Powered by Blogger.

Saturday, 11 July 2020

#SundaySpecial बाबांची पत्रे आणि आजीच्या हातचा सायभात म्हणजे आनंदाचा ठेवा 

Swati Huddar


अखियोंके झरोकोंसे सदरात यावेळी आपल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा देताहेत महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे
सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण माझ्या वाट्याला आलं होतं. आनंदवनातला आनंद घेऊन. सोबतीला होते बाबा, आजी, आई-बाबा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझा सांभाळ करणाऱ्या सुशी आजी आणि मिनी आजी. जन्मत:च माझे पाय वाकडे होते. त्यामुळे अगदी माझ्या आठवणीत आहे, तेव्हापासून डॉक्‍टर, औषधं आणि पायाला बांधलेलं प्लॅस्टर हे माझे सोबतीच. माझ्या पायांमुळे आईला सतत मला कडेवर घ्यावं लागायचं. परिणामी तिला कंबरेचं दुखणं जडलं आणि तिनं अंथरुण धरलं. त्यामुळे सुशी आजी आणि मिनी आजीनीच पुढे मला सांभाळलं. मला चित्र काढायला शिकवलं. विणकाम, भरतकाम शिकवलं. आणि ते सगळं मला मनापासून आवडत गेलं. त्याशिवाय मला अभ्यास करायला खूप मनापासून आवडायचं. अभ्यास म्हणजे मला करमणुकच वाटायची. माझ्या आजुबाजुला स्वस्थ समाजानं झिडकारलेली माणसंच होती. ती माणसं, त्यांची मुलं हेच माझे सवंगडी होते. शरीरानं अव्यंग असलेल्या समाजानं मात्र मला नेहमीच दूर ठेवलं. शाळेत सुद्धा इतर मुली किंवा त्यांचे पालक मला ठरावीक अंतरावरच ठेवत असतं. कारण ही मुलगी महारोगी कॉलनीतून येते, त्यामुळे हिच्यापासून दोन हात दूर राहिलेलंच बरं. अशीच वागणुक मला मिळत होती. त्यामुळे मी दिव्यांग व्यक्‍तींमध्येच रमत गेले. तेच मला आपलेसे वाटत. या आठवणी सांगितल्या महारोग सेवा समितीच्या चिफ एक्‍झिक्‍युटिव्ह ऑफिसर असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी.
गेल्या तीन पिढ्यांपासून समाजसेवेचं व्रत सांभाळणारं आमटे कुटुंब. समाजानं नाकारलेल्या महारोग्यांना त्यांनी माणूसपण बहाल केलं. अन्न-वस्त्र-निवारा आणि सन्मानाचं जिणं देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटेंची ही नात आणि डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटेंची कन्या. आजोबांनी वारश्‍यात दिलेली समाजसेवेची पालखी खांद्यावर आनंदाने वाहाते आहे.
आनंदवनचे कार्य नव्या काळाला अनुसरून अधिक विस्तारताना त्याला नवनवीन आयाम देण्यासाठी आणि विविध प्रोजेक्‍ट राबविण्यासाठी सतत धडपडणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याविषयी त्यांना बोलतं केलं असता त्यांनी त्यांच्या आठवणींची रेशमी पुरचुंडीच रिती केली. त्यातून अनेक मखमली आठवणी समोर आल्या. त्या सकाळच्या वाचकांसाठी.
त्या म्हणाल्या माझ्या आजोबांचं जगावेगळं उत्तुंग कार्य पाहातच मी मोठी होत गेले. मी चवथीत असताना बाबा नर्मदा परिक्रमेसाठी गेले. तोपर्यंत त्यांचा सहवास मिळाला. त्यानंतर मात्र माझं मेडिकलचं शिक्षण आटोपल्यावरचं ते परत आले. मात्र ते नव्हते, तेव्हा त्यांची पत्र यायची आणि तो माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होता. 1999 साली आलेल्या एका पत्रात बाबांनी लिहिलं होतं, तूच माझ्या घराण्याची भाग्यरेषा आहेस. बाबांच्या त्या पत्रांनी वाढत्या वयात माझ्या मनावर सखोल परिणाम केला. आजी मात्र सतत सोबत होती. तिच्या हातच्या साय-दहीभाताची चव जगातल्या दुसऱ्या कुठल्याच पदार्थाला नाही.
बाबांच्या माघारी आनंदवनच्या कामाचा सगळा भार माझ्या वडिलांच्या खांद्यावर होता. त्यांचं माझं नातं लहानपणापासून वडिल-मुलीपेक्षा मैत्रीचं अधिक आहे. त्यांना मी अरे दादा म्हणते आजही. आम्ही खूप बोलतो. भांडतो. एकमेकांवर रागवतोही. लहानपणी दादाला काम आटोपून घरी यायला रात्रीचा एक वाजायचा. मी त्याची वाट पाहात जागी असायचे. तो आला की आम्ही खूप गप्पा मारायचो. चित्र रंगवायचो. मग मी झोपायचे. कधी आम्ही झाडाच्या नावाच्या भेंड्या खेळायचो. दादाविषयीची ती ओढ आजही तशीच आहे. तो आजही कोणाचं ऐकत असेल, तर केवळ माझंचं.
अभ्यासात मी लहानपणापासूनच ठिक होते. मात्र मला कलेविषयी आसक्‍ती होती. त्यामुळे पुढे कलाक्षेत्रात करिअर करायचं, असं ठरवलं होतं. पण 12 वी मध्ये 98 टक्‍के मार्क्‍स मिळाले. राणी मावशी बंग म्हणाली, की तू डॉक्‍टर हो. डॉक्‍टर झाल्यावरही पुढे तुला कला क्षेत्रातही काही करता येईल, मात्र एकदा कलाक्षेत्र निवडलसं की मग डॉक्‍टरी करता येणार नाही. सगळ्यांचा आग्रह आणि विशेषत: बाबांची इच्छा म्हणून मी मेडिकलला ऍडमिशन घेतली. पुढे आमचे एक सर एकदा मला म्हणाले, मानवाचं शरीर एक कलाकृती आहे. त्यानंतर मी शरीरशास्त्राच्या अभ्यासाकडे कला म्हणून बघू लागले आणि आश्‍चर्य म्हणजे मला ते शिक्षण आवडू लागलं. मी एमबीबीएस झाले तेव्हा बाबा आनंदवनात परत आले होते म्हणून मी एमडी किंवा एमएस न करता त्यांच्या सहवासात आनंदवनातच थांबण्याचा निर्णय घेतला आणि मला आयुष्यभर पुरून उरेल इतका त्यांच्या सहवासाचा आनंद मिळाला. या काळात मी अनेक कोर्सेस केले. पदव्या घेतल्या. यवतमाळ जिल्ह्यात दादाबरोबर शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी काम केलं. माझं कलेवरचं प्रेम बघून अनिल अवचटांनी मला कॅमेरा दिला. आणि अभयकाकानं (डॉ. अभय बंग) मला फोटोग्राफी शिकवली. माझं पहिलं मॉडेल बाबा होते. पुढे मी फोटोग्राफीच्या माध्यमातून आनंदवनचं बरचं डॉक्‍युमेंटेंशन केलं. माझ्या छायाचित्रांना अनेक बक्षीसंही मिळाली.
2007 साली गौतम माझ्या आयुष्यात आला. तीन-चार महिन्यांच्या मैत्रीनंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आणि आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. गौतमच्या रुपानं मला जिवाभावाचा सखा मिळाला. गौतमचं पोस्टींग तेव्हा श्रीलंकेला होतं. तिथं सेव्हनस्टार लाईफस्टाईल होती, सगळी सुखं हात जोडून उभी होती. मात्र मला तिथे निरुद्देश जगणं नकोसं वाटू लागलं. शेवटी माझ्यासाठी गौतमनंही आनंदवनला येण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही आनंदवनला स्मार्टव्हिलेज बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. पुढे आमच्या लेकाचा जन्म झाला. त्यानं माझं आईपण घडवलं आणि माझं आयुष्य परिपूर्ण झालं. त्यानं माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आधी मी खूप परफेक्‍शनिस्ट होते. एखादी गोष्ट करायची तर ती परफेक्‍टच असायला हवी, ही माझी फिलॉसॉफी होती, आता माझ्या लेकामुळे मी प्रोसेस एन्जॉय करायला शिकले. त्याच्याचमुळे आम्ही वृक्षारोपण सुरू केलं. त्याच्याचमुळे मी परत पेंटिंग करायला लागले. इथे आनंदवनात आमचं अडीच हजार घरांचं कुटुंब आहे. आणि आम्ही इथे आई मॉडेल राबवितो. म्हणजे एवढ्या सगळ्यांना सांभाळून घ्यायला आईसारखं क्षमाशील असावं लागतं. त्याला आम्ही मदर्स ऍपरोच म्हणतो.
आनंदवनात खरचं खूप आनंद आहे. इथलं जीवन अर्थपूर्ण आहे. माझा आणि गौतमचा विक पॉईंट म्हणजे आमचा कुत्रा. त्याच्याशी खेळंण हे आमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. इथल्या कामानं आम्हाला खूप समाधान मिळतं. आणि त्या कामाची खूप गरजही आहे. बाबांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे,
पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्‍तगंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, गर्द ही फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निधळाची कमाई
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही

Tuesday, 7 July 2020

ते' दूरस्थ बेट


स्वाती हुद्दार

Pls. swich of your phones & tia a belt. या सूचनेनंतर विमानाने धावपट्टीवर वेग घेतला आणि ते आकाशात झेपावले. हिरवीगार जमीन इवलाली होत होत दिसेनाशी झाली आणि ढगांच्या आच्छादनानं विमानाला लपेटून टाकलं. आता पाच तास या पोकळीतच वास्तव्य. जमिनीशी दुवा सुटला होता. अधांतरी, आधाराविना, ही कल्पनाच अस्वस्थ करणारी. पाच तासांच्या पोकळीतल्या प्रवासानंतर ढगांची साथ सुटत गेली. खाली निळेशार पाणी दिसायला लागले. तेव्हा कळले की, गेले अडीच तास या अथांग पाण्याचीही साथ होती. वर निळे आकाश आणि खाली निळे पाणी. मध्ये हिरव्या जमिनीशी नाळ जुळलेले आपण. विमान जसजसे खाली येऊ लागले तसे त्या अथांग पाण्यातली हिरवी बेटं डोळ्यात भरू लागली. ठिपक्‍यांसारखी, सुंदर चित्रांसारखी अगणित. विमानाने त्यातल्याच एकाच्या दिशेने झेप घेतली आणि विमान स्थिरावले पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर. पाच तासांनंतर पाय पुन्हा जमिनीला लागले. ती जमीन, जी कधीतरी असंख्य देशभक्‍तांच्या पदस्पर्शाने पावन झाली होती. त्यांच्यावरच्या अनन्वित अत्याचाराची साक्ष असलेली. भारताच्या भूमीपासून पाण्याच्या प्रवाहाने तुटलेलं; पण भारताचाच अविभाज्य भाग असलेलं हे बेट अंदमान. तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण हे शब्द इथल्याच मातीनं जीवाचा कान करून ऐकले असतील.
सेल्यूलर जेल! शेकडो देशभक्‍तांना आपल्या दगडी पोटात सामावून घेणारी इमारत आजही निधड्या छातीवर इंग्रजांचे अत्याचार सोसणाऱ्या वीर देशभक्‍तांची गाथा सांगत उभी आहे. तिथला कोलू, ते फाशीघर, एकान्तवासाची शिक्षा देणाऱ्या त्या अंधाऱ्या खोल्या आणि त्या अनन्वित अत्याचारांनाही पुरून उरलेली ती दुर्दम्य देशभक्‍ती. इतक्‍या वर्षांनंतरही त्याची स्पंदनं जाणवतात आणि आपण तिथे नतमस्तक होतो.
पोर्टब्लेअरचं दुसरं आकर्षण म्हणजे अंदमानच्या जीवनाशी परिचय करून देणारे सामुद्रिका संग्रहालय. जितकी सुंदर सृष्टी या जमिनीवर आहे तितकेच सुंदर जीवनाचे अस्तित्व पाण्याखालीही आहे. त्या समुद्रीजीवनाचा परिचय हे संग्रहालय करून देते. अंदमान-निकोबार बेटांवर वास्तव्य करणाऱ्या आदिम जमातींची जीवनशैली, त्यांचे जीवनव्यवहार दर्शविणारी शिल्प, त्यांच्या नित्य वापरातल्या वस्तू या सगळ्यांचा संग्रह या संग्रहालयात आहे. पोर्ट ब्लेअरचे आणखी एक आकर्षण म्हणजे ऍट्रोपॉलॉजिकल संग्रहालय. अंदमानमधील आदिम जमातींच्या जीवनाशी जवळून परिचय करून देणारे हे संग्रहालय. त्यांचे खानपान, त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे, निसर्गाशी तादात्म्य पावलेली ही माणसे, निसर्गाच्या साहाय्याने आपली उपजीविका चालवितात.
पाण्यामधल्या जमिनीवरच्या तुकड्यावरची पहिली रात्र, नितांत सुंदर, दूरवर समुद्राची गाज, उंच गेलेल्या नारळाच्या झाडांना लगडलेले नारळाचे घोस, वाळूवर लांबच लांब पसरलेल्या त्यांच्या सावल्या आणि आपण. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारलाच पक्षांच्या किलबिलाटानं प्रसन्न जाग आली. बाहेर आकाशभर उगवतीचे रंग पसरले होते. उगवतीच्या लालबुंद सूर्याच्या साथीनं वंडुर बीचवरून निळेशार पाणी कापत क्रुझचा प्रवास. सोबतीला दोन्ही बाजूंनी मॅंग्रोझनी बहरलेली इवलाली बेटं. निळ्याशार समुद्री पाण्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय पार्कचा प्रवास करून क्रुझ जॉली बॉयच्या किनाऱ्याला लागते तेव्हा आपण स्वर्गात असल्याचा भास होतो. नितळ समुद्रकिनारा, स्वच्छ रुपेरी वाळू आणि वर निळे आकाश. बंगालच्या उपसागरातलं हे बेट. मानवी हस्तक्षेपाला इथे मर्यादा आहेत. माणसाशिवायच्या जीवसृष्टीला जगण्याचा बहरण्याचा अधिकार इथे मान्य केलाय. इथे प्लॅस्टिक, बाटल्या, सगळ्यांवर बंदी आहे. दररोज फक्‍त 250 प्रवाशांनाच इथे प्रवेश आहे आणि तोही केवळ सहा महिने. वर्षातले सहा महिने हे बेट बंद असतं. इथे पाण्याखालीही अनुपम जीवसृष्टी आहे. त्याच्या संवर्धनाकरिता शासनानं काही कठोर नियम केले आहेत. ती सजीवसृष्टी न्याहाळण्याकरिता आम्ही ग्लास बॉटम नावेत बसलो. पाण्याखालचं अनुपम जीवन बघताना आपण अचंबित होतो. रंगीबेरंगी सुंदर मासोळ्या, लहान मोठ्या, स्टार फिश आणि कोरल्स. विविध रंगांचे, विविध आकारांचे. आपल्या बुद्धीचा गर्व असलेल्या मानवानेही निसर्गाच्या या अनुपम सौंदर्यापुढे नतमस्तक व्हावे, असा सृष्टीचा चमत्कार. जीवो जीवस्य जीवनम्‌ या न्यायानं हे समुद्रीजीवन इथे बहरतेय. एक तास त्या सजीवसृष्टीला डोळे भरून न्याहाळल्यानंतर किनाऱ्यावरच्या मऊसुत वाळूवर बसून नजर जाईल तिथपर्यंत विस्तारलेला तीन रंगी समुद्र आणि त्यावर झुकलेले निळे आकाश पाहताना जाणवले की, काहीतरी नक्‍कीच आहे, आपल्या कळण्यापलीकडचे. अगम्य.
पोर्टब्लेअरपासून 41 किमी पूर्वोत्तर असलेलं हॅवलॉक हेदेखील नयनरम्य बेट. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ आता हे बेट स्वराज बेट नावाने ओळखले जाते. कालापत्थर, राधानगरचे समुद्रकिनारे हुंदडायला भाग पाडणारे. काहीसे अवखळ, लाडिक. जवळ जायला भाग पाडणारे.
स्वराज्यापर्यंत अंदमान परकीयांच्या ताब्यात होतं. डच, पोर्तुगीज आणि नंतर इंग्रज. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तीन वर्षे जपान्यांच्या ताब्यात. अजूनही या परकीय आक्रमकांच्या खुणा इथल्या बेटांवर कायम आहेत. इंग्रजांनी या द्विपांचा व्यवसायासाठी उपयोग करून घेतला. त्यासाठी कष्ट केले भारतीय राजकीय बंद्यांनी. इंग्रजी जुलमाच्या कथा सांगत चाथम सॉ मिल आजही उभी आहे. रॉस आयलंड ही इंग्रजांची राजधानी. त्यांनी इथे वस्ती वसवली, त्यासाठी भव्य इमारती उभारल्या. इथं इंग्रजकालीन इमारती, चर्च, त्यांची कार्यालये आजही इंग्रजी स्थापत्यकलेच्या नमुन्याच्या रूपात उभी आहेत.
बाराटांग द्विपावर मॅंग्रोजच्या घनदाट जंगलात लपलेल्या लाइमस्टोन केव्हज बघणं हा नितांतसुंदर अनुभव. बाराटांक द्विपापर्यंतचा मोटरबोटचा प्रवास तर केवळ अवर्णनीयच. दोन्ही बाजूला अस्पर्श अशी दाट वनराजींनी वेढलेली द्विपं आणि शांत नितळ पाण्यावरून सुरू असलेला प्रवास, संपूच नये असा.
इथे जाणारा मार्ग जातो जारवांच्या प्रदेशातून. जारवा. अंदमानचे मूळ निवासी. अजूनही निसर्गावलंबी जिणे जगणारे. निसर्गाशी तादात्म्य असलेले. निसर्गपुत्र. तुमच्या-माझ्या सुखवस्तू जीवनाचा वाराही न शिवलेले. त्यांना बघण्यासाठी उत्सुक असलेले शेकडो डोळे त्यांचा माग घेत त्यांच्या प्रदेशातून जातात. ते मात्र त्यापासून अनभिज्ञ. त्यांच्या प्रदेशातून जाताना अगदी काही क्षण नजरेस पडले. ते दोघं. ती आणि तो. हातात तिरकमचा आणि समोर नुकतीच केलेली त्या दिवसाची शिकार. गळ्यात रानटी फुलांच्या माळा. आणि उन्हात रापलेला काळा रंग. समोरून जाणाऱ्या वाहनाची, त्यातील अनोळख्या विश्‍वातल्या माणसांची दखलही त्यांनी घेतली नाही. त्या प्रदेशाचे ते सम्राट, त्या निसर्गाचे रक्षणकर्ते. तो निसर्ग आणि ते एकमेकांचे पालनकर्ते. त्यांचा तो बेदखल अंदाजही अतिशय मोहक. बुद्धीच्या सामर्थ्याने सगळ्या जगावर साम्राज्य करणाऱ्या आमच्या अहंच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारा होता.
572 द्विपांचा हा अंदमान-निकोबार द्विपसमूह. त्यातील केवळ 37 द्विपांवर मानवी वास्तव्य आहे आणि त्यातील केवळ 7 द्विप प्रवाशांसाठी खुली आहेत. मानवी हस्तक्षेपापासून दूर असल्यानेच यांचे सौंदर्य अबाधित आहे. नितळ निळ्या समुद्राच्या कुशीत निवांत पहुडलेल्या या द्विपांची सफर एकदा करावीच आणि आनंदवनभुवनीचा साक्षात्कार घ्यावाच.
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह