चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम्
swati Huddar ©
मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे
न च व्योम भूमिर्न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम्
श्रावणातल्या सोमवारी पहाटे जाग यायची तिच बाबांच्या धीरगंभीर
आवाजातल्या आद्य शंकराचार्यांच्या निर्वाण षटकमनं. अंथरुणातच अंगाभोवती
स्तोत्राची लय लपेटून काही काळ पडून राहणं, खूप सुखावह वाटायचं. हळूच डोळे
उघडून इकडे-तिकडे नजर टाकली की जाणवायचं, श्रावण सोमवारच अस्तित्व घरदारावर
पसरलेलं आहे. श्रावणाच्या रेशमी सरींनी सुस्नात झालेला केशरी देठांचा
नाजुक प्राजक्त परडीत विसावलेला असायचा. जाई-जुई, चमेलीच्या सुगंधानं अवघं
घर कोंदलेलं असायचं. कोपऱ्यात बेलाच्या हिरव्यागार राशींनी जागा पटकावलेली
असायची. पुजेच्या साहित्यात सहाणेवर नुकत्याच उगाळलेल्या दाट भगव्या
चंदनाच्या तबकडीनं ऐटीत जागा पटकावलेली असायची. पाऊसधारांनी ओलसर झालेल्या
वातावरणात देवघरात लावलेल्या उदबत्तीचे सुगंधी आवर्त बेमालूम मिसळून
वातावरणाला सात्विक डुब आलेली असे. देव्हाऱ्याशेजारी तेवत असलेल्या
समईतल्या ज्योतीतून परमेश्वराची स्निग्ध कृपा पाझरत असायची. निर्वाणषटकमचा
अर्थ कळण्याचं ते वय नव्हतं, मात्र घरादाराला व्यापून राहिलेल्या त्या
सश्रद्ध आणि प्रसन्न लहरी माझ्याही मनाला व्यापून टाकत असतं.
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः
शिवमहिम्नाच्या तालबद्ध स्वरात स्फटिकाच्या शिवलिंगाला दुग्धाभिषेक व्हायचा आणि त्यावर केशरी गंध रेखलं जायचं.
श्रावणी सोमवारचं आणखी एक आकर्षण म्हणजे शाळेत जाण्याआधी चिनी मातीच्या
बशीत मिळणारी साबुदाण्याची उसळ आणि त्यावर पसरलेली घट्ट दह्याची कवडी.
त्या दिवशी अख्ख्या घरालाच उपास असायचा. उसळ गट्ट करून शाळेत जायची लगबग
सुरू असायची, तेव्हा महादेवाच्या पिंडीवर आईचा ओम नमः शिवाय म्हणत बेल
अर्पण झालेला असायचा. हिरव्याकंच बेलावर आईने महादेवाला वाहिलेली तांदळाची
पांढरी शिवामुठ मोठी साजरी दिसायची. धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥
सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥ देवघरात बसलेल्या आईची पाठमोरी
आकृती, तिचा पाठीवर रुळणारा वेणीचा लांबसडक शेपटा, शब्दांच्या आघातासह
हलणाऱ्या तिच्या कानातल्या कुड्या आणि भक्तीत न्हाऊन निघालेला काहीशा
थकलेल्या आवाजातला तिच्या मुखातून उमटणारा शिवलिलामृताचा ११ वा अध्याय.
शाळेत जाणारी पावलं काही क्षण थबकायची. संसाराचा भार वाहणाऱ्या कायम लगबगीत
असलेल्या रोजच्या आईपेक्षा ही आई निराळीच वाटायची. चटकन जाऊन त्या
पाठमोऱ्या आईला मागून बिलगावंस वाटायचं. आताही स्मृती पटलावर आईचं ते
चित्र अगदी ताजं आहे.
श्रावण सोमवार आणखी खूप खूप आवडण्याचं कारणं म्हणजे चार वाजता सुटणारी
शाळा. सकाळी फक्त बशीभर उसळ खाल्लेली असल्यानं शेवटचे दोन पीरेड उरलेले
असतानाच पोटात कावळे ओरडायला लागलेले असायचे. त्यामुळे वर्गात काय चाललंय,
ते सगळं डोक्यावरून जायचं. एकदाची सुट्टीची घंटा वाजायची. दप्तरात कशीबशी
पुस्तकं कोंबुन तार स्वरात वर्गप्रार्थना म्हणायची आणि घराकडे धुम ठोकायची.
आभाळ भरून आलेलं असायचं. पाऊस हमखास सोबतीला असायचा. एका छत्रीत दोघी-दोघी
मैत्रिणी. पुस्तक ओली होऊ नयेत, म्हणून छातीशी दप्तर कवटाळून चालू
लागायचं. घराघरातून अन्नाचे सुवास येत असायचे. पावसाने निथळत दारात उभं
राहायचं.
छपरीतल्या झोपाळ्यावर अंगाभोवती घट्ट पदर लपेटून आजी वाती वळत शिवस्तुती म्हणत असायची.
जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
घरात जाऊन बंबातल्या उन उन पाण्यानं हात-पाय धुवायचे. ओले केस कोरडे
करायचे. आणि देवाला नमस्कार करायला देवघरात जायचं. नुकतीच आरती झालेली
असायची. निरांजनातल्या ज्योतीच्या उबदार सुगंधानं चित्तवृत्ती अधिकच तरल
व्हायच्या. देवापुढे नैवेद्य वाढलेला असायचा. लिंबु, हिरवी चटणी, कोशिंबीर,
श्रावण घेवड्याची भाजी, पालकाची पातळ भाजी, कढी, तुपानं माखलेली पोळी, गोड
म्हणून कधी करवंदाचा गुळांबा, कधी केळाचं शिकरण तर कधी केशर-वेलची घातलेला
शिरा. मऊ गरम भाताची पांढरी शुभ्र मुद, त्यावर पिवळंधम्म वरण आणि त्यावर
कृष्ण तुळशीचं सावळं दळं.
परडीतलं बेलाचं पान वाहून अंगत-पंगत जेवायला बसायची. नुकतीच मुंज
झालेला शेजारचा विनु ब्राह्मण म्हणून जेवायला असायचा. कोपऱ्यात लावलेल्या
उदबत्तीचा सुगंध ताटातल्या सुग्रास अन्नाच्या सुगंधात मिसळून जायचा. आई
सगळ्यांना वाढत असायची. वाढताना तिच्या हातातल्या काकणांची नाजुक किणकिण
व्हायची. आईची हिरवी काकण आणि देवघरातल्या शिवलिंगावरची बेलाची हिरवी रास.
माझं मन उगाचंच त्या दोन हिरव्या रंगांशी घुटमळत राहायचं. भरलेल्या
आभाळामुळं तिन्हीसांजेलाच बाहेर अंधार दाटून आलेला असायचा. अधूनमधून
पावसाच्या सरींचा लयबद्ध नाद सुरू असायचा.
सगळ्यांची जेवणं उरकली की मागचं आवरून आई स्वयंपाकघरात तिचं ताट वाढून
घ्यायची. मी तिच्या बाजुला जाऊन बसायचे. अन्न ब्रह्म रसो विष्णु, म्हणत आई
हात जोडायची, तेवढ्यात बाहेरून हाळी यायची. माई पोळी वाढा. लगबगीने उठून आई
गोडाधोडासह साग्रसंगीत ताट वाढायची. दारात उभी राहून त्या ओल्या फाटक्या
कपड्यातल्या, थंडीने थरथरणाऱ्याला पडवीत बोलवायची. त्याला बसायला पोतं देऊन
भरलेलं ताट त्याच्यासमोर ठेवायची. त्याचं पोटभर जेऊन होईपर्यंत थांबायची.
तो तृप्तात्मा मनापासून आशीर्वाद देत चालायला लागायचा. रस्त्यावर साठलेल्या
पाण्यात त्याच्या अनवाणी पावलांचा आवाज कमी कमी होत होत नाहीसा व्हायचा.
अंधारात पुढे पुढे जाणारी त्याची आकृतीही दिसेनाशी व्हायची. आई स्वयंपाक
घरात यायची. मघापासून वाढून ठेवलेल्या ताटासमोर बसायची. पुन्हा मनोभावे हात
जोडायची. डोळे मिटून म्हणायची, आजचा श्रावण सोमवार सुफळ संपूर्ण झाला. आणि
घास घ्यायची. त्याचवेळी अंधाऱ्या पावसाळी आभाळात वीज चमकायची. एव्हाना
माझ्या डोळ्यावर पेंग आलेली असायची, मनात पहाटे बाबांच्या धीरगंभीर स्वरात
ऐकलेले निर्वाण षटकम रुंजी घालत असायचं,
अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्
न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