सद्गुरुं तं नमामि
स्वाती हुद्दार
c
आषाढ मध्यावर आला की परमेश्वराची असीम कृपा आभाळातून जलधारांच्या रुपात
बरसू लागते. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पायी डोई ठेऊन कृतकृत्य झालेल्या
वाऱ्या परतीच्या मार्गाला लागलेल्या असतात. वारकऱ्यांनी उधळलेल्या
अबीर-गुलालाच्या रंगांनी दशदिश्या कोंदलेल्या असतात. पावसानंही अभंगाचाच
सूर धरलेला असतो. पानांवर टपटपणाऱ्या पाऊस थेंबांनी टाळ-चिपळ्यांचा नाद
घुमत असतो. अशावेळी येते गुरुपौर्णिमा. बाहेर घनघोर पाऊस बरसत असला तरी
मनामनांमध्ये गुरुंवरील श्रद्धेचे चांदणे फुललेले असते आणि भक्तीच्या पूर्ण
चंद्राने मनाचे अवघे आकाश व्यापलेले असते.
गुरु: ब्रह्मा: गुरु: विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: | गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ||
गुरू म्हणजे कोण ?
'गु' ह्या शब्दाचा अर्थ आहे अंध:कार व 'रु' चा अर्थ त्या अंध:काराला पुसून टाकणारा प्रकाश!
एखाद्याला योग्य मार्ग दाखवित त्याच्या आयुष्यातला अंध:कार नाहीसा करून
त्याचे जीवन प्रकाशमय करणारा तो गुरु. असा 'गुरूचा' अर्थ आहे.
ज्ञान देणारा म्हणजेच प्रकाश देणारा तो गुरू होय.
कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. मानवाला जगण्यासाठी
ज्या-ज्या गोष्टी सहाय्यभुत ठरतात, त्या सगळ्याप्रती कृतज्ञ राहणे ही
भारतीय परंपरा आहे. विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून आपण ती कृतज्ञता
वारंवार व्यक्त करीत असतो. चातुर्मासाचे चार महिने म्हणजे तर अशा उत्सवांची
पर्वणीच. अगदी शेती उद्योगासाठी मदतगार असलेल्या बैलांपासून,
सापांपर्यंतच्या सूक्ष्म सजीवांची आणि सूर्य, अग्नी, वायू, चंद्र, पृथ्वी
अशा पंचमहाभुतांचीही आपण कृतज्ञता म्हणून पुजा बांधतो.
अशा संस्कृतीत जीवनाची वाटच उजळून टाकणाऱ्या गुरुंप्रती तर अनन्य
शरणभाव असणे, स्वाभाविकच आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
गुरुपौर्णिमेचा.
गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा. शिक्षित करणारा. ते शिक्षण भौतिक
जीवनाविषयीचे असते आणि पारमार्थिक जीवनाविषयीचेही असते. भौतिक शिक्षण
देणाऱ्या गुरुंना शिक्षक (टिचर) असे संबोधले जाते आणि पारमार्थिक शिक्षण
देणाऱ्या गुरुंना सद्गुरु म्हणतात.
पौराणिक काळात गुरुकुल पद्धती होती. तेव्हा शिष्य गुरु गृही (आश्रमात)
राहून अस्त्र-शस्त्र विद्येचे शिक्षण घेत असत. राजनीतीचे धडे गिरवित असत.
गुरुगृही राजपरिवारातील मुले आणि सर्वसामान्यांची मुले एकत्र शिक्षण घेत.
सांदीपनी मुनींच्या आश्रमात शिकणारे कृष्ण-बलराम आणि सुदामा आपल्याला
माहिती आहेत. कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य आणि त्यांनी शिष्यत्व
नाकारले तरीही त्यांना मनोमन गुरु मानून त्यांच्या पुतळ्यसमोर शस्त्राभ्यास
करून अर्जुनापेक्षाही मोठा धनुर्धारी होणारा आणि गुरुंनी गुरुदक्षिणा
मागताच क्षणाचाही विलंब न करता उजव्या हाताचा अंगठा त्यांच्या पायावर
अर्पण करणारा एकलव्य. अशी गुरुशिष्यांची उज्ज्वल परंपरा पौराणिक काळात
दिसते.
संगीत आणि नृत्य कलेतही गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
गुरुगृही राहून संगीताचे आणि नृत्याचे धडे गिरवणाऱ्या अनेक नामवंत
गुरुशिष्य जोड्या आहेत. अर्थात हे झाले लौकिकार्थाने. पारमार्थिक
क्षेत्रातील गुरुशिष्य परंपरा ही तर अलौकिकच.
परमतत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गुरुंचे माहात्म्य खुद्द
परमेश्वरापेक्षाही अधिक असते, असे संत सांगतात. परमेश्वरापर्यंत
पोहोचण्याचे अनेक साधना मार्ग आहेत. अनेक पंथ संप्रदाय आहेत. मात्र त्या
सगळ्यांनीच गुरुंचे महत्व अधोरेखीत केले आहे. आणि गुरुभक्तीला अनन्यसाधारण
महत्व दिले आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तरी नाथ संप्रदाय, महानुभाव
संप्रदाय, श्रीदत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या
सगळ्या संप्रदायांमध्ये उज्ज्वल अशी गुरुशिष्य परंपरा आहे.
वारकरी संप्रदायातील गुरुशिष्य परंपरेचा विचार इथे करुया.
गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता,
जो गुरुसेवेपरौता, मार्ग नेणें
असे खुद्द संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.
ज्ञानदेवांचे वडिलबंधु संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. आणि निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ होते.
निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गयिनीनाथे सोय दाखविली ॥ असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे
ही गुरु परंपरा पुढे आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकरापर्यंत जाते. मात्र
ज्ञानदेवांना नाथ संप्रदायाची दिक्षा देऊनही निवृत्तीनाथांनी त्यांना
सर्वसामान्यांना सामावून घेणाऱ्या भक्तिमार्गाचा प्रसार करण्याची आज्ञा
केली आणि वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली अठरापगड समाज एकत्र आला. १२
व्या शतकातली सामाजिक समरसतेची ही घटना अभुतपुर्वच म्हटली पाहिजे. इथे
एकत्र आलेला समाज भेदाभेद रहित होता. जात-पात, वर्ण, लिंग, वय या कशाचेही
बंधन इथे नव्हते. ज्ञान आणि भक्ती इथे वयानुसार तोलली जात नाही. म्हणूनच
चिमुरडी मुक्ताई चौदाशे वर्ष वय असलेल्या चांगदेवांची गुरू असते.
गुणातीत डहाळी पाळणा लाविला | तेथे सुत पहुडला मुक्ताईचा
असे मुक्ताई चांगदेवांविषयी म्हणते.
सगुण भक्तीत अत्युच्च पातळीवर पोहोचलेल्या संत नामदेवांचे गुरु निर्गुण
निराकाराची आराधना करणारे विसोबा खेचर असतात. संत चोखोबांचे गुरु
संतश्रेष्ठ नामदेव होते.
धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा
माझा निरसिला भेवो, दाखविला पंढरीरावो
असे चोखोबा म्हणतात.
चोखोबांचे अवघे कुटुंबच विठ्ठलभक्तीत लीन होते.
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग असा उत्कट अभंग चोखोबांच्या पत्नी सोयराबाई लिहितात.
गुरुभक्ती आणि गुरुकृपा याचे वर्णन वेद-उपनिषदापासून ओवी-अभंगांपर्यंत आहे. या सगळ्या वर्णनानंतरही गुरु महात्म्य दशांगुळे उरतेच.
सामान्यांसाठी गुरु म्हणजे सुतचिंता वाहणारी माता. दुर्मार्गावरुन
सद्मार्गावर आणणारा पथदर्शक. आपल्या साऱ्या चिंता, सारे क्लेष ज्यांच्यावर
सोपवून निर्धास्त व्हावे, असे ठिकाण. असे सद्गुरू इच्छुक साधकांना लाभावे
आणि त्यांचे लौकिक आणि पारमार्थिक जीवन उजळून निघावे, हिच सद्गुरू चरणी
प्रार्थना.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि