Powered by Blogger.

Friday, 3 June 2022

 त्या दोघी

 
स्वाती हुद्दार

 
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तो भारत-पाकिस्तान असा विभाजित होऊन. या विभाजनाने अनेक जखमा दिल्या. काही कधीही भरून न येणाऱ्या. भारत स्वतंत्र झाला की जादुची कांडी फिरावी तसे सारे प्रश्न संपतील, भारतात सोन्याचा धुर निघेल, दुधाच्या नद्या वाहतील असे स्वप्नरंजन करणाऱ्यांच्या भ्रमाचे भोपळे फुटले आणि अनेक नवेच प्रश्न देशासमोर उभे ठाकले. भ्रमनिरास झालेली संवेदनशील पिढी आपल्या प्रश्नांची उत्तरे कलांमधून शोधू लागली. आपल्या व्यथा-वेदना कलांमधुन मांडु लागली. यातुनच एक नवा प्रवाह संगीत, नाटक, साहित्य यातुन प्रवाहित झाला. त्यावेळची तरुण भारावलेली पिढी या प्रवाहात सामील झाली आणि कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात क्रांती झाली.
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
असे म्हणत नवे प्रवाह साऱ्याच क्षेत्रांमधुन दुथडी भरून वाहू लागले. काव्य, कथा, कादंबरी प्रमाणेच रंगभुमीवरही हे नवे बदल दिसू लागले. नाटकाच्या संहितेपासून विषय-आशय ते सादरीकरणापर्यंत साऱ्यातच आमुलाग्र बदल झाले. रात्र-रात्र चालणाऱ्या संगीत नाटकांची जागा आशयप्रधान नाटकांनी घेतली. पौराणिक नाटकांपेक्षा प्रेक्षकांना सामाजिक विषय अधिक खुणावु लागले आणि मन्वंतराच्या या काळातच रंगभुमीला दोन गुणी कलावंत मिळाल्या. त्या दोघी म्हणजे सई परांजपे आणि विजया मेहता.
पुरुषी क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात या दोघींनीही आपल्या नावाची मोहोर उमटवली, नव्हे या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. सई आणि विजया नावाचे प्रवाह साधारण ५०-६० च्या दशकापासून अगदी अलिकडेपर्यंत सांस्कृतिक क्षेत्रात समांतर वाहत राहिलेत.
विजया मेहता उर्फ विजया जयवंत यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ चा आणि सई परांजपेंचा जन्म १९ मार्च १९३८ चा. म्हणजे एकाच दशकातला. स्वातंत्र्यपूर्व काळातला.
विजयाबाईंचे बालपण मुंबईतल्या गिरगावात गेले. जयवंत या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विजया हे शेंडे फळ. स्वातंत्र्य चळवळीने तेव्हाचे वातावरण भारलेेले होते. त्याचा परिणाम नकळतपणे विजयाबाईंच्याही मनावर होत होता. त्या भारावलेल्या मनोवस्थेत त्याही राष्ट्रसेवादलात सामील झाल्या. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण सुरूच होते आणि एका वळणावर विजयाबाईंना त्यांच्यातील कलावंताचा शोध लागला. कस्तुरी मृगाला त्याच्यातला सुगंध गवसावा अगदी तसा.
सई परांजपेंची पार्श्वभुमी अतीशय वेगळी होती. श्रेष्ठ गणितज्ज्ञ रॅंगलर परांजपेंची नात. ज्येष्ठ समाजसेविका, केंब्रिज विद्यापीठाच्या अधिस्नातक असलेल्या शकुंतला परांजपेंची आणि रशियन चित्रकार युरा स्लेप्टझॉफ यांची ही लेक. अत्यंत सुसंस्कारित, बौद्धिक, उच्चशिक्षित, व्यासंगी वातावरण सईला बालपणापासूनच मिळाले. आजोबा आणि आईच्या डोळस देखरेखीखाली सईचे व्यक्तिमत्व फुलत होते. वयाच्या आठव्या वर्षीच सईमधल्या कथा लेखिकेचा जन्म झाला. शिक्षण सुरू असतानाच सईचे आकाशवाणीशी बंध जुळले, इंग्रजी वृत्त निवेदिका म्हणून. आणि त्यांचा माध्यमांमधला सूवर्णकाळ सुरू झाला. दूरदर्शन, बालरंगभुमीत रमलेली सई परांजपे नाट्य क्षेत्राचे रितसर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाली. आणि तिथे तिला भेटले नाट्यक्षेत्रातील पितामह इब्राहिम अल्काजी. आणि मुळच्याच प्रतिभावंत सईच्या कलागुणांना पैलू पडू लागले.
इथे एक योगायोग असा की विजयाबाईंचेही गुरू इब्राहिम अल्काजीच आहेत. अल्काजींच्या तालमीत तयार झाल्यानंतर बाईंच्याही प्रतिभेला बहर आला. पुढे त्यांना आदि मरज़बान आणि जर्मन दिग्दर्शक फ्रिट्ज बेनेविट्ज़ यांचेही मार्गदर्शन लाभले. पीटर ब्रुकला बाई गुरू मानतात. बाईंच्याच शब्दात सांगायचं तर बाई पीटर ब्रुक यांच्याकडून एकलव्यासारख्या शिकल्या.
विजयाबाई आणि सई यांच्यात आणखी एका बाबतीत साम्य आहे, ते म्हणजे दोघीही पितृ प्रेमापासून वंचित राहिल्या. बाईंचे वडिल त्या पाच-सहा वर्षाच्या असताना वारले आणि सईच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा सई दीड वर्षाच्या होत्या. शकुंतला परांजपे सईला घेऊन भारतात परतल्या,त्यामुळे सईचेही बालपण वडिलांविना गेले.
कला क्षेत्रातला दोघींचाही प्रवास वेगळा आहे. अत्यंत देदिप्यमान आहे.क्रांतिकारक आहे.दोघींच्याही स्वभावाला अनुसरुन आहे. त्यांच्या-त्यांच्या प्रकृतीला मानवणारा आहे. अत्यंत लोभस आहे.
१९५१ साली महाविद्यालयातील नाटकांतून विजया मेहता यांच्या नाट्यकारकीर्दीची सुरुवात झाली. अगदी उमेदीच्याच काळात नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशा दिग्गज मंडळींसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.विजयाबाईंच्या नाट्यदिग्दर्शनाची सुरुवातच विजय तेंडुलकरांच्या श्रीमंत या नाटकाने झाली.त्याचबरोबर विजयाबाई पु. ल. देशपांडेंच्या नाटकांमधुनही काम करीत होत्या. पु.लंच्या नाट्यव्यक्तिमत्त्वाचा खूप प्रभाव बाईंच्या नाट्यप्रवासावर पडला. त्याचवेळी चि. त्र्यं. खानोलकर, दळवी, महेश एलकुंचवार यांच्या नाट्य संहिता विजयाबाईंना भुरळ घालू लागल्या. प्रायोगिक म्हणाव्या अशा नाट्यसंहितांना बाईंनी एकीकडे पाश्चात्य नाट्यकला आणि दुसरीकडे लोककला यांच्या मिश्रणातून तयार झालेला नवाच साज चढवला व त्याचे रुपडेच बदलून टाकले. परिणामी प्रेक्षकांना काहीतरी अगदी नवे, वेगळे, ताजे बघायला मिळाले.
१९६० साली विजयाबाईंनी तेंडुलकर, अरविंद देशपांडे यांच्यासह रंगायन नावाची नाट्यसंस्था सुरू केली आणि प्रस्थापिताला छेद देणारे नवे काहीतरी रंगभुमीवर रंगायला लागले. तुज आहे तुजपाशी, शितू, हॅम्लेट, सुंदर मी होणार यातील अभिनय आणि मादी, अजगर आणि गंधर्व, चिमणीचं घर होतं मेणाचं, गिधाडं, यशोदा, एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, संध्याछाया, जास्वंदी,अखेरचा सवाल,हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष,हयवदन, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक अत्यंत गाजलेली नाटकं विजयाबाईंच्या नावावर आहेत.रंगभूमीवरील अनेक साचेबद्ध गोष्टी हद्दपार करण्याचा आणि जागतिक रंगभूमीचं‌ भान मराठी रंगभूमीला देण्याचा मान विजयाबाईंना जातो. विजयाबाईंनी हयवदन आणि शाकुंतलचे प्रयोग जर्मन भाषेत आणि जर्मन कलावंतांकडून जर्मन प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे केले, हे विजयाबाईंचे वेगळेपण.
विजयाबाईंच्या काहीशा बोजड, मनोविश्लेषणात्मक, प्रायोगिक नाटकांच्या पार्श्वभुमीवर सई परांजपेंची वाट अगदी निराळी होती. सईची निर्मिती मध्यमवर्गींय मनाला भावणारी, त्यांचीच सुख-दुःख सांगणारी होती. सईचा पिंड मुळचा सिद्धहस्त लेखिकेचा. त्यामुळे त्यांनी प्रचंड साहित्य निर्माण केलं. त्यामध्ये बालसाहित्य, कथा, पटकथा अशा विविधांगी लेखनाचा समावेश आहे. सईच्या मनात कायम एक निरागस मुल दडलेलं आहे. ते त्यांच्या लिखाणातुनही सतत डोकावत असतं. खरेतर सई हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. सईंनी नाटकाबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन, माहितीपट, आणि सिनेमा अशी सारीच माध्यम वापरली. आणि केवळ वापरलीच नाही, तर त्यावर आपली नाममुद्राही रेखली. एकटे अपत्य असलेल्या सईला माणसांमध्ये रमणे खूप आवडते, त्याचा प्रभाव त्यांच्या नाटक-सिनेमामध्येही दिसतो. शेजारी, सख्खे शेजारी, पुन्हा शेजारी, हम पंछी एक चाॅल के ही नाटके आणि कथा, चष्मेबद्दुर सारखे सिनेमे याची साक्ष आहेत.या सगळ्यातुन त्यांनी चाळीमध्ये राहणारा सामान्य माणुस उभा केला.
सईने लिहिलेली, दिग्दर्शित केलेली नाटके, सिनेमे हे हसत-खेळत जीवनाचे तत्वज्ञान सांगतात आणि मनावर गारुड करतात. आलबेल, जास्वंदी ही नाटके आणि स्पर्श, दिशा हे सिनेमे ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे. सईंनी अनेक दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शनही केले आणि सई घराघरात जाऊन पोहोचल्या.
विजया मेहता आणि सई परांजपे हे दोन मनस्वी प्रवाह एकदा एकत्र आले, ते जास्वंदी नाटकाच्या निमित्ताने. जास्वंदीची संहिता सईंची होती आणि दिग्दर्शन विजयाबाईंचे.माणसांच्या अनाकलनीय मनोव्यापारांचा, इच्छा-वासनांचा आणि स्खलनाचा शोध घेत जाणारं हे नाटक मानवी महत्त्वाकांक्षेच्या बुडाशी असलेल्या क्रौर्याचं दर्शन घडवतं. एका सहजलयीत उलगडत जाणाऱ्या बारीकशा कथेतून आणि त्या कथेच्या पोटात असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींतून ही आशयसूत्रं समोर येत जातात. एक तरल, भावनाट्य उभं राहताना त्याच्यातला शोकात्म गाभा आपल्याला घेरून टाकतो. ही सईंच्या लेखणीची कमाल आहे आणि विजयाबाईंच्या दिग्दर्शनाचीही. दोघीही तेवढ्याच समर्थ.
हा एक अपवाद वगळता हे दोन कला प्रवाह आपापल्या वैशिष्ट्यांसह समांतर प्रवाहित होत राहिले.
विजयाबाईंनी नाटकाशिवाय सिनेमा हे माध्यम क्वचित वापरले. त्यांचे स्मृतीचित्रे, पार्टी हे सिनेमे प्रेक्षकांना आवडलेही, पण त्यांचे मन त्यात रमले नाही.
दोघींनीही आपला कला प्रवास आत्मचरित्राच्या रुपाने चाहत्यांसमोर पेश केला आहे. या दोघींचेही आत्मचरित्र म्हणजे कलाक्षेत्राच्या मन्वंतर काळातला दस्तावेज आहे.
दोघींनीही कलाकृतीतून ओढूनताणून कुठला संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही. कलेसाठी कला हे तत्व दोघींनीही जपले. जीवापाड सांभाळले.कलाक्षेत्रातील आपल्या कामाने या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. संगीताच्या भाषेत सांगायचे तर आपली घराणी निर्माण केली. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, रविंद्र मंकणी हे तर मोठ्या अभिमानाने विजयाबाईंचे शिष्यत्व मिरवतात.
विजयाबाई आणि सईने आपल्या साधनेने उजळलेला हा कलादीप असाच तेवत राहावा, या आशेसह.

 आज उगाचचं

आज उगाचचं
मनभर पसरलं आहे
उदासपणं,
दुधावर पसरलेल्या
दाट सायीसारखं
हात चालताहेत
रोजच्याच गतीनं
ठरावीक लयीत
आभाळातल्या काळ्या ढगांनी
केलीय गर्दी मनातही
गॅसवर चहाचं आधण
मनात विचारांची घुसळणं
कुकरच्या शिट्ट्या
मनातही दबलेले बाष्प
सवयीनं विळीवर भाजीचे काप
एकसारखे,
मनात विचारांची साखळी
एकसारखी, एकसंध
दारावरची बेल
दुधवाल्याची हाळी
अंगणात पेपरची गुंडाळी
भर दिवसा दाटून आलेलं आभाळ
घरभर अंधार
मनातही अंधार, काळा उदास
आज उगाचचंआज उगाचचं
मनभर पसरलं आहे
उदासपणं, दुधावर पसरलेल्या
दाट सायीसारखं
हात चालताहेत
रोजच्याच गतीनं
ठरावीक लयीत
आभाळातल्या काळ्या ढगांनी
केलीय गर्दी मनातही
गॅसवर चहाचं आधण
मनात विचारांची घुसळणं
कुकरच्या शिट्ट्या
मनातही दबलेले मान-अपमानाचे बाष्प
सवयीनं विळीवर भाजीचे काप
एकसारखे,
मनात विचारांची साखळी
एकसारखी, एकसंध
दारावरची बेल
दुधवाल्याची हाळी
अंगणात पेपरची गुंडाळी
भर दिवसा दाटून आलेलं आभाळ
घरभरही अंधार
मनातही अंधार, काळा उदास
आज उगाचचं

स्वाती हुद्दार

Saturday, 30 April 2022

 जोगिया ते गंगुबाई

 
स्वाती हुद्दार

 
नुकताच संजय लिला भन्सालींचा गंगुबाई काठीयावाडी पाहिला. संजय लिला भन्सालींचा चित्रपट म्हणजे सारेच भव्यदिव्य. मोठ्ठे सेट्स, महागडे काॅस्च्युम्स, उत्कृष्ट रंगभुषा, मनाचा ठाव घेणारे संगीत, सुंदर गाणी आणि अप्रतिम नृत्याविष्कार. त्यांचे देवदास,गोलियों की रासलीला रामलीला आणि अलिकडचे बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये जसे सारे भव्यदिव्य बघायला मिळते, तसेच सारे गंगुबाई मध्येही बघायला मिळते. नेहमीप्रमाणेच सारेच सुंदर आणि त्याला अप्रतिम पिक्चरायझेशनची जोड ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. या साऱ्याच्या जोडीला दिलखेचक संवाद हे भन्सालींच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य.
अगदी देवदासचा विचार केला तर
कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है, हम तो पीते हैं कि यहां बैठ सके, तुम्हे देख सकें, तुम्हें बर्दाश्त कर सकें। हा देवदासच्या मुखातला संवाद असो की तवायफोंकी किस्मत मे शौहर नही होते, या पारोच्या वाक्याला तवायफोंकी तो किस्मत ही नही होती, हे चंद्रमुखीचे उत्तर अशी एकाहून एक सुरेख संवादांची लड देवदासमध्ये गुंफली आहे. याचे श्रेय देवदास कादंबरीचे लेखक शरद्चंद्रांना द्यायचे ठरवले तरी भन्सालींच्या त्यानंतरच्या चित्रपटांमध्येही असेच एकाहून एक सुरेख संवाद ऐकायला मिळतात. बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीला घेऊन आलेल्या बाजीरावचे औक्षण केल्यानंतर ये स्वागत सिर्फ इस चौखट पे है, दिल कि चौखट पेे नही, असे बाणेदार उत्तर देणारी काशीबाई असो की चीते की चाल,बाज की नजर और बाजी राव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है, हा बाजीरावच्या तोंडचा संवाद असो, हे संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेले.
पद्मावतमध्येही असेच मनाचा ठाव घेणारे संवाद आहेत. राजपुती कंगनमे उतनीही धार है, जितनी तलवार मे, हा राणी पद्मिनीच्या तोंडचा संवाद असो की चिंता को तलवार कि नोक पे रखे वो राजपुत, रेत कि नाव लेके समंदर से शर्त लगाए वो राजपुत, हे राणाच्या तोंडचे संवादही खूप भाव खाऊन गेले. असेच संवाद गंगुबाईमध्येही आहेत. कुंवारी आपने छोडा नही, और श्रीमती किसीने बनाया नही, कहते है कमाठीपुरा मे कभी अमावस की रात नही होती, क्योकि वहाॅं गंगूबाई रहती है, अरे जब शक्ति, संपत्ति, और सद्बुद्धि ये तिनो औरते है, तो इन मर्दोंको किस बात का गुरुर, असे एकापेक्षा एक सरस संवाद प्रेक्षकांची दाद घेऊन गेले.
याशिवाय एक महत्त्वाचे निरीक्षण मांडायचे तर संजय लिला भन्सालींचे चित्रपट महिला केंद्रीत विषय मांडण्याचा प्रयत्न करतात, भन्सालींची निर्मिती असलेले ब्लॅक, गुजारिश असोत की त्यांनी दिग्दर्शित केलेले देवदास, बाजीराव मस्तानी, पद्मावत असोत किंवा अलिकडचा गंगुबाई असो, देवदास आणि गंगुबाईमध्ये तर सभ्य समाज ज्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहतो, अशा वेश्यावृत्तीच्या स्त्रीची कथा भन्सालींनी यशस्वापणे सांगितली आहे. देवदास ही पारो आणि देवदासच्या प्रेमाची कथा असली तरी त्यातुन चंद्रमुखीचे दुःख, तिचे देवदासवरचे निरपेक्ष प्रेम, तिची अगतिकता, तिच्या भावभावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात भन्साली यशस्वी ठरले आहेत.
गंगुबाई काठियावाडी चित्रपटाची नायिकाच वेश्यावृत्ती करणारी स्त्री आहे. समाजाने ज्यांना दुय्यम किंवा हिन समजले अशा स्त्रियांच्या आयुष्यातील व्यथा मांडण्याचा प्रयत्न हिंदी चित्रपटांनी खूप आधीपासून केला. शहजादा सलीम आणि नर्तकी अनारकली यांच्या जीवनावरील अनारकली, मुघले आजम, चित्रलेखा, पाकिझा, उमरावजान, सूरसंगम, जोहराचे दुःख सांगणारा मुकद्दर का सिकंदर, देवदासींच्या व्यथा सांगणारा महानंदा अशा अनेक चित्रपटांतून कधी जन्माने तर कधी कर्माने भाळी आलेले दुःख मुकपणे भोगणाऱ्या या स्त्रियांच्या शरीराच्या आतील मनाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला गेला. याच शृखंलेतील एक कडी म्हणजे भन्सालींचा गंगुबाई काठियावाडी.

नकळत्या वयात ज्याच्यावर प्रेम केले, त्यानेच शरीराचा बाजार मांडणाऱ्या वस्तीत आणून विकले. हे कळल्यानंतर आणि आता परतीचे मार्ग कायमचे बंद झाले आहेत हे वळल्यानंतर सुरुवातीला नाईलाजाने आणि नंतर अंगवळणी पडल्यामुळे या शरीरविक्रयाला सरावलेली चांगल्या घरातली गंगु आपले प्राक्तन विनातक्रार स्विकारते. घरदार, नातेवाईक, सख्या सगळ्यांना मागे सोडून या बदनाम वस्तीत आलेली गंगु इथल्याच तिच्यासारख्या अभागी मुलींना आपले मानते. त्यांचे दुःख समजून घेते. त्यांना आयुष्यातील छोटे-छोटे आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करते. एक दिवस शरीर आणि मन दोन्ही पालापाचोळ्यासारखे कुस्करुन टाकणारा एक जल्लाद अवचित उभा ठाकतो आणि सारे विस्कटुन टाकतो. शरीरच विकायला बाजारात बसलेल्या तिने तक्रार करायची कोणाकडे? मात्र असा फरिश्ता तिला करीम लालाच्या रुपाने भेटतो आणि गंगुच्या जीवनाला वेगळं वळणं लागतं. काही निराळे हिशोब सुरू होतात. गंगु माफिया क्विन बनते. तरीही अजुनही मनाचा हळवा कोपरा रिकामाच असतो. पैशांसाठी रोज चुरगळल्या जाणाऱ्या शरीराच्या आत एक जिवंत मन असतच की. ते कोणाचीतरी वाट पहात असतं. आणि तो कोणीतरी अवचित तिच्या आयुष्यात येतो. त्याला शरीराच्या आतली ती भावली असते. तिचे सारे सत्य समजुनही ती त्याला हवी असते. त्याचे तिच्यावर खरेखुरे प्रेम असते. शरीराचा व्यापार करणाऱ्या त्या बदनाम गल्ल्यांमध्ये तिच्यावर जीव जडवणारा तो वेगळा असतो. तिचेही मन त्याच्यासाठी धडधडु लागते. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटतो.
इथे महाकवी गदिमांची जोगीया कविता आठवते.
शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

गदिमांच्या जोगियातला सारखा गंगुलाही भांगेत तुळस पेरणारा श्याम या बदनाम गल्लीत भेटतो. मात्र गंगु निग्रहाने त्याचे प्रेम नाकारते. मनोमन मात्र त्याच्यावर अबोल प्रीती करीत राहते. एका निष्पाप जीवाचे भविष्य वाचविण्यासाठी ती खुद्द आपले प्रेम समर्पित करते. आणि त्याला लग्न करायला भाग पाडते.

देवदासमधली चंद्रमुखीही अशीच देवदाससाठी सारे काही कुर्बान करते. त्याचे आपल्यावर प्रेम नाही, हे सत्य माहिती असतानाही त्याच्या सहवासासाठी,त्याच्या एका कटाक्षासाठी तळमळत राहते.

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी

जोगीयातल्या नायिकेसारखीच सारे काही दूर सारून चंद्रमुखीही देवदासची वाट पहात राहते, कारण तिचा तिच्या सच्च्या प्रीतीवर विश्वास असतो.
भन्सालींनी देहाचा व्यापार करणाऱ्या या स्त्रियांचे हळवे मन उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत.
या सगळ्या पसाऱ्यात अडकलेल्या गंगुला एकदा तिचे घर तीव्रतेने आठवते. ती घरचा नंबर फिरवते आणि अपेक्षित असेच उत्तर तिला मिळते. नाकारले गेल्याचे. उमरावजानमध्येही असाच प्रसंग आहे. खूप वर्षांनंतर उमराव तिच्या गावी येते. मो्ठ्या आशेने आपल्या घरी जाते आणि सख्ख्या छोट्या भावाकडून नाकारली जाते. आपले असणाऱ्या साऱ्यांनी असे नाकारल्यानंतरही काय जगवत असेल, या दुर्भागी स्त्रियांना? कुठली प्रेरणा श्वास घ्यायला भाग पाडत असेल, त्या घुसमटलेल्या अस्वस्थ जगात. कदाचित त्यांच्या आयुष्यात आलेले असेच चुकार निसरडे क्षण. वाळवंटातल्या हिरवळीसारखे. उमरावला तिची कविता, चंद्रमुखीला देवदासचा न संपणारा इंतजार आणि गंगुला तिचे अबोल पण परिपक्व प्रेम जगायला भाग पाडत असेल. तराजुच्या एका पारड्यात असे काही अनमोल क्षण आणि दुसऱ्या पारड्यात रोजचे न संपणारे सौदे. अनमोल क्षणांचे पारडेच नेहमी जड ठरत असेल आणि त्या क्षणांवर उधळून टाकत असतील या आपली जिंदगी.

Wednesday, 27 April 2022

 अयोद्ध्या नृपती राजाराम

 
स्वाती हुद्दार

 
यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महितले।

तावत् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति।’


या पृथ्वीतलावर पर्वत आहेत, नद्या आहेत, स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे. या शब्दांत महर्षी वाल्मिकींनी रामायणकथेची कालातीतता सांगितली त्याप्रमाणे युगानुयुगे अव्याहत विविध भाषांमधून रामकथेचं गायन सुरू आहे आणि आजही त्याची गोडी अवीट आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती आणि प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. रामकथा सांगणाऱ्या प्रत्येकाने रामजीवनाचे विविध पैलू दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श मित्र, आदर्श स्वामी, आदर्श राजा अशी आदर्शाची नानाविध रुपं रामायणातून चित्रित केली आहेत. थोडक्यात रामायण ही आदर्शांची कथा आहे.
बुधकौशिक मुनींनी रचलेल्या श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रात
श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम,
अशी रामाची विविध रुपे येतात, त्याचबरोबर
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
राजांमध्ये श्रेष्ठ असलेले श्रीराम असेही वर्णन येते.
रामायणकाळात आणि त्याआधीही सर्वच राजे कर्माने आदर्शाने श्रेष्ठ होते. राजसिंहासन ही भोगाची नव्हे तर त्यागाची जागा होती. श्रीरामांच्या रघुकुळातच गंगेला पृथ्वीवर आणणारे राजा भगीरथ, देव-दानव युद्धात महत्त्वाची भुमिका पार पाडणारे श्रीरामांचे वडील राजा दशरथ, संन्यस्त वृत्तीने राज्यकारभार सांभाळणारे श्रीरामांचे श्वशुर मिथिला नरेश राजा जनक असे महान राजे होते. असे असतानाही बुधकौशिक मुनी श्रीरामांचे वर्णन राजमणि असे करतात, ते केवळ त्यांच्यावरील भक्तीपोटी नव्हे, किंवा त्यांच्यातील देवत्वाला स्मरुनही नव्हे. तर राजाराम म्हणून श्रीरामांनी जे आदर्श आयुष्यभर जपले, त्या आदर्शांचा परिपाक म्हणून श्रीराम राजमणि आहेत. इश्वाकुवंशीय रघुकुलतिलक दशरथनंदन श्रीराम जीवनातील विविध भुमिका, नाती पार पाडत असतानाही राजा राम ही भुमिका त्यांना कायम लगडलेलीच होती. अयोध्येचे राजे म्हणून राज्याभिषेक होण्यापूर्वीही राजधर्म त्यांच्या कणाकणात भिनलेला होता.
मराठीतील आधुनिक वाल्मिकी गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणात रामाच्या तोंडी घातलेल्या गीतांमधून याची वारंवार प्रचिती येते.
श्रीराम लक्ष्मण सीतेला गंगातीरी सोडून अयोध्येत परतलेल्या सुमंताला राजा दशरथांनी विचारले, काय म्हणाला रे माझा राम? दशरथांच्या त्या प्रश्नानंतर सुमंतानं सांगितलेला श्रीरामांचा निरोप म्हणजे अवघा राजधर्म आहे.
बोलले इतुके मज श्रीराम
या अत्यंत भावस्पर्शी गीतातील पाचव्या कडव्यात आपल्या मातेला सुमंताकरवी निरोप पाठवताना श्रीराम राजधर्माची आठवण करून देताना सांगतात,
राजधर्म तू आठव आई
अभिषिक्ताते गुणवय नाही
अभिषिक्त राजाचं वय लहान असलं किंवा कदाचित तो गुणांनी कमी असला तरी त्याचा राजा म्हणून मान निसंशय असतो, आता पिताश्रींच्या आज्ञेनं भरत अयोध्येचा राजा होणार आहे, त्यामुळं त्याच्या राजपदाचा सन्मान करणं, तुझं कर्तव्य आहे. अयोध्येचं राज्यपद त्यागुन पत्नी आणि धाकट्या भावासह वनवासी झालेल्या श्रीरामांना, आप्तेष्टांच्या विरहाच्या दुःखातही राजधर्माची तीव्र जाणिव आहे. आणि म्हणूनच ते राजमणि आहेत.
पुढे भरतासाठी सुमंताजवळ निरोप देताना श्रीराम त्यालाही राजधर्म सांगतात,
प्रजाजनांवर ठेवी ममता,
भोग सुखाचा अखंड घेई, मनी राही निष्काम

राजासाठी त्याची प्रजा ही पुत्रांप्रमाणे असते, प्रजेचं सुख हे राजासाठी सर्वोपरी असतं. तेव्हा प्रजेची काळजी घे, तेच राजाचं प्रथम कर्तव्य आहे. राजाजवळ जी साधनसंपत्ती आहे, ती प्रजेची ठेव आहे, त्यामुळं त्या साऱ्याचा उपभोग घेताना मन त्यात गुंतू देऊ नकोस, त्या संपत्तीचा मोह उत्पन्न होऊ देऊ नकोस, असा सल्ला श्रीराम आपल्या धाकट्या भावाला देतात.
पुढे श्रीराम भरताला सांगतात, राज्य नीतिने करुनी वाढवी रघुवंशाचे नाव
कैकयीच्या दुराग्रहापोटी राज्यत्याग करुन श्रीरामांना वनवास स्वीकारावा लागला, कैकयीनं हे भरतासाठी केले, मात्र त्याविषयीची कुठलीही कटुता मनात न ठेवता श्रीराम भरताला राजनीतीचे धडे देत आहेत. त्याला रघुवंशाचे नाव मोठं करायला सांगत आहेत. स्वतः वनवासी झालेला हा अयोध्येचा उत्तराधिकारी राज्यकाराभाराविषयी किती दक्ष होता, प्रजाहिताविषयी किती जागरुक होता, हे यावरून कळतं आणि म्हणूनच ते राजमणी आहेत.
राम आणि सीता म्हणजे प्रकृती आणि परमेश्वर. आकाश आणि धरा. रावणानं सीता हरण केल्यानंतर रामाची झालेली विकल अवस्था वनातल्या सृष्टीनं अनुभवली. लक्ष्मणानं बघितली. सीतेसाठी श्रीरामांनी लंकेवर आक्रमण केलं. रावणाचा वध केला. आणि या सगळ्या सायासानंतर जेव्हा सीता श्रीरामांसमोर आली, तेव्हा त्यांचं पुनर्मिलन पाहण्यासाठी आकाशात साऱ्या देवदेवता गोळ्या झाल्या होत्या. मात्र तिला सामोरे आलेला राम हा तिच्यावर निस्सिम प्रेम करणारा तिचा पती नव्हता. तो होता अयोध्येचा भावी राजा राम. कारण दहा महिने केवळ श्रीरामांच्या चिंतनामुळेच जीवित राहिलेल्या श्रीरामांच्या प्रेम कटाक्षासाठी आसुसलेल्या सीतेला राजाराम म्हणतात,

मी केले नीजकार्यासी

दशदिशा मोकळ्या तुजसी

नच माग अनुज्ञा मजसी

सखी सरले ते दोघांमधले नाते

श्रीरामांचे हे बोल ऐकून सीता अवाक् झाली असेल. याक्षणी धरती पोटात घेईल तर बरं, असं तिला वाटलं असेल. अर्थात हे बोलताना सीतापती श्रीरामांच्या हृदयाला किती घरं पडली असतील, हे देखील तिला चांगलंचं माहिती होतं, कारण सीता-राम हे द्वैत नव्हतंचं मुळी. सीतेनं केलेल्या अग्निदिव्यात सीतेचं शरीर अग्निच्या ज्वालांनी वेढलेलं असलं तरी त्याच्या झळा जाणवत होत्या, त्या रामाला. अग्निदिव्य केलं सीतेनं मात्र तावुनसुलाखुन निघाले राम. सीतेच्या अंतर्बाह्य शुद्धीची जानकीवल्लभ रामाला शंका नव्हतीच. तिला अग्निपरीक्षेची आज्ञा दिली होती, राजारामानं. आणि ती शिरसावंद्य मानली होती, अयोध्येच्या महाराणीनं.
श्रीराम हे लोकनायक होते. लोकनायकाला वैयक्तिक सुखदुःख, आवडीनिवडी नसतात, कारण समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पहात असतो. समाजहिताच्या दृष्टीनं जे आवश्यक ते निर्णय कितीही कटु असले तरी लोकनायकाला घ्यावे लागतात, व्यक्तिगत आयुष्य, नातीगोती याची त्यामध्ये राखरांगोळी होते, असे कठोर निर्णय घेण्याचे अनेक प्रसंग श्रीरामांच्या आयुष्यात आले आणि त्या प्रत्येक प्रसंगात पुत्र, मित्र, भ्राता ही सारी नाती सांभाळणाऱ्या कुटुंबवत्सल रामावर अयोध्येच्या राजारामाने विजय मिळवला.
प्रजा आणि राष्ट्र कल्याण हे साध्य असून व्यक्ती आणि कुटुंब ही साधनं आहेत. नाशिवंत व्यक्ती वा कुटुंब यांच्यापेक्षा शाश्वत व चिरंतन असलेल्या राष्ट्राची प्रतिष्ठा ही अनंतपटीनं मोठी आहे. ही श्रीरामांची धारणा होती आणि म्हणूनच राणी सीतेच्या पावित्र्याविषयी अतुट विश्वास असूनही केवळ प्रजानुरंजनासाठी राजारामानं गर्भवती सीतेचा त्याग केला. सीतात्यागानंतर राजाराम निष्ठेने उत्कृष्ट राज्यकारभार करीत होते. सीतापती राम मात्र राजप्रासादातही वनवासी जिणे जगत होते. कंदमुळं भक्षण करीत होते. दर्भाच्या शय्येवर नीजत होते. कारण त्यांची प्रिया वनवासी होती.
पुढे प्राणाहून प्रिय असलेल्या लक्ष्मणाला देहान्त शासन करतानाही राजाराम आपल्या न्यायप्रियतेपासून ढळले नाहीत. म्हणून ते राजमणि आहेत.
रामराज्य म्हणजे समाधानाचं राज्य, रामराज्यातील प्रजा सुखी, न्यायी, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष होती. रामराज्यात भेदभाव नव्हता. अयोध्येतल्या राजदंडावर धर्मदंडाचा अंकुश होता. म्हणून आजही सुखी राज्याची कल्पना करताना आम्ही रामराज्याचं उदाहरण देतो. रामराज्य येऊ दे, असं मागणं मागतो.
रामयुगातही अनेक शूरवीर राजे होते, मात्र त्यांनी राक्षसी शक्तींशी युद्ध आरंभले नव्हते. दुष्ट शक्तींचा नायनाट करून सारीकडे आनंदीआनंद निर्माण करणारे केवळ श्रीराम होते. सोन्याच्या लंकेवर विजय मिळवुनही तिचा मोह न करता ती बिभीषणाला देऊन ’जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरियसी’ म्हणणारे होते केवळ श्रीराम. स्वातंत्र्याचे भोक्ते होते श्रीराम. मानवी संस्कृतीचा अत्युच्च दीपस्तंभ होते श्रीराम. मानवाला ललामभुत होते श्रीराम. स्वतःच्या चारित्र्याद्वारे राष्ट्रीय जीवनात श्रद्धाकेंद्र निर्माण करणारे होते राम. आणि म्हणूनच ते राजमणि होते. राजाराम होते.
चला तर छत्रसिंंहासनी बसलेल्या अयोध्यानृपती राजारामचरणी लीन होऊया आणि भारतवर्षात रामराज्य येवो, हे मागणे मागुया.
राजारामचंद्र की जय.

 भोंग्यात अडकलेले समाजमन

 
स्वाती हुद्दार

 
कोरोना महामारीने गेली अडीच वर्षे सारे जगच स्टॅच्यू दिल्यासारखे थांबले होते. या काळात माणसाच्या जगण्याची सारी परिमाणेच बदलून गेली. साऱ्या सृष्टीवर अपनाही राज है, असे समजणाऱ्या आणि आपल्या बुद्धीचा अतोनात गर्व झालेल्या माणसाला कोरोना महामारीने चांगलीच चपराक दिली आणि माणूस म्हणजे सृष्टीच्या हातातले केवळ बाहुले आहे, ही जाणीव करून दिली. त्या दुःस्वप्नातून आत्ता कुठे सारे रुळावर येते आहे पण यातून धडा घेत माणूस अजिबात सुधारला नाही. आपल्या यकश्चित्व, जीवनाची क्षणभंगुरता कळल्यानंतरही एकमेकांवर कुरघोडी करण्याची त्याची खोड गेली नाही, हेच सध्याची जागतिक परिस्थिती पाहता लक्षात येते.
जगात सगळीकडेच सध्या अशांतता आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. माणसे एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. पाकिस्तानातही तख्तपलट झाले. श्रीलंकेत आणीबाणी लागली. भारतातही काही ऑलवेल नाही. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. समाजमन अस्थिर आहे. दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. इडीच्या कारवाया सुरूच आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे वादळ घोंघावते आहे. एसटीचा अनेक महिने लांबलेला संप आता कुठे संपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला. त्यावरून नको तेवढी टीकाटिप्पणी झाली.
यातच भरीस भर म्हणून राज्यात भोंग्यावरुन वादळ उठले आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदीसमोर हनुमानचालिसा सुरू करू, अशी धमकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. असा अल्टीमेटस देणे ही राज ठाकरेंच्या राजकारणाची स्टाईल आहे. या आधीही त्यांनी छठ पुजा, मराठी पाट्या, दादर स्टेशन बाहेरचे किरकोळ विक्रेते, असे बरेच मुद्दे गाजवत त्यांच्यातला राजकारणी जिवंत ठेवला. राज ठाकरेंनी राजकारणासाठी निवडलेले मुद्दे, त्यांचे खळ्ळखट्याक, त्यांची भाषणे, त्यांचे लाव रे तो व्हिडिओ, असे संवाद हे नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. त्यांच्या सभा नेहमीच गर्दी खेचून घेतात, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. परिणामी २००६ मध्ये स्थापन झालेली मनसे सत्तेसाठी अजूनही चाचपडते आहे. अर्थात आजचा लेखन प्रपंच त्यासाठी नाही.
आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष, नेते समाजस्वास्थ्य दावणीला बांधतात. त्यांना सोयिस्कर असा मुद्दा सतत तापत ठेवणे, आणि त्यावर आपली राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घेणे, ही त्यांच्या धंद्याची गरज असते, पण सामान्य जनता त्यांच्या घोषणांना, त्यांच्या उकरून काढलेल्या विषयांना बळी पडते, त्यालाच जीवन मरणाचा प्रश्न समजते आणि आपले जगणे मरणे विसरून जिंदाबाद-मुर्दाबाद करू लागते, मोर्चे काढु लागते, कधी-कधी माथी भडकतात, डोकी फुटतात. निष्पापांचे अकारण जीवही जातात.
भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात असाच तणाव आहे. अचलपूर -अमरावती पेटले आहे. तिथे संचारबंदी लावेपर्यंत परिस्थिती चिघळली आहे. उत्तरप्रदेशातही हा मुद्दा गरम होऊ लागला होता, मात्र मुख्यमंत्री योगींनी नियमावली जारी करीत भोंग्याच्या आवाजावर निर्बंध घालत या मुद्द्यातील हवाच काढून टाकली. एकीकडे रामनवमी हनुमान जयंतीला धार्मिक विद्वेषातून मिरवणुकीवर दगडफेक होत असताना मुंबईतील मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील पहाटेच्या भोंग्यांचा वापर बंद केला आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे.
सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान सुरू आहे. अनेक हिदू बांधव आनंदाने इफ्तार पार्टीत सामील होताहेत. अनेक मुस्लिम बांधव श्रीराम शोभायात्रेत सरबत वाटप करतात, खरेतर भारतीय समाजमन असेच घट्ट विणीने विणलेले आहे. मात्र कधीतरी कोणीतरी या विणीला छेद देतो आणि ही वीण उसवत जाते. मग सारेच बिघडते, दंगली उसळतात. होत्याचे नव्हते होते. आणि उरते केवळ शुन्य.
खरेतर कोणत्याही धर्माचे तत्वज्ञान एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचवायला भोंग्यांची गरज नाही. धर्म आणि तत्वज्ञान खूप पुरातन आहे आणि भोंगे खूप अलिकडचे. भोंगे अस्तित्वात नव्हते, तेव्हाही पवित्र मनाने केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत, अल्लापर्यंत पोहोचतच होती. आमची प्रार्थना, आमची भक्ती भोंग्यांसारख्या बाह्य साधनांवर अवलंबून राहू नये. आपली प्रार्थना इतरांसाठी त्रासाची ठरू नये, ही सच्चा चेल्याची, भक्ताची जबाबदारी असते. कारण कोणताच धर्म द्वेष करायला शिकवत नाही.
आता राहिला मुद्दा भोंग्याचा. दिवसातून पाच वेळा मशिदींमधुन भोंग्यांवरून अझान दिली जाते. अझान म्हणजेच प्रार्थनेसाठी, नमाज पढण्यासाठी गोळा होण्यासाठी दिलेली हाक. पारंपरिकरित्या मुआझिन मशिदीच्या मनोऱ्यावरून मोठ्या आवाजात अझानचं पठण करायचे, विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यासाठी सगळीकडे लाऊडस्पीकरचा वापर होऊ लागला. १९३६ साली पहिल्यांदा मशिदीमध्ये मायक्रोफोन-लाऊडस्पीकरचा वापर झाल्याचा उल्लेख सिंगापूरमधला आहे. मात्र गेल्या काही दशकांत लाऊडस्पीकरवरून अझान हा वादाचा मुद्दा बनत गेला. भारतातच नाही, तर जगभरात, अगदी अरब आणि मुस्लीम राष्ट्रांमध्येही.
केवळ मशिदीतच नाही, तर हिंदू, ख्रिश्चन अशा अन्य धर्मियांमध्येही वेगवेगळ्या सणांच्या वेळी तसेच उत्सव, लग्न, जत्रेत मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकरचा वापर होतो. भारतात लाऊडस्पीकरच्या वापराचे नियम आणि निर्बंध समान आहेत असं कायदेतज्ज्ञ सांगतात. २०१६ साली मुंबई उच्च न्यायालयाने जजमेंट दिलं होतं की, लाऊडस्पीकरचा वापर करणं हा मूलभूत अधिकार नाही. कोणताही धर्म हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही. पण शांतीपूर्ण जीवन जगणं हा मात्र मूलभूत अधिकार आहे. भारतात लाऊडस्पीकरच्या वापराविषयीचे नियम २००० साली लागू झाले. The Noise pollution (regulation and control) rules अर्थात ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण या नावानं ते ओळखले जातात. हेच नियम मशीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही लागू होतात.
त्यामुळे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. तो सर्वसामान्याच्या आरोग्याशी, ध्वनी प्रदुषणाशी संबंधित आहे. मात्र त्याला देण्यात आलेला धार्मिक रंग चुकीचा आहे. आणि त्यासाठी देण्यात आलेली धमकी (भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा पठण करणार) त्याहुन चुकीची आहे. कारण हनुमान चालिसा पठणामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा त्रासही नागरिकांनाच होणार आहे. म्हणजे एक ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी दुसरे ध्वनी प्रदुषण. म्हणुनच मुद्दा उपस्थित होतो, की राज ठाकरेंना ध्वनी प्रदुषण संपवायचे आहे की केवळ राजकारण करायचे आहे.
हे सगळे कमी होते की काय म्हणून या आठवड्यात जनतेने निवडुन दिलेले आमदार जाहीर भाषणात जातीयवादी टीका करतात, एक खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देतात, हे सगळे पाहिले की दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर किती घसरत चालला आहे, हे लक्षात येते आणि वाटते की या महाराष्ट्राला नक्कीच कोणाची तरी दृष्ट लागली आहे.
राजकारणाच्या या सगळ्या धबडग्यात आम्ही एवढे अडकलो की आज भोंग्यांसाठी भांडणारे आम्ही गेल्या वर्षी याच दिवसात ऑक्सिजन आणि बेडसाठी झुंजत होतो. एकेका श्वासासाठी झगडत होतो.अनेकांची प्राणाची बाजी लागली होती. अनेकांना आप्तेष्टांना मुकावे लागले होते, हे सोयिस्करपणे विसरलो आहोत.
राजकारणी आज भोंग्याचा मुद्दा मांडत आहेत, उद्या कोणता तरी नवा मुद्दा मांडतील, आणि आम्ही त्यावर चर्वितचर्वण करण्यात, प्रसंगी मोर्चे काढण्यात, जिंदाबाद-मुर्दाबाद करण्यात आमच्या आयुष्यातील बहुमुल्य क्षण गमवून बसू, तेव्हा या सगळ्याला वेळीच लगाम घालणे, हेच सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे.

 स्वरवेधने पेलले ’कट्यार’चे शिवधनुष्य
स्वाती हुद्दार

मिटता कमल दल
होई बंदी हा भृंग
परि सोडिना ध्यास
गुंजनात हा धुंद

स्वरांच्या लयकारीने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला होता. माना डोलत होत्या. वाह...वाहची दाद मिळत होती. सारे सभागृह ताल-सुरांच्या हिंदोळ्यावर झुलत होते. सुर थांबले आणि वन्स मोअरच्या घोषणांनी सभागृह दणाणले. रसिकांच्या विशेष आग्रहास्तव गाणे पुन्हा सुरू झाले आणि रसिक पुन्हा स्वरानंदात भिजु लागले. तो सुर होता मुळचा नागपुरचा महागायक अनिरुद्ध जोशीचा आणि निमित्त होते, स्वरवेध निर्मित कट्यार काळजात घुसली...एक अनुभुती या नाटकाचे.
१९६७ साली प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेतर्फे हे नाटक सर्वप्रथम रंगभुमीवर आले आणि अल्पावधीतच या नाटकाने रसिकांची मने मोहून टाकली. नागपूरकर रसिकांच्या मनात या नाटकाला विशेष स्थान आहे, कारण हे नाटक ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले ते मास्तर म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपूरचे आणि या नाटकातली खॉंसाहेबांची मध्यवर्ती भुमिका ज्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केली, ते चतुरस्त्र गायक आणि अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडेही नागपूरचे.
योगायोग असा की ’मी वसंतराव’ हा डॉ. वसंतराव देशपांडेंच्या जीवनावरचा चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन रसिकांच्या मनात त्याची याद ताजी असतानाच त्यांच्या अभिनयाने गाजलेले हे नाटक स्वरवेधने रंगभुमीवर आणले आणि ते सुद्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात.
खरेतर हे नाटक सादर करणे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, कारण अनेक दिग्गज कलावंतांच्या प्रतिभेचा परीसस्पर्श या कलाकृतीला झाला आहे. नाट्यशास्त्र कोळून प्यालेल्या मास्तरांच्या लेखणीतून ही कलाकृती उतरली आहे. पं जितेंद्र अभिषेकींसारख्या चतुरस्त्र संगीतकाराने यातील गीतांच्या चाली बांधल्या आहेत. भार्गवराम आचरेकर, वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, फैय्याज, बकुळ पंडीत अशा दिग्गज कलावंतांनी यातील भुमिका वठविल्या आहेत, त्यातच भर म्हणजे नुकताच या संहितेवर आधारीत चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे नवीन पिढीचीही या कथानकाशी ओळख झाली आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर हे नाटक दर्दी रसिकांसमोर पेश करणे, ही परीक्षाच होती, मात्र नागपुरकर गुणी कलावंतांनी ते आव्हान लिलया पेलले आणि हे नाटक रसिकांच्या पसंतीला उतरले.
स्वरवेधच्या नाटकाचे वेगळेपण हे की यातील पदे गाणारे कलावंत आणि अभिनय करणारे कलावंत वेगळे होते. महागायक अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर, आदित्य सावरकर, यश खेर, राम वनकर, राधा ठेंगडी, साक्षी सरोदे, श्रृती बाईवार, लक्ष्यती काजळकर या सगळ्या गायकांनी अत्यंत तयारीने ही पदे सादर केलीत. अभिनय करणाऱ्यांचे आणि गायकांचे ट्युनींग इतके जबरदस्त होते, गायकांच्या शब्दाबर हुकुम अभिनय करणाऱ्यांच्या ओठांची हालचाल होत होती. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
शंतनु ठेंगडी या कलाकाराने उभे केलेले खॉसाहेब तर लाजवाब. हिंदुस्थानी संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय. मुळात गंभीर असलेल्या या नाटकाला हलकीफुलकी विनोदी झालर देण्यात चॉंद- उस्मान आणि कवीराज ही पात्रे उभी करणारे कलावंत यशस्वी ठरले.
कविराज, सदाशिव, उमा, झरीना या पात्रांनी मिळून सादर केलेली गद्य आणि पद्यमय रागमाला या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. संगीत हेच सर्वस्व असणाऱ्या सदाशिवची संगीत विद्येसाठीची तगमग आणि त्याच्यावर अबोल प्रेम करणारी झरीना या दोघांचाही अभिनय दाद मिळवुन गेला. प्रत्यक्ष रंगभुमीवर न येणाऱ्या पंडीत भानुशंकर यांचे अस्तित्व नाटकभर जाणवत ठेवण्यात या नाटकाचे दिग्दर्शक ॲड. भानुदास कुलकर्णी आणि सारंग मास्टे यशस्वी ठरले आहेत.
अप्रतिम नेपथ्य आणि उत्कृष्ट संगीत ही या नाटकाची बलस्थानं आहेत. एका अक्षर कलाकृतीचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न स्वरवेधने केला आणि नागपुरकर रसिकांना तृप्त केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि यापुढेही अशाच उत्तमोत्तम कलाकृती स्वरवेधने प्रस्तुत कराव्या, यासाठी शुभेच्छा.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह