बोलणारी भांडी
©स्वाती हुद्दार
स्वयंपाकघर हा स्त्रीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गेल्या २०-३० वर्षात
स्वयंपाकघरांमध्ये आमुलाग्र परिवर्तन आलं. आधीची स्वयंपाकघरं
तांब्यापितळेच्या भांड्यांनी सजलेली असायची. तेव्हा मोड्युलर किचन हा
प्रकार नव्हता, त्यामुळे सगळा उघडा कारभार. सौंदर्याची आवड स्त्रीमध्ये
उपजतच असते. त्यामुळे चिंच लाऊन चकचकीत केलेले पितळेचे डबे
स्वयंपाकघरातल्या फडताळांवर कलात्मकतेने सजलेले असत, मोठ्या आकाराच्या
डब्यापासून लहान डब्यापर्यंत. वाटी-पेले पिरॅमिडसारखे एकावर एक रचलेले
असायचे. भिंतीवरच्या ताटाळ्यात बरोब्बर आकारानुसार ताटं बसलेली असंत.
पळीचमच्यांच्या स्टॅंडवर सराटे, झारे, भातवाढणी, चमचे सगळे अदबीनं उभे
असतं. भिंतीवर टांगलेल्या लाकडी फडताळावरच्या कप्प्यांमध्ये बशा हारीने
बसलेल्या असतं आणि कपांचे कान मात्र खुंटीला टांगलेले असतं. त्याच फडताळात
चहा-साखरचे डबे दक्षच्या स्थितीत उभे असतं. भिंतीवरच्या खुंटीवर
पाखडण्याच्या सुपाने तिरकस मान करीत आपली जागा पटकावलेली असे. छताला मधोमध
टांगलेल्या शिंकाळ्यात दुधाचं भांड समारंभाच्या अध्यक्षासारखं ऐटीत
विराजमान झालेलं असे. भिंतीलगतच्या लाकडी रॅकमध्ये निगुतीने घातलेल्या
आंब्या-लिंबाच्या लोणच्यांचा चवदार भार सांभाळत चिनीमातीच्या बरण्या
फडक्याने मुसक्या बांधुन हारीने उभ्या असत. जाळीच्या लाकडी कपाटात नुकत्याच
विरजायला लावलेल्या दह्याची दगडी, खालच्या खणात तिखटा-मीठाचं लाकडी पाळं,
तेलाचा कावळा असायचा. कपाटाच्या बाजुला खलबत्ता, पाटा-वरंवटा ठेवलेला
असायचा.
कालांतरानं स्वयंपाकघराचं रुपच पालटलं. ते अत्याधुनिक झालं.
सिनेमातल्यासारखं चकचकीत झालं. आधुनिक संसाधनांनी परिपूर्ण झालं.
पाझरणाऱ्या माठाच्या जागी फ्रीज आले. मायक्रोव्हेव आलेत.
खलबत्ता-पाटावरवंट्याच्या जागी मिक्सर आलेत. तांब्यापितळेच्या भांड्यांच्या
जागी ॲल्युमिनियम, स्टील आले, नॉनस्टिक आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं
म्हणजे मॉड्युलर किचन आलं. सगळं कसं चकचकीत, पसाऱ्याचं नावच नाही. मात्र
काही जुनी भांडी काळ ओलांडून, पिढ्या ओलांडून आजही चकचकीत नव्या झालेल्या
स्वयंपाकघरात ( नव्हे किचनमध्ये) ठाण मांडून बसलेली आहेत. काही जुनी भांडी
वारशाने आलेली असतात. त्यावर या मालकिणीचा अधिकच जीव असतो.
ती भांडी हाताळताना खूप नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. दोन पिढ्यांनी
हाताळलेल्या पोळपाटावर पोळी लाटताना त्या पोळपाटावर फिरलेले आधीच्या पिढीचे
हात हळंवं करून जातात. माहेरून आलेल्या साखरेच्या डब्यातून चहात साखर
टाकताना माहेरच्या प्रेमाची गोडी अलगद चहात उतरते. आवडीनं घेतलेली नॉनस्टिक
कढई असतानाही सांजा करायला घेताना हात सासुबाईंच्या जुन्या जाड बुडाच्या
कढईकडेच जातो. आणि रवा भाजता-भाजताच ती कढई सांगू लागते, आपणच नवी नवरी
असताना पहिल्यांदाच बिचकत बिचकत केलेल्या सांजाची कहाणी. पहिलाच घास तोंडात
गेल्यावर सासऱ्यांची आलेली व्वा ही प्रतिक्रिया, सासुबाईंचं हसून दाद
देणं, आणि अहोंची सगळ्यांसमोर न बोलताच जाणवलेली कौतुकभरली नजर. त्याचवेळी
नेमंकी सांजातली मिरची चावली जाऊन हिच्या डोळ्यात टचकंन आलेलं पाणी आणि
लागलेला जीवघेणा ठसका. या कढईला इतक्या वर्षांपूर्वीचं सगळंच अगदी क्रमवार
कसं लक्षात आहे, न कळे.
नव्या कोऱ्या स्वयंपाकघरात अजूनही मानानं विराजमान असलेली अशीच फोडणीची
लोखंडी पळी. वडा भात, डाळभाजी सांजेच्या आमटीला हिच्याशिवाय पूर्णत्व
नाहीच. गेल्या तीन पिढ्या तरी याच लोखंडी पळीतून दिलेल्या हिंग-मोहरीच्या
तडतडीत फोडणीने संसार खमंग आणि चरमरीत झाले आहेत.
तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण भांडी बोलतात ती अशी. ती स्पर्शातून
त्या घरमालकिणीशी संवाद साधतात. प्रत्येक भांड्याला आपली कहाणी असते.
काहीतरी इतिहास असतो. आणि तो त्या घर मालकिणीला माहिती असतो. पैशांचे
व्यवहार, कोणाच्या वाढदिवसाच्या तारखा, कसल्या कसल्या सनावळी हे अजिबात
लक्षात न ठेवणारी स्त्री तिच्या घरातले कोणते भांडे कधी घेतले किंवा कोणी
दिले, हे झोपेतही सांगू शकते. काही भांड्यांवर पोचेही आलेले असतात. ते कधी
धावपळीचे असतात, कधी नाराजीचे असतात, कधी रागाचेही असतात. त्या पोच्यांच्या
कहाण्याही त्या गृहिणीला ठाऊक असतात.
घरातल्या गृहिणीच्या मनस्थितीनुसार कधी भांडी खूप आवाज करतात, कधी अगदी
चिडीचूप असतात. स्वयंपाकघरातल्या त्या अर्थपूर्ण संगीतावरून जो घरमालक
गृहलक्ष्मीच्या मनस्थितीचा वेध घेऊ शकतो, तो खरा कुशल घरमालक. शब्दवेध
घेणाऱ्या कुशल तीरंदाजासारखाच भांडेवेध घेणारा कुशल घरमालकही महत्त्वाचा
असतो. आणि त्याच्या कुशलतेवरच त्या घराचे सौख्य सामावलेले असते. खरं ना?
तुमच्या घरची भांडी बोलतात? अगदी सहज विचारलेला प्रश्न!
©