बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्यातल्या "पिंगा' या गाण्याविषयी वाद सुरू झाला. अलीकडे चित्रपट आणि वाद हे समीकरणच झाले आहे. कदाचित तो प्रसिद्धीचा फंडा असावा. माध्यमांची भाऊगर्दी, त्यातून मिळणारी प्रसिद्धी आणि दर आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या शेकडो चित्रपटांची स्पर्धा. कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी निर्मात्यांची सुरू असलेली धडपड. या सगळ्यामुळे असेल कदाचित, पण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच त्याविषयीची प्रसिद्धी पद्धतशीरपणे केली जाते आणि हळूहळू वादही उत्पन्न केले जातात. "बाजीराव मस्तानी'त नायक-नायिका असलेले रणवीर सिंग आणि दीपिका यांच्याच भूमिका असलेला "रामलीला' हा चित्रपटही त्याच्या नावावरून असाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता हा योगायोग की आणखी काही... हे प्रेक्षकांनीच ठरवावे.
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट त्यातले पात्र सोडले तर संजय लीला भन्सालीच्याच "देवदास' चित्रपटाची कॉपी आहे. भव्यदिव्य सेट्स, ऐतिहासिक पार्श्वभूमी, एकाच व्यक्तीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन प्रेमिकांची कहाणी, एवढेच नव्हे तर देवदासमध्ये "डोला रे डोला'वर नाचणाऱ्या बंगाली पेहरावातल्या पारो आणि चंद्रमुखी आणि बाजीराव-मस्तानीमध्ये पिंगावर नाचणाऱ्या मराठी पेहरावातल्या काशी आणि मस्तानी. इथपर्यंत सगळे सारखे. मात्र देवदास मनात रुततो. बाजीराव साधी मनाची पकडही घेत नाही. "बाजीराव-मस्तानी'ने फिल्मफेअर पुरस्कारांवर मोहोर उमटविली असताना हे विधान धाडसाचे ठरेल.
देवदास शरद्चंद्र चटोपाध्यायांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. याआधी दिलीपकुमारने त्याच्या अभिनयाने देवदास खुलवलाच. वैजयंती माला आणि सुचित्रा सेनने त्याला पूरक साथ दिली. दिलीपकुमारच्या देवदासने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. त्याची छाप असतानाही शाहरुखचा देवदासही रसिकांनी उचलून धरला. त्याचे श्रेय शरद्चंद्रांच्या प्रतिभेला जाते. त्यातल्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या संवादांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाहरुखच्या अभिनयाला जाते. शाहरुख देवदास जगला. शाहरुखने देवदास मनात ठसवला. पारोला सतावणारा देवदास, वहिनीला चिडवणारा देवदास, वडिलांच्या प्रेमाला आसुसलेला देवदास, आईवर प्रेम करणारा देवदास, मित्राच्या शपथेसाठी दारू पिणारा देवदास, चंद्रमुखीचे जीवन व्यापून उरलेला देवदास आणि पारोला दिलेल्या शब्दासाठी अंतिम क्षणी तिच्या दारी आलेला देवदास. शाहरुखने साकारलेला देवदास हाच शरद्चंद्राचा खराखुरा देवदास वाटतो.
बाजीरावची भट्टी मात्र जमलीच नाही. संजयला मराठी मनात रुजलेला शूर योद्धा बाजीराव दाखवायचाच नव्हता. त्याला बाजीराव-मस्तानीची प्रेमकथाच रंगवायची होती. त्यामुळे योद्धा बाजीराव संजयच्या चित्रपटात दिसला नाही, त्याबद्दल तक्रार नाही, पण मस्तानीवर जिवापाड प्रेम करणारा बाजीरावही रणवीरला नीट रंगवता आला नाही. बाजीराव पेशवे हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे. मराठी साम्राज्याला वैभव प्राप्त करून देण्याचे श्रेय बाजीरावाला जाते. असा शूरवीर, लोकमान्य पुरुष तेवढ्याच गंभीरपणे साकारला गेला पाहिजे, भलेही त्याची प्रेमकहाणी रंगवायची असो. मराठी मनांमध्ये बाजीरावाची विशिष्ट प्रतिमा आहे. ऐतिहासिक पात्र रंगवताना ते खूप जबाबदारीने साकारायचे असते. जनसामान्यांच्या मनातील प्रतिमेला तडा देऊन ती भूमिका कधीच अजरामर करता येत नाही. केवळ रूपरंग त्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाणारे असणे पुरेसे नाही. ती भूमिका जगावी लागते. त्यात पुरेपूर उतरावे लागते. ती भूमिका जिवंत करावी लागते. रणवीर सिंग या प्रयत्नांत सपशेल अपयशी ठरला आहे. रणवीर या चित्रपटात बाजीराव न वाटता विदूषक वाटला, बाजीरावाचा बहुरूपी वाटला. रणवीरवर चित्रित झालेले "दुष्मन की कैसे वाट लवली' हे गाणे, त्यातील रणवीरचा बालिश अभिनय, त्यातील निरर्थक शब्द म्हणजे तर रणवीरच्या विदूषकीपणाचा कळस आहे. पिंगा गाण्यावर आक्षेप घेण्यापेक्षा मराठी माणसांनी या गाण्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता.
मस्तानीच्या आरसपानी दैवी सौंदर्याशिवाय तिच्याविषयी इतिहासात फारशी नोंद आढळत नाही. कदाचित त्यावेळच्या समाज आणि राज्य व्यवस्थेने तशी नोंद होऊ नये, याची पुरेशी काळजी घेतली असेल. ती शूर होती, स्वाभिमानी होती आणि बाजीरावावर नितांत प्रेम करत होती, या सगळ्या पैलूंवर या चित्रपटानेच प्रकाश टाकला आहे; मात्र दीपिकाचीही भट्टी नेहमीसारखी जमली नाही, असेच तिने साकारलेल्या मस्तानीविषयी म्हणावे लागेल. समाजाने अव्हेरलेली देवदासची चंद्रमुखी आपले अव्हेरलेपण, समाजातले आपले नगण्य स्थान स्वीकारूनही अलगद मनात रुजते, तसे मस्तानीच्या बाबतीत होत नाही. तुलनात्मक उदाहरणच द्यायचे तर देवदासमधल्या पारो आणि चंद्रमुखीचे संवाद आणि "बाजीराव मस्तानी'मधल्या काशी आणि मस्तानीच्या संवादांचे देता येईल, पारोच्या अभिमानाला चंद्रमुखीची नम्रता पुरून उरली आहे. पारोच्या खानदानी बाण्याला चंद्रमुखी देवदासवरच्या निरपेक्ष प्रेमाने जिंकून घेते. तशी प्रचिती मस्तानी आणि काशीच्या संवादांतून येत नाही. उलट आपण या पेशवीणबाईचे अपराधी आहोत, असाच काहीसा भाव मस्तानीच्या संवादांतून आणि अभिनयातून व्यक्त होत राहतो.
हा संपूर्ण चित्रपट व्यापून उरणारे एकच पात्र आहे, ते म्हणजे प्रियांकाने रंगवलेली काशीबाई. सपोर्टिंग रोल असूनही प्रियांकाने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेषत: राघोबाच्या जन्मानंतर शनिवारवाड्यात प्रवेश करताना बाजीरावाला केवळ नजरेतून दुर्लक्षित करणारा प्रियांकाचा अभिनय, बाजीराव-मस्तानीला मस्तानी महालाच्या दारावर ओवाळणारी आणि "ये स्वागत केवल इस चौखट पर है, दिलके चौखट पर नहीं', असे सांगणारी प्रियांका, बाजीराव शेवटच्या मोहिमेवर निघाला असताना त्याला राधाकृष्णाची कथा ऐकवणारी आणि आपल्या महालात येण्यास मज्जाव करणारी प्रियांका, मनात ठसते. प्रियांकाने शनिवार वाड्यात राहणाऱ्या, भारी वस्त्र आणि अलंकारांनी नटलेल्या घरंदाज स्त्रीच्या मनातले अव्हेरलेपणाचे दु:ख प्रियांकाने तिच्या अभिनयाद्वारे नेमके पकडले आहे. प्रियांकाने रंगवलेली काशीबाई पाहून का कोण जाणे, "साहिब, बीवी और गुलाम'मधली छोटी बहू आठवून जाते. प्रियांका काशीबाईची भूमिका जगली आहे. कदाचित प्रियांकाच्या कसदार अभिनयापुढे दीपिकाचा अभिनय फिका भासतो.
"बाजीराव मस्तानी' चित्रपट लक्षात राहतो केवळ प्रियांकाच्या जीव ओतून केलेल्या अभिनयामुळे.
-स्वाती हुद्दार