| नभं उतरू आलं पाऊस बेधुंद बरसत होता. मी अंतर्बाह्य बरसत होते. या पावसाशी सूर कधी जुळले नेमकं आठवत नाही. आठवतं तेव्हापासून हा हवाहवासाच वाटला. सखा वाटला. लहानपणी हा आला की नाचऱ्या पावलांनी अंगणभर हुंदडायचे. शाळेसाठी घैतलेल्या कोऱ्या करकरीत वह्यांची पानं फाडून त्याच्या नावा तयार व्हायच्या. पावसाच्या पाण्यात नावा सोडून त्यांचं दूर दूर जाणं बघत राहायचं. प्रवाहाबरोबर हेलकावत जाणारी नाव बघत टाळ्या पिटायच्या. मनसोक्त भिजल्यानंतर आईच्या उबदार पदरानं खसखसून केस पुसायचे. थंडी वाजते म्हणून बोलणी खात तिच्याच कुशीत शिरायचं. बालपण सरलं. पावसाचे नवे संदर्भ आकळले. बरसणाऱ्या बेधुंद सरींमध्ये मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात घेतलेल्या कट चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. पुढे सख्याच्या हातातहात गुंफून अनुभवलेल्या पाऊसधारा, त्या क्षणापासून तर पाऊस जीवलग झाला, तो कायमचाच. सख्याबरोबर पावसाची आठवण आणि पाऊस आला की सख्याची आठवण, ह त्रैराशिकच तयार झालं. पुढे लग्न झाल्यानंतरची पहिली आषाढी पौर्णिमा. माहेरी होते. पाठवणी करताना आईनी ओटी भरली. भरलेल्या आटीतले चार दाणे आईच्या पदरात परत टाकताना तिच्या तृप्त डोळ्यात वात्सल्याचं आभाळं दाटून आलं आणि बाहेर बरसणारा पाऊस माझ्या डोळ्यातूनही पाझरू लागला. आईनी भरलेल्या ओटीनं माझ घर आणि मन दोन्हीही समृद्ध झालं. या पावसाची रुपं तरी किती? कधी धुवॉंधार, कधी रिमझिम. धुवॉंधार बरसतो, तेव्हा तेव्हा एखाद्या सराईत वादकानं मृदंगावर थाप मारावी असा नादमधुर ध्वनी उत्पन्न होतो. रिमझिम बरसतो, तेव्हा वाटते की कान्ह्यानं जणू बासरीवर हळवी सुरावट छेडली आहे, मग मी "मी' उरतच नाही. माझी राधा होते आणि सभोवतालची सगळी सृष्टी गोकुळ होते. सघन आभाळ आपलं सगळं प्रेम पाऊससरींच्या रुपानं वसुंधरेच्या ओटीत टाकतं आणि सुरू होतो धरतीचा सृजनसोहळा. तृप्तीचं समाधानाचं हिरवकंच तेज धरतीच्या अंगांगावर विलसू लागतं. सारी सृष्टी सुगंधानं न्हाऊन निघते, पाऊसथेंब अंगावर झेलत जाईच्या मांडवाखाली कळ्या खुडताना तो धुंद सुगंध तनामनात भरून राहतो. त्या सुगंधानं अवघं जगणं सुगंधीत होतं. घर जवळ करण्याची ओढ लावणारी संध्याकाळ आणि नेमकी ती वेळ साधून कोसळणारा पाऊस यांची कायम युती असते. दिवे लागणीची वेळ, ओढाळ मन, बरसणारा पाऊस आणि सजणाची वाट बघत डोह्यांची झालेली निरांजन, हे सगळं म्हणजे एक अनोख भारलेपण. ढळत्या तिन्हीसांजेला पावसाच्या रिपरिपीत गोधनालाही घररी परतण्याची घाई असते. अशावेळी एखादे चुकार वासरू णकटेच मागे पडते. वृक्षाच्या अश्रयाला जाते. थंडीने थरथरणारी त्याची काया, व्याकुळ डोळे हळवा हंबर काळीज पिळवटून टाकतो. त्यावेळी मात्र म्हणावसं वाटतं, जरा उसंत घे रे बाबा! फक्त ते वासरू त्याच्या आईपाशी पोहोचेपर्यंत थांब, मग हवा तेवढा बरस. काहीजणांसाठी पाऊस म्हणजे खोळंबा, पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे चिकचिक, पाऊस म्हणजे किचकिच माझ्यासाठी मात्र पाऊस म्हणजे अलवार, पाऊस म्हणजे हळुवार, पाऊस म्हणजे हळवा, पाऊस म्हणजे बावळा, पाऊस म्हणजे संगीत आणि पाऊस म्हणजे मनमित सुद्धा. पावसानं यावं, धुंद बरसावं, मस्तीत कोसळावं, वसुंधरेवर चितारावी सुंदर नक्षी... आणि त्याचं बरसणं ओसरल्यानंतर मी व्हावं, त्या दूरच्या तारेवर भिजलेले ओले पंख वाळवत पंखात चोच खूपसलेला एक पक्षी स्वाती हुद्दार | |||
Saturday, 19 November 2016
| भेदाची अभेद्य भिंत स्वाती हुद्दार इंट्रो जपानमधील प्रायव्हेट रेल्वे कंपनीने महिलांवर निर्बंध लादणारी एक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आणि जपानी माध्यमांमध्ये गदारोळ उठला. या जाहिरातीच्या निमित्ताने स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांना सल्ले देणे किंवा त्यांच्यावर निर्बंध लादणे, पर्यायाने सोपे असते. त्यामुळे त्यांनी किती वाजता बाहेर पडू नये, किती वाजेपर्यंत परत यावे, कोणते कपडे परीधान करावे, नोकरी करावी की करू नये, शिकावे की शिकू नये, हे सगळे त्यांना सांगितले जाते, हे केवळ भारतातच होते असे नाही, तर संपूर्ण जगातच कमीअधिक प्रमाणात महिलांना सल्ले दिले जातात. महिलांची नटण्या-मुरडण्याची आवड, साड्या-कपड्यांची आवड, दागिन्यांची आवड, त्यांच्या गप्पा हे तर नेहमीच टवाळीचे विषय असतात. महिलांच्या नटण्यामुरडण्यावर समाजाचा किती आक्षेप असावा, हे सिद्ध करणारी घटना नुकतीच घडली, तीही जपानसारख्या देशात. टोकीयोतील टोकीयो कार्पोरेशन या प्रायव्हेट रेल्वे कंपनीने महिलांनी ट्रेनमध्ये मेकअप करू नये, असे सुचविले आहे. आणि त्यासाठी चक्क जपानमधील सावा निरुमा या अभिनेत्रीला घेऊन एक जाहिरात तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये ती म्हणते, जपानी महिला मुळात सुंदर आहेत, मात्र ट्रेनमध्ये मेकअप करून त्या कुरुप दिसायला लागतात. तीस सेकंदाच्या या जाहीरातीत शेवटी निरुमा म्हणते, प्लिज डु नॉट पुट ऑन मेकअप ऑन द ट्रेन. प्रायव्हेट रेल्वे कंपनीच्या या जाहरातीवर अपेक्षेप्रमाणेच जपानी महिलांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडिया आणि ट्वीटरवर कंपनीच्या या जाहीरातीवर आक्षेप नोंदवले गेले. महिलांनी ट्रेनमध्ये मेकअप करू नये, हे सांगणे एकवेळ ठिक आहे, मात्र मी सुंदर दिसते की कुरुप, हे सांगण्याचा रेल्वे कंपनीला अधिकार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया एका महिलेने ट्विटरवर नोंदवली असून याला एक दोन नव्हे तर तब्बल पाच हजार आठशे वेळा रिट्विट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर महिलांच्या मेकअपवर आक्षेप घेणाऱ्या कंपनीला काही ट्विटमधून रेल्वेत पुरुष मंडळी करीत असलेल्या स्मोकिंग आणि व्यसनांची आठवण करून देण्यात आली आहे. जपानी माध्यमांमध्येही हा विषय खूप गाजतो आहे. त्यावर टीकाही होते आहे. मात्र तरीसुद्धा रेल्वे कंपनी ही जाहीरात मागे घेण्यास तयार नाही. एकीकडे ऍब सरकार लैंगिक भेदभाव संपविण्यासंदर्भात पुढाकार घेत असताना रेल्वे कंपनीच्या अशा प्रकारच्या जाहीराती काही वेगळाच संदेश देत आहेत, एवढेच नव्हे जपानी न्यायालयाने महिला लग्नानंतर माहेरचे आडनाव वापरू शकणार नाही, असा निर्णय नुकताच देऊन महिला अधिकार आणि हक्कांवर प्रश्नचिन्हच लावले आहे. लेट वुमन शाईन हे घोषवाक्य घेऊन जपान सरकार कॅपेनिंग करीत असतानाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा नुकत्याच झालेल्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालात जपानचे स्थान 144 देशांमध्ये 111 वे आहे आणि ते याआधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत 10 स्थानांनी मागे गेले आहे. जपानमधील या घटना तर केवळ दाखले आहेत, महिलांसंदर्भातील पुरुषी मानसिकतेचे. वैज्ञानिक प्रगतीने अवकाश भेदण्याचे तंत्र अवगत केलेल्या मानवाला स्त्री-पुरुष भेदाच्या भिंदी भेदण्यात मात्र अजूनही यश आलेले नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल. | |||
Saturday, 5 November 2016
लढा खरेच यशस्वी?
स्वाती हुद्दार
इंट्रो
हाजी अली दर्ग्याच्या व्यवस्थापनाने महिलांच्या दर्गा प्रवेशाला परवानगी देत अनपेक्षितपणे षट्कारच ठोकला आहे. मंदिर, मशीद प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचा हा वरकरणी विजय ठरत असला तरी स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्याने अखेरचा टप्पा गाठला आहे, असा याचा अर्थ होतो का? महिलांचे मूलभूत प्रश्न या लढ्याने सुटणार आहेत का? आणि विशेष म्हणजे या विजयाने महिला आता पूर्णपणे सबल व अधिकारसंपन्न झाल्यात, असे समजता येऊ शकते काय? तर याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. अर्थात, म्हणून या संघर्षाचे आणि यशाचे महत्त्व नाकारता येणार नाही. स्त्री सन्मानाच्या, अस्मितेच्या लढ्याची ही नांदी निश्चितच आहे.
हक्क, अधिकार आणि कर्तव्य या विषयीचा स्त्री-पुरुष संघर्ष हा सनातन आहे. कधीतरी समाजात रुजलेली मातृसत्ताक पद्धती काळाच्या ओघात पुरुषसत्ताक पद्धतीत परावर्तित झाली आणि स्त्री-पुरुष शारीरिक भेदाचा किंबहुना स्त्रीच्या अबलत्वाचा परिणाम पुरुषी मक्तेदारीत आणि पुरुषी एकाधिकारशाहीत झाला. पुढे धर्म, रीतिरिवाज यांचे निमित्त करून स्त्रीवर निर्बंध लादले गेले. काळ बदलला. सावित्रीच्या कृपेने स्त्री शिक्षणाची पहाट झाली. परिणामी आपल्या अधिकार-हक्कांविषयी स्त्री जागरूक झाली आणि सुरू झाला सत्याग्रह. अनेक उदारमतवादी पुरुषांनीही या लढाईत स्त्रीची साथ दिली. नव्हे अनेकदा त्यांनीच पुढाकार घेतला आणि बालविवाह, सतीप्रथा, केशवपन अशा रानटी प्रथांना तिलांजली मिळाली. स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षितिजे पादाक्रांत केली तरीही बरेच हीन उरलेच आहे. त्यासाठी सुरू आहे अव्याहत संघर्ष. गेल्या वर्षी शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका महिलेने चुकून पाऊल ठेवले आणि एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली. धर्माच्या ठेकेदारांनी हलकल्लोळ केला. शनी चौथऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकालाही व्यवस्थापनाने नोकरीवरून कमी केले. आजच्या काळातही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांना दिली जाणारी हीन वागणूक पाहून तृप्ती देसाई आणि त्यांची भूमाता ब्रिगेड या अन्यायाविरुद्ध उभी ठाकली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाची अनुमती दिली. पुढचा टप्पा होता कोल्हापूरच्या मंदिराचा. तोही यशस्वी झाला. त्यानंतर त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर. तृप्ती देसाईंच्या संघर्षानंतर तोही तिढा सुटला. त्यानंतर सुरू झाली हाजी अली दर्ग्याच्या प्रवेशाची चळवळ. एप्रिल 2016 ला मुस्लिम समुदायाच्या प्रचंड जनक्षोभामुळे तृप्ती देसाई आणि मंडळींचा पहिला दर्गा प्रवेश अयशस्वी ठरला. त्यानंतर 12 मे 2016 रोजी दुसऱ्या प्रयत्नात पोलिस संरक्षणात त्यांना दर्ग्यात प्रवेश मिळाला; पण मजारपर्यंत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. मात्र दर्गाप्रवेशाच्या संघर्षाला एकदम कलाटणी मिळाली आणि प्रत्यक्ष हाजी अली ट्रस्टनेच दर्ग्यात महिलांना प्रवेशास हरकत नसल्याचे सांगून अनपेक्षित धक्का दिला. देशात एकीकडे समान नागरी कायद्याची चर्चा सुरू असताना एका धर्मपीठाने घेतलेली माघार अचंबित करणारी पण आशादायक आहे. शनी चौथऱ्यापासून सुरू झालेल्या एका अस्मितेच्या लढाईत केवळ एका वर्षातच महिला शक्तीचा विजय झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी हा केवळ पुरुषसत्ताक मानसिकतेवर आणि व्यवस्थेवर भारतीय धर्मनिरपेक्ष कायद्याच्या माध्यमातून मिळविलेला तांत्रिक विजय आहे. याचा अर्थ पुरुषी मानसिकता बदलविण्यात आणि खऱ्या अर्थाने आधुनिक समाज निर्माण करण्यात यश मिळाले आहे, असे मुळीच नाही. अर्थात, ही जीत प्रतीकात्मक असली तरी महत्त्वाची आहेच, कारण वर्षानुवर्षांची समाज मानसिकता बदलण्याची प्रक्रिया यामुळे निश्चितच सुरू झाली आहे. पण तृप्ती देसाई, त्यांची भूमाता ब्रिगेड आणि भारतीय मुस्लिम महिलांची चिकाटी आणि संघर्ष निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ मंदिर किंवा दर्गा प्रवेशाने मूलभूत प्रश्न संपणार नाहीत. ज्या दिवशी हुंड्यासाठी एखादी स्त्री बळी जाणार नाही, ज्या दिवशी स्त्री अत्याचाराच्या घटनांची संख्या शून्य होईल. रात्री उशिरा घराबाहेर असलेल्या स्त्रीचे कुटुंबीय घरी निश्चिंत झोपू शकतील. तिच्या कपड्यांवरून तिचे चारित्र्य ठरवले जाणार नाही. तिचे काही अवयव पुरुषांपेक्षा निराळे आहेत म्हणून तिला दुय्यम समजले जाणार नाही. तिच्या भावनांचा, विचारांचा व शरीराचाही आदर केला जाईल. तिची छेड काढली जाणार नाही. तिला नकोसे स्पर्श केले जाणार नाहीत. तिला नकोशा नजरांचा सामना करावा लागणार नाही आणि तिचा नकार हा नकारच समजला जाईल, त्या दिवशी हा लढा पूर्णत्वास जाईल. यानिमित्तानेच मुस्लिम महिलांच्या "तीन तलाक'चाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याला धार्मिक आयाम असेलही. पण कोणताही धर्म वा धार्मिक कायदा कुणावरही अन्याय करणारा असू शकत नाही. भविष्यात अशा अन्यायाची चिन्हे दिसत असतील, संकेत मिळत असतील तर त्यात योग्य त्या सुधारणा करण्याची परिपक्वताही सर्व समाजधुरिणांना दाखवावी लागणार आहे. तोपर्यंत मंदिर, दर्गा प्रवेशाच्या सोपस्कारांना आणि स्त्री हक्काची लढाई न्यायालयात किंवा वाटाघाटीच्या टेबलावर जिंकण्याला तसा फारसा अर्थ नाही. स्त्रीविषयीच्या आदराचा विचार जेव्हा प्रत्येक पुरुषाच्या मनात प्रकाशमान होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा लढा यशस्वी होईल.

Subscribe to:
Posts (Atom)