Powered by Blogger.

Tuesday, 2 April 2019

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अक्षर साहित्याचा जरासा अंश

आठव गदिमांचा

स्वाती हुद्दार

यंदाचं वर्ष अनेक सांस्कृतिक साहित्यिक घडामोडींचं वर्ष आहे. महाराष्ट्राचं भुषण असलेल्या पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग दि. माडगुळकर या त्रयींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहेच, त्याचप्रमाणं ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अमृता प्रीतम यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या सगळ्या साहित्यिकांनी, कलाकारांनी रसिकांना भरभरून दिलं. साहित्यिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न केलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या ऋणातून थोडंतरी उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्यापरीनं करीत आहे.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्‍तिमत्व असलेल्या भाईंवर सिनेमा आलाय. बाबुजींचे सुपुत्र श्रीधर फडके त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम करीत आहेत. अमृता प्रीतम आणि गदिमांवरही विविध कार्यक्रम सादर होत आहेत.
यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भाच्या मातीत यवतमाळला संपन्न झालं. डॉ. अरुणा ढेरेंसारख्या तरल संवेदनशील साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. एक विलक्षण आणि सुंदर योगायोग बघा. 1973 साली ग. दि. माडगुळकरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं होतं आणि ते साहित्य संमेलनही यवतमाळ इथंच झालं होतं. आणि यंदा अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षातही यवतमाळलाच साहित्य संमेलन पार पडलं.
यंदा महाराष्ट्र इथल्या मातीत जन्मलेल्या तीन प्रतिभासंपन्न आणि लाडक्‍या कलाकारांची जन्मशताब्दी साजरी करतोय. गदिमांच्या साहित्यावर यानिमित्ताने चर्चा, कार्यक्रम निश्‍चितच होतील. होत आहेत.
माझ्यासारख्या साहित्याच्या विद्यार्थिनीनं गदिमांवर बोलण्याचं धाडस करावं, म्हणजे काजव्यानं सूर्याची पुजा बांधण्यासारखं आहे. गदिमांच्याच शब्दात सांगायचं तर ही ज्योतीने तेजाची आरती आहे. तरी आपणा सारख्या सुविदय, सुजाण श्रोत्यांच्या समोर माझ्या अल्पमतीप्रमाणें मला आकळलेले गदिमा मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आजच्या विवेचनाचा विषय अलक्षित कवी गदिमा असला तरी यानिमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचाच धावता आढावा सुरुवातीला घेऊया.
कथा, कादंबरी, आत्मचरीत्र, पटकथा, संवाद, चित्रपटगीत, लावणी, बालगीत, प्रेमकाव्य, भावकाव्य, भक्‍तीकाव्य इथपासून तर जोगिया आणि पुढे पुरीयासारखी तरल कविता लिहिणारे गदिमा म्हणजे अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व.
गीतरामायणासारखी अलौकिक कृती प्रसवणाऱ्या गदिमांना महाराष्ट्र आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो. गीतरामायण जन्माला येऊन सहा दशकं लोटल्यानंतरही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतेच आहे, असं भाग्य फार कमी कलाकृतींना आणि साहित्यिकांना लाभतं.अशा अक्षर साहित्याचं धनित्व अण्णांकडे जातं. त्यांच्या हयातीतच त्यांच्या अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभलं होतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी, नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, गोरी गोरी पान, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी अशी एकाहून एक सरस बालगीतं लिहून बालसाहित्याचं विश्‍वही समृद्ध केलं. आपलं बालपण या गाण्यांवरच तर पोसलं गेलं.
फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी प्रासादिक भक्‍तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावणीही लिहितात.
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू आणि वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम लिहिणारे माडगुळकर
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी सारखं हळवं प्रेमगीतही लिहितात. आणि
कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी,
जन्मभरीच्या श्‍वासाइतुके मोजियले हरीनाम, विकत घेतला श्‍याम
असा मीराभावही व्यक्‍त करतात.
बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे अशी लडिवाळ अंगाईही लिहितात.
सहजस्फूर्त प्रासादिक भाषारचना आणि शब्दांची अचूक, नेमकी निवड हे गदिमांच्या गीतांचं वैशिष्ट्य आहे.
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गदिमांनी असामान्य प्रतिभेच्या बळावर भावकाव्य आणि चित्रपटगीतांमध्ये न भुतो न भविष्यती असं कार्य करून ठेवलं आहे. त्यांची काव्यप्रतिभा एवढी विलक्षण होती की चित्रपटातील प्रसंगानुरुप भाव आणि शब्द नेमकेपणानं त्यांच्या गीतांतून व्यक्‍त होत असतं. रचनांचं आणि विषयांचं वैविध्य पाहा. गदिमांनी शिर्डीच्या साईबाबांवरची काकडआरती रामगुलाम या नावानं रचली आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, त्यावेळी त्यांनी शाहिर बोऱ्या भगवान नावानं काही रचनाही केल्या. गीतरामायणासारखचं गदिमांनी गीतगोपाल आणि गीतसौभद्रही लिहिल. 158 मराठी चित्रपटांमधून गीतं लिहणाऱ्या गदिमांनी 25 हिंदी चित्रपटांच्याही कथा लिहिल्या आहेत. दो आँखे बारह हात, तुफान और दिया, नवरंग, अवतार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आणि प्यासा या गुरुदत्तच्या चित्रपटाची मूळ कथा इतकंच नाही तर राणी मुखर्जी आणि अमिताभच्या अभिनयानं गाजलेल्या ब्लॅक चित्रपटाची कथाही गदिमांचीच आहे. साहित्याचे इतके सगळे प्रकार प्रसवणारी अण्णांची लेखणी बहुप्रसवा होती.
चित्रपटगीतं आणि गीतरामायणाच्या उत्तुंग यशामागे या निर्मात्याची कविता मात्र झाकोळली गेली. अनेक समीक्षकांनी गदिमांना गीतकाराच्या प्रतिमेतच बंदिस्त करून टाकलं. समीक्षक आणि टीकाकारच काय स्वत: गदिमाही आपल्या महाकवी या उल्लेखावर कोटी करताना म्हणायचे मी महाकवी नाही, तर महाकाय कवी आहे. गंमतीचा भाग सोडला तर माडगुळकरांच्या कवितेची योग्य दखल मराठी रसिकांनी पुरेशी घेतली नाही, हे खेदानं नमुद करावं लागेल. सहज बोलणे तरी उपदेश हे संतांविषयी म्हटलं जातं. गदिमांची गीत आणि काव्य रचना सहजपणाची ती उंची गाठते. सोपं लिहिण्याइतकं अवघड जगात दुसरं काही नाही. हे अवघडपण गदिमांनी लिलया पेललं आहे. गदिमा एकाचवेळी क्‍लास आणि मासचे कवी आहेत. त्यांची कविता गात गात जन्माला आली. सोप्या शब्दातून गदिमांनी अनेक ठिकाणी गहन तत्वज्ञान सांगितलं.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझीया आयुष्याचे
या वस्त्राते विणतो कोण, एकसारखी नसती दोन,
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे
हे सांगणारी गदिमांची कविता संतकाव्याशी नातं सांगते. किर्लोस्कर -देवलांचा वारसा तर माडगुळकर मान्यच करतात. चैत्रबन हा त्यांचा गीतसंग्रह त्यांनी किर्लोस्कर देवलांच्या प्रतिभेलाच अर्पण केला आहे.
इथे फुलांना मरण जन्मता
दगडांना परी चिरंजिविता
बोर बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार
इतकी आशयघनता शब्दातून मांडणारे अण्णा शब्दप्रभुच होते. माडगुळकरांच्या शैलीबद्दल बोलताना शांताबाई शेळके एके ठिकाणी म्हणतात शब्दसिद्धी त्यांना जन्मत:च लाभली होती. कोणतीही अनुभुती रुपवंत करणारे शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहात.
संस्कृतच्या व्यासंगानं विदग्धतेचा स्पर्श झालेली त्यांची कविता पंडिती काव्याची आठवण करून देते. त्यांच्या गीतातील ग्रामीण बाज त्यांची नाळ शाहिरांशी जोडतो. राम जोशी चित्रपटातील त्यांची ही सवालजबाबाची लावणी लोकगीताचा उत्कृष्ट नमुना आहे.
सूर्य उगवता कमल उमलते
सिंधु उसळतो चंद्रा बघुनी
शुद्ध प्रीति हे कारण त्याचे
ज्ञात्यांनो घ्या हृदयी भरूनी
या शाहिरी काव्यातही गदिमांनी तत्वज्ञानाशी फारकत घेतलेली नाही.
रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा हे चैत्रबनमधलं गीत आणि
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर
ही पुरीयामधली माहेर ही कविता यातून हळवे माडगुळकर व्यक्‍त होतात.
जोगियाच्या प्रस्तावनेत अण्णा म्हणतात, जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे. या संग्रहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले. नेहमीच रसिकांची दाद मिळवणाऱ्या एखाद्या कसबी गवय्यानं एखाद्या मैफीलीत स्वर छेडावे आणि एका संपृक्‍त क्षणी त्याला नादब्रह्म गवसावं, तशी गदिमांची जोगिया ही कविता.
हा विडा घडवूनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा जोगिया रंगे
जोगिया आणि पुरीया हे अण्णांचं स्वान्त सुखाय लिहिलेलं अस्सल काव्य आहे. गेय कविता लिहून गीतकाराचा शिक्‍का माथी आलेले गदिमा पुरीयामध्ये मुक्‍तछंदातली कविता लिहितात. कधी त्यातून विंदा डोकावतात तर कधी मर्ढेकर.
गदिमांची रंगमंच ही आत्मपर कविता राजकवी तांब्यांच्या मधु मागसी माझ्या सख्या परीची आठवण करून देते. सच्च्या कलावंताची व्यथा गदिमा यातून व्यक्‍त करतात.
रंग पुसावा, वेष उतरावा
वाटते आहे
नाटकात रंगत राहिली नाही
पाडणार असशील तेव्हा पाड पडदा
भरतवाक्‍याचा उच्चार होईतो मी मंच सोडणार नाही, पण
पण मला क्षमा कर
अभिनयाची प्रत उतरली आहे
किती नेमक्‍या शब्दात कला, कलावंत यांचं वास्तव गदिमांनी इथे मांडलं आहे.
गदिमांच्या जोगियातील कवितांपेक्षा पुरीयामधील कवितांचा बाज वेगळा आहे. विषय आणि मांडणी या दोन्हीबाबतीत ही कविता अधिक धीटपणे व्यक्‍त होते. मुक्‍तछंदातून प्रगटणारी पुरीयातली कविता आधुनिक कवितेशी अधिक जवळचं नातं सांगणारी आहे. हे या रंगमंच कवितेवरून आपल्या लक्षात येईल.
ग. दि. माडगुळकर या अष्टपैलू साहित्यिकाच्या समग्र साहित्याचा विचार केल्यानंतर माझ मन येऊन थांबतं त्यांच्या एका गेय कवितेपाशी. गदिमांची ही कविता आईच्या मायेनं कुशीत घेते आहे असं मला नेहमी वाटतं. कवितेचे शब्द अंगाभोवती लपेटून मन गदिमांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं आणि आपण गुणगुणत राहतो,
बावरा मी भोळा
पडेन का तुझीया डोळा
लिनपणे कैसा येऊ
तुझ्या मंदिरात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात
एकवार पंखावरूनी फिरे तुझा हात
गदिमांची ही कविता कबिराच्या दोह्यांच्या जवळ जाणारी आहे.
गदिमांवरचे कथा कीर्तनाचे संस्कार, बालपणी त्यांनी ऐकलेल्या जात्यावरच्या ओव्या, रामायण महाभारतावर पोसलं गेलेलं त्यांचं बाल्य, संत काव्याशी त्यांची जुळलेली नाळ सगळं सगळं या एका कवितेतून व्यक्‍त होतं. सोप्या शब्दातून गहन तत्वज्ञान सांगणाऱ्या गदिमांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन या काव्यातून होतं. इथे तुळशीच्या सावळ्या पानानं पारडं जड करणारी रुक्‍मिणी आठवते. गदिमांची ही कविता तुळशीच्या त्या पानासारखी आहे. पारडं तोलून धरणारी.
हितगुज केल्यासारखी स्वाभाविकपणे गात गात व्यक्‍त होणाऱ्या गदिमांच्या कवितेसमोर आणि प्रतिभेसमोर आपण सहजच नतमस्तक होतो.
ज्ञानियांचा वा तुक्‍याचा
तोच माझा वंश आहे माझिया रक्‍तात थोडा
इश्‍वराचा अंश आहे
ज्ञानोबा तुकोबांच्या कलावंशाचा वारसा सांगणारे माडगुळकर महाकवीच नव्हे तर युगकवी होते. महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर आणि एकूणच साहित्य संप्रदायावर माडगुळकरांचं अनंत ऋण आहेत. मराठी साहित्य रसिंकांनी अण्णांच्या या ऋणातच राहावं. त्यांच्या साहित्याची पालखी भोई होऊन वाहावी आणि हे अक्षर साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावं, अशी आशा व्यक्‍त करते.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह