मल्हारस्वाती हुद्दारआज तो पुन्हा कोसळतोय धुवाधार. उर फुटून दु:ख झरावं तसा. तिच्या विशाल उबदार कुशीत ती सामावून घेते आहे त्याच्यासह त्याचं कोसळणं. तिचं मूक सांत्वन आणि त्याचा आवेगी आकांत.अशा भरून आलेल्या रित्या संध्याकाळी मग एकटेपण अधिकच प्रकर्षानं जाणवू लागतं. हा झरणारा पाऊस कोणाशी तरी शेअर करावासा वाटू लागतो. आजूबाजूला खूप गर्दी आहे चेहऱ्यांची; पण हा कोसळणारा पाऊस मनात रुजावा, असं मृदू मन असलेला एकही चेहरा तिथे नाही. सगळेच चेहरे कोरे. हात सेलफोनकडे वळले. बोटं सवयीनं कॉन्टॅक्ट लिस्ट सर्च करू लागली. मात्र मन एकाही नावाशी थांबलं नाही. कुणाशीच हा पाऊस वाटावासा वाटला नाही. आताशा असं का होतं? हे एकटेपण सगळं विश्व व्यापून पुन्हा दशांगुळे उरतंच. पावसाचा दु:खाचा आवेग आता जरा ओसरला आहे. पाऊसधारांपलीकडच्या अस्पष्ट टेकड्या नजरेच्या टप्प्यात येत आहेत. या टेकड्यांपलीकडे असेल का कुणीतरी पाऊस समजून घेणारा. कदाचित ते गावच असेल पाऊसवेड्या ओलेत्या मनांचं. पाऊसवेड्या मनाची माणसं असली की जमिनीतून तरारून येणाऱ्या हिरव्या अंकुरांसह त्या मनांनाही फुटतात आशाआकांक्षांचे धुमारे. ती वेडी माणसं गाऊ लागतात सृजनाचं गाणं, सुरांच्या हिंदोळ्यावर झोके घेत. ती सुरावट खूप ओळखीची वाटते. अगदी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी. मन आणि कान तृप्त करणारी. जीवनाशी नातं सांगणारी. आभाळातून कोसळणारा पाऊस मग डोळ्यातून झरू लागतो. झरणाऱ्या डोळ्यांमुळे सगळंच अस्पष्ट भासू लागतं. मनात मात्र मल्हारचे सूर घुमू लागतात. सखी सावन आये कंत नैय्या मोरा मन अकुलाए रिमझिम बादर बरसन लागी मोरा मनवा तरसावे युगामागून युगं उलटली. तानसेनचा मल्हार तेव्हापासून श्रांत क्लांत करतोय युगंधरेला. मल्हारच्या सुरावटीत भिजलेला पाऊस कधी झरतो शांत धीरगंभीर स्वरातून, कधी झंकारतो सतारीच्या तारांतून, तर कधी वेड लावतो वेळूच्या बासरीतून. माणसांच्या गर्दीतही एकट्या पडलेल्या या जिवाला हे सूर मग अलगद मिठीत घेतात. हलकेच जोजवतात. सुरांच्या साथीनं पाऊस आत आत झिरपत जातो. अंतर्बाह्य चिंब करतो. बाहेर धारांचा पाऊस आणि आत सुरांचा. ढगांनी झाकोळलेलं आभाळ अलगद मोकळं व्हायला लागलयं. पाऊसधारांनी चिंब झालेली संध्याकाळ सूरमयी झाली आहे. मल्हाराच्या सुरांमध्ये न्हाऊन चिंब झालेल्या सुरावटीत एकटेपणाची भावना विरघळून गेली. लख्ख वीज चकाकली. आपलीच आपल्याला ओळख पटली. युगानुयुगं मीच तर व्यक्त होतेय, कधी धीरगंभीर स्वरातून, कधी सतारीच्या झंकारातून, कधी बासरीच्या सुरावटीतून. आभाळातून वसुंधरेवर अलगद उतरणारी पाऊसधार म्हणाली सो$$$हम. युगानुयुगं छेडलेली मल्हारची सुरावट मीच. जिच्यासाठी कृष्णानं बासरीत श्वास फुंकला ती राधाही मीच. गोकुळही मीच आणि मल्हारच्या हाकेला ओ देत धरेवर कोसळणारा पाऊसही मीच. सोऽऽऽहम. | |||