Powered by Blogger.

Monday, 31 May 2021

 ओ रव्हा "सय'
स्वाती हुद्दार 

 
बादल घुमड बढ आये
काली घटा घनघोर गगन मे
अंधियारा चहु ओर
हे गाणं आठवतय रसिकहो साज चित्रपटातलं? भर पावसात रात्रीच्या अंधारात वृंदावन ते गातो. शास्त्रीय संगीताची बैठक असलेलं हे गीत स्वरबद्ध केलंय एकाहून एक सरस गाणी देणारे संगीतकार यशवंत देव यांनी आणि लिहिलयं याच चित्रपटाच्या दिग्दर्शिका सई परांजपे यांनी. याच गाण्याची दुसरी आवृत्ती बंसी गाते, त्याचे शब्द आहेत, बादल बरस अब मौन भये, हे गाणं सुद्धा सईच्याच लेखणीतून उतरलं आहे.
कथाकार, पटकथाकार, निवेदिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि अडल्यावेळी अशी अप्रतीम गाणी लिहिणारी गीतकार सुद्धा असलेली सई परांजपे म्हणजे अष्टपैलु गुणांचं अजब रसायन. बालपणापासून त्यांच्या कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास कथन करणारं त्यांचं आत्मचरित्र सय. त्यांच्यासारखंच साधं-सोप, सहज आणि निरागस, उत्साही आणि अवखळ.
सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ रॅंग्लर परांजपेंची नात, लेखिका, कलावंत, वक्त्या, संततीनियमनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजसेविका, आमदार, खासदार आणि पद्मभुषण शकुंतला परांजपेंची मुलगी आणि स्वतः पद्मभुषण हा भारताचा नागरी पुरस्कार मिळविणारी यशस्वी दिग्दर्शिका असलेल्या सई परांजपेंचे पाय कायम जमिनीवरच आहेत. त्यांचं हे आत्मचरित्र वाचताना त्या कोणीतरी आपल्या घरच्याच आहेत किंवा एखादी मैत्रीण सहज गुजगोष्टी सांगते आहे, असं वाटत राहतं. त्यांचं स्वतःचं मोठेपण, त्यांच्या कुटुंबाचं मोठेपण त्यांच्या सहजपणाच्या आड कधीही आलं नाही.
आजोबांबद्दलचं अपरंपार प्रेम, आईविषयीचं दरारायुक्त प्रेम सईच्या लिखाणातून ठायी ठायी जाणवतं. इतक्या नामवंत घराण्यात जन्माला येऊन सुद्धा सईनं स्वतःचं स्थान अत्यंत कष्टानं आणि संघर्षानं निर्माण केलं आहे. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली आकाशवाणी पुणे केंद्रावर निवेदिका म्हणून ५० रुपये पगारानं. त्यानंतर बालरंगभुमी तिथुन पुढे दिल्लीला नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिक्षण, मध्येच आठ वर्ष दूरदर्शनच्या अनुभवाची साखळी आणि पुण्याला फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामध्ये प्राध्यापकी. सई म्हणते, तिथेच तिला सिनेमाची लागण झाली आणि त्यानंतर स्पर्श, चष्मेबद्दुर, कथा, पपीहा, दिशा, साज असे एकापेक्षा एक सरस आणि वेगळे चित्रपट सईनं निर्माण केले. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणी कधी आर्थिक, कधी तांत्रिक, कधी इतर काही. अशी अडथळ्यांची शर्यत पार करीतच सईचा चित्रपट प्रवास झाला. तिच्या एकेका चित्रपटाच्या मेकिंगवरच एकेक चित्रपट तयार होईल, इतके किस्से आणि पैलू त्या प्रत्येक चित्रपटाचे आहेत. ते सगळे किस्से, कधी तिची झालेली फजिती, कधी कोणी केलेली फसवणुक, या सगळ्याचा उहापोह अत्यंत खिलाडुपणे सईने या आत्मचरित्रात केला आहे. याशिवाय अनेक बालपट', माहितीपट', लघुपट असा सईचा समृद्ध प्रवास आहे.
कॅमेऱ्याशिवाय सईचं आणखी एक प्रेम होतं, आणि ते म्हणजे नाटक. त्यासाठी तिनं आणि अरुण जोगळेकरांनी नाट्यद्वयी ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून हॅम्लेट', इडा पिडा टळो, नांदा सौख्यभरे, तुझी माझी जोडी जमली रे त्याचच हिंदी रुपांतर कैसी यह जोडी मिलाई मोरे राम, पुढे पु. लं. च्या अंमलदारचं हिंदी रुपांतर जी हुजुर, तेंडुलकरांचं सखाराम, एलकुंचवारांचं वासनाकांड या सगळ्याचे हिंदी प्रयोग आणि चक्का चलदा या पंजाबी नाटकाचही दिग्दर्शन सईनं केलं. एक तमाशा अच्छा खासा हे लोककलेच्या धाटणीनं जाणारं सामाजिक, राजकीय विषयावर ताशेरे ओढणारं नाटकही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. जास्वंदी सारखं वेगळं नाटक, सख्खे शेजारी, सोयरिक, धिक ताम, ही नाटके, अडोसपडोस, छोटेबडे, हम पंछी एक चॉल के, या दूरदर्शन मालिका मुंबई दूरदर्शनसाठी गजरा हे आणि असे अनेकानेक उपक्रम सईच्या खात्यावर जमा आहेत.
इतकचं नव्हे तर बिकट वाट वहिवाट या संगीत नाटकाचं दिग्दर्शनही सईनं केलयं. आलबेल नावाचं अगदी वेगळ्या धाटणीचं नाटक सईनी लिहिलं, दिग्दर्शित केलं आणि त्याचे प्रयोगही केले पण प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. तरीही सईच्या दृष्टीनं आलबेल तिचं सगळ्यात उत्कृष्ट नाटक आहे. त्यानंतर माझा खेळ मांडू दे आणि जास्वंदी. पण प्रेक्षकांना काय आणि कसं भावेल आणि ते काय नाकारतील, हे सांगणं कठीण आहे.
दिशा, पपीहा असे अत्यंत वेगळ्या धाटणीचे सामाजिक विषय सईनं तिच्या चित्रपटांमधून हाताळले. मात्र अत्यंत सोपे करून. आपण खूप काहीतरी महत्त्वाचं तत्वज्ञान सांगतो आहोत, असा कुठलाही आव न आणता, अगदी सहज-सोप्या पद्धतीनं तिनं या सामाजिक विषयांना हात घातला आहे. तिची सगळीचं, नाटकं, सिनेमे, माहितीपट कुठल्यातरी महत्वाच्या विषयाला हात घालतात. समाजातील एखादी समस्या मांडतात, पण अगदी हसतखेळत. अवघड, अनाकलनीय असं सईच्या जीवनात काहीही नाही. तिचे सिनेमे नाहीत, तिची नाटकं नाहीत आणि तिचं आत्मचरित्रही नाही.
सहजपणा, साधेपणा, जीवनावरचं उत्कट प्रेम हा सईचा स्थायीभाव आहे. म्हणूनच ते तिच्या जीवनासारखंचं तिच्या कलाकृतींमधूनही उमटतं आणि तिच्या आत्मचरित्रातूनही भेटीला येतं.
माझा कलाप्रवास सांगणं, हे माझ्या आत्मचरित्राचं उद्दिष्ट आहे, त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनाला त्यात थारा नकोच, असं म्हणणारी सई ओघाओघाने येणारे व्यक्तिगत, कौटुंबिक संदर्भ मांडत जाते, तेव्हा ते शुभ्र पाणीदार मोत्यांच्या माळेत शोभून दिसणाऱ्या पाचुसारखे भासतात.
सईच्या सय या माळेतलं रत्नजडीत पदक म्हणजे तिची जिनिव्हा भेट. कारण भारतीय आई आणि रशियन वडील असलेली सई २६ वर्षांनंतर आपल्या जन्मदात्याला आणि इतर नातेवाईकांना भेटली होती. सई लिहिते, जिनिव्हा-दिव्होनमधल्या त्या पाच दिवसांमधला प्रत्येक क्षण माझ्यामधला कलाकार जोपासण्यासाठी, माझा दृष्टिकोन अधिक गहरा करण्यासाठी मोलाचा होता. त्यानचं माझं कलाविश्व समृद्ध केलं.
सईचा तिच्या पपाचा निरोप घेताना जसं अंतःकरण जड होतं, तसंचं सयचा निरोप घेताना आपलंही होतं. सई लिहिते, फ्रेंचमध्ये निरोप घेताना ओ रव्हा असं म्हणतात, त्याचा अर्थ आपण दुरावतो आहोत, ते पुन्हा भेटण्यासाठी. मी पण सय चा ओ रव्हा असं म्हणतच निरोप घेतला.

Friday, 7 May 2021

 बोलणारी भांडी
©स्वाती हुद्दार

स्वयंपाकघर हा स्त्रीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गेल्या २०-३० वर्षात स्वयंपाकघरांमध्ये आमुलाग्र परिवर्तन आलं. आधीची स्वयंपाकघरं तांब्यापितळेच्या भांड्यांनी सजलेली असायची. तेव्हा मोड्युलर किचन हा प्रकार नव्हता, त्यामुळे सगळा उघडा कारभार. सौंदर्याची आवड स्त्रीमध्ये उपजतच असते. त्यामुळे चिंच लाऊन चकचकीत केलेले पितळेचे डबे स्वयंपाकघरातल्या फडताळांवर कलात्मकतेने सजलेले असत, मोठ्या आकाराच्या डब्यापासून लहान डब्यापर्यंत. वाटी-पेले पिरॅमिडसारखे एकावर एक रचलेले असायचे. भिंतीवरच्या ताटाळ्यात बरोब्बर आकारानुसार ताटं बसलेली असंत. पळीचमच्यांच्या स्टॅंडवर सराटे, झारे, भातवाढणी, चमचे सगळे अदबीनं उभे असतं. भिंतीवर टांगलेल्या लाकडी फडताळावरच्या कप्प्यांमध्ये बशा हारीने बसलेल्या असतं आणि कपांचे कान मात्र खुंटीला टांगलेले असतं. त्याच फडताळात चहा-साखरचे डबे दक्षच्या स्थितीत उभे असतं. भिंतीवरच्या खुंटीवर पाखडण्याच्या सुपाने तिरकस मान करीत आपली जागा पटकावलेली असे. छताला मधोमध टांगलेल्या शिंकाळ्यात दुधाचं भांड समारंभाच्या अध्यक्षासारखं ऐटीत विराजमान झालेलं असे. भिंतीलगतच्या लाकडी रॅकमध्ये निगुतीने घातलेल्या आंब्या-लिंबाच्या लोणच्यांचा चवदार भार सांभाळत चिनीमातीच्या बरण्या फडक्याने मुसक्या बांधुन हारीने उभ्या असत. जाळीच्या लाकडी कपाटात नुकत्याच विरजायला लावलेल्या दह्याची दगडी, खालच्या खणात तिखटा-मीठाचं लाकडी पाळं, तेलाचा कावळा असायचा. कपाटाच्या बाजुला खलबत्ता, पाटा-वरंवटा ठेवलेला असायचा.
कालांतरानं स्वयंपाकघराचं रुपच पालटलं. ते अत्याधुनिक झालं. सिनेमातल्यासारखं चकचकीत झालं. आधुनिक संसाधनांनी परिपूर्ण झालं. पाझरणाऱ्या माठाच्या जागी फ्रीज आले. मायक्रोव्हेव आलेत. खलबत्ता-पाटावरवंट्याच्या जागी मिक्सर आलेत. तांब्यापितळेच्या भांड्यांच्या जागी ॲल्युमिनियम, स्टील आले, नॉनस्टिक आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉड्युलर किचन आलं. सगळं कसं चकचकीत, पसाऱ्याचं नावच नाही. मात्र काही जुनी भांडी काळ ओलांडून, पिढ्या ओलांडून आजही चकचकीत नव्या झालेल्या स्वयंपाकघरात ( नव्हे किचनमध्ये) ठाण मांडून बसलेली आहेत. काही जुनी भांडी वारशाने आलेली असतात. त्यावर या मालकिणीचा अधिकच जीव असतो.
ती भांडी हाताळताना खूप नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. दोन पिढ्यांनी हाताळलेल्या पोळपाटावर पोळी लाटताना त्या पोळपाटावर फिरलेले आधीच्या पिढीचे हात हळंवं करून जातात. माहेरून आलेल्या साखरेच्या डब्यातून चहात साखर टाकताना माहेरच्या प्रेमाची गोडी अलगद चहात उतरते. आवडीनं घेतलेली नॉनस्टिक कढई असतानाही सांजा करायला घेताना हात सासुबाईंच्या जुन्या जाड बुडाच्या कढईकडेच जातो. आणि रवा भाजता-भाजताच ती कढई सांगू लागते, आपणच नवी नवरी असताना पहिल्यांदाच बिचकत बिचकत केलेल्या सांजाची कहाणी. पहिलाच घास तोंडात गेल्यावर सासऱ्यांची आलेली व्वा ही प्रतिक्रिया, सासुबाईंचं हसून दाद देणं, आणि अहोंची सगळ्यांसमोर न बोलताच जाणवलेली कौतुकभरली नजर. त्याचवेळी नेमंकी सांजातली मिरची चावली जाऊन हिच्या डोळ्यात टचकंन आलेलं पाणी आणि लागलेला जीवघेणा ठसका. या कढईला इतक्या वर्षांपूर्वीचं सगळंच अगदी क्रमवार कसं लक्षात आहे, न कळे.
नव्या कोऱ्या स्वयंपाकघरात अजूनही मानानं विराजमान असलेली अशीच फोडणीची लोखंडी पळी. वडा भात, डाळभाजी सांजेच्या आमटीला हिच्याशिवाय पूर्णत्व नाहीच. गेल्या तीन पिढ्या तरी याच लोखंडी पळीतून दिलेल्या हिंग-मोहरीच्या तडतडीत फोडणीने संसार खमंग आणि चरमरीत झाले आहेत.
तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण भांडी बोलतात ती अशी. ती स्पर्शातून त्या घरमालकिणीशी संवाद साधतात. प्रत्येक भांड्याला आपली कहाणी असते. काहीतरी इतिहास असतो. आणि तो त्या घर मालकिणीला माहिती असतो. पैशांचे व्यवहार, कोणाच्या वाढदिवसाच्या तारखा, कसल्या कसल्या सनावळी हे अजिबात लक्षात न ठेवणारी स्त्री तिच्या घरातले कोणते भांडे कधी घेतले किंवा कोणी दिले, हे झोपेतही सांगू शकते. काही भांड्यांवर पोचेही आलेले असतात. ते कधी धावपळीचे असतात, कधी नाराजीचे असतात, कधी रागाचेही असतात. त्या पोच्यांच्या कहाण्याही त्या गृहिणीला ठाऊक असतात.
घरातल्या गृहिणीच्या मनस्थितीनुसार कधी भांडी खूप आवाज करतात, कधी अगदी चिडीचूप असतात. स्वयंपाकघरातल्या त्या अर्थपूर्ण संगीतावरून जो घरमालक गृहलक्ष्मीच्या मनस्थितीचा वेध घेऊ शकतो, तो खरा कुशल घरमालक. शब्दवेध घेणाऱ्या कुशल तीरंदाजासारखाच भांडेवेध घेणारा कुशल घरमालकही महत्त्वाचा असतो. आणि त्याच्या कुशलतेवरच त्या घराचे सौख्य सामावलेले असते. खरं ना?
तुमच्या घरची भांडी बोलतात? अगदी सहज विचारलेला प्रश्न! 

©

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह