अट्टाहास | करकरीत तिन्हीसांज हाडे गोठवणारी थंडी आणि नर्मदेचा तीर दिसला तो अश्वत्थ वृक्षाखाली अंगावरच्या जुनेराच्या चिंध्या सावरत कपाळावर होती भळभळती जखम आरंभला होता त्यानं त्याच्याच आयुष्याचा यज्ञ आणि अर्पित होता त्याच्याच कर्माच्या समिधा स्वाहाकाराचा त्याचा ध्वनी मिसळून दूर जात होता नर्मदेच्या खळाळत्या प्रवाहाबरोबर यज्ञातल्या धुरानं कोंदला होता अवघा परीसर अश्वत्थाच्या आश्रयाला आलेल्या पाखरांचा गुदमरत होता श्वास घरट्यातली नुकतीच जन्मलेली पिलं पडत होती पटापट खाली मरणाचा हा खेळ पाहून विचारलं त्याला कशासाठी हा अट्टाहास म्हणाला, आणखी एका द्रौपदीच्या श्रापासाठी उच्चारावा तिनं माझा मृत्यू त्याचसाठी हा अट्टाहास केवळ त्याचसाठी स्वाती हुद्दार | ||||||
Friday, 14 December 2018
Wednesday, 28 November 2018
तेहेतीस टक्क्यांची नवी सुरुवातस्वाती हुद्दारगेल्या आठवड्यात ओडिशा विधानसभेने 33 टक्के महिला आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करीत एक नवी सुरुवात केली आहे. सध्या 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत महिलांची संख्या फक्त 12 आहे. सत्ताधारी बिजू जनता दलाने मांडलेल्या महिला आरक्षणाच्या प्रस्तावाला कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षानेही समर्थन दिले आणि विधानसभेत एका ऐतिहासिक पर्वाची पायाभरणी झाली. एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के महिला असलेल्या देशात संसदेत आणि विधानसभेत महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाच्या कायद्याची गरज पडावी आणि दोन दशकांचा काळ उलटल्यानंतरही हा कायदा संमत होऊ नये, यावरूनच या विषयासंबंधीची उदासीनता लक्षात येते. संसदेतील महिलांच्या प्रतिनिधित्वाविषयी झालेल्या जागतिक सर्वेक्षणात 193 देशांपैकी भारताचा 148 वा क्रमांक आहे. भारताच्या शेजारील पाकिस्तानात महिलांचे संसदेतील प्रतिनिधित्व 20.7 टक्के, बांगलादेशात 20.3 टक्के आणि नेपाळमध्ये तर चक्क 29.9 टक्के इतके जास्त आहे. सहिष्णुतेचे गोडवे गाणाऱ्या भारतात 542 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत महिला सदस्य केवळ 11.6 टक्के आणि 245 सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत केवळ 11 टक्के महिला खासदार आहेत. विधानसभांमध्येही परिस्थिती फारशी निराळी नाही. बिहार आणि राजस्थान विधानसभांचाच याला थोडाफार अपवाद आहे. येथील महिला आमदारांची टक्केवारी 14 टक्के आहे. स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही महिला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान आजही गौण आहे. अर्थात नोकरीतील आरक्षणानंतर नोकरदार महिलांची संख्या बऱ्यापैकी दिसू लागली. मात्र, उच्च शिक्षित होऊन नोकरी व्यवसायापासून इतर सर्व क्षेत्रात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या महिला राजकीय क्षेत्राबाबतच उदासीन का असाव्यात. एकूणच राजकारण हे कारकीर्द करण्याचे क्षेत्र मानले जाण्याची मानसिकता भारतात आजही नाही. उच्चशिक्षित व्यक्ती राजकारणात उतरण्याची टक्केवारी अलीकडे बऱ्यापैकी दिसत असली तरी राजकारण हे सुशिक्षितांचे क्षेत्र नव्हे या मानसिकतेचा प्रभाव आहेच. राजकारण हे वारशात मिळते, असेही मानले जाते. आजोबा, वडील, मुलगा अशी घराणेशाहीच राजकारणात चालते. राजकीय वारसा लाभलेल्या घरातील महिलाही राजकारणात उतरण्याचे प्रमाण कमीच आहे. अशा परिस्थितीत इतर महिलांचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. अर्थात महिलांचे क्षेत्र केवळ नटणे, मुरडणे आहे. त्यांनी घरगुती गप्पा माराव्यात. राजकारणातले त्यांना काहीही कळत नाही, असे मानणारा मोठ्ठा पुरुषवर्ग आजही आहे. पुरुषांच्या या गैरसमजाला काही महिलाही खतपाणी घालत असतात. महिलांचा गोतावळा जमला की घरगुती गप्पा आणि पुरुषांचा मित्रपरिवार जमला की राजकीय गप्पा, असे चित्र आजही घरोघरी दिसते. राजकीय गप्पांचेच ज्यांना वावडे आहे, त्या प्रत्यक्ष राजकारणात उतरणे दूरच. अर्थात स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पाश्चिमात्य देशांपेक्षाही महिला अधिकारांच्या बाबतीत भारत अधिक पुरोगामी आहे. इथे महिलांना निवडणुकीतील मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला नाही. परंतु, ज्या देशातील पंतप्रधानपद, राष्ट्रपतिपद आणि लोकसभाध्यक्षपद महिलांनी भूषविले, त्याच देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वास्तव भयंकर होते. सरपंचपदावर महिला असते. कारभार मात्र पतीच्या हाती असतो. कारण एकच. महिलांच्या क्षमतेवरील अविश्वास. त्या महिलेसह कोणालाही त्यात वावगे वाटत नाही. याचाच अर्थ कायदे करून परिस्थिती बदलत नाही. बदलांसाठी आवश्यकता असते मानसिकता बदलण्याची. कायदे केवळ हातभार लावतात. कायद्याने पायवा रचला जातो. इमारत उभी राहण्यासाठी विचारांचे आमूलाग्र परिवर्तनच गरजेचे असते. भारतातल्या शहरांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. गावांमधून हा बदल झिरपायला आणि महिलांनी राजकारणात उतरायला अजून बराच अवकाश आहे. एच. डी. देवगौडा सरकारने 1996 साली महिलांच्या 33 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सर्वप्रथम संसदेत आणला. त्यानंतर राज्यसभेत हा प्रस्ताव मंजूर व्हायला मार्च 2010 उगवावे लागले. लोकसभेत मात्र अजूनही हा प्रस्ताव रेंगाळला आहे. महिला आरक्षणाविरुद्ध ओरड करणाऱ्यांसाठी युनायटेड नेशन्सच्या युनिव्हर्सिटी वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे धक्कादायक असेच आहेत. हे सर्वेक्षण 1992 ते 2012 या चार निवडणुकांच्या काळातील आहे. * या सर्वेक्षणानुसार महिला प्रतिनिधी असलेल्या निवडणूक क्षेत्रातील आर्थिक स्तर अधिक उंचावला आहे. *महिला प्रतिनिधींच्या क्षेत्रात आधारभुत सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्यात आल्या आहेत आणि रस्ते बांधणी योजनाही चांगल्या राबविल्या आहेत. *पुरुष प्रतिनिधींच्या तुलनेत महिला प्रतिनिधींवर दाखल गुन्ह्यांची संख्या कमी आहे. *ग्रामपंचायतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांच्या क्षेत्रात पुरुष प्रतिनिधींच्या क्षेत्रापेक्षा 62 टक्के अधिक चांगल्या प्रकारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आहे. हे सर्वेक्षण खूप बोलके आहे. अत्यंत आशादायक आहे. महिलांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामार्तब करणारे आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर सक्षमपणे कार्य करणाऱ्या महिलांसाठी राजकारणात आपली शुभंकर पावले उमटवणे अशक्य नाही. हेच या सर्वेक्षणाने सिद्ध केले आहे. कायद्याने संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, मात्र राजकीय क्षेत्राला अस्पृश्य न मानता महिलांनी राष्ट्रहितासाठी या क्षेत्रातही पाऊलखुणा उमटवाव्यात. ओडिशा विधानसभेत महिलांना मिळालेले 33 टक्के आरक्षण ही केवळ राजकीय घटना नाही. ही नांदी आहे येऊ घातलेल्या बदलाची. |
Friday, 16 November 2018
पोकळीस्वाती हुद्दारअजगराच्या पोटासारखा लांबचलांब पसरलेला निमुळता रस्ता. आत-आत ओढत नेणारा. सोबतीला ती निळ्या कपड्यातली अनोळखी. गारुड झाल्यासारखी तिच्या सुचनांचं तंतोतंत पालन करत ही तिच्या बरोबर. त्या अंधाऱ्या बोगद्यातून पुढे पुढे. एक मोठ्ठ लाकडी दार. पुश अशी सुचना लिहिलेलं. खट् असा आवाज करत दार उघडलं गेलं. डोळ्यानंच तिची आत जाण्याची सुचना. आतमध्ये लख्ख चकचकीत उजेड. हिरव्या कपड्यातल्यांची सराईत निशब्द लगबग. मोठमोठ्या ट्रॉलीज. कात्र्या, सुरे, हॅण्डग्लोज, औषध, ऑक्सिजन सिलेंडर, बी पी ऍपरेटस, मोठ्ठ स्ट्रेचर. निळ्या कपड्यातलीची परत एक सुचना. स्ट्रेचरवर निजण्याची. स्ट्रेचरवरून दिसणारं त्या मोठ्ठ्या खोलीचं पांढरशुभ्र छत. डोक्यावर भिरभिरणारा पांढराच पंखा. पंख्याच्या आजुबाजुला ठरावीक अंतरावर उजेड फेकणारे दुधाळ लाईट्स. समोरच्या भिंतीवर मोठ्ठा स्क्रिन. एसीचा गारठवणारा गारवा. दातावर दात घट्ट दाबत थंडीशी मिळतंजुळतं घेण्याचा तिचा प्रयत्न. निळे कपड्यातलीने बटन दाबलं आणि स्ट्रेचरच्या वरचा मोठ्ठा दिवा ऑन झाला. स्ट्रेचरवरच्या शरीराचा आरपार वेध घेणारा. एक मनही होतं त्या शरीरात घुटमळणारं. हिरव्या कपडतल्यांची लगबग अधिक वाढली. बी पी ऍपरेटस हाताला गुंडाळलं गेलं. एका बोटाला बिप बिप आवाज करणारं पल्सचं ऍपरेटस. चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क. हातात इंजेक्शन घेतलेल्या एकानं तिच्या डोक्यावर हलकंच थोपटत तिला कुशीवर वळवलं. तिचे भेदरलेले डोळे इंजेक्शनवर स्थिरावले. एकदा मुलींना बघायचयं, ती पुटपुटली. तिचे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आत पाठीच्या मणक्यात तीव्र कळ. जीवघेणी. आई गं... ती कळवळली. बस बस झालं. एक आश्वासक आवाज. पायातली संवेदना हळूहळू कमी होत होत नाहीशी. कमरेखालच्या शरीराची जाणीव संपलेली. डोळे हळूहळू जड होत होते. आजुबाजुचे आवाज खोल गुहेतून आल्यासारखे. अनोळखी, अपरिचित. लख्ख प्रकाशाचा एक एक कोपरा विझत चाललेला. पांढरे छत अंधारात बुडत चालले होते. डोळ्यात दाटून आलेल्या अंधारात हिचा एकेक चेहरा शोधण्याचा प्रयत्न. मुलींचा, त्याचा. डोळ्यात साठवलेले चेहरे निजेच्या हिंदोळ्यावर हेलकावत होते. लहानपणी निजताना अंगाई लागायची. रवी गेला रे सोडूनी आकाशाला नीज नीज माझ्या बाळा. अंगणातल्या खाटा, केसातून फिरणारा आईचा सायीसारखा हात आणि नीज भरल्या डोळ्यात साठवलेलं चांदण्यांनी भरलेलं आकाश. नीजेच्या वेळी जवळची सोबत करणाऱ्या त्या दूरस्थ चांदण्या. त्यांचा प्रदेश नाव गाव अनोळखी. मात्र ओळख युगायुगांची. त्यांना आणि तिला सांधणारा परावर्तित दुधाळ प्रकाशाचा किरण. त्या प्रकाश किरणाच्या माध्यमातून तिच्या कितीतरी गुजगोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या. ते प्रकाशपुंज कवेत घेतलेली आकाशाची विशाल पोकळी. जमिनीखालीही आहेच पोकळी. मात्र जमिनीला श्राप नाही अवकाशासारखा वांझपणाचा. पोकळीवरच्या मातीच्या थरांमध्ये रुजते जीवन. बीजाला कोवळे अंकुर फुटतात. उमलतात फळं-फुलं. जमिनीला वरदान आहे सृजनाचे. अवकाशाच्या पोकळीत म्हणे रुजत नाही काहीच. असंख्य ग्रहताऱ्यांचे वैभव अंगाखांद्यावर मिरवणारे आकाश जीवनाशिवाय अपूर्णच आहे. खरे तर इथेही वाहतात वारे, येतात वादळे, कोसळतो पाऊस, प्रकाशतात अगणित तेजस्वी सूर्य आणि फिरतात इथल्या आकाशगंगेतील पृथ्वीभोवती अनेक चंद्रही. इथे आहेत लाखो तेजस्वी शुक्र आणि कड्याचे वैभव बाळगणारा शनीही. तरीही इथे जीवन फुलत नाही. कोवळे अंकुर उगवत नाहीत. फुले उमलत नाहीत. इथे कोकिळ गात नाही, मोर नाचत नाही. चिमण्या चिवचिवत नाहीत. भुकेले बाळ रडत नाही आणि बाळाचं रडणं ऐकून आईला पान्हाही फुटत नाही. म्हणूनच या सगळ्या चैतन्यसृष्टीशिवाय हे ब्रह्मांड पोरके आहे.पोकळी, रितेपण, वांझपण. युगायुगांच्या निद्रेनंतर जाग यावी, तशी एकेक संवेदना जागृत होतेय. काहीतरी दुखतयं, खुपतयं, जडावलेल्या डोळ्यात आभाळ दाटून आलंय. डोळ्यासमोर एकेक आकृती धुसर. कानांनाही जाणवताहेत प्रेमळ स्वर. डोक्यावरून फिरतोय एक मायाळू स्पर्श. गळ्यात दाटून आलाय हुंदका आणि आवंढा गिळताना पोटात जाणवली एक प्रचंड पोकळी. काहीतरी नक्कीच निसटलयं. संपलय. उरलयं एक रितेपण तिला, तिच्या अस्तित्वाला, अवघ्या ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं. आकाशाच्या पोकळीसारखं आता तिच्याही भाळी. | |||
Monday, 10 September 2018
नॉस्टॅल्जिया
स्वाती हुद्दार
वय आणि अनुभव वाढू लागतात तसतसे जुने बंध अधिकच ओढू लागतात की काय न कळे. वयाच्या चाळिशीत माणूस कितीही यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगत असला तरी बालपण, त्यातल्या रम्य आठवणी मागे राहून गेल्याची हुरहुर उरतेच. पदोपदी त्या आठवणी स्मरतात आणि आपण त्यातच रमायला लागतो. बालपणीचं घर, शाळा, मित्रमैत्रिणी, बहिण भावंड, खेळ, रुसवेफुगवे, उत्सव सगळं सगळं हवहवंस वाटतं. मन त्याकडे ओढ घ्यायला लागतं. पुन्हा एकदा भूतकाळाच्या उदरात शिरून त्या आठवणींना स्पर्श करावासा वाटतो. त्या अनुभवांच्या खोल डोहात डुंबावसं वाटायला लागतं.बाप्पा येणार असले की महिनाभर अगोदरच वातावरणनिर्मिती सुरू होते अजूनही. आमच्या लहानपणी तर खूपच जल्लोष असायचा. माझं बालपण महाल भागात गेलं. तिथे तर अतीच उत्सवी वातावरण असायचे. गणपतीचे दिवस जवळ आले की शाळेतून येताजाता मुद्दामच चितारओळीत चक्कर मारायचो आम्ही. त्या आळीत जागोजागी ओल्या चिक्कण मातीचे ढिग ठेवलेले असायचे. त्याचा गंध आजही स्मरतोय. घराघरासमोर काथ्याच्या अर्धवट साकारलेल्या गणेशमुर्ती दिसायच्या. त्यावर माती लिंपलेली असायची. कधीही अवचित येणाऱ्या पावसाची सोय म्हणून काळी ताडपत्री टाकलेली असायची. मंडळाच्या मोठमोठ्या मुर्तींबरोबरच घराघरातून स्थापन केल्या जाणाऱ्या छोट्या गणेशमुर्तीही आकाराला येत असायच्या. दिवस जसेजसे पुढे सरकू लागायचे तसतसे त्या मुर्तींचे रंगरुप खुलायला लागायचे. मुर्ती पूर्ण घडली आणि माती सुकली की चितारी त्यावर रंगकाम करायला घ्यायचे. मातीच्या गणेशमुर्ती विविध रंगात रंगू लागायच्या. एकाच विघ्नहर्त्याची विविध रुपं चितारओळीत हारीनं उभी असायची. महालातल्या त्या चितारओळीला कलानगरीचं रुप यायचं. कलावंतांचे कसबी हात गणेशाची विविध रुपं साकारायचे. गणेशमुर्ती पूर्ण आकाराला आल्या की बडकस चौकात त्या विकायला ठेवल्या जायच्या. ऑर्डरप्रमाणे तयार केलेल्या मंडळाच्या मुर्ती आणि काही घरगुती गणेश चितारओळीतूनच नेले जायचे.
आमच्या बालपणीचा काळ खरंच सुखाचा होता. आमच्या मानेवर मार्कांच्या सततच्या स्पर्धेचं जू नव्हतं. त्यामुळे बालगणेश मंडळ वगैरे नावं असलेली गणेशमंडळं वेटाळात स्थापली जायची. लहान मुलांबरोबरच पालकांचाही त्या गणेशमंडळांना पूर्ण पाठिंबा असायचा. मोठ्या माणसांच्या उपस्थितीत या गणेशमंडळाची बैठक व्हायची. खर्चाचा आराखडा मांडला जायचा. दहा दिवस कोणकोणते कार्यक्रम होतील, हे सर्वानुमते ठरायचे. बालसेना राखीनंतर वर्गणी गोळा करण्याच्या मोहीमेवर निघायची. प्रत्येक घरातून उत्साहाने आम्हा मुलांना वर्गणी मिळायची. आलेल्या वर्गणीतून कार्यक्रमाचे पाम्प्लेट छापले जायचे. गल्लीच्या तोंडाशी स्टेज तयार व्हायचा. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजतगाजत गजाननाचे आगमन व्हायचे. गल्लीतील हौशी मुलं नाटक बसवायचे. त्याच्या रात्र रात्र तालमी चालायच्या. जागून गणपतीसाठी आरास केली जायची. गृहिणींसाठी रांगोळी स्पर्धा, पुष्प सज्जा, गीत स्पर्धा, नकलांचे कार्यक्रम, व्हायचे. आनंद मेळावा असायचा. अर्थवशीर्षाची आवर्तन व्हायची. भजन गायली जायची. गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. एरवी 10 वाजता नीजानीज होणारी गल्ली गणपतीच्या दिवसात पहाटेपर्यंत जागती असायची. घरातील वडीलधारी मंडळीही यावर आक्षेप घेत नसत. संपूर्ण गल्लीचं एक कुटुंब झालेलं असायचं. दहाही दिवस एकेका घरातून प्रसाद यायचा. कधी शिरा, कधी मोदक, कधी साखरभात. ज्याला जे शक्य असेल ते. रोज सकाळ संध्याकाळ आरती व्हायची. वर्गणी चांगली जमली असेल तर एखाद्या दिवशी व्यावसायिक नाटक ठेवले जायचे. तेव्हा गणपतीचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे मोठ्ठ्या पडदयावर दाखवला जाणारा सिनेमा. तेव्हा नागपुरात टीव्हीही यायचे होते. त्यामुळे सिनेमांविषयी खूप आकर्षण होते. सिनेमाचा दिवस आधीच जाहीर केला जायचा. गणपतीच्या स्टेजच्या बाजुला काळ्या बोर्डावर सिनेमाचे नाव त्यातील कलावंतांची नावे लिहिली जायची. गणपतीच्या दहा दिवसांमध्ये आजुबाजुच्या वस्तीतील गणपतींजवळही कोणते कोणते सिनेमे दाखवले जाणार आहेत, याचा शोध घेण्यासाठी मुलांची एक टोळी शोध मोहिम राबवायची. जिथे आपला आवडता सिनेमा असेल, तिथे तो बघायला जायचा, असाही ट्रेंड होता त्यावेळी. सिनेमाच्या दोन दिवस आधीपासून सगळी गल्ली सिनेमामय झालेली असायची. सिनेमाच्या दिवशी तर कधी एकदा शाळा सुटते आणि संध्याकाळ होते, असे झालेले असायचे. शाळा सुटली की इकडेतिकडे न भटकता तडक घरी यायचे. आयाबायाही दुपारच्या गप्पा आवरत्या घेत लवकर स्वयंपाकपाणी आटोपून ठेवायच्या. घरी आल्याबरोबर कसातरी गृहपाठ आटोपला की रोजच्यासारखी कुरकुर न करता जे पानात वाढले जाईल ते घाईघाईत गिळून आपले पोते घेऊन सिनेमाच्या पडद्यासमोर जागा पटकवायची. हे ठरलेले असायचे. घरातल्या बायकाही मागची झाकपाक करून सगळ्या मिळून पोत्यावर येऊन बसायच्या. वेटाळातल्या वयस्कर मंडळींसाठी खुर्च्यांची सोय केली जायची. सगळे जमले की प्रोजेक्टरवर एकदाचा सिनेमा सुरू व्हायचा. आम्ही सगळे देहभान विसरून तो सिनेमा डोळ्यात साठवून घ्यायचो. गणपतीच्या दिवसात असे खूप सिनेमे आम्ही पाहिले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भाभी की चुडीया, मदर इंडिया, मधुमती, मराठा तितुका मेळवावा, असे एकाहून एक सिनेमे. सिनेमात एखाद्या देवाचे किंवा तीर्थक्षेत्राचे दर्शन झाले की आई आजी हमखास मनोभावे हात जोडायच्या. प्रोजेक्टरच्या बाजुला बायकांची आणि उलट्या बाजुला पुरुष मंडळींची बसण्याची सोय केलेली असायची. सिनेमा सुरू होऊन अर्धापाऊण तास झाला की मुंगफल्लीवाला आपला ठेला गल्लीच्या तोंडाशी उभा करायचा. सिनेमातल्या संवादांच्या पार्श्वभुमीवर त्याच्या ठेल्यावरच्या गरम घमेल्यात मुंगफल्ली परतण्याचा आवाज बेमालुम मिसळून जायचा. दिवसभराची रोजी संपवून घरी जायला निघालेला एखादा रिक्षावालाही आपल्या रिक्षात बसून सिनेमा बघायचा. सगळं वातावरण एकदम भारलेलं असायचं. रात्री अकरा साडेअकराला सिनेमा संपायचा. पेंगुळलेल्या छोट्या मुलांना कडेवर घेऊन आयाबाया घरी परतायला निघायच्या. सिनेमाच्या यातीन तासात त्याही संसाराचा रोजचा रामरगाडा विसरलेल्या असायच्या.
