रंगकांड्या
माणसंही असतात रंगीतघासून घासून झिजलेल्या
वापरून वापरून तुटलेल्या
रंगपेटीतल्या रंगकांड्यांसारखी
काही मेणकांड्यांसारखी
कितीही घासली तरी
न उमटणारी
असून नसल्यासारखी
तर काही असतात
तेलकांड्यांसारखी
रंगरेषांच्या उभ्या आडव्या
डार्क फटकाऱ्यांसारखी हटवादी
त्या कौलारू घरात
होती अशीच म्हातारी विरळ केसांची
काटेसावरीच्या पुंजक्यासारखी पांढरी
होता एक म्हातारा
खोकून खोकून छातीचा खोका झालेला
गडद होत जाणाऱ्या धुसर संध्याकाळसारखा
होता एक कर्ताही
ओढगस्तीचं जीणं जगताना
पोपडे उडालेल्या रंगहिन भिंतीसारखा
एक होती घरधनीण
शेणानं लिंपलेल्या अंगणात रेखलेल्या
हळदीकुंकवाची बोटं ल्यालेल्या
सुबक रांगोळीसारखी
आणि होती काही चिल्लीपिल्ली
विषामृत म्हणत
अंगणभर उंडारणारी
कोवळया हिरव्या लुसलुशीत पालवीसारखी
रंगकांड्यांचा डबा घेऊन
डोंगर-दऱ्या, सूर्य झाडं रेखणारी
त्या चित्रांमध्ये हवे ते रंग भरणारी
केशरी, हिरवा, निळा, लाल
कारण त्यांच्या लेखी नव्हतेच लेबल कुठल्याही रंगावर
जातीचे, धर्माचे, राजकारणाचे
एक दिवस त्यांच्यातल्या लहानग्याने
पांढऱ्या कागदावर एक फुलपाखरू रेखले
त्याच्या नाजुक इवल्याला पंखांमध्ये
रंगपेटीतले झाडून सगळे रंग भरले
आणि काय आश्चर्य
ते फुलपाखरू चक्क आकाशात उडाले
त्या रंगपेटीमध्ये नव्हतीच
सोनेरी रंगाची रंगकांडी
त्यामुळे तिथल्या कुणाच्याच मनाला
सोनेरी स्वप्नं शिवलीच नाहीत
मात्र त्या घराला होता
एक अंधारा माळा
रंगकांड्यातल्या काळ्या रंगकांडीसारखा
आणि त्या माळ्यावरच्या मळकट गाठोड्यात
बंदिस्त होती त्या सगळ्यांची नशीब
रंगकांड्यांच्या कागदी खोक्यातल्या
कप्प्याकप्प्यांमध्ये दाटीवाटीनं
घुसडलेल्या रंगकांड्यांसारखी
सटवाईनं पाचवीलाच त्यांच्या कपाळावर कोरलेली
त्या सटवाईच्या मनाचा रंग कोणता असेल?
गर्द जांभळा की करडा?