बाप ज्ञानेश्वर समाधिस्त
स्वाती हुद्दार
अखंड अव्याहत वाहते आहे इंद्रायणीचे उदंड पाणी. युगानुयुग. काठावरच्या
गाव-शहरांना सुजलाम्, सुफलाम् करीत. तिच्यासाठी काठावरची सगळी गावं सारखीच.
मात्र एक गाव तिच्यासाठीही विशेष. आळंदी. सातशे वर्षांपूर्वी आपलं अखंड
वाहतेपण थांबवून काही क्षण स्तब्ध होत तिनं तो सोहळा याची देही याची डोळा
अनुभवला होता. त्यावेळी उचंबळून आले होते तिचे जल. त्या पद्मासनातल्या
ध्यानस्थ पावलांवर अभिषेक करण्यासाठी.
जो जे वांछिल तो ते लाहो, असे जगत्कल्याणाचे पसायदान मागणारा योगी कायम तिच्याच काठी स्थिरावणार होता.
हरिपाठ, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी या ग्रंथांच्या
माध्यमातून शंभर जन्म अभ्यासल्यानंतरही जे तत्वज्ञान आकळणे कठीण आहे, ते
वयाच्या अवघ्या विशीत सांगणारा आणि स्वतःच्या आयुष्यातही ते तत्वज्ञान अलगद
उतरविणारा तो योगी. सगळ्या भावभावनांवर विजय मिळविलेल्या त्या ज्ञानवंताची
पावलं संजीवन समाधीसाठी जेव्हा इंद्रायणीच्या काठी आलीत, तेव्हा थरारली
इंद्रायणी आणि थरारली विठ्ठलाच्या पायाखालची वीटही.
ज्ञानदेवांपेक्षा वयानं बरेच मोठे असलेले, सगुण भक्तीत मोठा अधिकार
असलेले ज्ञानदेवांचे सुह्रद संत नामदेवांनी या समाधी सोहळ्याचे अत्यंत
भावपूर्ण असे वर्णन करणारे अभंग लिहिले आहेत.
महा उत्सव त्रयोदशी।केला त्या ज्ञानदेवासी॥
मग नाम म्हणे विठोबासी।चरण धरूनिया॥
समाधिसुख दिधलें देवा।ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा॥
अजानवृक्षी बीज वोल्हावा।
तीन दिवस चालला होता समाधी सोहळा. पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीसह अवघा
संतमेळा लोटला होता अलकापुरीत. वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध चांगदेवांपासून,
नामदेव त्यांचे अवघे कुटुंब, जनाई, चोखोबाराय आणि त्यांचे विठ्ठलभक्त
कुटुंब आणि ज्ञानदादाच्या अंगाखांद्यावर खेळत-बागडत मोठी झालेली आणि पुढे
जगावर रुसलेल्या ज्ञानदादालाच ताटीच्या अभंगातून जीवन तत्वज्ञान सांगणारी
इवलीशी मुक्ताई, ज्ञानदादाच्या पावलावर पाऊल ठेवतच वेदांताचे सार जीवनात
उतरविणारा सोपान आणि या ज्ञानवंताचे शिष्यत्व अभिमानानं मिरवणारे, स्वतः
योगमार्गावर वाटचाल करून ज्ञानाच्या खांद्यावर भक्तिमार्गाची ध्वजा
रोवणारे, पोरक्या भावंडांना आईची माया देणारे पितृतुल्य वडिलबंधु
निवृत्तीनाथ आणि वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली एकत्र आलेला अवघा
अठरापगड जनसमुदाय. असे सगळे सगळे गोळा झाले होते, लाडक्या ज्ञानेश्वरांना
निरोप देण्यासाठी.
नामदेव लिहितात,
धन्य इंद्रायणी, पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभुमी
अलंकापुरीतले श्री सिद्धेश्वराचे पुरातन मंदीर, प्रचंड अजान वृक्ष आणि
दक्षिण वाहिनी इंद्रायणीचा अखंड प्रवाह. अजानवृक्षाच्या छायेखाली एक दोन
खणांची गुहा म्हणजे समाधिस्थान ज्ञानेश्वरांनी तयार करविले होते. ज्ञानाला
निरोप देण्यासाठी एकत्र आलेला आप्तेष्टांचा प्रचंड जनसमुदाय. एकादशी,
द्वादशी, त्रयोदशी तीन दिवस सतत नामसंकीर्तन, ग्रंथपठण, पारायण, प्रवचन.
सारे भारलेले वातावरण. प्रत्येकजण इश्वर चिंतनात दंग. मनातून मात्र हळवा
झालेला. तीन दिवसांनंतर त्या ज्ञानी चरण युगुलांचा कायमचा वियोग होणार
होता. त्या गर्दीत खरेतर सारेच ज्ञानी, तपस्वी, षडरिपुंवर विजय मिळविलेले.
मात्र ज्ञानदेवांच्या वियोगाच्या जाणिवेने साऱ्यांचीच अवस्था भावव्याकुळ
झालेली.
कार्तिकी त्रयोदशी. माध्यान्हीचा समय. समाधीची वेळ जवळ येत होती, सारे
वारकरी सिद्धेश्वर मंदिराजवळ गोळा झाले. प्रत्येकाला माऊलीच्या पायावर डोई
ठेवायची होती.
नामदेव महाराजांच्या चारही मुलांनी समाधी स्थळ झाडून पुसून स्वच्छ केले.
नारा विठा गोंदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधीची
आसनावर बेल, तुळशीपत्र अंथरण्यात आले आणि समोर ठेवली भावार्थ दीपिका
ज्ञानदेवांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले, पांडुरंग म्हणाले,
म्हणे ज्ञानदेवा परियेसी। तीर्थ भगिरथी अहर्निशी ॥
तुज नित्य स्नानाशी। दिधली इंद्रायणी दक्षिणवाहिनी॥
त्यानंतर ज्ञानदेव वळले निवृत्तीनाथांकडे. किती पदर होते या दोघांच्या
नात्याचे.आईवडिलांच्या मायेने सांभाळणारा वडिलबंधु, मनातले गुज व्यक्त
करणारा जीवाभावाचा सखा, योगमार्गातले गुह्य उलगडणारा गुरू. असे अनेक.
ज्ञानदेव निवृत्तीनाथांसमोर पदस्पर्शासाठी वाकले आणि आध्यात्माचे सार कोळून
प्यालेल्या वैराग्यमूर्तीं निवृत्तीनीथांचा बांध फुटला.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला। आणिकांच्या डोळा अश्रु येती॥
अमर्यादा कधी केली नाहीं येणें। शिष्यगुरूपण सिद्धी नेलें।
निवृत्तीनाथांना भावविभोर झालेले पाहिले आणि सारे वैष्णव व्याकुळ झाले. नामदेव म्हणतात,
नदीच्या माशा घातले माजवण, तैसे जनवण कालवले
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाटा मुरडती
मुक्ताई, सोपानाच्या दुःखाचे वर्णन तर शब्दातीत असे आहे.
ती ज्ञानमूर्ती मात्र स्थितप्रज्ञ होती. ज्ञानदेव समाधीच्या दिशेने
चालू लागले. निवृत्तीनीथांनी त्यांना दोन्ही करांनी धरले. ज्ञानदेवांना
समाधी भुयारात सोडून निवृत्तीनीथ गोपाळासह बाहेर आले आणि त्यांनी भुयारावर
शिळा ठेवली.
निवृत्तींने बाहेर आणिलें गोपाळा।
घातियेली शिळा समाधीसी ॥
सोपान मुक्ताईसह साऱ्यांनाच दुःखावेग अनावर झाला. साऱ्यांनी त्या जड शिळेवर पुष्पांजली अर्पण केली.
नामदेवें भावें केली असे पूजा।
बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥
वयोवृद्ध आणि सगुण भक्तीतील अधिकारी संत नामदेव ज्ञानराजांना बाप असं संबोधतात. तेव्हा त्यांचा आध्यात्मातला अधिकार लक्षात येतो.
सहमंडळी सारे उठले ऋषिश्वर।
केला नमस्कार समाधीसी॥
साऱ्यांनी ज्ञानोबारायांचा जयजयकार केला
नामा म्हणे आता लोपला दिनकर
बाप ज्ञानेश्वर समाधिस्त
ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीमुळे वारकरी सांप्रदायिकांची अवस्था ज्ञानसूर्यच अस्ताला गेल्यासारखी झाली. सारे हळुहळु मार्गस्थ झाले.
इंद्रायणी काठी, सिद्धेश्वर मंदिराच्या बाजुला, अजान वृक्षातळी मात्र
कायमचा दिव्य प्रकाश पसरला. शतकांमागून शतकं उलटली, मात्र त्या दिव्य
तेजकणांमध्ये आजही वारकरी न्हाऊन निघतात.
तिथे आजही सुरू आहे जगत्कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाची धीरगंभीर
आवर्तनं. आजही जाणवतात पांडुरंग भक्तीत लीन झालेल्या सत्शील वैष्णवांच्या
भक्तीची कंपनं, अजान वृक्षाच्या पानांची कृतकृत्य अव्याहत सळसळ आणि
माऊलींच्या समाधीला अविरत अभिषेक करीत कृतार्थ झालेला इंद्रायणीचा खळाळता
प्रवाह.