वैशाखवणवास्वाती हुद्दाररामजन्माच्या सुंठवड्याची तिखट-गोड चव जिभेवरून ओसरता ओसरताच वैशाखाची काहिली जाणवू लागते. रामजन्म आणि हनुमानजन्माची धामधुम आटोपली की एक प्रकारचं रितेपण भरून राहत वातावरणात आणि अंगणभर पसरलेले उन्हाचे कवडसे अधिकच रुंदावतात. निष्पर्ण बुंध्यातून पाझरणारं रखरखत उन्ह अधिकच झोंबु लागतं. सकाळचे दहा वाजून गेले की वळणावळणांचे नागमोडी रस्ते एकटेच वाट चालतात. चौकातल्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत असलेल्या रसवंतीवरच्या घुंगुरमाळांचा नाद लयीत घुमत राहतो. त्याच्या बाजुला जमिनीवरच पथारीवर विकायला ठेवलेले कलिंगड, खरबुज डोळ्यांना गारवा देतात. कलिंगड-खरबुजाच्या गर्दीत ते विकणारा मोठ्ठ्या पोटाचा भैय्या मात्र अंगावरचा पंचा लपेटून मस्त घोरत असतो. एवढ्या उन्हात गिऱ्हाईक फिरकणार नाही, अशी जणू त्याला खात्रीच असते. बाजुच्या भाजीवालीनं भाजी सुकून जाऊ नये म्हणून त्यावर ओलसर पोते झाकले असते. आणि सकाळीच बांधून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेण्यात ती मग्न असते. उन्हाच्या तडाख्याने भांबवलेली पाखरे झाडाच्या आडोशाला येऊन उगाचच चिवचिवाट करीत असतात. झाडाच्या बुंध्याशी अंग सैल सोडून गाय रवंथ करीत पहुडली असते. आणि तिचे वासरू तिला मधुन मधुन ढुशी मारत असते. या सगळ्यांचं हे एकत्र कुटुंब उन्हाच्या झळांशी झिम्मा खेळत असतं. जीवनातल्या उन्हसावलीचे वेगळे धडे या मंडळींना गिरवण्याची गरजच नसावी. ऋतूनुसार आपल्या जीवनशैलीत आपसुकच बदल करण्याचं कसब निसर्गानचं त्यांना शिकवलं असतं.चौकातून वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या कोपऱ्यावर स्वत:च्याच रिक्षात घामाच्या धारांनी नहात रिक्षेवाल्यानं मस्त ताणून दिली असते. वस्तीतल्या घरांच्या अंगणातले वाळवणाचे पदार्थ आता समेवर आले असतात. कापसासारख्या केसांची म्हातारी हातात काडी घेऊन खाटेवर बसून त्या वाळवणाची चौकीदारी करत असते. घरातलं लाडावलेलं मांजर म्याव म्याव करीत तिच्या पायाशी घुटमळत असतं. अंगणातला निष्पर्ण चाफा फांदोफांदी बहरला असतो. उन्हाच्या एवढ्या तडाख्यातही वाळवणातला एखादा पापड तरी पळवता यावा, म्हणून दोन कावळे कौलावर रेंगाळत असतात. सारखं बसून बसून म्हातारीला डुलकी येते आणि तेवढीच संधी साधत कावळ्यांची जोडी पापड पळवण्यासाठी खाली उतरते, मात्र म्हातारीच्या पायाशी बसलेलं खाल्ल्या मिठाला जागणारं ते मांजर आपली शेपटी पिंजारत फिस्कारतं. आणि म्हातारीची डुलकी जाते. ती काठी उगारते. कावळे पुन्हा कौलांचा आधार घेतात, दुसऱ्या संधीची वाट पाहात. चैत्रातून वैशाखाकडे होणारी ही ऋतूची वाटचाल चैतन्याशी फारकत घेऊनच पुढे जाते. चैत्र आणि ज्येष्ठाच्या समेवरचा वैशाख कायमच सगळ्यांपासून वेगळा, घरातल्या एखाद्या किरकिऱ्या नकोशा मुलासारखाच. चैत्राचं नवकोरं उन्ह वैशाखात चटके देऊ लागलेलं असतं आणि ज्येष्ठाच्या धारा अजून खूप दूर वेशी बाहेर असतात. चैत्रपालवीचं लुसलुशीत पण थोडं करपलं असतं. गंधभारला मोगराही काहीसा मलूल भासतो. जमिनीवरच्या भेगा शतजन्माचे दु:ख एका क्षणात व्यक्त करतील, अशा आवासलेल्या असतात. उंचचउंच गेलेल्या झाडाच्या शेंड्यावरून परावर्तीत होणारे तेजस्वी सूर्यकिरण अंगणातल्या विहीरीत थेट झेपावत विहीरीचे पाणी घटाघटा पिऊन टाकतात. एरवी जीवनाने ओतप्रोत असलेल्या विहीरीचे एकेक आवर्त उलगडत जाते. खिराडीवरून खडखडत आंत आंत उतरत जाणारा दोरखंड थेट तळाशी भिडतो. आणि बादलीच्या पाण्याशी होणाऱ्या स्पर्शाचा डुब्ब असा ध्वनी विहीरीतून गोल घुमत वर येतो. तेव्हा असं भासतं की जणू वास्तुपुरुषानं तथास्तु म्हटलयं. मनाच्या खोल तळाशी पोहचून नितळ भावनांना स्पर्शणारा दोर असेल का कुणाकडे? त्या दोराला लगडून अलगद उतरावं मनात आणि उखडून टाकावेत सगळे तण दु:खाचे, अस्वस्थतेचे. मनातल्या वैशाखाच्या लाहीलाहीनं मनाचेही पापुद्रे सोलवटून निघालेले असतात. अलगद घालावी त्यावर हळूवार आपुलकीची फुंकर. काढून टाकावा सगळा अपमानांचा गाळ. हे सगळे सोपस्कार आटोपले की मनालाही फुटतील नवे झरे सुखाचे, समाधानाचे. अशा श्रांत तृप्त मनात आपणच पाहावं आपलं हसरं प्रतिबिंब आणि घालून बघावी एखादी हळूवार हळवी साद. मनाच्या डोहावर उठतील आनंदाचे तरंग आणि ऐन वैशाखातही अवघं जगणंच होईल आनंदाचं गाणं. | |||
Tuesday, 10 April 2018
मातृ देवो भव !
स्वाती हुद्दार
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी
पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतो
मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थित्यंतर घडवून आणणारी लोभस घटना. मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. प्रचंड वेदना आणि शारीरिक स्थित्यंतरातून एका जिवातून दुसरा जीव जन्माला येत असतो. मरणांतिक कळा सोसून स्त्री बाळाला जन्म देते आणि त्यानंतर तिचे वात्सल्यमूर्तीत रूपांतर होते. त्या नवमातेच्या सगळ्या भावभावना बाळाभोवती गुंतून जातात. आपले बाळ निरोगी असावे, सुदृढ असावे, असे तिला वाटते, पण त्यासाठी ती गरोदर असतानापासूनच पूर्वतयारी करायची असते, याची जाणीव तिला नसते. आईच्या पोटी जन्माला येणारी उद्याची पिढी तेव्हाच सशक्त होईल, जेव्हा आई सशक्त असेल. मात्र, भारतात गरोदर मातांच्या पोषणाविषयी आजही पुरेशी जागरूकता नाही. परिणामी अशक्त, रोगांनी ग्रस्त आणि कुपोषित बाळ जन्माला येण्याचे प्रमाण भारतात आजही बरेच आहे.
जंगोराईताड आदिवासी विकास संस्था ही समाजाच्या भल्यासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणारी एक सामाजिक संस्था. 2014 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेने स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन इटेवाही या गावात शौचालयांचे निर्माण केले. पेंढारी या गावात पथदिवे लावून ते गाव प्रकाशमान केले. गरीब आणि सामान्यांना आरोग्य खर्च परवडावा या उद्देशाने जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले. गोंदिया जिल्ह्यातील बारुंदा या गावी कुपोषण निर्मूलन शिबिर घेण्यात आले. गेल्या चार वर्षांत अशी विविध सामाजिक कार्ये करीत असताना संस्थेचे अर्ध्वयू प्रबोध वेखंडे यांना बालकांमधील कुपोषणाचे मूळ हे कुपोषित गरोदर मातांमध्ये असल्याचे लक्षात आले आणि संस्थेने त्या क्षेत्रातही भरीव कार्य करण्याचे ठरवले आणि मातृत्वाला सलाम करण्याचा, मातृत्वाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न नागपुरात 2016 पासून सुरू झाला वात्सल्यम् या उपक्रमाच्या माध्यमातून.
निम्न आर्थिकस्तरातील नागरिकांना आजही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावते. अशावेळी जेव्हा निसर्गनियमानुसार त्या महिलांच्या वाट्याला गरोदरपण येते, तेव्हा पुरेशा आहाराअभावी, योग्य औषधोपचाराअभावी कितीतरी महिलांचा गरोदरपणातच मृत्यू होतो. गरोदरपणात त्यांनी कसाबसा तग धरला तर पुढे जन्माला आलेले बाळ इतके अशक्त असते, की बालमृत्यू हे अटळ सत्य ठरते. त्यातूनही जी बाळं तग धरतात, ती कुपोषित असतात. त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ खुंटलेली असते, परिणामी भारताची भावी पिढी अशक्त निपजते. भारताला भावी काळात सुदृढ आणि सशक्त बनवायचे असेल तर गरोदर मातेचे पोषण महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन वात्सल्यम् या प्रबोध वेखंडे यांच्या उपक्रमाने गरोदर मातांच्या पोषणाचे असिधाराव्रत स्वीकारले. त्यांना भक्कम साथ लाभली डॉ. स्मिता चतुर्वेदी आणि नमिता पारखी यांची. सुदृढ समाजाच्या उभारणीत हातभार लावण्याचा हा उपक्रम या दोघींनी आपल्या सामर्थ्याने लीलया पेलली आणि आश्चर्यकारक परिणाम दिसू लागले.
या उपक्रमाची लाभार्थी निम्न आर्थिकस्तरातील महिला नेहा आत्राम हिने नुकताच दोन मुली आणि एक मुलगा अशा तिळ्यांना जन्म दिला. गरोदर असल्यापासून नेहाची काळजी वात्सल्यम्च्या माध्यमातून घेतली जात होती. नेहाची तिन्ही मुले दोन किलोंपेक्षा अधिक वजनाची आणि स्वस्थ आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, असे डॉ. स्मिता चतुर्वेदींने सांगितले. जेव्हा तिळे जन्माला येतात, तेव्हा त्यांचे वजन एक ते दीड किलोपेक्षा जास्त नसते. मात्र, वात्सल्यम्च्या वात्सल्याने नेहाची बाळं चांगल्या वजनाची जन्माला आली.
2016 साली सुरू झालेल्या या उपक्रमात पहिल्या वर्षी अकरा गर्भवतींना प्रोटिन, व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि इतर पूरक औषधे, आवश्यक तपासण्या आणि मुख्य म्हणजे मानसिक आधार अशा सुविधा पुरविण्यात आल्या. सोबतच त्यांना पोषण आहाराचे महत्त्व सांगितले गेले. त्यांचा बाळंतणाचा खर्चही संस्थेच्या माध्यमातूनच करण्यात आला. 2017 साली म्हणजे उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षी तेरा महिलांची काळजी अशाच पद्धतीने घेण्यात आली आणि यंदा 2018 साठी वीस गर्भवती महिलांच्या बाळंतपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वात्सल्यम्च्या माध्यमातून झालेल्या एका बाळंतपणात जन्माला आलेल्या एका बाळाचे दोन्ही पाय जुळलेले होते. त्या गरीब मुलाला भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून त्याचे पाय वेगळे करण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च वात्सल्यम्ने केला आणि पुढे वर्षभरही त्याच्या औषधोपचाराचा खर्च वात्सल्यम्च्याच माध्यमातून सुरू आहे. त्या बाळाला स्वत:च्या पायांवर उभे राहिलेले पाहिले, तेव्हा सगळ्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले, असे डॉ. चतुर्वेदी म्हणाल्या.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे
इदं न मम या वृत्तीने समाजासाठी झटणारी अशी माणसे आणि संस्था म्हणजे आभाळाचे खांब असतात. त्यांच्या दातृत्वाचा वाण तुम्हाआम्हालाही लाभावा आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने "सर्वेपि:सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया' अशी अवस्था प्राप्त होऊन भारत सुजलाम् सुफलाम् व्हावा, या सदिच्छेसह!
Subscribe to:
Posts (Atom)