Powered by Blogger.

Wednesday, 21 December 2016

सिनेमा बदलतोय
स्वाती हुद्दार
समाज जीवनाचे प्रतिबिंब कलाकृतीत उमटत असते. मग ती चित्रकला असो, साहित्य असो, नाटक असो की आजचे लोकप्रिय माध्यम सिनेमा असो. माणूस जे जगतो, तेच तो कलेतून मांडत असतो. म्हणूनच आदिमानवाने रेखाटलेल्या चित्रांमधून त्यावेळचे समाजजीवन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अजिंठा-वेरूळच्या शिल्पकृतीतून तत्कालिन जीवनशैलीचा धांडोळा घेतला जातो. विविध साहित्यिकांच्या कलाकृतींमधून त्यांच्या आयुष्याविषयीचे आडाखे बांधले जातात. गायकांच्या शैलीतून त्यांच्या गायकीचे घराणे, त्यांच्या गायकीवरील प्रभाव याचा अंदाज बांधला जातो. कुठलीही कलाकृती मनोरंजनासाठी असली तरी ती कलाकाराच्या मनोव्यापाराची, समाजजीवनाची निदर्शक असते.
आदिम काळापासूनच मानव कलाप्रिय आहे. रोजचे रहाटगाडगे हाकताना त्याला दोन घटकांचा विरंगुळा हवा असतो. या प्रेरणेतूनच आदिवासी नृत्य, संगीत जन्माला आले. पुढे मानव जसजसा प्रगत होत गेला तसा संगितिका आणि पुढे नाटके असा कलेचा प्रवास झाला. नाटकांनीही खूपशी स्थित्यंतरे अनुभवली. विष्णुदास भाव्यांच्या पौराणिक आख्यानांपासून तरल मनोव्यापार रेखाटणाऱ्या एलकुंचवार आणि तेंडुलकरांच्या प्रायोगिक रंगभुमीपर्यंत आणि आता त्याही पुढे जाऊन रोजच्या जगण्याचे प्रश्‍न मांडण्यापर्यंत. असाच प्रवास सिनेमाचाही झाला. राजा हरिश्‍चंद्र या पौराणिक सिनेमापासून सुरू झालेल्या सिनेमाने खूप वाटा वळणे घेतली. पौराणिक, ऐतिहासिक, संगीतप्रधान चित्रपटांपासून पुढे प्रेमाच्या विश्‍वात नेणारे देवानंदचे स्वप्नाळू सिनेमे, शो मॅन राज कपूरचे बुट पॉलिशसारखे वास्तवाला भिडणारे सिनेमे, दूर गगन कि छाव मे सारखे किशोर कुमारचे हसता हसता अंतर्मुख करणारे, दो बिघा जमीन, नयादौर सारखे सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे सिनेमे, अंगुरसारखे कौटुंबिक, सामाजिक विषयांवरचे गुलजारचे हलके-फुलके सिनेमे आणि नंतर झंझावातासारखी सगळी सिनेसृष्टी आपल्या कवेत घेणारे अँग्री यंग मॅनच्या रुपात एक युग गाजविणाऱ्या अमिताभ बच्चनचे सिनेमे. त्याचवेळी नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, स्मिता पाटील, शबाना सारख्या कलावंतांना घेऊन जगण्याच्या प्रश्‍नांना भिडणारा समांतर सिनेमाही आपले वेगळेपण जपत आकाराला येत होता. त्यानंतर खान युग आले मैने प्यार किया, कयामत ये कयामत तक, कुछ कुछ होता है, मै हूँ ना पासून अगदी अलिकडच्या चेन्नई एक्‍सप्रेसपर्यंत लोकांना हसवणारा, प्रेमाच्या कथा आणि व्यथा रंगवणारा चित्रपट अलिकडे मात्र पुरता बदललाय. सिनेमाच्या शतकभराच्या प्रवासात अगदी सुरुवातीच्या काळात कुंकूसारखे अपवाद वगळता आणि पुढे फुल बने अंगारे सारखे काही सिनेमे सोडले तर सिनेमाच्या केंद्रस्थानी कधीही नसलेली स्त्री आता मात्र सिनेमाच्या मध्यवर्ती आहे. विशेष म्हणजे हे सिनेमे केवळ स्त्रीप्रधान नसून तिच्या मनाचे पापुद्रे उलगडणारे आहेत. द डर्टी पिक्‍चर सिनेमातून सिल्क स्मिता या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या जीवनाची नव्हे तिच्या व्यथेची कथा सांगणारा आणि त्याचबरोबर तिच्या मनाची पडझड दाखवणारा प्रयोग यशस्वी झाला. त्याचे श्रेय विद्या बालनच्या समर्थ अभिनयाला जाते. त्यानंतर आलेला कहानीमधल्या देशद्रोही यंत्रणेविरुद्ध एकाकी लढा देणारी विद्या बापची ठसा उमटवून जातेच, मात्र खरा हळवा करतो तिचा सिनेमाच्या शेवटचा पती आणि पोटातल्या बाळाच्या विरहात केलेला आक्रोश.
त्यानंतर असाच लक्षात राहिला प्रियंकाच्या अभिनयाने सजलेला मेरी कोम, मेरी कोमचा कारकीर्दीतला संघर्ष आणि जीवनातलाही संघर्ष खूप छान चित्रित केला आहे. त्यानंतर मनात घर करून जाते नीरजाची कहाणी. पतीच्या जाचामुळे आत्मविश्‍वास गमावलेली नीरजा अपहरण झालेल्या विमानातील अतिरेक्‍यांचा कणखरपणे सामना करते आणि शेवटी अनेकांचे जीव वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देते. मध्यंतरी फारसा लक्षात न राहिलेला मधुर भांडारकरचा हिरोईन हा देखील स्त्री केंद्री सिनेमा.
अलिकडे आलेल्या पिंकने बदलत्या सिनेमावर शिक्‍कामोर्तब केले आहे. एकूणच बदलत जाणारी समाजव्यवस्था, पर्यायाने प्रवाहाबरोबर बदलत जाणारी स्त्री, मात्र तिचे बदलणे मान्य नसणारा समाज. त्यातून निर्माण झालेला संघर्ष. तिचे उशीरापर्यंत बाहेर थांबणे, तिचे मित्रांबरोबर पार्टीला जाणे, तिची मैत्री या सगळ्या गोष्टींवरून तिचे चारित्र्य ठरवले जाते. तिला गृहीत धरले जाते. आणि त्याविरुद्ध तिने आवाज उठवला तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. वेशभुषेने, राहणीने आधुनिक झालेली, मोठ्या शहरात उशीरापर्यंत काम करणारी, एकटी राहणारी स्त्री मनाने अजूनही कणखर झालेली नाही. तिच्या मॉडर्न शरीराच्या आत एक हळवे मन आहे. तिचे निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे. तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. हे समाजाला आजही मान्य नाही. शरीरापलिकडे तिच्यावर प्रेम करणारा, तिला समजून घेणारा मित्र तिला हवा आहे, दीपक सहगल या वकीलाच्या रुपाने पिंकमधल्या तिघींना एक ज्येष्ठ मित्र सापडतो. त्यांची लढाई लढणारा. कुठल्याही फायद्याची अपेक्षा न करता. शेवटपर्यंत त्यांना साथ देणारा सच्चा साथी.
मै हॉट हूँ, इसलिये पिक्‍चर का ऑफर दे रहे हो क्‍या? असा थेट प्रश्‍न आपल्या मित्राला विचारणारी डिअर जिंदगीमधली कायरा अशीच भिडते. मै सिर्फ साथ सोने के लिये मॅच्युअर्ड हूँ क्‍या? असेही ती सरळच विचारते. कायराचा हा प्रश्‍न सगळ्यांच्याच मनातला प्रश्‍न असतो. प्रेमभंगानंतर तिचे कोलमडणे, स्वत:शीच भांडणे, पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करणे आणि त्या दरम्यान मानसोपचारतज्ज्ञ जहागिर खानचे तिच्या आयुष्यात येणे, त्या दोघांच्या संवादातून उलगडत जाणारी जिंदगी प्रेक्षकांनाही डिअर वाटायला लागते. genious is about knowing when to stop असे सांगत त्याच्यात गुंतत गेलेल्या कायराला योग्य मार्गावर नेत अलगदपणे सोडून देणारा जग हुरहुर लाऊन जातो. रघुची मैत्री आणि सिनेमाची ऑफर नाकारणारी कायरा चक दे इंडियामधील शाहरुखच्या हॉकीच्या टीममधील आत्मसन्मानासाठी सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचे प्रेम नाकारणाऱ्या प्रीती सबरवालची आठवण करून देते. खूप अपेक्षा घेऊन आलेला कहानी 2 स्त्रीत्वाचाच प्रश्‍न मांडणारा, सो कॉल्ड उच्चभ्रू घरातही न कळत्या वयात मुलींचे होणारे शोषण या सामाजिक प्रश्‍नाला वाचा फोडणारा हा सिनेमा आणि त्या शोषणाविरुद्ध एकाकी झुंज देणारी विद्या सिन्हा मनाला चटका लाऊन जाते.
महिलांचे स्वस्त्व, त्यांचा आतमसन्मान, त्यांची घुसमट या सगळ्यांचे चित्र अलिकडे सिनेमात उमटायला लागले आहे, त्यानिमित्ताने तरी महिलांच्या प्रश्‍नांवर समाज जागृत होईल, अशी अपेक्षा करूया...
पिंकमध्ये तिघींच्या आत्मसन्मानाची लढाई लढणारा दीपक सहगल आणि आयुष्याचे तुकडे जोडण्यासाठी कायराला मदत करणारा जहागिर खान कुठल्यातरी रुपात प्रत्येकीच्याच आयुष्यात असावा, या शुभेच्छांसह.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह