मनाचीये गुंफीस्वाती हुद्दारखूप प्रतीक्षेनंतर बरसतो आहे तो मनसोक्त. भेगाळलेल्या धरेला श्रांत क्लांत करीत. मृद्गंधानं धुंद झालंय वातावरण. धुळीच्या अबीर गुलालानं रेखलेले झाडाचे बुंधे पुन्हा मूळचे रंग लेवून हिरवेगार दिसू लागले आहेत. तो निथळतोय दाराच्या कमानीवर विसावलेल्या सायलीच्या पानांवरून अलगद. त्याचा धसमुसळेपणा न सोसवून केळी झुकलीय कमरेतून. प्राजक्ताच्या बुंध्यातून कोसळतोय तो स्वर्गातून धरेवर उतरणाऱ्या गंगौघासारखा. भरदुपारीच आभाळ काळवंडून गेलंय. काळ्या ढगांनी सूर्याभोवती गर्दी करून त्याला निष्प्रभ करून टाकलंय. आग ओकणाऱ्या सूर्यानंही शेवटी या जलमय मेघांपुढे शरणागती पत्करली. आतापर्यंत जेता असलेला सूर्य मेघांपुढे पराजित. जय-पराजय, हार-जित. कधीच कायम नसते. हेच वास्तव. कधी याचे पारडे जड, कधी त्याचे.वातावरणात भरून राहिला आहे हवाहवासा गारवा. पक्ष्यांनी घेतलाय आसरा आपापल्या घरट्यात. ओलेत्या पंखांसह. पिलं सरकलीत हळुच उबेसाठी त्यांच्या पंखांखाली. गोठ्यातल्या गायींनीही विजेच्या लखलखटानं बावरलेल्या पिलाला हुंगून आश्वस्त केलं आणि किणकिणली तिच्या गळ्यातली घंटा मंजुळ, ओळखीची.खिडकीतून ती न्याहाळतेय पहिल्या पावसाचे सगळे विभ्रम. त्याच्या कोसळणाऱ्या सरळ, तिरप्या धारा. विजेच्या तारांवरून अलगद उतरतानाचा त्याचा ठहराव. साचलेल्या पाण्यातले पाऊस थेंबांचे नर्तन. पावसाचा हात हातात धरून दूर गेलेला वळणावळणाचा काळा कुळकुळीत रस्ता. मधूनच चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशातले अंधार-उजेडाचे खेळ. अंधूक प्रकाशात दिसणारे सृष्टीचे भास-आभास. काही खूप ओळखीचे, काही अगदीच अनोळखी. एखाद्या कसलेल्या नटानं निरनिराळ्या भूमिका ताकदीनं वठवल्या की मुखवट्यांमागचा तो खरा कोणता, हेच ओळखू नये, तसे हे सृष्टीचे पावसाळी रूप. रोजचीच झाडे, रोजचेच आकाश, रोजचेच पक्षी, रोजचेच रस्ते. आज मात्र नवे, पावसाळी रंगभूषा, वेषभूषा ल्यालेले, अनोळखी. माणसाच्या मनासारखे. आपलंच मन आपल्याला उमजू नये तसं. अपेक्षा, भावभावना प्रेम, अनुराग, अनुताप, लोभ, राग, अशी पुटावर पुटं चढलेले मन. कळतं, आकळंत ते केवळ काही अंश, बाकी हिमनगासारखं. गहिरं, खोल, गहन. मन कॅलिडोस्कोपसारखं, व्यक्तिपरत्वे बदलणारं, अगदी पावसासारखं, आषाढातला पाऊस, वेगळा, श्रावणातला वेगळा, भाद्रपदातला त्याहून वेगळा, मनही तसंच, कुणी म्हणावं, ही अशी, दुसऱ्यानं म्हणावं नाही ती तशी, आणखी एखाद्यानं सांगावं, अगं ती तशीच. एकाच व्यक्तीचे त्याच्या मनाचे किती निराळे विभ्रम. न उलगडणाऱ्या कोड्यासारखे. एकाच मनात इतके भाव वास्तव्याला की भावभावना विरहित नग्न मन समोर उभं ठाकलं तर आपलंच मन आपल्याला ओळखू येऊ नये इतकं अपरिचित. दूरस्थ, अनोळखी. गूढ. कधीतरी घेऊन बसावं आपलंच मन आपल्या पुढ्यात आणि उकलत जावा एकेक धागा अलगद. हळुवार. किती प्रसंग, किती आठवणी, किती गुण, किती दोष विलग होत जाताहेत मनाच्या सांदीकोपऱ्यातून. कुणावर तरी हळुवार प्रेम करणारं हे मन किती कठोर होतं एखाद्या प्रसंगी. कुणावर तरी वात्सल्याचे घट रिते करणारं हेच मन इतकं दुष्ट कसं? मुक्या प्राण्यांसाठीही द्रवणाऱ्या याच मनाला भाकरीसाठी पुढे केलेल्या त्या हाताची किळस का वाटावी? मंदिरात दानासाठी भरभरून द्रव्य देणाऱ्या या मनाला एखाद्या गरजूवर थोडेसे पैसे खर्च करणं अवघड का होतं? जीवनाच्या या सारिपाटावर सोंगट्या खेळताना माणसाला इतके मुखवटे चेहऱ्यावर चढवावे लागतात की, त्या मुखवट्यांमागचा खरा चेहरा आपला आपल्यालाच ओळखू येईनासा होतो. कधीतरी या मुखवट्यांमागे श्वास घुसमटू लागतो. शोधावसं वाटू लागतं स्वत:लाच. ओढून फेकाविशी वाटू लागतात ही मुखवट्यांची अस्तरं. एक, दोन, तीन, अनेक. कधी आणि कशासाठी चढवले इतके मुखवटे. मुखवट्यांच्या गर्दीमागचा खरा चेहरा शाबूत असेल की झाला असेल विद्रूप आणि घायाळ. आपलंच मन आणि आपलाच चेहरा...परस्परांसाठी अपरिचित, अनोळखी. अशावेळी काय करावं. विचारांची घडी घालून बाजूला ठेवावी. बाहेर कोसळणाऱ्या पाऊस धारेच्या स्वाधीन व्हावं. चिंब भिजू द्यावं मन आणि शरीर त्या स्वर्गीच्या अस्पर्श ओल्या धारेत. गळून जाऊ द्यावे सगळे मुखवटे. निथळू द्यावे मनातले सगळे भाव. निचरा होऊ द्यावा सगळ्या आशा-अपेक्षांचा. आणि मग गुणगुणावी छानशी लकेर. लपेटून घ्यावं स्वत:भोवती मृद्गंधाचं अत्तर. विणून घ्यावा कोष मनाभोवती निसर्गाच्या हिरवाईचा. आणि हिरव्या सुगंधित मनानं जावं पुन्हा एकदा जगण्याला सामोरं. चिंब ओल्या पाऊस धारेच्या साक्षीनं. मुखवटेविरहित! कोमल ओल्या जाईच्या फुलासारखं. बस इतकचं. | |||
Monday, 15 July 2019
Subscribe to:
Posts (Atom)