चंदेरी दुनियेच्या पडद्यामागचा मनस्वी कलावंत
स्वाती हुद्दार
थ्री इडियट सिनेमा बहुतेकांनी पाहिला असेल आणि अनेकांनी त्या
सिनेमातल्या थ्री इडियटमध्ये स्वतःला शोधले असेल. मात्र या पडद्यावरच्या
थ्री इडियटच्या मागे एक चवथाही होता, आणि तो होता या सिनेमाचा कला
दिग्दर्शक, नागपूरचा तरुण रजनीश हेडाऊ. तुम्हाला आठवत असेल, या सिनेमातील
कॉलेज, वर्गखोल्या, होस्टेल, पुढे मनालीपर्यंतचा प्रवास आणि रॅंचोच्या
अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारी मनालीतली सुंदर दृष्य. त्या सिनेमाचा परिणाम
मनाला भिडण्यात त्यातील कलावंत, त्यांचा अभिनय, त्यातले संवाद, गाणी-संगीत
या सगळ्याइतकाच या दृष्यांचाही म्हणजेच यातील नेपथ्याचाही वाटा होता आणि
ही सगळी किमया होती त्या चवथ्या मनस्वी इडियटची.
कला ही माणसाच्या जगण्याचे अविभाज्य अंग आहे, अगदी पोट भरण्यासाठी
लागणाऱ्या भाकरी एवढेच. भाकरी शरीराचे पोषण करते आणि कला मनाचे. अगदी आदि
मानवाचा इतिहास तपासला तरी त्याच्या कलाप्रियतेचे पुरावे आढळतात. हळुहळु
मानवी उत्क्रांतीबरोबरच त्याची कलासक्तता वाढतच गेली. त्याची माध्यमही
विस्तारत गेली. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक अशा कलेच्या विविध
स्रोतातून मानव व्यक्त होत राहिला आणि जगण्याचा आनंद घेत राहिला.
कलेशिवायचे माणसाचे जीवन म्हणजे केवळ शुष्क, निष्प्राण कलेवर उरले असते.
मानवाच्या उत्कर्षाबरोबरच कलेची दालनेही विस्तारत गेली. निसर्गाने
मानवाला दिलेल्या बौद्धिक ताकदीच्या भरवशावर त्याने तंत्रज्ञानातही
प्रगतीची घोडदौड केली.
मानवाचे कलाप्रेम आणि तंत्रज्ञानातील झेप यातून जन्माला आला सिनेमा. या
सिनेमा माध्यमात उत्क्रांती होत होत The Story of the Kelly Gang नावाची
पहिली फिचर फिल्म आॅस्ट्रेलियामध्ये १९०६ साली प्रदर्शित झाली आणि त्यानंतर
सिनेमाने अख्ख्या जगाला वेड लावले. काळानुसार सिनेमा बदलत गेला. विस्तारत
गेला, उलगडत गेला आणि बघता बघता या माध्यमाने सारे जग आपल्या कवेत घेतले.
भारतीय सिनेमाच्या यशाचा सूर्य आज मितीला माथ्यावर आला आहे.
हिंदीमध्ये सिनेमाची मुहुर्तमेढ रोवली, हिंदी सिनेमाचे पितामह
दादासाहेब फाळके यांनी. १९१३ साली राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला हिंदी
मुकपट तयार झाला. पुढे तांत्रिक दृष्ट्या विकसित होत होत सिनेमा बोलू लागला
आणि १९३१ साली आलमआरा नावाचा पहिला बोलपट प्रदर्शित झाला. जवळपास १०७
वर्षांचा झालेल्या हिंदी सिनेमाने खूप स्थित्यंतर अनुभवत आजपर्यंतची वाटचाल
केली आहे. ही स्थित्यंतर आशयाची होती, विषयाची होती, तंत्राची होती,
सादरीकरणाची होती. हिंदी चित्रपटाच्या या प्रदीर्घ प्रवासात मैलाचे दगड
ठरावेत, असे खूप चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या वेगळेपणात आणि यशात जितका
वाटा पटकथेचा आहे, तितकाच दिग्दर्शनाचा आहे, त्यातील कलावंतांचा आहे,
संगीताचा आहे आणि तो चित्रपट प्रेक्षकांप्रर्यंत पोहोचविणाऱ्या
पडद्यामागच्या असंख्य कलावंतांचा आहे. अनेकांनी आपली नाममुद्रा त्या-त्या
कलाकृतींवर उमटवली आहे. सिनेमाच्या माध्यमातून त्यांची कला रसिकांशी बोलत
राहिली. हे तरल संवेदनेचे कलावंत मात्र या झगमगत्या दुनीयेपासून दूरच
राहतात.
भारतीय सिनेमाला गांधी चित्रपटासाठी पहिला आॅस्कर मिळवून देणाऱ्या भानू
अथैय्यांसारखे सिनेमाच्या इतिहासात आपले कर्तृत्व सूवर्णांकित करणारे अनेक
जण या क्षेत्रात आहेत. कोणी कॉस्चूम डिझायनर आहे, तर कोणी नृत्य दिग्दर्शक
आहे. आणि कोणी कला दिग्दर्शक आहे. सिनेमाच्या यशात पडद्यावरच्या
कलावंतांइतकीच पडद्या मागच्या या कलावंतांची भूमिकाही महत्त्वाची असते.
त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे भाग मिल्खा भाग या सिनेमासाठी फिल्म
फेअर अवार्ड मिळविणारे, गुजारिश चित्रपटासाठी झी सिने अवार्ड मिळवणारे आणि
अशा बऱ्याच पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवणारे मूळचे नागपुरकर असलेले
कला दिग्दर्शक (production designer) रजनीश हेडाऊ.
भारत, ये जवानी है दिवानी, रेस थ्री, पीके, ट्युबलाईट, काबिल, सुल्तान,
हाऊसफुल थ्री, बजरंगी भाईजान, लेकर हम दिवाना दिल, या आणि अशा अनेक
चित्रपटांसह थ्री इडियट, फेरारी कि सवारी आणि गुजारिश अशा संवेदनशील
कलात्मक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारा हा अत्यंत संवेदनशील कलावंत.
जीवनाचे तत्वज्ञान अगदी सोपे करून टाकणारा.
सिनेमाच्या चकाचौंध दुनीयेत वावरतानाही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा असलेला मनस्वी कलावंत.
कधी जुळला याचा याच्या आतल्या कलावंताशी सूर? कधी लाभली याला कलावंताची
नजर? कलावंत जन्मावा लागतो की उपजतच लेऊन येतो कलावंतपण कर्णाच्या
कवचकुंडलासारखं. अशा अनेक प्रश्नांची उकल रजनीशच्या कला प्रवासातून होते.
हेडाऊ असे टीपिकल मराठी आडनाव असणाऱ्या रजनीशचे बालपण नागपूरच्या
हनुमाननगरात गेले. शाळा होती पं. बच्छराज व्यास विद्यालय. आणि इथेच रुजवात
झाली पुढच्या यशस्वी कलात्मक जीवनाची. इथे त्यांना भेटले कलाशिक्षक चन्ने
सर. चंद्रकांत चन्ने! हाडाचा कलावंत आणि हाडाचा शिक्षकही. चन्ने सर म्हणजे
परीस होते, लोखंडाचेही सोने करणारे. कित्येक ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाचे
विद्यार्थी त्यांच्या हातात आले आणि चन्ने सरांनी त्यातून शिल्पासारखी
सुंदर व्यक्तिमत्त्व साकारली. चन्ने सरांचा बसोली गृप अशा वेड्या कलावंत
विद्यार्थ्यांसाठी तीर्थक्षेत्र होते. चन्ने सरांनी रजनीशमधील कलेचे बीज
जोखले, एखाद्या जोहऱ्याच्या पारखी नजरेने मौल्यवान रत्न पारखावे अगदी तसे.
आणि त्याला पैलू पाडायला सुरुवात केली. शाळा, अभ्यास आणि सोबतच बसोलीच्या
मुक्तांगणात चित्रकलेची मुशाफिरी. घरी आईवडिलांचा प्रेमळ पाठिंबा. उमलत्या
वयातले ते फुलपाखरी दिवस. रजनीशचे वडीलही चित्रकार आहेत. खूप चांगले
फोटोग्राफर आहेत. अनेक मासिकांमधून, दिवाळी अंकातून त्यांचे फोटोग्राफ्स,
स्केचेस प्रकाशित झाले आहेत. आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून त्यांची कलासाधना
सुरुच असायची. त्यामुळे रजनीशमधील कलावंताला घरात मुक्तद्वार होते. इतके
तास अभ्यास केलाच पाहिजे, इतके वाजता घरी आलेच पाहिजे, अशी नियमांची जंत्री
त्यांच्या घरी नव्हती. स्वाभाविकच अशा कलासक्त, प्रगल्भ आईवडील आणि मोठ्या
भावाच्या सान्निध्यात रजनीशमधील कलावंत बहरत गेला. कलागुणांना वाव देणारी
शाळा, जीवाभावाच्या मित्रांची सोबत, सायकलवरची रपेट, रमेश लाडखेडकरांबरोबर
पक्षी निरीक्षण, निसर्गाचे सान्निध्य असे सगळे पोषक वातावरण त्याच्यातील
कलावंताला पैलू पाडत राहिले.
दहाव्या वर्गात उत्कृष्ट गुण मिळवून रजनीशने नागपूरच्या शिवाजी विज्ञान
महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि बारावीनंतर मुंबईच्या जे जे स्कुल आॅफ
आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. ग्रॅज्युवेशन पूर्ण झाल्यानंतर
ट्रेनिंगसाठी रजनीश दिल्लीला गेला आणि तिथे मोरपंखी स्वप्नांना आकार लाभला.
शिक्षण संपलेले होते. पुढच्या वाटा धुसर होत्या. नक्की काय करायचे याचा
शोध सुरू होता. दरम्यान विविध एक्झिबिशन्स बघणे, करीअरच्या शक्यतांचा वेध
घेणे, असे सगळे सुरू असतानाच अचानक एक संधी चालून आली. रजनीशचा एक भाऊ
त्यावेळी बीबीसी चॅनल सोर्ससाठी आर्किटेक्चरल हेरिटेज आॅफ इंडिया ही फिल्म
तयार करीत होता. रजनीश आर्किटेक्ट असल्यामुळे त्याने भावाबरोबर ही फिल्म
करण्याचे ठरविले. त्या फिल्मसाठी रजनीशने रिसर्चसह अनेक कामे केली. रजनीशची
फिल्मी दुनीयेशी ही पहिली ओळख. सहा महिने हे काम केल्यानंतर त्यांनी
सिनेमा क्षेत्रातच सेट डिझायनिंगचे काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते
मुंबईला परतले.
प्रॉडक्शन डिझायनर इन फिचर फिल्म हा व्यवसाय निवडणे, हा एक वेगळा आणि
धाडसी निर्णय होता. कारण हुशार मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनीयर व्हावे,
अभ्यासात थोडे बरे असणाऱ्यांनी पदवी मिळवून शिक्षकाची, सरकारी किंवा तत्सम
नोकरी मिळवावी आणि जीवनाची इतिकर्तव्यता मानावी, असे साधारण मध्यमवर्गीय
मराठी घरात होत असे. जीवनातील स्थैर्याला तेव्हा बऱ्यापैकी महत्त्व होते,
अशा काळात एका मराठी मुलाने अनिश्चततेने भरलेल्या सिनेक्षेत्रात जाण्याचा
निर्णय घेणे, खूप निराळे होते. तिथे स्वतःला सिद्ध करणे, हे मोठे आव्हान
होते.
मात्र ज्यांची मुळं जमिनीत घट्ट रुजलेली असतात, त्यांच्यासाठी आकाशाला
गवसणी घालणे तितकेसे कठीण नसते. रजनीश त्यापैकी एक होते. रजनीशने या
प्रवासाची सुरुवात पायरी-पायरीने आणि अभ्यासपूर्ण रितीने केली. मुंबईत
आल्यानंतर सुरुवातीला ते युनायटेड टेलिव्हजन, रोनी स्क्रुवाला, झरीना
मेहता, एम टीव्ही, चॅनल व्ही अशा मंडळींना भेटले. त्यांच्यासाठी त्यांनी
छोटी-छोटी कामे केली. त्यातूनच पुढे त्रिकाल या टेलिव्हिजन मालिकेसाठी आणि
गाथा या सिरीजसाठी काम केले. सुरुवातीची दोन-तीन वर्षे हे केल्यानंतर रजनीश
आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून Acropolis नावाची कंपनी सुरू केली. त्या
माध्यमातून त्यांनी टीव्हीच्या ५०० जाहिरातींसाठी काम केले. हळुहळु
चित्रपटांकडे वळत अनेक मोठे चित्रपट रजनीशच्या नावावर जमा होत गेले.
प्रत्येक चित्रपट आशय-विषयाच्या दृष्टीने निराळा असतो. त्यातली पात्र ती
कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांच्या अभिनयातून करीत
असतात. पण त्या चित्रपटाचा कालखंड, कथानकाची पार्श्वभूमी, त्यातले वातावरण
जिवंत करण्याचे काम चित्रपटाचे सेट्स करीत असतात.
अलिकडे हे शास्त्र अधिक विस्तारले आहे. दिवसेंदिवस विकसित होत
चाललेल्या टेक्नॉलॉजीमुळे सेट्सचे महत्त्वही वाढत चालले आहे. चित्रपटाच्या
कथानकात वर्णिलेला कालखंड, कथानकातला प्रदेश, कथेची सामाजिक, सांस्कृतिक
पार्श्वभूमी हे सगळे हुबेहुब साकार करण्याचे काम सेट्सचे असते. यासाठी
प्रचंड अभ्यासाची आवश्यकता असते. रजनीशने ते शिवधनुष्य पेलले. या क्षेत्रात
आधीपासून कार्यरत असलेल्यांच्या गर्दीत आपली जागा निर्माण करणे इतके
सोपेही नव्हते. गुजारिश सिनेमा आपल्याला आठवत असेल, त्यातील नायकाच्या
मनातली नकारात्मकता दाखवण्यासाठी गर्द रंग, अंधारलेले सेट्स वापरले आहेत,
ही सगळी रजनीशमधील कलावंताची कमाल आहे.
रजनीश सांगतात, प्रत्येक चित्रपटाचा सेट तयार करण्याचा अनुभव वेगळा
असतो. प्रत्येक अनुभवावर एकेक लेख लिहून होईल, इतके विस्तृत आणि समृद्ध
करणारे. अलिकडे रजनीशने ॲमेझॉन प्राईमसाठी द फरगॉटन आर्मी नावाची वेबसिरिज
केली, ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत आहे. ती करताना
नेताजींच्या जीवनाचा खूप अभ्यास केला. त्याचा मनावर खोलवर परिणाम झाला.
त्यासाठी बॅंकांकच्या जंगलात आम्ही फिरलो. तो अनुभव खूप निराळा आणि सुंदर
होता.
एक चित्रपट तयार करणे म्हणजे त्या कथावस्तुचा पूर्ण अभ्यास करणे. त्या
सिनेमाची कथा जिथे घडते, त्या देश-प्रदेशातील स्थापत्य, त्याचा इतिहास,
तिथले नागरी जीवन या सगळ्याचा खूप अभ्यास करावा लागतो. टायगर जिंदा है, या
चित्रपटासाठी अबुधाबीचा सेट तयार केला होता. तेव्हा बगदादचे
स्थापत्यशास्त्र अभ्यासले. तिथले पिरिआॅडिकल डिटेल्स अभ्यासले. त्या
सगळ्यातून खूप आनंद मिळतो. एखादा चित्रपट करताना त्याचा सेट भव्यदिव्य आहे
का? हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. माझ्यासाठी प्रत्येकच सिनेमा तेवढाच
महत्त्वाचा असतो. मला सतत काम करायचे आहे. हे महत्त्वाचे आहे. तो सिनेमा
हॉलिवूडचा असेल, बॉलिवूडचा असेल, किंवा तो एखादा माहितीपट असेल, मी
त्यामध्ये तेवढाच जीव ओततो. आपल्या कामात जितका जीव ओतावा, तितके ते अधिक
जिवंत होत जाते. रसरशीत होत जाते. हे रजनीशने विशेषत्वाने सांगितले.
कबीर खानच्या दिग्दर्शनात तयार झालेला आणि रणवीर सिंग, दीपिका
पदुकोणच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला 83 हा रजनीशचे प्रॉडक्शन डिझाईन
असलेला चित्रपट येऊ घातला आहे. त्याची प्रेक्षकांबरोबरच रजनीशही वाट बघत
आहेत.
यशाची एकेक दालने पादाक्रांत करीत जात असतानाही रजनीशच्या मनातल्या
बालपणाच्या खुणा अजून ताज्या आहेत. ते म्हणतात, ते शालेय दिवस, पं. बच्छराज
शाळेची ती इमारत,तिथले ग्राऊंड, ते राजाबाक्षाचे मंदिर, शाळेतले लाल
फुलांचे काटेसावरीचे झाड, सगळे बालमित्र, शाळेतले शिक्षक, त्यांची शिस्त हे
सगळे मनपटलावर कायमचे कोरले गेले आहे. प्रत्येकानेच अगदी हात धरून
शिकविलेच, असे नाही, मात्र त्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा
जाणते-अजाणतेपणी मनावर ठसत गेला आणि मी टिप कागदासारखा त्या गोष्टी टिपत
गेलो. आज सिनेमासाठी काम करतानाही त्या सगळ्याची कायम सोबत असते. मी आज जो
काही आहे, त्यामध्ये त्या सगळ्यांचा वाटा निश्चीत आहे.
आपले शहर, तिथले फुलपाखरी दिवस, शाळा, बालपण या सगळ्यांवर निरतिशय
प्रेम करणाऱ्या रजनीशला प्रांत, देश-भाषा यांच्या सीमा मान्य नाहीत.
त्याच्या पलिकडच्या मानवतावादावर त्यांचा विश्वास आहे. जाती-धर्म भेदाच्या
पलिकडे आता आपण गेले पाहिजे, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. जीवनात
Exploration असले पाहिजे. जेव्हा हे exploration थांबते, तेव्हा आयुष्य
थांबते. exploration च्या काही सीमा नसतात. असेही रजनीशला वाटते.
लखलख चंदेरी तेजाच्या दुनीयेत काहीसे अपरिचित असलेले क्षेत्र निवडणारा
हा तरुण त्याच्या प्रचंड मेहनतीने आणि अदम्य आशावादाने अवघ्या काही
वर्षातच या झगमगत्या दुनीयेत घट्ट पाय रोवून उभा राहिला. नुसता उभाच राहिला
नाही तर आपल्या कर्तृत्वाचे वलय त्याने तिथे निर्माण केले. मात्र हे सगळे
करताना आपण काही विशेष केले आहे, किंवा त्यासाठी काही विशेष स्ट्रगल करावे
लागले आहे, असे रजनीशला वाटत नाही, ते गंमतीने सांगतात, शालेय जीवनात
रसायनशास्त्र आणि गणिताचा पेपर सोडविणे हाच केवळ माझ्यासाठी स्ट्रगल होता.
बाकी कुठलाही विशेष स्ट्रगल मला जीवनात करावा लागला नाही. काम करीत गेलो,
एकातून दुसरे काम मिळत गेले, पैसेही येत गेले. सिनेक्षेत्रात नाव
कमावणाऱ्या प्रत्येकाजवळ त्यांच्या-त्यांच्या संघर्षाची कथा असते. रजनीशने
मात्र त्याच्या उमेदवारीचा काळ त्याच्यातल्या सकारात्मकतेने सोपा करून
टाकला आहे. त्यांच्या मते जे आवडते ते करणे हा आनंद असतो, यात संघर्ष नसतो.
आणि रजनीशमध्ये काठोकाठ भरून राहिलेली ही सकारात्मकताच त्यांना
इतरांपेक्षा वेगळे करते.
जन्मजात कलावंतपण लेऊन आलेला हा कलावंत कलेसाठी कला या न्यायाने अविरत
कलेची पखरण करतो आहे. याचे हे कलावंतपण असेच बहरत जावो आणि झी, फिल्म
फेअरसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आॅस्करवरही रजनीश हेडाऊ या नावाची
मोहोर उमटो, या शुभेच्छांसह.
Wednesday, 28 October 2020
देखणे ते हात
रक्तामध्ये ओढ मातीची
स्वाती हुद्दार
रसिकहो नमस्कार आणि या रंगगंधाच्या निसर्ग यात्रेत आपलं मनपूर्वक स्वागत.
कविता या वाड.मयकृतीचा प्रवास खूप पुरातन आहे. अगदी मराठी
साहित्यापुरताच विचार करायचं ठरवलं ना तरीही संत-पंत-तंत काव्यातून तेजाळत
आलेली ही कविता केशवसुतांच्या लेखणीतून उतरत आधुनिक कवितेशी नातं सांगू
लागली आणि त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही.
मराठी साहित्याला संतकाव्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. महानुभवी
कवींपासून वारकरी संत कवींपर्यंतच्या विपूल काव्यानं मराठी कविता समृद्ध
झाली आहे. परमेश्वर भक्ती हा संत काव्याचा आणि त्यानंतर पंडिती काव्याचा
मूळ उद्देश असला तरी त्यातील अनुभवांची खोली आणि शब्दसंपदा विस्मित करते.
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळु या ज्ञानदेवांच्या विराणीतून वर्णिलेला
राधाभाव किंवा अणुरेणिया थोकडा, तुका आकाशाएवढा या तुकोबांच्या अभंगातून
व्यक्त झालेलं तत्वज्ञान या समोर आपण नतमस्तकच होतो.
मराठीला अशीच तंत काव्याचीही परंपरा लाभली आहे. शाहिरांनी लावणी आणि
पोवाड्यातून रचलेलं काव्य जीवनसन्मुख आहे. जीवनानुभवांचं जिवंत वर्णन
करणारं आहे आणि म्हणूनच रसरशीत आहे. राम जोशी, अनंत पंदी, होनाजी बाळा
यांच्या रचना मराठी माणसाला आजही वेड लावतात.
लटपट लटपट तुझं चालण गं मोठ्या नखऱ्याचं
या लावणीचा ताल आजही थिरकायला लावतो.
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
असं लिहिणाऱ्या केशवसुतांनी आधुनिक मराठी काव्याची पायाभरणी केली आणि समुद्र मंथनातून एकेक रत्न बाहेर पडावेत तशी
केशवसुत, गोविंदाग्रज, राजकवी भा. रा. तांबे, कवी बी, बालकवी, बा. सी.
मर्ढेकर, मुक्तिबोध, कुसुमाग्रज, कवी अनिल, नारायण सुर्वे, दासु वैदय, ना.
धो. महानोर, ग दि माडगुळकर, सुरेश भट, ग्रेस ते अगदी अलिकडच्या संदीप खरे,
कवी सौमित्रांपर्यंत ही परंपरा अत्यंत वैभवानं विस्तारत गेली. प्रत्येकाचा
बाज वेगळा, शैली वेगळी.
कवयित्रीनींही मराठी कवितेची पालखी तेवढ्याच सक्षमपणे वाहिली आहे. संत
जनाबाई, मुक्ताई, कान्होपात्रा, सोयरा इथपासून सुरू झालेला हा प्रवास
निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, पद्मा गोळे आणि पुढे मनाचे पदर
उलगडणाऱ्या अरुणा ढेरें आणि त्या पुढेही जात राहिला. या सगळ्यांच्या
प्रतिभेचं कोंदण लेऊन अवतरलेल्या कविता पाणीदार तेजस्वी मोत्यांसारख्या
आहेत.
जीवनानुभवाला उत्कटपणं भिडणाऱ्या या सगळ्यांच्या कवितांमध्ये निसर्ग
निरनिराळ्या रुपात भेटतो. नव्हे तो अपरिहार्यपणे येतोच. पावसावर तर कवी
मनाचं अपार प्रेम.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
असं बालकवी लिहितात. तर
श्रावणात घननिळा बरसला
असं पाडगावकर म्हणतात
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे
असं कवी बी लिहितात तर
केळीचे सुकले बाग असूनि निगराणी रे
असं कवी अनिल म्हणतात
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद स्वराने
असं ग्रेस लिहितात
श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात
सखया रे आवर ही चांदरात
असं सुरेश भट म्हणतात
पहिल आभाळ, पहिल रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
असं सौमित्र म्हणतो
इतकी बेपर्वाई फक्त आकाशालाच शोभते
पण तू आकाशच राहा, नाहीतर डोळे उचलून बघायचे तरी कोणाकडे
असं पद्मा गोळे म्हणतात
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
असं बहिणाबाई म्हणतात
तोच चंद्रमा नभात, तिच चैत्र यामिनी
असं शांताबाई लिहितात
आणि...
मावळत्या दिशेपाशी
पाणी निळे होई
चंद्रभागेपरी, सांज वाहते गे बाई
असं अरुणा ढेरे म्हणतात
अशाच निसर्ग रुपकातून जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या दोन मराठी सारस्वतांच्या कविता आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत.
स्मरते कधी भरली नदी
अन गर्द झाडी काठची
पावसाळी चांदणे
अन साऊली घनदाटशी
हिरवे दिवेसे काजवे
मरवा हवेचा तीक्ष्णसा
दूर कोण्या पाखरांचा सूर जख्मी क्षीणसा
तो धुराने फासलेला, झोपड्यांचा पुंजका
गोठलेले ते धुके - छे! कोंडलेला हुंदका
असं लिहिणारे बा. भ. बोरकर
आणि
सफरचंदाच्या रंगांतुन
असेच अवचित रांगत आले
लाल उकलत्या पेरूमधूनी
बघून तिजला खुदकन हसले
टपोर द्राक्षांच्या घोसातून
बिलगे तिजला झेप टाकुनी
फुटली द्राक्षे कायेवरती
गेली अवघी मग बावरुनी
लपवू कोठे मुळी कळेना
नटरंगी हा अवखळ कान्हा
हे लिहिणाऱ्या इंदिरा संत
त्यांच्या कवितांमधून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
रसिकहो, बोरकरांची कविता म्हणजे आषाढातल्या घनघोर पावसात लख्खकन तेजाळणाऱ्या वीजेसारखी अंतर्बाह्य दीपवणारी
आणि
इंदिराबाईंची कविता श्रावणातल्या रिमझिम पावसासारखी आत-आत झिरपत जाणारी
बोरकरांची कविता उघड्या जीवन सत्याला सामोरी जाणारी आणि बाईंची कविता स्त्री सुलभ अवगुंठनातून सत्य उलगडणारी.
दोघांचीही कविता जन्मत:च स्वत:भोवती निसर्ग लपेटून येते. त्यांच्या
कवितेच्या शब्दाशब्दातून निसर्ग ठिबकतो आणि म्हणूनच दोघेही निसर्ग यात्री
आहेत.
१. आला श्रावण
२. माझ्या गोव्याच्या भुमीत
गोव्याची भूमी ही कलावंतांना जन्म देणारी आहे. साहित्य संगीत
क्षेत्रातले कितीतरी कलावंत याच भुमीत जन्मले. इथल्या लाल मातीच्या उदरातच
कलावंत घडविण्याची किमया आहे की काय न कळे. बोरकरांचा जन्मही गोव्याचा.
तिथल्या निसर्गाचा, संस्कृतीचा अमिट ठसा बोरकरांच्या काव्यावर उमटलेला
दिसतो.
गोव्याचा समुद्र, पुळणी, माडांची बने, नद्या आणि डोंगर, खारा वारा,
मासळीचा गंध, देवळे, चर्चेस, पूल, होड्या, हे सगळं सगळं त्यांच्या कवितेत
प्रतिबिंबित झालं आहे. बोरकरांच्याच शब्दात सांगायचं तर
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथे उलगडे
असं ते म्हणतात.
माझ्या गोव्याच्या भूमीत ही बोरकरांची कविता म्हणजे त्यांचं मातृभुमीला
वंदन आहे. त्या वात्सल्याच्या ओव्या आहेत. बोरकरांनी गोव्यावर प्रेम केलं
ते नुसत तिथल्या निसर्गावर नव्हे. बोरकरांनी गोवा मुक्ती संग्रामातही
हिरीरीने भाग घेतला होता. पुढे त्यांना त्यांच्या या कार्यासाठी ताम्रपट
देऊन गौरविण्यातही आलं.
ऐकूया माझ्या गोव्याच्या भूमीत
३. तव नयनांचे दल हलले ग
बोरकरांच्या कवितेविषयी बोलताना एकदा पु. ल. म्हणतात, बोरकरांच्या
कवितेत Infinite variety आहे. म्हणजे अनंत विविधता आहे. हे सांगताना पु. ल.
शेक्सपिअरच्या अँटनी ऍण्ड क्लिओपात्रा नाटकातल्या Ino Barbus च्या
वाक्याचा संदर्भ देतात. क्लिओपात्राच्या सौंदर्याविषयी बोलताना तो म्हणतो
Age cannot wither her nor custom stale her infinite variety पु. ल.
म्हणतात बोरकरांची कविता तशीच आहे, अनंत विविधतेनं भरलेली, कधीही शिळी न
होणारी. एक चिरंतन तारुण्याची उत्कटता त्यात आहे. ऐकूया अशीच एक उत्कट
कविता. तव नयनांचे दल हलले गं
४. हिरव्या माडांच्या
गोव्याचा निसर्ग बोरकरांच्या कवितेमध्ये ठायी ठायी विखुरला आहे.
गोव्याचा निसर्ग तृप्त करणारा आहे. निसर्गातली ही तृप्ती बोरकरांच्या
जीवनातही आहे. त्यांच्या जीवनातली ती तृप्ती, शांतता, समृद्धी, माधुर्य
त्यांच्या कवितेत पुरेपुर उतरलं आहे. आणि म्हणूनच बोरकरांच्या कवितेचा रंग
हिरवा आणि निळा आहे. तृप्तीचा आहे. त्यांच्या कवितेतलं मौन खूप खूप बोलकं
आहे.
५.पौषातील उन गडे
बोरकरांची कविता गात गात जन्माला येते. तिला तिची लय आहे. तिला तिचा
ताल आहे. इथे त्यांच्या कवितेची जातकुळी रविंद्रनाथांच्या कवितेशी जुळते.
रविंद्रनाथांची कविताही गात-गातच जन्माला यायची. तेच आज रविंद्र संगीत
म्हणून ओळखलं जातं.
थोड्याशा अनुनासिक स्वरात बोरकर जेव्हा त्यांची कविता गाऊन दाखवत तेव्हा त्या कवितेची खुमारी अधिकच वाटे.
पु. ल. म्हणतात बोरकरांच्या कवितेला दुसऱ्या कोणी दिलेली चाल किंवा
तिचं केलेलं गायन मला भावत नाही. बोरकरांच्या कवितेला दुसऱ्या कोणाच्या
प्रतिभेचा स्पर्श नकोसा वाटतो. पण आता बोरकर नाहीत, पण त्यांच्या कविता
आहेत आणि त्यांच्यावर कवितेवर प्रेम करणारे आपण सर्व आहोत. ऐकूया स्वत:ची
लय घेऊन जन्माला आलेली बोरकरांची कविता.
६. आणि मज माऊलीच जाहली
बोरकरांच्या कवितेवर संत साहित्याचे संस्कार आहेत तसेच लोकसाहित्याचेही
आहेत. भजन-कीर्तनाची परंपरा त्यांच्या घरातच होती. संस्कृतीनं संपन्न
असलेल्या गोव्यात त्यांचं बालपण गेलं. त्यामुळे दारावर येणारे वारकरी,
भुत्ये यांचं गायन ऐकतच बोरकर मोठे झाले. या सगळ्या पारंपरिक साहित्याचे
संस्कार त्यांच्या कवितेवर झाले आहेत. बोरकरांच्या काही कविता म्हणजे
आधुनिक कवितेतील अभंग आहेत. बोरकरांनी त्यांच्या कवितेतून स्त्रीत्वाची
अनेक रुपं उलगडली आहेत. त्यात अभिसारिका आहे. पत्नी आहे, प्रेयसी आहे आणि
अगदी गोव्यातील हिप्पीणीही आहे. त्यांची जपानी रमला ही जपानी स्त्रीच्या
सौंदर्याचं वर्णन करणारी कविता तर प्रसिद्धच आहे. मात्र काही कवितांमधून
त्यांनी स्त्रीत्वाची पूजा बांधली आहे. ऐकूया अशीच त्यांची आणि मज माऊलीच
जाहली ही कविता...
७. जलद भरूनि आले...
बोरकरांच्या कवितेला आध्यात्मिक बैठक आहे. कदाचित त्यांच्या घरातील
धार्मिक संस्कार आध्यात्मिक वातावरण त्याला कारणीभूत असेल. कदाचित
त्यांच्या घरातील धार्मिक संस्कार, आध्यात्मिक वातावरण त्याला कारणीभूत
असेल.
तप्त उन्हाळ्यानंतर निळ्या ढगांची प्रतीक्षा सगळ्यांनाच असते. मात्र
निळे ढग आकाशात दाटून आले की बोरकरांना जसे प्रतिभेचे धुमारे फुटतातत तसे
ते तुम्हा-आम्हाला फुटत नाहीत. हेच बोरकरांचं वेगळेपण आहे. मात्र बोरकरांची
कविता निळे ढग आणि टपटप पडणाऱ्या थेंबांपाशी थांबत नाही, बोरकरांना त्या
निळ्या जलदांमध्ये हरिकरुणा दिसते आणि पाऊस धारांनंतर श्रांत झालेल्या तप्त
धरतीचा मृदगंध त्यांना पृथ्वीचा वत्सल आशीर्वाद वाटतो. आणि म्हणूनच ते
बोरकर आहेत.
८. हवा पावसाळी
बोरकर पाच-दहा वर्षाचे असतानाच त्यांनी पहिला अभंग रचला होता आणि
त्यामध्ये बाका म्हणे अशी स्वत:ची नाममुद्राही रेखली होती. मात्र या मुलाला
कवित्वाची देण आहे, हे घरात कळल्यावर त्यांचं कौतुक न करता त्यांची आजी
म्हणाली होती, बाका आधी संत व्हावं, मग अभंग रचावा. त्या संभाषणानंतर
बोरकरांनी कवितेची उर्मी दाबून टाकली होती. पण कविता त्यांच्या आत होतीच,
त्यामुळे दाबून ठेवलेलं वरचं कवच उडवून ती बाहेर प्रकटलीच आणि स्वत:च
तत्वज्ञान घेऊन प्रकटली. त्यामुळे बोरकर त्यांच्या कवितेतून पावसाचं वर्णन
करीत असले तरी त्यातून जीवन तत्वज्ञान सांगणाऱ्या ओव्या आपसूकच प्रस्फुटीत
होतात.
सुखाच्या तळाशी, किती दु:खराशी
उरी कारणावीणही कालवे
ऐकूया बोरकरांची हवा पावसाळी
९. संधिकाल
बोरकर म्हणतात कवितेचा जन्म म्हणजे process of self discovery आहे. ती
आत्माविष्काराची साधना आहे. बोरकरांच्याच दृष्टीनं त्यांच्या कवितेकडे
पाहिलं की त्याचं वेगळेपण जाणवतं.
संधिकाल माणसाला अंतर्मुख करतो. तो आयुष्याचा असो की दिवसाचा. प्रत्येक
ऋतूचा संधिकाल निरनिराळा. बोरकरांनी ग्रीष्मातल्या एका अशाच संध्याकाळचं
वर्णन केलं आहे.
१०. थवे
बोरकरांच्या कवितेसारखा रंगोत्सव क्वचितच कुणाच्या कवितेत आढळेल.
हे विश्व म्हणजे परमात्म्याची महान कलाकृती आहे, असं मानणाऱ्या बोरकरांचं कविता लेखन म्हणजे परमात्म्याची साधनाच होती.
बोरकरांची कविता म्हणजे कसबी चित्रकारानं रेखाटलेलं अनुपम निसर्ग चित्र
आहे, असं भासतं. नानाविध रंगांचे बुधले समोर मांडलेले असावेत. आणि
चित्रकारानं हातातला कुंचला त्यामध्ये बुडवून कॅनव्हॉसवर सहज फटकारे मारत
अप्रतिम निसर्ग चित्र काही क्षणात साकारावं, अशीच बोरकरांची कविता
सप्तरंगात न्हाऊन आपल्यासमोर उभी ठाकते आणि त्या कवितेतला कोणता रंग अधिक
लोभस, हवाहवासा हे ठरविण्यात आपण हरवून जातो.
११ दंश
बोरकरांची कविता ज्या काळात जन्माला आली त्या काळात मराठी कवितेचे अनेक
प्रवाह दुथडी भरून प्रवाहित झाले होते. त्यावेळी कुसुमाग्रज समाजनिष्ठ
कविता लिहित होते. मर्ढेकर यंत्रयुगीन माणसाचं दु:ख टिपत होते. मुक्तिबोध
श्रमाची आराधना करणाऱ्या नवमानवाची कविता लिहित होते.
बोरकरांच्या कवितेचा प्रवाह अगदी निराळा होता. तो अभिजात भारतीय
संस्कृतीशी नातं सांगणारा होता. म्हणूनच बोरकरांच्या कवितेची नाळ
टागोर-अरविंदांच्या कवितेशी जुळते. तांब्यांच्या कवितेचा वारसा ती पुढे
नेते. रसरशीत जिवंतपणा बोरकरांच्या कवितेत ठायीठायी भेटतो. त्यांची कविता
निवृत्तीपर नाही, प्रवृत्तीपर आहे. बोरकरांची कविता जीवनातल्या सौंदर्याची
पुजा मांडते. बोरकरांच्या कवितेतील निसर्ग कधी परमतत्वापर्यंत नेऊन
पोहोचवतो, कळतही नाही आणि त्या कवितेच्या निळाईत आपण हरवून जातो.
१२ ढवळे ढवळे
बोरकरांनी त्यांच्या कवितांमधून जवळपास ३५० वृत्त-छंद वापरले आहेत.
त्यांच्या कवितेवर जसे संस्कृत साहित्याचे संस्कार आहेत, तसेच सौंदर्यलक्षी
पोर्तुगिजी संस्कृतीचेही आहेत. ग्रीक साहित्यातील सौंदर्यदृष्टीही त्यात
आहे. गोव्यातील लोकसंस्कृतीचेही संस्कार आहेत. कवितेतील अंत:संगीत ही किती
मौलिक गोष्ट आहे, याची जाणीव बोरकरांच्या कवितेनं प्रथमच मराठी कवितेला
करून दिली. बोरकरांच्या कवतेत सुर, छंद, ताल, आशय यांची एकत्र नांदणूक आहे.
पु. ल. म्हणतात, पाश्चात्य संगीतातील हार्मनी सारखच अनेक संस्कृतींचं
मिश्रण बोरकरांच्या कवितेत दिसतं. बोरकर स्वत:च म्हणतात, ग्रीकांची
सौंदर्यदृष्टी आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्म यांचा मिलाप त्यांच्या
कवितेत आहे. ऐकूया बोरकरांची अशीच अंत:संगीताचा साज लेऊन आलेली कविता.
१३.पर्जन्याची पिसे सांडली
बोरकराच्या कवितेविषयी अरुणा ढेरे लिहितात बोरकरांचा धर्म द्वंद्वाचा
स्वीकार करताना आवश्यक असणारा तोल सांभाळणारो. लोकान्त भोगतानाही आतला
एकान्त ढळू द्यायचा नाही. भोगाचा उत्सव मांडताना त्यागाची आंतरपुजा नजरेआड
होऊ द्यायची नाहीहा तोल म्हणजे बोरकरी कवितेचा ध्यानबिंदु आहे. एकदा या
बिंदुवर दृष्टी स्थिर केली की समाधी लागते.
इथे पुन्हा बोरकरांची कविता समजून घेताना त्यांच्याच कवितेतील शब्दांचा आधार घ्यावा लागतो. बोरकर म्हणतात
माझे सुख मोठे धुंद
रसलंपट'मी तरी मजला
अवचित गोसावीपण भेटे
१४ निळा
बोरकरांच्या कवितेला चैतन्याचा स्पशृ आहे. १९५८ साली सोलापूरला
भरलेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना बोरकर स्वत:च म्हणाले
होते, कविता हा लौकिक पातळीवरचा शब्दव्यवहार नव्हेच. ती अलौकिक पातळीवरची
शब्दघटना आहे. बोरकरांनी केलेल्या या व्याख्येतच सगळं आलं. पुढे ते
म्हणतात, कवितेचा मंत्र कवीला नुसता दिसत नाही तर ऐकूही येतो. बोरकर
कवितेला मंत्र म्हणतात. खरंच बोरकरांची एकेक कविता म्हणजे निसर्गाच्या
अणुरेणुत सामावलेल्या परमेश्वराला आवाहन करणारे मंत्र आहेत. या मंत्रांचा
आस्वाद घेताना आपलंही मी-तू पण संपत आणि उरते सृष्टीशी तादात्म्याची
अवस्था. केवळ अद्वैत.
१५. वारुणी रात
प्रत्येक कवी किंवा साहित्यकार पूर्वसुरींना वाट पुसतच वाड्.मयीन
वाटचाल करीत असतो. बोरकर त्यांच्या कवितेचा नवा संप्रदाय निर्माण करण्यात
यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या कवितेवरचा केशवसुत गोविंदाग्रज किंवा
बालकवींसारख्या कवींचा प्रभाव नाकारता येत नाही. भा. रा. तांबेंना तर बोरकर
गुरूच मानतात. तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारा कवी, असेही
बोरकरांबद्दल समीक्षकांचे मत आहे. तांब्यांनी स्वत: बोरकरांविषयी
गौरवोद्गार काढताना He is a new star on horizen असं म्हटलं होतं.
बोरकरांची वारुणी रात कविता ऐकताना बालकवींच्या फुलराणी कवितेची आठवण
येते. फुलराणीत बालकवींनी केलेलं निसर्ग वर्णन वाचून ते निसर्ग चित्र
डोळ्यापुढे उभं राहतं, तसंच वारुणी रात वाचतानाही तो निसर्ग हुबेहुब
डोळ्यापुढे येतो. जणूकाही निसर्ग रंगांमध्ये कुंचला बुडवून कोणीतरी मोठ्या
कॅनव्हासवर ते चित्र रेखाटतय, इतकं तरल शब्दचित्र बोरकर रेखाटतात.
ऐकूया वारुणी रात
१६. सरीवर सरी आल्या गं
बोरकरांनी मराठी कवितेला नवे आयाम दिले. त्यांची कविता उमटलीच स्वत:चं
वेगळं वैशिष्ट्य घेऊन. त्यामुळं मराठी समीक्षकांना आणि साहित्यिकांनाही
बोरकरांची नोंद घ्यावी लागली. अनेंकांनी त्यांना अनेक विशेषणांनी नावाजलं.
वि. स. खांडेकरांनी त्यांचा उल्लेख ज्वालेची पूजा करणारा पारिजातक बसा
केला आहे. मंगेश पाडगावकरांनी त्यांना उन्हाचं चांगणं करणारा कवी म्हटलयं.
कोणी त्यांना मांगल्याचे पुजारी म्हटलयं, कोणी त्यांनाजीवनप्रेमी म्हटलयं.
पुलंनी त्यांना आनंदयात्री म्हटलयं. मात्र पु. ल. म्हणतात, इतक्या
विशेषणांनंतरही बोरकरांची कविता त्याही पलिकडे दशांगुळे उरते. अगदी तो
परमात्मा दशांगुळे उरला प्रमाणेच.
बोरकरांच्या कवितेत गं. हे अक्षर वारंवार येतं. आणि मोठं गोड वाटतं. उदाहरणच द्यायचं तर, तव नयनांचे दल हलले गं.
किंवा फुटल्या गं उकळ्या
बोरकरांच्या कवितेते येणारा गं. ऐकून पुल गंमतीने म्हणायचे, बोरकरांनी
गं. ची बाधा झाली आहे. गंमतीचा भाग सोडला तर त्यांच्या कवितेतला गं मोठा
गोडवा घेऊन येतो. ऐकूया अशीच गं ची खुमारी घेऊन आलेली त्यांची कविता. सरीवर
सरी आल्या गं.
१७.जीवन त्यांना कळले हो
बोरकरांची कविता ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा सांगणारी. जीवनाचे तत्वज्ञान
मांडणारी. नव्हे त्यांची एकेक कविता म्हणजे वेदांची एकेक ऋचा आहे.
महात्मायन या त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या दीर्घ कवितेत ते लिहितात,
समुद्र होऊनी चंद्र रेखावा
चंद्र होऊनी अग्नि भोगावा
हे लिहिणारे बोरकर आणि त्यांची कविता दोन्ही अलौकिक पातळीवरचे. लहान न
कळत्या वयात बोरकरांनी पहिल्यांदा अभंग लिहिला, तेव्हा त्यांची आजी म्हणाली
होती, आधी संत व्हावे, मग अभंग रचावा.
बोरकरांमध्ये हे संतत्व मूळातच होतं. म्हणूनच जीवन त्यांना कळले हो
सारखं उपनिषदातलं तत्वज्ञान मांडणारं काव्य त्यांच्या लेखणीतून प्रसवलं.
ऐकूया, जीवन त्यांना कळले हो
इंदिरा संत
१. शेला
इंदिराबाई आणि नारायण संत या दाम्पत्याचा एकत्रित कवितासंग्रह म्हणजे
सहवास. मात्र इंदिराबाईंची निजखूण उमटली ती १९५१ साली प्रकाशित झालेल्या
शेला या त्यांच्या स्वतंत्र अशा पहिल्या काव्यसंग्रहात. आणि इंदिरा नावाची
वीजरेघ रसिकांच्या मनात लखलखून उमटली. ऐकूया त्यांची शबमदांचं गारुड करणारी
शेला ही कविता.
२. निळी पांढरी दुपार
इंदिराबाईंच्या कविता लेखनाला सुरुवात झाली त्यांच्या वयाच्या
सोळाव्या-सतराव्या वर्षी. मात्र प्रतिभेला बहर आला तो नारायण संत त्यांच्या
आयुष्यात आल्यानंतर. दोघांच्या एकत्रित कवितांचा सहवास हा कवितासंग्रह
१९४० साली प्रसिद्ध झाला. त्यामध्ये प्रीतीच्या कविता अधिक होत्या. पुढे
ना. मा. संतांचं अकाली निधन झालं आणि बाईंनी कवितेला जवळ करीत आपलं एकाकीपण
त्यात विरघळून टाकलं. त्यामुळ आक्कांची कविता निसर्गाच्या उपमांमधुन
त्यांचं दु:ख मांडत जाते. म्हणूनच प्रत्येकच स्त्रीला ती आत्यंतिक जवळची
भासते. बाईपणाच्या खुणा त्यांच्या कवितांमधून अलगद भेटीला येतात. ऐकूया
त्यांची निळीपांढरी दुपार ही कविता.
३.झंझावात
स्वत:च्या कवितांमधील निसर्गप्रतिमांबद्दल बोलताना आक्का स्वत:च
सांगतात, माझ्या भावजीवनात प्रीतीइतकंचं निसर्गालाही स्थान आहे. निसर्गाची
मला लहानपणापासूनच आवड आहे. आकाश, पाणी, वृक्ष यांच मला आकर्षण आहे.
त्याचप्रमाणे तळपणारं उन, धो-धो पडणारा पाऊस, धुक्याच्या लाटा यांचही.
म्हणूनच माझ्या कवितेत निसर्गाला अधिक जागा असे. पण हा निसर्ग नुसता
वर्णनापुरता येत नाही. त्याच्या दर्शनानं माझ्या मनात जे रंगतरंग निर्माण
केलेले असतात, त्याच्या रुपात तो येतो. ऐकूया वर्षा रुतूचं वर्णन करणारी
इंदिराबाईंची ही कविता.
४.वाटे मला
इंदिराबाईंच्या संपूर्ण जीवनप्रवासात निसर्ग त्यांचा सखा आहे. या
निसर्गाला स्वत:चा रंग, रुप, स्वभाव, स्पर्श, रस, सगळं माणसासारखंच आहे.
त्या निसर्गाला बाई आपलं सुख-दु:ख सांगतात. त्याच्याशीच हितगुज करतात.
निसर्ग, प्रेम, विरह, दु:ख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण
आहेत. कोणताही भावघटक स्वतंत्रपणे येत नाही. प्रेम म्हणजेच दु:ख.
दु:खाच्या गाभ्यातच विरह. विरहाची मिठी एकाकीपणाला आणि या सगळ्यात निसर्ग
विरघळून एकजीव झाला आहे.
५. पाखराच्या पिसापरी
दु:ख हा इंदिराबाईंच्या कवितेचा धर्म आहे. कविता ही फक्त आपली
सृजनप्रक्रीया नाही तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी संवादाचा हा एकमेव
मार्ग आहे. या जाणिवेनं त्यांनी कविता लिहिली. पन्नास वर्ष त्यांचा हा
संवाद सुरू होता. सुरुवातीला चिरविरहाचे दु:ख, पुढे नात्याची अनेक रुपं
कवितेतून प्रगट'होऊ लागली.आठवणींचा गोडवा, वेदना, नव्यानं सहवास, त्यांच्या
अनुभवांच्या संचिताला फुटलेली पालवी, जमिनीवर विखुरलेल्या बियांतून सहज
रोपं रुजावित तशी कविता आक्कांच्या अंतर्मनातून उमलत गेली. निसर्गाचे नाना
विभ्रम उलगडत गेली. सहजपणे, अगदी अलगद.
६.धुसर विरल
कापूस पिंजताना त्यातून अनेक म्हाताऱ्या हवेत तरंगू लागतात. त्यातील
एखादी खेळणाऱ्या मुलांच्या हाती लागते. तसे हे अनुभवांचे धुसर तरंगते
काहीतरी माझ्या हाती लागते आणि त्यातून कविता निर्माण होते. असं आक्कांनीच
त्यांच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रीयेविषयी म्हटलं आहे. खरंचं
म्हातारीच्या मागे धावणाऱ्या मुवाचं निरागसपणं त्यांच्या कवितेतून
स्पष्ट'दिसतं.
इंदिराबाई श्रेष्ठत्व देतात ते कवितेला. काव्याच्या सोबतीला त्यातील
सुप्त शक्तीला. ती निर्माण करणाऱ्या कवीला नव्हे. कविता ही आपल्यासाठी
श्वासाइतकीच जीवनदायी आहे. अशी कृतज्ञता कवितेविषयी त्यांच्या मनात आहे.
७. आली माहेरपणाला
बालपणापासूनच स्त्रीगीत जमविण्याचा इंदिराबाईंना नाद होता. ओव्या
त्यांना फार आवडतं. तवंदी या त्यांच्या जन्मगावी जात्यावरच्या ओव्यांनीच
त्यांना जाग येत असे. त्या ओव्यांवरच त्यांचं लहानवयातलं भावजीवन पोसलं
गेलं. या स्त्रीगीतांचा संस्कार माझ्या मनावर खोलवर आहे. असं आक्कांनीच
म्हटलयं. त्यामुळेच असेल कदाचित स्त्रीच्या भावजीवनातल्या रेशमी धाग्यांची
वीण त्यांच्या कवितेत वारंवार गुंफली जाते. आणि ती नाजुक गुंफण
काव्यरसिकालाही हळवं करून जाते.
८. नको नको रे पावसा
इंदिराबाईंच्या कवितेविषयी बोलताना माधव आचवल म्हणतात, इंदिराबाईंच्या
व्यक्तिमत्त्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाळ आणि
भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर
तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते. त्या एकीकडे लहानशा अगदी लहानशा
घटनेतील अनुभवाचं स्पंदन पकडतात आणि ते सापडल्यानंतर मात्र पसरुन देतात
क्षितीजापासून क्षितिजापर्यंत.
इंदिराबाईंच्या मनाचं अवघ क्षितीज व्यापलं आहे त्यांच्या सख्यानी.
इंदिराबाई, त्यांची कविता त्यातून येणारा निसर्ग ही त्रिवेणी धारा जाऊन
अखेर थांबते सख्याच्या स्मृतीपीशी. आणि इंदिराबाईंच्या सख्याच्या आठवणींनी
ओथंबलेल्या कवितेत आपणही हरवून जातो.
९. मेंदी
आक्कांच्या बालपणापासून त्यांच्या मनावर स्त्रीगीतांचा खूप प्रभाव आहे.
त्यामुळे त्यांच्या कवितेतही स्त्री प्रतिमा अगदी सहजपणे येतात. आणि
आक्कांची अशी कविता वाचताना बहिणाबाई चौधरींची हटकून आठवण येते. इंदिराबाई
स्वत:च सांगतात, त्याप्रमाणे त्यांची कवितेशी ओळख पारंपरिक रचनांमधून झाली.
कलांची जीवनाशी असणारी निकटता आणि त्याचा उत्स्फूर्त आणि सहज आविष्कार
यांचा ठसा इंदिराबाईंच्या कवितेवर फार गाढ दिसतो.
आक्कांच्या मेंदी संग्रहातल्या कवितांबद्दल गंगाधर गाडगीळ लिहितात,
मेंदीनं आपण वेडावून गेलो. अनुभवाच्या ज्या छटा शब्दांना कधी वेचता येतील,
असे वाटत नाही, त्या त्यांनी वेचल्या आहेत.
निसर्गातल्या रंगगंधांनी माखलेले त्यांचं मन तो तरल अनुभव शब्दांमध्ये
बांधू लागलं. आणि बघता बघता त्या शब्दांची रंगीबेरंगी फुलपाखरांसारखी मोहक
कविता झाली. ऐकूया आक्कांची मेंदी ही कविता.
१०. रंगमंच
छोट्याशा वर्तुळातील काचेच्या तुकड्याच्या साहाय्यानं अनंत रंगसंगती
आणि चित्राकृती दिसतात नं, तशा कॅलिडोस्कोपसारखीच इंदिराबाईंची कविताही
अनंत भाववृत्तींनी भरलेली, विरह, दु:ख, वेदना, शारीर अनुभव, वात्सल्य अशा
विविधरंगी भावछटांचे दर्शन घडवते.
दु:ख हे त्यांच्या कवितेचं उगमस्थान असलं तरी जीवनातील रुसवे-फुगवे,
खट्याळपणा, मिस्कीलपणा असे इतरही भाव त्यांच्या कवितेतून स्वाभाविकपणे
व्यक्त होतात. दु:ख हा त्यांच्या कवितेचा गाभा असला तरी त्यांची कविता रडकी
कडवटपणाची नाही. त्या कवितेत प्राप्त परिस्थितीची स्वीकार आहे.
११.हस्त
इंदिराबाईंच्या कवितेत सामाजिक सांस्कृतिक संदर्भ अपवादानेच येतात.
इंदिराबाईं स्वत:च त्याबद्दल बोलताना म्हणतात, माझ्या बहुसंख्य कवितांतून
प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे. निसर्ग सुद्धा पुष्कळदा
निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे. समाजातील
अनुभवांही मन सुन्न होतं पण त्या अनुभवांना माझ्या कवितेत तितकं स्थान
नाही. याचं कारण सांगताना इंदिराबाई म्हणतात की अनुभुतींना अभिव्यक्त
करणारे विशिष्ट एरीअल्स कवीच्या मनात उभे असावेत. त्यानुसार त्या अनुभुती
प्रस्फुटीत करणारी कविता कवीच्या मनातून उमटत असावी. इंदिराबाईंच्या हस्त
कवितेत मात्र सामाजिक संदर्भ अवचित भेटीला येतो, ऐकूया
१२. तवंग
इंदिराबाईंच्या कवितेत येणारा निसर्ग स्वत:चा रंग, रुप स्वभाव, स्पर्श,
रस असे सगळे माणसासारखे भाव घेऊन येतो. रंगांची मुक्त उधळण त्यांच्या
कवितेत ठायी ठायी भेटीला येते. त्यांच्या कवितेतला पोपटी भाव मनातला हिरवा
गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके
अशा अनेक रंग प्रतिमा येतात. स्त्री जीवनातल्या प्रतिमा शब्दांचं
पारदर्शित्व आणि सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात, तसं शब्दांचं बहुविध
अर्थलावण्य त्यांच्या कवितेचं सामर्थ्य आहे. ऐकूया त्यांची रंगामध्ये
न्हाऊन निघालेली तवंग ही कविता.
१३. कुब्जा
साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा आणि अखंड संवादलय ही इंदिराबाईंच्या
कवितेची वैशिष्ट्य. स्वत्वानं सुंदर ठरलेली विशुद्ध भावकविता असं इंदिरा
संतांच्या कवितेचं वर्णन केलं जातं.
अजिंठ्याच्या कलाकाराची विसरुन राहिलेली एक पुसट'रेषा माझ्या रक्तातून
वाहाते आहे. अस म्हणणाऱ्या इंदिरा संतांची कुब्जा ही कविता प्रेम आणि
भक्तीच्या अत्युत्कट बिंदुवर पोहोचली आहे. ऐकूया.
१४.हिरवे पिवळे तुरे उन्हाचे
निसर्ग, प्रेम, विरह, दु:ख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे
पंचप्राण आहेत. कोणताही भावघटक स्वतंत्रपणे येत नाही. प्रेम म्हणजेच दु:ख,
दु:खाच्या गाभ्यातच विरह. विरहाची मिठी एकाकीपणाला आणि या सगळ्यात निसर्ग
विरघळून एकजीव झाला आहे. ऐकूया त्यांची निसर्गाचा रंगोत्सव व्यक्त करणारी
सुरेख कविता.
१५. नुक्ती विरली
१६.आला कुण्या
इंदिराबाईंची एकेक कविता म्हणजे एकेक निसर्गचित्रच जणू. पांढऱ्या शुभ्र
कॅनव्हासवर कसबी चित्रकारानं रंगांचे सहज फटकारे मारत काही क्षणात निसर्ग
दृश्य साकारावं आणि पाहणाऱ्याचे डोळे तृप्त तृप्त व्हावेत, तशीच आक्कांची
कविताही ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत जाते आणि त्यांच्या शब्दांच्या उत्सवात
रसिक न्हाऊन निघतो. ऐकूया अशीच शब्दांचं गारुड करणारी इंदिरा संतांची
सहजसुंदर कविता.
१७. चंद्रकळा
कविता ही केवळ सृजनप्रक्रिया नव्हे तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी
संवादाचाही एकमेव मार्ग आहे. असे इंदिराबाईंना वाटत होते. थोडोथोडके नव्हे
तर पन्नास वर्ष त्यांनी हा संवाद चालू ठेवला. सुरुवातीला चिरविरहाचे दु:ख,
पुढे नात्याची अनेक रूपं त्यांच्या कवितेतून प्रकट होऊ लागली. आठवणींचा
गोडवा, वेदना, नव्याने सहवास हे सगळे आक्कांच्या कवितेतून उमटले आहे.
जमिनीवर पडलेल्या बियांतून रोपे रुजावित, तितक्या सहजतेनं आक्कांनी
त्यांच्या भावनांना शब्दरुप दिलं आहे. निसर्ग प्रतिमांमधून आलेले
चंद्रकळेचे वर्णन अत्यंत लोभस आहे.
वसुंधरेच्या कल्याणाचा वसा घेतलेले कोठे दाम्पत्य
स्वाती हुद्दार
एकोणिसावे शतक म्हणजे आदर्शवादाचे शतक. इंग्रजांच्या गुलामगिरीतून
भारतमातेची मुक्तता करण्यासाठी अनेक पिढ्या स्वातंत्र्य युद्धात उतरल्या.
१८५७ पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य समराला अखेर १९४७ मध्ये यश प्राप्त
झाले आणि भारत स्वतंत्र झाला. इंग्रजी राजवटीच्या काळात इंग्रजांबरोबर नवीन
तंत्रज्ञानही भारतात आले. साहित्य आले, संस्कृती आली, नवी शिक्षण प्रणाली
आली. सुधारणाही आल्या. या काळात समाजात दोन वर्ग तयार झाले. एक नवमतवादी
नवश्रीमंतांचा आणि दुसरा कुठल्याही सुधारणांचा, बदलांचा वाराही न
पोहोचलेल्या कष्टकरी गरीबांचा. देशाला स्वातंत्र्य मिळाले की भारत सारे जहॉ
से अच्छा होईल अशी आत्यंतिक आदर्शवादी कल्पना असलेल्यांच्या भ्रमाचा भोपळा
फुटला आणि शासनासह जनतेचाही सुरू झाला संघर्ष गरीबीशी, समस्यांशी. आणि मग
भारताला सुजलाम् सुफलाम् करण्यात किती खाचखळगे आहेत, किती आव्हाने आहेत,
किती समस्या आहेत, हे लक्षात येऊ लागले.
या काळात सामाजिक दरी वाढत गेली. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले आणि
गरीब अधिक गरीब. भारतातील अनेक सुदूर प्रांतांमध्ये तर स्वातंत्र्याच्या
पन्नास वर्षांनंतरही सुधारणांचे वारेही पोहोचले नव्हते. इतकेच काय, रोटी
कपडा मकान या जीवनावश्यक सोयीसुविधांविषयीही ते अनभिज्ञ होते.
या परिस्थितीत समाजातले पराई पीड जाणणारे वैष्णव जन
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू
असे म्हणत दीनोद्धाराकरीता उभे ठाकले. संपूर्ण देशभरच अशी
समाजसेवकांची फळी उभी ठाकली. विदर्भातही कुष्ठसेवेचे असिधाराव्रत घेतलेल्या
श्रद्धेय बाबा आमटेंनी वरोरा येथे उभारलेले आनंदवन. हेमलकसा येथे
आदिवासींची सेवा करण्याचे बाबांचेच स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे सुपुत्र
प्रकाश आमटे यांनी उभा केलेला लोकबिरादरी प्रकल्प. गडचिरोली जिल्ह्यात
आदिवासींच्या सेवेसाठी डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी अथक परीश्रमातून
साकारलेले शोधग्राम. मेळघाटातील आदिवासींची अविरत सेवा करणारे डॉ. रवी
कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे. डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख अशी
आणखी किती नावे सांगावित? इदं न मम या वृत्तीने अशा अनेक ज्ञात-अज्ञात
व्यक्ती सतत समाजसेवेत रत आहेत.
यातीलच एक जिगरबाज नाव म्हणजे आदिवासी डेव्हलपमेंट इनिशिटीव्हच्या
माध्यमातून छत्तीसगडमधील बस्तरसारख्या अत्यंत नक्षलग्रस्त भागात आणि
गोंदिया जिल्ह्यातील पाऊलझुला येथे वयाच्या ८५ व्या वर्षी आदिवासींच्या
कल्याणासाठी गेल्या २५ वर्षापासून अहोरात्र झटणारे दादाजी कोठे आणि दादीजी
कोठे हे नागपूरचे दाम्पत्य.
दादाजी उर्फ जयंत कोठे Oil and Natural Gas Corporation Ltd या
संस्थेतून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि मूळचे नागपूरकर असल्याने
नागपूरमध्ये स्थायिक झाले. मुलगा आणि सून डॉक्टर तर मुलगी आहारतज्ज्ञ आणि
जावई अभियंते. सगळे नागपूरमध्ये स्थायिक. आयुष्यभर उच्च पदावर कार्य
केल्यानंतर आणि सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर
निवृत्तीनंतरचे सुखासिन आयुष्य कोणालाही भुरळ घालेल. दादाजीही आपले आयुष्य
मुला-नातवंडांच्या सहवासात आनंदाने व्यतीत करू शकले असते. पण राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या दादाजींनी लोकहितम् मम करणीयम् हे
आयुष्याचे ध्येय मानून आदिवासी कल्याण कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे
ठरवले. लहानपणापासूनच दादाजींना समाजसेवेची आवड होती. नोकरीत असतानाही
त्यांचे समाजकार्य सुरुच होते. दादीजींनी म्हणजे जयश्री कोठेंनीही त्यांना
तेवढीच उत्स्फुर्त साथ दिली.
मात्र समाजकार्याची योग्य दिशा ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे तितके
सोपे नव्हते. दादाजी नागपूरला परतल्यानंतर छत्तीसगडमधील चांपा येथील भारतीय
कुष्ठरोग निवारक संघाच्या संपर्कात आले. तिथल्या कार्याने भारावले. तिथे
भेट दिल्यानंतर छत्तीसगडमधील आदिवासींच्या समस्याही त्यांच्या लक्षात
आल्या. जीवनावश्यक सुविधांचा वाराही न पोहोचलेल्या, मुख्य प्रवाहापासून
कोसो दूर असलेल्या आदिवासींसाठी कार्य उभे करायचे त्यांनी निश्चित केले.
आणि जयंत कोठे आणि जयश्री कोठे या दाम्पत्याची कंटकाकिर्ण मार्गावरून
वाटचाल सुरू झाली. तेव्हा दादाजींचे वय होते अवघे साठ वर्षांचे.
कार्याचे ठिकाण ठरले बस्तर. १९९८ च्या जून महिन्यात ध्येयाने भारलेली
चार पावले बस्तरकडे वळली. १५ दिवसात त्यांनी हा ७२ किलोमीटरचा प्रदेश
पिंजून काढला. एका आदिवासीच्या घरीच राहण्याची सोय झाली. सगळ्यात मोठी अडचण
होती भाषेची. चांपा येथील एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून कसाबसा तुटक
संवाद सुरू होता. त्यातून दादाजींनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या. तिथे
खरी समस्या होत कुपोषणाची. दादाजींनी त्याच समस्येला हात घालण्याचे ठरविले
आणि कार्याची मुहुर्तमेढ रोवली. तिथे कार्य उभे करण्यासाठी आधी त्या
आदिवासींना आपलेसे करणे गरजेचे होते. दादा-दादींनी ते असिधाराव्रत
स्वीकारले. त्यांची संस्कृती समजून घेतली. त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून
घेतल्या. त्यांच्या झोपडीत मुक्काम केला. त्यांच्याबरोबर जेवले. काही
दिवसांनी दादाजींच्या कार्याची कळकळ, त्यांच्या हेतूची सत्यता याविषयी
आदिवासींच्या मनात संदेह उरला नाही. दादाजींच्या देहबोलीने आदिवासींना
आपलेसे केले आणि ह्रदयीच्या संवादाला मग भाषेची आवश्यकताच उरली नाही.
आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करायचे तर तिथेच मुक्काम करण्याचे
ठरले. हलबरास केवळ २५ झोपड्यांचे छत्तीसगड राज्यातील बस्तरच्या दक्षिणेस
असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील गाव. येथील पुराना पुलिस ठाण्याची इमारत
दादा-दादींच्या निवासासाठी निश्चित करण्यात आली. ही इमारत भूतबंगला म्हणून
प्रसिद्ध होती. दादा-दादींनी मात्र तिथे राहण्याचे नक्की केले. ती इमारत
अतिशय जीर्ण झालेली होती. वर्षानुवर्षे तिथे कोणाचाही वावर नसल्याने रानटी
झुडपे, शेवाळ, पशु-पक्षांचा संचार अशी सगळी परिस्थिती होती. दादाजींच्या
कुटुंबियांनी ती इमारत राहण्यायोग्य केली. तिथे दादा-दादींचे वास्तव्य सुरू
झाले आणि त्या इमारतीचा आश्रम झाला.
बस्तरच्या या आदिवासी वस्तीत जिकडे-तिकडे हातापायांच्या काड्या झालेली
आणि पोट फुगलेली बालके व कुपोषित गर्भवती महिला होत्या. दादाजींनी आधी
यांना सकस आहार पुरविण्याचे मिशन हाती घेतले. मुलांना खिचडी, सोजी, वरणभात,
भाज्या असा सकस आहार देणे सुरू केले. हळूहळू याचे उत्तम परिणाम समोर येऊ
लागले. यामध्ये दादाजींची आहारतज्ज्ञ मुलगी वर्षा तत्ववादी हिने खूप
महत्त्वाची भूमिका बजावली. हळूहळू गर्भवती महिलांचा आणि नवजात बालकांचा
मृत्युदर कमी होऊ लागला. दुसरे मिशन होते आरोग्याचे. सिकल सेल हा इथला
प्रमुख आजार. या आजाराविषयी जागृती करणे सगळ्यात महत्त्वाचे होते.
दादाजी-दादीजींनी सिकल सेल चाचण्यांसाठी कॅंप सुरू केले. त्यासाठी
नागपूरहून प्रशिक्षित डॉक्टरांची चमू बस्तर सारख्या सुदूर प्रांतात
नियमितपणे जाऊ लागली. सिकलसेलसह इतरही आरोग्य चाचण्या करण्यात येऊ लागल्या.
आदिवासींना पुरेशा सकस आहारासोबतच योग्य ती औषधे मिळू लागली आणि त्याचे
चांगले परिणाम दिसू लागले. आदिवासींना स्वच्छतेचे महत्त्व सांगून
त्यांच्याकडून स्वच्छतेचे धडे गिरवून घेतले. या सगळ्याचा संयुक्त परिणाम
म्हणजे त्यांचे आरोग्य सुधारू लागले.
आहार आणि आरोग्य हे जीवनावश्यक प्रश्न सुटल्यानंतर विषय येतो
शिक्षणाचा. दादाजींनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि आदिवासी
मुलांकरिता शाळा सुरू केली. त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली.
दादीजींनी या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केले. शालेय शिक्षणाबरोबरच या
मुलांना जीवनोपयोगी शिक्षण मिळावे, यासाठी दादाजी अधिक प्रयत्नरत होते.
त्यांनी आश्रमातच निवासी शाळा सुरू केली. या मुलांना शेतीआधारीत उद्योग,
मेकॅनिकल ट्रेनिंग, बांबुपासुन कलाकृती तयार करणे असे शिक्षण देणे सुरू
केले. परिणामी ही मुले स्वतःच्या पायावर उभी होऊ लागली आणि त्यांच्यात
आत्मविश्वास निर्माण झाला. आदिवासींमध्येही हा विश्वास निर्माण झाला की
दादाजींच्या आश्रमात गेली की मुले चांगली निघतात.
दादीजींनीही आदिवासी महिलांसाठी व्यासपीठ सुरू केले. त्या माध्यमातून
त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धीट व्हायला शिकविले. कोठे दाम्पत्याच्या मदतीला
अण्णा जोग आणि देहाडराय दाम्पत्यही आले.
बस्तरमधील काम हळुहळु बाळसे धरू लागले. दादाजींच्या प्रयत्नाने तिथे
मध्य भारतातील पहिले सिकलसेल सेंटर सुरू झाले. दादाजींच्या अथक कार्याला
लोकाश्रय मिळाला आणि राजाश्रयही मिळाला. तिथल्या आयुक्तांनी दादाजींच्या
विनंतीला मान देऊन तिथले रस्ते बांधले. वीज आणली. लॅंडलाईन फोन सुरू केले.
पाणीपुरवठ्याच्या सोयी केल्या. २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हा
प्रदेश सुजलाम सुफलाम होतो आहे.
दादा-दादींच्या रुपाने इथे देवदुत आले मात्र इथले आदिवासी त्यांना
प्रेमाने दादा-दादी म्हणू लागले. कोणतेही सरकार आले तरी आदिच्या माध्यमातून
सुरू असलेल्या कामाची दखल घेतलीच जाते. खरे तर हा प्रांत म्हणजे नक्षली
कारवायांचा गडच. आदिच्या कामाला मात्र इतके वर्षात कुठलीच बाधा आली नाही.
ही दादाजी आणि दादीजींची पुण्याई आहे.
१९९५ साली सुरू झालेल्या या कार्याच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला
आहे. त्याला रसाळ-गोमटी फळेही लागली आहेत. या काळात दोन पिढ्या शिकून सवरून
स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत. आदिवासींची नवी पिढी पोलिसात नोकरी
करतेय, कोणी स्वतःची राईस मिल सुरू केलीय, कोणी सरकारी नोकरीत आहे. एकूण
दंतेवाड्यातील हा सुदूर प्रांत कोठे दाम्पत्याच्या अविरत प्रयत्नांनंतर
मुख्य धारेत आला आहे.
पण हे सहज झाले नाही. त्यामागे दादा-दादींचे अपरिमित कष्ट आहेत.
त्यांनी आजचा दिवस येण्यासाठी गळक्या झोपडीत तिथला धुॅवाधार पाऊस झेलला
आहे. ४८ अंश तापमानात कौलारू घरात घामाच्या धारा सहन केल्या आहेत. त्यांना
तिथे सापांनी सोबत केली आहे. श्वापदांनी साथ दिली आहे. मात्र ८५ वर्षांचे
दादाजी आणि दादीजी हाथ है उद्योग मे रत, राष्ट्रसेवा धार कर म्हणत
चरैवेती-चरैवेती हा मंत्र जपत मार्गक्रमण करीतच आहेत.
कोरोना काळातही दादाजी आणि दादीजी हलबरासलाच होते. दादाजींनी या काळाचा
आदिवासी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी खूप सुंदर उपयोग करून घेतला.
आदिच्या माध्यमातून तिथे शेती पिकविली जाते. शेतीत उत्पन्न झालेल्या
वस्तूंवर आधारीत पुरक उद्योगांचे प्रशिक्षण या काळात या मुलांना देण्यात
आले. त्यांनी भाज्यांचे विविध सॉस बनवले. सायकल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स
वस्तुंची दुरुस्ती असे उद्योगाधारीत प्रशिक्षणही मुलांना या काळात देण्यात
आले. दादाजींनी स्वतः या काळात मुलांचे इंग्रजी आणि गणित पक्के करुन
घेतले.
मुळातच कलाप्रिय असलेल्या या मुलांनी गणेशउत्सवात स्वतः तयार केलेली
गणेशाची मुर्ती स्थापन केली होती. दादा-दादींच्या आश्रमात आपली मुले आहेत.
म्हणजे त्यांचे कल्याणच होणार, हा विश्वास इथल्या आदिवासींच्या मनात आहे.
आदिच्या कार्याला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण,
छत्तीसगडचे तत्कालिन मुख्यमंत्री रमणसिंग, लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रकाश
आमटे या सगळ्यांनी आदिच्या कामाची दखल घेत या कार्याला नावाजले आहे.
हळुहळु इथले जीवन बदलते आहे. त्यामागे कोठे दाम्पत्याचे अविश्रांत
परीश्रम आहेत. ज्या दिवशी इथे एकही कुपोषित उरणार नाही आणि शिक्षणाची गंगा
इथल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल, तो सोनियाचा दिन उगवेपर्यंत आदिचे
कार्य अखंड आणि अविरत सुरुच राहिल.
या देशाचे उजळो प्राक्तन, याविण दुसरे भाग्य नको
Swati Huddar
३० सप्टेंबरची सकाळ वाईट्ट बातमी घेऊन आली. तसेही अलिकडे सगळेच दिवस
असेच उगवताहेत आणि मावळताहेत. दररोज कोणीतरी आप्तस्वकीय, कोणीतरी परिचित
यांच्या जाण्याच्या बातम्या येतात. या बातम्यांमुळे मन सतत धास्तावलेले.
कोरोनाने सारे जगच विळख्यात घेतले आहे. या आजाराने शरीराबरोबरच मनाचाही
ताबा घेतला आहे आणि समाजमनाचाही.
त्या दिवशीची सकाळ उगवली ती बबनमामा गेल्याची बातमी घेऊन आणि दिवसाच
काळोख दाटून आला. गेल्या ४५ वर्षांचा पट झरझर डोळ्यासमोरुन सरकत गेला.
बबनमामांची पहिली भेट आठवते, ती मी तीन-चार वर्षाची असतानाची. तेव्हा
आम्ही भगवाननगरला राहायचो. आणि बबनमामांचे मामा ठोंबरे आमचे शेजारी होते.
तेव्हा शेजार संबंध हे नात्यापेक्षाही घट्ट असायचे. आमचे आणि ठोंबरे
कुटुंबियांचेही संबंध तसेच होते. अगदी एक घर असल्यासारखे. दोन्ही घरची सगळी
सुखदु:ख एकच होती. पैशाची समृद्धी नसली तरी मनाची समृद्धी सगळ्यांजवळच
होती. दोन घरांच्या मधले दार कायम उघडेच असायचे. बबनमामा तेव्हा कोलकत्याला
संघाचे प्रचारक होते. ते सुट्टीमध्ये त्यांच्या मामांकडे आले, तेव्हा मी
त्यांना पहिल्यांदा भेटले.
लाल काठाचे पांढरे स्वच्छ धोतर आणि पांढरा स्वच्छ बंगाली कुर्ता अशा
वेषातल्या उंचपुऱ्या गोरेपान झुपकेदार मिशा असलेल्या बबनमामांशी लगेच गट्टी
जमली. रोज त्यांच्या मांडीत बसून गोष्टी ऐकण्याचा मग परिपाठच सुरू झाला.
बबनमामा असेच कधीमधी सुट्टीत येत राहिले आणि त्यांच्याशी माझे नाते
अधिकाधिक दृढ होत गेले. बबनमामांची सुट्टी संपली आणि ते परत कोलकत्याला
जायला निघाले की खूप रडू यायचे.
तेव्हा वय इतके लहान होते की संघकार्य, त्याची व्याप्ती, बबनमामांचे
प्रचारक असणे, ते ही बंगालसारख्या प्रांतात, हे सगळे आकळण्यापलिकडे होते.
तरीही त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याही वयात मनावर उमटला
होता. पुढे आम्ही ते घर सोडून हनुमाननगरला राहायला गेलो. मामांच्या भेटी
मात्र होतच राहिल्या. मामा नागपूरला आले की आवर्जून घरी येत आणि येताना
माझ्यासाठी न विसरता हमखास राजमलाई आणतं. या क्रमात मार्च महिन्यात
झालेल्या शेवटच्या भेटीपर्यंतही खंड पडला नाही. अगदी मी दोन मुलींची आई आणि
आता सासु झाल्यानंतरही बबनमामा घरी येताना माझ्यासाठी ओंजळभर राजमलाई आणतच
राहिले आणि त्यांच्या त्या प्रत्येक भेटीत माझं लहानपण मला परत परत भेटत
राहिलं.
पुढे बबनमामा प्रचारक म्हणून त्रिपुराला गेले. तिथे खूप विपरीत
परिस्थितीत संघकार्य विस्तारत होते. मामांचे नागपूरला येणे कमीकमी होत
गेले. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, या न्यायाने प्रचारकांची फळी तिथे
संघकार्याची पायाभरणी करीत होती. अनेक शारीरिक- मानसिक क्लेष मामांसह
सगळ्यांनाच सहन करावे लागत होते. मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता ध्येय
मंदिर कि दिशा मे पग सदा बढते रहे, म्हणत संघकार्य सुरुच होते.
२० वर्षांचा काळ असाच पुढे सरकला. माझे शाळा-कॉलेज आटोपले आणि लग्न
जमले. आई-बाबांनी मामांना निमंत्रणाचे पत्र पाठवले. मामांचे लग्नाला येणे
जमेल की नाही असे वाटत होते. लग्नाला एक महिना असतानाच एक दिवस दुपारी मामा
अचानक घरी आले. त्यांना पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. आम्ही
सगळे एकत्र जेवलो. माझ्या लग्नाच्या वेळी मामांना दिल्लीला बैठकीसाठी जायचे
होते, म्हणून ते मुद्दाम आधी भेटायला आले होते. मला म्हणाले आज तुला एक
मंत्र देतो. नवऱ्याच्या मनात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. हे
नेहमीसाठी लक्षात ठेव आणि सुखाने संसार कर. लग्नाची भेट म्हणून त्यांनी
हातमागावर विणलेले खास कापड आणले होते आणि ओंजळभर राजमलाई. माझ्या लग्नात
मिळालेल्या भेटींमधली ही सगळ्यात अमूल्य भेट होती.
पुढे मामा नागपूरला परत आले. महालच्या संघ कार्यालयात त्यांचे राहणे
होते. महिन्यातून एकदा आवर्जून घरी येत. मुलींशी खूप गप्पा मारत. तीन
वर्षाआधी वैदेहीला मुंबईला नोकरी लागली. तिला मुंबईत स्थिरस्थावर करण्याची
सगळी जबाबदारी बबनमामांनी त्यांच्या शिरावर घेतली. संघ कार्यालयात फोन कर,
प्रचारकांना फोन कर, असे करीत तिची राहण्याची खात्रीशीर सोय होईपर्यंत ते
स्वस्थ बसले नाहीत.
गेल्या वर्षी वैदेहीचं लग्न झालं. मामांना आम्ही सांगितलं पुजनीय
मोहनजींना निमंत्रण द्यायचं आहे. बबनमामांनी मोहनजींना निमंत्रण
देण्यापासून ते मोहनजी लग्नाला येईपर्यंत सगळ्या गोष्टींकडे जातीनं लक्ष
दिलं.
मार्च महिन्यातील लॉकडाऊन आधीचा रविवार. मामा अचानक घरी आले. त्या
दिवशी पुडाची वडी केली होती. मामा म्हणाले, वा वा अलभ्य लाभ. खाणे झाले.
गप्पा झाल्या. पण ही बबनमामांशी शेवटची भेट असेल असे अजिबात वाटले नाही.
लॉकडाऊनमुळे मामांचे पुन्हा घरी येणे झाले नाही. अधूनमधून फोनवर बोलणे होत
होते, तेवढेच.
...आणि अचानक मामा आजारी असल्याचे कळले आणि परवा तर सगळेच संपले.
बबनमामा एकटेच गेले नाहीत. सोबत माझे बालपण घेऊन गेले. माझे हक्काचे
माहेर घेऊन गेले. जीवनात जुळणारे मैत्र, नातेबंध, हे सगळे पूर्वसंचित असते.
उगाच नाही निरपेक्ष प्रेम करणारी बबनमामांसारखी माणसं आयुष्यात येत.
मात्र ती जेव्हा अशी अचानक निरोप न घेता निघुन जातात, तेव्हा कधीही भरून न
निघणारी पोकळी निर्माण होते, कायमची.
संघकार्याच्या पवित्र यज्ञात आपल्या जीवनाची समिधा इदं न मम या
वृत्तीने समर्पित करणाऱ्या बबनमामा सहस्त्रभोजनी या संघ प्रचारकाला
संघगीताच्या या ओळीतून भावसुमनांजली.
मी संन्यासी फिरतीवरचा
कशापरी वर्षाव फुलांचा
ही ध्येयाची घोर तपस्या
इथे प्रलोभन अन्य नको
काही नको मज काही नको