आवाजाची दुनीया
स्वाती हुद्दार
आवाजाशी माणसाचे नाते जुळते, ते आईच्या गर्भातच. काळोख्या गर्भातही बाहेरचे आवाज बाळापर्यंत पोहोचत असतात आणि बाळ त्याला प्रतिसादही देत असते. ही आवाजाची दुनीया बाळाला आयुष्यभर सोबत करते. पिढी दर पिढी हे आवाजाचे संदर्भ बदलत जातात. लहानपणी माझी सकाळ व्हायची, आईच्या व्यंकटेश स्तोत्राने. केरवारे करताना, सडा-रांगोळी करताना ती व्यंकटेश स्तोत्र म्हणत असायची.
अन्नासाठी दाही दिशा
आम्हा फिरविसी जगदिशा.
पहाटेच्या नीरव शांततेत साऱ्या घरादाराला व्यापून उरलेला तिच्या प्रसन्न आवाजातील स्तोत्राचा आरोह-अवरोह अंगाभोवती लपेटून घेऊन मी अंथरुणातच पडून राहायचे. मग स्वयंपाकघरात सुरू व्हायची कपबशांची किणकिण. सोबतीला विहिरीच्या खिराडीचा लयबद्ध नाद. आणि दोर पूर्ण सोडल्यानंतर बादली पाण्याच्या पृष्ठभागावर आदळल्याचा डुब् असा आवाज. एखाद्या गवयाला सम गवसावी, तसा. चहाच्या घोटाबरोबर कानावर यायचे आकाशवाणीवरचे अर्चनाचे स्वर आणि सकाळ सुरेल व्हायची. मागोमाग दूध अशी दूधवाल्याची हाळी. मागोमाग भाजी घ्या भाजी, दही घेता का जी असे भाजीवाली, दहीवालीचे आवाज. या सगळ्या आवाजांना आपापले नाद, आपापली ओळख होती. त्या साऱ्या वातावरणाचा, त्या रहाटगाडग्याचा ते आवाज अविभाज्य भाग होते. जगण्याच्या पार्श्वसंगीतासारखे. दिवस पुढे-पुढे सरकायला लागला की आवाजाचा पोतही बदलू लागायचा. वातावरणात शाळा-ऑफीसची घाई जाणवू लागायची. सायकल, रिक्षांच्या घंटी, देवघरातून येणारे नित्यपुजेचे, आरतीचे स्वर निरांजनाच्या स्निग्धतेत भिजून आल्यासारखे वाटायचे. सोबतीला कुकरच्या शिट्ट्या, पोळ्या लाटताना होणारी बांगड्यांची किणकिण, असे जठराग्नी चेतवणारे आवाज. रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याची लकेर. सारे आवाज एकमेकांमध्ये मिसळून द्रुत लयीतल्या तराण्यासारखे कानावर पडायचे. घडाळ्याचा काटा माध्यान्हाकडे झुकू लागला की हे सारे आवाजांची धावपळ कमी व्हायची आणि ते विलंबित ख्यालासारखे कानावर येऊ लागायचे. आई पोळी वाढा, अशी माधुकऱ्याची साद घुमायची. मधूनच बाई भांडी घेता काजी, अशी लकेर उमटायची. दारात दुपार रेंगाळू लागली की तोंडात सुपारीचे खांड चघळत दारासमोरच्या ओट्यावर आयाबायांचा गप्पांचा फड रंगायचा. त्यांच्या सुखदुःखाच्या गुजगोष्टींनी, हास्यविनोदांच्या निवांत आवाजांनी घर-अंगण सुखावून जायचे. अंगणातला चाफा मोहरून जायचा. आणखी थोडा वेळ गेला की हे आवाज सुस्तवायचे आणि अलगद पांघरुणात गुरफटायचे.
संध्याकाळच्या सावल्या गडद होऊ लागल्या की केशरी आकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांचे थवे आणि त्यांचा चिवचिवाट. गोठ्याकडे परतणाऱ्या गायीगुरांचा हंबर. शाळेतून परतणाऱ्या मुलांची आई् अशी साद. संध्याकाळच्या चहाबरोबर रंगलेल्या हास्यविनोदाचे आवाज, तुळशी वृंदावनाजवळ तेवणाऱ्या पणतीच्या उजेडातून येणारा परवचाचा स्वर. मागोमाग तारस्वरात केलेले पाढ्यांचे पाठांतर. इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगची घोकंपट्टी, तालासुरात म्हटलेल्या कवितांमुळे घरादाराला मिळालेली लय. त्यातच मिसळलेला टीव्हीवरच्या बातम्यांचा आवाज. आणि ९-९.३० वाजता पेंगुळलेले घर-दार. एकेक दिवा मालवत दिवसभराचे थकलेले सारे आवाज अलगद पांघरुणात शिरायचे आणि सारे शांत..शांत व्हायचे. मात्र त्या शांततेलाही एक आवाज होता, तृप्तीचा, समाधानाचा. तो आवाज आजच्या हलकल्लोळाच्या, श्रीमंत जागत्या रात्रींच्या झगमगत्या दुनीयेत हरवला आहे. तुमच्यापैकी कुणाला सापडला, तर मला नक्की सांगा. प्रतीक्षेत...