साठा-उत्तराची कहाणी...स्वाती हुद्दारआज परत कोलाहल, गप्पा, गजबज, बिल्वरांची किणकिण, उदधुपाचा सुगंध, वाती-फुलवातींचा सोज्वळ उष्ण प्रकाश, दह्यादुधाचा शिडकावा आणि कच्च्या सुताचे पक्के फेरे, जुन्यावर नवे, परत नवे, परत नवे, आवर्त युगायुगांचे. मी इथेच, या बांधावर उभा. आशा, अपेक्षांच्या धाग्यात बंदिस्त, कधीचा. पिढ्या बदलल्या, ऋतू बदलले, पारंब्या रुजल्या, नवे जीवन उमलले, फुलले, बहरले, पुन्हा रुजले. इथेच माझ्या साक्षीनं. माझ्या हिरव्याकंच डेरेदार सावलीत ती पतीचे मस्तक मांडीवर घेतलेली. यमाला वादविवादात जिंकून पतीच्या प्राणांचे वरदान प्राप्त करणारी महाभारतातल्या वनपर्वातील सत्यवानाची सावित्री. अखंड सौभाग्याचे वरदान घेऊन सत्यवानासह जेव्हा ती माझ्या छायेत विसावली, तेव्हा माझ्यासह सगळा भवताल मंगलगीत गायला होता आणि तेव्हापासून युगानुयुगे मी गावाच्या वेशीवर आईबहिणींच्या सौभाग्याचे रक्षण करीत उभा. वादळवारा, ऊनपाऊस झेलत. ऊनपावसाच्या समेवर माझा एक दिवस. गावातून वाहणारे उष्ण वारे आणि पावसाचा सांगावा घेऊन वेशीवर दाटून आलेले काळे ढग. अशावेळी हातभर बांगड्या, कपाळी रुपयाएवढे कुंकू ल्यायलेल्या, मेंदीने सजलेल्या हातात पूजेची तबक घेतलेल्या त्या समूहाने येतात. काही चंचल डोळ्यात नवेपणाचा साज ल्यायलेल्या नवथर, तर काही अनुभवसंपन्न शहाणपण अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या. एरवी गावातल्या बुजरुगांच्या गप्पा आणि गुरांसाठी वळचण असलेला माझा पार या लाघवी लगबगीनं फुलून येतो. आणि फांद्याफांद्यांवर विसावलेली पाखरांची चिवचिवही मंजूळ कुजबुज जीवाचे कान करून ऐकू लागते. पारंब्यांना लय प्राप्त होते आणि घोळक्यातल्या लेकीबाळी त्यावर झुलू लागतात. पारावरची माती उकरून धान्यानं पेव भरली जाते. दह्यादुधाचे ओघळ दुथडी भरून वाहू लागतात. हळद-कुंकू, अबीर-गुलालाची रंगपंचमी रंगते. मोगऱ्याच्या फुलांनी आणि हारांनी पूजा बांधली जाते. फुलवाती तेवतात. आणि सुरू होतो आर्त स्वरातला आरतीचा गजर, जोडीला टाळ्यांनी बांधलेला ताल आणि आईच्या पदराला धरून वडाला आलेल्या पाच-सहा वर्षाच्या चिमुकल्या हातातील घंटाही किणकिणू लागते. कापूर आरती सुरू होते आणि सुवासिक धुराचे लोट वातावरण भारून टाकतात. त्यानंतर सुरू होते वृद्ध कापऱ्या आवाजातील सावित्री-सत्यवानाची साठा उत्तराची कहाणी. युगामागून युग लोटली, कहाणी सांगणारी आणि ऐकणारी पात्र बदलली. कहाणी आणि मी मात्र तोच. तरीही कहाणी नवी भासते आणि दरवर्षीप्रमाणे मी भान हरपून ती ऐकत राहतो. मग सुरू होतात सुताचे फेरे. किती अलगदपणे सुताच्या बंधनानं मी वचनबद्ध होतो. कच्च्या सुताचे फेरे यांच्या भावभक्तीनं कधी वज्राचे होतात, माझं मलाच कळत नाही. हात जोडले जातात. अहेवपणाचं मागणं मागितलं जातं. जन्मोजन्मीची साथ आणि पतीच्या दीर्घायुरारोग्याचा आशीर्वाद मागणाऱ्या या मातृशक्तीपुढे मीच नतमस्तक होतो. गहिवरतो. एकमेकींच्या कपाळी हळदीकुंकवाची बोटं उमटवली जातात. वाणं वाटली जातात. हळूहळू गर्दी पांगते. उरतात पणत्यांमधून तेवणाऱ्या आशेच्या ज्योती. अर्धवट जळत्या उदबत्त्या. पायांखाली येऊन मलूल झालेली फुलं, खोडावरून ओघळलेल्या दुधादह्याचा ओशट गंध, धान्याच्या राशी, काही नाणी आणि आंबे. परीघभर पसरलेल्या माझ्या खोडामागून अलगद फाटक्या कपड्यातलं 8-10 वर्षाचं दारिद्य्र प्रगटतं. हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा. केस पिंजारलेले. मळकट बाहीनं वाहतं नाक पुसणाऱ्या त्या दारिद्य्राची चोरटी नजर इकडेतिकडे भिरभिरते. आपल्या काळपट काटक्या हातांनी ते पारावरची चिल्लर गोळा करून फाटक्या झग्याच्या खिशात सारतं. कळकट पिशवीत इवल्या हातांनी धान्य भरण्याचा प्रयत्न करतं. आंबे गोळा करताना हाताला लागलेला गोड वासाचा रसरशीत आंबा मुखी काढून चोखू लागतं आणि त्याचे समाधानानं चकाकणारे डोळे ही वटसावित्रीची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्याची ग्वाही देतात. | |||
Monday, 5 June 2017
Subscribe to:
Posts (Atom)