नोंदी 2019 च्यास्वाती हुद्दारकालचक्र अव्याहत सुरूच असते. वर्षे येतात आणि जातात. मात्र, जाताना आपल्या उदरात अनेक घटना साठवून जातात. त्या घटनांच्या नोंदी त्या-त्या वर्षावर कोरल्या जातात. काही सुखद आणि काही दु:खदही. पुढे याच घटना इतिहास म्हणवल्या जातात. 2019 हे वर्षही आता मावळते आहे. या वर्षानेही अनेक घटना पाहिल्या. समुद्रावर उठलेल्या लाटांसारख्या त्यातल्या काही कालौघात मिटून जातील, काहींची नोंद घेणे मात्र इतिहासाला भाग पडेल.2019 या वर्षावर महिलांनीही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. त्याचीच ही बखर... *मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा अमेरिकेतल्या मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने 1967 मध्ये म्हणजे 57 वर्षांपूर्वी सुरू केली. या सौंदर्य स्पर्धेत 190 पेक्षा अधिक देश सहभागी होतात. यंदा झोझिबिनी टुंझी या साउथ आफ्रिकेच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला आहे. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचाही या स्पर्धेमध्ये कस लागतो. सौंदर्याचे मापदंड बदलताहेत, हेच यंदाच्या या सौंदर्यवतीने सिद्ध केले आहे. * मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा 1951 साली इंग्लंडमध्ये सुरू झाली. यंदा जमायकाच्या टोनी एन सिंगने मिसवर्ल्डचा क्राऊन जिंकला आहे. *मिस वर्ल्ड आशिया हा 2019 चा पुरस्कार भारताच्या सुमन रावने मिळवला आहे. 21 वर्षांची सुमन राव ही कथ्थक नृत्यांगना आहे. *रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, शांती, शरीरविज्ञानशास्त्र या शास्त्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल देण्यात येते. 118 वर्षांपूर्वी 1901 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. अल्फ्रेड नोबेल यांनी 1895 मध्ये या पुरस्काराची घोषणा केली. हा त्या त्या क्षेत्रात दिला जाणारा सगळ्यात महत्त्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. यंदा अर्थशास्त्राचे नोबेल तीन व्यक्तींना मिळाले आहे आणि त्यातील एक महिला आहे इस्टर डफलो. पॅरिसमध्ये 25 ऑक्टोबर 1972 मध्ये जन्मलेल्या इस्टर सध्या केंब्रिजमधील एमआयटीमध्ये कार्यरत आहेत. 2018 चे साहित्यातील नोबेल 2019 मध्येच घोषित झाले आहे पोलंडच्या ओल्गा टोकरच्युक यांना. *ऑस्कर म्हणजे सिनेक्षेत्रातला नोबेलच. ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट ऍण्ड सायन्स या संस्थेच्या माध्यमातून प्रदान केला जातो. 1929 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. यंदा लेडी गागाचे शॅलो हे मुळ गाणे ऑस्करच्या शर्यतीत जिंकले आहे. रेजिना किंगला इफ बिल स्ट्रिट कुड टॉकसाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचे ऑस्कर घोषित झाले आहे. ऍक्ट्रेस इन लिडिंग रोलचे ऑस्कर द फेवरेटसाठी ऑलिव्हिआ कोलमेनला घोषित झाले आहे. *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. दरवर्षी भारत सरकारने निवडलेल्या समितीच्या माध्यमातून या पुरस्कारांची निवड केली जाते. आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. 2019 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार महानती सिनेमासाठी कीर्थी सुरेश यांना प्रदान करण्यात आला. बधाई हो चित्रपटासाठी उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार सुरेखा सिक्रीला घोषित. नातिचरामी सिनेमातील मायावी मानवे या गाण्यासाठी बिंदू मनी या गायिकेला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार फिल्म फेअर पुरस्कार हा हिंदी भाषिक चित्रपटांसाठी प्रदान केला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1954 साली झाली. यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार राझी चित्रपटातील भूमिकेसाठी आलिया भटला प्रदान करण्यात आला. राझीसाठी उत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार मेघना गुलजारला मिळाला. उत्कृष्ट चरित्र अभिनेत्रीचा पुरस्कार बधाई हो चित्रपटासाठी नीना गुप्ता यांना मिळाला. उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार सारा अली खान, उत्कृष्ट पार्श्वगायिका श्रेया घोषाल, लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड श्रीदेवी यांना मरणोत्तर आणि सिनेक्षेत्रात 50 वर्षे अतुलनीय कामगिरीसाठी हेमा मालिनी यांना गौरविण्यात आले. *साहित्य क्षेत्रातल्या बुकर या मानाच्या पुरस्कारावरही यंदा दोन महिलांनीच नाममुद्रा उमटविली आहे. पहिल्यांदाच बुकर पुरस्कार दोन व्यक्तींना विभागून देण्यात आला आहे. द टेस्टमेंटसाठी मार्गारेट ऍटवुड आणि गर्ल वुमन अदर या पुस्तकासाठी बर्नार्डिन एव्हरिस्टो या दोघींना यंदाचा बुकर घोषित झाला आहे. *साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणाही नुकतीच झाली. मराठी भाषेतील कवितेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कवितासंग्रहाला घोषित झाला आहे. *पद्म पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. विविध क्षेत्रांमध्ये अतुल्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते आणि मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. 2019 मध्ये राष्ट्रपतींनी 112 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 3 भारतरत्न, 4 पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. लोककलेच्या गायिका सुश्री तीजनबाई यांना कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. 14 पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यापैकी पर्वतारोहण क्षेत्रात बछेंद्री पाल या एकमेव महिलेचा समावेश यामध्ये आहे. राष्ट्रपतींनी 94 पद्मश्री पुरस्कार घोषित केले असून गुजरातच्या ज्योती भट यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी, मुक्ताबेन पंकजकुमार दागली यांना मेडिसीन क्षेत्रासाठी, राजकुमारी देवी यांना शेती क्षेत्रातील योगदानासाठी गोदावरी दत्ता यांना मधुबनी चित्रकलेसाठी,भागीरथी देवी यांना सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी, हरिका द्रोणावल्ली यांना बुद्धिबळातील कामगिरीसाठी, द्रौपदी घिमिरस यांना सामाजिक कार्यातील योगदानासाठी, स्मिता कोल्हे यांना आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय कार्यासाठी, गीता मेहता यांना साहित्य क्षेत्रासाठी, नर्तकी नटराज यांना नृत्यकलेसाठी, कमला पुजारी यांनी कृषी क्षेत्रातील योगदानासाठी, आर वी रमणी यांना ऑप्थल्मोलॉजी क्षेत्रातील कार्यासाठी, मिलिता साल्विनी यांना कथकली नृत्यप्रकारासाठी, शारदा श्रीनिवासन यांना पुरातत्त्व क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 2019 या वर्षावर विविध क्षेत्रांतील जगभरातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे, पण 2020 या नववर्षात महिला कर्तृत्वाचा टक्का अधिक वाढता राहावा, या आशेसह... | |||
Wednesday, 25 December 2019
करा हो नियमित योगासनस्वाती हुद्दाररामनगर द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर जर्नादन स्वामी मार्ग या मुख्य रस्त्यावर डाव्या हाताला एक प्रशस्त चार मजली इमारत आपले लक्ष वेधून घेते. ही इमारत आहे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगशिक्षणाचे असिधाराव्रत घेतलेल्या जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाची. या भव्य इमारतीत प्रवेश करतानाच इथले पावित्र्य मनावर गारुड करते. इमारतीत पहिल्या मजल्यावर जर्नादन स्वामींचे समाधीमंदिर आहे. उजव्या बाजुला शेणाने स्वच्छ सारवलेला रस्ता. तिथल्या वृक्षांनाही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही अष्टांग योगातील नावे दिलेली. समोर तुळशी वृंदावन, दिवा आणि रांगोळी. आत शिरतानाच ओंकाराचे धीरगंभीर स्वर कानावर पडतात. स्वामीजींच्या पवित्र समाधी समोर योगसाधक साधना करताना दिसतात.1949 सालचे नागपूर. फारशी वर्दळ नसलेले. रामनगर हा तर अगदी विरळ लोकवस्तीचा भाग. अशावेळी भगवी वस्त्रे परीधान केलेले, पायात लाकडी खडावा, तेजस्वी डोळे आणि आजान बाहु असे संन्यासी कोकणातल्या सुदूर खेड्यातून भारतभ्रमंती करीत इथे आले. ते होते जर्नादन स्वामी. स्वामीजींनी समाजाच्या उत्थानासाठी योगासनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नागपूर नगरीची निवड केली. अयाचित व्रत घेतलेल्या स्वामीजींनी तेव्हा घरोघरी जाऊन, शाळाशाळांमधून भारताच्या प्राचीन अशा योगसाधनेच्या वारशाचा प्रचार आणि प्रसार केला, तोही निशुल्क. 1949 ते 1978 म्हणजे स्वामीजी समाधिस्थ होईपर्यंत अशी 29 वर्षे स्वामीजींचे वास्तव्य या आश्रमात होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या याच परीसरात योगाभ्यासाचे व्रत आजही सुरू आहे अखंड, अविरत. प्रचंड थंडी असो, धुवॉंधार पाऊस असो की कडकडीत उन्हाळा. वर्षाचे बाराही महिने सकाळी 5 वाजून 59 मिनटं आणि 60 सेकंदांनी इथे प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात आणि योगाभ्यास सुरू होतो. सामाजिक बांधिलकी जपणारे आणि स्वामीजींवर श्रद्धा असलेले इथले योगशिक्षक कुठल्याही मानधनाशिवाय वर्षानुवर्षे इथे योगविद्या शिकवित आहेत. स्वामीजींच्या प्रेरणेतून नागपुरातील इतर 105 ठिकाणीही योगाभ्यासी मंडळाचे असेच निशुल्क वर्ग सुरू आहेत. योगाभ्यासी मंडळात निरोगत्वासाठी वर्ग चालतात,तसेच विविध आजारांवरही योगाद्वारे निशुल्क उपचार केले जातात. रक्तदाब, मधुमेह अशा आजारांसाठी विशेष शिबीरांचेही आयोजन केले जाते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत असते. नवीन पिढीला योगाचे आकर्षण वाटावे आणि त्यांनी योगजीवनशैली अंगिकारावी यासाठी योगसंस्कार शिबीर, बुद्धीविकास शिबीर अशी शिबीरे घेतली जातात. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सांघिक योगासन स्पर्धाही घेतल्या जातात. येत्या 18 जानेवारी 2020 रोजी नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये 30 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरवर्षी 21 जून या जागतिक योग दिनी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने सांघिक योगासनांचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये 25 हजार योगसाधक सहभागी होत असतात. दर तीन वर्षांनी निवासी योग संमेलनाचे आयोजन योगाभ्यासी मंडळ करीत असते, त्यावेळी साडे तीन-चार हजार योगसाधक उपस्थित असतात. योगाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने योगप्रकाश हे मासिक योगाभ्यासी मंडळातर्फे प्रकाशित केले जाते. दहा हजार साधक याचे सदस्य असूुन नियमितपणे हा अंक प्रकाशित होतो, आणि याचे संपादक मंडळ वर्षानुवर्षे केवळ सेवा म्हणून निशुल्क कार्य करीत आहे. योगप्रकाश दिवाळीत दरवर्षी योगजीवनशैली विशेषांकही प्रकाशित करीत असते. जर्नादन स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या जागेवर अगदी अलिकडे ही भव्य वास्तू उभी राहिली आहे ती जनतेने स्वखुशीने उभारलेल्या निधीतून. अयाचित व्रत अंगिकारलेल्या संन्यासी स्वामींचा वारसा सांगणारे इथले योगसाधक कधीच कोणाकडूनही पैचीही अपेक्षा करीत नाहीत. स्वार्थाने गजबजलेल्या या जगात निस्वार्थ सेवेचा हा यज्ञ अव्याहतपणे सुरू आहे. योगाभ्यासी मंडळ हे एक कुटुंब आहे. इथे सगळे भारतीय सणउत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये जर्नादन स्वामींची पुण्यतिथी, जयंती आणि गुरूपौर्णिमा हे विशेष आहेत. स्वामीजींच्या पुण्यतिथी दिनी सांघिक योगासने करून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण केली जाते. स्वामीजींच्या पादुकांची पालखी निघते. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त तीन दिवसांच्या प्रवचनमालेचे आयोजन केले जाते. याशिवाय दीपोत्सव, गुढीपाडवा, श्रीकृष्ण जयंती, महाशिवरात्री असे विविध सण अनोख्या पद्धतीने साजरे केले जातात. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या जीवनातील शांतता नष्ट झाली आहे. त्याचे परीणाम त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही दिसतात. मनस्वास्थ्य हरवलेल्या माणसांच्या गर्दीत जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाची ही वास्तू आणि इथले योगसाधक समाजाचे शारीर आणि मनस्वास्थ्य प्रदान करण्यासाठी झटत आहे. मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण करा हो नियमित योगासन योगाभ्यासी मंडळाचे हे सांघिक गीत मानवाचा परमेश्वर होण्याचा संदेश देणारे आहे आणि स्वामीजींच्या कृपेने माणसातला परमेश्वर जागृत करण्याचाच इथल्या योगसाधकांचा प्रयत्न आहे. | |||
मन मनास उमगत नाही
प्रा. राजा आकाश
शब्दांकन - स्वाती हुद्दार
भारतात अजूनही मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही. मुळातच कुठलाही त्रास नसताना डॉक्टरकडे जाणे ही कल्पनाच लोकांना मानवत नाही. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार खूप बळावल्यावरच लोक डॉक्टरकडे पोहोचतात. शारीरिक आजारांबद्दलच ही स्थिती असताना मानसिक स्वरुपाचे आजार असू शकतात, हेच लोकांना पटत नाही. कधी तरी परिस्थिती खूप हाताबाहेर गेल्यावर मग कळते की हा मानसिक आजार आहे, पण तरीही त्यावर उपचार होऊ शकतो आणि त्यासाठी आपण मानसशास्त्रज्ञाकडे गेले पाहिजे, हे अजूनही लोकांच्या पचनी पडत नाही.अलिकडच्या जीवनशैलीत तर मानसिक तणाव प्रचंड वाढतो आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची न संपणारी स्पर्धा, कामाचे वाढलेले तास आणि ताण, विभक्त कुटुंबपद्धती. शेजारसंबंध संपलेले. सार्वजनिक जीवन नसल्यासारखे. सगळी नाती खूप फॉर्मल. यामुळे दिवसेंदिवस माणूस एकटा होत चालला आहे. माणसामाणसातला संवाद संपत चाललाय. परिणामी मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशावेळी तंत्रज्ञानाने माणसाला एकटेपण घालवण्याचा नवा मार्ग मिळवून दिला आहे, तो आहे सोशल मीडियाचा आणि हातात दिले आहे एक चोवीस तास साथ देणारे खेळणे. सेलफोनचे. माणूस त्यामध्ये आपले एकटेपण विसरू पाहतो. पण हे खेळणे फसवे आहे. यामुळे एकटेपणा संपत नाही, तर माणूस अधिक एकलकोंडा होत जातो. माणूस आपली व्यक्त होण्याची भूक सोशल मीडियावर भागवत असतो. मात्र हा वन वे ट्रॅफिक आहे. सोशल मीडियावर तुम्हाला सच्चा प्रतिक्रिया मिळतीलच, याची खात्री नसते. हे आभासी जग आहे, त्यातुन बाहेर पडले की एकाकीपणा अधिकच मानगुटीवर बसतो. परिणामी माणूस संतापी होतो किंवा नैराश्यात जातो. मग व्यसन, आत्महत्या, हत्या असे परिणाम दिसू लागतात.
युवकांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. या पिढीला नाही ऐकण्याची सवयच उरली नाही. बालवयापासूनच यांच्यासमोर सगळी सुखे हात जोडून उभी असतात. संघर्ष त्यांना माहितीच नाही. सगळ्या ऐहिक गोष्टी मुबलक आहे. कमतरता असते ती भावनिक ओलाव्याची. त्यामुळे तरुण पिढी भावनाशून्य होत चालली आहे. अपयश, पराभव, अपमान ते पचवू शकत नाहीत. नैराश्यात जातात. त्यातून कधीतरी चुकीच्या मार्गाला लागतात. आत्महत्येचा मार्ग निवडतात. कारण संवाद हरवत चालला आहे.
हे टाळायचे असेल तर...
* परस्पर संवाद साधला जावा.
* कुटुंबातल्या सगळ्यांनी एक दिवस ठरवून सोशल मीडियाचा उपवास करावा.
*दिवसातून एकदा तरी एकत्र जेवावे. जेणेकरून गप्पा होतील आणि दिवसभरातील घडामोडी कुटुंबियांशी शेअर होतील.
* जीवाभावाचे मित्र असावेत. ज्यांच्याजवळ मन मोकळे करता येईल.
* दिवसातला काही वेळ फक्त स्वत:साठी असावा. त्यावेळी आवडते पुस्तक वाचावे, संगीत ऐकावे.
* झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटनांचा आढावा घ्यावा. अंतर्मुख होऊन आपल्या वागण्याचे विश्लेषण करावे.
* आपल्या दिसण्याची,कपड्यांची आपण जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपण आपल्या मनाचीही घ्यावी.
* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यातला आनंद शोधावा.
Monday, 15 July 2019
मनाचीये गुंफीस्वाती हुद्दारखूप प्रतीक्षेनंतर बरसतो आहे तो मनसोक्त. भेगाळलेल्या धरेला श्रांत क्लांत करीत. मृद्गंधानं धुंद झालंय वातावरण. धुळीच्या अबीर गुलालानं रेखलेले झाडाचे बुंधे पुन्हा मूळचे रंग लेवून हिरवेगार दिसू लागले आहेत. तो निथळतोय दाराच्या कमानीवर विसावलेल्या सायलीच्या पानांवरून अलगद. त्याचा धसमुसळेपणा न सोसवून केळी झुकलीय कमरेतून. प्राजक्ताच्या बुंध्यातून कोसळतोय तो स्वर्गातून धरेवर उतरणाऱ्या गंगौघासारखा. भरदुपारीच आभाळ काळवंडून गेलंय. काळ्या ढगांनी सूर्याभोवती गर्दी करून त्याला निष्प्रभ करून टाकलंय. आग ओकणाऱ्या सूर्यानंही शेवटी या जलमय मेघांपुढे शरणागती पत्करली. आतापर्यंत जेता असलेला सूर्य मेघांपुढे पराजित. जय-पराजय, हार-जित. कधीच कायम नसते. हेच वास्तव. कधी याचे पारडे जड, कधी त्याचे.वातावरणात भरून राहिला आहे हवाहवासा गारवा. पक्ष्यांनी घेतलाय आसरा आपापल्या घरट्यात. ओलेत्या पंखांसह. पिलं सरकलीत हळुच उबेसाठी त्यांच्या पंखांखाली. गोठ्यातल्या गायींनीही विजेच्या लखलखटानं बावरलेल्या पिलाला हुंगून आश्वस्त केलं आणि किणकिणली तिच्या गळ्यातली घंटा मंजुळ, ओळखीची.खिडकीतून ती न्याहाळतेय पहिल्या पावसाचे सगळे विभ्रम. त्याच्या कोसळणाऱ्या सरळ, तिरप्या धारा. विजेच्या तारांवरून अलगद उतरतानाचा त्याचा ठहराव. साचलेल्या पाण्यातले पाऊस थेंबांचे नर्तन. पावसाचा हात हातात धरून दूर गेलेला वळणावळणाचा काळा कुळकुळीत रस्ता. मधूनच चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशातले अंधार-उजेडाचे खेळ. अंधूक प्रकाशात दिसणारे सृष्टीचे भास-आभास. काही खूप ओळखीचे, काही अगदीच अनोळखी. एखाद्या कसलेल्या नटानं निरनिराळ्या भूमिका ताकदीनं वठवल्या की मुखवट्यांमागचा तो खरा कोणता, हेच ओळखू नये, तसे हे सृष्टीचे पावसाळी रूप. रोजचीच झाडे, रोजचेच आकाश, रोजचेच पक्षी, रोजचेच रस्ते. आज मात्र नवे, पावसाळी रंगभूषा, वेषभूषा ल्यालेले, अनोळखी. माणसाच्या मनासारखे. आपलंच मन आपल्याला उमजू नये तसं. अपेक्षा, भावभावना प्रेम, अनुराग, अनुताप, लोभ, राग, अशी पुटावर पुटं चढलेले मन. कळतं, आकळंत ते केवळ काही अंश, बाकी हिमनगासारखं. गहिरं, खोल, गहन. मन कॅलिडोस्कोपसारखं, व्यक्तिपरत्वे बदलणारं, अगदी पावसासारखं, आषाढातला पाऊस, वेगळा, श्रावणातला वेगळा, भाद्रपदातला त्याहून वेगळा, मनही तसंच, कुणी म्हणावं, ही अशी, दुसऱ्यानं म्हणावं नाही ती तशी, आणखी एखाद्यानं सांगावं, अगं ती तशीच. एकाच व्यक्तीचे त्याच्या मनाचे किती निराळे विभ्रम. न उलगडणाऱ्या कोड्यासारखे. एकाच मनात इतके भाव वास्तव्याला की भावभावना विरहित नग्न मन समोर उभं ठाकलं तर आपलंच मन आपल्याला ओळखू येऊ नये इतकं अपरिचित. दूरस्थ, अनोळखी. गूढ. कधीतरी घेऊन बसावं आपलंच मन आपल्या पुढ्यात आणि उकलत जावा एकेक धागा अलगद. हळुवार. किती प्रसंग, किती आठवणी, किती गुण, किती दोष विलग होत जाताहेत मनाच्या सांदीकोपऱ्यातून. कुणावर तरी हळुवार प्रेम करणारं हे मन किती कठोर होतं एखाद्या प्रसंगी. कुणावर तरी वात्सल्याचे घट रिते करणारं हेच मन इतकं दुष्ट कसं? मुक्या प्राण्यांसाठीही द्रवणाऱ्या याच मनाला भाकरीसाठी पुढे केलेल्या त्या हाताची किळस का वाटावी? मंदिरात दानासाठी भरभरून द्रव्य देणाऱ्या या मनाला एखाद्या गरजूवर थोडेसे पैसे खर्च करणं अवघड का होतं? जीवनाच्या या सारिपाटावर सोंगट्या खेळताना माणसाला इतके मुखवटे चेहऱ्यावर चढवावे लागतात की, त्या मुखवट्यांमागचा खरा चेहरा आपला आपल्यालाच ओळखू येईनासा होतो. कधीतरी या मुखवट्यांमागे श्वास घुसमटू लागतो. शोधावसं वाटू लागतं स्वत:लाच. ओढून फेकाविशी वाटू लागतात ही मुखवट्यांची अस्तरं. एक, दोन, तीन, अनेक. कधी आणि कशासाठी चढवले इतके मुखवटे. मुखवट्यांच्या गर्दीमागचा खरा चेहरा शाबूत असेल की झाला असेल विद्रूप आणि घायाळ. आपलंच मन आणि आपलाच चेहरा...परस्परांसाठी अपरिचित, अनोळखी. अशावेळी काय करावं. विचारांची घडी घालून बाजूला ठेवावी. बाहेर कोसळणाऱ्या पाऊस धारेच्या स्वाधीन व्हावं. चिंब भिजू द्यावं मन आणि शरीर त्या स्वर्गीच्या अस्पर्श ओल्या धारेत. गळून जाऊ द्यावे सगळे मुखवटे. निथळू द्यावे मनातले सगळे भाव. निचरा होऊ द्यावा सगळ्या आशा-अपेक्षांचा. आणि मग गुणगुणावी छानशी लकेर. लपेटून घ्यावं स्वत:भोवती मृद्गंधाचं अत्तर. विणून घ्यावा कोष मनाभोवती निसर्गाच्या हिरवाईचा. आणि हिरव्या सुगंधित मनानं जावं पुन्हा एकदा जगण्याला सामोरं. चिंब ओल्या पाऊस धारेच्या साक्षीनं. मुखवटेविरहित! कोमल ओल्या जाईच्या फुलासारखं. बस इतकचं. | |||
Wednesday, 22 May 2019
स्वरचक्रस्वाती हुद्दारसूर गुंजताहेत अनंत काळापासून. युगांच्या समेवर. क्षितिजाच्या मैफलीत. त्या स्वरांनी दीप राग छेडला की प्रकाशतात तारकापुंज आणि उजळून जाते अवघे अवकाश. रंगतो दीपोत्सव ब्रह्मांडात. चंद्रही उतरतो चांदीच्या रथातून त्या मैफलीत, नीज विसरून साठवतो तनामनात तो अनादी स्वरविलास. शुक्राची चांदणी ते स्वरवैभव ऐकून लख्ख प्रकाशते. आता सुरू होते भैरवी. भैरवीच्या कोमल स्वरांनी प्रकाशतात प्रकाशकण पूर्वेच्या अंगणात. आणि उमलू लागते चैतन्य पानाफुलांवर. त्या दैवी स्वरांचा सुगंध घेऊन फुलतो मोगरा आणि दरवळतो आसमंत. भूपाळीच्या सुरांनी चाफ्याच्या फांद्याफांद्यांवर फुलते वैभव. बहाव्याच्या सोनेरी उत्सवाने उजळतात दशदिशा. आम्रतरूवर गाऊ लागतो कोकीळ. या रंगगंधोत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी सूर्यही येतो सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन. चैतन्याने न्हाऊन निघते अवघी धरा. कमलपुष्पात रात्रभर बंदिस्त झालेला भ्रमरही सोडवून घेतो ती मिठी आणि करू लागतो गुंजारव. पक्ष्यांचा किलबिलाटही देतो दाद त्या सुरांना. त्या स्वरांचा रंग चढतो अवघ्या सृष्टीवर. क्षितिजाला लगडलेल्या त्या स्वरांच्या रेशमी लडींवर हिंदळतेय सृष्टी षड्जापासून षडापर्यंत.मल्हारातूनच रिमझिमतो पाऊस. चमकते दामिनी. मेघ देतात साथ मृदंगासारखी. उमलते जीवन. कोण्या मियॉंने छेडले होते असेच स्वरवैभव मल्हारचे आणि भारून टाकली होती सारी सृष्टी आकाशातून कोसळणाऱ्या चैतन्याने. पुरियाच्या साथीनेच मावळतात दिशा दाही. उतरते सांज धरेवर मारव्याच्या साक्षीने. फुलू लागते चांदणवेळ मारूबिहागाच्या स्वरात. नीज उतरू लागते मालकंसातून अलगद. नाद-स्वरांचे हे आवर्त, अनाहत, अव्याहत. ऋतुचक्र, जीवनचक्राचे साक्षीदार असलेले हे सूर अनंत, अपार. | |||
Monday, 22 April 2019
गौराईचं माहेरपण
स्वाती हुद्दार
माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही.त्यादिवशी अंगणाची शोभा काही औरच होती. जुईच्या मांडवाखाली भुश्याचा डोंगर केला होता. त्या डोंगरावर झाडाच्या फांद्या खोचल्या होत्या. अंगणातल्याच गवताने तो डोंगर हिरवागार शाकारला होता. खेळण्यातले छोटेछोटे हत्ती घोडे, चिमण्या पक्षी त्यावर मांडले होते. डोंगराच्या एका बाजुला वाळुचे कडे करून तलाव केला होता. तलावाच्या काठावर सुंदर सुंदर पक्षी विहरत होते. तलावाच्या मध्यभागी पांढऱ्याशुभ्र कांद्याचे कोरीव कमळ ठेवले होते. एका बाजुला भातुकलीतला लुटुुपुटुचा संसार मांडला होता आणि डोंगराच्या पायथ्याशी छोट्याशा शिसवी पाळण्यात गौराईची स्थापना केली होती. मोगऱ्याच्या गजऱ्यांनी गौराईचा पाळणा शाकारला होता. तिच्यासमोर चिवडा, लाडु, करंजा असे जिन्नस मांडले होते. खरबुज कलिंगडाचे कोरीव काप ठेवले होते. खिरापत, कैरीची डाळ आणि कैरीच्या केशर विलायची घातलेल्या पन्ह्याचा प्रसाद होता. वातावरणात अत्तर गुलाबजलाचा सुगंध भरून राहिला होता. आई-आजी नाकात नथ घालून केसांवर मोगऱ्याचे गजरे माळून विशेषच सजल्या होत्या. सडा रांगोळी घातलेल्या अंगणात सतरंजा अंथरल्या होत्या. उतरत्या सांजेला त्या दिवशी आमच्या अंगणात आयाबायांचा जमावडा जमला होता. हास्यकल्लोळात अवघं घर बुडून गेलं होतं. होतं काय असं विशेष त्या दिवशी. आजी म्हणाली अग चैत्रगौर माहेरपणाला आली आहे आपल्याकडे. माझ्या आठवणीतली ती पहिली चैत्रगौर. त्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की माझं मन आपसुकच त्या माहेरवाशीण गौरीची वाट पाहू लागायचे. तेव्हा त्यातला माहेर हा शब्द काही खूप महत्त्वाचा वाटला नव्हता. मात्र शिसवी पाळण्यात विराजमान झालेल्या त्या गौरीच्या येण्यानं खाण्यापिण्याची चंगळ असते. खणाचं परकरपोलकं घालून मिरवायला मिळतं. खूप मैत्रीणी, काकवा मावश्या घरी येतात. एवढंच कळत होतं. या चैत्रगौरीच्या आगमनाची तयारी घरी आठवडाभर आधीपासून चालायची. वय वाढलं तसं आई-आजीबरोबर सजावटीत माझाही सहभाग राहू लागला आणि मन अधिकच उत्कंठेनं चैत्रातल्या गौरीची वाट पाहू लागलं.
गौरीनं माहेरपणाला येण्याचे किती प्रसंग येतात असे वर्षातून. एकदा ती भाद्रपदात तीन दिवसांसाठी येते. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नुसतीच धावपळ करत उभ्या उभ्या आलेल्या कर्तव्यदक्ष सासुरवाशीणीसारखी. तेव्हाचा थाटही अगदी बघण्यासारखा. सोळा भाज्या, सोळा चटण्या, गोडधोड, पुरणपोळी आणि बरच काही. चैत्रातला मुक्काम मात्र चांगला महिनाभराचा. सासरच्या जबाबदाऱ्या निस्तरून निवांतपणानं माहेरच्या अंगणात विसावायला आल्यासारखी. झोपाळ्यावर झुलणारी गौरी. मोगऱ्याच्या माळा माळलेली गौरी. माहेरचा पाहुणचार घेणारी गौरी. अगदी तुमच्या माझ्यासारखी माहेरवाशीण वाटते. आपलं देवपणही काही काळाकरता विसरून गेल्यासारखी भासते. माहेर असतच असं. देवपणही विसरायला लावणारं. या गौरीची पाठवणी अत्यंत भावुक करणारी. तिच्या कोडकौतुकात मुक्कामाचे दिवस कसे सरतात, कळतच नाही. पाठवणी करताना तिला दहीभात आणि मुरड पोळीची शिदोरी दिली जाते. आणि पुन्हा ये ग अशीच मुक्कामी असं सांगत पुनरागमनायच म्हणत तिला निरोप दिला जातो, तो क्षण खरच हळवं करतो.
पूर्वी सासरी खूप कष्ट असायचे. छळही व्हायचा. खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. लग्नही अगदी कमी वयात व्हायची, त्यामुळे माहेरची ओढ असायचीच. माहेरची मायेची माणसं, दोन घास उन उन अन्न, जीवाला थोडा आराम या सगळ्यासाठी माहेर हवं असायचं. माहेरचं महत्त्व सुखदु:खसमेकृत्वा असणाऱ्या संतांनाही मान्य आहे. तुकारामांच्या अभंगात याचे दाखले येतात. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली किंवा कन्या सासुरासी जाये या अभंगांमधून तुकारामांनी सासुरवाशीण लेकीच्या माहेरच्या ओढीचा दाखला दिला आहे. माहेराचं महत्त्व संतांनाही जाणवावं असं आहे. लोकगीतांनी, जात्यावरच्या ओव्यांनी स्त्रीच्या मनातलं माहेर जपलं आहे. भोंडल्याच्या गाण्यात सासर माहेरच्या वैद्याची केलेली तुलना, सासरच्या नातेवाईकांना दिलेली दुषणं बरीच बोलकी आहेत. एकनाथांच्या भारुडातही नणंदेचं कार्ट किरकिर करत, खरुज होऊ दे त्याला म्हणणाऱ्या सासुरवाशीण स्त्रीच्या भावना व्यक्त होतात.
काळ बदलला आहे. छळ करणार सासर आता नाही. विभक्त कुटुंब पद्धतीत अनेक ठिकाणी राजाराणीचाच संसार असतो. सासरची माणसंही पूर्वीसारखी खाष्ट नाहीत. स्त्रियाही आता शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आहेत. माहेरी जाण्यासाठी, सासुबाई मला मुळ आलं आता तरी धाडा ना, अशी सासुबाईंची परवानगी घेण्याची गरजही नाही. तरीही माहेरची ओढ कायम आहे. सासरच्या वाटे कुचुकुचु काटे आता उरले नसले तरी माहेरच्या वाटेवर अजूनही हळदकुंकु दाटलेलं असतचं. माझ्या अंगणात पिंगा घालणाऱ्या वाऱ्यानं माहेरी सुवासाची बरसात करावी, असं आजच्या सुशिक्षित स्त्रीलाही वाटतचं.
माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही. अनेक कारणांनी माहेराला पारख्या झालेल्या स्त्रियांसाठी अलिकडे अनेक संस्था एक दिवस माहेरचा अशा उपक्रमांचं आयोजन करतात. त्या दिवशी सगळ्या सख्यांची माहेरी ठेवावी, तशी बडदास्त ठेवली जाते. त्यांना साडीचोळीचा अहेर केला जातो. असं औटघटकेचं लटकं माहेर या माहेरासाठी आसुसलेल्या सख्यांच्या मनावर हळुवार फुंकर घालत.माहेर मायेच्या माणसांमुळे तर असतंच पण काळाच्या ओघात दृष्ट लागल्यासारखी ती मायेची माणसं गेली तरी माहेरच्या घराच्या विटांच्या भिंती, माहेरचं अंगण, माहेरचं गाव मायेची पखरण करीतच असतात.
सासरी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना स्त्रीच्या मनातली माहेरची ओढ कधीच कमी होत नाही, तरीही ती सासरी कां नांदते, याचं हळवं उत्तर सरस्वतीची लेक बहिणाबाई चौधरींच्या कवितेत दिसतं, त्या म्हणतात, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते! पुढे बहिणाबाई सांगतात,
देव कुठे देव कुठे भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला असं देवपण सामावलेलं माहेर स्वर्गापेक्षाही अधिक सुखदायी असतं.
देवालाही दुर्लभ असलेलं माहेरचं प्रेम आणि पंचपक्वानांपेक्षाही चविष्ट असलेला माहेरचा दहीभात सगळ्यांना उदंड लाभो आणि चैत्रातल्या गौरीसारखंच माहेरपणाचं सौख्य सगळ्या सख्यांच्या वाट्याला येवो, बस इतकंच, एवढंच.
Monday, 8 April 2019
कालजयी कुमारगंधर्वरियाजswati huddarइंदुर उज्जैन रस्त्यावर वसलेलं टुमदार देवास. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आणि म्हणूनच देवाचं वास्तव्य असलेलं देवास. नर्मदेच्या सुजलाम प्रवाहानं माळव्यातल्या भुमीच्या या तुकड्याला सुफलाम केलं. देवासच्या भुमीला संगीताची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध संगीतकार बंदे अली, शेवटचे मोठे बीनकार बाबूखॉं , संगीत सम्राट खॉंसाहेब रजब अली खॉं, पुढे कुमार गंधर्व. आणि असे कितीतरी संगीतज्ज्ञ या भुमीनं दिले.चामुंडा टेकडीकडे जाणाऱ्या उतारावरचं एक सुरेल घर भानुकुल. नित्य संगीत आराधनेत रमलेलं. ऋतूचक्राची जाणीव करून देणारी घराभोवतीची वृक्षराजीही स्वरांच्या घोसांनी लगडलेली. त्या वृक्षांवरच्या पक्ष्यांचा चिवचिवाटही एखाद्या बंदीशीसारखा. भानुकुलमधल्या बंगईच्या पितळी कड्यांची किणकिणही सुरेलच. एखादी रागिणी छेडल्यासारखी. कारण साक्षात सात स्वरांचं वास्तव्य या घरात होतं. 30 जानेवारी 1948 एका गंधर्वाची पावलं देवासच्या भुमीला लागली आणि ही भुमी अधिकच संगीतमय झाली. 8 एप्रिल 1924 रोजी बेळगाव इथं जन्मलेला शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली हा यक्ष संगीत साधनेसाठी मुंबईला येतो काय आणि पुढे प्रकृतीच्या कारणानं माळव्याच्या भुमीत रुजतो काय. सारंच अचंबित, अनाकलनीय. या गंधर्वाची पाच वर्षांची मुक साधनाही देवासच्या भुमीनं अनुभवली. इथल्या पोषक, स्वास्थ्यवर्धक वातावरणानं या गंधर्वाला जपलं आणि चमत्कार झाला. नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं ते स्वरपुंज वातावरणात घुमू लागले आणि त्यांनी अवघं संगीत अवकाश आपल्या कवेत घेतलं. अवघ्या नऊ वर्षांच्या शिवपुत्राचं गाणं ऐकून बेळगावच्या स्वामीजींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले अरे हा तर साक्षात कुमार गंधर्व. हे बिरुद कुमारांबरोबर कायम राहिलं. कुमार गंधर्व या व्यक्तिचं शारीरिक वय वाढत गेलं. त्याच्या स्वरांचं, गाण्याचं वय मात्र त्याच्या नावाप्रमाणं कायम कुमारच राहिल. चिरतरुण राहिल. ते स्वर नित्यनुतन संगीत प्रसवत राहिले. साल 1935. अलाहाबादच्या संगीत परिषदेत हे स्वर गुंजले आणि उस्ताद फैयाज खान, कुंदनलाल सहगल सारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी अवाक केलं. त्यावेळी त्या स्वरांचं वय होतं अवघं नऊ वर्षांचं. त्यानंतर कोलकत्त्याला संपन्न झालेली गांधर्व महाविद्यालय मंडळाची परिषद. पंडीत विनायकराव पटवर्धन, पंडीत नारायणराव व्यास, पंडीत शंकरराव व्यास, प्रो. बी. आर देवधरांसारख्या संगीतज्ज्ञांची उपस्थिती. 10 वर्षांच्या त्या गंधर्वानं पिया बिना नाही आवत चैन ही झिंझोटीतली ठुमरी छेडली आणि सगळी सभा देहभान विसरली. एका रात्रीत वयाच्या केवळ दहाव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव राष्ट्रीय गायक म्हणून नावारुपाला आलं. 1936 मध्ये कुमारजी मुंबईत देवधरांच्या स्कूल ऑफ इंडियन म्युजिक मध्ये दाखल झाले आणि या हिऱ्याला पैलू पडायला लागले. या स्वरांनी भारतवर्षाला वेड लावलं. साल 1947. या स्वरांना ग्रहणानं ग्रासलं. निदान झालं राजयक्षमा. कोरड्या हवेसाठी निवड झाली देवासची. चार-पाच वर्षांचा अज्ञातवास. स्वर मुक झाले. आत मात्र संगीत सुरुच होतं. अधिकाधिक बहरत होतं. माळव्याचं लोकसंगीत , कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास, निर्गुणी भजन, अहिमोहिनी, मालवती, मघवा, लगनगंधार, सहेली, तोडी, संजारी, मधसुरजा, निंदियारी, भवमतभैरव अशा नवनवीन रागरागिणी, अनेक नव्या बंदिशी, असं अगणित अनंत मनात उमलत होतं, आकारत होतं. अखेर 1952 साली या स्वरांचं ग्रहण सुटलं. आणि एक नवनवोन्मेषी तप:पुत अनुपम, स्वर्गीय स्वर दशदिशांना व्यापून राहिला. एक क्रांतीकारी स्वर. एक अपारंपरिक संगीत विचार. स्वतंत्र शैलीचा गायक. संगीत घराण्यांची परंपरा झुगारून देणारा संगीतोपासक. शास्त्रीय संगीताला परंपरेच्या जोखडातून मुक्त करून रसिकाभिमुख बनवणारा सरस्वतीचा सच्चा उपासक. चिंतनशील स्वतंत्र प्रतिभेचा गायक. असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार गंधर्व. कुमारजींनी चिंतनातून स्वत:ची गायकी जन्माला घातली. या अवलियावर स्वर प्रसन्न झाले. सगळे स्वर याच्या गळ्यात येऊन बसले आणि लहान मुलांना अंगाखांद्यावर खेळवावं तसा हा या सुरांशी खेळू लागला. शास्त्रीय संगीताचा उगम लोकसंगीतात आहे, असा विश्वास असलेल्या कुमार गंधर्वांनी मालवा की लोकधुने हा कार्यक्रम केला. आणि माळव्यातलं लोकसंगीत अक्षर झालं. कुमारजींनी तंत्रात अडकलेली गायिकी खुली केली. त्यात गोडवा निर्माण केला. रागांमध्ये विविध प्रयोग केले. एकाहून एक सुंदर बंदिशींची रचना केली. अनुपरागविलास हा कुमारजींच्या स्वरचित बंदिशी आणि राग यांच्या स्वरांकनाचा ग्रंथ आहे. सारंग या रागात बांधलेली ही बंदिश रुखवातले आया, आया तले आया बेठा बटमारा तपन करी दूर अरी ओ बाजी आओ पियास बुझाले तोरा व्यातलं लोकजीवन या बंदिशीतून व्यक्त होतं. कबीरांवर कुमारांचं विशेष प्रेम सुनता है गुरू ज्ञानी हे कुमारांनी गावं. आणि ऐकणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागावी. तानपुरे जुळवावेत आणि तासनतास त्या नादब्रह्माच्या आराधनेत तल्लीन व्हावं, ते कुमारांनीच. प्रिय पत्नी भानुताईंचं निधन झाल्यावर स्मशान घाटावरचं आंब्याचं बहरलेलं झाड पाहून भानुंच्या आठवणीनं व्याकुळ होऊन त्यांच्या चितेच्या साक्षीनं फेर आई मौरा अम्बुवापे ही बंदीश रचावी तिही कुमारांनीच. भानुकुलसमोरच्या माताजी का रास्तावरून देवीला बळी द्यायला निघालेल्या बकऱ्याच्या केविलवाण्या स्वरातून मधसुरजा राग सुचावा, तोही कुमारांनाच. बचा ले मोरी मां, घरमे ललुवा अकेलो है बिन मोहे ही आर्त बंदीश लिहावी तिही कुमारांनीच. संगीताबरोबरच कुमारांना साहित्याचीही उत्तम जाण होती. म्हणूनच कुमारांना तुकाराम पेलता आला. तुलसीदास गाता आला. भा. रा तांबेंच्या भावगीतांवर तांबे गीत रजनी सादर करता आली. भारत सरकारच्या निमंत्रणावरून कुमारजींनी गांधी मल्हार या रागाची निर्मिती केली. बेळगावच्या कुमारांना कर्नाटकी संगीतापेक्षा हिंदुस्तानी संगीत जवळच वाटलं. रागदारी संगीतातील या गंधर्वाला संतकाव्य, भावकाव्य, लोकसंगीत ठुमरी टप्पा असं काही सुद्धा वर्ज्य नव्हतं. कुमारांनी मला उमजलेले बालगंधर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाट्यगीतही पेश केली. संगीतातील घराण्यांचा अट्टाहास कुमारांनी मोडीत काढला. स्वत:च्या ग्वाल्हेर घराण्याचा अभिमान बाळगत असतानाच इतर संगीत घराण्यातील बलस्थानंही त्यांनी आत्मसात केली. कुमारांनी त्यांच्या प्रत्येक गुरूची विशेषता स्वत:च्या गाण्यात आणली अंजनाबई मालपेकरांकडून पूर्णतेची दृष्टी घेतली. प्रखर सूर घेतला. वाझिद हुसेनकडून बंदिशीची समज आणि ज्ञान घेतलं. राजाभैय्या पुंछवालेकडून अस्सल गाणं घेतलं. पं. ओंकारनाथ ठाकुर, जगन्नाथबुवा, गोविंदराव टेंबे, सिंदे खॉं, रामकृष्णबुवा वझे आणि देवधर या प्रत्येकाची खासियत कुमारांच्या गळ्यात उतरली आणि त्यांचं गाण परिपूर्ण झालं. अवघं 68 वर्षांचं आयुष्य. एका आयुष्यात कुमारांनी दहा आयुष्यांएवढी संगीताची सेवा केली. कुमारांच्या जीवनाचा रग रग संगीत, कण कण संगीत होता. संगीत हा त्यांचा ध्यास होता आणि श्वासही होता, कुमारजींना सम दिसायची. त्यांना स्वर दिसायचे. एखाद्याला परमेश्वर दिसावा तसा. मधसुरजा रागाची निर्मिती करणारे कुमार गंधर्व स्वत:च माध्यन्हिचा सूर्य होते. प्रखर आणि तेजस्वी. कुमारजी म्हणजे सळसळत चैतन्य. कुमारजी म्हणजे पौर्णिमेचं चांदणं. कुमारजी म्हणजे स्वरांचा गंगौघ. कुमारजींसाठी वसंत बापटांनी लिहिलेलं काव्य सादर करते. एका कुमाराची कहाणी सकाळच्या उन्हासरिसे एकदा याने काय केले दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले टिंबाटिंबामधे जसे चिंब आपले भरून ठेवले वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले तेवढ्यामध्ये कोणी तरी कौतुकाची टाळी दिली... तशी हा सावध झाला, आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक तप करते धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते तसा तोही इनामदार उग्र एकाग्र झाला तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला... तशी हा जो तडक उठला, ृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला. खजुरीच्या बनामधे संध्याकाळची सावली झाला तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला म्हणे कोणी तरी याच्यासाठी हाय म्हटले... तशी याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला कोणी म्हणतात निगुर्णाच्या डोहाचाही तळ पाहिला... एवढ्यामध्ये काय घडले, मंदिरात सनातन डमरू झडले. कण्यामधल्या मण्यांमधून मल्हाराची नागीण उठली चंद्राच्या तव्यामध्ये ॐकाराची लाट फुटली तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली... आता तसा कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठे म्हणे माझा सप्तवर्ण श्यामकर्ण घोडा कुठे! | |||
Tuesday, 2 April 2019
वुमन ऑफ बीट
जॅनिस जॉप्लिन
गार्गी विवेक हुद्दार
अनुवाद - वैदेही विवेक हुद्दार
मेझो सुप्रानो ही जॅनिसच्या आवाजाची ओळख, नव्हे तिची मक्तेदारीच. जॅनिस गायला लागली की क्षणार्धात तिच्या जादुई आवाजाने लाखोंना भुरळ पडायची. महिला रॉकस्टार हा शब्दच जॅनिससाठी निर्माण झाला.जॉपलिनचें सगळेच वेगळे, तिचे कपडे, तिची बीडेड ज्वेलरी, तिचे पिसे जडवलेले ड्रेस, ती स्वत: आणि हो तिचे गाणे आणि आवाज. सगळेच विलक्षण.
या सगळ्यामागे जॉपलिनचा रियाझ होता, तिची संगीत साधना होती. सगळ्या पट्ट्यांमध्ये लिलया फिरणारा तिचा आवाज ऐकणाऱ्यावर जादु करायचा. ती सुरांशी खेळायची.
तिला लेडी एल्विस प्रेसली म्हटले जायचे. अर्थात दोघांची तुलना करणे किंवा जॉपलीनला अशी उपाधी देणे हा कुठेतरी तिच्यावर अन्याय आहे. कारण तिची स्वत:ची ओळख आहे. एल्विस प्रेसली आणि जॅनिस जॉपलिन दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ होते. त्यांच्यातील साम्य म्हणजे दोघांनीही रॉक एन रोल या गायन प्रकाराला ग्लॅमर मिळवून दिले. दोघांमध्येही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद होती. अचाट आणि वैविध्यपूर्ण गायनशैलीने दोघांनीही संगीत इतिहासात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. दोघांचेही नाव पाश्चात्य संगीत इतिहासात अजरामर झाले.
1960 च्या उत्तरार्धात अफाट लोकप्रियता मिळवून चाहत्यांना वेड लावणारी जॅनिस मॉन्टरी पॉप फेस्टिव्हलमध्ये बिग ब्रदर्स या बॅन्डमधली मुख्य गायिका म्हणून पहिल्यांदा गायली आणि नवीन तारका म्हणून प्रकाशात आली. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या तिच्या दोन्ही अल्बमनी समीक्षकांची भरपूर वाहवा मिळवली. मात्र तिच्या कलागुणांना पुरेसा वाव मिळत नसल्याचे पाहून जॅनिसने इथून पुढे स्वत:चा बॅंड तयार करण्याचे आणि स्वतंत्र कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यातून जन्माला आला कॉस्मिक ब्लुज बॅंड. मात्र पुढे या बॅंडमध्ये काही आंतरिक मतभेद निर्माण झाले. म्हणून जॉपलिनने काही तज्ज्ञ मंडळींना घेऊन full filt boogie band सुरू केला. तिचे नवीन सहकारी अत्यंत कुशल आणि मेहनती होते. परीणामी जॉपलिनला नवे व्यासपीठ प्राप्त झाले, नवे अवकाश मिळाले. तिची गाणी चाहत्यांनी तर डोक्यावर घेतलीच आणि समीक्षकांकडूनही नावाजली गेली. जॅनिस कलावंत म्हणून अधिकाधिक समृद्ध होत गेली. जॅनिस तिच्या कलेविषयी, कामाविषयी अत्यंत निष्ठावान होती. तिचे सहकारी सांगतात, जॅनिस नेहमीच सर्वात आधी स्टुडिओत यायची आणि सर्वात शेवटी जायची.
जॅनिसच्या बिग ब्रोज या पहिल्यावहिल्या अल्बममधील कमी लोकप्रियता लाभलेली पण अविस्मरणीय अशी काही गाणी म्हणजे डाऊन ऑन मी, द टेस्ट टाईम. नंतर तिचा चिप थ्रिल नावाचा दुसरा अल्बम आला. तो प्रचंड प्रकाशझोतात आला, त्याला खूप लोकप्रियता लाभली. या अल्बमने billiboard 200 अल्बम चार्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले. त्यातील halled way for iconic heat, piece of my heart, summer time ही काही महत्त्वाची गाणी. तिचा तिसरा अल्बम kozic blues ने billiboard hot hundred मध्ये 41 वे स्थान प्राप्त केले. पण चिप थ्रिल ची उंची kozic blues गाठू शकला नाही. मात्र बाकीच्या अल्बमपेक्षा या अल्बमच्या आवाज आणि रेकॉर्डिंगची गुणवत्ता उत्कृष्ट मानली गेली.
28 जुन ते 4 जुलै 1970 या कालावधीत जॅनिस आणि तिच्या full filt boogie बॅंडने all star festival express train tour ध्ये सहभाग घेतला. ही ट्रेन कॅनडामधून प्रवास करायची आणि सर्व प्रवासी कलावंत ठिकठिकाणी थांबून कार्यक्रम करायचे. हा जॉपलिनच्या संगीत कारकीर्दीतला सर्वोच्च काळ होता.
दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यात याच काळात तुफान आले होते. तिचे खाजगी आणि सार्वजनिक संबंध, तिचे हेरॉइनचे व्यसन अशा बऱ्याच वादग्रस्त गोष्टी त्या काळात घडल्या. मात्र ते सगळं वादळ तिने आपल्या कलेत, गायनात ओतले. ती झोकून देऊन व्यक्त झाली आणि तिने स्वत:लाच नव्हे तर संगीत क्षेत्रालाही गौरवान्वित केले.
जॅनिसने तिच्या pearl या पुढच्या अल्बमचे रेकॉर्डिंग सुरू केले. या अल्बममध्ये जॅनिसने स्वत: लिहिलेल्या मर्सिडिझ बेन्झ या गाण्याचा समावेश होता. हा अल्बम खरोखरच pearl म्हणजे पाश्चात्य संगीतातील मोती ठरला. यामध्ये जॅनिसने क्रिस क्रिस्टोफरचे me and bobby megee हे गाणे स्वत:च्या अंदाजात गाऊन या मोत्याला सूवर्णाचे कोंदण चढवले. pearl अल्बम प्रकाशित झाला आणि म्युझीक इंडस्ट्री अवाक झाली. चाहत्यांनी, समीक्षकांनी यातील गाणी अक्षरश: डोक्यावर घेतली. आर्थिकदृष्टयाही या अल्बमने अफाट यश मिळविले. जॅनिसला या अल्बमने यशोशिखरावर नेऊन ठेवले. 2008 साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार HUNDRED GRETEST SINGERS OF ALL TIME या यादीमध्ये जॅनिसचे नाव 28 व्या क्रमांकावर झळकले. एवढेच नव्हे तर ROCK N ROLL HALL OF FAME 1995 मध्ये जॅनिसच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी महिला कलाकरांमध्येही जॅनिसचा समावेश आहे. तिच्या अल्बमने 15 दशलक्ष प्रती विकल्या जाण्याचा विक्रम केला. या यशाचा आनंद घेणे मात्र जॅनिसच्या नशिबात नव्हते.
जॅनिस अगदी लहान असताना तिला झोपेत चालण्याची सवय होती. अशी चालत असताना तिला कुठे चाललीस, असे कुणी विचारले तर तिचे उत्तर असायचे, घरी! समाजाची बंधने झुगारणारी जॅनिस प्रत्यक्ष आयुष्यातही स्वत:चा एकटेपणा सोबत घेऊन खूप भटकली. लहान असतानासारखीच कदाचित घराच्या शोधात. तिचा तो एकटेपणा, तिचे औदासिन्य तिच्या कलेतून जाणवत राहिले. सगळ्या पट्ट्यांमधून लिलया फिरणाऱ्या तिच्या जादुई स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली.
पण नियतीपुढे कुणाचे चालणार? वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जॅनिस जॉपलिन नावाची ही स्वर्गीय सुरांची मलिका ड्रग ओव्हर डोजमुळे हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली. अगदी लहान वयात तिने या जगाचा निरोप घेतला आणि कदाचित पाश्चात्य संगीत क्षेत्रात घडू शकले असते, असे अनेक विक्रम अपूर्णच राहिले. अनेक आख्यायिका अर्धवटच राहिल्या.
जॅनिसची भटकंती मात्र थांबली. मिळाले बहुदा तिला तिचे खरे घर. स्थिरावले तिचे सूर आणि ती!
गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अक्षर साहित्याचा जरासा अंश आठव गदिमांचास्वाती हुद्दारयंदाचं वर्ष अनेक सांस्कृतिक साहित्यिक घडामोडींचं वर्ष आहे. महाराष्ट्राचं भुषण असलेल्या पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग दि. माडगुळकर या त्रयींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहेच, त्याचप्रमाणं ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अमृता प्रीतम यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या सगळ्या साहित्यिकांनी, कलाकारांनी रसिकांना भरभरून दिलं. साहित्यिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न केलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या ऋणातून थोडंतरी उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्यापरीनं करीत आहे.महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या भाईंवर सिनेमा आलाय. बाबुजींचे सुपुत्र श्रीधर फडके त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम करीत आहेत. अमृता प्रीतम आणि गदिमांवरही विविध कार्यक्रम सादर होत आहेत. यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भाच्या मातीत यवतमाळला संपन्न झालं. डॉ. अरुणा ढेरेंसारख्या तरल संवेदनशील साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. एक विलक्षण आणि सुंदर योगायोग बघा. 1973 साली ग. दि. माडगुळकरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं होतं आणि ते साहित्य संमेलनही यवतमाळ इथंच झालं होतं. आणि यंदा अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षातही यवतमाळलाच साहित्य संमेलन पार पडलं. यंदा महाराष्ट्र इथल्या मातीत जन्मलेल्या तीन प्रतिभासंपन्न आणि लाडक्या कलाकारांची जन्मशताब्दी साजरी करतोय. गदिमांच्या साहित्यावर यानिमित्ताने चर्चा, कार्यक्रम निश्चितच होतील. होत आहेत. माझ्यासारख्या साहित्याच्या विद्यार्थिनीनं गदिमांवर बोलण्याचं धाडस करावं, म्हणजे काजव्यानं सूर्याची पुजा बांधण्यासारखं आहे. गदिमांच्याच शब्दात सांगायचं तर ही ज्योतीने तेजाची आरती आहे. तरी आपणा सारख्या सुविदय, सुजाण श्रोत्यांच्या समोर माझ्या अल्पमतीप्रमाणें मला आकळलेले गदिमा मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आजच्या विवेचनाचा विषय अलक्षित कवी गदिमा असला तरी यानिमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचाच धावता आढावा सुरुवातीला घेऊया. कथा, कादंबरी, आत्मचरीत्र, पटकथा, संवाद, चित्रपटगीत, लावणी, बालगीत, प्रेमकाव्य, भावकाव्य, भक्तीकाव्य इथपासून तर जोगिया आणि पुढे पुरीयासारखी तरल कविता लिहिणारे गदिमा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. गीतरामायणासारखी अलौकिक कृती प्रसवणाऱ्या गदिमांना महाराष्ट्र आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो. गीतरामायण जन्माला येऊन सहा दशकं लोटल्यानंतरही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतेच आहे, असं भाग्य फार कमी कलाकृतींना आणि साहित्यिकांना लाभतं.अशा अक्षर साहित्याचं धनित्व अण्णांकडे जातं. त्यांच्या हयातीतच त्यांच्या अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभलं होतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी, नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, गोरी गोरी पान, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी अशी एकाहून एक सरस बालगीतं लिहून बालसाहित्याचं विश्वही समृद्ध केलं. आपलं बालपण या गाण्यांवरच तर पोसलं गेलं. फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी प्रासादिक भक्तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावणीही लिहितात. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू आणि वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम लिहिणारे माडगुळकर नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी सारखं हळवं प्रेमगीतही लिहितात. आणि कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरीनाम, विकत घेतला श्याम असा मीराभावही व्यक्त करतात. बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे अशी लडिवाळ अंगाईही लिहितात. सहजस्फूर्त प्रासादिक भाषारचना आणि शब्दांची अचूक, नेमकी निवड हे गदिमांच्या गीतांचं वैशिष्ट्य आहे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गदिमांनी असामान्य प्रतिभेच्या बळावर भावकाव्य आणि चित्रपटगीतांमध्ये न भुतो न भविष्यती असं कार्य करून ठेवलं आहे. त्यांची काव्यप्रतिभा एवढी विलक्षण होती की चित्रपटातील प्रसंगानुरुप भाव आणि शब्द नेमकेपणानं त्यांच्या गीतांतून व्यक्त होत असतं. रचनांचं आणि विषयांचं वैविध्य पाहा. गदिमांनी शिर्डीच्या साईबाबांवरची काकडआरती रामगुलाम या नावानं रचली आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, त्यावेळी त्यांनी शाहिर बोऱ्या भगवान नावानं काही रचनाही केल्या. गीतरामायणासारखचं गदिमांनी गीतगोपाल आणि गीतसौभद्रही लिहिल. 158 मराठी चित्रपटांमधून गीतं लिहणाऱ्या गदिमांनी 25 हिंदी चित्रपटांच्याही कथा लिहिल्या आहेत. दो आँखे बारह हात, तुफान और दिया, नवरंग, अवतार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आणि प्यासा या गुरुदत्तच्या चित्रपटाची मूळ कथा इतकंच नाही तर राणी मुखर्जी आणि अमिताभच्या अभिनयानं गाजलेल्या ब्लॅक चित्रपटाची कथाही गदिमांचीच आहे. साहित्याचे इतके सगळे प्रकार प्रसवणारी अण्णांची लेखणी बहुप्रसवा होती. चित्रपटगीतं आणि गीतरामायणाच्या उत्तुंग यशामागे या निर्मात्याची कविता मात्र झाकोळली गेली. अनेक समीक्षकांनी गदिमांना गीतकाराच्या प्रतिमेतच बंदिस्त करून टाकलं. समीक्षक आणि टीकाकारच काय स्वत: गदिमाही आपल्या महाकवी या उल्लेखावर कोटी करताना म्हणायचे मी महाकवी नाही, तर महाकाय कवी आहे. गंमतीचा भाग सोडला तर माडगुळकरांच्या कवितेची योग्य दखल मराठी रसिकांनी पुरेशी घेतली नाही, हे खेदानं नमुद करावं लागेल. सहज बोलणे तरी उपदेश हे संतांविषयी म्हटलं जातं. गदिमांची गीत आणि काव्य रचना सहजपणाची ती उंची गाठते. सोपं लिहिण्याइतकं अवघड जगात दुसरं काही नाही. हे अवघडपण गदिमांनी लिलया पेललं आहे. गदिमा एकाचवेळी क्लास आणि मासचे कवी आहेत. त्यांची कविता गात गात जन्माला आली. सोप्या शब्दातून गदिमांनी अनेक ठिकाणी गहन तत्वज्ञान सांगितलं. एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझीया आयुष्याचे या वस्त्राते विणतो कोण, एकसारखी नसती दोन, कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे हे सांगणारी गदिमांची कविता संतकाव्याशी नातं सांगते. किर्लोस्कर -देवलांचा वारसा तर माडगुळकर मान्यच करतात. चैत्रबन हा त्यांचा गीतसंग्रह त्यांनी किर्लोस्कर देवलांच्या प्रतिभेलाच अर्पण केला आहे. इथे फुलांना मरण जन्मता दगडांना परी चिरंजिविता बोर बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार इतकी आशयघनता शब्दातून मांडणारे अण्णा शब्दप्रभुच होते. माडगुळकरांच्या शैलीबद्दल बोलताना शांताबाई शेळके एके ठिकाणी म्हणतात शब्दसिद्धी त्यांना जन्मत:च लाभली होती. कोणतीही अनुभुती रुपवंत करणारे शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहात. संस्कृतच्या व्यासंगानं विदग्धतेचा स्पर्श झालेली त्यांची कविता पंडिती काव्याची आठवण करून देते. त्यांच्या गीतातील ग्रामीण बाज त्यांची नाळ शाहिरांशी जोडतो. राम जोशी चित्रपटातील त्यांची ही सवालजबाबाची लावणी लोकगीताचा उत्कृष्ट नमुना आहे. सूर्य उगवता कमल उमलते सिंधु उसळतो चंद्रा बघुनी शुद्ध प्रीति हे कारण त्याचे ज्ञात्यांनो घ्या हृदयी भरूनी या शाहिरी काव्यातही गदिमांनी तत्वज्ञानाशी फारकत घेतलेली नाही. रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा हे चैत्रबनमधलं गीत आणि सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर ही पुरीयामधली माहेर ही कविता यातून हळवे माडगुळकर व्यक्त होतात. जोगियाच्या प्रस्तावनेत अण्णा म्हणतात, जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे. या संग्रहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले. नेहमीच रसिकांची दाद मिळवणाऱ्या एखाद्या कसबी गवय्यानं एखाद्या मैफीलीत स्वर छेडावे आणि एका संपृक्त क्षणी त्याला नादब्रह्म गवसावं, तशी गदिमांची जोगिया ही कविता. हा विडा घडवूनी करिते त्याचे ध्यान त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनि अंगे वर्षात एकदा असा जोगिया रंगे जोगिया आणि पुरीया हे अण्णांचं स्वान्त सुखाय लिहिलेलं अस्सल काव्य आहे. गेय कविता लिहून गीतकाराचा शिक्का माथी आलेले गदिमा पुरीयामध्ये मुक्तछंदातली कविता लिहितात. कधी त्यातून विंदा डोकावतात तर कधी मर्ढेकर. गदिमांची रंगमंच ही आत्मपर कविता राजकवी तांब्यांच्या मधु मागसी माझ्या सख्या परीची आठवण करून देते. सच्च्या कलावंताची व्यथा गदिमा यातून व्यक्त करतात. रंग पुसावा, वेष उतरावा वाटते आहे नाटकात रंगत राहिली नाही पाडणार असशील तेव्हा पाड पडदा भरतवाक्याचा उच्चार होईतो मी मंच सोडणार नाही, पण पण मला क्षमा कर अभिनयाची प्रत उतरली आहे किती नेमक्या शब्दात कला, कलावंत यांचं वास्तव गदिमांनी इथे मांडलं आहे. गदिमांच्या जोगियातील कवितांपेक्षा पुरीयामधील कवितांचा बाज वेगळा आहे. विषय आणि मांडणी या दोन्हीबाबतीत ही कविता अधिक धीटपणे व्यक्त होते. मुक्तछंदातून प्रगटणारी पुरीयातली कविता आधुनिक कवितेशी अधिक जवळचं नातं सांगणारी आहे. हे या रंगमंच कवितेवरून आपल्या लक्षात येईल. ग. दि. माडगुळकर या अष्टपैलू साहित्यिकाच्या समग्र साहित्याचा विचार केल्यानंतर माझ मन येऊन थांबतं त्यांच्या एका गेय कवितेपाशी. गदिमांची ही कविता आईच्या मायेनं कुशीत घेते आहे असं मला नेहमी वाटतं. कवितेचे शब्द अंगाभोवती लपेटून मन गदिमांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं आणि आपण गुणगुणत राहतो, बावरा मी भोळा पडेन का तुझीया डोळा लिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात एकवार पंखावरूनी फिरे तुझा हात गदिमांची ही कविता कबिराच्या दोह्यांच्या जवळ जाणारी आहे. गदिमांवरचे कथा कीर्तनाचे संस्कार, बालपणी त्यांनी ऐकलेल्या जात्यावरच्या ओव्या, रामायण महाभारतावर पोसलं गेलेलं त्यांचं बाल्य, संत काव्याशी त्यांची जुळलेली नाळ सगळं सगळं या एका कवितेतून व्यक्त होतं. सोप्या शब्दातून गहन तत्वज्ञान सांगणाऱ्या गदिमांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन या काव्यातून होतं. इथे तुळशीच्या सावळ्या पानानं पारडं जड करणारी रुक्मिणी आठवते. गदिमांची ही कविता तुळशीच्या त्या पानासारखी आहे. पारडं तोलून धरणारी. हितगुज केल्यासारखी स्वाभाविकपणे गात गात व्यक्त होणाऱ्या गदिमांच्या कवितेसमोर आणि प्रतिभेसमोर आपण सहजच नतमस्तक होतो. ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा इश्वराचा अंश आहे ज्ञानोबा तुकोबांच्या कलावंशाचा वारसा सांगणारे माडगुळकर महाकवीच नव्हे तर युगकवी होते. महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर आणि एकूणच साहित्य संप्रदायावर माडगुळकरांचं अनंत ऋण आहेत. मराठी साहित्य रसिंकांनी अण्णांच्या या ऋणातच राहावं. त्यांच्या साहित्याची पालखी भोई होऊन वाहावी आणि हे अक्षर साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावं, अशी आशा व्यक्त करते. | |||
Thursday, 14 February 2019
खेळ विस्तवाशीस्वाती हुद्दारअरे संसार संसार जसा तवा चुल्यावरआधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या या कवितेतून स्त्रीची व्यथा आणि कथा सांगितली आहे. आयुष्यभर कष्टाचे, दु:खाचे चटके सोसत प्रत्येक स्त्री संसार करते आणि त्यातून तावूनसुलाखून निघत असते. स्त्री जीवनाला अग्निपरीक्षा चुकलेलीच नाही. प्रत्यक्ष सीतेलाही आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली. द्रौपदीलाही भर सभेत विटंबनेचे चटके सोसावे लागले. शिक्षणाचा मूलमंत्र देणाऱ्या सावित्रीने पांढरपेशा समाजाच्या शिव्याशापांचे चटके सोसले. सावित्रीच्या या कष्टांना मात्र यशाची फुले आली आणि स्त्री शिकूनसवरून शहाणी झाली. हळूहळू प्रत्येक क्षेत्रात तिने यशाच्या पताका फडकवल्या. मोठमोठी पदे भुषविली. विमान चालविण्यापासून तर पोलिस दलात आणि सेनेत भरती होण्यापर्यंत सगळी क्षेत्रे तिने पादाक्रांत केलीत. आतातर नव्या युगाची नवी महिला अग्निशमन दलातही आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी सरसावली आहे. सेवावृत्ती, समयसूचकता, सावधानता, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वीपणे कार्य करू शकण्याचे आनुवंशिक शहाणपण अशा निसर्गदत्त स्थायी गुणांचे वरदान महिलांना लाभले आहे. अशा गुणसंपन्न 100 हिरकण्या अग्निशमनदलाच्या सेवेत नुकत्याच रुजू झाल्या आहेत. विस्तवाशी सामना करण्याच्या संकल्पाने. माणसाचे आयुष्य आव्हानांनी भरलेले आहेच. जीवनात धोक्याची वळणेही असतातच. स्त्रियांच्या वाट्याला तर अधिकच असतात. ती स्वत:च्या घरातही सुरक्षित असेलच, याची खात्री नसते; मात्र रोजच्या जीवनातली सगळी आडवळणे, समस्या, जबाबदाऱ्या, कर्तव्ये सांभाळून आता तिने ध्यास घेतला आहे स्वत:ला सिद्ध करण्याचा आणि म्हणूनच ती रोज यशाची नवनवी क्षेत्रे पादाक्रांत करीत पुढेपुढेच निघाली आहे. वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलात चाललो मिसळूनी मेळ्यात कधी, एक हात धरुनि कधी आपुलिच साथ कधी करित चाललो काट्यांची फुले करण्याच्या निर्धाराने. अग्निशमन दलात नोकरी म्हणजे खरे तर मृत्यूशीच दोस्ती. अत्यंत जोखमीची. काळवेळेचे बंधन नसलेली ही नोकरी या महिलांनी स्वखुशीने स्वीकारली आहे. याआधी 2012 मध्येही अग्निशमन दलात महिला कर्मचारी दाखल झाल्या होत्या. यावेळी मात्र हा आकडा बराच मोठा म्हणजे तब्बल शंभरीचा. विशेष म्हणजे या विशी-पंचविशीच्या महिला शहरी भागासह ग्रामीण भागातूनही आल्या आहेत. हे विशेष कौतुकास्पद आहे. अनेकींची नुकतीच लग्न झाली आहेत, अनेकजणींना छोटी बाळं आहेत, तरीही त्यांनी काळवेळेचे बंधन नसलेली आणि जिवाचा भरवसा नसलेली नोकरी आनंदाने स्वीकारली आहे. त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांचेही कौतुकच केले पाहिजे. कारण कुटुंबीयांच्या सहकार्याशिवाय अशी सेवाव्रती नोकरी करणे केवळ अशक्य आहे. या क्षेत्रात जोखीम खूप जास्त आहे, कारण प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचेपर्यंत आपल्याला कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, हे कळायला मार्ग नसतो. आगीचे स्वरूप, त्याची गंभीरता लक्षात घेऊन वेळेवर निर्णय घ्यावे लागतात. अग्निशमनाचे तंत्र पूर्णत: आत्मसात करावे लागते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवावे लागतात. कधी स्फोट होण्याचा धोका असतो. कधी अंगावर काही कोसळण्याचा धोका असतो. त्यासाठी मनाबरोबरच शरीराने खंबीर असणे गरजेचे आहे आणि आपल्या सुखी जीवनाचा त्याग करून ही जोखीम स्वीकारलेल्या या शंभर रणरागिण्या या परीक्षेत खऱ्या उतरल्या आहेत. इथे स्त्री-पुरुष असमानतेची रेषा धूसर झाल्याचे जाणवते. महिला कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा डाव्या नाहीत, हे त्यांनी अनेकवार सिद्ध केले आहे. हा भेद आता समाजानेही संपवला पाहिजे. आपले प्राण धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणाऱ्या या निडर महिलांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. सेवा पुरवणाऱ्या कामांमध्ये एकदा का वर्दी अंगावर चढवली की तुम्ही स्त्री आहात की पुरुष, ही भावनाच उरत नाही. असते केवळ आपल्या कामाप्रती पूर्ण समर्पण आणि सेवाभाव. असा अनुभव या रणरागिण्या व्यक्त करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुणाचा तरी जीव वाचवल्याची भावना खूप सुंदर असते. तो आयुष्यातला कृतार्थतेचा क्षण असतो. स्त्री-पुरुष असमानता, हेवेदावे, मतभेद या सगळ्या गोष्टी त्यापुढे अत्यंत खुज्या असतात. तेव्हा एकच जज्बा असतो, समाजसेवेचा. सेवेची ही भावना नोकरी, पगार या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहे. समाजसेवेचे कंकण डोळसपणे हाती बांधलेल्या या हिरकण्यांना मानाचा मुजरा. | |||
सर्वेपि:सुखिन सन्तुswati huddarमाझा देश आणि देशबांधवांचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. शालेय जीवनापासून प्रतिज्ञेतल्या या ओळी आम्ही मुखोतगत केल्या असतात, मात्र त्या जीवनात प्रत्यक्षात उतरविणारे विरळाच. विविधतेने नटलेल्या या देशातील वंचित समाजाला स्नेह अर्पण करून त्यांच्या कल्याणासाठी गेली 20 वर्ष अविरत झटणारे एक दाम्पत्य. जयंत आणि जयश्री कोठे. वय वर्षे अवघे 82. ओएनजीसीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झाल्यानंतर आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून नागपुरातील सुखी आयुष्य त्यागून बस्तरसारख्या आदिवासी भागात कोठे दाम्पत्याने सेवाकार्याची मुहुर्तमेढ रोवली. दंतेवाडा हा छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग. इथे गेल्या 21 वर्षांपासून आणि गोंदिया जिल्ह्यातील पाऊलझुला येथे गेल्या पाच वर्षांपासून कोठे दाम्पत्याची आदि ही संस्था इदं न मम या वृत्तीने सेवाकार्य करीत आहे. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक सोयीसुविधांपासूनही इथला समाज कोसो दूर होता. शिक्षण, आरोग्य यासंबंधीच्या जाणिवाच जागृत नसलेला अत्यंत मागास समाज. कुपोषण, सिकलसेल जागृती, रोजगाराभिमुख शिक्षण या अजेंड्यावर कार्याची सुरुवात झाली. सुधारणांचा वाराही न लागलेल्या आपल्याच कोषात जगणाऱ्या या समाजाला आपलसं करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. प्रेमळ स्वभावाच्या या दोघांनीही त्यात सहज यश मिळवलं. आणि आज या सगळ्यांचे ते दादाजी-दादींजी आहेत. आदिवासी समाज आणि दादा-दादींमध्ये अतूट असे स्नेहबंध निर्माण झाले. या मंडंळींमधले कुपोषण दूर करणे सगळ्यात गरजेचे होते. त्यासाठी त्यांना पौष्टिक आहार आदिकडून पुरविला जाऊ लागला. मुलांनी शाळेत जावे आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आदिने शाळेमध्ये खिचडी पुरविणे सुरू केले. इथल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने खिचडी तयार करण्याचे कामही स्थानिक महिलांनाच देण्यात आले. मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयोग आदिने राबविला. या प्रयोगातून आजपर्यंत हजारो मुले शिकून स्वत:च्या पायावर उभी झाली आहेत. ड्रायव्हिंग, संगणक प्रशिक्षण, आयटीआयचे शिक्षण देऊन इथल्या नवीन पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यात दादा-दादींचा सिंहाचा वाटा आहे. दर आठवड्यात मेडीकल कॅंपचे आयोजन करून या मंडळींच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. औषधांचा पुरवठा केला जातो. वर्षातून दोनदा मेगा मेडीकल कॅंपही घेतले जातात. बस्तरच्या 60 किलोमीटर परिसरात आणि गोंदिया जिल्ह्याच्या आसपासच्या 50-60 गावांमध्ये आदिचे कार्य विस्तारले आहे. इथल्या स्थानिक कलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून उत्पन्नही मिळावे यासाठी या मंडळींनी तयार केलेल्या काष्ठ शिल्पांचे, आणि विविध वस्तुंचे प्रदर्शन मोठ्या शहरात आदिद्वारे आयोजित केले जाते. इथली मुले मुळातच काटक आहेत, त्यांच्या शारीरिक क्षमतांचा योग्य विकास व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध क्रीडा प्रकार शिकविले जातात, क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाते.आता तर आदिने पाऊलझुल्याला पाच एकर शेती भाड्याने घेतली आहे, त्यावर शेती उत्पादनाचे विविध प्रयोग राबविण्यात येणार आहेत, लाभदायक शेती आणि शेतीपुरक व्यवसायाचे प्रशिक्षण इथल्या तरुण मुलांना देण्याचा दादा-दादींचा मानस आहे. मी आणि माझे अशी जीवनशैली अंगिकारलेल्या आजच्या काळात वसुधेच्या कल्याणाकरिता चंदनासम झिजणाऱ्या दादाजी आणि दादीजी कोठेंच्या अलौकिक कार्याला सलाम! | |||
Friday, 18 January 2019
| लढाई अस्मितेची! किती खरी किती खोटी स्वाती हुद्दार दिवस, महिने, वर्ष हे आपल्या ठरावीक गतीने पुढे सरकतातच. काळ सततच प्रवाहित असतो. माणूस त्या काळाच्या गतीशी जुळवून घेतो किंवा नाही, यावरच त्याची प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते. नव्या वर्षाच्या कॅलेंडरमधले पंधरा दिवस उलटलेही. या नव्याच्या नऊ दिवसात महिलांसंबंधातील काही घटना घडल्या. त्या घटना आमच्या सुसंस्कृततेवर, पुरोगामित्वावर, प्रतिगामित्वावर भाष्य करण्यास पुरेशा आहेत. आपण सात आंधळे आणि हत्तींची गोष्ट ऐकली आहे. प्रत्येक आंधळ्यानं त्याला जाणवलं तसं हत्तीचं वर्णन केलं, त्याच्या दृष्टीनं हत्तीचं तेच रुप होतं. तसंच या महिलांसंबंधातील घटनांचा अन्वयार्थ प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टिकोनातून लावेल. या घटनांना अनेक आयाम आहेत. कॅलिडोस्कोपसारखे. तरीही काही मुलभूत प्रश्न उरतातच आणि नव्या वर्षाच्या, नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच विचारगर्भ ठरावेत. प्रत्येक समाजात काही मिथक असतात. अगदी पाश्चिमात्य देशही याला अपवाद नाहीत. त्या परंपरांना काही धार्मिक, सामाजिक आयाम असतात. ते पिढ्यानुपिढ्या जपली जातात. काळाबरोबर पुढे सरकतात. ती काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून बघितली जात नाहीत, कारण परंपरा जोपासणं हा समाजाचा स्वभाव असतो. अशीच परंपरा महाराष्ट्रातल्या शनीशिंगणापूरला होती. महिलांनी शनी मंदिरात प्रवेश करू नये, ही ती परंपरा. अलिकडेपर्यंत कोणालाही त्यात काही गैर वाटले नाही. मात्र दोन वर्षापूर्वी तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडनं त्याविरुद्ध एल्गार पुकारला आणि त्यांच्यासह अनेक महिलांनी मंदिरात प्रवेश केला. परंपरावाद्यांनी त्यावेळी टोकाचा विरोध केला. मात्र तृप्ती देसाई आणि टीम मंदिर प्रवेशात यशस्वी झाली. महिलांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून भूकंप आला नाही, वादळ झाले नाही, दुष्काळ पडला नाही आणि पुरही आला नाही. महिलांचा हा प्रतिकात्मक विजय होता. चुकीच्या किंवा अन्याय्य परंपरांविरुद्ध वाचा फोडण्यासाठी एखादा सत्याग्रह पुरेसा असतो, जसा डॉ. आंबेडकरांनी केलेला महाडचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिर प्रवेशासाठीचे आंदोलन, महात्मा गांधींनी केलेला मीठाचा सत्याग्रह. महिलांचा हा शनी शिंगणापुरचा विजय प्रतिकात्मक होता. स्त्री-पुरूष समानतेला अधोरेखीत करणारा होता. मात्र त्यानंतर मंदिर प्रवेशाचं लोणचं आलं. कोल्हापुरची महालक्ष्मी, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, हाजीअली, शबरीमला आणि आता तुळजापूर. शबरीमलाचे रण पेटलेलेच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परंपरावादी मागे हटायला तयार नाहीत. निष्पाप बळी जात आहेत आणि त्याचवेळी 50 वर्षाखालील दोन महिलांनी मध्यरात्री शबरीमला मंदिरात प्रवेश करून अयप्पांची पुजा केल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी तुळजापुरच्या भवानीच्या गर्भगृहात काही महिलांनी मध्यरात्री प्रवेश केला आणि भवानीच्या चरणांना स्पर्श केल्याचा दावा केला आहे. मंदिराच्या भोपे परिवारातील महिलांशिवाय इतर कोणत्याही महिलांना भवानीचे चरणस्पर्श करण्याचा अधिकार नाही, याविरुद्ध अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. शेवटी गेल्या आठवड्यात काही महिलांना यात यश मिळाले. महिला एकामागोमाग मंदिरे पादाक्रांत करीत आहेत. रुढीवाद्यांपुढे महिलांचा हा निश्चितच विजय आहे, मात्र या मंदिर प्रवेशामुळे महिला वर्गाचे समस्त प्रश्न मार्गी लागले आहेत, असं समजायचं का? मंदिर प्रवेश हा स्त्री-पुरूष समानतेचा एकमेव निकष आहे, अशा थाटात ही आंदोलनं सुरू आहेत. मंदिर प्रवेशाचं हे रण माजलं असतानाच साहित्य-संस्कृतीचं माहेरघर असलेल्या पुण्यात कंजारभाट समाजाच्या एका उच्चशिक्षित नववधुला कौमार्य चाचणीला नुकतंच सामोर जावं लागलं. जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून आपल्या नवविवाहित पत्नीला ही चाचणी द्यायला भाग पाडणारा तिचा नवरा लंडनमध्ये शिकला आहे. तिचे सासरे माजी नगरसेवक आहेत आणि खुद्द तिचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नववधुही उच्चशिक्षित आहे. तरीही तिनं या गोष्टीला विरोध केला नाही. मंदिर प्रवेश लढाईच्या वेळी उफाळून आलेला आमचा आत्माभिमान अशा प्रसंगी कुठे दडून बसतो, न कळे. कंजारभाट समाजातील या प्रथेला 20 वर्षापूर्वी सर्वप्रथम याच समाजातील अरुणा आणि कृष्णा इंद्रेकर या जोडप्यानं विरोध केला. त्यासाठी त्यांना वाळीतही टाकण्यात आले. मात्र त्यांनी आपला विरोध आणि समाजातील तरुणांची जनजागृती सुरूच ठेवली. त्याचाच परिणाम म्हणजे या समाजातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रथेविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. त्यांनी स्टॉप व्ही टेस्ट नावानं व्हॉट्स ऍप ग्रुप सुरू केला आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकणारा विवेक तमाचेकर या चळवळीत अग्रेसर आहे. काही वडीलधाऱ्यांचाही त्यांना पाठिंबा मिळतो आहे, मात्र दुसरीकडे त्यांना धमक्याही येऊ लागल्या आहेत. तरीही ही नव्या दमाची तरुण मंडळी या अन्याय्य प्रथेविरुद्धचा लढा पुढे रेटत आहेत, हे ही नसे थोडके. मंदीराचे उंबरे झिजवण्यापेक्षा अशा राक्षसी प्रथांविरोधात उभे ठाकणे अधिक महत्त्वाचे आहे. मंदिर हा अस्मितेचा विषय असेलही, मात्र अशा जुलमी प्रथा म्हणजे त्या महिलेचा जीवनमरणाचा प्रश्न असतो. या लढाईत उर्वरीत समाजानेही या तरुणांबरोबर उभे राहाणे गरजेचे आहे. जाता जाता... गेल्या आठवड्यात नेदरलॅंडच्या साराची कथा वाचण्यात आली. नेदरलॅंडची ही अवघी 19 वर्षांची युवती नोकरीच्या शोधात ऍमस्टरडॅमला गेली, एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर तिला एका सापळ्यात अडकवण्यात आले आणि तिची रवानगी वेश्यागृहात करण्यात आली. तिथे दररोज तिला कोकेन दिलं जातं होतं आणि 18-18 माणसे तिच्यावर अत्याचार करीत होते. 1997 साली सारानं कशीबशी तिथुन सुटका करून घेतली आणि बेल्जियममध्ये आश्रय घेतला. आता 42 वर्षांची असलेल्या सारानं स्लेव गर्ल या नावानं आत्मचरित्र लिहून आपली कहाणी जगासमोर आणली आहे. अशा किती सारा अजूनही अंधारात अत्याचार सोसत असतील, कितीजणी अजूनही पावित्र्यासाठी परीक्षा देत असतील, याची मोजदादच नाही. अनेकींमधल्या काहीच कहाण्या अशा समोर येतात, बाकीच्या काळाच्या उदरात गुडूप होतात. जगभर स्त्रीच्या वाट्याला अन्याय अत्याचार येत असतात. प्रत्येकीची कहाणी निराळी. थकवणारी. दुखावणारी. रडवणारी. सगळ्या प्रथा तिच्या विरोधात. सगळ्या परंपरा तिच्या विरोधात. समाजही तिच्या विरोधात. या सगळ्या प्रथा, परंपरा निर्माण करणारा पुरुषही तिच्या विरोधात. नवीन वर्षाचा सूर्यही तिच्या जीवनातील अंधार दूर सारू शकला नाही. फक्त एवढेच सत्य आहे. | |||
Subscribe to:
Posts (Atom)