चला वसवुया नवी पृथ्वी
स्वाती हुद्दार
१९३५ ते १९४५. जर्मनीतील हिटलर युग. ज्युंचा प्राणान्तिक छळ. छळ
छावण्या, गॅस चेंबर, जीव जाईस्तोवर मारहाण, महिलांवर अत्याचार, अतोनात
कष्ट. जानेवारी १९३३ साली जर्मनीमध्ये ५ लाख ३३ हजार असलेल्या ज्युंची
संख्या १९४५ साली सोव्हिएत आर्मीनं बर्लिनमध्ये प्रवेश केला, तेव्हा केवळ ८
हजार इतकी उरली होती. कारण? केवळ आणि केवळ वंशभेद.
६ आणि ९ आॅगस्ट'१९४५.जागतिक इतिहासातले दोन काळे दिवस. अहिंसेचे बौद्ध
तत्वज्ञान अंगिकारलेल्या जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेचे
बॉम्बहल्ले. लाखो मृत्यूमुखी. हजारो अपंग, चेतनाहिन. कारण? जगावर हुकुमत
गाजवण्याची अवाजवी महत्त्वाकांक्षा.
आॅगस्ट १९४७. भारत स्वतंत्र, पण फाळणीची भळभळती जखम घेऊन. परिणिती
हिंदू-मुस्लिम दंगली. रक्ताचे पाट, प्रेतांचा खच, स्त्रियांच्या अब्रुची
लक्तरे, संपत्तीच्या हानीची तर मोजदादच नाही. ७५ वर्षांपूर्वी ओढलेल्या
विभाजनाच्या रेषेचे ओरखडे आजही मनामनांवर तेवढेच खोल, रक्ताळलेले, दुखरे.
त्याचे पडसाद अजूनही उमटतात अधूनमधून. कारण? धार्मिक द्वेष.
१२ मार्च १९९३. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट. २५७ जणांचा मृत्यू, हजारो जखमी.
सन २००० चा सुमार. अस्वस्थ मध्य-पूर्व आशिया. तालिबानी क्रुर राजवट. बॉम्बस्फोट, हिंसा, खून, उद्ध्वस्त जनमानस. सैरभैर मानवता, आजही
११ सप्टेंबर २००१. अमेरिकेतील न्युयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला. मृतांचा आकडा २ हजार ९९६, जखमींची संख्या २५ हजार.
२६ नोव्हेंबर २००८. मुंबईवर पुन्हा एक दहशतवादी हल्ला. या सगळ्यामागची कारणं? केवळ काही माथेफिरुंचा द्वेष.
ही यादी बरीच लांबवता येईल. कारण जगाच्या इतिहासात क्रौर्याची,
द्वेषाची पानेच सर्वाधिक आहेत. पृथ्वीवरील मानवाची उत्पत्ती त्याची
उत्क्रांती, त्याचं टोळीनं राहणं, समुहानं जगणं, प्रवास रानटीपणाकडून
माणूसपणापर्यंतचा. आधी मानवेतरांपासून वाचण्यासाठी संघर्ष, त्यातूनच
वर्चस्वाची लढाई, संघर्ष, युद्ध. पुढे बौद्धिक क्षमतेतून अग्नीचा शोध,
शेती, वसाहत अशी प्रगती. आणि पुढे वंश, जात, पंथ, वर्ण, धर्म, देश, प्रांत
ही विभागणी. त्यातुनच पुन्हा संघर्ष, चढाई, लढाई. ही प्रगती की
अधोगती?पुन्हा एकदा प्रवास माणुसपणाकडून पशुत्वापर्यंतचा.
अशावेळी माणसातलं माणूसपण जागवायला येतो अत्त दीप भवचे तत्वज्ञान घेऊन
दुःखितांच्या दुःखाने द्रवलेला आणि राजपाट सोडून सत्याच्या मार्गावर
निघालेला सिद्धार्थ गौतम बुद्ध. आणि त्याच्या पिंपळ छायेत येतात अनेक
चक्रवर्ती सम्राट लक्षावधी नरसंहाराने पश्चात्तापदग्ध झालेले, शांतीच्या
शोधात.
येतो एक महावीर अहिंसा आणि शांतीचे बीज पेरीत. येतो एक देवदुत क्रुसावर
चढवणाऱ्यांसाठीच परमेश्वराकडे दयेची याचना करणारा. पेरत जातो उजेड आपल्या
असंख्य अनुयायांसाठी. असतो कोणीतरी एकनाथ तप्त वाळवंटात तडफडणाऱ्या
गाढवाच्या मुखात गंगेची घागर रिती करणारा. असतो कोणी ज्ञानदेव रेड्या मुखी
वेद वदवत अद्वैत सिद्धांत सांगणारा.
असतो कोणीतरी कबीर
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।
म्हणणारा.
असतो एक महात्मा. अहिंसेने लढा देत दांडी यात्रा काढणारा, मीठाचा
सत्याग्रह करणारा, चले जावची चळवळ करीत इंग्रजांची सत्ता उलथवून
टाकणारा.आणि नौआखालीत हिंदू-मुस्लिम दंगे सुरू असताना भिंत होऊन उभा
राहणारा, आयुष्यभर अहिंसेची पुजा बांधणाऱ्या या महामानवाचा शेवट मात्र
हिंसेने व्हावा, केवढा हा दैवदुर्विलास.
अशा जगाविषयी कोणी साहिर लिहितो,
यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है
नकोच ही दुष्ट बेदरकार दुनीया.
चला, मानवतेवर प्रेम करणारे मुठभर आपण वसवुया नवी पृथ्वी, जिथे नसतील
धर्म, पंथ, जातींचे भेदाभेद, संघर्ष, स्पर्धा, चढाओढ, हार-जित. जिथे असेल
केवळ जीवांचे मैत्र, तिथे असतील अलांछन चंद्र आणि तापहिन मार्तंड. चला
निर्माण करुया असे एक आनंदवनभुवन.