Powered by Blogger.

Tuesday, 21 September 2021

 मै आज तुमको न जाने दुंगी...
स्वाती हुद्दार ©
गुरूदत्त हिंदी चित्रसृष्टीला पडलेलं एक मखमली पण अधुरं स्वप्न. गुरुदत्तच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झालेल्या सिनेमांमधला एक म्हणजे साहिब बिवी और गुलाम.
हिंदी सिनेमातलं महाकाव्य असं या सिनेमाचं वर्णन केलं जातं, या सिनेमात छोटी बहुच्या तोंडी एक आर्जवी गीत आहे. पतीच्या सहवासासाठी आसुसलेली बडी हवेलीतली सोज्ज्वळ, सुस्वरुप छोटी बहु पतीला रोखण्यासाठी त्याची मनधरणी करते.
ना जाओ सैया छुडा के बैया
कसम तुम्हारी मै रो पडुंगी
छोटी बहु पतिव्रता आहे. पतीचं सुख, त्याचा सहवास हेच छोटी बहुचं सर्वस्व आहे. त्यानं आपल्या जवळं थांबावं, आपल्याला सेवेची संधी द्यावी, एवढी एकच छोटी बहुची जीवनेच्छा असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. पतीचा सहवास लाभावा, यासाठी ती भुतनाथकडून सिंदुर मागवते. त्यासाठी दारूही पिते. गाणं गाते. मात्र बाहेरख्यालीपणा करण्यातच पुरुषार्थ मानणाऱ्या जमीनदारी मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या छोटे सरकारला बायकोच्या पदराला बांधुन राहणे मंजुर नाही, ते छोटी बहुचं आर्जव नाकारतात, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी छोटी बहु हे गीत गाते. नवऱ्याला रिझवण्यासाठी ही खानदानी पत्नी अभिसारिकेच्या अभिनिवेशात त्याची मनधरणी करताना म्हणते,
ये बिखरी जुल्फें ये खिलता गजरा
ये महाकि चुनरी ये मन की मदिरा
ये सब तुम्हारे लिए हैं प्रीतम
मैं आज तुम को न जाने दूँगी
जाने न दूँगी
खरं तर बड्या हवेलीत पतीचा बाहेरख्यालीपणा भूषण मानला जाण्याची रित आहे. तिथल्या इतर बहुंनी हे प्राक्तन मान्य केलं आहे. पतीभक्ती आणि वाट्याला आली तर पती सेवा आनंदानं विना तक्रार करायची. हे या हवेलीतल्या महिलांनी स्विकारलं आहे. मात्र छोटी बहु त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. तिची पतीभक्ती केवळ संस्कारातून आणि परंपरेतून आलेली नाही. नवऱ्यावर प्रेम करणं ही तिची स्वाभाविक उर्मी आहे. आपल्या बदफैली नवऱ्यामध्ये ती भावनिकरित्याही गुंतली आहे. छोटे सरकारला मात्र तिच्या प्रेमाची जाणिवही नाही, आणि त्याच्याशी काही देणेघेणेही नाही. तिचे स्वर्गीय सौंदर्यही त्यांच्या लेखी नगण्य आहे. त्याचे त्यांना तसुभरही आकर्षण नाही. लग्नाच्या बायकोला अशीच यकश्चित वागणुक द्यायची असते, हाच रिवाज त्यांना माहिती आहे. प्रेम, भावना या सगळ्याशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पतीच्या आग्रहाखातर नशा करणारी, ये महकि चुनरी मन कि मदिरा म्हणणारी छोटी बहु फार काळ अभिसारिकेच्या भुमिकेत राहू शकत नाही, ती पुन्हा छोटे सरकारच्या पत्नीच्या भूमिकेत येते आणि म्हणते,
मैं तुम्हारी दासी जनम की प्यासी
तुम ही हो मेरा सिंगार प्रितम
तुम्हारे रास्ते की धूल ले कर
मई मांग अपनी सदा
सदा भरुँगी
पत्नी ही पतीच्या पायाची धुळ आहे, असे मानणाऱ्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी छोटी बहु त्या पेक्षा वेगळी नाही. पतीची दासी असण्यात तिला काही वावगंही वाटत नाही. पतीला रिझवतानाही तिच्यातली कुलीन स्त्री या ओळींमधून दृष्टीगोचर होते. पतीसाठी केलेला श्रृंगार, त्याच्यासाठी भांगामध्ये भरलेलं कुंकु, या सगळ्याचे दाखले नकळत तिच्या आर्जवामध्ये गुंफले जातात. तिचा पती तिचा प्रीतम आहे. प्रियकर आहे. हे सुद्धा ती अलगदपणे त्याच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र हे मनाच्या पातळीवरचे व्यवहार छोटे सरकारच्या गावीही नाहीत. पिढी दर पिढी चाललेल्या रिवाजानुसार गाणारीच्या कोठ्याच्या पायऱ्या झिजवायच्या. त्यांच्यावर दौलत उधळायची. मदिरा आणि मदिराक्षी हिच इतिकर्तव्यता मानणाऱ्या छोटे सरकारला छोटी बहुचं तरल मन, त्यातल्या अलवार भावना कळणंही शक्य नाही. छोटी बहुची गुंतवणुक मानसिक आहे. भावनिक आहे. मात्र पैशाच्या जोरावर दोन घटका सुख विकत घेणाऱ्या छोटे सरकारला हे मानसिक पातळीवरचे व्यवहार कसे कळणार?
छोट्या बहुच्या या कोणत्याच आर्जवाकडे तिच्या पतीचं लक्ष नाही. त्याला तिची ब्याद कशीतरी टाळायची आहे. तिची हळवी विनवणी त्याच्या कानावर तर पडते आहे, मात्र मनापर्यंत पोहोचत नाही. सगळे उपाय थकल्यावर शेवटी छोटी बहु छोटे सरकारला निर्वाणीचं सांगते.
जो मुझ से अखियाँ चुरा रहे हो
तो मेरी इतनी अरज भी सुन लो
तुम्हारे चरणों में आ गई हूँ
यहीं जियूँगी यहीं मरूँगी, यहीं मरूँगी
तुम्ही मला कितीही नाकारलंत, तरी मी आता तुम्हाला सोडणार नाही. तुमची पावलं हेच आता माझं सर्वस्व आहे. मी तुमच्या पायाशीच जगणार आणि इथेच मरणार. छोटी बहुचं जगणं, तिचं मरणं, किंबहुना तिचं अस्तित्व या सगळ्याला त्या बड्या हवेलीतल्या छोटे सरकारच्या लेखी काहीही महत्त्व नाही. छोटी बहुशी लग्न हा त्यांच्यासाठी केवळ उपचार होता. बड्या हवेलीची शोभा वाढवणारी एक जिवंत शोभेची वस्तु. एक हाडामासांची चालती-बोलती सुंदर आकृती. बड्या हवेलीचं बडप्पन जपणारी.एवढीच त्यांच्या लेखी तिची किंमत आहे. त्या जिवंत शरीरात एक हळंव मनही आहे. त्याला काही भावभावना आहेत, याची पुसटशी जाणिवही त्या नवरा नावाच्या प्राण्याला नाही. अशा भावनाहिन नवऱ्याला छोटी बहु सांगते, कसम तुम्हारी मै रो पडुंगी. त्याच्या दृष्टीनं जिचं अस्तित्वच कस्पटासमान आहे, तिथे तिच्या अश्रुंचं काय मोल? ती मात्र सांगतेय, मै आज तुमको न जाने दुंगी...जाने न दुंगी.
एवढ्या सगळ्या आर्जवानंतरही छोटी बहुचा नवरा तिचा हा लडिवाळ हट्ट झुगारून तिथुन निघुन जातो. गाणं संपतं. मात्र लक्षात राहतं ते छोटी बहुच्या रुंद कपाळावरचं ठसठशीत मोठ्ठ गोल कुंकू. आणि तिचे करुणार्द्र डोळे.
छोटे सरकारचं निघुन जाणं, हेच छोटी बहुचं प्राक्तन असतं आणि ही छोटी बहु अजूनही प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे. मन गुंतवून बसलेली. हळवी.वाट पाहणारी.आणि नजर उचलून पाहिलंत तर अनेक छोटे सरकारही दिसतील आजुबाजुला.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह