आता तो येत नाहीस्वाती हुद्दारसंध्याकाळची वेळ. सेलफोनची रिंग वाजली. तिचा अंदाज खरा होता. फोन त्याचाच होता. तिनं फोन घेतला."मी ऑफीसच्या खाली उभा आहे. ये खाली. चहा घेऊया.' "नको, मी मीटिंगमध्ये आहे.' "काही हरकत नाही. उद्या येतो.' तिनं नाखुशीनंच हो म्हटलं आणि आता उद्या न भेटण्याचं काय कारण सांगायचं, याचा मनोमन विचार करू लागली. हा संवाद नेहमीचाच. तिचं भेट टाळणं आणि त्याचं न कंटाळता पुन्हा पुन्हा भेटायला येणं. अलीकडे तिला कुणाशीच बोलणं नको वाटायचं. कुणात मिसळणं तिनं सोडूनच दिलं होतं. किती दिवसांत काही नवं लिहायला तिनं पेनही हातात घेतला नव्हता. तिनं स्वत:भोवती एक कोश निर्माण केला होता. बाकी जगाला तिच्या या अवस्थेशी काही देणंघेणं नव्हतं. तिच्या आजूबाजूच्या जगाचं रहाटगाडगं व्यवस्थित सुरू होतं. त्यानं मात्र तिला यातून बाहेर काढण्याचं मनोमन ठरवलं होतं. तिला रोज फोन करणं, जमेल तेव्हा भेटायला जाणं, त्यानं सुरूच ठेवल होतं. तिची न भेटण्याची कित्येक खोटी कारणं पचवूनही तो येतच राहिला. सतत. अविरत. कधी सुरू झाली ही जगावेगळी विलक्षण मैत्री? नेमकं आठवत नाही; पण तिनं सहज कागदावर खरडलेली दोन-चार अक्षरं त्यानं वाचली आणि तो फिदा झाला. तो स्वत: प्रथितयश साहित्यिक होता. त्याच्या शब्दांमागे प्रचंड साधना होती. आयुष्याच्या भट्टीत तावूनसुलाखून निघालेल्या शब्दांचं संचित त्याच्या साहित्यात जागोजागी विखुरलं होतं. जागतिक साहित्याचा त्याचा अभ्यास त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असे. ती मात्र स्वान्त सुखाय काहीतरी खरडायची आणि मनात आलं तर ते कागद चुरगळून फेकूनही द्यायची. असंच काही त्यानं वाचलं आणि तिला लिहितं करण्याचं त्यानं ठरवलं. हळूहळू त्यांच्या साहित्यिक चर्चा रंगू लागल्या. वाचन, लेखन, चर्चा आणि चहा. चहा, हो त्याला लेमन टी आवडायचा. दिवसेंदिवस त्यांची गप्पाष्टक रंगायची. साहित्यिक गप्पांबरोबर ती दोघं त्यांची सुखदु:खही वाटून घेऊ लागली. घट्ट विणींचं अतूट नातं त्यांच्यात निर्माण झालं. एक निनावी नातं. निरपेक्ष नातं. राग-लोभ, अपेक्षांच्या पलीकडचं. एक अक्षर नातं. दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे गेली. दोघांच्याही जीवनात अनेक चढउतार आले. दोघेही एकमेकांबरोबर उभे होते. मात्र तिच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली न कळे. तिच्या संसारात संकटांची मालिकाच उभी राहिली आणि मुळातच संवेदनशील असलेली ती कोलमडली. संकटांशी लढता लढता विझत गेली. रोजचं रहाटगाडगं सुरूच होतं, कर्तव्य म्हणून ती सगळं पार पाडत होती. ती मात्र त्यात कुठेच नव्हती. मैत्र जुळले तेव्हापासून तिच्या प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी तो हुकमाचा एक्का म्हणून कायम उभा होता. ती मात्र थकली होती. तिला कोणाचीच सहानुभूती नको होती. तिला कुणाशीच बोलावसं वाटेना. अगदी त्याच्याशीसुद्धा. त्याला हे कळत होतं. तिचं त्यालाही टाळणं त्याला उमजत होतं. तरीही त्यानं त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. तिला यातून बाहेर काढायचंच, असा त्यानं मनोमन निश्चय केला आणि तो येत राहिला... ...आणि एक दिवस अचानक त्याचं येणं बंद झालं. आठवडा, पंधरा दिवस...जवळपास महिना. तो आलाच नाही. त्याचा फोनही नाही. त्याचं येणं नको आणि त्याला भेटणंही नको, असं वाटत असतानाही ती त्याची वाट बघत होती. शेवटी न राहवून तिनं फोन केला. फोनवर एक अपरिचित आवाज. तिनं त्याची चौकशी केली. त्या अपरिचित आवाजानं तो आजारी असल्याचं सांगितलं. तिला स्वत:चाच राग आला, लाजही वाटली. तो बरा झाला की आता त्याला दुखवायचं नाही. पुन्हा आधीसारख्या खूप गप्पा मारायच्या. खूप वाचायचं, लिहायचं आणि त्याच्याबरोबर टपरीवर जाऊन लेमन टी ही घ्यायचा. तिनं मनाशी पक्क ठरवलं. ती एक दिवसाआड फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागली. प्रत्येकवेळी कुणीतरी तिसरीच व्यक्ती फोनवर... आणि तब्येतीविषयी काहीतरी गंभीर. ...आणि एक दिवस तो गेल्याची बातमी. ती मुकी. संवेदनाहीन. अजूनही रोज सूर्य पश्चिमेला कलतो. संध्याकाळ झाडांवर उतरते. मात्र तो येत नाही. त्याचा फोनही येत नाही. | |||