Powered by Blogger.

Monday, 9 March 2020

पुन्हा एक महिलादिन


संयुक्‍त राष्ट्रसंघाने 1975 साली सुरू केलेला जागतिक महिलादिन यंदा 45 वर्षांचा होतो आहे. जागतिक महिलादिनाला विविध देशांमधल्या महिलाविषयक प्रश्‍नांची, समस्यांची अनेक वर्षांची, तिथल्या चळवळींची पार्श्‍वभूमी आहे. भारतात तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महिलांच्या मूलभूत प्रश्‍नांसाठी अनेक सुधारणावादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. प्रश्‍नही ऐरणीचेच होते. बालविवाह, केशवपन, सतीप्रथा, शिक्षणाचा डावललेला अधिकार असे आणि अनेक. इंग्रजी राजवटीत सुधारणांचे वारे वाहू लागले आणि इथला नवशिक्षित सुधारणावादी वर्ग इतर अनेक सामाजिक प्रश्‍नांसोबतच महिला प्रश्‍नांविषयीही जागरूक झाला. सतीप्रथेविरुद्ध तळमळीने उभे राहिलेले राजाराममोहन रॉय, केशवपनासारख्या अमानुष रूढींना विरोध करणारे गोपाळ गणेश आगरकर, विधवा विवाहाचा पायंडा स्वत:च्या उदाहरणाने घालून देणारे धोंडो केशव कर्वे, संतती नियमनाचे पुरस्कर्ते रं. धो. कर्वे आणि शिक्षणाची दारे खुली करून पुढच्या अनेक पिढ्यांना उपकृत करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य.
या सगळ्या पूर्वसुरींच्या संयुक्‍त प्रयत्नांनी महिलांचे जिणे जरा सुसह्य झाले. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी खुली झाली. विचार करण्याचे आणि ते व्यक्‍त करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरही बरीच उलथापालथ झाली. भारतही स्वतंत्र झाला. स्त्रीविश्‍वाला नवी जाण आली. मात्र, तिचे प्रश्‍न संपले नाहीत, तर काळानुरूप त्यांचे स्वरूप बदलले. हुंडाबळीसारखे नवे प्रश्‍न समाजासमोर उभे राहिले. त्यासाठीही चळवळी उभ्या झाल्या. हा प्रश्‍न कालबाह्य झालेला नाही. त्याची तीव्रता थोडी कमी झाली आहे इतकेच. पुढच्या दशकात स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटनांचे पेवच फुटले. स्वत:ला सुशिक्षित, सुसंस्कृत समजला जाणारा वर्गच या गुन्ह्यामध्ये अग्रेसर आहे, अजूनही...
आता तर स्त्रीविषयक प्रश्‍नांनी अत्यंत दाहक स्वरूप घेतले आहे. तिच्यावर होणारे हल्ले असोत, ऍसिड अटॅक असोत, परप्रांतात होणारी तिची विक्री असो की, बलात्कारांची न संपणारी मालिका असो! दिल्ली, हैद्राबाद, हिंगणघाट आणि कितीतरी. पुरुषांमधल्या या विकृतीला प्रांत, भाषा कशाच्याही मर्यादा नाहीत. प्रत्येक घटनेनंतर आंदोलन, मोर्चे, निषेध, सभा, आक्रोश, भाषणे बरेच काही. पुन्हा सगळे शांत... पुढच्या घटनेपर्यंत. अलीकडे दुर्दैवाने या मोर्चे, आंदोलनांमधले अंतर मात्र कमी होत चालले आहे, कारण अशा घटनांमधला कालावधी कमी-कमी होत चालला आहे.
निर्भयाच्या गुन्हेगारांना अद्याप शिक्षा नाही, हैद्राबाद घटनेच्या आरोपींचा एन्काउंटर. पुन्हा त्यावरही चर्चा. काय चूक, काय बरोबर. नुसत्या चर्चांनी हे प्रश्‍न सुटले असते तर, स्त्रीचे जिणे किती सुसह्य झाले असते. पण!
तिच्यावरच्या हल्ल्याला तिचा नकार कारणीभूत होता, तिच्यावरच्या बलात्काराला तिचे कपडे, तिचे अवेळी बाहेर पडणे, कारणीभूत होते. महिलांनो अंगभर कपडे घाला, वेळेत घरी परत या. कोणाशीही हुज्जत घालू नका. कोणालाही नकार देऊ नका. स्त्रीसाठी सूचनांची, नियमांची ही मालिका आणखीही लांबवता येईल. मात्र, हे सगळे केल्याने तिच्यावरचे अत्याचार खरेच थांबतील. कोणी खात्री देईल, या गोष्टीची?
नाही देणार कोणी खात्री. कारण ही कारणेच खरी नाहीत, ही केवळ पळवाट आहे, मूळ प्रश्‍नांना बगल देण्याची.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृतांची मानसिकता काय असेल? तिला नामोहरम करणे. बलात्कार हे तिच्याविरुद्ध वापरलेले शस्त्र असते. स्त्रीला सगळ्यात प्रिय तिचे शील. तेच नासवले तर तिच्यावर सूड उगवता येतो, ही त्यामागची मानसिकता. म्हणून कोणीतरी सुचवतं की महत्त्वचं देऊ नये, या अत्याचारांना. झाला असेल बलात्कार. तिने पुन्हा उभे राहावे, नव्या उमेदीने! इतके सोपे आहे सगळे? शरीरावरच्या जखमा भरून निघतीलही कालप्रवाहात, मनावरच्या जखमांचे, ओरखड्यांचे काय? त्या भरतात का कधी? खरे तर ही सगळी वरवरची मलमपट्टी. मूळ दुखण्यावर उपाय सापडत नाही म्हणून.
सगळ्यात भयंकर म्हणजे दाराआड होणाऱ्या अत्याचारांचे काय? ते तर घरांच्या भिंतीतच चिणले जातात, वाहत्या डोळ्यांसह आणि अस्फुट हुंदक्‍यांसह. तो कधी सावत्र बाप असतो, कधी सख्खा भाऊ, कधी सासरा, कधी भासरा आणि कधी काका, कधी मामा कधी तर...
हिंदी सिनेमे, सहज उपलब्ध असलेल्या पोर्न साईट्‌स या सगळ्याला जबाबदार असल्याचेही कोणी सांगतं. काही प्रमाणात ते खरेही आहे. तू मेरी नही तो किसी ओर कि नही हो सकती, किंवा तू है मेरी किरन वगैरे वगैरे. सिनेमाचीच भाषा समजणारी आणि बोलणारी पिढी त्या प्रभावात येऊन हे सगळे करू शकते. नक्‍कीच. मात्र, संस्कारच पक्‍के असतील तर?
एकीकडे आदिवासी समाजात अशा घटना घडत नाहीत. कुठली मूल्य जपली जातात तिथे? कसे संस्कार केले जातात? याचा ऊहापोह, अभ्यास आमच्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या समाजाने केला तर प्रकाशाचा एखादा किरण सापडेल कदाचित. दुसरीकडे पाश्‍चात्य राष्ट्रात अशा घटनांची टक्‍केवारी भारतापेक्षा कमी आहे. तिथे कुठला तर्क लावणार आपण? ते देश तर मुक्‍त व्यवस्था मानणारे आहेत.
पूर्वी भारत साप आणि गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. आता यापुढे भारताची ओळख काय राहिल?
सगळी घडीच तर विस्कटलीय. ती पुन्हा नीट करायची असेल तर पुन्हा एकदा सुरुवात करायची त्या बिंदूपासून. जिथून झाली सुरुवात जीवनाला. नव्हतेच कुठले भेदाभेद. तू स्त्री, मी पुरुष हे आकळण्याचीही नव्हती अवस्था. एक मुक्‍त स्वैर जीवन. पोटाची भूक कळण्याइतकीच जाणीव. जाऊया का पुन्हा तिथपर्यंत. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होईल. हातात हात घेऊन जगण्याचा आनंद घेता-घेता पुन्हा नव्याने रुजवात करूया संस्कारांची. जिथे नसतीलच स्त्री-पुरुष भेदांच्या भिंती. अपमान, छल, कपट काहीही. एक सुंदर, आनंदी, मनमुक्‍त जगणे. कुठल्याही भीतीशिवाय, दडपणाशिवाय.
की निर्माण करूया एक नवी पृथ्वी. फक्‍त आणि फक्‍त स्त्रीसाठीच. तिथे नसलीत अत्याचार, बलात्कार, मारझोड, ऍसिड अटॅक, जाळपोळ. असेल केवळ आनंदाचे घोस लगडलेले झाड आणि त्याभोवती सख्यांच्या हातात हात गुंफून खेळलेला आनंदाचा झिम्मा.
मैत्रिणींनो, जागतिक महिलादिन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाची थिम आहे equality. ही इक्‍वॅलिटी तुमच्या माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने येवो. भेदांच्या भिंती गळून पडोत, या शुभेच्छांसह.

संयोजिका

स्वाती हुद्दार


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह