सिनेमातली देशभक्ती
स्वाती हुद्दार
आज कभी खुशी कभी गम सिनेमा बघितला. त्यात एक खूप टची सीन आहे.
लंडनमध्ये राहणारे अंजली आणि राहुल त्यांच्या मुलाच्या क्रिशच्या शाळेतील
ॲनिवल फंक्शनला जातात. तिथे क्रिश भारताचे राष्ट्रगीत सादर करतो. आणि तिथे
उपस्थित असलेले सगळे लंडनवासी भारताच्या राष्ट्रगीताला उभे राहून मानवंदना
देतात. कौटुंबिक मतभेद, विभक्त झालेला परिवार, त्यांचे मनोमिलन ही
पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात देशभक्तीची वीणही छान गुंफली गेली आहे.
सिनेमात नेहमीच सामाजिक स्थितीचे, घटनांचे प्रतिबिंब उमटत असते.
देशभक्ती हा तर हिंदी सिनेमांचा आवडता विषय. हिंदी चित्रपटांचाच अगदी
सुरुवातीपासून विचार केला तरी प्रत्येक दशकातील चित्रपट निर्मितीत एक
चतुर्थांश चित्रपट तरी देशभक्तीवरचे असतील. याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व
काळापासून झाली. १९४३ साली बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या किस्मत या
सिनेमातले कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेले दूर हटो ऐ दुनियावालो
हिंदुस्तान हमारा है, हे गीत तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाले होते. त्यासाठी
इंग्रजांनी कवी प्रदीप यांच्या नावाने अटक वॉरंटही जारी केला होता. आणि कवी
प्रदीप यांना भुमिगत व्हावे लागले होते.
देशप्रेमाची पार्श्वभूमी असलेला १९५२ मधला सिनेमा म्हणजे आनंदमठ.
बंकिमचंद्र चॅटर्जींच्या कादंबरीवर आधारलेला. सर्व देशभक्तांसाठी मंत्र
ठरलेले वंदेमातरम हे बंकिमचंद्रांच्या लेखणीतून उतरलेले गीत या चित्रपटात
आहे. २००३ साली बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने १६५ देशांमध्ये घेतलेल्या
"World's Top Ten" songs of all-time या पोलमध्ये हे वंदेमातरम गीत दुसऱ्या
क्रमांकावर होते.
१९६५ साली प्रदर्शित झालेला स्वातंत्र्यलढ्यावर आधारलेला शहीद सिनेमा सुद्धा त्याकाळी अत्यंत लोकप्रिय ठरला.
ज्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन लोक लढले, ते
स्वातंत्र्य पदरात तर पडले पण फाळणीची जखम देऊन. या विभाजनाने अनेक नवीन
प्रश्न उभे ठाकले. अनेक नवीन जखमाही दिल्या आणि सिनेमाला नवे हळवे विषय
मिळाले. अमृता प्रितमच्या पिंजर कादंबरीवर आधारलेला पिंजर हा चित्रपट असाच
फाळणीच्या वेदनांवर भाष्य करणारा.
स्वातंत्र्यानंतरचे प्रश्न अधिकच जटील होते. एकदा स्वातंत्र्या मिळाले
की जादुची कांडा फिरवल्यासारखे सगळे प्रश्न संपतील, असा भाबडा आशावाद
जपणाऱ्या स्वप्नाळु लोकांसाठी तर हा मोठा धक्का होता. या सगळ्या भावना
साहिरने त्याच्या काव्यातून मांडल्या.
वो उजले दरीचों में पायल की छन-छन
थकी-हारी साँसों पे तबले की धन-धन
ये बेरूह कमरों में खाँसी की ठन-ठन
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं
गरीबी, बेरोजगारीसारख्या अनेक समस्यांशी देश झगडत होता.
यांत्रिकीकरणामुळे माणसाच्या अस्तित्वावरच उभे राहिलेले प्रश्नचिन्ह. त्या
सगळ्याचे प्रतिबिंब सिनेमांमध्ये उमटू लागले. हाच आशय अभिव्यक्त करणारा मदर
इंडिया १९५७ साली प्रदर्शित झाला .
७० च्या दशकात देशप्रेमाचे भरते आलेला मनोजकुमारचा पुरब और पश्चिम आला.
त्यानंतर आले उपकार, क्रांती. आणि मनोजकुमार भारतकुमार म्हणून ओळखला जाऊ
लागला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर १९७३ साली चेतन आनंदने दिग्दर्शित
केलेला हिंदुस्तान कि कसम आला. चेतन आनंदने १९६२ च्या भारत-चीन युद्धावरही
१९६४ मध्ये हकिकत हा सिनेमा काढला होता.
१९९२ साली प्रदर्शित झालेल्या मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाला
काश्मीरमधल्या दहशतवादाची पार्श्वभुमी आहे. या चित्रपटातल्या भारत हमको जान
से प्यारा है या गाण्याने आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
१९९३ सालचा नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या अभिनयाने सजलेला तिरंगा हा
देखील लक्षात राहण्यासारखा सिनेमा होता. त्यानंतर भारत-पाकिस्तान
युद्धातील सत्यघटनांवर आधारलेला सनी देवल, सुनाल शेट्टी, अक्षय कुमार
यांच्या भूमिका असलेल्या बॉर्डरने तरुणांना वेडे केले होते. आणि त्यानंतर
देशभक्तीने ओतप्रोत सिनेमांचा दौरच सुरू झाला.
२००१ साली देशप्रेमावर आधारलेले दोन सिनेमे आले. एक आशुतोष गोवारीकरचा
लगान आणि दुसरा अनिल शर्माने दिग्दर्शित केलेला गदर एक प्रेम कथा. लगानचे
आॅस्करसाठी नॉमिनेशन झाले होते. जुल्मी इंग्रजी सत्तेविरुद्ध सर्वसामान्य
गावकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे अत्यंत भावपूर्ण चित्रण या सिनेमात आहे. आणि
गदर फाळणीच्या दुःखाला जाऊन भिडतो.
२००२ साली शहीद भगतसिंगाच्या जीवनावर आधारलेला द लिजंड आॅफ भगतसिंग
प्रदर्शित झाला. यामध्ये अजय देवगणने भगतसिंगाची भूमिका साकारली होती.
राष्ट्रीय पुरस्कारासह तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटातील ए
आर रहमानच्या संगीताने नटलेल्या पगडी संभाल, मेरा रंग दे बसंती, सरफरोशी
कि तमन्ना, देस मेरे देस मेरे या गाण्यांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य
केले.
२००३ मध्ये कारगिल युद्धावर आधारीत एलओसी कारगिल, २००४ मध्ये लक्ष्य
असे देशभक्तीने भारलेले चित्रपट आले. २००६ मध्ये आलेला रंग दे बसंती हा
स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतीकारकांना सलाम करतानाच भ्रष्ट व्यवस्थेवरही
प्रहार करतो.
२००७ साली आलेला चक दे इंडिया हा हॉकी खेळाच्या माध्यमातून
देशप्रेमापर्यंत पोहोचवणारा असाच एक मनात रुतून बसलेला सिनेमा. अलिकडच्या
काळात तर एकाहून एक सरस सिनेमे आले. २०१५ साली आलेला अक्षयकुमारचा बेबी
असाच दिलखेचक सिनेमा. त्यातील हर जंग बॉर्डर पर नही लढी जाती किंवा रिलिजन
वाले कॉलम मे हम बोल्ड और कॅपिटलमे इंडियन लिखते है, असे अनेक संवाद टाळ्या
घेऊन गेले.
२०१८ साली आलेला मेघना गुलजारने दिग्दर्शित केलेला राझी असाच मनाचा ठाव
घेऊन गेला. देशासाठी घर-दार, कुटुंब सगळे पाश तोडून आपल्या जीवाची बाजी
लावून खुद्द शत्रुच्याच घरात लग्न करून वास्तव्याला जाणारी आणि तिथुन
सेनेसाठी गुप्तपणे बातम्या पुरवणारी सहमत काल्पनिक नाही. सत्य घटनेवर
आधारलेला हा सिनेमा मनात देशाभिमान जागवतो. वतन के आगे कुछ भि नही, खुद भि
नही, असे म्हणणारी सहमत मनावर राज्य करते.
तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहा रहू जहाँ में याद रहे तू
ऐ वतन
मेरे वतन
असे म्हणणारी सहमत खूप खूप आवडून जाते.
आणि उरी सर्जिकल स्ट्राईकने तर देशात जोश निर्माण केला. हाऊज द जोश, हा
संवाद अत्यंत लोकप्रिय ठरला. प्राणांची पर्वा न करता शत्रुच्या सीमेत
घुसून आपल्या देशाच्या अपमानाचा बदला घेणारे जॉं बाज सैनिक पाहून आपलाही उर
अभिमानाने भरून येतो.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय हिंदी सिनेमातील
देशभक्तीपर सिनेमांचा हा धावता आढावा, मात्र हा कॅनव्हॉस प्रचंड मोठा
असल्यामुळे सर्वांचाच अंतर्भाव यामध्ये झालेला नाही. मात्र स्वातंत्र्यदिन
चिरायु होवो, या शुभेच्छेसह इथेच थांबुया.