मनभावन रविवार
स्वाती हुद्दार
शनिवारपासूनच रविवारचे रंग मनावर अलगद उतरत असतात. रविवारचे बेत
ठरवण्यात शनिवार कसा झरझर सरत जातो. एखाद्या शनिवारी मस्त भट्टी जमून येते
आणि खूप दिवसांपासून वेटिंगवर असलेली मुव्ही रात्री उशीरा बघण्याचा योग
जुळून येतो. दुसऱ्या दिवसाच्या धावपळीचे ओझे मनावर नसताना आवडत्या मुव्हीचा
आनंद घेणे किंवा घराच्या आवडत्या कोपऱ्यात बसून आवडते पुस्तक वाचत कॉफीचा
आनंद घेणे. सुख सुख म्हणतात ते हेच बहुदा. मध्यरात्र चढत जाते, तेव्हा मनात
पाहिलेल्या मुव्हीचे संवाद घोळवत किंवा वाचलेल्या पुस्तकातील ओळी आठवत
निद्रेच्या आधीन व्हायचे. रविवारी सकाळी अलार्म वाजणारच नसतो. त्यामुळे तो
दर पाच मिनटांनी स्नुझ करण्याची कटकट नसते. पाहिजे तेव्हा उठण्याचे आपणच
आपल्याला दिलेले स्वातंत्र्य असते. नव्हे जाग आल्यावरही रविवारचे सुख
अंगावर लपेटून अंथरुणात लोळत पडण्याची सुट असते, कारण आज असतो रविवार .
उठल्याबरोबर तारवटलेल्या डोळ्यांनीच पेस्ट ब्रशवर लावून खसाखसा दात
घासण्याची सक्ती आज नसते. उलट ब्रशवर पेस्टची कलात्मकतेने भरपूर रेष ओढत
अलगद ब्रश तोंडात घालून घरात किंवा अंगणात येरझारा घालत मनातल्या मनात
एखादी लकेर गुणगुणत केलेले दंतमार्जन म्हणजे रविवारचा शुभारंभ, त्यानंतर
गप्पांच्या मेजवानीसह घोट घोट चहाचा आनंद म्हणजे आहाहाच. रोज दहा काम आवरत
आणि दिवसभरातल्या कामांची यादी मनात घोळवत गारगुट्ट्या झालेला चहा एकाच
घोटात संपविण्याची दुःखद आठवणही आज नकोशी होते. चहानंतर आवडत्या गाण्याच्या
तालावर नाश्ता तयार होतो आणि गप्पांच्या मैफिलीत त्याचा फडशा पडतो.
रविवारचा आणखी एक आनंद म्हणजे मनसोक्त आंघोळ. रोजच्या धावपळीतल्या
बुडुबुडु गंगेचे उट्टे काढण्याचा दिवस. मनात आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत
असतात आणि अंगावर शॉवरमधल्या पाण्याचे कारंजे.
केस वाळवणं हा समारंभ आहे, हे रविवारीच आकळतं. एरवी आपल्याच केसांशी
आपले शत्रुत्व असावे तसे खसखस केस पुसुन हाताला येईल त्या क्लचरमध्ये ते
कोंबून वेळ मारावी लागते. रविवारी मात्र अलगद केसांची एकेक लड उलगडताना
इंदिराबाई आठवतात,
हेमंताचा ओढून शेला, हळुच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापील उंची पातळ ल्यावे
ग्रीष्माची नाजुक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर
गर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर
केस कोरडे करताना मनात उमललेल्या इंदिबाईंच्या कविता मग दिवसभर छान सोबत करतात.
एरवी रोजचे जेवण म्हणजे केवळ अन्न पोटात ढकलणे. अक्षरशः जाणिजे
यज्ञकर्म. रविवार त्याला अपवाद. रविवार म्हणजे आवडते पदार्थ चवीने खाणे आणि
जेवण झाल्यावर गप्पाष्टक हाकत ताटावरच हात वाळवत बसणे.
आता रविवारची मैफल ऐन मध्यावर आली असते. खूप दिवसांपासून ऐकायचा ठरवलेल्या किशोरीताईंच्या सहेला रे ने मनाचा ठाव घेतला असतो,
जनम-जनम को संग न भुले; अब के मिले सो बिछूड ना जाये!
सहेला रे, आ मिल गाये; सप्तसुरन की भेद सुनाये
माझ्यासाठी तर हा रविवारच सहेला असतो आणि अब मिले से बिछडू ना जाये हे आर्जव त्याच्यासाठीच करावसं वाटतं.
हळुहळु डोळ्यांवर पेंग येते. रविवारची पेंगुळलेली दुपार म्हणजे
सुट्टीच्या आनंदाचा परमोच्च क्षण असतो. त्या सुखनिद्रेनंतर हातात चहाचा कप
घेऊन अंगणातल्या झोपाळ्यावर बसून उतरत्या उन्हाचे कवडसे पहाणे, हा देखील एक
सुखसोहळाच.
हळुहळु आकाश केशरी होऊ लागते. घरा-दारांवर संध्याकाळ अलगद उतरू लागते.
अंगणातल्या जाई-जुई, चमेली फुलू लागतात. त्यांच्या सुगंधाने मनही गंधाळते.
दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या आठवड्याचे नियोजन नकळत मनात सुरू होते.
एका मनाजोग्या विश्रांत दिवसानंतर ताजेतवाने झालेले मन पुन्हा एकदा
कामाच्या रगाड्यात गुरफटुन जायला सज्ज झालेले असते. त्या मनाला प्रतीक्षा
असते पुन्हा येणाऱ्या पुढच्या रविवारची. श्रांत क्लांत होण्यासाठी.
कारण रविवार म्हणजे कौटुंबिक संमेलन
रविवार म्हणजे जिभेचे चोचले
रविवार म्हणजे सिनेमा-गाणे
रविवार म्हणजे गाता गळा
रविवार म्हणजे मित्रांचा मेळा
रविवार म्हणजे गुणगुणलेली लकेर
रविवार म्हणजे नॉट फिकर
रविवार म्हणजे श्रांत क्लांत
रविवार म्हणजे मस्त निवांत