अनंत चतुदर्शीच्या दिवशी दुपारी गोपालकाल्याचे कीर्तन असायचे आणि रात्री महाप्रसाद असायचा. घराघरातून आलेले तांदुळ, तेल, मीठ मसाले, भाज्या सगळे एकत्र करून महाप्रसादाचा मसालेभात तयार केला जायचा. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण व्हायचे. त्या महाप्रसादाची चव पंचतारांकित हॉटेलमधल्या जेवणालाही येणे शक्य नाही. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळते आहे. शेवटी बाप्पाला निरोप देण्याचा कठीण समारंभ. सगळेजण घरातील कोणी आप्त गावाला निघाल्यासारखे उदास झालेले असायचे. घराघरातल्या थाळ्या, घंटांच्या नादात शेवटची आरती व्हायची. डाळकाकडीचा प्रसाद वाटला जायचा. गणपती बाप्पा मोरयाचा मोठ्ठा गजर व्हायचा आणि गणपतीची मिरवणुक निघायची. वाजतगाजत सगळेजण गणपतीसह शुक्रवार तलावावर पोहोचायचे आणि गणपतीचे विसर्जन व्हायचे. गणपतीबरोबरच दहा दिवसांच्या उत्साही उत्सवाचेही विसर्जन करून सगळेजण पुढच्या वर्षी लवकर या ही घोषणा मनात घोळवत उदासवाणे घरी परतायचे.
आजही गणेशमंडळे आहेत, भव्यदिव्य सजावट आहे, डीजे आहे, गणपतीसमोर मोठमोठे ऑर्केस्ट्रा होतात, शेवटच्या दिवशी मेजवानीही होते मिरवणुकीत बाभुळगावचा बॅण्डही आहे. मात्र त्या उत्सवातला प्राण मात्र निघुन गेला आहे, उरला आहे केवळ उपचार.
Saturday, 18 August 2018
श्रावणोत्सवस्वाती विवेक हुद्दारश्रावणातली उनकोवळी ओलसर दुपार. न्हालेले काळेभोर लांबसडक ओले केस पाठीवर मिरवत पायातल्या तोरड्यांच्या मंजुळ नादात तिचं सतत आतबाहेर मिरवणं. तिच्या उत्सुक डोळ्यातून झरत होता हसरा श्रावण. रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधानं घर कोंदून गेलं होतं. बांबुच्या परडीवर पानाफुलांची गौर रेखण्यात आईआजी रंगून गेल्या होत्या. पांढरा तगर, लालचूटूक जास्वंद, गुलाबी कण्हेर, जांभळा, लाल, केशरी, पांढरा तेरडा, सुगंधी नाजुक जाई-जुई-सायली आणि चमेली, सोनेरी सोनचाफा आणि नाजुक केशरी देठाचा स्वर्गीय प्राजक्त. रंग-गंधाचा उत्सव. निसर्गाची मनसोक्त उधळण. ते सगळे रंग-गंध, आई-आजीच्या कलासक्त हातातून परडीवर उतरले आणि भराडी गौरीतून साकारला उत्सवी श्रावण. भराडी गौर. श्रावणातला एक निसर्गोत्सव.आषाढातला पावसाचा आवेग ओसरल्यानंतर लयबद्ध विलंबित बंदीशीसारख्या पावसाच्या रेशमी श्रावण सरी झरू लागतात. रंगात आलेल्या मैफीलीसारखी झाडेवेलीही पानोपानी बहरून येतात. रंगसंगतीचं अचुक ज्ञान असलेल्या कसबी चित्रकारासारखा निसर्ग उधळतो रंगीबेरंगी फुलांची रास. आणि सुरू होतं निसर्गपुजेचं पर्व. श्रावणातल्या पंचमीला नागपुजन. दर मंगळवारी नवथर नववधुंनी केलेली मंगळागौरीची आराधना. अगस्तींनी प्राशन केलेल्या सागराची आराधना करणारी नारळी पौर्णिमा. गोकुळाष्टमी, पोळ्याला होणारे वृषभ पुजन. कृषकसंस्कृतीच्या आणि निसर्गपुजेच्या खुणा श्रावणभर विखुरलेल्या. दर सोमवाराची शिवआराधना हा तर श्रावणाचा प्राण. देवघरातल्या पिंडीवर वाहिलेली शिवामुठ आणि हिरवीकंच बेलाची रास. मंदीरातल्या अंधाऱ्या दगडी गाभाऱ्यातल्या शिवपिंडीवर अभिषेकाची धार आणि बाहेर पावसाची श्रावणधार. नंदादीपातल्या स्निग्ध ज्योतीचा उष्ण सुगंध. शिवपिंडीवरील फुलांच्या शेजेचा मिश्रित सुगंध आणि चिदानंद रुपम शिवोहम शिवोहमचा धीरगंभीर नाद. श्रावण सोमवारची उपासाची दुपारी चार वाजताची पंगत म्हणजे आनंदपर्वणी. श्रावण घेवड्याची भाजी. पांढऱ्याशुभ्र वाफेभरल्या भाताच्या मुदीवर पिवळेधम्म वरण आणि त्यावर तुपाची धार. कढी आणि घराघरातून दरवळणारा मऊसुत गरम पोळ्यांचा सुगंध. जोडीला कधी केळाचं शिकरण तर कधी करवंदाचा गुळांबा. दर सोमवारी अशी चविष्ट मेजवानी. श्रावणाशी हे संदर्भ कायमचे जुळलेले. चरैवेती चरैवेती म्हणत सतत पुढे पुढे सरकणाऱ्या काळाच्या ओघात काही संदर्भ गळतात काही नव्याने जोडले जातात. असाच मनाच्या एका कोपऱ्यात दडलेला भराडी गौरीचा संदर्भ. भराडी गौर हा निसर्गपुजेचाच एक प्रकार. श्रावणात उमलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांनी परडीवर ही गौर साकारतात. स्त्रीच्या सौंदर्यासक्त कलागुणांचा आविष्कार घडवणारा हा सण. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. घरात आजी, काकु, आत्या, बहिणी, वहिनी अशा खूप स्त्रिया असायच्या. वेटाळातले संबंधही कुटुंबासारखेच असायचे. त्यामुळे प्रत्येक सणाला उत्सवी स्वरुप यायचं. मोठ्ठी बसकी घरं, घराभोवती खूप फुलझाडं. श्रावणात ती सगळी झाडं बहरायची. निसर्गातल्या प्राणी-पक्षी अशा सगळ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आपली संस्कृती. चित्तवृत्ती प्रफुल्लीत करणाऱ्या या फुलांनाही देवीस्वरुप मानून त्यांची पुजा बांधणारी भराडी गौर. श्रावणात वेटाळातल्या सगळ्या बायका मिळून भराडी गौर साजरी करायच्या. झाडांवरची सगळी रंगीत-गंधीत फुल एकत्रित करून परडीवर शुभचिन्ह रेखली जायची. कधी स्वस्तीक, कधी ओम, कधी गौरी-गणपती, असं बरच काही. त्या परडीवर साकारलेल्या शुभ चिन्हांना देवीस्वरुप कल्पून पुजा बांधली जायची. हळदीकुंकु, नैवेद्य प्रसाद असे सगळे सोपस्कार व्हायचे. मंगळागौरीसारखे खेळ, गाणी या गौरी समोर सादर केली जायची. स्त्रीचं सृजन, नवनिर्मितीची ओढ, या गौरीच्या माध्यमातून व्यक्त व्हायची आणि साकारायची एक उत्तम कलाकृती. निसर्गाच्या वैभवातून साधलेली निसर्गपुजा. तुझे तुलाच अर्पण ही नम्र भावना. या एका भराडी गौरीच्या माध्यमातून किती गोष्टी साध्य व्हायच्या. निसर्गाशी तादात्म्य, कृतज्ञता. सृष्टीतील रस, रंग, गंधाशी परीचय, निसर्गाशी अनोखं नातं, सामाजिक एकोपा, करमणुक आणि बरंच काही. अलिकडे मात्र असे सगळे सण, उत्सव नामशेष होत चालले आहेत. आमची बदलती जीवनशैली, धावपळीचं आयुष्य, जगण्याची बदलती परिमाणं, सणउत्सवांचे बदलते स्वरुप अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. ती अपरिहार्यही आहेत. मात्र त्यामुळे कदाचित आम्ही निसर्गापासून दूर चाललो आहोत. या सगळ्या सणांच्या माध्यमातून निसर्गाशी होणारी आमची ओळख पुसली जाते आहे. पूर्वी निसर्गवाचनाचे वेगळे धडे गिरवायची गरज नव्हती. ऋतूंनुसार सहज उमलणाऱ्या झाडे, वेली फुलांचे रंग-गंध आमच्या संवेदनांमध्ये पक्के रुजले होते. अलिकडे मात्र निसर्गाशी आमची फारकत होत चालली आहे. बाल्कनीत आणि कीचन गार्डनमध्ये वस्तीला असलेला निसर्गच आम्हाला ज्ञात आहे. दर श्रावण सोमवारी पुड्यांमधून विकायला येणाऱ्या बेलाशीच आमची ओळख आहे. श्रावणात सहज उगवणाऱ्या वनस्पती, त्यांचे औषधी उपयोग, त्यांचे उग्र पण हवेहवेसे गंध या सगळ्याशी आम्ही अपरिचित आहोत. निसर्गाची मुक्त उधळण, डांबरी रस्त्यांमध्ये आणि फरशीच्या अंगणामध्ये लुप्त होत चालली आहे. अर्थात संक्रमण हा निसर्गाचा नियम आहे. तरीही ते स्मरणातले रस, रंग, गंध श्रावणाच्या अशा वळणावर खूप खूप मागे नेतात आणि परडीवर सजलेल्या भराडी गौरीच्या आठवणी हळवं करतात इतकंच. | |||
Monday, 25 June 2018
रंग ऋतुंचेस्वाती हुद्दारऋतूंनाही रंग असतात. पिवळा हिरवा वसंत सरला की आग ओकणारा केशरी-लाल ग्रीष्म अवतरतो, आपल्या तप्त स्वभाव धर्मासह. ग्रीष्मातले उष्ण वारेही केशरी रंगात न्हालेले असतात. ग्रीष्मातला दिवस जसजसा वर चढत जातो तसतशी त्यावर लाली चढत जाते. दूरवर आकाशाकडे नजर लाऊन डोळे मिटले तरी डोळ्यासमोर लाल वर्तुळं नाचत राहतात. ग्रीष्मात फुलणारा पळसही केशरीच. पानोपानी बहरणारा गुलमोहोरही लाल-केशरीच. मावळतीला डोंगराआड जाणारे लालबुंद सूर्यबिंब आकाशात लाल-केशरी छटांचे फटकारे मारत जाते, एखाद्या कसबी चित्रकारासारखे. ग्रीष्माच्या उन्हानं उघडे-बोडके झालेले डोंगरमाथे ते लालेलाल आकाश आपल्याभोवती लपेटून घेतात आणि तो लाल रंग पसरत जातो उघड्या माळरानावर, डोंगरदऱ्यांवर, नदी-तलावावर, क्षितिजापर्यंत अथांग पसरलेल्या समुद्रावर. जणूकाही सूर्यानं आकाशात लालकेशरी फटकारे मारून आपला कुंचला या पाण्यात बुडवला असावा. हा लाल रंग साचून राहतो मग पानाफुलांवर, घरादारावर आणि मनांवरही. तडा गेलेली जमीन आणि उंच गेलेली वाळक्या पानांची झाडं अनाथ एकाकी वाटू लागतात. वेध लागतात पाऊसधारांचे. तो येणार म्हणून वाऱ्याचे सांगावे येऊ लागतात. ढग दवंडी पिटतात आणि ग्रीष्माच्या लाहीलाहीनंतर ज्येष्ठाचा हात धरून गर्जत बरसत येणारा वर्षा ऋतू ओंजळीतून निळं चैतन्य घेऊन येतो. निळ्या रेशमी पाऊसधारा बरसतात आणि सगळी सृष्टी निळ्या रंगात रंगून जाते. आभाळं निळंसावळं होतं. आभाळातून बरसणाऱ्या निळ्या जलधारा निळ्या जलाशयात एकरुप होतात. निळ्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि अवघ्या विश्वाला हे निळेपण व्यापून उरतं. सृष्टीलाही वेध लागतात पंढरीच्या निळ्याच्या भेटीचे. निळ्या आभाळाच्या विशाल मांडवाखालून कड्याकपारीतला निळा पाऊस झेलत गळ्यात तुळशीची सावळी माळ घातलेली आणि डोक्यावर सावळी तुळस धरलेली पाऊले पंढरीची वाट चालू लागतात. ओढ असते त्या निळया समचरणांच्या दर्शनाची. सह्याद्रीच्या घाटदार वळणांवर घुमत राहतो निळ्या विठुच्या नामाचा गजर. रंगतो ज्ञानोबांचा हरीपाठ, रंगतात तुक्याचे अभंग इंद्रायणीच्या निळ्या पाण्यानं तारलेले. धुळवड रंगते अबीराची. हिरव्या पाऊलवाटांवरही चढतो रंग निळ्याच्या भक्तीचा. वारकऱ्यांच्या त्या मेळ्यात कोणी असतो नाम्या, कोणी गोरा, कोणी चोखा, कोणी जनाई, कोणी मुक्ताई, सोयराबाई. अवघी संतसज्जनांची मांदियाळी. चंद्रभागेच्या वाळवंटात वाहत्या निळ्या पाण्याच्या साक्षीनं रंगतं रिंगण, घातल्या जातात फुगड्या. हा भक्तीसोहळा बघायला निळे ढग आभाळात गर्दी करतात. टाळ चिपळ्यांच्या ध्वनीला आसमंतातली सौदामिनी साथ देते. एकतारी झंकारते आणि अवघे पंढरपुर भक्तीरंगात न्हाऊन निघते. चंद्रभागेच्या वाळवंटात देहभान विसरून विठ्ठलनामात मी-तू पण सरलेल्या, एकमेकांच्या पायावर डोई ठेवणाऱ्या वारकऱ्यांवर आभाळीच्या निळ्या जलधारा अभिषेक करू लागतात. ज्या पांडुरंगासाठी हा अवघा रंगसोहळा रंगतो आहे, तो पांडुरंगही रुक्मिणीसह या रंगात रंगून जातो. भक्त आणि भगवंत हे द्वैत सरते आणि पांडुरंगाच्या निळ्या प्रभेत अवघे पंढरपूर न्हाऊन निघते. | |||
वडाचा पार
युगानुयुगं उभा आहे तो
गावाच्या वेशीवर
पाराचा परीघ सांभाळत
दरसाल न चुकता येणाऱ्या
लेकीसुनांना सौभाग्याचा वायदा देत
सात फेरे, सात वेढे
कच्च्या सुतात बांधलेले
सात जन्माचे पक्के वादे
दह्यादुधाचा अभिषेक
आंबा आणि नाणी
सोबत गव्हाची रास
त्याबदल्यात त्याच्या पारंब्यांनी
उधळलेले अखंड सौभाग्याचे दान
सौभाग्य???
कपाळी कुंकवाचा मळवट
गळ्याभोवती रुतलेली काळी सर
हातभर हिरवा चुडा
बोटं सोलवटून काढणारी घट्ट जोडवी
सवाष्ण असल्याच्या खुणा अंगाखांद्यावर
त्याखाली लपला जातो
परवाच हातावर उमटलेला
तापल्या सळीचा चुरचुरीत चटका
आणि चुरगळलेलं मनही
कारण ती सवाष्ण आहे
...आणि तिच्या येण्यानं
वर्षभर एकाकी असलेला
त्याचा पारही सवाष्ण झाला आहे
स्वाती हुद्दार
Saturday, 16 June 2018
मल्हारस्वाती हुद्दारआज तो पुन्हा कोसळतोय धुवाधार. उर फुटून दु:ख झरावं तसा. तिच्या विशाल उबदार कुशीत ती सामावून घेते आहे त्याच्यासह त्याचं कोसळणं. तिचं मूक सांत्वन आणि त्याचा आवेगी आकांत.अशा भरून आलेल्या रित्या संध्याकाळी मग एकटेपण अधिकच प्रकर्षानं जाणवू लागतं. हा झरणारा पाऊस कोणाशी तरी शेअर करावासा वाटू लागतो. आजूबाजूला खूप गर्दी आहे चेहऱ्यांची; पण हा कोसळणारा पाऊस मनात रुजावा, असं मृदू मन असलेला एकही चेहरा तिथे नाही. सगळेच चेहरे कोरे. हात सेलफोनकडे वळले. बोटं सवयीनं कॉन्टॅक्ट लिस्ट सर्च करू लागली. मात्र मन एकाही नावाशी थांबलं नाही. कुणाशीच हा पाऊस वाटावासा वाटला नाही. आताशा असं का होतं? हे एकटेपण सगळं विश्व व्यापून पुन्हा दशांगुळे उरतंच. पावसाचा दु:खाचा आवेग आता जरा ओसरला आहे. पाऊसधारांपलीकडच्या अस्पष्ट टेकड्या नजरेच्या टप्प्यात येत आहेत. या टेकड्यांपलीकडे असेल का कुणीतरी पाऊस समजून घेणारा. कदाचित ते गावच असेल पाऊसवेड्या ओलेत्या मनांचं. पाऊसवेड्या मनाची माणसं असली की जमिनीतून तरारून येणाऱ्या हिरव्या अंकुरांसह त्या मनांनाही फुटतात आशाआकांक्षांचे धुमारे. ती वेडी माणसं गाऊ लागतात सृजनाचं गाणं, सुरांच्या हिंदोळ्यावर झोके घेत. ती सुरावट खूप ओळखीची वाटते. अगदी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी. मन आणि कान तृप्त करणारी. जीवनाशी नातं सांगणारी. आभाळातून कोसळणारा पाऊस मग डोळ्यातून झरू लागतो. झरणाऱ्या डोळ्यांमुळे सगळंच अस्पष्ट भासू लागतं. मनात मात्र मल्हारचे सूर घुमू लागतात. सखी सावन आये कंत नैय्या मोरा मन अकुलाए रिमझिम बादर बरसन लागी मोरा मनवा तरसावे युगामागून युगं उलटली. तानसेनचा मल्हार तेव्हापासून श्रांत क्लांत करतोय युगंधरेला. मल्हारच्या सुरावटीत भिजलेला पाऊस कधी झरतो शांत धीरगंभीर स्वरातून, कधी झंकारतो सतारीच्या तारांतून, तर कधी वेड लावतो वेळूच्या बासरीतून. माणसांच्या गर्दीतही एकट्या पडलेल्या या जिवाला हे सूर मग अलगद मिठीत घेतात. हलकेच जोजवतात. सुरांच्या साथीनं पाऊस आत आत झिरपत जातो. अंतर्बाह्य चिंब करतो. बाहेर धारांचा पाऊस आणि आत सुरांचा. ढगांनी झाकोळलेलं आभाळ अलगद मोकळं व्हायला लागलयं. पाऊसधारांनी चिंब झालेली संध्याकाळ सूरमयी झाली आहे. मल्हाराच्या सुरांमध्ये न्हाऊन चिंब झालेल्या सुरावटीत एकटेपणाची भावना विरघळून गेली. लख्ख वीज चकाकली. आपलीच आपल्याला ओळख पटली. युगानुयुगं मीच तर व्यक्त होतेय, कधी धीरगंभीर स्वरातून, कधी सतारीच्या झंकारातून, कधी बासरीच्या सुरावटीतून. आभाळातून वसुंधरेवर अलगद उतरणारी पाऊसधार म्हणाली सो$$$हम. युगानुयुगं छेडलेली मल्हारची सुरावट मीच. जिच्यासाठी कृष्णानं बासरीत श्वास फुंकला ती राधाही मीच. गोकुळही मीच आणि मल्हारच्या हाकेला ओ देत धरेवर कोसळणारा पाऊसही मीच. सोऽऽऽहम. | |||
Wednesday, 2 May 2018
रंगकांड्या
माणसंही असतात रंगीतघासून घासून झिजलेल्या
वापरून वापरून तुटलेल्या
रंगपेटीतल्या रंगकांड्यांसारखी
काही मेणकांड्यांसारखी
कितीही घासली तरी
न उमटणारी
असून नसल्यासारखी
तर काही असतात
तेलकांड्यांसारखी
रंगरेषांच्या उभ्या आडव्या
डार्क फटकाऱ्यांसारखी हटवादी
त्या कौलारू घरात
होती अशीच म्हातारी विरळ केसांची
काटेसावरीच्या पुंजक्यासारखी पांढरी
होता एक म्हातारा
खोकून खोकून छातीचा खोका झालेला
गडद होत जाणाऱ्या धुसर संध्याकाळसारखा
होता एक कर्ताही
ओढगस्तीचं जीणं जगताना
पोपडे उडालेल्या रंगहिन भिंतीसारखा
एक होती घरधनीण
शेणानं लिंपलेल्या अंगणात रेखलेल्या
हळदीकुंकवाची बोटं ल्यालेल्या
सुबक रांगोळीसारखी
आणि होती काही चिल्लीपिल्ली
विषामृत म्हणत
अंगणभर उंडारणारी
कोवळया हिरव्या लुसलुशीत पालवीसारखी
रंगकांड्यांचा डबा घेऊन
डोंगर-दऱ्या, सूर्य झाडं रेखणारी
त्या चित्रांमध्ये हवे ते रंग भरणारी
केशरी, हिरवा, निळा, लाल
कारण त्यांच्या लेखी नव्हतेच लेबल कुठल्याही रंगावर
जातीचे, धर्माचे, राजकारणाचे
एक दिवस त्यांच्यातल्या लहानग्याने
पांढऱ्या कागदावर एक फुलपाखरू रेखले
त्याच्या नाजुक इवल्याला पंखांमध्ये
रंगपेटीतले झाडून सगळे रंग भरले
आणि काय आश्चर्य
ते फुलपाखरू चक्क आकाशात उडाले
त्या रंगपेटीमध्ये नव्हतीच
सोनेरी रंगाची रंगकांडी
त्यामुळे तिथल्या कुणाच्याच मनाला
सोनेरी स्वप्नं शिवलीच नाहीत
मात्र त्या घराला होता
एक अंधारा माळा
रंगकांड्यातल्या काळ्या रंगकांडीसारखा
आणि त्या माळ्यावरच्या मळकट गाठोड्यात
बंदिस्त होती त्या सगळ्यांची नशीब
रंगकांड्यांच्या कागदी खोक्यातल्या
कप्प्याकप्प्यांमध्ये दाटीवाटीनं
घुसडलेल्या रंगकांड्यांसारखी
सटवाईनं पाचवीलाच त्यांच्या कपाळावर कोरलेली
त्या सटवाईच्या मनाचा रंग कोणता असेल?
गर्द जांभळा की करडा?
स्वाती हुद्दार
Tuesday, 10 April 2018
वैशाखवणवास्वाती हुद्दाररामजन्माच्या सुंठवड्याची तिखट-गोड चव जिभेवरून ओसरता ओसरताच वैशाखाची काहिली जाणवू लागते. रामजन्म आणि हनुमानजन्माची धामधुम आटोपली की एक प्रकारचं रितेपण भरून राहत वातावरणात आणि अंगणभर पसरलेले उन्हाचे कवडसे अधिकच रुंदावतात. निष्पर्ण बुंध्यातून पाझरणारं रखरखत उन्ह अधिकच झोंबु लागतं. सकाळचे दहा वाजून गेले की वळणावळणांचे नागमोडी रस्ते एकटेच वाट चालतात. चौकातल्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत असलेल्या रसवंतीवरच्या घुंगुरमाळांचा नाद लयीत घुमत राहतो. त्याच्या बाजुला जमिनीवरच पथारीवर विकायला ठेवलेले कलिंगड, खरबुज डोळ्यांना गारवा देतात. कलिंगड-खरबुजाच्या गर्दीत ते विकणारा मोठ्ठ्या पोटाचा भैय्या मात्र अंगावरचा पंचा लपेटून मस्त घोरत असतो. एवढ्या उन्हात गिऱ्हाईक फिरकणार नाही, अशी जणू त्याला खात्रीच असते. बाजुच्या भाजीवालीनं भाजी सुकून जाऊ नये म्हणून त्यावर ओलसर पोते झाकले असते. आणि सकाळीच बांधून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेण्यात ती मग्न असते. उन्हाच्या तडाख्याने भांबवलेली पाखरे झाडाच्या आडोशाला येऊन उगाचच चिवचिवाट करीत असतात. झाडाच्या बुंध्याशी अंग सैल सोडून गाय रवंथ करीत पहुडली असते. आणि तिचे वासरू तिला मधुन मधुन ढुशी मारत असते. या सगळ्यांचं हे एकत्र कुटुंब उन्हाच्या झळांशी झिम्मा खेळत असतं. जीवनातल्या उन्हसावलीचे वेगळे धडे या मंडळींना गिरवण्याची गरजच नसावी. ऋतूनुसार आपल्या जीवनशैलीत आपसुकच बदल करण्याचं कसब निसर्गानचं त्यांना शिकवलं असतं.चौकातून वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या कोपऱ्यावर स्वत:च्याच रिक्षात घामाच्या धारांनी नहात रिक्षेवाल्यानं मस्त ताणून दिली असते. वस्तीतल्या घरांच्या अंगणातले वाळवणाचे पदार्थ आता समेवर आले असतात. कापसासारख्या केसांची म्हातारी हातात काडी घेऊन खाटेवर बसून त्या वाळवणाची चौकीदारी करत असते. घरातलं लाडावलेलं मांजर म्याव म्याव करीत तिच्या पायाशी घुटमळत असतं. अंगणातला निष्पर्ण चाफा फांदोफांदी बहरला असतो. उन्हाच्या एवढ्या तडाख्यातही वाळवणातला एखादा पापड तरी पळवता यावा, म्हणून दोन कावळे कौलावर रेंगाळत असतात. सारखं बसून बसून म्हातारीला डुलकी येते आणि तेवढीच संधी साधत कावळ्यांची जोडी पापड पळवण्यासाठी खाली उतरते, मात्र म्हातारीच्या पायाशी बसलेलं खाल्ल्या मिठाला जागणारं ते मांजर आपली शेपटी पिंजारत फिस्कारतं. आणि म्हातारीची डुलकी जाते. ती काठी उगारते. कावळे पुन्हा कौलांचा आधार घेतात, दुसऱ्या संधीची वाट पाहात. चैत्रातून वैशाखाकडे होणारी ही ऋतूची वाटचाल चैतन्याशी फारकत घेऊनच पुढे जाते. चैत्र आणि ज्येष्ठाच्या समेवरचा वैशाख कायमच सगळ्यांपासून वेगळा, घरातल्या एखाद्या किरकिऱ्या नकोशा मुलासारखाच. चैत्राचं नवकोरं उन्ह वैशाखात चटके देऊ लागलेलं असतं आणि ज्येष्ठाच्या धारा अजून खूप दूर वेशी बाहेर असतात. चैत्रपालवीचं लुसलुशीत पण थोडं करपलं असतं. गंधभारला मोगराही काहीसा मलूल भासतो. जमिनीवरच्या भेगा शतजन्माचे दु:ख एका क्षणात व्यक्त करतील, अशा आवासलेल्या असतात. उंचचउंच गेलेल्या झाडाच्या शेंड्यावरून परावर्तीत होणारे तेजस्वी सूर्यकिरण अंगणातल्या विहीरीत थेट झेपावत विहीरीचे पाणी घटाघटा पिऊन टाकतात. एरवी जीवनाने ओतप्रोत असलेल्या विहीरीचे एकेक आवर्त उलगडत जाते. खिराडीवरून खडखडत आंत आंत उतरत जाणारा दोरखंड थेट तळाशी भिडतो. आणि बादलीच्या पाण्याशी होणाऱ्या स्पर्शाचा डुब्ब असा ध्वनी विहीरीतून गोल घुमत वर येतो. तेव्हा असं भासतं की जणू वास्तुपुरुषानं तथास्तु म्हटलयं. मनाच्या खोल तळाशी पोहचून नितळ भावनांना स्पर्शणारा दोर असेल का कुणाकडे? त्या दोराला लगडून अलगद उतरावं मनात आणि उखडून टाकावेत सगळे तण दु:खाचे, अस्वस्थतेचे. मनातल्या वैशाखाच्या लाहीलाहीनं मनाचेही पापुद्रे सोलवटून निघालेले असतात. अलगद घालावी त्यावर हळूवार आपुलकीची फुंकर. काढून टाकावा सगळा अपमानांचा गाळ. हे सगळे सोपस्कार आटोपले की मनालाही फुटतील नवे झरे सुखाचे, समाधानाचे. अशा श्रांत तृप्त मनात आपणच पाहावं आपलं हसरं प्रतिबिंब आणि घालून बघावी एखादी हळूवार हळवी साद. मनाच्या डोहावर उठतील आनंदाचे तरंग आणि ऐन वैशाखातही अवघं जगणंच होईल आनंदाचं गाणं. | |||
मातृ देवो भव !
स्वाती हुद्दार
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी
पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतो
मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थित्यंतर घडवून आणणारी लोभस घटना. मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. प्रचंड वेदना आणि शारीरिक स्थित्यंतरातून एका जिवातून दुसरा जीव जन्माला येत असतो. मरणांतिक कळा सोसून स्त्री बाळाला जन्म देते आणि त्यानंतर तिचे वात्सल्यमूर्तीत रूपांतर होते. त्या नवमातेच्या सगळ्या भावभावना बाळाभोवती गुंतून जातात. आपले बाळ निरोगी असावे, सुदृढ असावे, असे तिला वाटते, पण त्यासाठी ती गरोदर असतानापासूनच पूर्वतयारी करायची असते, याची जाणीव तिला नसते. आईच्या पोटी जन्माला येणारी उद्याची पिढी तेव्हाच सशक्त होईल, जेव्हा आई सशक्त असेल. मात्र, भारतात गरोदर मातांच्या पोषणाविषयी आजही पुरेशी जागरूकता नाही. परिणामी अशक्त, रोगांनी ग्रस्त आणि कुपोषित बाळ जन्माला येण्याचे प्रमाण भारतात आजही बरेच आहे.
जंगोराईताड आदिवासी विकास संस्था ही समाजाच्या भल्यासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणारी एक सामाजिक संस्था. 2014 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेने स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन इटेवाही या गावात शौचालयांचे निर्माण केले. पेंढारी या गावात पथदिवे लावून ते गाव प्रकाशमान केले. गरीब आणि सामान्यांना आरोग्य खर्च परवडावा या उद्देशाने जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले. गोंदिया जिल्ह्यातील बारुंदा या गावी कुपोषण निर्मूलन शिबिर घेण्यात आले. गेल्या चार वर्षांत अशी विविध सामाजिक कार्ये करीत असताना संस्थेचे अर्ध्वयू प्रबोध वेखंडे यांना बालकांमधील कुपोषणाचे मूळ हे कुपोषित गरोदर मातांमध्ये असल्याचे लक्षात आले आणि संस्थेने त्या क्षेत्रातही भरीव कार्य करण्याचे ठरवले आणि मातृत्वाला सलाम करण्याचा, मातृत्वाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न नागपुरात 2016 पासून सुरू झाला वात्सल्यम् या उपक्रमाच्या माध्यमातून.
निम्न आर्थिकस्तरातील नागरिकांना आजही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावते. अशावेळी जेव्हा निसर्गनियमानुसार त्या महिलांच्या वाट्याला गरोदरपण येते, तेव्हा पुरेशा आहाराअभावी, योग्य औषधोपचाराअभावी कितीतरी महिलांचा गरोदरपणातच मृत्यू होतो. गरोदरपणात त्यांनी कसाबसा तग धरला तर पुढे जन्माला आलेले बाळ इतके अशक्त असते, की बालमृत्यू हे अटळ सत्य ठरते. त्यातूनही जी बाळं तग धरतात, ती कुपोषित असतात. त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ खुंटलेली असते, परिणामी भारताची भावी पिढी अशक्त निपजते. भारताला भावी काळात सुदृढ आणि सशक्त बनवायचे असेल तर गरोदर मातेचे पोषण महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन वात्सल्यम् या प्रबोध वेखंडे यांच्या उपक्रमाने गरोदर मातांच्या पोषणाचे असिधाराव्रत स्वीकारले. त्यांना भक्कम साथ लाभली डॉ. स्मिता चतुर्वेदी आणि नमिता पारखी यांची. सुदृढ समाजाच्या उभारणीत हातभार लावण्याचा हा उपक्रम या दोघींनी आपल्या सामर्थ्याने लीलया पेलली आणि आश्चर्यकारक परिणाम दिसू लागले.
या उपक्रमाची लाभार्थी निम्न आर्थिकस्तरातील महिला नेहा आत्राम हिने नुकताच दोन मुली आणि एक मुलगा अशा तिळ्यांना जन्म दिला. गरोदर असल्यापासून नेहाची काळजी वात्सल्यम्च्या माध्यमातून घेतली जात होती. नेहाची तिन्ही मुले दोन किलोंपेक्षा अधिक वजनाची आणि स्वस्थ आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, असे डॉ. स्मिता चतुर्वेदींने सांगितले. जेव्हा तिळे जन्माला येतात, तेव्हा त्यांचे वजन एक ते दीड किलोपेक्षा जास्त नसते. मात्र, वात्सल्यम्च्या वात्सल्याने नेहाची बाळं चांगल्या वजनाची जन्माला आली.
2016 साली सुरू झालेल्या या उपक्रमात पहिल्या वर्षी अकरा गर्भवतींना प्रोटिन, व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि इतर पूरक औषधे, आवश्यक तपासण्या आणि मुख्य म्हणजे मानसिक आधार अशा सुविधा पुरविण्यात आल्या. सोबतच त्यांना पोषण आहाराचे महत्त्व सांगितले गेले. त्यांचा बाळंतणाचा खर्चही संस्थेच्या माध्यमातूनच करण्यात आला. 2017 साली म्हणजे उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षी तेरा महिलांची काळजी अशाच पद्धतीने घेण्यात आली आणि यंदा 2018 साठी वीस गर्भवती महिलांच्या बाळंतपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वात्सल्यम्च्या माध्यमातून झालेल्या एका बाळंतपणात जन्माला आलेल्या एका बाळाचे दोन्ही पाय जुळलेले होते. त्या गरीब मुलाला भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून त्याचे पाय वेगळे करण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च वात्सल्यम्ने केला आणि पुढे वर्षभरही त्याच्या औषधोपचाराचा खर्च वात्सल्यम्च्याच माध्यमातून सुरू आहे. त्या बाळाला स्वत:च्या पायांवर उभे राहिलेले पाहिले, तेव्हा सगळ्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले, असे डॉ. चतुर्वेदी म्हणाल्या.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे
इदं न मम या वृत्तीने समाजासाठी झटणारी अशी माणसे आणि संस्था म्हणजे आभाळाचे खांब असतात. त्यांच्या दातृत्वाचा वाण तुम्हाआम्हालाही लाभावा आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने "सर्वेपि:सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया' अशी अवस्था प्राप्त होऊन भारत सुजलाम् सुफलाम् व्हावा, या सदिच्छेसह!
Saturday, 17 February 2018
ऍन ते परवानास्वाती हुद्दारसामान्य जनता सत्तापिपासुंचे अनन्वित अत्याचार नाईलजास्तव मुग गिळून सहन करीत राहिली. त्यात सर्वाधिक भरडली गेली स्त्री. कुठल्याही देशात, कुठल्याही समाजात. तिला आवाजच नसला तरी मन मात्र असतं आणि ते आतल्याआत आक्रंदत असतं. कधीतरी ते कोणाच्याही नकळत व्यक्त होण्याची बंडखोरी करीतच असतं. अशीच व्यक्त झाली नाझींच्या अत्याचाराला घाबरून अज्ञातवासात गेलेली फ्रन्क कुटुंबातली ऍन. तिच्या डायरीच्या माध्यमातून. साल होते 1942. आणि अशीच व्यक्त झाली परवाना डेबोरा एलीसच्या शब्दांमधून. साल होते 2000. ऍन होती अवघी 13 वर्षांची आणि परवाना तर केवळ 11 वर्षांची. 1942 ते 2000 यामध्ये आणि आगेमागेही. अगणित असंख्य कहाण्या आहेत. अशाच किंवा यापेक्षाही भयंकर. व्यक्त झालेल्या आणि अव्यक्तही.पाषाणयुगापासून ते विज्ञानयुगापर्यंतचा मानवाचा प्रवास. अचंबित, स्तंभित करणारा. कधीतरी गुहांमध्ये वास्तव्य करणारा मानव आता संगमरवरी घरांमध्ये राहतो. भुकेपोटी श्वापदांची शिकार करून कच्चे मांस भक्षण करणारा मानव आता स्वादिष्ट, रुचकर पदार्थ सेवन करतो आणि खाणाखुणांनी मुक संवाद साधणारा मानव आता साहित्य प्रसवतो. तत्वज्ञानावर चर्चा करतो. सभा-संमेलने गाजवतो. हे सगळे बदल घडून यायला युगे लोटावी लागली. हा मानवाचा माणुसपणाकडे होणारा प्रवास होता, असे मात्र म्हणता येणार नाही. कारण या प्रवासात मानव युद्ध विसरला नाही. त्याने हिंस्त्रपणाचा त्याग केला नाही. तो शिकार विसरला नाही. फरक इतकाच. आधीची शिकार, आधीची लढाई त्याच्या पोटाच्या भुकेसाठी होती आणि आताची लढाई महत्त्वाकांक्षेच्या भुकेसाठी आहे. स्वार्थासाठी आहे, साम्राज्य विस्तारासाठी आहे. जातीसाठी आहे. धर्मासाठी आहे. मुठभर साम्राज्यवाद्यांसाठी, धर्मांधांसाठी भरडली गेली मात्र सामान्य निरपराध जनता. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होणारी टोळीयुद्ध असोत. मुघल काळातील भारताला छिन्नविछिन्न करणाऱ्या शाहांच्या लढाया असोत, पहिले महायुद्ध असो, वंशभेदापोटी झालेला अनन्वित छळ असो की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी हिटलरने केलेला ज्युंचा छळ असो. भारत-पाक फाळणी दरम्यान वाहिलेले रक्ताचे पाट असोत, आयाबहिणींच्या अब्रुची वेशीवर टांगलेली लक्तरे असोत, अलिकडे मध्य पूर्व आशीयात तालिबान, इसिसच्या माथेफिरुंनी केलेली छळवणुक असो, म्यानमारमध्ये लष्करी सत्तेने केलेले सामान्यांचे दमन असो की आजघडीला सुरू असलेला रोहिंग्याचा प्रश्न असो, की उत्तर कोरीयाच्या माथेफिरु किम जॉंगच्या अण्वस्त्रांच्या भयावह चाचण्या आणि त्या दडपणाखाली जगत असलेला जनसमुदाय असो ( ही यादी बरीच लांबवता येईल) सत्ताधाऱ्यांनी माणुसकी नेहमीच पायदळी तुडवली आहे. स्वत:चा आवाजच नसलेली सामान्य जनता सत्तापिपासुंचे अनन्वित अत्याचार नाईलजास्तव मुग गिळून सहन करीत राहिली. त्यात सर्वाधिक भरडली गेली स्त्री. कुठल्याही देशात, कुठल्याही समाजात. तिला आवाजच नसला तरी मन मात्र असतं आणि ते आतल्याआत आक्रंदत असतं. कधीतरी ते कोणाच्याही नकळत व्यक्त होण्याची बंडखोरी करीतच असतं. अशीच व्यक्त झाली नाझींच्या अत्याचाराला घाबरून अज्ञातवासात गेलेली फ्रन्क कुटुंबातली ऍन. तिच्या डायरीच्या माध्यमातून. साल होते 1942. आणि अशीच व्यक्त झाली परवाना. डेबोरा एलीसच्या शब्दांमधून. साल होते 2000. ऍन होती अवघी 13 वर्षांची आणि परवाना तर केवळ 11 वर्षांची. 1942 ते 2000 यामध्ये आणि आगेमागेही. अगणित असंख्य कहाण्या आहेत. अशाच किंवा यापेक्षाही भयंकर. व्यक्त झालेल्या आणि अव्यक्तही. इसवीसन 1942. दुसऱ्या महायुद्धाचा ऐन भराचा काळ. आताचे नेदरलॅंड आणि तेव्हाचे हॉलंडही नाझींच्या अनन्वित छळाला बळी पडले होते. राजधानी ऍमस्टरडॅमपर्यंत छळाचा वणवा पसरला होता. फ्रॅंक या चौकोनी सुखवस्तु कुटुंबालाही अज्ञातवासात जाणे भाग पडले. फ्रॅंक कुटुंबातील लहान मुलगी ऍन हिने वाढदिवसाला भेट मिळालेल्या डायरीत रोजनिशी लिहिणे सुरू केले. 14 जुन 1942 रोजी ऍनने लिहिणे सुरू केलेल्या डायरीत शेवटची नोंद 1 ऑगस्ट 1944 या दिवशीची आहे. त्यानंतर अज्ञातवासातले फ्रॅंक कुटुंब पकडले गेले. ऍन आणि तिची मोठी बहीण मार्गारेट यांना बर्जेर बेल्सन इथल्या छळ छावणीत ठेवण्यात आले. तिथेच या दोघी बहिणींचा मार्च 1945 मध्ये दुर्दैवी मृत्यु झाला. ऍनला छळछावणीत काय सोसावे लागले हे कळायला मार्ग नाही कारण तिथे ती रोजनिही लिहू शकली नाही. मात्र त्या छळाची कल्पना करता येते. कारण छळछावणीत अवघ्या 7 महिन्यातच ऍनचा मृत्यू झाला. अज्ञातवासातल्या दिवसांचे अत्यंत जिवंत वर्णन ऍनने रोजनिशीत केले आहे. आपण कधीही पकडले जाऊ ही कायमची दहशत. सतत सुरू असलेला बॉम्बचा वर्षाव. त्याची सुचना देणारा भयावह सायरन. शाळा बंद, मित्रमैत्रिणी नाहीत. ठरावीक साचेबद्ध जीवन आणि उपलब्ध असलेले जेवण. एकच समाधान. सगळे कुटुंब एकत्र असण्याचे आणि अजून तरी जिवंत असण्याचे. थोडक्यात मृत्युच्या छायेतले 2 वर्षाचे बंदिस्त जगणे. मुळातच परिपक्व असलेली ऍन या दोन वर्षात अधिकच परिपक्व होत गेली. मानवी भावभावनांकडे, स्वत:च्या गुणदोषांकडे त्रयस्थपणे पाहण्याची कला तिला वयाच्या तेराव्या वर्षीच प्राप्त झाली. रोजनिशी लेखन हा तिचा विरंगुळा होता. एखाद्या जिवाभावाच्या सखीशी संवाद साधावा, अशा पद्धतीने ऍन या रोजनिशीत व्यक्त होत गेली. दोस्त देशांच्या फौजा पोहोचल्या आहेत आणि लवकरच आपली इथून सुटका होणार आहे, अशी आशा करीत असतानाच एक दिवस ही सगळी मंडळी पकडली गेली आणि महायुद्ध संपले तेव्हा केवळ ऍनचे वडील जिवंत उरले. त्यांनी पुढे ऍनची डायरी प्रकाशित केली. ज्यू म्हणून जन्माला येणे हा एकमेव गुन्हा केलेल्या अगणित ज्यूंच्या हालअपेष्टांची मूक कहाणी ऍनची ही डायरी सांगते. इसवीसन 1992. सोव्हिएत रशीयाचे अफगाणिस्तानातले अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर उदय झाला तालिबानी राजवटीचा. शरयतीच्या नावाखाली तालिबानींनी अफगाणी जनतेचे जगणे नकोसे केले. कधीतरी सुजलाम सुफलाम असलेला अफगाणिस्तान आता उरला एक उद्धवस्त खंडहर. मोठमोठी विद्यापीठ, सुंदर इमारती यांच्या जागी दिसायला लागले केवळ मातीचे ढिगारे. केव्हाही होणारे बॉम्बवर्षाव. तालिबानींची दंडुकेशाही, प्रेतांचा खच. त्यावर ताव मारणारे भटके कुत्रे आणि गिधाडे. याच पार्श्वभुमीवर परवानाची कहाणी उलगडत जाते. परवानाच्या कुटुंबात ते चौघे बहीणभाऊ आणि तिचे अब्बु अम्मी. एक सुशिक्षित कुटुंब. मात्र या सगळ्या पडझडीत कुटुंब बेघर झाले. परवानाच्या अब्बुंचा एक पायही बॉम्बस्फोटात निकामी झाला आणि सुशिक्षित अब्बुंवर बाजारात बसून लोकांची पत्रे वाचून आणि लिहून दाखवून घरात चूल पेटवण्याची वेळ आली. एक पाय नसलेल्या अब्बुंचा आधार बनली परवाना. एके दिवशी दुर्दैवाने आणखी दशावतार दाखविले आणि अब्बुंना तालिबानी पकडून घेऊन गेले. घरात चुल पेटण्याचा प्रश्न उभा राहिला आणि परवानाला कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी तिचे सुंदर केस कापून मुलगा बनविण्यात आले. मुलाचे रुप धारण केलेल्या परवानाच्या शरीरात मात्र सृजनाची ओढ असलेले मुलीचेच हळवे, सुकोमल मन जिवंत राहिले. सगळ्यांचे पोट भरण्याच्या कर्तव्यात तिने कसूर केली नाही. त्यासाठी अगदी हाडांची तस्करीही केली. दोन पैशासाठी हाडांची तस्करी करणाऱ्या परवानाने काळ्या खिडकीतल्या कधीही न पाहिलेल्या मैत्रिणीसाठी अफगाणिस्तानातल्या उजाड भुमीवर एक इवलेसे रोप रुजवले. परवानाचे पुढे काय झाले माहिती नाही. मात्र तिने रुजविलेले ते रोपटे बॉम्ब वर्षावाने वैराण झालेल्या भुमीत रुजले. पाकिस्तानातील अफगाण निर्वासितांच्या छावणीत द ब्रेड विनरच्या लेखिका डेबोरा एलिस यांना अशा अनेक कहाण्या दिसल्या. अनेक परवानाही सापडल्या. प्रत्येकीची कथा वेगळी असेलही. कथेचा शेवट मात्र सारखाच दुर्दैवी. स्त्रीच्या लेखी युग बदलले असेल. मात्र दुर्दैवाचे दशावतार प्रत्येक युगात सारखेच. कधी ती अग्नीपरीक्षा देणारी सीता असते, कधी भरसभेत विटंबना होणारी द्रौपदी असते, कधी ऍन असते तर कधी परवाना असते. युद्ध पुरुषांचे असते. पराजित मात्र स्त्री होते. | |||
Wednesday, 14 February 2018
आता तो येत नाहीस्वाती हुद्दारसंध्याकाळची वेळ. सेलफोनची रिंग वाजली. तिचा अंदाज खरा होता. फोन त्याचाच होता. तिनं फोन घेतला."मी ऑफीसच्या खाली उभा आहे. ये खाली. चहा घेऊया.' "नको, मी मीटिंगमध्ये आहे.' "काही हरकत नाही. उद्या येतो.' तिनं नाखुशीनंच हो म्हटलं आणि आता उद्या न भेटण्याचं काय कारण सांगायचं, याचा मनोमन विचार करू लागली. हा संवाद नेहमीचाच. तिचं भेट टाळणं आणि त्याचं न कंटाळता पुन्हा पुन्हा भेटायला येणं. अलीकडे तिला कुणाशीच बोलणं नको वाटायचं. कुणात मिसळणं तिनं सोडूनच दिलं होतं. किती दिवसांत काही नवं लिहायला तिनं पेनही हातात घेतला नव्हता. तिनं स्वत:भोवती एक कोश निर्माण केला होता. बाकी जगाला तिच्या या अवस्थेशी काही देणंघेणं नव्हतं. तिच्या आजूबाजूच्या जगाचं रहाटगाडगं व्यवस्थित सुरू होतं. त्यानं मात्र तिला यातून बाहेर काढण्याचं मनोमन ठरवलं होतं. तिला रोज फोन करणं, जमेल तेव्हा भेटायला जाणं, त्यानं सुरूच ठेवल होतं. तिची न भेटण्याची कित्येक खोटी कारणं पचवूनही तो येतच राहिला. सतत. अविरत. कधी सुरू झाली ही जगावेगळी विलक्षण मैत्री? नेमकं आठवत नाही; पण तिनं सहज कागदावर खरडलेली दोन-चार अक्षरं त्यानं वाचली आणि तो फिदा झाला. तो स्वत: प्रथितयश साहित्यिक होता. त्याच्या शब्दांमागे प्रचंड साधना होती. आयुष्याच्या भट्टीत तावूनसुलाखून निघालेल्या शब्दांचं संचित त्याच्या साहित्यात जागोजागी विखुरलं होतं. जागतिक साहित्याचा त्याचा अभ्यास त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असे. ती मात्र स्वान्त सुखाय काहीतरी खरडायची आणि मनात आलं तर ते कागद चुरगळून फेकूनही द्यायची. असंच काही त्यानं वाचलं आणि तिला लिहितं करण्याचं त्यानं ठरवलं. हळूहळू त्यांच्या साहित्यिक चर्चा रंगू लागल्या. वाचन, लेखन, चर्चा आणि चहा. चहा, हो त्याला लेमन टी आवडायचा. दिवसेंदिवस त्यांची गप्पाष्टक रंगायची. साहित्यिक गप्पांबरोबर ती दोघं त्यांची सुखदु:खही वाटून घेऊ लागली. घट्ट विणींचं अतूट नातं त्यांच्यात निर्माण झालं. एक निनावी नातं. निरपेक्ष नातं. राग-लोभ, अपेक्षांच्या पलीकडचं. एक अक्षर नातं. दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे गेली. दोघांच्याही जीवनात अनेक चढउतार आले. दोघेही एकमेकांबरोबर उभे होते. मात्र तिच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली न कळे. तिच्या संसारात संकटांची मालिकाच उभी राहिली आणि मुळातच संवेदनशील असलेली ती कोलमडली. संकटांशी लढता लढता विझत गेली. रोजचं रहाटगाडगं सुरूच होतं, कर्तव्य म्हणून ती सगळं पार पाडत होती. ती मात्र त्यात कुठेच नव्हती. मैत्र जुळले तेव्हापासून तिच्या प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी तो हुकमाचा एक्का म्हणून कायम उभा होता. ती मात्र थकली होती. तिला कोणाचीच सहानुभूती नको होती. तिला कुणाशीच बोलावसं वाटेना. अगदी त्याच्याशीसुद्धा. त्याला हे कळत होतं. तिचं त्यालाही टाळणं त्याला उमजत होतं. तरीही त्यानं त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. तिला यातून बाहेर काढायचंच, असा त्यानं मनोमन निश्चय केला आणि तो येत राहिला... ...आणि एक दिवस अचानक त्याचं येणं बंद झालं. आठवडा, पंधरा दिवस...जवळपास महिना. तो आलाच नाही. त्याचा फोनही नाही. त्याचं येणं नको आणि त्याला भेटणंही नको, असं वाटत असतानाही ती त्याची वाट बघत होती. शेवटी न राहवून तिनं फोन केला. फोनवर एक अपरिचित आवाज. तिनं त्याची चौकशी केली. त्या अपरिचित आवाजानं तो आजारी असल्याचं सांगितलं. तिला स्वत:चाच राग आला, लाजही वाटली. तो बरा झाला की आता त्याला दुखवायचं नाही. पुन्हा आधीसारख्या खूप गप्पा मारायच्या. खूप वाचायचं, लिहायचं आणि त्याच्याबरोबर टपरीवर जाऊन लेमन टी ही घ्यायचा. तिनं मनाशी पक्क ठरवलं. ती एक दिवसाआड फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागली. प्रत्येकवेळी कुणीतरी तिसरीच व्यक्ती फोनवर... आणि तब्येतीविषयी काहीतरी गंभीर. ...आणि एक दिवस तो गेल्याची बातमी. ती मुकी. संवेदनाहीन. अजूनही रोज सूर्य पश्चिमेला कलतो. संध्याकाळ झाडांवर उतरते. मात्र तो येत नाही. त्याचा फोनही येत नाही. | |||
Tuesday, 23 January 2018
काही सुखद...स्वाती हुद्दारमकरसंक्रांत ही संक्रमणाची म्हणजे बदलाची द्योतक आहे. संक्रांतीनंतर सृष्टीतही अनेक सुखावह बदल होतात. गारठा कमी होतो. शिशिरामुळे उघडेबोडके झालेल्या वृक्षांवर वसंत पंचमीपासून कोवळी लुसलुशीत पालवी दिसू लागते. आंब्यावर मोहोराचा फुलोरा डुलू लागतो. रोपट्यांवर रंगीबेरंगी फुलांची नजाकत सजते. थंडीमुळे सुस्तावलेली सृष्टी पुन्हा उभारी घेते.यंदा हे संक्रमण समाजातही दिसले. विशेषत: महिला विश्वात अनेक चांगले बदल घडून आले. भारताला महिला संरक्षणमंत्री लाभल्या आहेत. भारताच्या पाकिस्तान आणि चीन या दोन्ही सीमांवर तणाव असताना एक महिला संरक्षणमंत्री ती परिस्थिती सुयोग्यपणे हाताळते आहे, ही भारतीय महिला विश्वासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अशातच निर्मला सीतारामन यांनी 17 जानेवारी रोजी सुखोई 30 एमकेआय या विमानातून अवकाशात भरारी घेतली आणि भारताच्या सैनिकी इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. या महिला संरक्षणमंत्र्यांच्या कर्तृत्वाने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. हरियाना हे स्त्रीभ्रूणहत्येसाठी कुप्रसिद्ध असलेले राज्य आहे. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2017 मध्ये मुलींचा जन्मदर येथे प्रथमच 900 च्या पुढे गेला आहे. हरियानातील 17 जिल्ह्यांमध्ये हजार मुलांमागे स्त्री जन्मदर 914 असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेटी बचाओव-बेटी पढाओ या अभियानाचे हे यश आहे. असेच म्हणावे लागेल. हरियानातील कुठल्याही जिल्ह्यात मुलींचा जन्मदर 880 पेक्षा कमी नाही. हे अत्यंत सकारात्मक असे चित्र आहे. 2017 मध्ये हरियानामध्ये 5.09 लाख मुले जन्माला आली, त्यापैकी 2.66 लाख मुले आहेत आणि मुलींची संख्या तब्बल 2.43 लाख इतकी आहे. बेटी बचाओ अभियानाच्या माध्यमातून समाजजागृती आणि काही कायदेशीर कारवाई करीत स्त्री जन्मदराच्या बाबतीत सकारात्मक बदल हरियाणामध्ये दिसून आले. महिला हक्कांना डावलणारा देश अशीच सौदी अरबची ओळख आहे. महिलांचे हक्क त्यांच्या भावभावना सौदीमध्ये बुरख्याआड दडपल्या जातात. अलीकडे मात्र सौदी महिलांच्या हक्काविषयी चांगली जागृती झाल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते आहे. काही दिवसांपूर्वी सौदीतील महिलांना कार चालविण्याची परवानगी इथल्या शासनाकडून देण्यात आली, एवढेच नव्हे तर खास महिलांसाठी कारची शोरूमही उघडण्यात आले आणि आतातर चक्क सौदीतील महिलांना स्टेडियममध्ये जाऊन पुरुषांची फुटबॉल मॅच पाहण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. सौदीच्या इतिहासात अगदी प्रथमच किंग अब्दुल्ला स्टेडियममध्ये पुरुषांच्या फुटबॉल मॅचला सौदी महिलांनीही प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. आपल्या कुटुंबीयांसमवेत आलेल्या या महिलांचे इथे प्रवेशद्वारावर स्वागतही करण्यात आले. मोकळ्या मैदानाच्या स्टेडियममध्ये बसून मॅच पाहणे हे किती सुखद आणि आल्हाददायक आहे, हे सौदीच्या महिलांनी प्रथमच अनुभवले. सौदीसारख्या कर्मठ देशात अलीकडे होत जाणारे हे सकारात्मक बदल प्रगतिशील प्रवृत्तीचे निदर्शक आहेत. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सहिष्णुवृत्तीचा हा परिपाक आहे. घरात आणि कामाच्या ठिकाणीही स्त्री-पुरुष भेदभाव ही सामान्य बाब आहे. महिलांना कामाच्या स्वरूपात, वेतनाच्या स्वरूपात नेहमीच पुरुषांच्या तुलनेत डावलले जाते. आणि जगभर महिलांनीही आजवर हे गृहीतच धरले होते. आज मात्र एका पत्रकार महिलेने याविरुद्ध बंड पुकारले आहे. बीबीसी या जगप्रसिद्ध वृत्तसेवेच्या चीनमधील संपादक कॅरी ग्रेसी यांनी आपल्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 30 वर्षांपासून बीबीसीच्या सेवेत असलेल्या कॅरी यांनी राजीनामा देताना एक खुले पत्र लिहून स्त्री-पुरुष वेतनामधील भेदभावाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. कॅरी म्हणतात, या संस्थेत दीड लाख पाउंडपेक्षा अधिक पगार असणाऱ्यांमध्ये दोन तृतीयांश पुरुष आहेत. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, या न्यायाने कॅरी यांची नोकरी गेली असली तरी स्त्री-पुरुष भेदभावाचा महत्त्वाचा विषय ऐरणीवर आणण्याचे श्रेय कॅरी यांच्या खात्यात नक्कीच जमा झाले आहे. पाकिस्तानातील एक हळवी घटना. एका आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. जगभरच या दुर्दैवी घटना घडत आहेत. जगभरातील सज्जन शक्ती या घटनांचा आपापल्यापरीने निषेधही नोंदवित आहे. कायदे आपले काम करीत आहेत. तरीही अशा घटनांचे प्रमाण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. पाकिस्तानातील एका टीव्ही अँकरने मात्र या घटनेला वाचा फोडण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी एक वेगळा प्रयोग केला. किरण नाज नावाची ही टीव्ही अँकर ही बातमी देण्यासाठी आपल्या लहानशा मुलीला घेऊन कॅमेरा समोर आली आणि अत्यंत भावुक होऊन तिने ही बातमी वाचली. काय नव्हते त्यामध्ये. एका आईची आपल्या मुलीच्या सुरक्षिततेविषयीची काळजी. घटनेचा संताप, असहाय्यता, निषेध, न्यायाची अपेक्षा. किरण नाजच्या या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध झाले की सीमांनी जगाची विभागणी केली असली तरी आईचे हृदय आणि स्त्रीच्या भावना, तिची अवहेलना सगळीकडे सारखीच आहे. बातमी वाचताना अत्यंत भावुक झालेल्या किरण नाजने आज माणुसकीचा गळा दाबला गेला, असे सांगितले. दारूल उलम देवबंदचे फतवे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दारूल उलमने नुकताच मुस्लिम महिलांनी डिझायनर आणि स्लिम फिट बुरखे वापरू नये असा फतवा काढला आहे. मुसलमान महिला आता हा फतवा शिरोधार्य मानतात की त्याला कचऱ्याची टोपली दाखवतात, हे येणारा काळच ठरवेल. मासिक पाळी हा महिलांचा शारीरिक धर्म आहे. मात्र, परंपरेने त्याला धार्मिक कोंदण दिले आहे. पर्यायाने त्याविषयी बोलणे, चर्चा करणे टाळले जाते. परिणामी त्यादरम्यानची स्वच्छता, स्वच्छतेची साधने, पाळीसंबंधी आजार या सगळ्या गोष्टींविषयी कमालीची उदासीनता आपल्या समाजात आहे. अजूनही बऱ्याच गावखेड्यांमध्ये एवढेच नव्हे तर शहरातही काही ठिकाणी या काळात महिला पारंपरिक साधनेच वापरताना दिसतात. मात्र, महिलांची ही अडचण ओळखली तमिळनाडूच्या अरुणाचलम मुरुंगनथम या सामाजिक कार्यकर्त्याने. त्याने सॅनिटरी पॅडचा कारखाना काढून महिलांना अगदी किमान किमतीत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याचा वसा घेतला. या माध्यमातून अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला. अरुणाचलमचे हे कार्य देशभर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला. आणि आर बाल्की यांनी चक्क त्यांच्यावर "पॅडमॅन' हा चित्रपट तयार केला. अक्षयकुमारसारख्या प्रगल्भ अभिनेत्याने अरुणाचलमची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित असलेला विषयावर एक पुरुष क्रांतिकारी कार्य करतो आणि एवढेच नव्हे तर सारा देश त्याची दखल घेतो आणि त्या विषयावर चित्रपटही येतो. ही स्त्रीविषयक बदलत्या मानसिकतेची नांदी आहे, एवढे निश्चित. कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण ही नित्याची बाब आहे. कुठलाच देश, कुठलेच प्रोफेशन आणि कुठलाच समाज याला अपवाद नाही. अशा घटना टाळल्या जाव्यात यासाठी भारतात अनेक प्रयत्न झालेत. विशाखा समिती हा त्यापैकी एक प्रयोग. मात्र संकोच, बदनामी या धास्तीमुळे महिलांनीच याविषयी चुप्पी साधली. असे त्रास त्या न बोलता सहन करत राहिल्या. याप्रकाराला सामाजिक माध्यमांतून सार्वजनिकरित्या वाचा फोडली तराना बुर्क या सामाजिक कार्यकर्तीने 2006 साली. तिने मी टु हा हॅशटॅग वापरून अशा प्रकारच्या शोषणाचा पर्दाफाश करणे सुरू केले. आणि तिला अगणित प्रतिसाद मिळाला. अलीकडे 2017 च्या शेवटी हार्वे वेनस्टिन या अमेरिकी निर्मात्याविरोधात ऍलिसा मिलॅने या नटीने मी टू हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर मोहीम राबवली आणि ही चळवळ पुनरुज्जीवित झाली. त्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळत गेला. लाखो महिलांनी त्यांच्यावरचा अन्याय मी टू च्या माध्यमातून सार्वजनिक केला. अशा चळवळींमधून हार्वेसारख्या वृत्तींना आळा बसेल, ही आशा आहेच. त्याशिवाय महिला आपल्यावरच्या अन्यायाविषयी न घाबरता बोलू लागल्या, हे सगळ्यात महत्त्वाचे संक्रमण आहे. महिला विश्वातली संक्रमणाची ही मालिका अशीच कायम राहो, नव्हे विस्तारत जावो. या अपेक्षेसह! | |||
Subscribe to:
Posts (Atom)