Powered by Blogger.

Wednesday, 26 July 2017

दिव्यत्वाची जेथ प्रचिती...

स्वाती हुद्दार

हिमालयाच्या पूर्वोत्तर रांगा, ब्रह्मपुत्रेचे विस्तीर्ण पात्र, खनीज संपत्तीने परिपूर्ण जंगल आणि सुंदर रिमझिमता पाऊस यामध्ये वसलेली सात राज्ये, उर्वरीत भारतापासून भावनिकदृष्ट्या काहीशी तुटलेली. आपली संस्कृती, आपल्या प्रथा-परंपरा जपणारी. प्रगती, भौतिक सुधारणांपासून दूरस्थ असे इथले जनजीवन. परिणामी उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि त्या समस्यांवर मात करण्यासाठी, इथल्या रहिवासींच्या उत्थानासाठी झटणारी मुठभर वेडी माणसं. त्यातीलच एक आकाशासारखं उत्तुंग व्यक्‍तिमत्त्व म्हणजे गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आसाममध्ये समाजसेवा करणाऱ्या डॉ. अल्का सरमा.
साल 1983. चळवळीच्या कार्याच्या निमित्ताने नागालॅंडमध्ये प्रवास करीत असलेल्या अल्का सरमांना तिथल्या रहिवासींनी विचारले, क्‍या आप इंडियासे आयी है? या प्रश्‍नाने अल्काजींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले, पण कार्याची दिशाही गवसली. त्यांनी शांतपणे उत्तर दिले की मै महात्मा गांधी के देश से आयी हूँ. अल्काजींच्या या उत्तराने तिथल्या रहिवाशांमधले आणि अल्काजींमधले अंतर संपले आणि कार्याची दिशाही स्पष्ट झाली.
1956 साली मुंबईत गांधीवादी घरात जन्मलेल्या अल्का सरमांचे शालेय ते आचार्यपदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. महाविद्यालयीन जीवनात त्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीकडे आकृष्ट झाल्या आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कार्याशी जुळल्या. 1978-79 साली जेपी चळवळीच्या निमित्ताने बिहारमध्ये गेल्या असताना एका सभेत पुरुष खुर्च्यांवर आणि महिला जमिनीवर बसलेल्या आढळल्या. स्त्री-पुरुष समानतेच्या वातावरणात वाढलेल्या अल्काजींच्या मनावर ही घटना कोरली गेली आणि स्त्रीमुक्‍तीच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.
नागेन सर्मा यांच्याशी विवाहानंतर अल्काजी आसाममध्ये आल्या. आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. आसाम गण परीषदेचे नेते असलेले नागेन सर्मा वन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नलबारी या त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यावेळी नागेन आणि अल्का यांची मुलगी पारोमिता अवघी दहा वर्षांची होती. सकाळी टाटा करून घरून निघालेल्या वडिलांचे शव रात्री घरी आले, तेव्हा आपले दु:ख बाजुला ठेऊन लेकीला काय समजवायचे, हा अल्काजींसमोर प्रश्‍न होता. पतीला एकदाच मृत्यू येतो, त्याच्या पत्नीला मात्र त्यानंतर वारंवार मरावे लागते. असे जिणे अल्काजींनी नाकारले आणि राजकीय क्षेत्र न आवडणाऱ्या अल्काजी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नलबारी विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. आणि 2000 तसेच 2006 मध्ये त्या निवडूनही आल्या. 2006-2011 या कार्यकाळासाठी त्यांना उत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1979 सालापासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल्काजींनी 2013 मध्ये अक्षर फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून आदिवासी मुले आणि महिलांना सुशिक्षित करण्याचे कार्य त्या अविरत करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाने गुवहाटीमधील शिक्षणाचा आलेख उंचावतो आहे. पतीच्या हत्येनंतर नागेन सर्मा मेमोरियल सोसायटीची स्थापन करून त्या माध्यमातून रोजगार, आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
महिलांचे गुण जेव्हा सार्वत्रिक होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजोत्थान होईल, असा विश्‍वास असलेल्या अल्काजींनी आसाम महिला समता सोसायटीची स्थापना केली.
गांधी विचारधाराच आजच्या काळातही समाजोद्धाराचे माध्यम आहे, यावर अतुट विश्‍वास असलेल्या अल्काजी सर्वोदयी विचार, नई तालिम या माध्यमातून गांधी आचार-विचारांचा प्रचार-प्रसार करीत आहेत. द्वेष व्यक्‍तीचा नव्हे, त्याच्या दोषांचा करा, हे गांधीजींचे विचार अंमलात आणत गांधीयन थॉटस फॉर पीसच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठीही त्या कार्यरत आहेत.
पूर्वोत्तर राज्यांच्या समस्या उर्वरीत भारतापेक्षा वेगळ्या आहेत, या सात राज्यांची 98 टक्‍के सीमा आंतरराष्ट्रीय आहे. इथली संस्कृती वेगळी आहे, वेष वेगळा आहे, भाषा वेगळी आहे. त्यामुळे इथला रहिवासी एकटा पडला आहे. त्याच्या मनात त्याच्या अस्तित्वाविषयीच प्रश्‍नचिन्ह आहे. पूर्वोत्तर राज्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी माणसाचा माणसाशी संवाद गरजेचा आहे. अनेकदा दहशतवादी तयार होण्यासाठी सैन्याचे धोरणही कारणीभुत ठरते. कायदे आणि हिंसा हे इथल्या समस्यांचे उत्तर नाही. असे डॉ. अल्का सर्मा यांचे स्पष्ट मत आहे. आम्ही तर पोटासाठी पशुंची हत्या करतो, तुम्ही तर हुंड्यासाठी घरच्या स्त्रीची हत्या करता, असे जेव्हा आसामची एखादी व्यक्‍ती सुनावते, तेव्हा आपल्या सुसंस्कृततेवर ते मोठे प्रश्‍नचिन्ह आहे, असे अल्काजी म्हणतात.
पतीच्या निर्घृण हत्येनंतरही खचून न जाता मला मरून चालणार नाही, जगलेच पाहिजे, असे म्हणत हिंमतीने त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या अल्का सर्मांच्या अलौकिक कार्याला सलाम!

Monday, 17 July 2017

सकाळ @ फुटाळा चौपाटी

वेळ सकाळी 6

स्वाती हुद्दार

नागपूर, ता. 8
तरुणाईचे डेस्टिनेशन असलेली आणि रात्री 12 पर्यंत जाग असलेली फुटाळा चौपाटी सकाळी पुन्हा सहा वाजताच जागी झाली होती. संध्याकाळपासून तरुणांच्या उत्साही गर्दीने ओसंडणाऱ्या या रस्त्यावर सकाळी सहा वाजता मात्र मध्यमवयीन गर्दी दिसत होती. चौपाटीच्या फुटपाथलगत अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने रांगेत पार्क केली होती. मोकळ्या रस्त्यावर ट्रॅक सुट आणि स्पोर्टस शुज परिधान केलेले पुरुष आणि महिला तलावावरून येणारे थंड प्रसन्न वारे अंगावर घेत मॉर्निंग वॉक करीत होते. एकत्र मॉर्निग वॉक करणाऱ्या मित्रांचा समुह हास्यविनोद करीत चालला होता. तर एकटे
फिरणारे काही जण कानात इअर फोन लाऊन संगीताचा आनंद घेत होते. काही मध्यमवयीन जोडपीही संसाराच्या सुखदु:खाची चर्चा करीत फिरत होती. काही विशी-बावीशीचे तरुण जॉगिंग करीत होते. इतक्‍यात डोक्‍यावर हेल्मेट लावलेला तरुण-तरुणींचा घोळका मोकळया रस्त्यावर रेसिंग सायकल दामटत पुढे निघाला.
तलावाच्या विरुद्ध दिशेला असलेले हॉटेल्स, फास्टफुड-जंकफुडचे ठेले, आईस्क्रीम पार्लरस अजून बंद होते. रात्री उशीरापर्यंत ग्राहकांना सेवा दिल्याच्या खुणा हॉटेल्स आणि ठेल्यांच्या आजूबाजूला विखुरल्या होत्या. रस्त्यालगतच्या कचराकुंड्या भरून वाहात होत्या. माणसांनी रात्री पोट भरल्यावर अर्धवट खाऊन टाकलेल्या खाद्‌पदार्थांवर सकाळी उपाशी कुत्री ताव मारत होती. चहाचे एक-दोन ठेले मात्र ग्राहकांच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या तयारीत होते. चहावाल्याने जोर लावत स्टोव्हला पंप मारला आणि चहाचे आधण ठेवलेला स्टोव्ह धगधगु लागला. पाण्याला उकळी आली तशी चहावाल्याने स्वच्छ धुतलेल्या ठेल्यावर ओळीने रचून ठेवलेल्या डब्यातील चहा-साखर त्यामध्ये घातली. आणि विशिष्ट रिदम निर्माण करीत तो खलबत्त्यात आले आणि विलायची कुटू लागला. दुसऱ्या स्टोव्हवर मोठ्ठे पातेले ठेऊन त्याने त्यामध्ये झोकात दुधाचे पुडे रिकामे केले. कुटलेले आले आणि विलायची चहामध्ये टाकताच चहाचा सुगंध दरवळला. मोठ्ठ्या पळीने तो चहा जसजसा ढवळू लागला तशी मॉर्निंग वॉक करणारी गर्दी ठेल्याभोवती गोळा होऊ लागली. रोजच्या गिऱ्हाईकांशी चहा गाळता-गाळता त्याच्या गप्पाही रंगल्या. ऍल्युमिनीयमच्या स्वच्छ केटलीतून त्याने चहा पेल्यांमध्ये ओतला आणि पायी फिरून दमलेली चहाची दर्दी गर्दी घाम पुसत त्या अमृततुल्य चहाचा आस्वाद घेऊ लागली.
चहाच्या ठेल्याजवळून तलावाचा नजारा रमणीय दिसत होता. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात तलावातले पाणी चमकत होते. आपल्या पिलांसह बदके जलविहार करीत होती. हिरव्या लुसलुशीत पानांवर उमललेली पांढरी कमळे तलावाचे सौंदर्य वाढवित होती. काठावरच्या दगडी भिंतीवर काही मासेमार पाण्यामध्ये गळ टाकून बसले होते.
काठाच्या आजुबाजुला मात्र प्रचंड घाणीचे साम्राज्य होते. काठालगत पाण्यात कचरा साचला होता. पाण्याला दुर्गंधी येत होती. काठावर दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. एक मनपा कामगार हातात लांब झाडू घेऊन परीसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत होता. हजारो हातांनी केलेली घाण दोन हातांनी स्वच्छ करणे केवळ अशक्‍य आहे. जबाबदार आणि सुजाण नागरिकांना कधीतरी याचे भान येऊन सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता नाहीशी होईल, या आशेसह.

मन्वंतर काळाचे चित्रण करणारी वंशवृक्ष

स्वाती हुद्दार

सनातन धार्मिक परंपरा आणि मन्वंतर काळातील बदलती जीवनमूल्य यांच्या मंथनात घुसळल्या गेलेल्या मानवी भावभावनांच्या संघर्षाचे अत्यंत तरल चित्रण वंशवृक्ष या डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबरीत दिसते. या कादंबरीचे नायक श्रीनिवास श्रौती वेदविद्यापारंगत तर आहेतच, त्याशिवाय जीवनमुल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. सुखदु:खे समेकृत्वा हा भगवद्‌गीतेतील उपदेश त्यांनी अंगी बाणवला आहे. पूर्वजांच्या अमाप संपत्तीचा उपभोग आवश्‍यकतेपुरता घेऊन समाजातील गरजुंनाही त्या संपत्तीचा लाभ देण्याचा ते प्रयत्न करतात. व्रतस्थ जीवन अंगिकारलेल्या श्रौतींनी एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनाचे दु:खही त्यांना साजेशा धीरोदात्तपणे सहन केले आहे. मुलगा कर्ता झाल्यानंतर निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे मन मुलाच्या मृत्युनंतर परत कर्तव्य भावनेने त्यांनी संसाराकडे वळविले.
परंपरा, पुवर्जांचे ऋण, श्राद्धकर्म, वेदाध्ययन यांचे स्वत: कठोरपणे पालन करणारे श्रौती मुलाच्या मृत्युनंतर सुनेच्या केशवपनासाठी आग्रह धरीत नाहीत. एवढेच नव्हे तर तिच्या पुढच्या शिक्षणाला मान्यता देतात.
कात्यायनी पुनर्विवाहाचा निर्णय त्यांच्यापुढे जाहीर करते, तेव्हा वंश, त्यागावर आधारलेला सनातन धर्म आणि स्वत्व, स्वकेंद्रीत व्यक्‍तिनिष्ठ बदलती जीवनमुल्य यांचा सुप्त संघर्ष यातील भेद ते तिच्यापुढे उलगडतात. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता श्रौती त्यांच्या सुनेला मन, भावना, शरीर यापलिकडे पाहणाऱ्या मुल्यांचा उपदेश करतात आणि निर्णय तिच्यावर सोपवतात. आणि तिचा निर्णय अत्यंत संयतपणे स्वीकारतात. सगळ्या आशा आपल्या नातवावर केंद्रीत करून पुन्हा मार्गक्रमण करीत राहतात.
भावना आणि शरीराच्या हाकेला ओ देऊन पुनर्विवाह करणारी कात्यायनी मात्र तो भर ओसरल्यावर परंपरा आणि व्यक्‍तिस्वातंत्र्य या द्वंद्वात भरडली जाते. पापपुण्य संकल्पनांच्या मानसिक द्वंद्वात अडकलेल्या कात्यायनीचा अत्यंत करुण शेवट होतो.
मन्वंतर काळातील पिढीचे कात्यायनी प्रतिनिधित्व करते. प्राप्त परिस्थिती आहे तशी स्वीकारणारी नागलक्ष्मी कर्तव्यनिष्ठेने जीवनाला सामोरी जाते. संशोधन हेच आपले जीवितकार्य मानणारे सदाशिवराव कर्तव्य, भावना यांच्या पलिकडे आहेत. जीवनावर भरभरून प्रेम करणारा राज आधुनिक पिढीचे प्रतिनिधित्व करतो. संशोधन कार्याच्या निमित्ताने सदाशिवरावांशी विवाहबद्ध झालेली आणि स्वत:च्या हक्‍कांविषयी अत्यंत काटेकोर असलेली करुणारत्ने नागलक्ष्मीवर आणि तिच्या मुलावर मात्र सहज अन्न्याय करते.
आयुष्यभर जोपासलेली परंपरा, वंशाभिमान याचा पायाच पोकळ असल्याचे सत्य आकळल्यानंतर आतल्याआत दुभंगलेले, कोलमडलेले श्रीनिवास श्रौती त्यांच्या प्रगल्भ व्यक्‍तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने त्यातून सावरतात आणि एकुलत्याएक नातवाच्या संमतीने वडिलोपार्जित संपत्तीचा त्याग करून संन्यास स्वीकारतात. दोन पिढ्यांमधील बदलत्या जीवनमुल्यांची मुक साक्षीदार म्हणजे श्रौतींच्या घरची मोलकरीण लक्ष्मी.
मुलावर अधिकार कुणाचा, जन्मदात्या आईचा की त्याच्या वंशाचा, हा महाभारतकालिन सनातन संघर्ष बदलत्या काळाच्या पार्श्‍वभुमीवर एका कुटुंबकथेच्या निमित्ताने डॉ. भैरपांनी अत्यंत संयतपणे चितारला आहे. विधवा विवाह, आई-मुलाचे नाते, त्याला असलेला कायद्याचा आधार, एक पत्नी असतानाही केलेला दुसरा विवाह आणि परंपरेचा पगडा असलेल्या स्त्रीने पतीच्या दुसऱ्या विवाहाला दिलेली मुक संमती असे अनेक पैलू या कथेत येतात. इंग्रजी भाषा, साहित्य, पुरोगामित्व त्यानिमित्ताने भारतीय जीवन व्यवस्थेतही रुजत जाणारी पाश्‍चात्य मुल्य, त्यांचा स्वीकार, अस्वीकार याचा उहापोह या कादंबरीत येतो. डॉ. भैरप्पांच्या सिद्धहस्त लेखणीचे प्रत्यंतर, त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास, त्यावरील निष्ठा याचे दर्शन ठायी ठायी घडते.
पाश्‍चात्य साहित्य, विचारधारा, जीवनमूल्य, यांचा प्रभाव असणारी पण जुन्या परंपरा, धर्मनिष्ठा यांचेही जोखड झुगारून देण्याची हिंमत नसणारी संक्रमण काळातील पिढीचे नेतृत्व करणारी कात्यायनी हरली की धर्मनिष्ठा, परंपरा, वंशवृद्धी आणि त्यागमय जीवनाचा पुरस्कार करणारे श्रीनिवास श्रौती हरले, याचा निर्णय वाचकांनी घ्यावा.
डॉ. भैरपांच्या कादंबरीच्या कथावस्तुला कुठेही धक्‍का न लावणारा अत्यंत सरस अनुवाद उमा कुळकर्णी यांनी केला आहे.


Monday, 3 July 2017

सकाळचे नागपूर


@रेल्वेस्थानक

प्लॅटफॉर्म क्रमांक 8, वेळ पहाटे 4.30

स्वाती हुद्दार

एरवी चालणेही कठीण जावे, इतका गजबजलेला संत्रा मार्केटचा रस्ता, चुकार वाहन आणि एखाद-दुसरा पादचारी वगळता शांत होता. रेल्वे स्थानकाबाहेर ऑटोंची रांग आणि गाडी यायला वेळ असल्यामुळे ऑटोच्या मागच्या सीटवर पेंगुळलेले ऑटो चालक. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला पार्किंग. तिथल्या पोऱ्यानी दोन खुर्च्या एकमेकांना जोडून त्यावरच ताणून दिलेली. गाडीचा आवाज ऐकून तारवटलेल्या डोळ्यांनीच गाडी यहा नही वहा लगाओ, ऐसी काटो, आगे लो पिछे लो, त्याच्या आदेशवजा सुचना. पार्किगच्या बाजुला वळकट्या डोक्‍याशी घेऊन निजलेले भिकारी. त्यांच्यातून वाट काढत प्लॅटफॉर्म गाठण्याची कसरत. आत शिरल्याबरोबर विशिष्ट कुबट वास नाकात शिरला. तिथले रेल्वेचे मोठ्ठे पांढरे घड्याळ 4.35 ची वेळ दाखवत होते. रेल्वेच्या बाकड्यांवर काही प्रवासी सामानसह दाटीवाटीने बसले होते. सामान आणि दोन छोट्या मुलांसह एक जोडपे घाईघाईने आत आले. छोट्या बाळाला आईने कडेवर घेतले होते. दुसऱ्या हाताने बॅग खेचताना तिची तारांबळ उडत होती. वडीलांच्या हाताला धरून अर्धवट झोपेत असलेला थोरला कसाबसा चालत होता.
झोपाळलेल्या डोळ्यांनी चहाच्या बुथचा पोऱ्या दुकानाचे शटर उघडत होता. शटर उघडून त्याने माझा, कोला, सोयामिल्कचे क्रेट बाहेर काढून दुकानातली गर्दी कमी केली. दुकानातले दिवे उजळले. चहाचे मशीन सुरू केले. बाजुचे बुक काऊंटर मात्र बंद होते. दुकानाच्या शटरसमोर एका फळीवर मळकट चादर टाकून दुकानातला पोऱ्या झोपला होता.
इंडिकेटरवर गाडीची वेळ आणि डब्यांची पोझिशन दिसू लागली. जोडीला यात्रीगण कृपया ध्यान दे अशी अनाऊंसमेंट सुरू झाली. थोडे आधी पोहोचलेले आणि बाकड्यांवर स्थिरावलेले प्रवासी सावध झाले. काही प्रवासी धावतपळत प्रवेश करत होते. दूरून गाडीचे दिवे दिसू लागताच प्लॅटफॉर्मला गती आली. हळूच गाडीने प्रवेश केला आणि वातावरण सजीव झाले. आत शिरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची एकच हुल्लड माजली. गाडीतून बाहेर पडलेले प्रवासी झोपाळलेल्या डोळ्यांनी आपले सामान तपासू लागले. त्यातच चाय गरम चाय च्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. थंडे पानी की बोतल म्हणणारे पोरे इकडेतिकडे धावू लागले. त्यांच्याकडून पाणी बोतल किंवा चहा घेऊन गाडी सुटण्याच्या आत त्यांच्याशी पैशाची देवाण घेवाण करण्याची कसरत प्रवासी करीत होते. जनरल डब्यातील मंडळी प्लॅटफॉर्मच्याच नळावरून घाईघाईने पाणी भरत होती. तेवढ्यात गाडी सुटण्याची शिटी झाली आणि एकच पळापळ करीत मंडळी गाडीत शिरली. कुणी धावत गाडी गाठली. सोडायला आलेले निरोपाचे हात हलले आणि गाडीने वेग घेतला. प्लॅटफॉर्म परत ओस, शांत.
हळूहळू पुढच्या गाडीचे प्रवासी प्लॅटफॉर्मवर येऊ लागले. पुन्हा तिथले बेंच माणसांनी भरले. एक आंधळा भिकारी एकतारीवर सूर छेडत भजन गात होता. कुणीतरी त्याच्या दिशेने नाणे फेकले. नाण्याच्या आवाजाने त्याने गाणे थांबवले आणि तो आंधळा भिकारी नाण्यासाठी जमिन चाचपडू लागला. त्याची ती तगमग बघून बेंचवरचे प्रवासी कुत्सित हसू लागले. सकाळचे साडे पाच वाजले होते. बाहेर हळूहळू उजाडू लागले होते. त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातला आणि त्याच्यावर हसणाऱ्यांच्या मनातला अंधार मात्र तसाच कायम होता.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह