श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे
स्वाती हुद्दार
गंधभारित उत्फुल्ल सकाळ. आज शक्तिस्वरुपिणी जगन्मातेच्या नवरात्राचा
प्रारंभ. हळदी-कुंकवाच्या शुभ पावलांनी तिचं आगमन. चुन्यानं सारवलेल्या आणि
गेरुनं वेलबुट्टी रेखलेल्या स्वच्छ देवघरात नवधान्य रुजवलेल्या काळ्याशार
मातीवर मृण्मयी घटाची स्थापना. देवीतत्वाची स्थापना. त्यावर सोडलेली
पुष्पमाला. सगळं भक्तीमय.
दरवर्षी आम्ही हा नवरात्रोत्सव साजरा करतो. नवरात्रोत्सव म्हणजे
सुष्टांच्या दुष्टांवर विजयाचं प्रतीक. दुष्टांच्या निर्दालनासाठी
देवांच्या तेजातून जिची निर्मिती झाली ती आदिमाया. शुंभ, निशुंभ, रक्तबीज,
आदी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेनं चंडीचा अवतार घेतला आणि नऊ दिवस या
राक्षसांबरोबर युद्ध करून दशमीला तिनं अंतिम विजय संपादन केला. त्या
दुष्टांच्या निर्दालनाचं प्रतीक म्हणजे हा नवरात्रोत्सव. देवाधिदेवांनाही
ज्या दुष्टांचं निर्दालन करणं अशक्य झालं, ते कार्य चंडीनं केलं. त्यानंतर
जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं, दुर्जन शक्तीचं प्राबल्य वाढलं, तेव्हा
तेव्हा समाज त्या आदिशक्तीलाच शरण गेला.
सन १५०० चा काळ. यवनी राजवटीच्या जुलमानं सारी प्रजा त्रासली होती.
सज्जनांचा कोणीही वाली उरला नव्हता, तेव्हा संत एकनाथ महाराज त्या
जगत्जननीलाच शरण गेले.
हे माते, तुझ्या कृपेचं दार बंद झाल्यामुळे समाजजीवन विकारग्रस्त झालं
आहे. रामराज्य लयाला जाऊन राक्षसांचं राज्य उदयाला येत आहे. या विकारग्रस्त
समाजावर दुबळा शत्रूसुद्धा खूप वर्षे राज्य करीत आहे. तेव्हा तुझ्या
कृपेचं दार आता उघडलंच पाहिजे. म्हणून नाथ पुनःपुन्हा म्हणतात,
‘‘दार उघड बया आता दार उघड
अलक्ष पूर भवानी दार उघड
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड
तेलंग लक्ष्मी दार उघड
तुळजापूर भवानी दार उघड’’
आणि खरचं नाथांची आर्जवी विनवणी त्या जगत्जननीनं ऐकली आणि शिवबाच्या
रुपानं सज्जनांच्या रक्षणकर्त्यानं जन्म घेतला. आणि पुन्हा एकदा
सज्जनशक्तीचा विजय झाला.
या अनादी निर्गुण जगदंबेचा महिमा वेद-उपनिषदांनीही गायला.
पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व॥
असं तिचं वर्णन श्रीसूक्तात केलं आहे.
देवराज इंद्रानही महालक्ष्मीचा महिमा गाताना
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते
असं वर्णन केलं आहे.
तर आद्य शंकराचार्य
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि
हे माते आई, वडिल, बंधु, पुत्र-पुत्री हे कोणीही माझे नाहीत. मी केवळ तुला शरण आलो आहे. या अनन्य भावानं जगन्मातेला शरण गेले आहेत.
वेद-उपनिषदातील वर्णनानंतरही दशांगुळे उरलेल्या आदिमायेचं वर्णन मराठी
संतकवींनी त्यांच्या कवनांमधून करण्याचा प्रयत्न केला. नाथांचे नातू पंतकवी
मुक्तेश्वरांनी रचलेल्या आरतीतून
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
महालक्ष्मीचं असं वर्णन केलं आहे.
नरहरीने रचलेल्या देवीच्या आरतीत ते लिहितात, हे माते तुझे गुण गाताना
चारही वेद श्रमतात. इतकी तुझी लिली अगाध आहे. शेवटी भावव्याकुळ झालेले
नरहरी म्हणतात,
क्लेशापासून सोडी, दुःखापासूनी सोडवी
तोडी भवपाशा
हे अंबे तुझ्यावाचुन हा भवसागर पार करण्याची माझी इच्छा कोण पुरी करणार?
वेद-उपनिषदांमधुन आणि संत काव्यातून आलेल्या वर्णनाइतकंच
लोकवाड्.मयातून आलेलं देवीचं वर्णनही तितकच लोभस आणि भावपूर्ण आहे. जोगवा,
गोंधळ, डहाका ही खास महाराष्ट्रातली भक्ती प्रथा. देवीचे भुत्ये आणि गोंधळी
ही भक्तीरसप्रधान लोकगीतं गातात. यातील तत्वज्ञान वेदांताइतकच सखोल असतं.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥
आता साजणी साजणी झाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला मी संग ।
काम क्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग । सत्चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥
तुझ्या कृपेने आता कामक्रोधादी विकार सांडून मी सत् चित आनंदाचा अनुभव घेतो आहे. असं सांगणारा हा जोगवा वेद-उपनिषदांपेक्षा कमी नाही.
ही अनादी निर्गुण जगन्माता तिच्या भक्तांसाठी मात्र सगुण रुप धारण करते.
कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी |
नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी |
समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी |
शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी |
भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे
तिचं काव्यातुन येणारं अनुपम रुप भक्तांच्या ह्रदयात विराजमान आहे.
परमेश्वरीच्या परमतत्वाला सगुण साकार रुप देण्याची ताकद फक्त भक्ताच्या
भक्तीत आहे. शिवाची शक्ती असलेल्या आदीमायेचं वर्णन शिवाच्या आधी येतं.
दिव्यांबरायचं दिगंबराय म्हणताना आपण शिवाच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो.
घागर घुमु दे घुमु दे म्हणताना जन्म मरणाचे फेरे चुकविण्याचं मागणं आपण ज्या जगन्मातेकडे मागतो, ती सृजनाची शक्ती आहे.
नवरात्रीचा हा सोहळा नऊ रात्रींचा. पेरणी नऊ धान्याची. जलकुंभ मातीचा.
ही तर सृजनाची पुजा. स्त्रीत्वाची पुजा. या नवरात्रीनिमित्त प्रत्येक
स्त्रीच्या ठायी असलेल्या दैवी अंशाला, सृजनशक्तीला नमन करुया.
आणि त्या निरांजनी नारायणी परब्रह्म स्वरुपिणीला जगावरचं संकट दूर सारण्याचं साकड घालूया.