Powered by Blogger.

Friday, 21 October 2016

मी'साठी
सख्यांनो,
स्त्रीचे भावविश्‍व उलगडणारी "मी' ही पुरवणी आज तुमच्या सुपूर्द करताना मनस्वी आनंद होतो आहे. महिलांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक मजकुरांचा समावेश असणारी ही पुरवणी प्रामुख्याने स्त्रीच्या "मी'पणाचा वेध घेणार आहे. आई, पत्नी, मुलगी, बहीण अशा अनेक भूमिका वठवताना आपण स्वत:ला मात्र विसरलेले असतो. नव्हे संसाराच्या पायव्यात माझे "मी'पण पत्थरासम गाडूनच संसाराच्या इमारतीचा हा डोलारा दिमाखाने उभा झालेला असतो आणि मग मागे वळून पाहताना "मै शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ, मगर चांदतारे मुझे जानते है,' अशी अवस्था होते. कारण आई, मैत्रीण, पत्नी म्हणून आपली ओळख जगाला असली तरी "मी' म्हणून आपण स्वत:साठीच अनोळखी ठरतो आणि "आयुष्य ओघळूनी मी रिक्‍तहस्त आहे,' असे काहीसे रिकामेपण, साचलेपण अनेकींच्या वाट्याला येते.
अर्थात "मी'पण जपणे म्हणजे बंडाचा झेंडा घेऊन सतत समस्त पुरुष जातीशी संघर्ष करणे नक्‍कीच नाही. तर निसर्गाने स्त्री म्हणून दिलेले वेगळेपण जपत पुरुषाची ताकद बनणे. पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रातही स्वत:तल्या उपजत कणखरपणाने ठाम उभे राहणे.
मैत्रिणींनो, निसर्ग स्त्रीवर अधिकच उदार आहे, कारण सृजनाची क्षमता निसर्गाने स्त्रीलाच प्रदान केली आहे. निर्मितीचे डोहाळे असलेले देखणे हात दिले आहेत. हे सृजन, ही निर्मितीक्षमता आमची मर्यादा नाही, तर ताकद आहे. या ताकदीसह पूर्वसुरींचे ऋण जपत त्यांनी आखून दिलेल्या प्रशस्त पायवाटेवरून आम्ही पुढे-पुढे जात आहोत, मात्र पुढे जाणाऱ्या काहीजणी आणि अजूनही सुधारणांचा वाराही न लागलेल्या आमच्याच काही मैत्रिणी यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आपली वाट चालताना परंपरांच्या आणि निरक्षरतेच्या जोखडात अडकलेल्या एकेकीचा हात धरून प्रत्येकीने त्यांनाही सोबत न्यायचे ठरवले, तर हे अंतर कमी होत होत एक दिवस नक्‍कीच नाहीसे होईल आणि "तमाच्या तळाशी दिवे लागले रे', अशी प्रकाशमय अवस्था प्राप्त होईल.
जगाच्या पाठीवरील महिलाविषयक घडामोडींचा ऊहापोह या पुरवणीतून वाचायला मिळणार आहे, त्याशिवाय करिअर, शिक्षण, हेल्थ, सौंदर्य, योग यांचीही माहिती दिली जाणार आहे. करिअर, नोकरी जपताना घरसंसारही देखणेपणे सांभाळणाऱ्या आमच्या सख्यांसाठी कुकिंग, कलाकुसर, फॅशन या स्तंभांचा समावेशही आम्ही आवर्जून केला आहे.
मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी असलेल्या या पुरवणीचे तुम्ही मन:पूर्वक स्वागत कराल, या आशेसह.
swati huddar
sanyojika
mee suplliment
sakal
nagpur
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह