Powered by Blogger.

Monday, 10 September 2018

नॉस्टॅल्जिया

स्वाती हुद्दार

वय आणि अनुभव वाढू लागतात तसतसे जुने बंध अधिकच ओढू लागतात की काय न कळे. वयाच्या चाळिशीत माणूस कितीही यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगत असला तरी बालपण, त्यातल्या रम्य आठवणी मागे राहून गेल्याची हुरहुर उरतेच. पदोपदी त्या आठवणी स्मरतात आणि आपण त्यातच रमायला लागतो. बालपणीचं घर, शाळा, मित्रमैत्रिणी, बहिण भावंड, खेळ, रुसवेफुगवे, उत्सव सगळं सगळं हवहवंस वाटतं. मन त्याकडे ओढ घ्यायला लागतं. पुन्हा एकदा भूतकाळाच्या उदरात शिरून त्या आठवणींना स्पर्श करावासा वाटतो. त्या अनुभवांच्या खोल डोहात डुंबावसं वाटायला लागतं.

बाप्पा येणार असले की महिनाभर अगोदरच वातावरणनिर्मिती सुरू होते अजूनही. आमच्या लहानपणी तर खूपच जल्लोष असायचा. माझं बालपण महाल भागात गेलं. तिथे तर अतीच उत्सवी वातावरण असायचे. गणपतीचे दिवस जवळ आले की शाळेतून येताजाता मुद्दामच चितारओळीत चक्‍कर मारायचो आम्ही. त्या आळीत जागोजागी ओल्या चिक्‍कण मातीचे ढिग ठेवलेले असायचे. त्याचा गंध आजही स्मरतोय. घराघरासमोर काथ्याच्या अर्धवट साकारलेल्या गणेशमुर्ती दिसायच्या. त्यावर माती लिंपलेली असायची. कधीही अवचित येणाऱ्या पावसाची सोय म्हणून काळी ताडपत्री टाकलेली असायची. मंडळाच्या मोठमोठ्या मुर्तींबरोबरच घराघरातून स्थापन केल्या जाणाऱ्या छोट्या गणेशमुर्तीही आकाराला येत असायच्या. दिवस जसेजसे पुढे सरकू लागायचे तसतसे त्या मुर्तींचे रंगरुप खुलायला लागायचे. मुर्ती पूर्ण घडली आणि माती सुकली की चितारी त्यावर रंगकाम करायला घ्यायचे. मातीच्या गणेशमुर्ती विविध रंगात रंगू लागायच्या. एकाच विघ्नहर्त्याची विविध रुपं चितारओळीत हारीनं उभी असायची. महालातल्या त्या चितारओळीला कलानगरीचं रुप यायचं. कलावंतांचे कसबी हात गणेशाची विविध रुपं साकारायचे. गणेशमुर्ती पूर्ण आकाराला आल्या की बडकस चौकात त्या विकायला ठेवल्या जायच्या. ऑर्डरप्रमाणे तयार केलेल्या मंडळाच्या मुर्ती आणि काही घरगुती गणेश चितारओळीतूनच नेले जायचे.
आमच्या बालपणीचा काळ खरंच सुखाचा होता. आमच्या मानेवर मार्कांच्या सततच्या स्पर्धेचं जू नव्हतं. त्यामुळे बालगणेश मंडळ वगैरे नावं असलेली गणेशमंडळं वेटाळात स्थापली जायची. लहान मुलांबरोबरच पालकांचाही त्या गणेशमंडळांना पूर्ण पाठिंबा असायचा. मोठ्या माणसांच्या उपस्थितीत या गणेशमंडळाची बैठक व्हायची. खर्चाचा आराखडा मांडला जायचा. दहा दिवस कोणकोणते कार्यक्रम होतील, हे सर्वानुमते ठरायचे. बालसेना राखीनंतर वर्गणी गोळा करण्याच्या मोहीमेवर निघायची. प्रत्येक घरातून उत्साहाने आम्हा मुलांना वर्गणी मिळायची. आलेल्या वर्गणीतून कार्यक्रमाचे पाम्प्लेट छापले जायचे. गल्लीच्या तोंडाशी स्टेज तयार व्हायचा. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजतगाजत गजाननाचे आगमन व्हायचे. गल्लीतील हौशी मुलं नाटक बसवायचे. त्याच्या रात्र रात्र तालमी चालायच्या. जागून गणपतीसाठी आरास केली जायची. गृहिणींसाठी रांगोळी स्पर्धा, पुष्प सज्जा, गीत स्पर्धा, नकलांचे कार्यक्रम, व्हायचे. आनंद मेळावा असायचा. अर्थवशीर्षाची आवर्तन व्हायची. भजन गायली जायची. गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. एरवी 10 वाजता नीजानीज होणारी गल्ली गणपतीच्या दिवसात पहाटेपर्यंत जागती असायची. घरातील वडीलधारी मंडळीही यावर आक्षेप घेत नसत. संपूर्ण गल्लीचं एक कुटुंब झालेलं असायचं. दहाही दिवस एकेका घरातून प्रसाद यायचा. कधी शिरा, कधी मोदक, कधी साखरभात. ज्याला जे शक्‍य असेल ते. रोज सकाळ संध्याकाळ आरती व्हायची. वर्गणी चांगली जमली असेल तर एखाद्या दिवशी व्यावसायिक नाटक ठेवले जायचे. तेव्हा गणपतीचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे मोठ्ठ्या पडदयावर दाखवला जाणारा सिनेमा. तेव्हा नागपुरात टीव्हीही यायचे होते. त्यामुळे सिनेमांविषयी खूप आकर्षण होते. सिनेमाचा दिवस आधीच जाहीर केला जायचा. गणपतीच्या स्टेजच्या बाजुला काळ्या बोर्डावर सिनेमाचे नाव त्यातील कलावंतांची नावे लिहिली जायची. गणपतीच्या दहा दिवसांमध्ये आजुबाजुच्या वस्तीतील गणपतींजवळही कोणते कोणते सिनेमे दाखवले जाणार आहेत, याचा शोध घेण्यासाठी मुलांची एक टोळी शोध मोहिम राबवायची. जिथे आपला आवडता सिनेमा असेल, तिथे तो बघायला जायचा, असाही ट्रेंड होता त्यावेळी. सिनेमाच्या दोन दिवस आधीपासून सगळी गल्ली सिनेमामय झालेली असायची. सिनेमाच्या दिवशी तर कधी एकदा शाळा सुटते आणि संध्याकाळ होते, असे झालेले असायचे. शाळा सुटली की इकडेतिकडे न भटकता तडक घरी यायचे. आयाबायाही दुपारच्या गप्पा आवरत्या घेत लवकर स्वयंपाकपाणी आटोपून ठेवायच्या. घरी आल्याबरोबर कसातरी गृहपाठ आटोपला की रोजच्यासारखी कुरकुर न करता जे पानात वाढले जाईल ते घाईघाईत गिळून आपले पोते घेऊन सिनेमाच्या पडद्यासमोर जागा पटकवायची. हे ठरलेले असायचे. घरातल्या बायकाही मागची झाकपाक करून सगळ्या मिळून पोत्यावर येऊन बसायच्या. वेटाळातल्या वयस्कर मंडळींसाठी खुर्च्यांची सोय केली जायची. सगळे जमले की प्रोजेक्‍टरवर एकदाचा सिनेमा सुरू व्हायचा. आम्ही सगळे देहभान विसरून तो सिनेमा डोळ्यात साठवून घ्यायचो. गणपतीच्या दिवसात असे खूप सिनेमे आम्ही पाहिले. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, भाभी की चुडीया, मदर इंडिया, मधुमती, मराठा तितुका मेळवावा, असे एकाहून एक सिनेमे. सिनेमात एखाद्या देवाचे किंवा तीर्थक्षेत्राचे दर्शन झाले की आई आजी हमखास मनोभावे हात जोडायच्या. प्रोजेक्‍टरच्या बाजुला बायकांची आणि उलट्या बाजुला पुरुष मंडळींची बसण्याची सोय केलेली असायची. सिनेमा सुरू होऊन अर्धापाऊण तास झाला की मुंगफल्लीवाला आपला ठेला गल्लीच्या तोंडाशी उभा करायचा. सिनेमातल्या संवादांच्या पार्श्‍वभुमीवर त्याच्या ठेल्यावरच्या गरम घमेल्यात मुंगफल्ली परतण्याचा आवाज बेमालुम मिसळून जायचा. दिवसभराची रोजी संपवून घरी जायला निघालेला एखादा रिक्षावालाही आपल्या रिक्षात बसून सिनेमा बघायचा. सगळं वातावरण एकदम भारलेलं असायचं. रात्री अकरा साडेअकराला सिनेमा संपायचा. पेंगुळलेल्या छोट्या मुलांना कडेवर घेऊन आयाबाया घरी परतायला निघायच्या. सिनेमाच्या यातीन तासात त्याही संसाराचा रोजचा रामरगाडा विसरलेल्या असायच्या.
अनंत चतुदर्शीच्या दिवशी दुपारी गोपालकाल्याचे कीर्तन असायचे आणि रात्री महाप्रसाद असायचा. घराघरातून आलेले तांदुळ, तेल, मीठ मसाले, भाज्या सगळे एकत्र करून महाप्रसादाचा मसालेभात तयार केला जायचा. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण व्हायचे. त्या महाप्रसादाची चव पंचतारांकित हॉटेलमधल्या जेवणालाही येणे शक्‍य नाही. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळते आहे. शेवटी बाप्पाला निरोप देण्याचा कठीण समारंभ. सगळेजण घरातील कोणी आप्त गावाला निघाल्यासारखे उदास झालेले असायचे. घराघरातल्या थाळ्या, घंटांच्या नादात शेवटची आरती व्हायची. डाळकाकडीचा प्रसाद वाटला जायचा. गणपती बाप्पा मोरयाचा मोठ्ठा गजर व्हायचा आणि गणपतीची मिरवणुक निघायची. वाजतगाजत सगळेजण गणपतीसह शुक्रवार तलावावर पोहोचायचे आणि गणपतीचे विसर्जन व्हायचे. गणपतीबरोबरच दहा दिवसांच्या उत्साही उत्सवाचेही विसर्जन करून सगळेजण पुढच्या वर्षी लवकर या ही घोषणा मनात घोळवत उदासवाणे घरी परतायचे.
आजही गणेशमंडळे आहेत, भव्यदिव्य सजावट आहे, डीजे आहे, गणपतीसमोर मोठमोठे ऑर्केस्ट्रा होतात, शेवटच्या दिवशी मेजवानीही होते मिरवणुकीत बाभुळगावचा बॅण्डही आहे. मात्र त्या उत्सवातला प्राण मात्र निघुन गेला आहे, उरला आहे केवळ उपचार.
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह