव्य इथपासून तर जोगिया आणि पुढे पुरीयासारखी तरल कविता लिहिणारे गदिमा म्हणजे अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व.
गीतरामायणासारखी अलौकिक कृती प्रसवणाऱ्या गदिमांना महाराष्ट्र आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो. गीतरामायण जन्माला येऊन सहा दशकं लोटल्यानंतरही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतेच आहे, असं भाग्य फार कमी कलाकृतींना आणि साहित्यिकांना लाभतं.अशा अक्षर साहित्याचं धनित्व अण्णांकडे जातं. त्यांच्या हयातीतच त्यांच्या अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभलं होतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी, नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, गोरी गोरी पान, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी अशी एकाहून एक सरस बालगीतं लिहून बालसाहित्याचं विश्‍वही समृद्ध केलं. आपलं बालपण या गाण्यांवरच तर पोसलं गेलं.
फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी प्रासादिक भक्‍तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावणीही लिहितात.
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू आणि वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम लिहिणारे माडगुळकर
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी सारखं हळवं प्रेमगीतही लिहितात. आणि
कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी,
जन्मभरीच्या श्‍वासाइतुके मोजियले हरीनाम, विकत घेतला श्‍याम
असा मीराभावही व्यक्‍त करतात.
बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे अशी लडिवाळ अंगाईही लिहितात.
सहजस्फूर्त प्रासादिक भाषारचना आणि शब्दांची अचूक, नेमकी निवड हे गदिमांच्या गीतांचं वैशिष्ट्य आहे.
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गदिमांनी असामान्य प्रतिभेच्या बळावर भावकाव्य आणि चित्रपटगीतांमध्ये न भुतो न भविष्यती असं कार्य करून ठेवलं आहे. त्यांची काव्यप्रतिभा एवढी विलक्षण होती की चित्रपटातील प्रसंगानुरुप भाव आणि शब्द नेमकेपणानं त्यांच्या गीतांतून व्यक्‍त होत असतं. रचनांचं आणि विषयांचं वैविध्य पाहा. गदिमांनी शिर्डीच्या साईबाबांवरची काकडआरती रामगुलाम या नावानं रचली आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, त्यावेळी त्यांनी शाहिर बोऱ्या भगवान नावानं काही रचनाही केल्या. गीतरामायणासारखचं गदिमांनी गीतगोपाल आणि गीतसौभद्रही लिहिल. 158 मराठी चित्रपटांमधून गीतं लिहणाऱ्या गदिमांनी 25 हिंदी चित्रपटांच्याही कथा लिहिल्या आहेत. दो आँखे बारह हात, तुफान और दिया, नवरंग, अवतार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आणि प्यासा या गुरुदत्तच्या चित्रपटाची मूळ कथा इतकंच नाही तर राणी मुखर्जी आणि अमिताभच्या अभिनयानं गाजलेल्या ब्लॅक चित्रपटाची कथाही गदिमांचीच आहे. साहित्याचे इतके सगळे प्रकार प्रसवणारी अण्णांची लेखणी बहुप्रसवा होती.
चित्रपटगीतं आणि गीतरामायणाच्या उत्तुंग यशामागे या निर्मात्याची कविता मात्र झाकोळली गेली. अनेक समीक्षकांनी गदिमांना गीतकाराच्या प्रतिमेतच बंदिस्त करून टाकलं. समीक्षक आणि टीकाकारच काय स्वत: गदिमाही आपल्या महाकवी या उल्लेखावर कोटी करताना म्हणायचे मी महाकवी नाही, तर महाकाय कवी आहे. गंमतीचा भाग सोडला तर माडगुळकरांच्या कवितेची योग्य दखल मराठी रसिकांनी पुरेशी घेतली नाही, हे खेदानं नमुद करावं लागेल. सहज बोलणे तरी उपदेश हे संतांविषयी म्हटलं जातं. गदिमांची गीत आणि काव्य रचना सहजपणाची ती उंची गाठते. सोपं लिहिण्याइतकं अवघड जगात दुसरं काही नाही. हे अवघडपण गदिमांनी लिलया पेललं आहे. गदिमा एकाचवेळी क्‍लास आणि मासचे कवी आहेत. त्यांची कविता गात गात जन्माला आली. सोप्या शब्दातून गदिमांनी अनेक ठिकाणी गहन तत्वज्ञान सांगितलं.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझीया आयुष्याचे
या वस्त्राते विणतो कोण, एकसारखी नसती दोन,
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे
हे सांगणारी गदिमांची कविता संतकाव्याशी नातं सांगते. किर्लोस्कर -देवलांचा वारसा तर माडगुळकर मान्यच करतात. चैत्रबन हा त्यांचा गीतसंग्रह त्यांनी किर्लोस्कर देवलांच्या प्रतिभेलाच अर्पण केला आहे.
इथे फुलांना मरण जन्मता
दगडांना परी चिरंजिविता
बोर बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार
इतकी आशयघनता शब्दातून मांडणारे अण्णा शब्दप्रभुच होते. माडगुळकरांच्या शैलीबद्दल बोलताना शांताबाई शेळके एके ठिकाणी म्हणतात शब्दसिद्धी त्यांना जन्मत:च लाभली होती. कोणतीही अनुभुती रुपवंत करणारे शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहात.
संस्कृतच्या व्यासंगानं विदग्धतेचा स्पर्श झालेली त्यांची कविता पंडिती काव्याची आठवण करून देते. त्यांच्या गीतातील ग्रामीण बाज त्यांची नाळ शाहिरांशी जोडतो. राम जोशी चित्रपटातील त्यांची ही सवालजबाबाची लावणी लोकगीताचा उत्कृष्ट नमुना आहे.
सूर्य उगवता कमल उमलते
सिंधु उसळतो चंद्रा बघुनी
शुद्ध प्रीति हे कारण त्याचे
ज्ञात्यांनो घ्या हृदयी भरूनी
या शाहिरी काव्यातही गदिमांनी तत्वज्ञानाशी फारकत घेतलेली नाही.
रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा हे चैत्रबनमधलं गीत आणि
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर
ही पुरीयामधली माहेर ही कविता यातून हळवे माडगुळकर व्यक्‍त होतात.
जोगियाच्या प्रस्तावनेत अण्णा म्हणतात, जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे. या संग्रहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले. नेहमीच रसिकांची दाद मिळवणाऱ्या एखाद्या कसबी गवय्यानं एखाद्या मैफीलीत स्वर छेडावे आणि एका संपृक्‍त क्षणी त्याला नादब्रह्म गवसावं, तशी गदिमांची जोगिया ही कविता.
हा विडा घडवूनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा जोगिया रंगे
जोगिया आणि पुरीया हे अण्णांचं स्वान्त सुखाय लिहिलेलं अस्सल काव्य आहे. गेय कविता लिहून गीतकाराचा शिक्‍का माथी आलेले गदिमा पुरीयामध्ये मुक्‍तछंदातली कविता लिहितात. कधी त्यातून विंदा डोकावतात तर कधी मर्ढेकर.
गदिमांची रंगमंच ही आत्मपर कविता राजकवी तांब्यांच्या मधु मागसी माझ्या सख्या परीची आठवण करून देते. सच्च्या कलावंताची व्यथा गदिमा यातून व्यक्‍त करतात.
रंग पुसावा, वेष उतरावा
वाटते आहे
नाटकात रंगत राहिली नाही
पाडणार असशील तेव्हा पाड पडदा
भरतवाक्‍याचा उच्चार होईतो मी मंच सोडणार नाही, पण
पण मला क्षमा कर
अभिनयाची प्रत उतरली आहे
किती नेमक्‍या शब्दात कला, कलावंत यांचं वास्तव गदिमांनी इथे मांडलं आहे.
गदिमांच्या जोगियातील कवितांपेक्षा पुरीयामधील कवितांचा बाज वेगळा आहे. विषय आणि मांडणी या दोन्हीबाबतीत ही कविता अधिक धीटपणे व्यक्‍त होते. मुक्‍तछंदातून प्रगटणारी पुरीयातली कविता आधुनिक कवितेशी अधिक जवळचं नातं सांगणारी आहे. हे या रंगमंच कवितेवरून आपल्या लक्षात येईल.
ग. दि. माडगुळकर या अष्टपैलू साहित्यिकाच्या समग्र साहित्याचा विचार केल्यानंतर माझ मन येऊन थांबतं त्यांच्या एका गेय कवितेपाशी. गदिमांची ही कविता आईच्या मायेनं कुशीत घेते आहे असं मला नेहमी वाटतं. कवितेचे शब्द अंगाभोवती लपेटून मन गदिमांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं आणि आपण गुणगुणत राहतो,
बावरा मी भोळा
पडेन का तुझीया डोळा
लिनपणे कैसा येऊ
तुझ्या मंदिरात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात
एकवार पंखावरूनी फिरे तुझा हात
गदिमांची ही कविता कबिराच्या दोह्यांच्या जवळ जाणारी आहे.
गदिमांवरचे कथा कीर्तनाचे संस्कार, बालपणी त्यांनी ऐकलेल्या जात्यावरच्या ओव्या, रामायण महाभारतावर पोसलं गेलेलं त्यांचं बाल्य, संत काव्याशी त्यांची जुळलेली नाळ सगळं सगळं या एका कवितेतून व्यक्‍त होतं. सोप्या शब्दातून गहन तत्वज्ञान सांगणाऱ्या गदिमांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन या काव्यातून होतं. इथे तुळशीच्या सावळ्या पानानं पारडं जड करणारी रुक्‍मिणी आठवते. गदिमांची ही कविता तुळशीच्या त्या पानासारखी आहे. पारडं तोलून धरणारी.
हितगुज केल्यासारखी स्वाभाविकपणे गात गात व्यक्‍त होणाऱ्या गदिमांच्या कवितेसमोर आणि प्रतिभेसमोर आपण सहजच नतमस्तक होतो.
ज्ञानियांचा वा तुक्‍याचा
तोच माझा वंश आहे माझिया रक्‍तात थोडा
इश्‍वराचा अंश आहे
ज्ञानोबा तुकोबांच्या कलावंशाचा वारसा सांगणारे माडगुळकर महाकवीच नव्हे तर युगकवी होते. महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर आणि एकूणच साहित्य संप्रदायावर माडगुळकरांचं अनंत ऋण आहेत. मराठी साहित्य रसिंकांनी अण्णांच्या या ऋणातच राहावं. त्यांच्या साहित्याची पालखी भोई होऊन वाहावी आणि हे अक्षर साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावं, अशी आशा व्यक्‍त करते.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह