Powered by Blogger.

Saturday, 20 November 2021

 वाचनाची मेजवानी देणारे दिवाळी अंक
स्वाती हुद्दार

दिवाळी अंक ही खास महाराष्ट्राची परंपरा. दिवाळीतल्या फराळाइतकेच दिवाळी अंकाचेही मराठी माणसाला महत्त्व आहे. नव्हे दिवाळी अंकाशिवाय मराठी माणसाची दिवाळी अपूर्ण आहे. दिवाळी अंक म्हणजे दर्जेदार साहित्याची मेजवानी. दिवसेंदिवस दिवाळी अंकाची ही परंपरा विस्तारते आहे आणि अधिक समृद्ध होते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दर्जेदार दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत हजर आहेत. त्यांचाच हा लेखाजोखा.
मीडिया वॉच दिवाळी अंक
मीडिया वॉच हा दिवाळी अंक माणसांच्या कथा सांगणारा आहे. रवीश कुमार, प्रशांत किशोर, मोईना मोईत्रा, जयंत पाटील यांच्या सोबतच अमिताभ, तब्बु, कपिल शर्मा, जी. ए. कुलकर्णी अशा विविध क्षेत्रातील मातब्बरांच्या आयुष्याच्या कहाण्या सांगण्यासोबतच त्यांच्या जीवनातील अंधाऱ्या कोपऱ्यांवरही या लेखांमधुन प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय आदिवासींची संस्कृती-परंपरा आणि जगणे बायांचे या विभागातील लेख अत्यंत वायनीय आहेत. तसेच सुलक्षणा वऱ्हाडकर यांच्या मैत्रिणींच्या भन्नाट कथा आणि समीर गायकवाडांचा रेड लाईट डायरी वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात.
आकांक्षाचा दिवाळी अंक
सत्ता, स्त्री आणि सौंदर्य या विषयाला वाहिलेला आकांक्षा प्रकाशनाचा दिवाळी अंक अंतर्मुख करणारा आहे. स्त्री सौंदर्याच्या पूर्वापार संकल्पना, त्यामागचे पुरुषी वर्चस्व, स्त्री सौंदर्याचे आजचे परिमाण, स्री सौंदर्याच्या व्याख्येकडे पाहण्याचा आधुनिक स्त्रीचा दृष्टिकोन अशा विविध विषयांना स्पर्श करणारे गणेश कनाटे, सुरेश द्वादशीवार, अरुणा सबाने, सानिया भालेराव आदी नामवंतांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत. याशिवाय संजय आवटे, नीलम गोऱ्हे, प्रतीक्षा लोणकर, गीताली आदींच्या मुलाखती, काही कथा आणि कविता असा भरगच्च मजकुर या अंकात आहे.
मराठामार्गचा बळीराजा
दिवाळी अंकाच्या नेहमीच्या परंपरेला फाटा देत शेतकऱ्यांना वाहिलेला बळीराजा विशेषांक काढून मराठामार्गने एक नवीन मुहुर्तमेढ रोवली आहे. आरक्षण आणि शेतकरी आंदोलन अशा दोन विषयात हा अंक विभागला आहे. या अंकात आरक्षणातील बनवाबनवी हा मराठामार्गचे संस्थापक संपादक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांचा लेख विचार करायला भाग पाडणारा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आणि लढा हा डॉ. बबनराव तायवाडे यांचा लेख, याशिवाय डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. जावेद पाशा कुरैशी, डॉ. एम. ए. रशीद, जयश्री पाटील रणदिवे अशा अनेक मान्यवरांचे आरक्षणासंबंधी ऊहापोह करणारे लेख, शेतकऱ्यांच्या चिरंतन प्रश्नावरचे फिरदोस मिर्झा, अनिल घनवट, डॉ. अजित नवले, ॲड. वामनराव चटप, अमिताभ पावडे आदी अभ्यासकांचे लेख आणि आधुनिक मराठी रंगभूमीचे शिल्पकार हा डॉ. सतीश पावडे यांचा लेख अशा अभ्यासपुर्ण लेखांचा समावेश या अंकात आहे.
इंक ॲण्ड पेनचा अनलॉक
देशभरातील विविध समुह हा अनलॉक दिवाळी अंकाचा विषय आहे. देशातील अनेक समुहांचे जगणे चाकोरी बाहेरचे आहे. काहींचे कर्तृत्व अत्यंत मोठे आहे. काही समुह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही समस्या आणि प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकले आहे. काही समुहांनी देशाला दिशा दिली तर काहींची आजही उपेक्षाच होते आहे. अनेक समुहांविषयी जगाला माहितीच नाही. अशा अनेक समुहांवर या दिवाळी अंकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय अनेक मान्यवरांच्या कथा, कविता या अंकात आहेत. 

महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक
महाराष्ट्र टाईम्सच्या विदर्भ आवृत्तीला यंदा ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त यंदाच्या दिवाळी अंकात प्राचीन वैदर्भीय शहरांमध्ये दडलेल्या ऐतिहासिक दाखल्यांचा ऊहापोह या अंकात करण्यात आला आहे. विदर्भातील आदिवासी संस्कृती, त्यांच्या प्रथा-परंपरा, पूर्व विदर्भातील दुर्मीळ वनौषधी याचा मागोवाही अंकात घेण्यात आला आहे. यासोबतच विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा शोध घेणारा लेख, महाकवी दंडीचा आठव, गावांमध्ये अजूनही न पोचलेला विकास, जगविख्यात कोलंबियन-स्पॅनिश लेखकाच्या लिव्हिंग टु टेल द् टेल या आत्मकथेतील माणूसतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्नही या अंकात करण्यात आली आहे. याशिवाय धर्मांतरण प्रक्रियेचा प्रवास सांगणारा लेख, संगीत वेड्यांसाठी बंदिशीवरचा अभ्यासपूर्ण लेख, काही व्यक्तिवेध घेणारे लेख, काही यशोकथा अशा अनेकविध विषयांचा अंतर्भाव या अंकात आहे.
लोकशाहीवार्ताचा लोकदीप
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, दिनकर रायकर, यमाजी मालकर, श्रीनिवास खांदेवाले, कर्नल अभय पटवर्धन, आदींच्या परिसंवादासह, कथा, ललित, कविता असा साहित्यिक नजराणाही या अंकात पुरेपुर आहे. याशिवाय व्यंगचित्र, रेखाचित्र, अंकज्योतिष्य आणि राशीभविष्य अशा नेहमीच्या सदरांनीही हा अंक परिपूर्ण आहे.
पुण्यनगरी दिवाळी अंक
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ही संकल्पना घेऊन पुण्यनगरीचा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आला आहे. ७५ वर्षातील जमा-पुंजी, डावे-उजवे, कर्तव्य- जबाबदाऱ्या या सगळ्यांचा अत्यंत संतुलित लेखाजोखा विविध क्षेत्रातील विचारवंतांनी मांडला आहे. हा दिवाळी अंक चार भागात प्रकाशित झाला असून चारही भाग वाचनीय आहेत. याशिवाय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेशा कथा, कविता, ललित, राशीभविष्य असा नियमित भरमसाठ मजकुर यामध्ये आहेच. एकूणच अंक वाचनीय झाला आहे. 

एकूणच अनेक दर्जेदार दिवाळी अंकांनी यंदाची दिवाळी तेजोमय करण्यात हातभार लावला.
दिवाळी संपल्यानंतरही विचारांचे प्रकाशपुंज मनामनात तेवत ठेवणारे दिवाळी अंक म्हणजे मराठी माणसासाठी मर्मबंधातली ठेव आहेत. 

Monday, 1 November 2021

 अवघा रंग एक झाला...
स्वाती हुद्दार
बाराव्या शतकाचा काळ. समाज सुखासीन झाला होता. कर्मकांडाचे प्राबल्य नको तेवढे वाढले होते. जातिभेदाने समाज पोखरला जात होता. अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला होता. अशा वाट चुकलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणण्याची धुरा संतसज्जनांनी हाती घेतली. साऱ्या भारत वर्षातच संतांनी समाज जागराचे व्रत घेतले. गुजरातेत नरसी मेहता, मारवाडात संत मीराबाई, उत्तरेत कबीर, सुरदास या साऱ्या संत मंडळींनी भगवद्भक्तीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे असिधाराव्रत अंगिकारले. महाराष्ट्रही त्यावेळी विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघत होता. जात-धर्म-लिंग-वंश सारे भेद विसरुन भागवत धर्माच्या झेंड्याखाली अठरा पगड समाज एकत्र आला होता. एक मोठ्ठे सामाजिक अभिसरण तेव्हा घडून आले. एकीकडे समाजानं वाळीत टाकलेले निवृत्ती-ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांचे अवघे कुटुंब, गोरा कुंभार, सावता माळी, वयोवृद्ध चांगदेव, नरहरी सोनार इथपासून जोहार मायबाप जोहार म्हणणाऱ्या चोखोबांपर्यंत आणि त्याहीपुढे नको देवराया अंत आता पाहू म्हणणाऱ्या गणिका कान्होपात्रेपर्यंत सारे या प्रवाहात सामील झाले. या संतावळीत नामयाची दासी जनी होती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी चित्कला मुक्ताई होती आणि चोखीयाची महारी अशी नाममुद्रा रेखणारी सोयराबाईही होती.
या सर्व संतांनी परमेश्वराची आराधना करणारी काव्यरचना केली. त्यांच्या रचनांचा उद्देशच भक्ती हा होता. मात्र परमेश्वर भक्तीबरोबरच या काव्यातून तत्कालिन संदर्भही आपसुकच येतात. तेव्हाची समाजव्यवस्थाही दिसते, चालिरिती कळतात. या सगळ्या संतकवींच्या व्यवसायाचे चित्रही त्यांच्या भक्ती काव्यातून येते आणि सोबतच ही अत्यंत प्रासादिक रचना तत्वज्ञानही अभिव्यक्त करते. साध्या शब्दांमधून मोठा आशय व्यक्त करणाऱ्या या रचना उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या आहेत. संत कवयित्रींच्या रचना अधिक भावपूर्णही आहेत. त्यात स्त्री भावजीवनाचे संदर्भ ठायाठायी आढळतात. मुक्ताईची कविता म्हणजे शुद्ध तत्वज्ञान आहे. मुक्ताई म्हणते मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्यासी तर
जनाबाईच्या काव्यातून तिच्या कष्टमय जीवनाचे चित्र उमटते. झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥ तर कान्होपात्रा म्हणते, घेई कान्होपोत्रेस हृदयात, आणि समाजानं विठ्ठलाच्या दर्शनाचा अधिकारही नाकारलेली सोयराबाई म्हणते,
सदा सर्वकाळ नामाचा छंद, रामकृष्ण गोविंद जपे सदा
अखंड वाचेशी, नाही पै खंडण, नाम नारायण सुलभ हे
सुख दुःख काही न पडे आवाज, होय मन शांत जपता नाम
सोयरा म्हणे मज आलीसे प्रचीत, नामेची पतीत उद्धरती
सोयराबाईंचा हा अभंग म्हणजे आत्मप्रचीतीचे बोल आहेत. जन्मानं वाट्याला आलेलं मेलेली गुरं ओढुन नेण्याचं काम आणि त्या सोबतच वाट्याला आलेली अवहेलना सोसत नामभक्तीत रंगलेल्या पतीला साथ देत सोयराही नामभक्तीत रंगली. रोजची दिनचर्या सांभाळत नामभक्तीच तिच्यासाठी सहजसोपी होती. तिनं आपलं दुःख, कष्ट, यातना विठुनामात विरघळुन टाकल्या. सोयरा विठ्ठल नामाशी एकरुप झाली. आणि अनन्य भक्तीनं विठ्ठलाला आपलसं केलं. सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही, आणिक तो आम्हा दृढ धरा, आपलं सगळं सुख-दुःख ती विठ्ठलाला कथन करते. समाजातील भेदाभेद, त्यातून वाट्याला आलेल्या यातना सगळं सगळं विठ्ठलाजवळ व्यक्त करताना सोयरा म्हणते,
देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवणधर्म
इथे लौकिकार्थाने अशिक्षित असलेली सोयरा भक्तीच्या पलिकडचं तत्वज्ञान मांडते. तिनं मांडलेलं हे तत्वज्ञान विचारप्रवण करणारं आहे, कारण हे ती जीवनाच्या शाळेत शिकली आहे. तिच्या अनुभवांनी तिला हे शिकवलं आहे. त्याही पुढे जाऊन ती सांगते,
अवघे सुखाचे सांगाती, दुःख होता पळती आपोआप
हे वैश्विक सत्य सोयराबाई किती सहजसोप्या शब्दात सांगते. सोयराबाईच्या शब्दांना इथे तिच्या व्यक्तिगत अनुभवाचा स्पर्श आहे.
समाजानं वाळीत टाकलेल्या सोयराला विठ्ठलाचाच आसरा आहे. त्याच्याशी किती बोलू आणि किती नको, असं तिला होतं,
बैसूनी एकांती, बोलू गुजगोष्टी, केधवा भेटसी, बाई मज, असं विठ्ठलाचं आर्जव करणाऱ्या सोयराबाईचे अवघे ६० अभंग संतगाथेत सापडतात. त्यातून भक्ती, समर्पण, लौकिक, पारलौकिक, परमार्थ अशा सगळ्या भावना व्यक्त होतात. अत्यंत प्रासादिक अशी अभंग रचना करताना निरक्षर सोयराबाईपुढे शब्द हात जोडून उभे राहतात. आणि आपल्या अभंगातून जीवनाचं गुढ तत्वज्ञान सोयराबाई अत्यंत ओघवत्या भाषेत मांडते. सोयराबाईंचा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग हा अभंग भक्ती, तत्वज्ञान, साहित्यिक मुल्याच्या अत्युत्कट बिंदुवर नेऊन पोहोचवतो. मी-तू पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया
असा आध्यात्म अनुभुतीची साक्षात्कार घडवण्याचं सामर्थ्य सोयराबाईंच्या अभंगात आहे. त्यांच्या काव्यातील ऋजुता, नादमधुरता आणि अर्थपुर्णता नादावून टाकते, तशीच त्यातील अतीव हळुवारता, भाषासुलभताही भावते.
नाही भेदाचे ते काम, पळुनी गेले क्रोध काम
देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही
संसाराचा रामरगाडा ओढताना नामभक्तीच्या माध्यमातून परमतत्वापर्यंत पोहोचलेल्या चोखीयाची महारी अशी नाममुद्रा रेखणाऱ्या सोयराबाईंच्या शब्दसामर्थ्यापुढे आपण नतमस्तक होतो.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह