Powered by Blogger.

Monday, 9 December 2024

आवाजाची दुनीया

स्वाती हुद्दार


आवाजाशी माणसाचे नाते जुळते, ते आईच्या गर्भातच. काळोख्या गर्भातही बाहेरचे आवाज बाळापर्यंत पोहोचत असतात आणि बाळ त्याला प्रतिसादही देत असते. ही आवाजाची दुनीया बाळाला आयुष्यभर सोबत करते. पिढी दर पिढी हे आवाजाचे संदर्भ बदलत जातात. लहानपणी माझी सकाळ व्हायची, आईच्या व्यंकटेश स्तोत्राने. केरवारे करताना, सडा-रांगोळी करताना ती व्यंकटेश स्तोत्र म्हणत असायची.
अन्नासाठी दाही दिशा
आम्हा फिरविसी जगदिशा.
पहाटेच्या नीरव शांततेत साऱ्या घरादाराला व्यापून उरलेला तिच्या प्रसन्न आवाजातील स्तोत्राचा आरोह-अवरोह अंगाभोवती लपेटून घेऊन मी अंथरुणातच पडून राहायचे. मग स्वयंपाकघरात सुरू व्हायची कपबशांची किणकिण. सोबतीला विहिरीच्या खिराडीचा लयबद्ध नाद. आणि दोर पूर्ण सोडल्यानंतर बादली पाण्याच्या पृष्ठभागावर आदळल्याचा डुब् असा आवाज. एखाद्या गवयाला सम गवसावी, तसा. चहाच्या घोटाबरोबर कानावर यायचे आकाशवाणीवरचे अर्चनाचे स्वर आणि सकाळ सुरेल व्हायची. मागोमाग दूध अशी दूधवाल्याची हाळी. मागोमाग भाजी घ्या भाजी, दही घेता का जी असे भाजीवाली, दहीवालीचे आवाज. या सगळ्या आवाजांना आपापले नाद, आपापली ओळख होती. त्या साऱ्या वातावरणाचा, त्या रहाटगाडग्याचा ते आवाज अविभाज्य भाग होते. जगण्याच्या पार्श्वसंगीतासारखे. दिवस पुढे-पुढे सरकायला लागला की आवाजाचा पोतही बदलू लागायचा. वातावरणात शाळा-ऑफीसची घाई जाणवू लागायची. सायकल, रिक्षांच्या घंटी, देवघरातून येणारे नित्यपुजेचे, आरतीचे स्वर निरांजनाच्या स्निग्धतेत भिजून आल्यासारखे वाटायचे. सोबतीला कुकरच्या शिट्ट्या, पोळ्या लाटताना होणारी बांगड्यांची किणकिण, असे जठराग्नी चेतवणारे आवाज.  रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याची लकेर.  सारे आवाज एकमेकांमध्ये मिसळून द्रुत लयीतल्या तराण्यासारखे  कानावर पडायचे.  घडाळ्याचा काटा माध्यान्हाकडे झुकू लागला की हे सारे आवाजांची धावपळ कमी व्हायची आणि ते विलंबित ख्यालासारखे कानावर येऊ लागायचे.  आई पोळी वाढा, अशी माधुकऱ्याची साद घुमायची.  मधूनच बाई भांडी घेता काजी, अशी लकेर उमटायची. दारात दुपार रेंगाळू लागली की तोंडात सुपारीचे खांड चघळत दारासमोरच्या ओट्यावर आयाबायांचा गप्पांचा फड रंगायचा. त्यांच्या सुखदुःखाच्या गुजगोष्टींनी, हास्यविनोदांच्या निवांत आवाजांनी घर-अंगण सुखावून जायचे. अंगणातला चाफा मोहरून जायचा. आणखी थोडा वेळ गेला की हे आवाज सुस्तवायचे आणि अलगद पांघरुणात गुरफटायचे.
संध्याकाळच्या सावल्या गडद होऊ लागल्या की केशरी आकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांचे थवे आणि त्यांचा चिवचिवाट. गोठ्याकडे परतणाऱ्या गायीगुरांचा हंबर. शाळेतून परतणाऱ्या मुलांची आई् अशी साद. संध्याकाळच्या चहाबरोबर रंगलेल्या हास्यविनोदाचे आवाज, तुळशी वृंदावनाजवळ तेवणाऱ्या पणतीच्या उजेडातून येणारा परवचाचा स्वर. मागोमाग तारस्वरात केलेले पाढ्यांचे पाठांतर. इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगची घोकंपट्टी, तालासुरात म्हटलेल्या कवितांमुळे घरादाराला मिळालेली लय. त्यातच मिसळलेला टीव्हीवरच्या बातम्यांचा आवाज. आणि ९-९.३० वाजता पेंगुळलेले घर-दार. एकेक दिवा मालवत  दिवसभराचे थकलेले सारे आवाज अलगद पांघरुणात शिरायचे आणि सारे शांत..शांत व्हायचे. मात्र त्या शांततेलाही एक आवाज होता, तृप्तीचा, समाधानाचा. तो आवाज आजच्या हलकल्लोळाच्या, श्रीमंत जागत्या रात्रींच्या झगमगत्या  दुनीयेत हरवला आहे. तुमच्यापैकी कुणाला सापडला, तर मला नक्की सांगा. प्रतीक्षेत...

Thursday, 10 October 2024

 आईचा जोगवा मागेन
स्वाती हुद्दार  

 श्रीदेवी ही विविध संप्रदायाची अधिष्ठात्री आहे. त्या-त्या संप्रदायाच्या पूजा पद्धतीनुसार देवीची पूजा बांधली जाते. वेद, पुराण, उपनिषदातून देवी महात्म्याचे अतीशय सुंदर वर्णन केले आहे. त्याचबरोबर लोकसाहित्यातही देवी आराधनेच्या विपुल रचना आढळतात.
गोंधळ, भारूड, जोगवा हे देवी आराधनेचे लोकसाहित्यातील काही प्रकार. वेद-उपनिषदांइतकीच सघनता, अर्थपूर्णता या रचनांमध्येही आढळते. मराठी भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ एकनाथांनी भारूड, जोगवा या रचनांमधूनही देवीची आराधना केली आहे. एवढेच नव्हे नाथांनी दुर्गेदुर्गट भारी ही घरोघरी म्हटली जाणारी देवीची आरतीही रचली आहे.
जोगवा गीत हा देवी आराधनेचा एक प्रकार. जोगवा म्हणजे भिक्षा. जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. अंबा, भवानी, रेणुका आदी शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. जोगते व जोगतिणी या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात.
देवीच्या नावाने जोगवा मागणे याचा अर्थ घरोघरी जाऊन भिक्षा मागणे आणि त्यामध्ये जो कोरडा शिधा किंवा धान्य मिळेल ते शिजवून खाणे. जोगते आणि जोगतीण यांचा निर्वाह यावर अवलंबून असतो. काही देवीभक्तांकडे जोगवा मागणे हा कुळाचार असतो. मंगळवारी किंवा शुक्रवारी तसेच शारदीय नवरात्रोत्सवात असा जोगवा मागितला जातो. अतीशय संपन्न घरातील मंडळीही केवळ कुळाचार म्हणून असा जोगवा आजही मागतात. भिक्षा मागणे म्हणजेच अहंभाव बाजूला सारणे. अहंभाव दूर सारल्याशिवाय माणूस याचक बनू शकत नाही. हा अहंभाव त्यागण्याची शिकवणच आपल्याला या प्रथा-परंपरांमधून मिळते.
नाथांनीही देवीकडे जोगवा मागितला आहे, मात्र तो शाश्वत वस्तूंचा नव्हे. हेच नाथांचे संतत्व आहे.
देवीचे जोगते झालेले संत एकनाथ तिच्याकडे मागणं मागताना म्हणतात
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन
विश्वाच्या निर्मितीस जी कारण आहे, जी जगत्‍जननी आहे, जिच्या रुपाला आदि-अंत नाही, भक्तांनी जिच्या सगुण साकार रुपाची कल्पना केली आहे, मात्र जी निर्गुण निराकार आहे, अशी आदिमाया जगदंबा प्रत्यक्ष प्रगट व्हावी आणि माझ्या मनातल्या मोहरुपी महिषासुराचा तिने नाश करावा, माझ्या मनातले आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे त्रिविध ताप तिने दूर करावेत, असा जोगवा मला दे.
नाथांचे सद्‍गुरू जनार्दन स्वामी हे दत्तभक्त होते. गुरू परंपरेनुसार नाथही दत्त संप्रदायी होते. त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा ही संत एकनाथांनी रचलेली दत्ताची आरती आजही दत्त संप्रदायात म्हटली जाते. नाथांनी मात्र सामान्यांसाठी भक्तिमार्ग अनुसरला. नाथ क्रांतिकारक आणि संशोधक संत होते. संस्कृत भाषेत रचना करणे, प्रतिष्ठेचे मानले जाण्याचा तो काळ. तरीही नाथांनी सामान्यांसाठी सारी रचना प्राकृतात केली. या अर्थाने नाथ क्रांतिकारक होते. कालौघात भावार्थदीपिकेत अनेक पाठभेद निर्माण झाले होते. नाथांनी संशोधन करून ते पाठभेद दूर सारीत ज्ञानेश्वरी शुद्ध केली. या अर्थाने नाथ संशोधक होते. असे नाथ जगदंबेकडे जोगवा मागतात, तो ही अलौकिकच.
द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी धरीन् । भेद रहित रहित वारीस जा‌ईन । आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन
अहं ब्रह्मास्मी, हा हिंदू तत्वज्ञानाचा गाभा. सर्व चराचरात एकच तत्व भरून राहिले आहे. आत्मा-परमात्मा एकच आहे. असे आपण मानतो, ते आचरणात मात्र येत नाही. ‘मी-तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त जाण’ हे मी-तू पण संपावे, आपल्यातले द्वैत सरून अद्वैत अवस्था प्राप्त व्हावी आणि आत्मबोधाचे ज्ञान व्हावे, म्हणजे मीच ब्रह्म आहे. ही अनुभुती प्राप्त व्हावी. महाराष्ट्रात वारीची परंपरा पूर्वापार आहे. वारीत कुठलाही भेदाभेद अमंगळ नसतो. सारे पांडुरंगाच्या भक्तीत रंगलेले असतात. लहानथोर सारे एकमेकांच्या पायी डोकी ठेवतात. असा जोगवा नाथ मागत आहेत. खरेतर नाथांचे चरित्र भेदविरहित जीवनाचा अत्युच्च आदर्श होते. वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या तोंडात गोदेवरून आणलेली कावड रिती करणारे नाथांसारखे उदाहरण विरळाच. अशी भूतदया असलेला संत भेदरहित करण्याचे मागणे अंबेकडे मागतो, ते स्वतःसाठी नाही, तर तुमच्या आमच्या सारख्या संसारींसाठी. यातच नाथांचे श्रेष्ठत्व आहे.
नवविध भक्तिच्या करुनी नवरात्रा । करोनी निराकरण कारण मागेन ज्ञानपुत्रा । दंभ सासरा सासरा संडीन कुपात्रा । करीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन
नाथ पुढे मागणे मागतात, दंभ म्हणजे अहंकार दूर सारण्याचे. जो प्रत्येकाला जन्मतःच चिकटलेला आहे. एकदा का मी आणि माझे सरले की उरतो, साऱ्यांविषयीचा सद्‍भाव, करुणा, प्रेम. म्हणजेच संतत्व. हे प्राप्त होण्यासाठीच तर या नवविधा नवरात्रीची उपासना आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण या नवविधा भक्तीच्या पहिल्या तीन पायऱ्या. परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास उपयोगी असतात; पादसेवनम, अर्चनं, वंदनम हे प्रकार भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत व दास्यम, सख्यम व आत्मनिवेदन हे शेवटचे तीन प्रकार म्हणजे भक्तीतील आंतरिक भाव आहेत. नवविधा भक्तीच्या या पायऱ्या पार केल्यानंतर आपोआप काम, क्रोध, मद, लोभ, दंभ हे षड्‍रिपू गळून पडतात आणि आपुलाच आपुलाशी संवाद सुरू होते. अंतरीच्या खुणा पटायला लागतात आणि सत् चित् आनंदाची प्राप्ती होते. सारे भवपाश गळून पडतात आणि वारी वारी जन्ममरणाते वारी हे एकच मागणे उरते, इथे एका जनार्दनी ही नाममुद्रा रेखत नाथ महाद्वारी येऊन नवस फेडण्याचा जोगवा मागतात.

Friday, 16 August 2024

 एक दिन अचानक

 स्वाती हुद्दार 

 
भारतीय सिनेमामध्ये व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा हे दोन्ही प्रवाह समांतर चालत आले आहेत. कलात्मक सिनेमाचा इतिहास १९२०-३० च्या दशकापर्यंत मागे जातो. १९२५ साली बाबूराव पेंटर यांनी सावकारी पाश हा कलात्मक चित्रपट दिग्दर्शित केला होता. तेव्हापासूनच व्यावसायिक चित्रपटांच्या भाऊगर्दीत कलात्मक चित्रपटांची छोटी पण स्पष्ट धारा प्रवाहित होतच राहिली.
पुढे सत्यजीत रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन, तपन सिन्हा, ख़्वाजा अहमद अब्बास, बुद्धदेव दासगुप्ता, चेतन आनंद, गुरुदत्त, व्ही. शांताराम अशा दिग्गज निर्माता दिग्दर्शकांनी समांतर सिनेमामध्ये सूवर्ण युग निर्माण केले.
पुढे १९८९ साली हिंदी सिनेमात मैने प्यार किया, चांदनी, राम लखन अशा व्यावसायिक चित्रपटांचा बोलबाला असतानाच मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला एक दिन अचानक हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने आपली नाममुद्राही रेखली.
रामपद चौधरी यांच्या बीज या बांग्ला कादंबरीवर आधारीत असलेला हा चित्रपट सुरू होतो तो कोलकत्त्यातील पावसाळी रात्रीच्या पार्श्वभुमीवर. इतिहासाचे प्राध्यापक असलेले शशांक रे घरी परतलेले नसतात. त्यांची पत्नी, दोन मुली आणि मुलगा त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. ते बाहेर जातात तेव्हा त्यांची बायकोच फक्त घरी असते. मुले संध्याकाळी घरी परततात, तेव्हापासून सुरू होते वाट पाहणे. ते कुठे जाण्याची शक्यता आहे, याचा विचारविमर्श, फोन करून पाहणे, पावसामुळे बंद झालेला फोन, काळजीतून आलेला ताण टिपत सिनेमा पुढे सरकतो.

प्रोफेसर रे नाहीसे झाल्यानंतर त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग फ्लॅशबॅकमध्ये येत राहतात. त्यातून रेंचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते.
रे हे इतिहासतज्ज्ञ आहेत. इतिहासाचा त्यांचा सखोल अभ्यासही आहे. आपली नोकरी, आपला अभ्यास, आपले चाहते, आपले विद्यार्थी, ऐतिहासिक चर्चा असे मनस्वी आयुष्य जगणाऱ्या रेंचा संसार त्यांच्या पत्नीनेच सांभाळला. यथावकाश नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही रे स्वतःच्या कोषातच जगत राहिले. परिणामी त्यांच्या तिनही मुलांशी त्यांचे दृढ नाते विणले गेले नाही. एकाच घरात राहूनही त्यांची मने सांधली गेली नाहीत. त्यातल्यात्यात मोठ्या मुलीशी त्यांचे बरे सूर जुळले. मुलामध्ये आणि त्यांच्यामध्ये तर कायम तणावच राहिला.त्यांची गृहिणी असलेला पत्नी ही पती आणि मुले यांच्यातली मध्यस्थाची भूमिका बजावत राहिली. आपण कोणीतरी विशेष आहोत, वेगळे आहोत, ही जाणीव असलेल्या रेंनी स्वतःभोवती एक वर्तुळ आखून घेतले होते. त्यांचे स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे कुटुंब आणि रें यांच्यात कायम एक दरी राहिली, न सांधणारी. 

दिवसांमागून दिवस उलटत जातात. रेंचे घरी न परतणे, हळूहळू कुटुंबाने स्वीकारले. प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला. तरी कधीतरी ते घरी परततील, ही आशा आणि त्यांच्या अशा अचानक नाहीशा होण्याामागच्या कारणांचा वेध कुटुंबातील प्रत्येकजण घेतच राहतो. या सगळ्यात एकटी उरली रेंची पत्नी. कारण पती आणि कुटुंब याशिवाय तिला वेगळे अस्तित्व नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाहीशा होण्यानंतर तिच्या आयुष्यात एक रितेपण भरून राहिले. रेंनी स्वतःच स्वतःभोवती एक आभासी वलय निर्माण केले होते. त्याच्या आत खुद्द त्यांच्या पत्नीलाही स्थान नव्हते. पण त्यांच्या पत्नीने ते स्वीकारले होते. ती आयुष्यभर त्या वलयाच्या अवतीभवती वावरत राहिली. मात्र रेंच्या जाण्यानंतर तिच्या आयुष्याचा तो संदर्भही हरवला. मग ती शोध घेत राहिली त्यांच्या नाहीशा होण्याच्या कारणांचा. घरी कोणी नसताना त्यांची पुस्तके, त्यांचे लिखाण यामध्ये त्यांच्या निघून जाण्याचे धागे ती शोधू लागली आणि तिला एक दिवस सापडले त्यांनी एका कागदावर रेखलेले अपर्णा या त्यांच्या आवडत्या विद्यार्थिनीचे नाव. खरेतर अपर्णा नेहमीच त्यांच्या घरी येणारी. प्रोफेसर रे, पत्नी सुधा आणि अपर्णा असे तिघेही कधीतरी गप्पा करत बसायचे. अभ्यासातल्या काही शंकांसाठी अपर्णा रेंना रात्री-बेरात्री फोन करायची. प्रोफेसर रेंचा अहम त्यामुळे सुखावला जायचा, हे सुधाला कळायचे मात्र तिला कधी त्यात वावगे वाटले नाही. आता मात्र संदर्भ बदलले होते. त्यामुळे प्रोफेसर रेंनी रेखाटलेल्या अपर्णाच्या नावाला सुधाच्या दृष्टीने वेगळा अर्थ होता. रेंच्या नाहीसे होण्यानंतर अपर्णाचे त्यांच्या घरी येणे, फोन करणेही बंद झाले होते. सुधा या सगळ्याचे धागे एकमेकांशी सांधून पाहू लागली. सुधाने मोठी मुलगी नीताजवळ हे सगळे सांगत मन मोकळे केले. आणि सुरू झाला अपर्णाशी संपर्काचा प्रयत्न. अपर्णा लग्न करून गाव सोडून गेलेली असते. त्यामुळे मायलेकींच्या संशयाला अधिकच बळ मिळते. अपर्णाला बोलावणे पाठवले जाते. ती रेंच्या घरी भेटायला येते. तेव्हा  मात्र अपर्णाचा नवरा कोणी दुसराच असल्याचे सत्य समोर येते. मायलेकी तिला रेंच्या तिच्याविषयीच्या भावनांविषयी तिला सांगतात, तिच्यासाठीही हा धक्का असतो, कारण ती रेंच्या मोठ्या मुलीच्या वयाची असते. खूप दुखावली जाऊन ती रेंच्या घरून निघून जाते. मग सुरू होतो नव्या कारणांचा शोध.

 रेंना नाहीसे होऊन एक वर्ष झाले असते. पुन्हा तशीच पावसाळी रात्र असते. दोन्ही मुली आणि आई एकत्र बसून रेंच्या आठवणी जागवत असतात. तेव्हा अचानक नीता, त्यांना वाटत होते, तेवढे ते मोठे नव्हते. आणि हे सत्य ते पचवू शकले नाहीत, हेच त्यांच्या निघून जाण्याचे कारण असावे, असे आपल्या वडलांविषयीचे निरीक्षण नोंदवते. बहुतेक साऱ्यांनाच कुठेतरी हे पटते  आणि इथे हा सिनेमा संपतो. मात्र तेव्हाही प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उरते. 

शबाना आजमी, श्रीराम लागू, अपर्णा सेन, उत्तरा बावकर, रुपा गांगुली अशा कसलेल्या कलाकारांनी हा जिवंत अभिनयाने हा चित्रपट वेगळ्या उंचीवर नेला आहे.

Tuesday, 28 May 2024

जिण्याचा आषाढ मेघ व्हावा

स्वाती हुद्दार 

 
 आशा निर्माण करणारा आणि ओढ लावणारा तो आषाढ. कृषक, कलावंत, धार्मिक साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. ज्येष्ठाच्या मध्यावर अवचित येणारा पाऊस आषाढात स्थिरावत जातो. पारावर पावसाविषयीच्याच गप्पा रंगतात. काळी भुई बीज पोटात रुजवून घ्यायला सज्ज असते. हरिनामाचा गजर करीत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या दिंड्यांतील पावलांना लय गवसली असते. टाळ-चिपळ्यांच्या तालावर अभंग रंगला असतो. फेर धरले जातात. फुगड्या खेळल्या जातात. वारीतल्या भगव्या पताका काळ्या ढगांनी व्यापलेल्या आकाशात लहरत असतात. डोईवरची कृष्ण तुळस, गळ्यातली तुळशी माळ आणि कपाळावरचा अबीर सावळ्या विठ्ठलाला कडकडून भेटायला आतूर झालेले असतात.
गवय्याने छेडलेले मल्हारचे सूर पाऊसधारांना आवाहन करीत असतात.
अशा पार्श्वभूमीवर आभाळातून अमृतधारा बरसतात आणि सारी सृष्टी चैतन्याने न्हाऊन निघते. धुळीचे भस्म लावून ध्यानस्थ बसलेल्या वेशीवरच्या वडाच्या पानापानांतून पाऊस थेंब अलवार ओघळतात. वडावरची घरटी चिवचिवतात. अलगद अंगावर उडालेल्या पाऊस तुषारामुळे वडाच्या आश्रयाला आलेल्या गायीचे अंग थरथरते. वडाखााली वाटसरूही निथळत उभे राहतात.
असा हा आषाढ. महिन्यांच्या क्रमातला चवथा. एका हातात पांडुरंग भक्ती आणि दुसऱ्या हातात गुरूभक्ती घेऊन येणारा. महाकवी कालिदासाला मेघदुताची रचना करायला लावणारा.
म्हणूनच कलावैदर्भीचा आषाढ अंक आषाढ विशेष म्हणून सादर करीत आहोत.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह